Friday, November 21, 2008

शाळेतले शिक्षण (भाग १)

"मी कोण होणार?" या मालिकेत खेळाडू, कलाकार, डॉक्टर, कलेक्टर वगैरे पर्याय कसे एकेक करून कटाप होत गेले आणि अखेरीस मी इंजिनियरिंगला कसा गेलो ते सांगितले होते. मी प्रत्यक्षात इंजिनियरिंग केले असले तरी हे लेख म्हणजे फक्त माझे आत्मकथन नव्हते. पन्नास वर्षांपूर्वी लहान गांवात वाढलेल्या मुलांचे अनुभव एकत्र करून त्याला रंजकता आणण्यासाठी पदरचे तिखटमीठ लावले होते. या लेखाचा थोडा विस्तार या मालिकेत करीत आहे.

मी मोठा झाल्यावर जो कोण होईन ते सर्वस्वी माझ्या शिकण्यावरूनच ठरणार आहे ही गोष्ट अगदी लहानपणापासून माझ्या मनावर खोलवर बिंबवली गेली होती. 'विद्या' या विषयावरील अनेक सुभाषिते तोंडपाठ करून घेतली होती. त्यांची उजळणी व्हायची. घरातले एकंदरीतच वातावरण शिक्षणाला प्राधान्य देणारे होते. त्यामुळे मी शाळेत असल्यापासून काय (काय काय!) शिकलो ते थोडे पाहून घेऊ.

आमच्या प्राथमिक शाळेतल्या कांही मास्तरांची शेतीवाडी होती. त्यात ते धान्यधुन्य, भाजीपाला, फळफळावळ वगैरेंची लागवड करीत असत. कोणी गायी म्हशी पाळून दूधदुभत्याचा धंदा चालवत होते, कोणी पत्रिका पाहणे, त्या जुळवणे, विविध प्रसंगासाठी सुमुहूर्त काढणे वगैरे करायचे, तर कोणाचे सायकल दुरुस्तीचे किंवा अन्य कसले तरी दुकान होते. त्या सगळ्यांचा व्याप सांभाळून फावल्या वेळात ते शाळेत येऊन मुलांना शिकवण्याचे कामसुद्धा करायचे. त्यामुळे शाळेत जितक्या 'यत्ता' तेवढे 'गुर्जी' असे चित्र नेहमी दिसायचेच असे नाही. बाहेरगांवावरून नोकरीसाठी आमच्या गावात आलेले कांही शिक्षक होते। ते तेवढे नियमितपणे शाळेत येऊन मन लावून शिकवण्याचे काम करायचे आणि वेळ पडेल तेंव्हा एकाच छडीच्या जोरावर दोन दोन वर्गातली मेंढरे हांकायचे.

"कोणत्या इयत्तेत कोणत्या विषयात काय शिकवले जावे" यावर पुण्यामुंबईतली विद्वान मंडळी विचारविनिमय करून त्याचा अभ्यासक्रम वगैरे ठरवायची म्हणे. त्यानुसार ते लोक अधून मधून
पाठ्यपुस्तकांत किरकोळ फेरफार देखील करायचे. पण त्या पुस्तकांच्या अशा सुधारलेल्या आवृत्या गोगलगायीच्या पावलाने सरकत सरकत आमच्या गांवापर्यंत येऊन पोचायला महिनोगणतीचा वेळ लागत असे. वर्गातल्या प्रत्येक मुलाकडे प्रत्येक विषयाचे नवे कोरे पाठ्यपुस्तक असलेच पाहिजे असा दंडक त्यावेळेस नव्हता. शाळेतली बहुतेक मुले वरच्या वर्गात गेलेल्या मुलांची सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हँड पुस्तकेच स्वस्तात विकत घेत असत. संयुक्त कुटुंबांमध्ये पाठोपाठच्या इयत्तेत शिकणा-या मुलांमुलींची रांग असे. त्यामुळे जोंवर एकाद्या पुस्तकाच्या फाटून चिंध्या होत नाहीत, उंदीर घुशी ते कुरतडत नाहीत किंवा छतातून गळलेल्या पाण्यात भिजून त्याचा लगदा होत नाही तोंपर्यंत एकदा विकत घेतलेले पुस्तक वापरात असायचे. एकाच वर्गातल्या मुलांकडे वेगवेगळ्या आवृत्या असणे साहजीकच वाटायचे। "माझ्या पुस्तकात हे चित्र आहे, तुझ्या पुस्तकात कुठे आहे?" अशी चिडवाचिडवीसुध्दा त्यावरून व्हायची.

पण यामुळे शाळेतल्या शिक्षणात फारसा फरक पडत नसे. गणितातल्या 'काळ काम वेग' यावरील गणितातला रामा थोडा आळशी आणि शिवा थोडा मठ्ठ असला तरी बिचारा गोविंदा जास्त काम करून ते पूर्ण करीत असे, पण त्यांच्या ऐवजी चंदू, बंडू आणि नंदू आल्यावर सुध्दा त्यातला कोण कामाचा आहे ते कांही समजत नसे आणि नांवे बदलली तरी गणित सोडवणे तेवढेच कठीण जात असे.

"पानिपतच्या तिस-या युध्दात सदाशिवरावभाऊ हे मराठ्यांचे सेनापती होते." असे एका आवृत्तीत छापलेले असले तर त्यांच्या ऐवजी "नानासाहेब पेशवे किंवा मल्हारराव होळकर त्या जागी होते" असे कांही दुसरीकडे नसायचे. "हे आपल्या पुण्याचे सदाशिवरावभाऊ आणि तो अफगाणिस्तानातला अबदाली का कोण होता तो असे हे दोघेहीजण आपापली घरदारे सोडून तिस-याच कोणाच्या मुलुखातल्या पानीपतेला लढाई करायला का म्हणून गेले असतील?" हे कोडे त्यातल्या कोठल्याही आवृत्तीत सुटत नव्हते. या लढाईत मराठ्यांचे पुरते 'पानिपत' झालेच, पण ती जिंकून अबदालीचा कोणता फायदा झाला हे मला अद्यापपर्यंत समजलेले नाही। "त्या लोकांना तेंव्हा कांही कां करेनात, आपण आपले सन आणि नांवे लक्षात ठेवायची आणि परीक्षेतल्या प्रश्नातल्या गाळलेल्या जागेत ती भरायची" यापलीकडे कोणा मुलाला त्याबद्दल फारसे कांही स्वारस्य वाटत नसे.

इतिहासाच्या वेगवेगळ्या पुस्तकांत जसे तेच्या तेच लिहिलेले असे त्याचप्रमाणे भूगोलाच्या पुस्तकातले भारताच्या पूर्वेला असलेले ब्रम्हदेश, सयाम वगैरे देश आणि पश्चिमेकडचे इराण, इराक वगैरे देश कुठल्याही पुस्तकांत आपापल्या जागेवरच दिसायचे. पाकिस्तान तेवढा पूर्व व पश्चिम या दोन्ही दिशेला असल्याने गोँधळ व्हायचा. पुढे इंदिरा गांधींनी तो प्रश्न सोडवून टाकला. ब्रम्हदेशाचे 'मायनामार' आणि मलायाचे 'मलेशिया' या नांवांनी त्या देशांची नवी बारशीही झाली. पण तोंपर्यंत माझे शाळेतले शिक्षण संपून गेलेले असल्यामुळे एवढ्याशा कारणासाठी नवी पुस्तके विकत घेण्याची पाळी माझ्यावर आली नाही.

यथावकाश या पाठ्यपुस्तकांच्या नव्या आवृत्या आमच्या शिक्षकांच्या हांतात पडत असत. पण त्यातले कोणते आणि किती शिकवायचे हा निर्णय पूर्णपणे त्यांच्याच हांतात असे. जे शिकवणारे तेच परीक्षेचा पेपर काढणार आणि तेच ते पेपर तपासणार असल्यामुळे जेवढे शाळेत शिकवले जायचे तेवढ्या ज्ञानावर पास होऊन वरच्या वर्गात जाणे कठीण नव्हते. "अमक्या इयत्तेत मला या गोष्टी शिकायच्याच आहेत." असे विद्यार्थ्याला ठाऊक असण्याचा प्रश्नच नव्हता. वाटल्यास त्याने पुस्तकातले न शिकवलेले धडे घरी वाचावेत आणि आपल्या आपणच ते समजून घ्यावेत, पण त्याबद्दल शाळेत मास्तरांना शंका विचारण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती.

कांही मुलांच्या बाबतीत "तो साळा शिकून शाना होतोय् " एवढे समाधान त्यांच्या पालकांना पुरेसा दिलासा देत असे. पहिल्या तीन चार वर्षात रोज बाराखड्या आणि पाढे गिरवून गिरवून अक्षरांची आणि अंकांची ओळख पक्की केली जायची. त्यामुळे "पोरगं लिवायला वाचायला लागलं, हिशेबबी करतंय्." एवढं 'शानपन' त्याच्या अंगात आल्यावर उरलेल्या गोष्टी तो कामाला लागल्यावर त्याला आपसूक यायला लागतील अशा विचाराने त्याची घरातल्या व्यवसायातली उमेदवारी सुरू होत असे. वडील मंडळींना मदतीसाठी त्याच्या हांतभाराची गरजही असे. अशी मुले हौस म्हणून किंवा मित्रांच्या सहवासासाठी किंवा घरात त्याची सारखी भुणभुण नसावी अशा कारणास्तव कांही काळ शाळेत येत, पण हळू हळू त्यांची संख्या गळत असे.

याच्या उलट कांही मुलांचे पालक शाळेतल्या शिक्षणाला विशेष महत्वच देत नसत. शाळेत दाखल होण्यापूर्वीच घरी त्यांचे शिक्षण सुरू झालेले असे. बोबडे बोलता बोलता थोडे स्पष्ट उच्चार यायला लागले की त्याला रोज संध्याकाळ झाल्यावर "शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा" पासून सुरू करून एक एक श्लोक म्हणायला शिकवत असत. चिमुकल्या बोटात पेन्सिल धरून पाटीवर अक्षर उमटवायला येण्यापूर्वीच अनेक श्लोक त्याला तोंडपाठ झालेले असत. मराठीनंतर संस्कृत श्लोक, स्तोत्रे वगैरे त्याच्याकडून वदवून घेतले जात. "लहानपणी जिभेला वळण लावता येते, एकदा ती ताठर आणि जड झाली की वळता वळत नाही" वगैरे कारणे देऊन अनेक श्लोक, स्तोत्रे आणि मंत्र त्याला मुखोद्गत करायला लावत. जोडाक्षरांची भेंडोळीच्या भेंडोळी उच्चारतांना त्याच्या जिभेला तर व्यायाम होत असेच, पण ते मोठ्या खणखणीत आवाजात एका दमात म्हणतांना स्वरयंत्रापासून फुफ्फुसांपर्यंत सर्व श्वसनसंस्थेलाही त्याचा चांगला अभ्यास होत असेल! ज्या मुलांना पुढे पौरोहित्य करायचे असेल त्यांच्या दृष्टीने हे पुढील व्यवसायासाठी उपयोगी पडणारे शिक्षण होते. पण फारच कमी प्रमाणात ते घडत असेल. "देवाशी संवाद साधतांना देववाणी संस्कृतमध्ये बोलले तर आपण काय बोलत आहोत ते (आपल्याला समजत नसले तरी) त्याला व्यवस्थित समजते आणि त्यावर प्रसन्न होऊन तो आपली सर्व काळजी घेतो." अशी अनेक लोकांची गाढ श्रध्दा असते. बालपणी केलेले हे पाठांतर त्यांना आयुष्यभर अनुपम समाधान देतेच, शिवाय ही शिदोरी त्यांना पुढच्या प्रवासातदेखील उपयोगी पडेल अशी त्यांची मनोमन खात्री असते.

घरातल्या या महत्वाच्या शिक्षणाच्या तुलनेत शाळेत शिकवले जाणारे भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे विषय अगदी गौण म्हणता येतील. त्या काळात जसे घरी पाठांतराला महत्व होते तसेच ते शाळेतही असायचे. तिथे सुध्दा बहुतेक सारे शिक्षण मौखिकच होते. पुस्तकातल्या कविता, उतारे, शब्दार्थ आणि कांही प्रश्नोत्तरे सगळ्या मुलांच्याकडून घोकून घेतल्या जात. वर्षाच्या सुरुवातीला घेतलेली एक कच्ची वही सर्व विषयांच्या अभ्यासासाठी वर्षभर पुरायची। इन्स्पेक्शनच्या वेळी दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पातळशा पक्क्या वह्या असायच्या. त्यात काय लिहायचे ते गुरूजी फळ्यावर लिहून द्यायचे. ते आम्ही कच्च्या वहीत घाईघाईने उतरवून घेत असू आणि शक्य तेवढे सुवाच्य अक्षर काढून घरी बसून ते पक्क्या वहीत लिहीत असू. यापलीकडे कसला गृहपाठ केल्याचे मला आठवत नाही.

शाळेतून घरी आल्यावर "आज वर्गात काय शिकलास?" असा प्रश्न कोणी विचारत नसे की दफ्तर उघडून त्यातल्या वह्यांमध्ये मी काय लिहिले आहे हे कोणी पहात नसे. आमच्या घरी थोडे शिक्षणाचे वातावरण असल्यामुळे मोठी भावंडे अधून मधून अचानक कांही प्रश्न विचारून माझी चांचणी घेत आणि वेळप्रसंगी न समजलेले समजावून सांगतही असत. त्यामुळे परीक्षेत चांगले मार्क मिळवून वरचा नंबर मिळवण्याएवढी माझी प्रगती होत असे. मला वाचनाची उपजत आवड असल्यामुळे मी हांतात पडेल ते वाचत असे आणि त्यात माझ्या पुस्तकातला शाळेत न शिकवलेला भागही थोडा थोडा डोळ्याखालून जात असे.

आमच्या लहानपणी एक कोडे घातले जाई. "जी गोष्ट देणा-याचा हांत नेहमी खाली असतो आणि ती घेणा-याचा वर असतो अशी कोणती वस्तू आहे?" याचे उत्तर "तपकीर" असे आहे. 'शिक्षण' याचा समावेश सुद्धा यात करता येईल असे मला वाटते. ते देणारा आपला गुरू त्याच्याकडले ज्ञानभांडार आपल्या समोर उघडे करू शकतो, पण त्यातले कण कण आपणच चिमटीने वेचून घ्यायचे असतात.

No comments: