Thursday, November 20, 2008

सांत्वन

आम्ही दोघे एकाच उत्तुंग इमारतीमध्ये दहा बारा वर्षे तरी रहात होतो. पण पहिल्या मजल्यावर राहणारा लिफ्टसाठी थांबत नाही आणि एकोणीसाव्या मजल्यापर्यंत जिन्याने चढउतार करणे कठीण असते. यामुळे आमची गांठ कांही फारशी पडत नसे. महानगरीत राहणा-या लोकांत अशा परिस्थितीत जितकी ओळख होते तेवढा आमचा परिचय झाला होता. आमच्या गृहिणींना मात्र ओळखी पाळखी करून घेण्याची हौसही होती आणि एकमेकींच्या घरी जाऊन बसायला बोलायला पुरेसा मोकळा वेळही होता। त्यातून दोघींना संगीताची आवड असल्याने त्यांना एकत्र बांधणारा एक चांगला धागा मिळाला. त्यांची बरीच गट्टी जमली होती.

सेवानिवृत्तीनंतर आम्ही दोघेही नव्या मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात स्थाईक झालो. कधी तरी कुठेतरी योगायोगाने गांठभेट व्हायची आणि पुन्हा मुद्दाम ठरवून भेटायचे असे ठरवायचे. त्याप्रमाणे एकदा ते जोडपे आमच्याकडे येऊनसुद्धा गेले। मी त्या काळात आजारी होतो. त्यांचा पत्ता आणि तिकडे जाण्याच्या खाणाखुणा वगैरे पत्याच्या वहीत लिहून घेतल्या आणि बरे वाटल्यावर नक्की त्यांचे घर पहायला येण्याचे आश्वासन दिले. पुढे कांही ना कारणाने ते राहूनच गेले.

दरम्यान त्या गृहस्थांना श्वसनसंस्थेचा कर्करोग जडल्याची बातमी एके दिवशी कांनावर आली. आता त्यांना जाऊन भेटणे आवश्यक तर होते, पण तेंव्हा काय बोलायचे हा प्रश्न होता. हा रोग जडलेला माणूस बरा होण्याची शक्यताच नसल्याने त्यांना पैलतीर नजरेच्या टप्यात दिसू लागला असणार। अशा वेळी उगाच लवकरच बरे होण्याची खोटी आशा त्यांना दाखवायची की परलोक किंवा स्वर्गलोक चांगला मिळण्यासाठी कांही धर्मकार्यावर बोलायचे? तेही मलाच माहीत नसलेल्या विषयावर! मला कांहीच सुचत नव्हते. टाळाटाळ करायला कांही ना कांही कारणे येतच राहतात.

आणि एक दिवस त्यांच्या परलोकगमनाची दुःखद वार्ता घेऊन आला. आता शक्य तितक्या लवकर भेटायला जाणे जरूरीचे होते. पण ज्या गृहस्थाशी माझी जुजबी तरी ओळख होती तो आता राहिला नव्हताच। त्याच्या अनोळखी पत्नीशी मी काय बोलणार? माझ्या पत्नीच्या दोन तीन मैत्रिणी सांत्वन करायला जाणार होत्या त्यांच्याबरोबर तिला पाठवून दिले.

त्यांना या वेळी एक वेगळाच अनुभव आला. त्या गृहस्थाची पत्नी घरात असूनही त्यांच्याशी बोलण्यासाठी आधी ती बाहेर आलीच नाही. परगांवाहून आलेल्या कोणा नातेवाईकानेच "कसे झाले, काय झाले" वगैरेवर या मंडळींबरोबर थोडी चर्चा केली. त्यानंतर त्या गृहस्थाची पत्नी बाहेर आली. "मी आता मुंबई सोडून आपल्या गांवाकडे परत जायचे ठरवले आहे आणि त्यासाठी बांधाबांध करण्यात बिझी आहे. तुम्ही आजच आलात ते बरे झाले." एवढे सांगून परत आंतमध्ये चालली गेली. भेटायला गेलेली मंडळी हक्केबुक्के होऊन एकमेकींकडे पहात घराकडे परतली.

त्या बाईंच्या दृष्टीकोनातून थोडा विचार केला तर असे दिसेल की गेले कांही महिने तिने बरेच सोसले होते. त्या काळात तिच्या मदतीला कोणी गेले असते तर तिला त्यांचा प्रत्यक्ष कामांत बराच उपयोग झाला असता. त्यांचा भावनिक आधारही मिळाला असता. तेंव्हा त्यासाठी किती लोक गेले होते कोणास ठाऊक. कर्करोगामुळे पतीची दिवसेदिवस बिघडत गेलेली अवस्था पाहता पाहता तिचे मन येणारा प्रहार सोसण्यासाठी खंबीर झाले असणार. कदाचित तिने त्यानंतर काय करायचे याचा विचारसुद्धा दोघांनी मिळूनच करून ठेवलेला असणार. आता फक्त त्याच्या औषधोपचारासाठी ती इथे राहिली होती. त्याची गरज संपताच तिने शांतपणे पुढील आयुष्याला सामोरे जाण्याची तयारी तिने सुरू केली. सांत्वन करायला गेलेल्या मैत्रिणींचे त्या तिच्या दूरदेशी असलेल्या गांवाकडच्या जगात कांहीच स्थान नव्हते. त्याबद्दल त्यांनी कांही बोलावे असे सुध्दा तिला वाटले नाही. तिने ठरवलेल्या वाटेला आता कोणी फाटे फोडायला नकोत असेही तिला वाटले असेल। इथले सगळे पाश तोडून ती दूर जाणार होती. तेंव्हा "आता या लोकांच्याबरोबर बोलून तरी काय फायदा?" असा विचार तिच्या मनात आला असणार.

"सांत्वन करायला गेलेल्या मंडळींबरोबर ती अपेक्षेपेक्षा वेगळी, अगदी तुटकपणाने वागली. पण तिचे खरेच फार कांही चुकले कां?" यावर मी खूप वेळ विचार करत राहिलो. मला तरी त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.

2 comments:

Anonymous said...

Aapli postings me vachat aste.. visheshta pravasvarnana..pan first time pratikriya det aahe...

Agdi khar aahe.. jevha khari garaj aste madatichi or shabdik aadharachi teva konich yet nahi... ani mag nantar asha shabdik budbudyancha bhadimar nakosa hoto... kathin kalat javalche mitra natevaik madatila matra astat... tarihi ek samajik pratha mhanun santvan karayla lok jatatch.. kahi jatinmadhe eka tharavik veli 'prayer meeting' or 'baithak' arrange karnyachi paddhat aahe.. tya tharavik 1/2 tasanchya avdhit jyana santvan karayche aahe te yeun karu shaktat.. yamule kadhihi ghari yenyachi sankhya kami hote ani dukkhi jivana tras pan kami hoto... maharashtrian lokani pan ashach paddhativar 'ramraksha pathan' eka tharavik velat thevave.. janyaryacha aatmyalahi shanti milel, yenaryana ekach veli yeta yeil ani gharchyana pan sthir vhayla vel milel asa mala vatat...

Thanks.

Sarika

Anand Ghare said...

आपल्या सविस्तर प्रतिसादासाठी आभार.
या लेखात दिलेल्या गोष्टीतील महिला तिच्यावर झालेल्या आघातातून सांवरलेली होती तसेच तिच्या
पुढील आयुष्याची सर्व आवश्यक तरतूद झालेली होती, त्यामुळे तिची परिस्थिती वेगळी आहे. बहुतेक प्रसंगी अशा वेळी भावनिक तसेच प्रत्यक्ष
आधाराची खूप गरज असते, विशेषतः सांत्वनाची. शाब्दिक बुडबुडे निरर्थक असतात हे समजत असले तरी सुध्दा बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसा त्या वेळी त्याचा थोडा चांगला परिणाम होतो. कांही वेळा विपरीत परिणाम होण्याची शक्यतासुध्दा असते. या वेळी जवळच्या लोकांनी इतर लोकांवर नियंत्रण ठेवावे लागते.
आपण केलेली सूचना चांगली आहे, पण याबद्दल कांही नियम असे करता येत नाहीत. कांही गोष्टी रूढीनुसार घडत जातात, कांही लोक पुढाकार
घेऊन नव्या प्रथा पाडण्याचा प्रयत्न करतात.
माझे लिखाण वाचत रहावे आणि अधून मधून प्रतिसाद देत रहावेत अशी विनंती.