Sunday, November 23, 2008

शाळेतले शिक्षण (भाग २)

ब्रिटीशांनी भारतात दोन प्रकारच्या सरकारी शाळा सुरू केल्या होत्या. त्या काळच्या भाषेत सांगायचे झाले तर "एतद्देशीय मनुष्यांना ज्या योगे त्यांच्या भाषेतच शहाणपण शिकून घेण्याचा लाभ घडेल" अशा उद्देशाने जागोजागी ('मराठी' सारखी) 'व्हर्नाक्युलर स्कूल्स' काढली होती. तेथील शिक्षणाची सुरुवात पहिल्या इयत्तेतल्या 'श्रीगणेशायनमः'ने होत असे आणि सातवीनंतर व्ह.फा. (व्हर्नाक्युलर फायनल) परीक्षेने ते संपत असे. फायनलची ही परीक्षा सर्वार्थाने अंतिम होती. त्यापुढे शिक्षण थांबतच असे. त्याहून अधिक शहाणपणाची 'एतद्दशीयांना' गरज नाही किंवा ते मिळणे इंग्रजांना अडचणीचे होईल असा विचार त्यांनी केला असणार. त्यातही शहाणपणाच्या चार गोष्टींबरोबरच "भो पंचमजॉर्जभूप धन्य" यासारख्या कविता आणि "येशूचे शुभवर्तमान" शिकवून त्यातून राजनिष्ठा आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसारही करीत असत.

'कल्याणकारी' इंग्रजांच्या सरकारचा कारभार सुरळीतपणे चालावा यासाठी 'लायक' व 'स्वामीभक्त' असा नोकरवर्ग निर्माण करण्याच्या हेतूने दुस-या प्रकारच्या म्हणजे 'इंग्रजी' शाळा सुरू केल्या होत्या. हवे असल्यास मराठी शाळेच्या चार इयत्ता पास केल्यानंतर या शाळांमधल्या पहिल्या इयत्तेत प्रवेश करून पुढील शिक्षण सुरू होत असे. त्यामुळे आपला मुलगा आता कितवीत आहे हे सांगतांना "तो इंग्रजी तिसरीत आहे " किंवा "मराठी चौथीत आहे" हे मुद्दाम सांगावे लागे. इंग्रजी शाळेत सात वर्षे शिकल्यानंतर मॅट्रिक्युलेशनची परीक्षा असे. ती पास होणे कठीण होते, त्यामुळे अनेकांना तो अडसर ओलंडता येत नसे. तिथपर्यंत पोचलेल्यांना 'नॉनमॅट्रिक' असे म्हणत असत. 'नॉनमॅट्रिक' हा शब्द वापरातून पार नाहीसा झाला होता. अलीकडे कुमारी गंगूबाईने त्याचे पुनरुज्जीवन केले. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतरच कॉलेजचे दरवाजे उघडत. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करीत डॉक्टरेटपर्यंत हवे तेवढे शिक्षण घेण्याची सोय अनेक शिक्षणमहर्षींच्या परिश्रमातून भारतात झालेली होती. कांही असामान्य कर्तृत्व असलेले लोक उच्च शिक्षणासाठी थेट इंग्लंडमध्ये जाऊन तेथून रँगलर, बॅरिस्टर, एफआरसीएस आदी पदव्या संपादन करीत.

मी शाळेत जायला लागलो तोंपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. महात्माजींच्या अहिंसक चळवळीमुळे ज्यांना प्रत्यक्ष इंग्रजांना ठोकायला मिळाले नव्हते त्यांनी त्याचा सूड इंग्रजी भाषेवर उगवून बहुधा तिलाही देशातून हद्दपार करायचा चंग बांधला असावा. सरकारी इंग्रजी शाळातून मॅट्रिकपर्यंतचे सारे शिक्षण भारतीय भाषांमधून द्यायला सुरुवात झाली. मातृभाषेतून शिक्षणाची संधी मिळणे ही उत्कृष्ट गोष्ट असली तरी त्यासाठी इंग्रजी भाषेचे एकदम उच्चाटन करण्यात थोडी घाई झाली होती. माझे सातवीपर्यंतचे शिक्षण मराठी शाळेत झाले. तिथे इंग्रजीचा गंधही नव्हता. 'व्हर्नाक्युलर फायनल'ची परीक्षाही बंद झाली. शाळेची सातवी परीक्षा पास करून आठवीला हायस्कूलला गेलो. तेंव्हा कुठे 'इंग्रजी' या एका विषयाची 'एबीसीडी' शिकायला सुरुवात झाली. मुळाक्षरे, शब्द, वाक्यरचना वगैरेच्या पाय-या पटापट ओलांडून शेक्सपीयरच्या नाटकांतले उतारे आणि वर्डस्वर्थच्या कविता शिकणे सगळ्यांना जमत नसे. त्यामुळे इंग्रजी हा विषय ज्यांचा कच्चा रहात असे त्यांना तो विषय वगळून शालांत परीक्षा पास होण्याची सोय केली होती. त्यामुळे 'ऐच्छिक' झालेला तो विषय शिकवण्याकडे अधिकच दुर्लक्ष होऊ लागले होते.
(क्रमशः)

No comments: