Sunday, November 09, 2008

हेमंताचे दिवस मजेचे


ऋतुराज वसंताच्या आगमनाने सारी सृष्टी प्रफुल्लित होते. तिचे भाट कोकिलपक्षी वसंताचे स्वागत आपल्या सुस्वर गायनाने करतात असे मानले जाते. आपल्याकडे जागोजागी उत्साहाने निरनिराळ्या प्रकाराने व वसंतोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर येणारा दाहक ग्रीष्म ऋतू तापदायक वाटतो. त्यामुळे चातकाच्या आतुरतेने सारे लोक पहिल्या पावसाची वाट पाहतात. जीवनदान देणारा वर्षा ऋतू कांही दमेकरी सोडल्यास सर्वांनाच अत्यंत प्रिय असतो. पण भरपूर पाण्याची सोय होऊन गेल्यानंतर निरभ्र आकाशातले शरदाचे चांदणे आकर्षक वाटायला लागते. 'शारद चंदेरी' रात्रींची मजा चाखल्यानंतर वर्षाच्या अखेरीस शिशिरातल्या 'माघाची थंडी' धुंदी देते. या दोन ऋतूंच्या मध्ये येऊन जाणारा हेमंत ऋतू मात्र कधी सुरू झाला आणि कधी संपला याबद्दल फारसे बोलले जात नाही. त्याचे खास असे ठळक वैशिष्ट्य सांगता येत नाही.
युरोप अमेरिकेत असे सहा ऋतूंचे सहा सोहळे साजरे होत नाहीत. मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून पुढले सहा महिने रात्रीपेक्षा दिवस मोठा असतो आणि सप्टेंबरच्या शेवटल्या आठवड्यापासूनचे सहा महिने दिवसापेक्षा जास्त वेळ रात्र असते. या फरकामुळे होणारे तपमानातले बदल उन्हाळा (समर) आणि हिंवाळा (विंटर) या मुख्य दोन ऋतूंच्या रूपाने दिसतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला एकदम सगळी झाडे फुलांनी बहरलेली दिसू लागतात. या काळाला 'स्प्रिंग' म्हणतात. ऋतुचक्रातला हा पहिला ऋतू वसंताप्रमाणे लोकप्रिय असतो. पण त्यानंतर येणारा 'समर' जास्त सुखावह वाटतो. या काळात बहुतेक लोक सुटी घेऊन कुठे ना कुठे हिंडण्याफिरण्याचे आणि मौजमस्ती करण्याचे बेत आखतात. पूर्वी तर कित्येक संस्थांना केवळ यासाठी महिनाभर सुटी देत. त्यानंतर हिंवाळ्यातल्या थंडीची चाहूल लावणारा 'ऑटम' किंवा 'फॉल सीझन' येतो. अमेरिकेतले लोक मात्र सकारात्मक विचार करून त्याची मजा अनुभवतात.
या काळात निसर्गात एक अद्भुत दृष्य पहायला मिळते. योगायोगाने मला इकडे आल्या आल्या उत्तरेकडली घनदाट राने पहायला मिळाली. हेमंत (फॉल) ऋतू येताच ही झाडे आपला रंग बदलू लागतात. उन्हाळ्यात हिरवी गर्द दिसणारी वनराई लाल, केशरी, शेंदरी, सोनेरी, पिवळा धमक अशा विविध रंगांच्या असंख्य छटा धारण करते. एकादे संपूर्ण झाड लालचुटुक दिसते तर एकाद्या झाडाच्या निरनिराळ्या शाखा वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघाल्या असतात. कांही झाडांच्या फांद्या अनेक रंगांनी सजलेल्या असतात. या सगळ्या रंगरंगोटीमध्ये एक प्रकारची सिमेट्री असावी असे वाटते. 'फॉल कलर्स' या नांवाने ओळखले जाणारे हे दृष्य फारच विलोभनीय असे असते. अनेक पर्यटक मुद्दाम ते पाहण्यासाठी प्रवासाला निघतात.
या दिवसात, म्हणजे सध्या अजून दिवसातले अकरा तास उजेड असल्यामुळे कडाक्याची थंडी अजून सुरू झालेली नाही. पहाटे गारवा वाटत असला तरी उन्हे वर आल्यानंतर वातावरण प्रसन्न होते. संध्याकाळी ते आल्हाददायक असते. यावरून आपल्याकडल्या हेमंत ऋतूची आठवण येते. हे 'हेमंताचे दिवस मजेचे रविकिरणात नहाण्या'साठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडतांना दिसतात.

No comments: