Thursday, November 06, 2008

अमेरिकेत सारे कांही शक्य आहे




मी अमेरिकेत आलो तेंव्हा इथे होऊ घातलेल्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. पण अमेरिकेत भ्रमण करतांना रस्त्यात कोठेही मोठी छायाचित्रे असलेले अवाढव्य फलक दिसले नाहीत की कोठेही ध्वनीवर्धकांचा कर्कश गोंगाट ऐकू आला नाही. न्यूयॉर्क आणि शिकागोसारख्या महानगरांमधल्या मोठ्या मैदानात किंवा इतर शहरांमधल्या मोठ्या सभागृहांमध्ये प्रचाराच्या सभा होत असत आणि त्याचे वृत्तांत टी.व्ही.वर दाखवत होते. त्याखेरीज टी.व्हीवरील कांही चॅनेल्सवर निवडणुकीनिमित्य सतत कांही ना कार्यक्रम चालले असायचे. आजकाल इकडे प्रचाराचा सर्वाधिक भर बहुधा टी.व्ही.वरच होत असावा. ओबामा आणि सिनेटर मॅकेन यांच्या वेगवेगळ्या तसेच अमोरासमोर बसून घेतलेल्या मुलाखतीसुध्दा झाल्या.

येथील लोकांच्या स्थानिक समस्यांशी माझे कांहीच देणे घेणे नसल्यामुळे मी जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न कधी केला नाही, पण त्यांच्या बोलण्याचा थोडा एकंदर अंदाज येत होता. प्रेसिडेंट बुश यांच्या कारकीर्दीत झालेल्या गैरव्यवहारामुळे आज अमेरिका आर्थिक संकटात सापडली आहे असाच येथील सर्वसामान्य जनतेचा समज आहे. पण त्याचे फार मोठे भांडवल करण्याचा मोह टाळून, "प्राप्त परिस्थितीतून बाहेर येऊन पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करण्याची अमेरिकन जनतेला गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ते करायचे आहे. " असे प्रतिपादन ओबामा करायचे. त्यासाठी करण्याच्या उपाययोजनांचे सूतोवाच ते आपल्या भाषणात करत. मॅकेन यांनी मात्र ओबामांच्या भाषणावर आसूड ओढण्याचेच काम मुख्यतः केले. मॅकेन यांच्या भाषणात जेवढा ओबामाचा उल्लेख मला आढळला तेवढा मॅकेन यांच्या नांवाचा उल्लेख ओबामांच्या भाषणात मला तरी जाणवला नाही. "ओबामा जे सांगताहेत ते ते कसे काय करणार आहेत?" असा सवाल मॅकेन हे नेहमी करायचे. त्यावर एक मंद स्मित करून "अमेरिकेत सारे कांही शक्य आहे" असे ओबामा सांगायचे.

ओबामा हे मिश्र वंशाचे आहेत याचा जेवढा गवगवा प्रसारमाध्यमांनी केला तेवढाच त्याचा अनुल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. "मी सर्व अमेरिकन जनतेचा प्रतिनिधी आहे." असेच ते नेहमी सांगत आले. त्यांनी विचारपूर्वक घेतलेल्या या धोरणाचा त्यांना चांगला फायदा झाला असे दिसते. एकजात सर्व गौरेतरांचा भरघोस पाठिंबा त्यांना मिळालाच, पण सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे असंतुष्ट असलेले बहुसंख्य गौरवर्णीय त्यांच्या बाजूला आले. त्यामुळेच ते प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत.

निवडणूक जिंकल्यानंतर लगेच केलेल्या भाषणाची सुरुवात श्री। ओबामा यांनी या शब्दात केली.
"If there is anyone out there who still doubts that America is a place where all things are possible; who still wonders if the dream of our founders is alive in our time; who still questions the power of our democracy, tonight is your answer."

"अमेरिका ही अशी जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे, याबद्दल जर अजूनही कोणाच्या मनात शंका असेल, आपल्या पूर्वजांची स्वप्ने आजही जीवंत आहेत कां असा विचार कोणाच्या मनात येत असेल, लोकशाहीच्या सामर्थ्याबद्दल कोणाला प्रश्न पडला असेल, तर आज त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत. " या शब्दात सिनेटर बरॅक ओबामा यांनी आपल्या विजयाचा स्वीकार केला. खरोखरच ज्या गोष्टीची कल्पनाही दोन वर्षापूर्वी कोणी केली नसती ती आज शक्य झाली आहे आणि त्याचे सर्व श्रेय ओबामा यांनी अमेरिकेच्या जनतेला दिले आहे. यात विनयाचा भाग किती आणि कृतज्ञतेची प्रामाणिक भावना किती असा प्रश्न कोणाला पडेल. पण ज्या आत्मविश्वासाने ओबामा यांनी आपली कँपेन चालवली होती त्याबद्दल इथे आलेल्या दिवसापासून मला त्यांचे कौतुक वाटत होते.

No comments: