Sunday, November 30, 2008

चोखी ढाणी - भाग १


पुण्यात हिंडतांना मला कांही मोक्याच्या जागी 'चोखी ढाणी' च्या आकर्षक पाट्या दिसल्या होत्या। त्या पाहून पुण्यासारख्या अस्सल मराठी शहरात हा काय प्रकार आहे याबद्दल कुतूहल वाटत होते. मागल्या वर्षी अखेर एकदा त्या जागी जाणे झाले. पुणे सोलापूर रस्ता सोडून मगरपट्ट्याच्या परिसरात येतांच रस्त्याच्या कडेला 'चोखी ढाणी' कडे जाणारा रस्ता दाखवणारे फलक जागोजागी दिसू लागले. त्यांचा मागोवा घेत पुणे नगर रस्त्याला लागल्यावर एका ठिकाणी उजवीकडे वळण्याची सूचना तिथल्या फलकांवर दिली होती. ते वळण घेताच आमची ग्रामीण भागातली वाटचाल सुरू झाली. खाचखळग्यांनी भरलेला रस्ता आणि धूळ उडवीत जाणारे ट्रक यांमधून मार्ग काढीत एकदाचे 'चोखी ढाणी' पर्यंत येऊन पोचलो.

प्रवेशद्वारावरच द्वारपालाचा एक अवाढव्य पुतळा होता. तो दुरूनच दिसत असल्यामुळे तिथपर्यंत पोचणे अगदी सोपे होते. जवळ गेल्यावर त्याच्या सोबतीला असलेले उंट घोडे देखील दिसले. बाजूलाच एक मोकळी जागा होती. तिथल्या एका झाडाला एक 'पुणेरी पाटी' टांगलेली होती. 'वाहनचालकांनी आपली वाहने या जागेवर स्वतःच्या पूर्ण जबाबदारीवर उभी करावी. त्यांचे कांही नुकसान झाल्यास मॅनेजमेंट त्याला जबाबदार नाही.' अशा अर्थाचे कांही तरी त्यावर लिहिलेले होते. पण गाडी सुरक्षित जागी उभी करण्याचा दुसरा कोणताही पर्यायही दिसला नाही. आमच्या आधीच चार पांच गाड्या त्या जागेवर उभ्या होत्या. त्यांचे जे कांही होईल तेच आपले होईल असा विचार करून आमची कार तिथेच बाजूला लावली. आम्ही परत येईपर्यंत ती जागा गचागच भरली होती. आता कोणाला ती 'पुणेरी पाटी' दिसण्याची शक्यता कमीच होती.

परदेशात कोठल्याही रिसॉर्टमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच एक प्रशस्त पार्किंग लॉट दिसतो. त्यात वेगवेगळ्या प्रकारची वाहने कुठे उभी करावीत याचे मार्गदर्शन असते. तिथे आपली गाडी बिनधास्तपणे उभी करण्यासाठी दहा पंधरा डॉलर, पाउंड किंवा युरो घेतील, तेही अगदी अलगदपणे! म्हणजे आंत शिरण्याच्या गेटपाशी असलेल्या यंत्रातील भेगेत आपले क्रेडिट कार्ड फिरवायचे किंवा स्कॅनरला ते नुसते दाखवायचे. लगेच आपल्या बँकेच्या खात्यातून पैसे काढले जातात आणि ते स्वयंचलित प्रवेशद्वार आपोआप उघडून आपल्याला आंत जाण्यासाठी प्रवेश देते.

आंत गेल्यावर एक छोटीशी संगमरवरी घुमटी होती. त्याला उत्तर भारतात छत्री म्हणतात. त्यात मुरलीधराची सुंदर मूर्ती होती. तेवढ्यात आमची इरा म्हणाली, "तो पहा कृष्णभगवान गोटला टेकून उभा आहे।" मी चमकून लक्ष देऊन पाहिले। कृष्ण आणि त्याची गाय यांच्या आंकारात प्रमाणबद्धता नसल्याने इराला ती शेळी वाटली होती. "ती 'गोट' नसून 'काऊ' आहे." हे कांही तिला सांगून पटत नव्हते. अखेरीस "त्या वासराला जरा लवकरच शिंगे आली आहेत." असे सांगून तिची समजूत घातली.

श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोरच परंपरागत मारवाडी पद्धतीचे धोतर नेसून, उपरणे पांघरून आणि कपाळाला गंधाचा टिळा लावून एक पंडित बसला होता. आम्हाला पाहताच त्याने लगेच "अकालमृत्युहरणम् सर्वव्याधीविनाशनम् । . . " वगैरे मंत्र म्हणत तीर्थाने भरलेली पळी पुढे केली. त्याच्या समोर ठेवलेल्या ताम्हनांत नाणी नव्हती, नोटा होत्या हे सांगायलाच नको. त्यात अल्पशी भर घालून आम्हीही तीर्थप्राशन केले आणि पुढे गेलो.

तिथे भाजी बाजारातल्या गाळ्यासारखा दिसणारा काउंटर होता. त्या काउंटरवर गाद्या अंथरून व लोड वगैरे ठेऊन बैठक केलेली होती. नखशिखांत मारवाडी व्यापा-याचा पोशाख परिधान केलेले दोन मुनीम त्या बैठकीवर मांडी ठोकून बसलेले होते. मात्र त्यांच्या पुढ्यात लांबलचक चोपडी आणि दौतटांक न दिसता अद्ययावत संगणकाचे की बोर्ड ठेवलेले दिसत होते. त्यांनी दर डोई चांगले भक्कम प्रवेशशुल्क घेऊन आमच्या येण्याची नोंद घेतली. इथे मात्र आमचे क्रेडिट कार्ड चालले. ते नसते तर कदाचित आम्हाला परतच जावे लागले असते, कारण आजच्या जमान्यात एवढी मोठी रोख रक्कम खिशात घेऊन हिंडायची संवय राहिली नाही. संगणकातून आमची प्रवेशपत्रे छापून बाहेर आली. ती हांतात घेऊन आम्ही चोखी ढाणीमध्ये प्रवेश केला.
. . . . . . .. . . . . . . . (क्रमशः)

Saturday, November 29, 2008

शाळेतले शिक्षण (भाग १०)

शालेय शिक्षणाबरोबरच घरातली समांतर 'मस्तीकी पाठशाला' चालत होती. वाढत्या वयाप्रमाणे शाळेत नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळत होत्या त्याचप्रमाणे घरातल्या शिक्षणाची व्याप्तीही वाढत होती. सुरुवातीला झारा, पळी, स्क्रू ड्रायव्हर, स्पॅनर अशातली अमकी वस्तू आणून दे म्हंटले की ती ओळखून नेऊन द्यायची. तिच्याबरोबर खेळता खेळता मोठी माणसे तिचा उपयोग कसे करतात ते पाहून झाले आणि त्यांचे अनुकरण करत करत ती वापरायला येऊ लागली. थोडी अक्कल आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर सुरी, कात्री, विळी, करवत अशा धारदार वस्तू हाताळायला मिळाल्या. अंगात थोडी शक्ती आल्यानंतर कुदळ, फावडे, रंधा, कोयता वगैरे वस्तूंचा उपयोग करायची परवानगी मिळाली.

दगडमातीच्या भिंती आणि लाकडाच्या चौकटींच्या आधारावर उभे असलेले ते जुन्या पध्दतीचे अवाढव्य घर असल्यामुळे त्याची दुरुस्ती किंवा त्यात कांही छोटे बदल करण्याचे काम नेहमीच निघत असे. ते काम कंत्राटाने देण्याऐवजी मजूरांना बोलावून केले जात असे. त्यामुळे सुतार आणि गवंड्यांना लागणारी एकूण एक हत्यारे घरात होती. पानतंबाखू, विडीकाडी वगैरेसाठी त्यांची विश्रांती चालली असतांना आम्ही मुले कुणाला काका नाही तर कुणाला मामा म्हणून त्यांच्याशी सलगी करून हळूच ती हत्यारे चालवून पहात असू. घरातले कोणी आम्हाला त्यात अडवत नसे. तिकडे सोयिस्करपणे कानाडोळा करीत किंवा फार तर "जरा जपून बाबा! " असा इशारा देत असत. त्या काळी इन्फेक्शनचा बाऊ अजीबात नव्हता आणि टिटॅनसचे नांवही मी मुंबईला आल्यानंतर पहिल्यांदा ऐकले. थोडे फार खरचटले तर त्यावर आयोडीनचा बोळा फिरवायचा एवढेच.

पुस्तकातली गणिते सोडवण्यापेक्षा बाजारातून विकत आणलेल्या वस्तूंचा हिशोब करण्यात जास्त मजा होती. आधी नुसतीच यादी लिहून काढण्यापासून सुरुवात केली. नंतर त्यातील प्रत्येक वस्तूचे दर आणि त्या किती आणल्या ते लिहून गुणाकार व बेरीज करून एकूण किंमत काढायची असे करत करत अखेरीस घराचा संपूर्ण जमाखर्च सांभाळायचे काम करण्यापर्यंत प्रगती केली. त्या निमित्याने नोटा आणि नाणी मोजतांना थ्रिल वाटत असे. मी तयार केलेला ताळेबंद बराचसा व्यवस्थित जुळत असल्यामुळे पुढे मला कांही समारंभाच्या प्रसंगी खजिनदार व्हावे लागले.

भाषेच्या अभ्यासात गण, वृत्ते वगैरे शिकतांना त्यात रचलेल्या कवितांची विडंबने करावीशी वाटत आणि बोलता बोलता ती होऊनही जात. नात्यातल्या एका लग्नासाठी गंमत म्हणून मंगलाष्टक करायचा प्रयत्न केला. म्हणजे एक जुने मंगलाष्टक घेऊन त्यातली नवरा नवरींची नांवे बदलून दिली. शार्दूलविक्रीडित वृत्ताचे 'म स ज स त त ग' हे गण लिहून घेऊन त्यात ती नांवे कुठे बसतात ते पाहून आजूबाजूला सुरेख, सद्गुणी, शालीन, कुलीन वगैरे विशेषणे टाकली आणि उरलेली जागा ' च वै तु ही' सारख्या निरर्थक अक्षरांनी भरून काढली। पण मला हे करता येते असे समजल्यावर ते काम माझ्या मागेच लागले. त्यामुळे आणखी थोडा बदल करून गणपतीच्या ऐवजी गणेश आणि शंकराच्या जागी महेश अशी आराध्य देवतांची नांवेही बदलली. या सगळ्याला भरपूर प्रोत्साहन मिळायचे हे सांगायची गरज नाही.

आमच्या गावाला रेल्वे स्टेशन नसले तरी बरीच नातेवाईक मंडळी वेगवेगळ्या गांवी होती. मोठी भावंडेही आधी शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी परगांवी रहायची. त्यातले कोणी तरी येतांना रेल्वेचे वेळापत्रक घरी घेऊन येत असत. भूगोलाच्या अभ्यासात नकाशा पहायला शिकल्यानंतर मी रेल्वेचा नकाशा घेऊन पहात बसत असे आणि त्यातली कोणकोणती गांवे ओळखीची वाटतात त्यांच्या जागा पाहून ठेवत असे. हळू हळू त्यातले तक्ते वगैरे समजायला लागले आणि भारतातल्या कुठल्याही शहरापासून दुस-या कुठल्याही शहराला जाण्याचे कोणते मार्ग आहेत, त्यात कुठे गाडी बदलावी लागेल, त्यात किती किलोमीटर प्रवास होईल आणि त्याचे किती भाडे लागेल इथपर्यंत सांगता येऊ लागले. मी शाळेत शिकत असतांनाच एस् टी ची वाहतूक सुरू झाली. त्याचे स्टँड माझ्या शाळेच्या पलीकडेच होते. त्यामुळे तिथून कुठकुठल्या गावाला केंव्हा बस जाते आणि केंव्हा ती येते हे ज्ञान जातायेताच प्राप्त होत असे. पावसाळा आणि
कडाक्याच्या थंडीचे एक दोन महिने सोडून इतर काळात आम्ही गच्चीवर उघड्या हवेतच झोपर असू. तेंव्हा डोक्यावर दिसणा-या आभाळातले चमचमते तारे, विशेषतः सप्तर्षी, ध्रुव तारा, मृग किंवा हस्त यासारखी वैशिष्ट्यपूर्ण आकाराची नक्षत्रे, वृश्चिक रास वगैरेंची रोज पाहून ओळख झाली. रोजच्या रोज जागा बदलणारा चंद्र आणि वर्ष वर्षभर फारसे न हलणारे गुरू व शनी यांचे राशीचक्रामधले भ्रमण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यानंतर हे आपल्याला कधीही अपाय करणार नाहीत याची खात्री पटली। हे ग्रह कागदावर आखलेल्या चौकटीत फिरतात, त्यातल्या अमक्या घरातून तमक्या घरात जातात आणि जाता येता आपल्याकडे प्रेमाने किंवा रागाने पाहतात वगैरे गप्पा नंतर जेंव्हा ऐकल्या तेंव्हा माझे छान मनोरंजन झाले.

स्वयंपाकघर म्हणजे माझी घरातली प्रयोगशाळाच होती असे म्हणायला हरकत नाही. माझ्या आईला वेगवेगळे प्रयोग करून पहायची आवड होती. अक्षर ओळखीच्या पलीकडे शालेय शिक्षण झालेले नसतांना केवळ निरीक्षण आणि अनुभव यातून तिला ऊष्णतेच्या वहनाच्या सर्व प्रक्रियांचे सखोल आकलन झालेले होते. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन ही नांवे तिने ऐकली नव्हती आणि त्यांची सूत्रे वा समीकरणे समजण्याचा प्रश्नच नव्हता. पण फोफाट्यात भाजणे, तव्यावर भाजणे, शिजवणे आणि तळणे या स्वयंपाकातल्या चार मुख्य क्रिया कशा होतात आणि त्यात अन्नपदार्थात कोणते बदल घडतात, त्यांची चव कशी बदलते वगैरे तिला नेमके माहीत असायचे. रोजचा स्वयंपाक आणि पारंपारिक खाद्यपदार्थ चविष्ट बनवण्यात तिचा हातखंडा होताच पण त्या काळी कसल्याही प्रकारची ओव्हन किंवा कुकर घरात नसतांना घरातली भांडी, तवे, डबे वगैरेचा उपयोग करून आणि लाकूड व कोळशापासून मिळणारी आग आणि धग
वापरून ती इडल्या, ढोकळे, केक, बिस्किटे वगैरे रुचकर पदार्थ बनवत असे. अशा नवा पदार्थ बनवण्याच्या प्रयोगात मी तिला उत्साहाने सहाय्य करत असे. प्रत्येक क्रियेनंतर काय होणार याचे कुतूहल तिलाही असे आणि जरा कांही बिघडते असे वाटताच ती लगेच त्याला कसे सावरून घेते ते पहायची उत्सुकता मला असायची. तिने मला कोणतीही रेसिपी शिकवली नाही, पण अन्नाचे घटक आणि सगळ्या मूलभूत प्रक्रिया छान सोदाहरण समजावून सांगितल्या.

माझ्या आईने मला सकारात्मक दृष्टीकोन दिला. तिने सांगितलेले कुठलेही काम "मला येत नाही." असे सांगून टाळता येत नसे. ती त्याच्या तपशीलात जाऊन त्यातली नेमकी कोणती स्टेप येत नाही ते विचारत असे आणि जे येत नाही ते शिकून घ्यायला भाग पाडत असे. "केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे." हे तिचे पालुपद होते. कशालाही एकदम नाही न म्हणता आपल्याला जमेल तेवढे, जमेल तसे प्रामाणिकपणे करून पहावे असे तिचे सांगणे असायचे। दुस-या बाजूला माझे वडील परफेक्शनिस्ट होते. हातात घेतलेले काम पूर्ण केलेच पाहिजे आणि ते चांगलेच व्हायला हवे असा त्यांचा आग्रह होता. मूलभूत प्रकारच्या चुका केलेले त्यांना मुळीच खपत नसे. घरात सगळ्यांना त्यांचा वचक होता. दोन्ही बाजूंनी असे दडपण असल्यामुळे कधी कधी जरा जादाच मेहनत करावी लागत असे. एका दृष्टीने तेही चांगलेच झाले.

अशा प्रकारे माझा सर्वांगीण विकास का काय म्हणतात तो ब-यापैकी होत गेला. कॉलेजच्या शिक्षणासाठी एकट्याने रहाण्यासाठी मनाची संपूर्ण तयारी झाली आणि पुरेसा आत्मविश्वास बरोबर घेऊन मी घराबाहेर पडलो. पुढील मार्गात अडचणी आल्या तरी यशस्वीपणे त्यांना तोंड देता आले.
. . .. . . . . . . . (समाप्त)

शाळेतले शिक्षण (भाग ९)

आमच्या गांवात महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे शाळा संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी कुठल्या तरी शहरात जावे लागणार हे ठरलेलेच होते. त्या गांवात पदवीधरांना नोकरी मिळण्याची संधी जवळ जवळ नव्हतीच। म्हणजे पुन्हा 'पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन' असे करावे लागणारच होते. त्यात 'मी राजाच्या सदनी' असण्याची मुळीच शक्यता नसल्यामुळे 'माळरानी फिरेन' हेच गृहीत धरून चालावे लागायचे. त्यामुळे शाळा सोडल्यापासून ते नोकरीत स्थिरस्थावर होऊन संसाराला लागण्याच्या दरम्यान निदान दहा वर्षाचा काळ बाहेरगांवी एकट्याने राहणे ठरलेलेच होते. समजायला लागल्यापासून त्याची पूर्वतयारी सुरू होत असे.

हल्ली कानाला मोबाईल लावून "आता पुढे काय करायचे?" हे विचारत भाजी फोडणीला टाकणे शक्य आहे. निवडून बारीक चिरलेल्या भाज्यांची तयार पाकिटे बाजारात मिळतात. झटपट करता येण्याजोगे पदार्थही शेकड्याने निघाले आहेत. "थोडे पालक आणा आणि थोडे पनीर आणा आणि ते फ्रीजमध्ये ठेऊन द्या. आता पातेल्यात थोडे पाणी घाला आणि अमक्या कंपनीचे पॅकेट फोडून ते त्यात ओता व गॅसवर ठेवा. दोन मिनिटात पालकपनीर तयार!" अशी त्याची रेसिपी एक पाच सहा वर्षाचा गोड छोकरा एका जाहिरातीत सांगतो. 'टेस्टमे बेस्ट' असा तयार मसाला कुठल्याही पदार्थात घातला की कोणतीही मम्मी 'बेस्ट कुक' बनून जाते. कोणे एके काळी बाजारातून वा शेतातून मसाल्याचे पदार्थ आणून, ते तळून व भाजून आणि त्यांना कुटून व दळून घरातच त्याची भुकटी बनवत असत हे बहुधा कांही दिवसांनी इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळेल. माझ्या लहानपणी हे काम घरोघरी होत असे. कांही थोडे तयार किंवा अर्धवट तयार पदार्थ मुंबईपुण्याकडे मिळू लागले असले तरी खेडेगांवांपर्यंत ते पोचले नव्हते. त्यामुळे माहेरपणाला आलेल्या बहुतेक मुली सासरी जातांना मेतकूट, मसाले, सांडगे, पापड, लोणची वगैरेचा स्टॉक घेऊन जात असत तसेच त्याची कृती शिकून घेत असत.

"उद्या सासरी गेल्यावर तुला हे काम करता आलं नाही तर तू काय करणार आहेस?" असा प्रश्न विचारून जसे लहान मुलींना कामाला जुंपत असत अगदी त्याचप्रमाणे "उद्या कॉलेजला किंवा नोकरीच्या गांवी गेल्यावर तिथे हे काम करायला आई येणार आहे काय?" असे म्हणून मुलांवर घरातली छोटी छोटी कामे सोपवली जात असत. पण घरातले वातावरणच असे होते की मुले ते काम हौसेने किंबहुना चढाओढीने करतही असत। अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांशी निगडित असलेली घरात करण्याची जेवढी म्हणून रोजची कामे असतात ती सर्वांनी शिकून घेतलीच पाहिजेत असा दंडक होता किंवा आपल्याला ती करता यायला पाहिजेत असे सर्वजणच मानत असत. ज्याची त्याची आवड, कुवत आणि सवड लक्षात घेऊन रोजच्या कामांची एक अलिखित वाटणी झालेली असली तरी एकादी व्यक्ती कांही कारणाने जागेवर नसली तर इतर लोक तिचे काम बिनबोभाटपणे करून टाकत. लहान मुलांना त्यात जास्तच उत्साह असायचा. "आज अमक्याने पाटपाणी घेतलंय् बर कां! " किंवा "आज तमकीने कोशिंबीर बनवली आहे. " असे म्हणून त्याचे क्रेडिट मिळायचे आणि कौतुकही व्हायचे.

रोजच्या शाळेच्या वेळा आणि खेळण्याची वेळ चुकवून घरकाम करायची गरज सहसा नसे, पण सुटीच्या दिवशी आळीपाळीने कुठले तरी छोटेसे काम शिकून घेण्यासाठी कुणाबरोबर उमेदवारी करायची आणि हळू हळू ते काम अंगावर घेऊन पूर्ण करून शाबासकी मिळवायची. त्यात नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळत आणि प्रयोग करून पाहण्याची संधीही मिळे. त्यातून कांही विचारले तर समजावून सांगणारी आणि चुकले तर ते सांवरून घेणारी मोठी मंडळी असतच. दिवाळीची सुटी लागली की घराची साफसफाई, सजावट, फराळाचे पदार्थ बनवणे वगैरे सारी कामे संयुक्तपणे होत आणि लहान मुले व मुली त्यात उत्साहाने भाग घेत. एकजण बांबूला कुंचा बांधून आढ्याजवळची जळमटे काढतो आहे, दुसरा मातीच्या भिंतीची डागडुजी करतो आहे, तिसरा त्यावर फुलापानांची नक्षी काढतो आहे. किंवा घरातली सगळी मंडळी एकत्र बसून गप्पागोष्टी व थट्टामस्करी करत शेंगा फोडून त्यातले दाणे काढत आहेत. एकादा द्वाड मुलगा कोणी पहात नाही असे पाहून हळूच दोन चार शेंगादाणे तोंडात टाकतो आहे. दुस-या मुलाने त्याला पाहिलेले असल्याने त्याची चहाडी न करताही त्याला बोलते करून त्याचे पितळ उघडे पाडत आहे किंवा सगळीजणे स्वयंपाकघरात कोंडाळे करून बसली आहेत, एकजण पोळपाटावर पु-या लाटते आहे, दोनतीन मुले त्यात सारण भरून आणि दुमडून त्यांना अर्धगोलाकार देत आहे, कोणी कातण्याने त्याला नागमोडी कडा देत आहे आणि शेवटी सर्वात एक्स्पर्ट त्या करंज्या तळून काढते आहे. अशी लहानपणाची दृष्ये दिवाळी आली की अजून माझ्या डोळ्यापुढे येतात.
. . .. . . . . . . . . . . . (क्रमशः)

Friday, November 28, 2008

शाळेतले शिक्षण (भाग ८)

सायन्सच्या अभ्यासात नेमकेपणा आणण्य़ासाठी फार पूर्वीपासून जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. एकादी वस्तू लहान-मोठी, जड-हलकी, थंड-गरम आहे असे मोघमपणे सांगण्याऐवजी तिचे आकारमान, वस्तुमान, तपमान वगैरे मोजूनमापून ते योग्य त्या परिमाणामध्ये व्यक्त केले जाऊ लागले. पूर्वी या गोष्टी चिमूटभर, मूठभर किंवा चार बोटे, दोन विता अशासारख्या अंदाजातून सांगितल्या जायच्या. त्याऐवजी त्यासाठी फूट, मीटर, पौंड, ग्रॅम, तास, मिनिटे, सेकंड आदींची प्रमाणित परिमाणे ठरवली गेली आणि ती अचूकपणे मोजण्यासाठी फूटपट्ट्या, तराजू इत्यादी उपकरणे तयार करून त्यांचा उपयोग करणे सुरू झाले. लांबीरुंदीवरून क्षेत्रफळ, घनफळ, परीघ वगैरे ठरवण्यासाठी भूमितीमधील सूत्रे केली गेली. पदार्थांच्या वेगवेगळ्या नैसर्गिक गुणधर्मांच्या विशिष्ट व्याख्या केल्या गेल्या आणि त्यातून एक वेगळी परिभाषा निर्माण झाली. उदाहरणार्थ इंग्रजी भाषेतील 'फोर्स','प्रेशर' व 'स्ट्रेस' हे शब्द एरवी 'जोर जबरदस्ती, दबाव' या
साधारणपणे समान अर्थाने वापरले जातात, पण वैज्ञानिक परिभाषेत यातील प्रत्येक शब्द ही एक वेगळी संकल्पना आहे आणि तिची वेगळी व्याख्या आहे. पूर्वीच्या काळात बल किंवा शक्ती ही हत्ती, घोडा, बैल किंवा सिंह आदी प्राण्यांच्या तुलनेत व्यक्त केल्या जात असत. आता त्या सर्व गोष्टी विशिष्ट परिमाणांमध्येच मोजल्या किंवा व्यक्त केल्या जातात, त्यातून झुरळाच्या पायात केवढी शक्ती आहे याचे सूक्ष्म मोजमापदेखील करता येते. या सर्व नव्या व जुन्या संकल्पनांना एकमेकांना जोडणारी सूत्रे मांडून ती सिध्द केली गेली. प्रत्येक संकल्पनांचे मोजमाप घेऊन ते अंकांत व्यक्त करता आल्यानंतर त्या अंकांची तुलना करणे सोपे झाले. दोन अंकांमधील फरक वजाबाकीतून काढता येतो आणि एक अंक दुस-याच्या कितीपट आहे हे भागाकारातून. त्याचप्रमाणे त्यांची सरासरी, टक्केवारी आदी अनेक प्रकारची आंकडेमोड करता येते. अनेक अंकांचा आलेख काढता येतो व त्यातून त्यांची तुलना दृष्य रूपाने दिसते. अशा प्रकारे विज्ञानाबरोबर गणिताचा पक्का सांधा जुळला. तसेच ही शिस्त पाळली जात असल्यामुळे एक संशोधक आपले संशोधन इतरांसमोर मांडू शकला आणि ते इतरांना व्यवस्थितपणे समजू शकले. त्यामुळे
माहितीच्या देवाणघेणाला मोलाची मदत होऊन प्रत्येक संशोधक आपल्या क्षेत्रातील इतर संशोधनांचा लाभ घेऊ लागला.

शास्त्रीय प्रयोग करण्यापूर्वी त्याचा उद्देश ठरवला जातो, त्यासाठी लागणारे सामान तसेच उपकरणे, तो करण्याची तपशीलवार रीत, प्रयोग सुरू करण्यापूर्वी, तो सुरू असतांना आणि तो संपल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींची मोजमापे घ्यायची त्याची साधने वगैरे सर्व गोष्टींची जमवाजमव करून तो करतात. त्यातून मिळणा-या माहितीचे विश्लेषण करून त्यापासून तर्कसंगत असे निष्कर्ष काढून ते उपलब्ध असलेल्या इतर माहितीनुसार पडताळून पाहिले जातात. त्यात विसंगती आढळल्यास तो प्रयोग पुन्हा पुन्हा करून त्यामागील कारण शोधले जाते. यामधून नवीन सिध्दांत निघतात. अशा प्रकाराने विज्ञानाची प्रगती होत राहते. मी शाळेत शिकत होतो त्या काळी सुध्दा तिथे एक प्रयोगशाळा होती आणि कांही सोपे प्रयोग व प्रात्यक्षिके करून दाखवण्याची व्यवस्था होती. शाळेत पाहिलेल्या प्रयोगावरून तो विषय चांगला समजत तर असेच. शिवाय रोजच्या जीवनात उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा उपयोग करून नवनवे प्रयोग करून पहाण्याची प्रेरणासुध्दा मिळत असे। त्यातही खूप मजा वाटत असे.

सायन्सच्या शालेय अभ्यासक्रमातला बहुतेक सारा भाग वर्णनात्मक होता. शेवटी शेवटी कांही सोपी सूत्रे व समीकरणे शिकवली गेली. ती सारी बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार एवढ्यापुरतीच मर्यादित होती। पण निसर्गाचे सगळेच नियम कांही असे सोपे नसतात. ते मांडण्यासाठी अंकगणित तर अपुरे पडतेच, पण बीजगणित व भूमिती यांच्याही पलीकडे जाऊन कॅल्क्युलस, ट्रिगनॉमेट्री, कोऑर्डिनेट ज्यॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स आदि शाखांचा अभ्यास केल्यानंतरच ते समजू शकतात. गणिताचा आवश्यक तेवढा भक्कम पाया असल्याखेरीज अशी क्लिष्ट सूत्रे शिकण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे शाळेच्या अभ्यासक्रमात ती नव्हती.

असे असले तरी प्रख्यात शास्त्रज्ञांची माहिती विद्यार्थ्यांना असावी या उद्देशाने त्यांची थोडक्यात ओळख करून दिली गेली. पण "सर आइझॅक न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला" किंवा "आइनस्टाईनने सापेक्षतावादाचा सिध्दांत मांडला" असे शिकवतांना त्याबरोबर "झाडावरून फळ पडणे म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचा नियम" आणि "रेल्वेमधून जातांना झाडे मागे पळतांना दिसतात तीच आइनस्टाईनने सांगितलेली सापेक्षता" असे अजब विचार मुलांच्या डोक्यात भरवले गेले। त्यामुळे कांही लोक "इतक्या साध्या गोष्टी शेंबड्या पोरांनासुध्दा माहीत असतात. त्या सांगायला न्यूटन आणि आइनस्टाईन कशाला हवेत आणि त्यांचे एवढे स्तोम कशाला?" अशी त्यांची टर उडवतात तर कांही विद्वान ज्ञानेश्वरी किंवा दासबोधातील ओव्यांचे चरण दाखवून "ही सगळी माहिती आपल्या संतांना होती हो!" असे सांगत सुटतात. "आमचे वेद म्हणजे सर्व ज्ञानाचे भांडार आहे" अशी श्रध्दा बाळगणा-या लोकांचे तर विचारायलाच नको. प्रत्यक्षात न्यूटनचा सिध्दात काय होता ते मला कॉलेजमध्ये गेल्यानंतर कळले आणि आइनस्टाईनच्या सापेक्षतेची ओळख वैज्ञानिक क्षेत्रात काम करू लागल्यानंतर झाली. गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडण्यापूर्वी न्यूटनने खालील माहितीचा उपयोग केला होता.
१. पृथ्वी गोलाकार असणे आणि त्या आकाराची नेमकी त्रिज्या किती आहे त्याचा अंदाज.
२. चंद्राच्या भ्रमणाची कक्षा आणि पृथ्वी व चंद्र यांमधील अंतर
३. चंद्राच्या भ्रमणाचा वेग
४. झाडावरून खाली पडणा-या फळाचा बदलता वेग किंवा त्याचे त्वरण
५. गतिमानतेचे (न्यूटननेच सिध्द केलेले) नियम
६. वस्तूचे सरळ रेषेत व वर्तुळाकृती कक्षेत फिरणे यातील फरक
७. पायथॅगोरसचा थिरम
आपल्याला या सगळ्या गोष्टींचा परस्पराशी कांही संबंध दिसत नाही, पण न्यूटनला तो जाणवला हा त्याच्या अचाट बुध्दीमत्तेचा प्रभाव! त्या काळी अशी माहिती हँडबुकात मिळत नव्हती. त्यासाठी प्रचंड अभ्यास करून व स्वतः संशोधन करून हव्या असलेल्या गोष्टी त्याला मिळवाव्या लागल्या असणार. यातील वेगवेगळ्या गोष्टींना एकमेकांशी जोडणारी किचकट समीकरणे न्यूटनने मांडली आणि ती सोडवतांना त्यातून गुरुत्वाकर्षणाचा नियम तयार झाला. तो त्याने अनेक प्रकारे तपासून पाहिला. पावसाचे पाणी जमीनीवर पडून वहात समुद्राला जाऊन मिळण्यापासून ते सूर्यमालिकेतील ग्रह व उपग्रहांच्या ठराविक गतीने होत असलेल्या भ्रमणापर्यंत अनेक गोष्टी या सिध्दांताला जोडल्या गेल्या आहेत. त्या सगळ्यांचे व्यवस्थित स्पष्टीकरण करता येते हे पाहून झाल्यानंतर त्याने आपला हा अत्यंत महत्वाचा सिध्दांत एका समीकरणाच्या स्वरूपात जगासमोर मांडला. हे करण्यात वीस वर्षांचा काळ गेला. पृथ्वी फळाला आपल्याकडे ओढते एवढे सांगणे म्हणजे न्यूटनचा शोध नव्हे. ते आकर्षण दोन वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात व त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते हे
सूत्र म्हणजे न्यूटनने लावलेला शोध आहे. पण शाळेनंतर ज्यांनी विज्ञानाकडे पाठ फिरवली असेल असे लोक "एकदा न्यूटन झाडाखाली बसला असतांना त्याच्या डोक्यात सफरचंदाचे फळ पडले आणि दणकन गुरुत्वाकर्षणाच्या सिध्दांताचा प्रकाश त्याच्या डोक्यात चमकला." अशा गोड गैरसमजुतीचत आयुष्यभर असतात.
. . . . . . . . . . . . . .(क्रमशः)

Thursday, November 27, 2008

शाळेतले शिक्षण (भाग ७)

तान्हे मूल देखील आपल्या इवल्याशा डोळ्यांनी टुकूटुकू सगळीकडे पहात असते, चिमुकले कान टवकारून कानावर पडणारे ध्वनि ऐकत असते आणि मूठ वळायला येऊ लागताच तिच्यात मिळेल ती वस्तू पकडून चाखून पाहते. या परीक्षण व निरीक्षणातून ज्या संवेदना त्या बाळाला प्राप्त होतात त्यावरूनच आजूबाजूच्या जगाचे भान त्याला येते आणि हळूहळू त्यातल्या गोष्टी समजायला लागतात. हातापायात थोडे बळ येताच ते कुशीवर वळते, रांगू लागते आणि धडपडत उभे राहून चालायला शिकते. यासाठी लागणारी जिज्ञासा व प्रयत्नशीलता हे गुण आपल्याला जन्मतः मिळतात आणि अखेरपर्यंत ते कमीअधिक प्रमाणात आपल्यासोबत असतात.
पूर्वापारपासून विद्वान लोकांनी त्यांच्यातल्या याच शक्तींचा पध्दतशीरपणे उपयोग करून आपल्या सभोवती पसरलेल्या विश्वाचा सखोल अभ्यास केला, त्यांना मिळालेली माहिती व्यवस्थितपणे क्रमवार रीतीने मांडली, विविध पदार्थांचे त्यांना उमगलेले गुणधर्म नोंदवून ठेवले आणि त्यासंबंधीचे निसर्गाचे नियम नीट समजून घेतले. अशा प्रकारे गोळा केलेले ज्ञान कालांतराने इतके वाढले की त्यासाठी 'सायन्स' नांवाची एक वेगळी शाखा केली गेली. आता त्या शाखेचा विशाल वटवृक्ष निर्माण होऊन त्याला शेकड्याने उपशाखा फुटल्या आहेत. फक्त तर्कसंगत आणि सप्रमाण सिध्द झालेल्या माहितीचा व सिध्दांताचा समावेश या विषयात केला जातो. 'सायन्स' या शब्दाला मराठी भाषेत 'शास्त्र' आणि 'विज्ञान' हे पर्यायी शब्द आहेत, पण या मूळच्या संस्कृत शब्दांना त्यांच्या परंपरागत वापरातून अन्य छटा लाभल्या आहेत. त्यामुळे 'सायन्स'च्या व्याख्येत बसू न शकणा-या अनेक प्रकारच्या श्रध्दांचा समावेश त्यांत होऊ लागला
आहे. या तथाकथित 'शास्त्रां'ना स्पर्श न करता फक्त 'सायन्स' या मुख्य विषयात मला शाळेय जीवनात काय शिकायला मिळाले तेवढे मी या लेखात मांडणार आहे.
'सायन्स' या विषयाचा मानवी जीवनाशी निकटचा संबंध असल्यामुळे शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश होणे क्रमप्राप्तच होते. या विषयाची ओळख प्राथमिक शिक्षणात 'सामान्य ज्ञान' या नांवाने झाली. "आपण डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, तोंडाचा उपयोग खाणे व बोलणे यासाठी करतो" किंवा "गाय दूध देते, मांजर दूध पिते, कुत्रा भुंकतो, वासरू हंबरते" अशासारख्या रोज दिसणा-या सोप्या गोष्टींपासून हे सामान्य ज्ञान शिकायला सुरुवात झाली. जसजशी समज वाढत गेली, अनुभवविश्व रुंदावले तसतशी त्यात भर पडत गेली. मुख्यतः आपले शरीर, अन्न वस्त्र व निवारा या त्याच्या मूलभूत गरजा, आजूबाजूच्या निसर्गातील इतर पशुपक्षी व वनस्पती यांचे विषयीची सर्वसाधारण माहिती त्यात असायची.
माध्यमिक शिक्षणात या विषयाला 'शास्त्र' असे संबोधन मिळाल्यावर त्यात यासंबंधींचे बारीक सारीक तपशील येऊ लागले. त्याचप्रमाणे प्रकाश, ध्वनि, विद्युत आदि ऊर्जेची रूपे, पदार्थांची रूपे व विविध प्रकारची मूलतत्वे, शरीरातील वेगवेगळ्या संस्थांची कार्यपध्दती, ती करणारे अवयव वगैरे अनंत प्रकारची माहिती त्यात मिळाली. यातील प्रत्येक गोष्टीत ती तशी कां आहे असा शास्त्रीय कार्यकारण भाव दिलेला असला तरी हे सारे ज्ञान वर्णनात्मकच होते. ते देखील सगळ्यांना समजत होते अशातला भाग नाही. "रात्रीच्या वेळी झाडाखाली कां झोपू नये?" या प्रश्नाला "रात्रीच्या अंधारात चोर येऊन मार देतील, झाडांवरून पक्षी अंगावर घाण करतील, झाडाची फांदी डोक्यात पडेल " अशी 'शास्त्रीय' उत्तरे देणारे महाभाग असतच. त्यांना
कर्बद्विप्राणिल वायु वगैरेसारख्या गोष्टी त्यांना एवढ्या महत्वाच्या वाटत नसणार. 'सायन्स'या विषयातील कांही भागाला गणिताचा मजबूत पाया आहे याची जाणीव तेंव्हा नव्हती. त्याबद्दल पुढील भागात पाहू.
. . . . . . . . . . . . . .(क्रमशः)

Wednesday, November 26, 2008

शाळेतले शिक्षण (भाग ६)

मला मिळालेल्या जनुकातच कांही गफलत होती की माझ्या उजव्या का डाव्या मेंदूला थोडा जास्तच रक्तपुरवठा होत होता कोण जाणे, पण फार लहान असतांनापासून मी जरा तर्कसंगत आणि सुसंबध्द बोलायला लागलो होतो असे घरातल्या मोठ्या लोकांच्याकडून ऐकले होते. कुठलीही गोष्ट सांगताना "अमक्यामुळे तमकं" आणि "तमक्यामुळे ढमकं" असा एक कार्यकारण भाव त्यात मी सहजपणेच घालत असे. ही संवय अद्याप गेलेली नाही हे वरील वाक्यातच दिसून आले असेल. लहान मुले एकादा पदार्थ एक दिवस मिटक्या मारत खातात, दुसरे दिवशी तो खात नाहीत. याला आपण लहरीपणा म्हणू. पण मी मात्र "त्यात मीठ कमी पडले आहे किंवा फोडणी थोडी करपली आहे म्हणून आज मला तो आवडला नाही" असे विश्लेषण करून सांगत असे म्हणे. जेवतांना प्रत्येक घासात भाकरीचा केवढ्या आकाराचा तुकडा घ्यायचा आणि त्याला केवढे कालवण लावून खायचे याचे एक गणित माझ्या डोक्यात सेट केलेले असे. त्यामुळे पानात वाढलेली भाकरी आणि भाजी कधीच एका वेळी संपत नसे. जेवण संपता संपता उरलेल्या भाजीच्या दोन फोडी बरोबर खायला अर्धा चतकोर भाकरी किंवा उरलेल्या भाकरीच्या तुकड्याला लावून
खाण्यासाठी भाजीची एक फोड मी मागून घेत असे. माझ्या या नादिष्टपणामुळे आई वैतागत असे, पण ही सगळी मनात गणिताची आवड असण्याची लक्षणे आहेत हे त्या बापडीला ठाऊक नव्हते.

आमच्या लहानपणी दिवेलागणी झाल्यावर घरातली सर्व मुले एकत्र बसून (किंवा उभे राहून) श्लोक, परवचा, पाढे वगैरे म्हणत. ते ऐकून ऐकून आणि त्यांच्यासोबत म्हणता म्हणताच मला पाठ होऊन गेले होते. त्यामुळे मला शाळेत ते वेगळ्याने शिकावे लागले नाहीत. "माझ्याजवळ चार गोट्या आहेत आणि तुझ्याजवळ तीन, तर दोघांच्या मिळून किती?" किंवा "आपल्याकडे बारा खडू आहेत ते तीन मुलांना वाटले तर प्रत्येकाला किती मिळतील?" अशा प्रकारच्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यातील फक्त एक क्रिया असलेल्या सोप्या तोंडी सोडवण्याच्या हिशोबापासून गणिताची सुरुवातही घरातच होत असे. या चार मूलभूत क्रियांमधली कोणती क्रिया केंव्हा वापरायची हे कळल्यानंतर आणि ते कसे करायचे याची रीत समजल्यानंतर अंकगणितात कठीण काय आहे हेच मला समजत नव्हते. एक अंकी आंकड्याऐवजी त्यात चार पांच अंक असले तर त्याला फक्त थोडा जास्त वेळ लागेल, वेगवेगळ्या दहा आकडेमोडी करण्याची गरज असेल तर त्या करायच्या, त्यानंतर उत्तर येणारच! एका प्रकारची दोन तीन गणिते सोडवून झाल्यावर आणि त्याचे उत्तर बरोबर आहे हे पाहून झाल्यावर पुन्हा तशीच गणिते न करता मी गणिताचा वेगळा प्रकार शोधत असे. ते सोडवायला घेतल्यानंतर मात्र त्याचे बरोबर उत्तर मिळेपर्यंत मला चैन पडत नसे. वेगवेगळ्या त-हेची गणिते सोडवून पहाण्याचा मला नादच लागला. सोप्या आंकडेमोडीनंतर अपूर्णांक, त्रैराशिक, सम आणि व्यस्त प्रमाण, सरळ आणि चक्रवाढ व्याज वगैरे टप्प्याटप्प्याने शिकून बहुतेक सगळे अंकगणीत शाळा सोडेपर्यंत शिकून झाले होते. कॉलेजमध्ये गणिताच्या अभ्यासात अंकगणित हा विषय नव्हता. त्यातली कांही किचकट आंकडेमोड सुलभपणे करण्याच्या युक्त्या पुढे वैदिक गणितावर आलेल्या लेखांमध्ये वाचनात आल्या एवढेच। पण तोपर्यंत हाताने आंकडेमोड करण्याची गरज उरली नसल्यामुळे त्या युक्त्यांचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग करण्याची वेळ आली नाही.

अगदी सुरुवातीला सरळ रेषा, वक्र रेषा, समांतर रेषा वगैरे काढायला शिकतांना हांताच्या आणि बोटांच्या हालचालीवर ताबा मिळण्याचा तो प्रयत्न असला तरी त्यातूनच भूमितीची पहिली ओळख होत असे. पुढे गोल भाकरी, त्रिकोणी सामोसा, चौकोनी पुस्तक असे वेगवेगळे आकार आले. त्यानंतर त्यांचे परीघ, क्षेत्रफळ वगैरे काढण्याचे नियम, गुणधर्म वगैरे येत प्रमेये आली. ती लक्षात ठेवण्यासाठी आधी थोडा प्रयत्न करावा लागला तरी त्यावर आधारलेली गणिते सोडवून झाल्यानंतर ती आपोआप लक्षात रहात असत. त्यांचा उपयोग अंकगणिताएवढा रोजच्या जीवनात होत नसला तरी ती अगदी अनोळखी वाटायची नाहीत। पदार्थविज्ञानाच्या अभ्यासात परीघ, क्षेत्रफळ, घनफळ वगैरेंची आवश्यकता पडतही असे. चित्रकलेमधील त-हेत-हेच्या आकृत्या काढण्यासाठी आणि भूगोलातले नकाशे शिकण्यासाठी भूमितीच्या माहितीचा चांगला उपयोग होत असे.

हायस्कूलमध्ये गेल्यानंतर बीजगणिताची ओळख झाली. कुठल्याही माहित नसलेल्या संख्येला 'क्ष', 'य' अशी नांवे देण्याची ती पध्दत पाहून आधी खूप गंमत वाटली. पण अंकगणितात कठीण किंवा अशक्य वाटणारी कोडी या 'यक्ष' मंडळींच्या सहाय्याने पटापट सोडवता येऊ लागली तेंव्हा त्याचे आकर्षण अधिकच वाढले, तसेच उजव्या डाव्या बाजूंचे समीकरण मांडण्याचे महत्व समजले. पुढे येणा-या कॅल्क्युलसमध्ये 'क्ष' आणि 'य' यांचे जवळ जवळ शून्याइतके सूक्ष्म तुकडे करायचे आहेत आणि बीजगणित हा त्याचा पायाभूत विषय आहे हे तेंव्हा माहीत नव्हते. हा विषय ज्यांना समजत असे त्यांना तो फार आवडत असे आणि कांही लोकांच्या डोक्यात कांही केल्या शिरत नसे त्यांना त्याची धास्ती वाटायची. गणित हा शंभर टक्के तर्कसंगत विषय असल्यामुळे मला अगदी सोपा वाटत असे आणि मनापासून प्रिय होता.
. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Tuesday, November 25, 2008

शाळेतले शिक्षण (भाग ५)

इतिहासाच्या शिक्षणाबरोबर भूगोलाचे ज्ञान होत जाणे जरूरीचेच असते. अलेक्झँडर ग्रीसहून निघाला आणि भारताच्या सीमेपर्यंत येऊन पोचला म्हणजे नक्की कोठून कोठे आणि कसकसा गेला ते समजण्यासाठी आग्नेय यूरोप आणि पश्चिम आशियाची माहिती हवी. भारतातल्याच चौल, चालुक्य, शिलाहार वगैरेपासून मोगल, मराठा किंवा रजपूतांपर्यंत अनेक साम्राज्यांच्या राजवटी कोणत्या भागात होत्या किंवा इंग्रजी राज्याची सुरुवात कुठून झाली आणि ते कसे देशभर पसरत गेले हे समजण्यासाठी भारताच्या नकाशाचे निदान जुजबी ज्ञान तरी हवे.

भौगोलिक रचनेचा इतिहासातल्या घटनांवर मोठा प्रभाव पडला आहे. उत्तरेला हिमालय, पश्चिमेला वाळवंट, पूर्वेला घनदाट अरण्य आणि दक्षिणेला समुद्र असे नैसर्गिक संरक्षण भरतखंडाला चारही बाजूंनी प्राप्त झाले होते. इथले वेगवेगळ्या वंशाचे राज्यकर्ते आपापसात युध्दे करून आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात असत. या नैसर्गिक सीमांच्या पलीकडे भारतीय संस्कृतीचा प्रसार दूरवर झाला असला तरी कोणा सम्राटाने आपल्या राज्याचा विस्तार इराण, तिबेट किंवा ब्रम्हदेशात केल्याचा इतिहास नाही. पायी चालत बाहेरून येणा-या आक्रमकांना मोठ्या संख्येने इकडे येणे कठीण होते. त्यातूनही खैबरखिंडीची चिंचोळी वाट निघाली. तिच्यातून चंचूप्रवेश करून आलेल्यांना माघारी परत जाणे कठीण होते. त्यामुळे ग्रीक, शक, कुशाण, हूण आदी लोकांच्या टोळ्या आल्या आणि इथल्या समाजात विलीन होऊन गेल्या. घोडदळ, मोठाले गाडे आदी वाहतूकीच्या साधनांचा आणि शस्त्रास्त्रांचा विकास झाल्यानंतर आणि पश्चिमेकडील देशात
लढाऊ वृत्तीच्या लोकांचा रेटा वाढल्यामुळे मध्ययुगात तिकडून अनेक वेळा एका पाठोपाठ एक अशी आक्रमणे झाली आणि भारताचा मोठा भाग इस्लामी राजवटीखाली गेला. प्राचीन काळापासून नौकानयन होत असले तरी ते व्यापारापुरते मर्यादित असायचे. त्यामुळे अथांग पसरलेल्या समुद्रातून आपल्यावर मोठा लष्करी हल्ला होऊ शकतो अशी कल्पनासुध्दा पूर्वी करवत नव्हती। पण अवाढव्य आकाराच्या जहाजांची बांधणी, होकायंत्रासारखी साधने आणि तोफखान्याचा दारूगोळा यांच्या प्रगतीच्या जोरावर युरोपियन लोकांनी जगभरातली बहुतेक सगळी खंडे काबीज केली आणि जिकडे तिकडे आपल्या वसाहती वसवल्या. भूगोलाच्या अद्ययावत ज्ञानाचा त्यांना यात जबरदस्त फायदा झाला.

फक्त इतिहास समजण्यासाठी भूगोल शिकायला पाहिजे असे नाही. अगदी लहान मुलाला देखील खिडकीच्या बाहेर काय दिसते ते पहाण्याचे विलक्षण कुतूहल असते. आपल्या डोळ्यांना क्षितिजापर्यंतचा भाग दिसतो। त्यापलीकडचा भूभाग कसा आहे हे जाणून घ्यायची उत्कंठा प्रत्येकाला असते. ही उत्कंठा शमवण्यासाठी कित्येक लोकांनी जिवाचे रान केले आहे. हिमालयाच्या गिरीशिखरांपासून सहाराच्या वाळवंटापर्यंत आणि आफ्रिकेतल्या घनदाट अरण्यांपासून ध्रुवप्रदेशातल्या निर्जन बर्फाळ प्रदेशापर्यंत अत्यंत दुर्गम अशा जागी कांही संशोधक गेले आणि तिथे त्यांना जे दिसले ते त्यांनी जगाला सांगितले. कुतूहलाची उपजत देण ज्यांना असते त्यांच्या मनात भूगोल या विषयाचे आकर्षण निर्माण होतेच. जगात कोणकोणत्या प्रकारचे प्रदेश आहेत आणि आपल्याशिवाय आणखी कोणकोणत्या प्रकारच्या लोकांची तिथे वस्ती आहे याची माहिती मनोरंजक वाटते. भूगोल या विषयाचा अभ्यास करतांना घरबसल्या ही माहिती वाचायला मिळाली तर अजून काय पाहिजे ?

भूगोल या विषयाचा अभ्यासही पाचवीपासून सुरू झाला आणि क्रमाक्रमाने वाढत गेला. आपले गांव, तालुका यांची माहिती सर्वांनाच पाठ्यपुस्तकात मिळणार नाही. ती जागा ऐतिहासिक किंवा धार्मिक कारणांसाठी प्रसिध्द असेल किंवा तेथे थंड हवेचे ठिकाण, मोठा कारखाना, धरण वगैरे असेल तर गोष्ट वेगळी! पण जिल्ह्यांपासून सुरू होऊन राज्ये, देश, शेजारचे देश, खंड अशी चढती भाजणी सुरू होत असे. त्याखेरीज महासागर, समुद्र, पर्वत, नद्यांचे प्रवाह आदि महत्वाच्या नैसर्गिक गोष्टी शिकवल्या गेल्या, वेगवेगळ्या भागातले वातावरण, वारे, पाऊस वगैरेंची माहिती मिळाली. आपण जेंव्हा उन्हाच्या काहिलीने हैराण झालेलो असतो तेंव्हा ऑस्ट्रेलियातले लोक थंडीने कुडकुडत असतात आणि आपण शाळेला जातो त्या वेळेस अमेरिकेतली मुले गाढ झोपलेली असतात हे वाचायला मजा वाटत असे. एस्किमो लोक बर्फाची इग्लू करून त्यात राहतात किंवा जपानी लोकांची घरे लाकडाची असतात आणि त्याला पुठ्ठ्याच्या भिंती असतात, आफ्रिकेतल्या जंगलात नरभक्षण करणारे राक्षस राहतात आणि चीनमधले लोक उंदीर आणि झुरळांनासुध्दा खाऊन टाकतात असली वेगवेगळ्या प्रदेशात राहणा-या लोकांची विभिन्न जीवनशैली वाचतांना तर खूपच गंमत वाटायची. एकंदरीत भूगोल हा विषय मला मजेदार वाटायचा. शाळेत असतांना मला दक्षिणेकडला 'उत्ताप्पा' किंवा बंगालमधला 'संदेश' देखील खायला मिळाला नव्हता.त्या पदार्थांची नांवेच कुतूहल निर्माण करीत. 'प्रवासवर्णन' या सदरात जेवढी म्हणून पुस्तके मला लायब्ररीत मिळायची ती मी वाचून काढली असतील. त्यामुळे भूगोलाची गोडी वाढतच गेली. शाळा सोडून पन्नास वर्षे व्हायला आली असली तरी ती अद्याप कमी झालेली नाही.

रोमांचकारक इतिहास आणि मजेदार भूगोल यांच्या सोबतीला नागरिकशास्त्र नांवाचा एक भयाण विषय असायचा. भारताचे संघराज्य, त्याची राज्यघटना, केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्यसंस्था, विविध विधीमंडळे, त्यांचे सभासद, सभापती, त्यांचे अधिकार आणि त्यांच्यावरील जबाबदा-या, अमके आणि ढमके असले त्या वयात अजीबात न समजणारे शब्द आणि त्यांचे अत्यंत रुक्ष वर्णन यांनी भरलेला हा विषय कमालीचा कंटाळवाणा वाटत असे. तो समजणे सर्वसाधारण मुलांच्या शक्यतेच्या पलीकडे असल्यामुळे गाळलेल्या जागा भरा किंवा जोड्या जमवा अशा प्रकारचे सोपे प्रश्न परीक्षेत विचारून पास होण्याची सोय केली जाई.

. . . . . . . . . . (क्रमशः)

Monday, November 24, 2008

शाळेतले शिक्षण (भाग ४)

इंग्रजी आणि संस्कृत हे दोन ऐच्छिक विषय सोडले तर उरलेले सारे विषय सर्वांना समान असत. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे सोशल स्टडीजमध्ये येत; पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यांना मिळून 'शास्त्र' असे नांव होते आणि अंकगणित, भूमिती व बीजगणित हे गणित या विषयाचे उपविभाग होते. हेच विषय वेगवेगळे किंवा एकत्र करून एसएसएलसीला घ्यायचे थोडेसे स्वातंत्र्य होते. एकत्र किंवा वेगवेगळे घेण्यात त्या विषयाच्या अभ्यासक्रमाची लांबी, रुंदी आणि खोली यांत फरक पडत असेल पण मास्तरांच्या शिकवण्यात तो विशेष जाणवत नसे. अखेर ज्या त्या मुलाची जशी रुची व कुवत असे, तसेच कोणत्या विषयात जास्त मार्क मिळवून टक्केवारी वाढवता येते अथवा कोणता विषय निदान पास होण्यापुरते मार्क मिळवायला सोपा पडेल वगैरे बाबींचा विचार करून जो तो ते ठरवत असे. पण हे सगळे शेवटच्या वर्षी परीक्षेचा फॉर्म भरतांना ठरवता येत असे. तोंपर्यंत सगळ्यांना सगळे कांही शिकण्याची मुभा असायची. दहावीपर्यंत चित्रकला, क्रीडा, व्यायाम वगैरे अवांतर विषय असायचे. ते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असले तरी परीक्षेच्या कामाचे नव्हते. पुढील काळात चित्रकार, नट किंवा खेळाडू यांना यशाबरोबर उदंड कीर्ती आणि समृध्दी प्राप्त होऊन ते झटपट करोडपती होऊन जातील असे तेंव्हा कोणाच्या स्वप्नातसुध्दा येत नव्हते.

इतिहासाच्या अभ्यासाची सुरुवात पांचवीतच व्हायची. सर्व गतकालाची 'प्राचीन','मध्ययुग' आणि 'अर्वाचीन' कालखंडात विभागणी करून एकेक कालखंड दरवर्षी शिकवला जाई. त्याच क्रमाने त्याची उजळणी आठवी ते दहावीत झाली. पांचवी ते सातवीत असतांना वेगवेगळे राजे, महाराजे, सुलतान आणि बादशहा यांच्या घराण्यांच्या वंशावळी, त्यांचे जन्म, मृत्यू आणि त्यांनी केलेल्या युध्दांच्या सनावली एवढेच महत्वाचे होते. हायस्कूलमध्ये शिकतांना त्याच्या जोडीला त्या काळातले समाजजीवन, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगती तसेच उत्खननात सापडलेल्या गोष्टी, बखरी, प्रवासवर्णने वगैरे तपशील भरून पुस्तकांची जाडी चौपट होत असे. कोठल्या तरी राजाच्या किंवा बादशहाच्या कारकीर्दीत त्याने काय केले असा एक प्रश्न हमखास असायचा. त्यावर "त्याने सुंदर इमारती, किल्ले, धरणे, कालवे आणि रस्ते बांधले, रस्त्यांच्या कडेला झाडे लावली, नद्यांच्या किना-यावर घाट बांधले, नदी नसेल तेथे विहिरी खणल्या, गांवोगांवी धर्मशाळा बांधल्या. जनतेवरील कराचा बोजा कमी केला." वगैरे लिहिले तर ते कोणालाही लागू पडत असे. ज्या राजाने यातले कांहीच केले नव्हते त्याने काय केले असा प्रश्न कधी विचारतच नसत.

हा भाग तसा नीरस असला तर इतिहासाला अत्यंत मनोरंजक असा दुसरा पैलू आहे. इतिहासातल्या घटना या घडून गेलेल्या 'गोष्टी'च असल्यामुळे त्यातील विविध प्रसंगांबरोबर कथानके, आख्यायिका वगैरे जोडल्या गेल्या आहेत। अनेक लोकप्रिय नाटके, कादंब-या आणि काव्यांमधून ते प्रसंग छान रंगवले गेले आहेत. त्यामुळे इतिहास हा विषय गोष्टींच्या रूपाने शिकतांना बालवयात तो आकर्षक वाटायचाच. त्यातील मुख्य पात्रांची कांही 'आपली' आणि कांही 'परकी' किंवा 'शत्रूपक्षाची' अशी आपोआपच विभागणी होत असे. मग आपल्या कथानायकाने शत्रूचा 'निःपात' केला, त्याचा 'समूळ नायनाट' केला की त्याच्या शौर्याचा व पराक्रमाचा अभिमान वाटायचा आणि शत्रू मात्र आपल्या लोकांची 'निर्घृण कत्तल' करायचा त्यामुळे त्याच्याबद्दल मनस्वीचीड वाटायची. वेळ पडल्यास आपला नायक शत्रूच्या 'हातावर तुरी देऊन' शिताफीने निसटून जायचा तर पळपुटा शत्रू 'भ्याडासारखा' पळ काढायचा. विजयाची खात्री नसली तर आपला राजा 'मुत्सद्देगिरी' दाखवून तह वगैरे करायचा आणि शत्रूपक्ष 'नामुष्कीने' वाटाघाटी करायला तयार होत असे. आपल्या विजयी वीरांचे शौर्य ऐकून स्फुरण चढायचेच, पण पराभूत झालेले संस्मरणीय वीर अखेरच्या श्वासापर्यंत प्राणपणाने लढून केवळ दुर्दैवाच्या फे-यामुळे अखेरीस 'धारातीर्थी' पडले असे वाटे. दुश्मनाचा विजय 'कपट कारस्थाने', 'दगलबाजी' आणि अखेर दैवाची त्याला साथ मिळाल्यामुळे व्हायचा. पराभूत झालेला शत्रू तर कुचकामाचाच होता. त्याचे नांवसुद्धा जाणून घ्यावे असे वाटत नसे. असे वेगवेगळे रंग त्यात भरल्यामुळे इतिहासात खूपच रंजकता येत असे.

पुस्तकात छापलेल्या गोष्टी बरोबरच असणार याबद्दल साधारणपणे बहुतेकांना खात्री असल्यामुळे त्याबद्दल त्यांना शंका वाटत नसे. पण कांही मुले संध्याकाळी 'बौध्दिक' वगैरे ऐकून येत असत. त्यामुळे त्यांच्या 'आपले' व 'परके' यांच्या याद्या वेगळ्या असत. त्याप्रमाणे कोण चांगले आणि कोण वाईट हे ठरत असे. अकबर आणि शहाजहान यांसारखे बादशहा, महात्मा गांधी व पंडितजींसारखे राष्ट्रीय नेते यांच्या संबंधात पुस्तकात जेथे कांही चांगले लिहिलेले असे त्या पानावर ते पेन्सिलीने फुल्या मारीत. परीक्षेत मात्र चांगले मार्क मिळवण्यासाठी पुस्तकात दिल्याप्रमाणे उत्तर लिहावे की तत्वनिष्ठेपोटी परीक्षेतले मार्क घालवावेत अशी शृंगापत्ती त्यांच्यावर ओढवत असे. स्वतःच्या बुध्दीने विचार करून आपले स्वतंत्र मत बनवण्याएवढी अक्कल त्या वयात नसते. त्यामुळे मनावर ज्या विचारांचा प्रभाव पडेल त्याप्रमाणे कधी कधी इतिहासाचा अर्थ वेगळा लागत असे. कोठल्याच विचारप्रणालीचा संबंध न आलेल्या मुलांना कदाचित इतिहास हा विषय तेवढा महत्वाचा वाटत नसणार.
. . . . . . . . . . (क्रमशः)

Sunday, November 23, 2008

शाळेतले शिक्षण (भाग ३)

मी पहिल्या भागात जो अनुभव सांगितला आहे तो होता 'मराठी' मुलांच्या शाळेतला म्हणजे प्राथमिक शाळेतला. आजूबाजूच्या गांवांमधल्या मराठी व कानडी माध्यम असलेल्या मुला व मुलींच्या निरनिराळ्या शाळांमधल्या सगळ्या विद्यार्थ्यासाठी तालुक्याच्या गांवी एकच 'हायस्कूल' होते. त्यात शिक्षणाच्या माध्यमानुसार वेगळ्या तुकड्या असायच्या. त्यातल्या प्रत्येक तुकडीत मुले आणि मुली या दोघांचाही समावेश असला तरी क्लासरूममध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळे विभाग आणि बसण्यासाठी वेगवेगळी बाकडी असत. वर्गाच्या दोन्ही बाजूंना लांबलचक कॉरीडॉर होते, त्यांमधून येण्याजाण्यासाठी वेगळे दरवाजे असत. एका व्हरांड्यामधून फक्त मुलांना आणि दुस-यातून फक्त मुलींना चालायला परवानगी होती. मुले आणि मुली आपापली वेगवेगळी कोंडाळी करून हिंडत. त्यांच्यात सतत एक प्रकारचे शीतयुध्दाचे वातावरण असे. आपापसात बोलतांनाच विरुध्द बाजूला ऐकू येतील असे टोमणे व खोडसाळ ताशेरे मारणे, टिंगल किंवा नक्कल करणे वगैरे नेहमी चालायचे, पण सख्खे बहीण भाऊसुद्धा शाळेच्या आवारात कधीही अमोरासमोर उभे राहून एकमेकांशी बोलत मात्र नसत. त्यामुळे सहशिक्षण होते पण सहजीवन नव्हते अशातली परिस्थिती होती.

आमच्या हायस्कूलमध्ये सुरुवातीपासूनच म्हणजे आठवीपासून बरेच शिस्तबद्ध वातावरण होते. आधीच्या 'इंग्रजी' शाळेचेच हे नवे रूप होते आणि इंग्रजांच्या काळातील जुने शिक्षक आता मुख्याध्यापकाच्या पदावरून तिचा कारभार चालवत असल्यामुळे बरेचसे पूर्वीचे वातावरण शिल्लक राहिले असावे. त्या काळात मुलांना सक्तीचा गणवेष नव्हता, मात्र त्यांनी अंगात नीटनेटके कपडे घालणे आवश्यक होते. मुलींना उपजतच चांगल्या वेषभूषेची हौस असते आणि शाळेत मुली आहेत म्हंटल्यावर आपसूकच मुलांनाही आपण जरा बरे दिसावे असे वाटत असणार! आठवड्याचे वेळापत्रक होते आणि त्यानुसार वेगवेगळे विषय शिकवण्यासाठी त्या त्या विषयांचे तज्ञ गुरूजी नियमितपणे येऊन आपापले तास घेत. आज हे ऐकायला अगदी सामान्य वाटत असले तरी 'मराठी' शाळेतून 'हायस्कूल' मध्ये गेल्यानंतर आम्हाला त्या वेळेस त्याचे केवढे कौतुक वाटायचे?

आम्ही शाळेत असतांनाच राज्यपुनर्रचना होऊन 'मुंबई प्रांता'त असलेला आमचा भाग 'मैसूर' राज्यात गेला. तिकडच्या शिक्षणपध्दतीत बराच फरक होता असे ऐकले होते. आधीच पुण्यामुंबईकडच्या शिक्षणतज्ञांनी ठरवलेला अभ्यासक्रम आमच्या गांवापर्यंत नीटपणे पोचत नव्हता. त्यात हे बंगलोरचे तज्ञ आणखी काय करणार आहेत या काळजीने कांही लोक चूर झाले. मध्यंतरीच्या काळात धारवाड हुबळीकडची मंडळी त्यात समन्वय आणण्याचे काम करतील असे ठरवले गेले म्हणे. 'मॅट्रिक'ची परीक्षा जाऊन तिच्या जागी अकरावी इयत्तेची 'एसएसएलसी' नांवाची शालांत परीक्षा आली.

परीक्षा घेणा-या बोर्डाने अनेक विषय ठेवले असले तरी आमच्या शाळेत भाषा, गणित, समाजशास्त्र आणि विज्ञान एवढे ठराविक विषयच शिकवण्याची सोय होती. मराठी माध्यमात शिक्षण घ्यायचे तर 'मराठी भाषा' हा विषय आलाच. तो मला अत्यंत प्रिय होता. पुरातन कालातल्या संतकवींपासून तत्कालिन लोकप्रिय लेखकांपर्यंत सर्वांचे विविध प्रकारचे साहित्य वाचायची मला आवड होती. वर्गात शिकवले जाणारे धडे त्यापुढे यःकश्चित वाटायचे. राष्ट्रभाषेतले बरेचसे शब्द लता, आशा, मुकेश, रफी यांच्या गोड गळ्यातून कानावर पडत असल्यामुळे ती भाषा ऐकायला गोड आणि समजायला सोपी वाटायची. त्या काळात तिच्यावर 'टपोरी', पंजाबी किंवा भोजपुरी बोलींचे आक्रमण झालेले नसल्यामुळे हिंदी सिनेमातले नटनट्या बरीच शुध्द भाषा बोलत असत हे मला मोठा झाल्यानंतर कळले. गांवात एकही हिंदीभाषी कुटुंब नसल्यामुळे प्रत्यक्ष जीवनात ती कधी कांनावर पडलीच नाही आणि "सिनेमाच्या नादाने मुले बिघडतात." असे वडीलधारी मंडळींचे ठाम मत असल्यामुळे सिनेमा पाहून त्यातून हिंदी शिकायची संधी मला शाळेत असतांना मिळाली नाही. कानडी मुलुखात रहात असल्यामुळे लहानपणापासून त्या भागातली प्रचलित बोली बोलता येतच होती. तिची मुळाक्षरे आणि सोपी शुध्द वाक्ये शिकण्याची संधी शाळेत मिळत होती ती सोडण्यात अर्थ नव्हता.

मला कॉलेजात जायचे होतेच, त्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे अत्यावश्यक होते. तिची लिपी, उच्चार, वाक्यरचना वगैरे सगळेच फार वेगळे असल्यामुळे ते सारे चार वर्षात आत्मसात करणे जडच जात होते, पण त्याला इलाज नव्हता. मी जर कधी मनाविरुध्द अभ्यास केला असेल तर तो याच विषयाचा! ज्यांना कॉलेजात जायचेच नव्हते अशी मुले मात्र इंग्रजी भाषा कठीण म्हणून सोडून देत असत. 'भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती।' असे जिचे कौतुक केले जाते ती संस्कृत भाषा शिकण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तिच्यातले 'अ'कारांत, 'आ'कारांत वगैरे अनेक प्रकारचे अंत असलेल्या, विभिन्न लिंगे असलेल्या शब्दांच्या तीन वचनानुसार बदलणारी सात विभक्त्यांमधली विविध रूपे "रामः रामौ रामाः" करीत पाठ करणे मुलांच्या सहनशक्तीचा अंत पहात असे आणि वेगवेगळ्या प्रकारचे धातु तीन वचनांमध्ये आणि अनेक काळांमध्ये "गच्छामि गच्छावः गच्छामः" करीत 'चालवतांना' त्यात आमचीच 'गच्छंती' होत असे. बहुतेक मुलांना असले प्रचंड पाठांतर करायची मुळीच हौस नसायची आणि गरजही वाटत नव्हती, त्यामुळे ते तिच्यापासून दूर रहायचे.
.... ...... (क्रमशः)

शाळेतले शिक्षण (भाग २)

ब्रिटीशांनी भारतात दोन प्रकारच्या सरकारी शाळा सुरू केल्या होत्या. त्या काळच्या भाषेत सांगायचे झाले तर "एतद्देशीय मनुष्यांना ज्या योगे त्यांच्या भाषेतच शहाणपण शिकून घेण्याचा लाभ घडेल" अशा उद्देशाने जागोजागी ('मराठी' सारखी) 'व्हर्नाक्युलर स्कूल्स' काढली होती. तेथील शिक्षणाची सुरुवात पहिल्या इयत्तेतल्या 'श्रीगणेशायनमः'ने होत असे आणि सातवीनंतर व्ह.फा. (व्हर्नाक्युलर फायनल) परीक्षेने ते संपत असे. फायनलची ही परीक्षा सर्वार्थाने अंतिम होती. त्यापुढे शिक्षण थांबतच असे. त्याहून अधिक शहाणपणाची 'एतद्दशीयांना' गरज नाही किंवा ते मिळणे इंग्रजांना अडचणीचे होईल असा विचार त्यांनी केला असणार. त्यातही शहाणपणाच्या चार गोष्टींबरोबरच "भो पंचमजॉर्जभूप धन्य" यासारख्या कविता आणि "येशूचे शुभवर्तमान" शिकवून त्यातून राजनिष्ठा आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसारही करीत असत.

'कल्याणकारी' इंग्रजांच्या सरकारचा कारभार सुरळीतपणे चालावा यासाठी 'लायक' व 'स्वामीभक्त' असा नोकरवर्ग निर्माण करण्याच्या हेतूने दुस-या प्रकारच्या म्हणजे 'इंग्रजी' शाळा सुरू केल्या होत्या. हवे असल्यास मराठी शाळेच्या चार इयत्ता पास केल्यानंतर या शाळांमधल्या पहिल्या इयत्तेत प्रवेश करून पुढील शिक्षण सुरू होत असे. त्यामुळे आपला मुलगा आता कितवीत आहे हे सांगतांना "तो इंग्रजी तिसरीत आहे " किंवा "मराठी चौथीत आहे" हे मुद्दाम सांगावे लागे. इंग्रजी शाळेत सात वर्षे शिकल्यानंतर मॅट्रिक्युलेशनची परीक्षा असे. ती पास होणे कठीण होते, त्यामुळे अनेकांना तो अडसर ओलंडता येत नसे. तिथपर्यंत पोचलेल्यांना 'नॉनमॅट्रिक' असे म्हणत असत. 'नॉनमॅट्रिक' हा शब्द वापरातून पार नाहीसा झाला होता. अलीकडे कुमारी गंगूबाईने त्याचे पुनरुज्जीवन केले. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतरच कॉलेजचे दरवाजे उघडत. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करीत डॉक्टरेटपर्यंत हवे तेवढे शिक्षण घेण्याची सोय अनेक शिक्षणमहर्षींच्या परिश्रमातून भारतात झालेली होती. कांही असामान्य कर्तृत्व असलेले लोक उच्च शिक्षणासाठी थेट इंग्लंडमध्ये जाऊन तेथून रँगलर, बॅरिस्टर, एफआरसीएस आदी पदव्या संपादन करीत.

मी शाळेत जायला लागलो तोंपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. महात्माजींच्या अहिंसक चळवळीमुळे ज्यांना प्रत्यक्ष इंग्रजांना ठोकायला मिळाले नव्हते त्यांनी त्याचा सूड इंग्रजी भाषेवर उगवून बहुधा तिलाही देशातून हद्दपार करायचा चंग बांधला असावा. सरकारी इंग्रजी शाळातून मॅट्रिकपर्यंतचे सारे शिक्षण भारतीय भाषांमधून द्यायला सुरुवात झाली. मातृभाषेतून शिक्षणाची संधी मिळणे ही उत्कृष्ट गोष्ट असली तरी त्यासाठी इंग्रजी भाषेचे एकदम उच्चाटन करण्यात थोडी घाई झाली होती. माझे सातवीपर्यंतचे शिक्षण मराठी शाळेत झाले. तिथे इंग्रजीचा गंधही नव्हता. 'व्हर्नाक्युलर फायनल'ची परीक्षाही बंद झाली. शाळेची सातवी परीक्षा पास करून आठवीला हायस्कूलला गेलो. तेंव्हा कुठे 'इंग्रजी' या एका विषयाची 'एबीसीडी' शिकायला सुरुवात झाली. मुळाक्षरे, शब्द, वाक्यरचना वगैरेच्या पाय-या पटापट ओलांडून शेक्सपीयरच्या नाटकांतले उतारे आणि वर्डस्वर्थच्या कविता शिकणे सगळ्यांना जमत नसे. त्यामुळे इंग्रजी हा विषय ज्यांचा कच्चा रहात असे त्यांना तो विषय वगळून शालांत परीक्षा पास होण्याची सोय केली होती. त्यामुळे 'ऐच्छिक' झालेला तो विषय शिकवण्याकडे अधिकच दुर्लक्ष होऊ लागले होते.
(क्रमशः)

Friday, November 21, 2008

शाळेतले शिक्षण (भाग १)

"मी कोण होणार?" या मालिकेत खेळाडू, कलाकार, डॉक्टर, कलेक्टर वगैरे पर्याय कसे एकेक करून कटाप होत गेले आणि अखेरीस मी इंजिनियरिंगला कसा गेलो ते सांगितले होते. मी प्रत्यक्षात इंजिनियरिंग केले असले तरी हे लेख म्हणजे फक्त माझे आत्मकथन नव्हते. पन्नास वर्षांपूर्वी लहान गांवात वाढलेल्या मुलांचे अनुभव एकत्र करून त्याला रंजकता आणण्यासाठी पदरचे तिखटमीठ लावले होते. या लेखाचा थोडा विस्तार या मालिकेत करीत आहे.

मी मोठा झाल्यावर जो कोण होईन ते सर्वस्वी माझ्या शिकण्यावरूनच ठरणार आहे ही गोष्ट अगदी लहानपणापासून माझ्या मनावर खोलवर बिंबवली गेली होती. 'विद्या' या विषयावरील अनेक सुभाषिते तोंडपाठ करून घेतली होती. त्यांची उजळणी व्हायची. घरातले एकंदरीतच वातावरण शिक्षणाला प्राधान्य देणारे होते. त्यामुळे मी शाळेत असल्यापासून काय (काय काय!) शिकलो ते थोडे पाहून घेऊ.

आमच्या प्राथमिक शाळेतल्या कांही मास्तरांची शेतीवाडी होती. त्यात ते धान्यधुन्य, भाजीपाला, फळफळावळ वगैरेंची लागवड करीत असत. कोणी गायी म्हशी पाळून दूधदुभत्याचा धंदा चालवत होते, कोणी पत्रिका पाहणे, त्या जुळवणे, विविध प्रसंगासाठी सुमुहूर्त काढणे वगैरे करायचे, तर कोणाचे सायकल दुरुस्तीचे किंवा अन्य कसले तरी दुकान होते. त्या सगळ्यांचा व्याप सांभाळून फावल्या वेळात ते शाळेत येऊन मुलांना शिकवण्याचे कामसुद्धा करायचे. त्यामुळे शाळेत जितक्या 'यत्ता' तेवढे 'गुर्जी' असे चित्र नेहमी दिसायचेच असे नाही. बाहेरगांवावरून नोकरीसाठी आमच्या गावात आलेले कांही शिक्षक होते। ते तेवढे नियमितपणे शाळेत येऊन मन लावून शिकवण्याचे काम करायचे आणि वेळ पडेल तेंव्हा एकाच छडीच्या जोरावर दोन दोन वर्गातली मेंढरे हांकायचे.

"कोणत्या इयत्तेत कोणत्या विषयात काय शिकवले जावे" यावर पुण्यामुंबईतली विद्वान मंडळी विचारविनिमय करून त्याचा अभ्यासक्रम वगैरे ठरवायची म्हणे. त्यानुसार ते लोक अधून मधून
पाठ्यपुस्तकांत किरकोळ फेरफार देखील करायचे. पण त्या पुस्तकांच्या अशा सुधारलेल्या आवृत्या गोगलगायीच्या पावलाने सरकत सरकत आमच्या गांवापर्यंत येऊन पोचायला महिनोगणतीचा वेळ लागत असे. वर्गातल्या प्रत्येक मुलाकडे प्रत्येक विषयाचे नवे कोरे पाठ्यपुस्तक असलेच पाहिजे असा दंडक त्यावेळेस नव्हता. शाळेतली बहुतेक मुले वरच्या वर्गात गेलेल्या मुलांची सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हँड पुस्तकेच स्वस्तात विकत घेत असत. संयुक्त कुटुंबांमध्ये पाठोपाठच्या इयत्तेत शिकणा-या मुलांमुलींची रांग असे. त्यामुळे जोंवर एकाद्या पुस्तकाच्या फाटून चिंध्या होत नाहीत, उंदीर घुशी ते कुरतडत नाहीत किंवा छतातून गळलेल्या पाण्यात भिजून त्याचा लगदा होत नाही तोंपर्यंत एकदा विकत घेतलेले पुस्तक वापरात असायचे. एकाच वर्गातल्या मुलांकडे वेगवेगळ्या आवृत्या असणे साहजीकच वाटायचे। "माझ्या पुस्तकात हे चित्र आहे, तुझ्या पुस्तकात कुठे आहे?" अशी चिडवाचिडवीसुध्दा त्यावरून व्हायची.

पण यामुळे शाळेतल्या शिक्षणात फारसा फरक पडत नसे. गणितातल्या 'काळ काम वेग' यावरील गणितातला रामा थोडा आळशी आणि शिवा थोडा मठ्ठ असला तरी बिचारा गोविंदा जास्त काम करून ते पूर्ण करीत असे, पण त्यांच्या ऐवजी चंदू, बंडू आणि नंदू आल्यावर सुध्दा त्यातला कोण कामाचा आहे ते कांही समजत नसे आणि नांवे बदलली तरी गणित सोडवणे तेवढेच कठीण जात असे.

"पानिपतच्या तिस-या युध्दात सदाशिवरावभाऊ हे मराठ्यांचे सेनापती होते." असे एका आवृत्तीत छापलेले असले तर त्यांच्या ऐवजी "नानासाहेब पेशवे किंवा मल्हारराव होळकर त्या जागी होते" असे कांही दुसरीकडे नसायचे. "हे आपल्या पुण्याचे सदाशिवरावभाऊ आणि तो अफगाणिस्तानातला अबदाली का कोण होता तो असे हे दोघेहीजण आपापली घरदारे सोडून तिस-याच कोणाच्या मुलुखातल्या पानीपतेला लढाई करायला का म्हणून गेले असतील?" हे कोडे त्यातल्या कोठल्याही आवृत्तीत सुटत नव्हते. या लढाईत मराठ्यांचे पुरते 'पानिपत' झालेच, पण ती जिंकून अबदालीचा कोणता फायदा झाला हे मला अद्यापपर्यंत समजलेले नाही। "त्या लोकांना तेंव्हा कांही कां करेनात, आपण आपले सन आणि नांवे लक्षात ठेवायची आणि परीक्षेतल्या प्रश्नातल्या गाळलेल्या जागेत ती भरायची" यापलीकडे कोणा मुलाला त्याबद्दल फारसे कांही स्वारस्य वाटत नसे.

इतिहासाच्या वेगवेगळ्या पुस्तकांत जसे तेच्या तेच लिहिलेले असे त्याचप्रमाणे भूगोलाच्या पुस्तकातले भारताच्या पूर्वेला असलेले ब्रम्हदेश, सयाम वगैरे देश आणि पश्चिमेकडचे इराण, इराक वगैरे देश कुठल्याही पुस्तकांत आपापल्या जागेवरच दिसायचे. पाकिस्तान तेवढा पूर्व व पश्चिम या दोन्ही दिशेला असल्याने गोँधळ व्हायचा. पुढे इंदिरा गांधींनी तो प्रश्न सोडवून टाकला. ब्रम्हदेशाचे 'मायनामार' आणि मलायाचे 'मलेशिया' या नांवांनी त्या देशांची नवी बारशीही झाली. पण तोंपर्यंत माझे शाळेतले शिक्षण संपून गेलेले असल्यामुळे एवढ्याशा कारणासाठी नवी पुस्तके विकत घेण्याची पाळी माझ्यावर आली नाही.

यथावकाश या पाठ्यपुस्तकांच्या नव्या आवृत्या आमच्या शिक्षकांच्या हांतात पडत असत. पण त्यातले कोणते आणि किती शिकवायचे हा निर्णय पूर्णपणे त्यांच्याच हांतात असे. जे शिकवणारे तेच परीक्षेचा पेपर काढणार आणि तेच ते पेपर तपासणार असल्यामुळे जेवढे शाळेत शिकवले जायचे तेवढ्या ज्ञानावर पास होऊन वरच्या वर्गात जाणे कठीण नव्हते. "अमक्या इयत्तेत मला या गोष्टी शिकायच्याच आहेत." असे विद्यार्थ्याला ठाऊक असण्याचा प्रश्नच नव्हता. वाटल्यास त्याने पुस्तकातले न शिकवलेले धडे घरी वाचावेत आणि आपल्या आपणच ते समजून घ्यावेत, पण त्याबद्दल शाळेत मास्तरांना शंका विचारण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती.

कांही मुलांच्या बाबतीत "तो साळा शिकून शाना होतोय् " एवढे समाधान त्यांच्या पालकांना पुरेसा दिलासा देत असे. पहिल्या तीन चार वर्षात रोज बाराखड्या आणि पाढे गिरवून गिरवून अक्षरांची आणि अंकांची ओळख पक्की केली जायची. त्यामुळे "पोरगं लिवायला वाचायला लागलं, हिशेबबी करतंय्." एवढं 'शानपन' त्याच्या अंगात आल्यावर उरलेल्या गोष्टी तो कामाला लागल्यावर त्याला आपसूक यायला लागतील अशा विचाराने त्याची घरातल्या व्यवसायातली उमेदवारी सुरू होत असे. वडील मंडळींना मदतीसाठी त्याच्या हांतभाराची गरजही असे. अशी मुले हौस म्हणून किंवा मित्रांच्या सहवासासाठी किंवा घरात त्याची सारखी भुणभुण नसावी अशा कारणास्तव कांही काळ शाळेत येत, पण हळू हळू त्यांची संख्या गळत असे.

याच्या उलट कांही मुलांचे पालक शाळेतल्या शिक्षणाला विशेष महत्वच देत नसत. शाळेत दाखल होण्यापूर्वीच घरी त्यांचे शिक्षण सुरू झालेले असे. बोबडे बोलता बोलता थोडे स्पष्ट उच्चार यायला लागले की त्याला रोज संध्याकाळ झाल्यावर "शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा" पासून सुरू करून एक एक श्लोक म्हणायला शिकवत असत. चिमुकल्या बोटात पेन्सिल धरून पाटीवर अक्षर उमटवायला येण्यापूर्वीच अनेक श्लोक त्याला तोंडपाठ झालेले असत. मराठीनंतर संस्कृत श्लोक, स्तोत्रे वगैरे त्याच्याकडून वदवून घेतले जात. "लहानपणी जिभेला वळण लावता येते, एकदा ती ताठर आणि जड झाली की वळता वळत नाही" वगैरे कारणे देऊन अनेक श्लोक, स्तोत्रे आणि मंत्र त्याला मुखोद्गत करायला लावत. जोडाक्षरांची भेंडोळीच्या भेंडोळी उच्चारतांना त्याच्या जिभेला तर व्यायाम होत असेच, पण ते मोठ्या खणखणीत आवाजात एका दमात म्हणतांना स्वरयंत्रापासून फुफ्फुसांपर्यंत सर्व श्वसनसंस्थेलाही त्याचा चांगला अभ्यास होत असेल! ज्या मुलांना पुढे पौरोहित्य करायचे असेल त्यांच्या दृष्टीने हे पुढील व्यवसायासाठी उपयोगी पडणारे शिक्षण होते. पण फारच कमी प्रमाणात ते घडत असेल. "देवाशी संवाद साधतांना देववाणी संस्कृतमध्ये बोलले तर आपण काय बोलत आहोत ते (आपल्याला समजत नसले तरी) त्याला व्यवस्थित समजते आणि त्यावर प्रसन्न होऊन तो आपली सर्व काळजी घेतो." अशी अनेक लोकांची गाढ श्रध्दा असते. बालपणी केलेले हे पाठांतर त्यांना आयुष्यभर अनुपम समाधान देतेच, शिवाय ही शिदोरी त्यांना पुढच्या प्रवासातदेखील उपयोगी पडेल अशी त्यांची मनोमन खात्री असते.

घरातल्या या महत्वाच्या शिक्षणाच्या तुलनेत शाळेत शिकवले जाणारे भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे विषय अगदी गौण म्हणता येतील. त्या काळात जसे घरी पाठांतराला महत्व होते तसेच ते शाळेतही असायचे. तिथे सुध्दा बहुतेक सारे शिक्षण मौखिकच होते. पुस्तकातल्या कविता, उतारे, शब्दार्थ आणि कांही प्रश्नोत्तरे सगळ्या मुलांच्याकडून घोकून घेतल्या जात. वर्षाच्या सुरुवातीला घेतलेली एक कच्ची वही सर्व विषयांच्या अभ्यासासाठी वर्षभर पुरायची। इन्स्पेक्शनच्या वेळी दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पातळशा पक्क्या वह्या असायच्या. त्यात काय लिहायचे ते गुरूजी फळ्यावर लिहून द्यायचे. ते आम्ही कच्च्या वहीत घाईघाईने उतरवून घेत असू आणि शक्य तेवढे सुवाच्य अक्षर काढून घरी बसून ते पक्क्या वहीत लिहीत असू. यापलीकडे कसला गृहपाठ केल्याचे मला आठवत नाही.

शाळेतून घरी आल्यावर "आज वर्गात काय शिकलास?" असा प्रश्न कोणी विचारत नसे की दफ्तर उघडून त्यातल्या वह्यांमध्ये मी काय लिहिले आहे हे कोणी पहात नसे. आमच्या घरी थोडे शिक्षणाचे वातावरण असल्यामुळे मोठी भावंडे अधून मधून अचानक कांही प्रश्न विचारून माझी चांचणी घेत आणि वेळप्रसंगी न समजलेले समजावून सांगतही असत. त्यामुळे परीक्षेत चांगले मार्क मिळवून वरचा नंबर मिळवण्याएवढी माझी प्रगती होत असे. मला वाचनाची उपजत आवड असल्यामुळे मी हांतात पडेल ते वाचत असे आणि त्यात माझ्या पुस्तकातला शाळेत न शिकवलेला भागही थोडा थोडा डोळ्याखालून जात असे.

आमच्या लहानपणी एक कोडे घातले जाई. "जी गोष्ट देणा-याचा हांत नेहमी खाली असतो आणि ती घेणा-याचा वर असतो अशी कोणती वस्तू आहे?" याचे उत्तर "तपकीर" असे आहे. 'शिक्षण' याचा समावेश सुद्धा यात करता येईल असे मला वाटते. ते देणारा आपला गुरू त्याच्याकडले ज्ञानभांडार आपल्या समोर उघडे करू शकतो, पण त्यातले कण कण आपणच चिमटीने वेचून घ्यायचे असतात.

Thursday, November 20, 2008

सांत्वन

आम्ही दोघे एकाच उत्तुंग इमारतीमध्ये दहा बारा वर्षे तरी रहात होतो. पण पहिल्या मजल्यावर राहणारा लिफ्टसाठी थांबत नाही आणि एकोणीसाव्या मजल्यापर्यंत जिन्याने चढउतार करणे कठीण असते. यामुळे आमची गांठ कांही फारशी पडत नसे. महानगरीत राहणा-या लोकांत अशा परिस्थितीत जितकी ओळख होते तेवढा आमचा परिचय झाला होता. आमच्या गृहिणींना मात्र ओळखी पाळखी करून घेण्याची हौसही होती आणि एकमेकींच्या घरी जाऊन बसायला बोलायला पुरेसा मोकळा वेळही होता। त्यातून दोघींना संगीताची आवड असल्याने त्यांना एकत्र बांधणारा एक चांगला धागा मिळाला. त्यांची बरीच गट्टी जमली होती.

सेवानिवृत्तीनंतर आम्ही दोघेही नव्या मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात स्थाईक झालो. कधी तरी कुठेतरी योगायोगाने गांठभेट व्हायची आणि पुन्हा मुद्दाम ठरवून भेटायचे असे ठरवायचे. त्याप्रमाणे एकदा ते जोडपे आमच्याकडे येऊनसुद्धा गेले। मी त्या काळात आजारी होतो. त्यांचा पत्ता आणि तिकडे जाण्याच्या खाणाखुणा वगैरे पत्याच्या वहीत लिहून घेतल्या आणि बरे वाटल्यावर नक्की त्यांचे घर पहायला येण्याचे आश्वासन दिले. पुढे कांही ना कारणाने ते राहूनच गेले.

दरम्यान त्या गृहस्थांना श्वसनसंस्थेचा कर्करोग जडल्याची बातमी एके दिवशी कांनावर आली. आता त्यांना जाऊन भेटणे आवश्यक तर होते, पण तेंव्हा काय बोलायचे हा प्रश्न होता. हा रोग जडलेला माणूस बरा होण्याची शक्यताच नसल्याने त्यांना पैलतीर नजरेच्या टप्यात दिसू लागला असणार। अशा वेळी उगाच लवकरच बरे होण्याची खोटी आशा त्यांना दाखवायची की परलोक किंवा स्वर्गलोक चांगला मिळण्यासाठी कांही धर्मकार्यावर बोलायचे? तेही मलाच माहीत नसलेल्या विषयावर! मला कांहीच सुचत नव्हते. टाळाटाळ करायला कांही ना कांही कारणे येतच राहतात.

आणि एक दिवस त्यांच्या परलोकगमनाची दुःखद वार्ता घेऊन आला. आता शक्य तितक्या लवकर भेटायला जाणे जरूरीचे होते. पण ज्या गृहस्थाशी माझी जुजबी तरी ओळख होती तो आता राहिला नव्हताच। त्याच्या अनोळखी पत्नीशी मी काय बोलणार? माझ्या पत्नीच्या दोन तीन मैत्रिणी सांत्वन करायला जाणार होत्या त्यांच्याबरोबर तिला पाठवून दिले.

त्यांना या वेळी एक वेगळाच अनुभव आला. त्या गृहस्थाची पत्नी घरात असूनही त्यांच्याशी बोलण्यासाठी आधी ती बाहेर आलीच नाही. परगांवाहून आलेल्या कोणा नातेवाईकानेच "कसे झाले, काय झाले" वगैरेवर या मंडळींबरोबर थोडी चर्चा केली. त्यानंतर त्या गृहस्थाची पत्नी बाहेर आली. "मी आता मुंबई सोडून आपल्या गांवाकडे परत जायचे ठरवले आहे आणि त्यासाठी बांधाबांध करण्यात बिझी आहे. तुम्ही आजच आलात ते बरे झाले." एवढे सांगून परत आंतमध्ये चालली गेली. भेटायला गेलेली मंडळी हक्केबुक्के होऊन एकमेकींकडे पहात घराकडे परतली.

त्या बाईंच्या दृष्टीकोनातून थोडा विचार केला तर असे दिसेल की गेले कांही महिने तिने बरेच सोसले होते. त्या काळात तिच्या मदतीला कोणी गेले असते तर तिला त्यांचा प्रत्यक्ष कामांत बराच उपयोग झाला असता. त्यांचा भावनिक आधारही मिळाला असता. तेंव्हा त्यासाठी किती लोक गेले होते कोणास ठाऊक. कर्करोगामुळे पतीची दिवसेदिवस बिघडत गेलेली अवस्था पाहता पाहता तिचे मन येणारा प्रहार सोसण्यासाठी खंबीर झाले असणार. कदाचित तिने त्यानंतर काय करायचे याचा विचारसुद्धा दोघांनी मिळूनच करून ठेवलेला असणार. आता फक्त त्याच्या औषधोपचारासाठी ती इथे राहिली होती. त्याची गरज संपताच तिने शांतपणे पुढील आयुष्याला सामोरे जाण्याची तयारी तिने सुरू केली. सांत्वन करायला गेलेल्या मैत्रिणींचे त्या तिच्या दूरदेशी असलेल्या गांवाकडच्या जगात कांहीच स्थान नव्हते. त्याबद्दल त्यांनी कांही बोलावे असे सुध्दा तिला वाटले नाही. तिने ठरवलेल्या वाटेला आता कोणी फाटे फोडायला नकोत असेही तिला वाटले असेल। इथले सगळे पाश तोडून ती दूर जाणार होती. तेंव्हा "आता या लोकांच्याबरोबर बोलून तरी काय फायदा?" असा विचार तिच्या मनात आला असणार.

"सांत्वन करायला गेलेल्या मंडळींबरोबर ती अपेक्षेपेक्षा वेगळी, अगदी तुटकपणाने वागली. पण तिचे खरेच फार कांही चुकले कां?" यावर मी खूप वेळ विचार करत राहिलो. मला तरी त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.

Wednesday, November 19, 2008

उजवा मेंदू आणि डावा मेंदू


आपल्या मेंदूचा उजवा भाग शरीराच्या डाव्या भागाचे नियंत्रण करतो आणि डावा भाग उजव्या बाजूचे असे शाळेत असतांना शरीरशास्त्राच्या अभ्यासात शिकलो होतो. ज्याच्या मेंदूचा उजवा भाग अधिक सक्षम असेल तो माणूस डावखोरा होतो असे तेंव्हा वाटत असे. डावखोरी माणसे अधिक कलासक्त असतात असे कांहीसे ऐकले होते. या विषयावर अधिकाधिक संशोधन झाल्यावर या दोन्ही भागांमध्ये कामाची वाटणी झाली आहे असे समजले जाते. त्यातून खाली दिलेले निष्कर्ष काढले गेले आहेत.
डावा मेंदू तर्कशुद्ध विचार करतो आणि उजवा भावनांचा.
डावा मेंदू तपशीलात जातो आणि उजवा सम्यक दृष्य पाहतो
डावा मेंदू वस्तुस्थिती पाहतो आणि उजवा कल्पनाविलास
डावा मेंदू शब्द व भाषा जाणतो आणि उजवा खुणा व चित्रे
डावा मेंदू गणित व विज्ञान समजून घेतो आणि उजवा तत्वज्ञान आणि धर्म
डावा मेंदू आकलन करतो आणि उजवा ग्रहण करतो
डावा मेंदू जाणतो आणि उजवा विश्वास ठेवतो
डावा मेंदू पोच देतो आणि उजवा दाद देतो
डाव्या मेंदूला पॅटर्न समजतात तर उजव्याला ठिकाण
डावा मेंदू वस्तूचे नांव जाणतो आणि उजवा तिचे गुणधर्म
डावा मेंदू वस्तुनिष्ठ विचार करतो आणि उजवा कल्पनारम्य
डावा मेंदू धोरण ठरवतो आणि उजवा शक्यता आजमावतो
डावा मेंदू प्रॅक्टिकल असतो उजवा मनस्वी
डावा मेंदू सुरक्षितता पाहतो आणि उजवा धोका पत्करतो.
आपण यातल्या सगळ्याच गोष्टी करतो कारण आपल्याला दोन्ही भाग असतात. त्यातल्या एकाला
ढोबळपणे आपण बुद्धी म्हणतो आणि दुस-याला मन. पण या दोघांमध्ये अनेक वेळा परस्परविरोध होत असतो. कधी मन उधाण वा-यासारखे स्वैरपणे भरकटत जाते तर कधी उभ्या पिकात शिरलेल्या ढोरासारखे वढाय वढाय होते. तेंव्हा बुद्धी त्यावर अंकुश ठेवते. जेंव्हा समजते पण उमगत नाही त्या वेळेस बुद्धीला पटलेल्या गोष्टी मानायला मन तयार होत नाही. कधी कधी तर बुद्धीला अनाकलनीय असलेल्या गूढ गोष्टी मनाला जाणवतात. या प्रकारे मन व बुद्धी कधी एकमेकींना पूरक ठरतात तर कधी त्यांच्यात रस्सीखेच होते. पण अखेरीस ज्या माणसाच्या मेंदूचा जो भाग अधिक बलवान असेल त्याच्या प्रभावाखाली तो वागतो.
मेंदूचा उजवा आणि डावा भाग यात योग्य तेवढे संतुलन आणि सहकार्य नसेल तर त्यातून डिस्लेक्शिया यासारख्या समस्या होतात. याच विषयावर काढलेला तारे जमीनपर हा चित्रपट लवकरच झी चॅनेलवर लाणार असल्याची जाहिरात सध्या येते आहे. याबद्दल थोडी माहिती मी नुकतीच माझ्या एका ब्लॉगवर दिली होती.
हा लेख मला आलेल्या एका ई-मेलवरून घेतला आहे.

सत्य, असत्य आणि अर्धसत्य

अश्विनी भावे यांनी तयार केलेला 'कदाचित' हा एक सुंदर चित्रपट आहे. त्यात हा सत्य, असत्य आणि अर्धसत्य यामुळे निर्माण होणा-या भावनिक गुंतागुंतीचे सुरेख दर्शन घडले. या सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी हा विषय विलक्षण कौशल्याने हाताळला आहे. याच्या गोष्टीमधल्या सत्याचा शोध घेणारे गूढ उकलण्यात प्रेक्षक गुंतत जातो आणि जेवढे सत्य सर्वांना सुखकारक आहे तेच खरे, त्याच्या पलीकडे जाण्यात कांही अर्थ नाही, उलट ते त्रासदायकच ठरण्याची शक्यता आहे असा निष्कर्ष काढून अखेर तो बाहेर पडतो. एक दोन सेकंदात घडून गेलेल्या एका दुर्दैवी घटनेची दोन पात्रांना समजलेली आणि त्यामुळे त्यांनी (प्रामाणिकपणे) सांगितलेली अर्धसत्ये त्यांच्या आयुष्यात प्रचंड वादळे निर्माण करतात. "हे खरे" की "ते खरे" अशा दोलायमान स्थितीत प्रेक्षक असतो आणि त्याचा गुंता सोडवण्यासाठी चित्रपटातल्या प्रमुख पात्राला धडधडीत असत्याची कास धरावी लागेल की काय असे वाटत असतांनाच एक वेगळेच सत्य समोर येते असे या चित्रपटात दाखवले आहे. ज्या वाचकांनी हा सिनेमा पाहिला नसेल त्यांना तो पाहण्याची उत्कंठा रहावी यासाठी त्याची गोष्ट व तिचा शेवट इथे सांगत नाही. ज्यांनी तो पाहिला असेल त्यांच्या लक्षात हा मुद्दा लगेच येईल.

एकदा माझ्या एरा मित्राकडून ईमेलवर एक गोष्ट आली. त्यातले दोन देवदूत वेश पालटून फिरत फिरत एका धनाढ्य माणसाच्या घरी मुक्कामाला आले. त्या माणसाने त्यांना एका दमट आणि कुबट तळघरात झोपायला सांगितले आणि तो स्वतः मात्र आपल्या आलीशान महालात राहिला. त्यातल्या मोठ्या देवदूताला तिथल्या भिंतीमध्ये पडलेले एक छिद्र दिसले.आपल्याकडील जादूच्या कांडीने ते त्याने लगेच बुजवून टाकले. दुसरे दिवशी ते दोघे देवदूत एका गरीबाच्या घरी वस्तीला थांबले. त्या माणसाकडे मनाची श्रीमंती होती. त्याने आपल्या घरातली भाकरी त्यांना प्रेमाने खाऊ घातली आणि त्यांची झोपण्याची शक्य तेवढी चांगली व्यवस्था करून ते कुटुंब स्वतः ओसरीवर झोपले. पण त्या रात्रीच त्यांची दुभती गाय अचानक मरण पावली आणि ते कुटुंब दुःखी झाले. सकाळी उठून दोन्ही देवदूत आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले.

लहान देवदूताला त्या मोठ्या देवदूताच्या वागणुकीचे आश्चर्य वाटले. त्याने विचारले, "त्या माजोरी श्रीमंताच्या तळघराच्या भिंतीला पडलेले भोक बुजवण्याइतका तुला त्याचा पुळका आला आणि त्या बिचा-या चांगल्या वृत्तीच्या गरीबाची तुला मुळीसुध्दा दया आली नाही. तू त्यांना कांहीच मदत कां केली नाहीस ?"

मोठा देवदूत शांतपणे उत्तरला, "तू फक्त अर्धेच सत्य पाहिले आहेस. अरे, त्या तळघराच्या भिंतीला पडलेल्या छिद्रातून मला भिंतीच्या आत दडवून ठेवलेल्या सोन्याच्या लगडी दिसल्या. आज ना उद्या त्या श्रीमंतालाही त्या दिसल्या असत्या आणि त्या काढून घेऊन तो अधिकच धनवान आणि मग्रूर झाला असता. म्हणून मी ते भोकच बुजवून टाकले आणि त्या लगडी दिसेनाशा केल्या. दुसरी गोष्ट म्हणजे त्या गरीबाच्या पत्नीचे प्राण हरण करण्यासाठी यमदूत काल रात्री इथे आले होते. मीच त्यांची मनधरणी करून त्यांना गोठ्यात पाठवून दिले आणि गायीच्या प्राणाच्या बदल्यात त्या बाईंचे प्राण वाचवले."

Tuesday, November 18, 2008

अखेर इंजिनियर

इंजिनियर होण्याची अंतःप्रेरणा मात्र लहानपणी माझ्या मनात कधीच उठली नाही, कारण मी इंजिनियर हा प्राणीच पाहिला नव्हता आणि त्या शब्दाचा अर्थसुद्धा मला कळला नव्हता. आमच्या गांवातली एकूण एक जुनी घरे दगडमातीच्या भिंती उभारून बांधलेली होती. मी शाळेत जायला लागल्यानंतर सिमेंटचे पहिले पोते आमच्या गांवात आले असावे. पिढीजात बांधकाम करत आलेले गांवातले निष्णात गवंडी लोक येऊन बांधकाम करीत आणि सुतार येऊन दारे खिडक्या बसवण्याचे काम करीत असत. घराचे मालक स्वतःच कुठे काय बांधायचे ते त्यांना सांगायचे. गांवातले अनुभवी लोक त्यांना मार्गदर्शन करायचे. त्यात सुद्धा शनी, यम, अग्नी, वायू, ऊन, पाऊस वगैरेंच्या दिशा अशा गोष्टींना प्राधान्य असे. घर बांधण्यापूर्वी त्याचा नकाशा काढणे व सरकारकडून त्याची मंजूरी मिळवणे असल्या भानगडी कोणी ऐकल्यासुद्धा नसतील. पिठाची चक्की आणि छापखाना या गांवातल्या दोन प्रकारच्या 'कारखान्यां'त थोडी यंत्रसामुग्री होती. तिथे काम करणारे मजूर त्याची देखभाल करत. मोटारगाड्यांना तेल पाणी पुरवायचे काम 'किन्नर' (क्लीनरचा अपभ्रंश) करायचे. बेभरंवशाची वीजपुरवठा करणारी एक यंत्रणा होती. ती वायरमन (इलेक्ट्रिशियन) चालवत असे. यामुळे सिव्हिल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल यातल्या कोठल्याच शाखेच्या इंजिनियरची गांवाला गरज नव्हती. त्यांच्या सहाय्याशिवाय गांवाचा गाडा सुरळीत चालत होता. तोंपर्यंत आमच्या नात्यागोत्यातसुद्धा कोणी इंजिनियर झालेला नव्हता. आताच्या पुढच्या पिढीतली ऐंशी नव्वद टक्के मुले मात्र कसल्या ना कसल्या प्रकारचे तांत्रिक कामच पाहतात.

खूप पूर्वी एकदा दूर कुठे तरी एकादा पूल कोसळला किंवा कारखान्यात मोठा अपघात झाला होता. त्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली तेंव्हा घरातली मोठी माणसे त्या विषयी जी चर्चा करू लागली त्यात 'इंजिनियर' हा शब्द पहिल्यांदा कानावर पडला. अर्थातच त्या दुर्घटनेचा सगळा दोष त्याला दिला गेला. त्यातले जेवढे कळले त्याप्रमाणे हा प्राणी बंगल्यात राहतो, जीपगाडीत बसून हिंडत असतो (जीपा उडवतो!) आणि पैसे खातो अशी चमत्कारिक वाटणारी माहिती मिळाली. त्या काळी आमच्या गांवात वाडे होते, घरे होती, झोपड्या होत्या आणि गांवापासून दूर एक राजवाडासुद्धा होता, पण 'बंगला' म्हणता येईल अशा प्रकारची वास्तू नव्हती. 'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी
माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल? ?
जीपगाडीची ओळख देखील अशाच प्रकारची होती. शहरातला कोणी पोलिस इन्स्पेक्टर किंवा तत्सम बडा अधिकारी कधी तरी आमच्या गांवातून जाणा-या रस्त्यावरून इकडून तिकडे गेला तर त्याच्या जीपगाडीचे आम्हाला दर्शन व्हायचे. तिचा भयानक आवाज दुरूनच ऐकू आला की आम्ही मुले घाबरून मिळेल त्या आडोशाला जाऊन उभे रहात असू आणि प्रचंड खडखडाट करीत व धुळीचे लोट उडवीत जाणा-या त्या वाहनाकडे दुरूनच चोरून पहात असू. सगळ्या बाजूने उघडी असलेली ती गाडी कांही मनात घर करीत नसे. असल्या गाडीतून हा इंजिनियर कशाला प्रवास करत असेल? अखेर तो अगदी जंगलात रहात असला आणि तिथे खायला प्यायला कांही मिळत नसले तरी पैसे ही काय खाण्याची गोष्ट आहे? एकदा चुकून मी एक ढब्बू पैशाचे नाणे दातात धरून चावले होते तेंव्हा माझे दोन दांत पडले होते. शिवाय आईने पाठीत धपाटा घातला होता तो वेगळाच. "नरड्यात पैसा अडकला तर जीव जाईल" असे ती म्हणाली होती.
आणि हा इंजिनियर म्हणे सरळ पैसे चावून गिळतो! त्याचे सगळेच काम और दिसत होते.

अशा प्रकारची चित्रे मनात बाळगून कोण इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहील? वाढत्या वयाबरोबर हळू हळू त्यातल्या एक एक गोष्टीचा खुलासा होत गेला. बंगला हे एक प्रकारचे छानसे स्वतंत्र आणि प्रशस्त असे घरच असते, रानावनात आणि खेड्यापाड्यातल्या कच्च्या रस्त्यावरून जाण्यासाठी मजबूत बांधणीची जीप उपयोगाला येते हे समजले. पैसे खाणे काय असते ते कळले. फक्त इंजिनियरच पैसे खातात किंवा सगळेच इंजिनियर पैसे खातात अशातला भाग नाही, हा संपूर्ण समाजात पसरलेला रोग आहे हे देखील समजले. जेंव्हा दुर्घटना घडते त्या वेळी संबंधित लोकांबद्दल अशी शंका घेतली जाते त्यामुळे त्याचा संबंध इंजिनियरशी जोडला गेला हे लक्षात आले. अशा प्रकारे इंजिनियरांच्या पेशाबद्दल मनातला आकस दूर झाला. पण तरीही तो नेमके काय काम करतो हे मात्र समजत नव्हते.

पंडितजींच्या नेतृत्वाखाली पंचवार्षिक योजना सुरू झाल्या आणि देशात जागोजागी मोठमोठी धरणे व कारखाने उभे करण्याचे प्रकल्प सुरू झाले. त्यानंतर इंजिनियरांचे महात्म्य दिवसेदिवस वाढत गेले. "मुलगा इंजिनियरिंगची परीक्षा पास झाला रे झाला की त्याला बंगला, गाडी यासकट नोकरीची ऑर्डर मिळते." अशा प्रकारच्या वदंता उठल्या आणि आमच्या गांवापर्यंत येऊन पोचल्या. मोठमोठ्या नद्यांचे पाणी धरण बांधून अडवण्याचे काम करणारा भगीरथाचा अवतार असणार आणि रेल्वेगाड्या किंवा जहाजांसारख्या अगडबंब धुडांची निर्मिती करणारा विश्वकर्म्याचा अंश असणार! "असले आव्हानात्मक काम करायला मिळाले तर?" हा विचार मनाला मोहून टाकणारा होता. त्यामुळे शालेय जीवनाच्या अखेरीस मलाही इंजिनियरिंगचे आकर्षण वाटू लागले. शिवाय त्या काळात घरातली नाजुक आर्थिक परिस्थिती पाहता ती सुधारण्यासाठी चांगल्या नोकरीची मला गरज होती. मला बंगला गाडीचे एवढे आकर्षण नव्हतेच आणि प्रत्यक्षात ती मिळाली नाही याचे वैषम्यही वाटले नाही.

कुणाचे भले होत असले तर त्यात खोडा घालणारे लोक भेटतातच. "इंजिनियरच्या कामात जिवाला धोका असतो म्हणे." किंवा "त्या कोर्सचा अभ्यास फारच कठीण असतो, त्यात भयानक शारीरिक कष्ट असतात, ते याला झेपतील काय?" अशा प्रकारच्या माहितीने माझ्या मातापित्यांचे कान भरून झाले. आमच्या लहान गांवात बरोबर व पूर्ण माहिती देणारा कोणीच नव्हता. सगळेच ऐकीव गोष्टी सांगणारे होते. पण होणारा विरोध पाहून माझ्या मनातल्या सुप्त इच्छेचे रूपांतर निर्धारात झाले. प्रवेशासाठी पाहिजे होते तेवढे गुण मिळवण्यात मला कांहीच अडचण नव्हती. ते मिळवून इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश तर मिळवलाच, शिवाय नॅशनल स्कॉलरशिप मिळाल्याने खर्चाचा प्रश्नही आपण होऊन सुटला. तरीही कॉलेजात प्रवेश करेपर्यंत मला एकही इंजिनियर प्रत्यक्षात भेटला नव्हता की त्या कोर्सचे एकही पुस्तक दृष्टीला पडले नव्हते. इंजिनियरिंग म्हणजे काय हा प्रश्न अजून अनुत्तरितच होता.

Monday, November 17, 2008

डॉक्टर की कलेक्टर?

शाळेत शिकत असतांना थोरामोठ्या लोकांची चरित्रे वाचायला मिळाली. त्यांच्याबद्दलची माहिती कळली आणि समजही वाढली. मोठी माणसे कांही ठरवून मोठी होत नाहीत. अनेक खडतर दिव्यातून पार पडल्यानंतर त्यांना मोठेपण प्राप्त होते. तसेच मोठे झाल्यानंतरसुद्धा त्यांना नेहमीच कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" असे म्हंटले आहे. हे समजल्यानंतर "आपल्याला ते मोठेपण कशाला पाहिजे?" असे वाटायला लागले. "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचारवा" हे तुकोबांचे वचन ऐकल्यावर मोठेपणाचे आकर्षण आणखीनच कमी झाले. सगळे मोठे लोक चांगले वयस्क दिसायचे. म्हणजे असेच आपल्यालाही आयुष्यात कधी काळी मोठेपण मिळाले तरी तोंपर्यंत तग धरण्यासाठी आधी पोटापाण्याचा प्रश्न सोडवणे भाग होते. आमच्या पूर्वजांनी पुढील पिढ्यांना बसून खाण्यासाठी गडगंज संपत्ती जमवून मागे ठेवलेली नव्हती. घरातला असा कोणता उद्योगधंदा नव्हता. त्यामुळे माझे मोठे भाऊ शिक्षण घेऊन नोकरी करू लागले होते किंवा अजून शिक्षण घेत होते. मलाही त्याच मार्गाने जायचे होते यात शंका नव्हती. फक्त शाळा सोडल्यानंतर कोणत्या कॉलेजचा रस्ता धरायचा याबद्दल तेवढी अनिश्चितता होती.
माझ्या लहानपणाच्या काळात शिक्षणाचा प्रसार फारसा झाला नव्हता आणि आजच्या एवढी स्पर्धा त्यात आलेली नव्हती. ब-यापैकी हुषार मुलाला कोणत्याही कॉलेजात त्याला हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत असे. पुढे तो अभ्यासक्रम न झेपल्यामुळे किंवा शिक्षणासाठी शहरात राहण्याचा खर्च परवडत नसल्यामुळे अर्ध्याहून अधिक विद्यार्थी ते अर्धवट सोडून नोकरीला लागत असत. त्या काळात अशा नोक-या मिळतही असत. त्यामुळे कशाचेच टेन्शन नव्हते. शाळा संपल्यानंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा याची निवड आपणच करायची होती.
मला स्वतःला वाचनाची भयंकर आवड असल्यामुळे फडके, खांडेकर, अत्रे, पु.ल.देशपांडे वगैरे माझी दैवते होती. पण "प्रतिभा शिकून मिळत नाही, नक्कल करून तर नाहीच नाही, तिचे वरदान जन्मतःच घेऊन यावे लागते." वगैरे बरेच कांही वाचनात आले असल्यामुळे आपण प्रसिद्धच काय पण नुसता लेखक बनू आणि आपण लिहिलेल्या चार ओळी दहा लोक वाचतील या भ्रमात मी कधी राहिलो नाही. प्रतिभावंत साहित्यिकांनी लिहावे आणि आपण ते वाचावे एवढीच माझी भूमिका होती. मला नोकरीची गरज नसती तर मी नक्कीच आर्टसला प्रवेश घेऊन मिळेल तितके मराठी, इंग्रजी व संस्कृत वाङ्मय वाचून काढले असते. पण "हल्ली नुसत्या बी.ए.ला नोक-यांच्या बाजारात फारसा भाव नाही. त्यानंतर बी.टी. करून मास्तर व्हायला हवे नाही तर एल.एल.बी करून वकील तरी!" असे ऐकण्यात आले. त्यातून त्या काळात बी.ए. झालेल्या मुलींचा लग्नाच्या बाजारातला भाव वाढत असल्यामुळे कलाशाखेच्या वर्गात नव्वद टक्के तरी मुलीच असायच्या. लहान गांवातल्या समाजात शिक्षक आणि वकीलांना भरपूर मान असायचा आणि बाहेरचे जग मी कधी पाहिलेच नव्हते. त्यामुळे शाळामास्तर किंवा वकील व्हायला माझी कांही हरकत नव्हती किंवा निदान पन्नास टक्के तीच शक्यता मला दिसत होती, पण त्याहून चांगले कांही मिळवता आले तर ते पाहिजे होते.
माझे शाळेतले यश पाहून मला मेडिकलला सहज प्रवेश मिळेल आणि तो घेऊन मी डॉक्टर व्हावे असे घरातल्या कांही लोकांना वाटायचे. पण डॉक्टरी जीवनाकडे मी वेगळ्या दृष्टीकोनातून पहात होतो. त्या काळात साध्या ताप व खोकल्याच्या इलाजासाठी लोक डॉक्टरकडे जात नसत. अंगणातल्या तुळशीची व गवती चहाची पाने आणि स्वयंपाकघरातले आले, लवंग, मिरे अशा पदार्थांचा काढा पिऊनच ते बरे होत असत. आजार फारच चिघळला आणि त्याचा त्रास असह्य झाला तर डॉक्टरांना बोलावीत. आजारी माणसाला तपासण्यासाठी आमचे फॅमिली डॉक्टर घरीच येत असत, पण त्यांच्या कंपौंडरकडून औषध नेण्यासाठी मला दवाखान्यात जावे लागायचे. जेंव्हा जेंव्हा मी तिथे गेलो तेंव्हा असह्य वेदनांमुळे विव्हळणारे रुग्ण, गंभीर चेहेरा करून बसलेले त्यांचे चिंताक्रांत आप्त, अपघातात घायाळ झालेले लोक अशीच मंडळी त्या जागी बसलेली दिसत असे. त्यात कोणाचे तोंड सुजले आहे, कोणाच्या जखमेतून भळाभळा रक्त वाहते आहे, कोणाला भयानक धांप लागली आहे तर कोणाची ढास थांबत नाही अशी सगळी दृष्ये पाहिल्यानंतर त्या दुःखी कष्टी लोकांची सेवा करून पुण्य मिळवण्याचा उदात्त विचार कांही माझ्या मनात येत नव्हता. उलट या असल्या निराशाजनक वातावरणात सगळे आयुष्य घालवायची कल्पना माझ्याने करवली जात नव्हती. त्यात मेडिकलला जाण्यापूर्वी सायन्स कॉलेजमध्येच गांडूळाला चिमटीत पकडून उभे चिरावे लागते आणि जीवंत बेडकाचे चारी पाय पिनने टेबलाला टोचून ठेऊन त्याचा कोथळा सुरीने बाहेर काढतात वगैरे क्रूरपणाची वर्णने ऐकल्यावर तर त्या प्रकारांची शिसारीच आली. यामुळे कांही झाले तरी डॉक्टर व्हायचे नाही हे मी मनाशी ठरवले.
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आमच्या गांवावर तिथल्या संस्थानिकाचे राज्य होते. संस्थाने संघराज्यात विलीन झाल्यानंतर जिल्ह्याच्या कलेक्टरकडे सारे प्रशासनिक अधिकार आले. त्यामुळे कलेक्टर हा राजासारखा मोठा माणूस मानला जाऊ लागला. मी सुद्धा चांगले शिकून कलेक्टर बनावे अशी माझ्या आईची इच्छा होती. पण त्यासाठी मुंबईला जाऊन कसली तरी अतीशय कठीण परीक्षा द्यायची असते एवढेच तिने कुठे तरी उडत उडत ऐकले होते. माझे वडील सरकारी नोकरीतूनच सेवानिवृत्त झाले असल्यामुळे त्यांना संपूर्ण कल्पना असावी, पण ते या विषयावर कधी मोकळेपणाने बोलायचे नाहीत. त्यांना मिळणा-या तुटपुंज्या पेन्शनमध्ये घरखर्च चालवणेच सोपे नसतांना माझ्या शिक्षणासाठी कुठून पैसे आणायचे याची विवंचना त्यांना वाटत असणार, पण त्यांनी ती कधी व्यक्त केली नाही. "पांडुरंगाच्या मनात असेल तर सगळे नीट होईल." असे आशावादी उद्गारच ते नेहमी काढीत.
शाळेत इंग्रजी शिकतांना 'कलेक्ट' म्हणजे 'गोळा करणे' आणि 'कलेक्टर' म्हणजे 'गोळा करणारा' असे या शब्दांचे अर्थ समजले. सगळ्या लहान मुलांना वस्तू गोळा करण्याचा नाद असतोच. मला तर त्याचे वेड होते. पोस्टाची तिकीटे, नाणी, सह्या वगैरे गोळा करण्याच्या छंदांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्यांशिवाय वेगवेगळ्या रंगाचे आणि आकारांचे खडे, गोट्या, रिकाम्या काडेपेट्या, पक्ष्यांची पिसे, वडापिंपळाची पाने, बाटल्यांची झाकणे, पेस्टच्या ट्यूबची टोपणे अशा नाना प्रकारच्या वस्तू माझ्या संग्रहात असत. पण माझे अशा प्रकारे 'कलेक्टर' होणे आईला मान्य नव्हते. मी बाहेर गेलेलो असतांना ती माझा खण रिकामा करून चालू शकणारी नाणी बाजारात खपवून टाके आणि बाकीची अडगळ फेकून देत असे. संग्रही ठेवण्याच्या वस्तू बदलल्या असल्या तरी माझा हा नाद मात्र अजून सुटला नाही. हजारो निरनिराळी चित्रे, लेख, माहिती वगैरेचा पसारा मांडून पहात बसणे मला मनापासून आवडते.

Sunday, November 16, 2008

ना खेळाडू, ना कलाकार ना दुकानदार

त्या काळात गृहपाठ नांवाचा बोजा फारसा नसायचा. त्यामुळे मुलांना भरपूर रिकामा वेळ
मिळायचा. अर्थातच तो खेळण्यात घालवायचा. पण माझ्या
वर्गात मी वयाने सर्वात लहान होतो आणि अंगकाठी बारीक असल्याने आकाराने सुद्धा. उशीराने शाळेत प्रवेश घेऊन एकेका इयत्तेत दोन दोन वर्षे मुक्काम करत आलेली कांही थोराड मुले तर माझ्या दुप्पट अंगाची होती. अशा आडदांड मुलांवर मैदानी खेळात कुरघोडी करणे मला अशक्य होते. हुतूतूच्या खेळात मी चढाई केल्यावर अशा एकाने नुसती माझी चड्डी चिमटीत धरली तरी मी तिथेच तडफडत असे आणि त्याला मी मिठी मारून पकडले तरी तो मला फरपटत मध्यरेषेपर्यंत सहज नेत असे. शिवाय असे धुळीत लोळून कोपरे आणि गुडघे फोडून घेणारे खेळ खेळायची मला मुळीसुद्धा हौस नव्हती. कुस्तीच्या हौद्यात उतरण्याचे साहस मी कधी केलेच नाही. क्रिकेटच्या जंटलमन्स गेममध्ये सुद्धा मी फलंदाजी करायला गेलो की पहिल्या चेंडूला बाद व्हायचा आणि मला कोणी गोलंदाजी देतच नसे. क्षेत्ररक्षणासाठी स्लिपमध्ये उभे केले तर जवळून सणसणत जाणारा वेगवान चेंडू हातात पकडायचा धीरच मला व्हायचा नाही. सीमेजवळ उभा असतांना नेमका माझ्या दिशेने चेंडू आला तर ठीक होते, पण त्याच्यामागे माझ्या छोट्या पावलांनी पळत जाऊन त्याला पकडण्याआधीच तो सीमापार होऊन जायचा. अखेर मला अंपायर किंवा स्कोअरर करून पाहिले. इथे सुद्धा माझ्या निर्णयावरून वाद झाला आणि मारामारीपर्यंत प्रकरण गेले तर मार खावा लागू नये असा विचार मनात येत असल्यामुळे कदाचित माझ्याकडून पक्षपात घडत असावा, किंवा तसे घडण्याची शक्यता असल्यामुळे मला बहुतेक वेळा प्रेक्षकाची भूमिकाच करावी लागत असे. एकंदरीत सांगायचे झाले तर हिंदकेसरीचा खिताब जिंकून खांद्यावर गदा घेऊन उभा असलेल्या किंवा विजयी षट्कार मारलेल्या फलंदाजाच्या पवित्र्यात माझा फोटो वृत्तपत्रात छापून येण्याची सुतराम शक्यता मला कधीही दिसली नाही.

चित्रे काढण्याची मला लहानपणी खूप हौस होती आणि अजूनही आहे. फक्त मी घोड्याचे चित्र काढले तर तो उंदीर आणि बेडूक यांच्या संकरातून निर्माण झालेला नवा प्राणी असावा असे वाटत असे. आमच्या गांवातल्या लोकांनी पिकासोची चित्रे कधी पाहिलीच नव्हती. त्यामुळे त्यांना या कलाकृतींचे कौतुक वाटले नाही. पिकासो अशी वेडीवाकडी चित्रे मुद्दाम काढत होता आणि माझ्या हांतून ती आपोआप निघत होती असे असले तरी पाहणा-यांनी त्याचा अर्थ लावायला नको कां? "उगाच कागदाची नासाडी करू नकोस" असा दम मला भरला जात असल्यामुळे त्या कलेचे चीज झाले नाही आणि मोठ्ठा चित्रकार बनण्याचे स्वप्नही मी पाहू शकलो नाही.

दर गुरुवारी भरणा-या आठवड्याच्या बाजारात सुईदो-यापासून भाजीपाल्यापर्यंत सगळ्या जीवनावश्यक वस्तू मिळायच्या. पट्टणशेट्टी किंवा लाहोटी अशासारख्या आडनांवाच्या व्यापा-यांची दुकाने बाजारात होती. त्यांना कांचेची तावदाने, रोलिंग शटर्स, शो विंडो असले कांही नव्हते. साधे कौंटरदेखील नसायचे. किराणा दुकान असेल तर पोती, पत्र्याचे डबे आणि बरण्या यात भरलेला माल पसरून त्यातच तो दुकानदार बसायचा. कापडाच्या दुकानात कापडे, धोतरे आणि लुगड्यांचे गठ्ठे बांधून भिंतीशी लावून ठेवले असायचे आणि एक जाजम अंथरून त्यावर लोडाला टेकून शेठजी बसायचा. तसले दुकान आपण चालवावे असे वाटण्यासारखे कांहीसुद्धा त्यात नव्हते. सराफीचा आणि सावकारीचा धंदा करणारे खूप श्रीमंत असतात असे ऐकले होते, पण त्यांचा लहान मुलांशी कांही संबंध येत नव्हता. हा धंदा करायला आधी मुळात भरपूर माया जवळ असणे आवश्यक होते. ती तर नव्हतीच. म्हणजे मोठे झाल्यावर आपण दुकानदार तर होणार नाही हे सुद्धा निश्चित होते.

त्या काळात सुतार, लोहार, सोनार, कोष्टी आदि उत्पादक काम करणारे लोक वंशपरंपरा ते काम करत असत। बाहेरच्या लोकांना त्यात शिरकाव करायला वाव नव्हता. या कष्टक-यांचा समावेश मोठ्ठ्या लोकात होतही नव्हता. त्या मार्गाकडे वळण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मात्र शाळेच्या अभ्यासक्रमातल्या सगळ्याच विषयांत मला पहिल्यापासून चांगली गती होती आणि वाचनाची आवड असल्यामुळे नवी पुस्तके आणल्यावर लगेचच त्यावर वर्तमानपत्राची कव्हरे घालून त्या कव्हरांवरील बातम्यासकट आंतल्या पुस्तकांची अथपासून इतीपर्यंत सारी पाने मी आपणहून वाचून काढीत असे. अखेर मिळेल तेवढे शिक्षण घेऊन त्याच्या आधारावर आपले जीवन ठरले जाणार आहे हे सत्य शाळेच्या शेवटच्या वर्गात येईपर्यंत स्पष्ट झाले होते.

Saturday, November 15, 2008

मी मोठ्ठा होणार!


कांही लोक मोठे झाल्यावर कोण होणार हे लहानपणापासूनच ठरवतात म्हणे। ते ध्येय गांठण्याचा रस्ता त्यांच्या नाकासमोर असतो आणि ते हलतडुलत आरामात तिथपर्यंत जाऊन पोचतात. धन्य आहे त्या लोकांची! हल्ली तर आज जन्माला आलेले पोर मोठेपणी सॉफ्टवेअर इंजिनियर नाही तर टीव्ही प्रोग्रॅमचा अँकर होणार अशी भविष्ये वर्तवणारे ज्योतिषी निघाले आहेत. कांही आईवडील आपल्या मुलामुलींची करीयर्स त्यांच्या जन्माआधीपासून ठरवून ठेवतात आणि त्यासाठी सारे नियोजन करतात.

माझ्या लहानपणी असले कांही नव्हते। "ज्याने चोच दिली आहे तो चारासुद्धा देईल" अशा विचाराने सगळा भार देवावर टाकून पालकवर्ग आपल्या मुलावर कसे चांगले संस्कार करता येतील इकडे लक्ष पुरवायचा. सर्व वडील मंडळींच्या पाया पडायचा रिवाज होता. तेंव्हा ते "मोठा हो, शहाणा हो." असे आशीर्वाद देत असत. कधी कधी "तू मोठा झाल्यावर कोण होणार आहेस?" असे कोणी विचारले तर "मी मोठ्ठा होणार" असे उत्तर देऊन मी मोकळा होत असे. सगळे जण जर मला मोठा होण्याचा आशीर्वाद देत होते तर मी मोठाच होणार असा माझा साधा तर्क होता. "किती मोठा होणार?" या प्रश्नावर "आभाळाएवढा!" यापेक्षा चांगले दुसरे उत्तर काय देणार?

खरोखरच आपल्याला पाहिजे तेंव्हा मारुतीरायासारखे अगडबंब होता आले असते आणि आमच्या गांवातला मेरुगिरीलिंगप्पाचा डोंगर तळहातावर ठेऊन आकाशात उडता आले असते तर किती मज्जा आली असती असे वाटायचे. पण असले चमत्कार देवबाप्पाच करू शकतो हे कधीतरी समजले आणि त्या स्वप्नाचा नाद सोडावा लागला. अखेर कुठल्या तरी मोठ्या माणसासारखे आपणही मोठे व्हावे असी माफक इच्छा मनात डोकावू लागली.

या मोठ्या माणसांची यादी मात्र रोजच्या रोज बदलत जायची. कधी महात्मा गांधी सर्वात मोठे वाटायचे तर कधी पंडित नेहरू, कधी नेताजी सुभाषचंद्र बोस तर कधी वीर सावरकर यांचे आकर्षण वाटायचे. हे राष्ट्रीय नेते झाले. सर आयझॅक न्यूटन आणि लुई पाश्चर यांसारखे महान शास्त्रज्ञ, मुकेश आणि रफीसारखे लोकप्रिय गायक, विजय हजारे व लाला अमरनाथ यांसारखे खेळाडू अशी नाना क्षेत्रातली मोठी माणसे डोळ्यासमोर येत जात असत. जसजशी ज्ञानात भर पडत गेली तसतशी ही यादी लांबत गेली. पण या सगळ्या मोठ्या लोकांच्या गर्दीत एक ओळखीचा चेहेरा ठळकपणे दिसायचा तो माझ्या वडिलांचा!
हे सगळे मोठे लोक नेमके काय काम करतात याची जशी मला माहिती नव्हती तसेच माझे वडील घरातून बाहेर गेल्यानंतर काय करतात याची देखील सुतराम कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांच्या कार्याची तुलना करता येणे माझ्या बालबुद्धीला अशक्यप्राय होते. त्यातून लोकमान्य टिळक किंवा विनू मांकड यांची मला भीती वाटण्याचे कारण नव्हते, पण वडिलांचा धांक होता. त्यामुळे ते जास्तच मोठे वाटत असण्याची शक्यता आहे.
एकदा मी एका तीन चार वर्षांच्या बडबड्या चिमुरडीला विचारले, "तुझे बाबा काय काम करतात?"
"आंघोळ करतात, जेवण करतात, झालंच तर माझ्याशी खेळतात." तिने उत्तर दिले.
"म्हणजे ते दिवसभर घरीच असतात कां?" मी खोदून विचारले.
"नाही. दिवसभर ते ऑफीसात जातात." तिने सांगितले.
"ऑफीसमध्ये ते कसले काम करतात?" तिच्या सामान्यज्ञानाची परीक्षा घेत मी विचारले.
"तिथं ना, ते सगळी कामे करतात. झाडू लावतात, भांडी घासतात, कपडे धुतात, वाळत घालतात, स्वैपाक करतात वगैरे वगैरे." तिने निरागसपणे बाबांच्या अब्रूचे धिंडवडे उडवले.
तिच्या इवल्याशा शब्दकोषात 'काम' या शब्दाच्या अर्थाची एवढीच व्याप्ती तोपर्यंत जमा झालेली होती. ही व्याप्ती जन्मभर वाढतच असते. "मी इथे किती काम करतो ते माझ्या बॉसला समजतच नाही." असे गा-हाणे नव्याण्णऊ टक्के चाकरमाने करतात तर "मी घरी किती काम करते ते माझ्या नव-याला कळत नाही." असे शंभर टक्के महिलांना वाटत असते.
असे असतांना मोठ्ठी माणसे काय काम करतात हे मला बालवयात कसे समजणार? "मोठा झाल्यावर तू काय करणार?" असे कोणी विचारलेच तर "ज्या गोष्टी मोठ्ठी माणसे करतात त्या मी पण करणार." असा माझा हजरजबाब तयार असे. ही पुस्तकांतली मोठी माणसे काही प्रत्यक्षात आपल्याला कधी भेटत नाहीत आणि आपल्या वास्तव जगात मात्र जे लोक स्वतः कांहीच न करता दुस-या लोकांनी केलेल्या कामाचे श्रेय उपटतात त्यांना बाकीचे लोक मोठे म्हणतात हे सत्य समजायला उभे आयुष्य घालवावे लागते.

Friday, November 14, 2008

राजकुमार साठ वर्षांचा झाला


"परीकथेतिल राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल कां ? भाव दाटले मनी अनामिक साद तयांना देशिल कां ?" अशी अस्फुट लकेर नवयौवनांत प्रवेश केलेल्या मुलींच्या मनात उठत असते. बालपणी वाचलेल्या परीकथांमधले राजकुमार झगमगते चिलखत अंगावर चढवून, रत्नजडित मुकुट डोक्यावर धारण करून, अबलख घोड्यांवर स्वार होऊन दौडत येतात, हातातल्या समशेरीने दुष्ट चेटकिणीला मारून तिच्या तावडीत सापडलेल्या राजकुमारीची मुक्तता करतात आणि तिला आपल्यासोबत घेऊन जातात. हे झाले परीकथेतले राजकुमार.
आजच्या जगातला एक प्रत्यक्षातला राजकुमार जन्माला आला तेंव्हा त्याचे आजोबा जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्याचे सम्राट होते. चार वर्षांनंतर त्याची आई महाराणी बनली आणि तो मुलगा त्या साम्राज्याचा राजकुमार . वेगवेगळे राजवाडे, किल्ले आणि महाल यांत खेळत बागडत तो मोठा झाला. आजच्या जगात एवढ्या तोलामोलाच्या राजकन्या राहिलेल्या नाहीत. पण इतर कुमारींचा गराडा त्याच्या सभोवती पडलेला असे. कधी कोणाचे कधी कुणाचे नांव त्याला जोडले जाई तसेच थोड्या दिवसांनी ते खोडले जाई.
स्वर्गातल्या अप्सरेसारखी एक सुंदर त्याला परी भेटली. त्या दोघांच्या प्रेमाला भरते आले. त्याने रीतसर तिच्या वडिलांकडे तिचा हात मागितला. परीकथेत शोभून दिसावा इतक्या थाटामाटात त्यांचा विवाह झाला. आजवर दुस-या कोणत्याही लग्नसमारंभाला मिळालेली नाही एवढी प्रसिध्दी त्या विवाहसमारंभाला मिळाली. जगातील कोट्यावधी लोकांनी तो सोहळा टीव्हीवर पाहिला आणि स्वतः कृतकृत्य झाल्यासारखे त्यांना वाटले. परी आणि राजकुमार या दांपत्याला दोन गोंडस पुत्ररत्ने प्राप्त झाली. साम्राज्याला वारसांची पुढची पिढी मिळाली. त्या बालकांचेही अमाप कौतुक झाले.
त्यानंतर कांही तरी बिनसले. दोघात अबोला झाला, एकमेकांपासून दूर जात जात अखेर ते वेगळे झाले. पंख तुटलेल्या परीचे पाय जमीनीवर उतरताच मळले. तिने एका गडगंज दुकानदाराच्या मुलाला जवळ केले. त्याच्याबरोबर असतांना तिच्या गाडीचा अपघात होऊन ती स्वर्गवासी झाली. राजकुमाराचे नांव पुन्हा कोणाकोणाबरोबर जोडले जाऊ लागले. त्यातले एक प्रकरण चव्हाट्यावर आले. अखेर पन्नाशीतल्या राजकुमाराने त्या प्रौढेबरोबर पाट लावला.
त्यानंतर त्या राजकुमाराचे नांव फारसे कुठे ऐकू येईनासे झाले. त्याच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली असे आज अचानक बातम्यांमध्ये वाचले. विशीतली दोन मुले असलेल्या त्या राजकुमाराचे नांव आहे प्रिन्स चार्ल्स! हल्ली तो समाजसेवेची बरीच कामे करतो असे म्हणतात. त्यात त्याला उज्ज्वल यश मिळो आणि भविष्यकाळात त्याचे नांव सन्मानपूर्वक घेतले जावो अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Wednesday, November 12, 2008

एके दिवशी भाग १-३

ही काव्यकथा थोडी लांबत गेल्यामुळे  २००८ साली ३ भागात ब्लॉगवर चढवली होती. ब्लॉग्जची संख्या १००० वरच मर्यादित ठेवण्याचे ठरवल्यमुळे ती आता एकत्र केली आहे. 
दि.१२-११-२०१६

------------------------------------------------------

सूर्याचे भ्रमण हस्त नक्षात होत असतांना महाराष्ट्राच्या कांही भागात हादगा खेळण्याची पारंपारिक रीत आहे. कांही ठिकाणी तो भोंडला या नांवाने ओळखला जातो तर कांही जागी त्यातल्या गाण्यांना भुलाबाईची गाणी असे नांवही आहे. मागच्या महिन्यात हादगा होऊन गेला. त्या निमित्याने हादग्याच्या गाण्यांच्या चालीवर ही छोटीशी गोष्ट लिहिली आहे.

एके दिवशी भाग १

एलोमा पैलोमा गणेशदेवा । माझी गोष्ट सांगू दे करीन तुझी सेवा ।।
गोष्ट सांगाया द्यावी देवा । थोडीशी बुध्दी ।।
**** *** (चाल बदल)
एके दिवशी मिस्टर जोशी, निघाले ऑफीसला ।
त्यांच्यासाठी लंचबॉक्स, मिसेसने भरला ।।
भरलेला डबा तिने, बॅगेमध्ये ठेवला ।
बॅगेचा खणसुध्दा, हळूच तपासला ।।
**** ***(चाल बदल)
त्यात होतं एक पाकीट । पाकीटाच्या आंत तिकीट ।
तिकीट होतं सिनेमाच्या, थिएटरचे ।।
तिकीट अलगद काढलं । ब्लाउजमध्ये खोचून दिलं ।
कारण लागली चाहूल, नव-याची ।।
"झालं कां गं इन्स्पेक्शन । बॅग देतेस कां आणून ।
बस जाईल निघून, ऑफीसाची ।। "
नवरा निघाला घाईत । हंसून दाखवला हात ।
फिरताच त्याची पाठ, काढलं तिकीट ।।
तारीख दहा ऑक्टोबर । म्हणजे गेला शनिवार ।
खेळ दुपारचे चार, वाजतांचा ।।
**** ***(चाल बदल)
त्या दिवशी काय काय झालं, तिला सारं आठवलं ।
सकाळीच तिनं होतं, नव-याला विचारलं ।।
"शनिवारची सुटी ना आज, पाऊस आहे ओसरला ।
थोडी मौज मस्ती करू, जायचं कां हो पिक्चरला" ।।
**** ***(चाल बदल)
म्हणाला "ते शक्य नाही गं । कामाचा साठलाहे ढीग ।
क्लीअर करायचाय् बॅकलॉग, ऑफीसवर्कचा" ।।
असं जातांना सांगून गेला । रात्री उशीरा परतला ।
त्याचा अर्थ नीट आला , आता ध्यानात ।।
क्षणात तिनं लावला फोन । खणातच वाजला रिंगटोन ।
घरीच मोबाइल सोडून, गेली की स्वारी ।।
तिनं पुन्हा पाहिलं तिकीट । उलटून पाठपोट ।
सापडलं एक नांव 'जेनेट', अन् फोन नंबर ।।
नव-याच्या मोबाइलवर । तिने शोधले कॉल्ड नंबर ।
जेनेटचा वारंवार, रेकॉर्ड होता ।।

**** ***(चाल बदल)
रागाचा पारा तिच्या अनिवार चढला ।
कसा बसा वेळ तिनं चरफडत काढला ।
ऑफिस सुरू झाल्या झाल्या टेलिफोन लावला ।
नव-याचं एक्स्टेन्शन सांगितलं द्यायाला ।।
**** ***(चाल बदल)
तिथली शिष्ट रिसेप्शनिस्ट । म्हणते काय काम अर्जंट ।
केल्यावर खूपच रिक्वेस्ट, केलं कनेक्ट ।।
"मला आत्ता आहे मीटिंग । माझा साहेब झोटिंग ।
उगारून दोन शिंगं, बघतो आहे ना ।।
माझी मीटिंग संपल्यावर । मीच फोन करीन बरं ।"
एवढं सांगून रिसीव्हर, दिला की ठेऊन ।।
आला प्रचंड वैताग । जिवाची झाली तगमग ।
धुमसतच लागली मग, घरकामाला ।।
दुपारची जेवणं झाली । सासू कलंडून गेली ।
सून करीतच राहिली, विचार मनात ।।
----------------------------------
एके दिवशी भाग २

सासूबाई दाखवतात किती त्या सोज्ज्वळ ।
कुणालाही वाटावे या बाई किती प्रेमळ ।
माझ्या वागण्यातलं त्यांना बोचतं कुसळ ।
नणंदेच्या तो-याचं मात्र चालतं मुसळ ।।
मला कळलं आहे त्यांचं इंगीत सगळं ।
परवाचीच गोष्ट आहे पुरावा सबळ ।।
**** ***(चाल बदल)
नणंदा भावजया दोघी जणी । घरात नव्हतं तिसरं कोणी ।
"फ्रीजमधलं चॉकलेट खाल्लं कोणी" । मलाच विचारलं ।।
गेल्या महिन्यामधली गोष्ट । करते सारं चित्र स्पष्ट ।
मनाला होतात कष्ट । आठवल्यावर ।।
आत्याबाईंचं पत्र आलं । चारूचं लग्न ठरलं ।
सर्वांना होतं बोलावलं । आग्रहानं ।।
**** ***(चाल बदल)
सासरे म्हणाले, "मी तर मामा ।
येईन कामा धामा । माझ्या भाच्याचं लगीन ।।"
व-हाडी कोण कोण जाणार , आमच्या चारूचं लगीन ।।
सासू म्हणाली," जाणारच् मी ।
मी तर सख्खी मामी । माझ्या भाच्याचं लगीन ।।"
व-हाडी कोण कोण जाणार , आमच्या चारूचं लगीन ।।
नणंद म्हणाली, " मी तर करवली ।
माझा करवलीचा मान । नटून थटून छान छान ।
खूप धमाल करीन, माझ्या भावाचं लग्न ।।"
व-हाडी कोण कोण जाणार , आमच्या चारूचं लगीन ।।

**** ***(चाल बदल)
नवरोजीनं मात्र केला पुरता बेरंग ।
सदान् कदा त्याच्या आपल्या ऑफिसच्या मीटिंग ।
त्यात म्हणे आणखी कोणी बडं प्रस्थ येणार ।
कोणालाही आता बॉस सुट्टी नाही देणार ।।
**** *** चाल बदल
मी आपलं म्हंटलं उगीच । "यांना सोडून घरीच ।
कशी येऊ एकटीच, मी हो लग्नाला ।।"
तेवढं सर्वांनी ऐकलं । सीरीयसली की घेतलं ।
गेले ना सोडून एकलं, मला हो घरी ।।
**** *** चाल बदल
आता नव-याचंसुध्दा फुटलं गुपीत ।
माझ्याहून प्रिय त्यांना जेनेटची संगत ।।
मला खोटं सांगून तिला सिनेमाला नेतात ।
मरमर मरून त्यांच्यासाठी काय आपली गत ।।
अस्सं सासर द्वाड बाई कोंडून मारतं ।।
विचार आला मनात हे, कसलं आपलं जिणं ।
सारे अप्पलपोटे इथे, मला विचारतं कोण ।
एका एका प्रसंगाची, होऊन आठवण ।
अश्रूंच्या मोत्यांनी भरले, डोळ्यांचे रांजण ।।
अस्सं सासर द्वाड बाई मारतं कोंडून ।।
आठवले मी माहेरी, किती होते सुखात ।
कशाची ना चिंता होती, ना कशाची ददात ।
कित्ती कोडकौतुक रोज, गोडधोड पानात ।
अस्सं माहेर सुरेख बाई खायाला घालतं ।।
अस्सं सासर द्वाड बाई कोंडून मारतं ।।

**** *** चाल बदल
झाली मनाची तडफड । माहेराची लागली ओढ ।
सासू मात्र होती गाढ, झोपलेली ।।
तिला मुळी कल्पनाच नाही । सुनेचं बिनसलं कांही ।
उठल्यावर गेली तीही, मंडळात ।।
पतीचा ना आला फोन । तगमग होईना सहन ।
चिठ्ठी लिहून ठेऊन, गेली माहेरा ।।
जेंव्हा संध्याकाळ झाली । घरची मंडळी परतली ।
त्यांची दाणादाण उडाली, चिठ्ठी वाचून ।।

--------------------------------------------------
एके दिवशी भाग ३

सासूबाईंनी फोन लावला । "ये गं सूनबाई आपल्या घराला ।
माझा नेकलेस देते तूला ।"
"तुमचा नेकलेस नको मला । कधीच औट ऑफ फॅशन झाला ।
मी नाही यायची तुमच्या घराला ।"
सासुरवाशी, सून रुसून बसली कैसी । मिस्टर जोशी, मिसेस रुसून गेली कैसी ।।
सास-याने एसेमएस केला । "ये गं सूनबाई आपल्या घराला ।
नवीन स्कूटी घेतो तूला ।"
"एसेमएसचा रिप्लाय आला । स्कूटी बिट्टी नको मला ।
मी नाही यायची तुमच्या घराला ।"
सासुरवाशी, सून रुसून बसली कैसी । मिस्टर जोशी, मिसेस रुसून गेली कैसी ।।
नणंद गेली समजावयाला । "चल गं वहिनी आपल्या घराला ।
सेंटची बाटली देते तूला ।"
"मुळीच नको बाटली तुझी । त्याची मला आहे अॅलर्जी ।
यायची इच्छा नाही माझी।"
सासुरवाशी सून रुसून बसली कैसी । मिस्टर जोशी, मिसेस रुसून गेली कैसी ।।
**** *** चाल बदल
सरते शेवटी मिस्टर जोशी, स्वतः गेले बोलवायला ।
समजावण्या की जाब विचाराया, की दम भरायला ।।
"काय प्रकार आहे हा सांग, कशाचा घेतेस सूड ।
सकाळी तर तुझा होता, किती चांगला मूड ।।"

**** *** चाल बदल
पर्समधून काढलं तिकीट । "काय आहे आठवा हे नीट ।
कोण सटवी ही जेनेट , आहे कां उत्तर ।।"
नवरा म्हणाला हांसून । "तूच पहा लावून फोन।
स्वतः घे करून पूर्ण, शहानिशा ।।"

**** *** चाल बदल
टेलीफोनवर तिने, नंबर लावला ।
दुस-या बाजूने एक, पुरुष बोलला ।
"धिस ईज जेनेट ट्रॅव्हल मॅडम, वॉट् कॅन आय् डू फॉर यू ।
वुई हॅव मेनी पॅकेजेस अँड , आय् कॅन मेक वन फॉर यू ।।"

**** *** चाल बदल
मिसेस गेली भांबावून । पतीच्या हातात दिला फोन ।
सांगितले लगेच त्यानं , "जोशी स्पीकिंग ।।
आमचं झालं कां बुकिंग । हॉटेल, ट्रॅव्हल, साईट सीइंग ।
केंव्हा मी येऊ सांग, तिकीट घ्यायला ।।"
पत्नीला मग सांगितलं । "लग्नाला जाणं हुकलं ।
तुझं तोंड हिरमुसलेलं , दिसलं आईला ।।
तिच्या मनाला लागलं । बाबांनी मला सांगितलं ।
मी सुध्दा ठरवलं, कांही मनात ।।
आपली मॅरेज अॅनिव्हर्सरी । जोशात करावी साजरी ।
गोवा पहायची करावी पुरी, तुझी इच्छा ।।
शनिवारी योगायोगानं । येतांना ऑफीसमधून ।
मिस्टर मिसेस महाजन , भेटले वाटेत ।।
गेलेले नुकते गोव्याला । म्हणे छान पॅकेज मिळाला ।
ट्रॅव्हल एजंटचा नंबर दिला , त्यांनी लगेच ।।
जो कागद मिळाला खिशात । ते होते गं हेच तिकीट ।
त्यामागे लिहिला घाईत , फोन नंबर ।।
मोबाईलवर लावून फोन । मी सांगितला माझा प्लॅन ।
म्हणाला दिवसांनी दोन , मिळतील तिकीटे ।।
कांही हातात नव्हतं आलं । म्हणून तुला नाही सांगितलं ।
त्यानं एवढं सगळं झालं, महाभारत ।।"

**** *** चाल बदल
एके दिवशी मिस्टर जोशी आणि मिसेस जोशी ।
समजुतीच्या घोटाळ्याला पडले कसे हो फशी ।
संशयकल्लोळाची एक कहाणी छोटीशी ।
सांगितली तुम्हा आज, सांगा वाटली कशी ।।
एके दिवशी .. . . . . . . ..

. . . . . . . . . . . . . (समाप्त)

Tuesday, November 11, 2008

अमेरिकेची नवी वाट - २


अमेरिकेला गेल्यानंतर तिथला एक मांडीवरला माझ्या तावडीत सापडला तेंव्हा तो कसा चालतो ते पाहण्यासाठी त्याच्याशी चाळा करता करता मिसळपावचे संकेतस्थळ हाती लागले. समर्थांच्या एका सुप्रसिद्ध ओवीच्या पहिल्या दोन चरणांवरून प्रेरणा घेऊन "जे जे आपणांसी कळावे, ते ते इतरांसी सांगून मोकळे व्हावे" असा विचार मनात आला आणि गारठलेली बोटे कीबोर्डावर बडवून घेतली. अशा प्रकारे मुंबईहून न्यूयॉर्कला केलेल्या विमानप्रवासाबद्दल मी चार ओळी लिहिल्या होत्या. या लेखावर बरेच प्रतिसाद आले. ही वाट किमान २०-२५ वर्षे तरी जुनी आहे असे कोणी लिहिले होते. कांही लोकांनी प्रवासाला लागणारे कमीत कमी अंतर आणि त्यामुळे होणारी इंधनाची व वेळेची बचत यासारखे मुद्दे मांडून झाल्यावर त्यावर युक्लीडच्या प्रमेयाच्या आधाराने त्यांचे विश्लेषण करून चर्चेचा स्तर बराच उंचावला होता. त्यातील मुद्द्यांचा विचार करून ही पुरवणी जोडायचे ठरवले.

१९९६ साली मी मुंबईहून टोरोंटोला गेलो होतो तेंव्हा आमच्या सरकारी ऑफिसातल्या फॉरेन ट्रॅव्हल सेलने माझे तिकीट लंडनमार्गे काढले होते आणि बिलातले प्रत्येक अक्षर व आकडा डोळ्यात तेल घालून तपासणा-या आमच्या अकाउंट्स खात्याने माझा ट्रॅव्हल क्लेम बिनबोभाटपणे मंजूर केला होता. माझे सामान्यज्ञान जरी कच्चे असले तरी त्या काळात कॅनडाला जाण्याचा दुसरा जवळचा किंवा स्वस्तातला मार्ग असता तर तो या विशेषज्ञांना नक्की ठाऊक असता अशी माझी खात्री आहे.
" सन २००१ साली डेल्टा, कॉन्टिनेंटल आणि युनायटेड या प्रमुख अमेरिकन कंपन्यांनी उत्तर ध्रुवावरून चीनपर्यंत व्यावसायिक उड्डाणे करण्याची नुकतीच सुरुवात केली होती ( त्यानंतर त्यांनी ती सेवा भारतापर्यंत वाढवली असावी.) आणि एअर इंडियाने तर या मार्गावरून पहिले विमान २००७ साली उडवले." अशी माहिती मला शोधयंत्राद्वारे मिळाली. मी स्वतः नवी वाट शोधून काढल्याचा दावा कधीच केला नव्हता पण ही वाट किती जुनी आहे याची कल्पना प्रवास करतांना मला नव्हती, पण त्याने माझ्या अनुभवात विशेष फरक पडला नसता. त्यामुळे माझ्या लेखाला ' अमेरिकेची नवी वाट' असा सुटसुटीत मथळा देण्याऐवजी 'आधीपासून अस्तित्वात असलेली आणि चांगली रुळलेली पण मी यापूर्वीच्या आयुष्यात कधीही न पाहिलेली अमेरिकेची वाट ' असे लांबलचक नांव दिले असते तरी त्याखालचा मजकूर जवळजवळ तसाच राहिला असता .

'विमानप्रवासाचा इतिहास' या विषयावरील चर्चेचा धागा मी सुरू केला असता तर कोणत्या कंपनीने तयार केलेले आणि कोणत्या कंपनीने उडवलेले विमान पहिल्यांदा भारतातून निघून उत्तर ध्रुवावरून अमेरिकेला गेले याच्या इतिहासाची पाळेमुळे खणून काढली असती. पण माझ्या लेखाचा तो उद्देश नव्हता. आपण एकाद्या नवख्या गांवात जातो तेंव्हा रेल्वे स्टेशनातून बाहेर कसे पडायचे ते सुध्दा आपल्याला ठाऊक नसते. बाहेर पडल्यानंतर रस्त्यावरच्या पाट्या वाचत वाचत आणि चौकशा करत आपण योग्य स्थळी पोचतो. या सगळ्या गोष्टी जुन्याच असल्या तरी आपण प्रथमच पहात असतो. त्यामुळे त्याचे वर्णन रंगवून इतरांना सांगतो. बहुतेक सारी प्रवासवर्णने अशाच प्रकारे लिहिली गेली आहेत. मुंबईच्या विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर न्यूयॉर्कला पोचेतोपर्यंत मी जे पाहिले, अनुभवले ते विस्मरण होण्याच्या आत थोडक्यात लिहून काढले होते.
मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये कमीत कमी अंतर कसे काढायचे या विषयाकडे वळू. या दोन शहरांच्या बिंदूंना जोडणारी सरळ रेषा काढली तर ती पृथ्वीच्या पोटातून जाते. त्यामुळे आकाशमार्गाने त्यांना जोडणा-या सर्व रेषा वक्रच असणार. परवा वॉशिंग्टन डीसी मध्ये फिरतांना एका वस्तुसंग्रहालयाच्या समोर अनेक मोठमोठे ग्लोब मांडून ठेवलेले पाहिले. थोडे लक्ष देऊन निरीक्षण केल्यावर युक्लिडचा नियम लक्षात आला तसेच मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरांमधले कमीत कमी अंतर कुठल्या वक्र रेषेनुसार येते तेही कळले. आपली ठेंगणी ठुसकी आणि ढेरपोटी पृथ्वी उत्तर व दक्षिण ध्रुवांपाशी जराशी चपटी आहे आणि विषुववृत्ताजवळ थोडी फुगीर आहे. विषुववृत्ताचा परीघ उत्तर व दक्षिण ध्रुवांमधून जाणा-या पृथ्वीच्या परीघापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आमच्या विमानाने घेतलेला उत्तर दिशेचा मार्ग अर्थातच जवळचा होता.
त्याशिवाय ध्रुवप्रदेशातले वातावरण स्तब्ध असल्यामुळे हवेचा विरोधसुध्दा थोडा कमी असतो म्हणे.
कोणत्याही वाहनातून जमीनीवरून वाहतूक करण्यासाठी रस्ते किंवा रेल्वेमार्ग बांधावे लागतात. ते अमूक इतक्या वर्षांपूर्वी बांधले गेले असे सांगता येते. हवेतून उडणा-या विमानाला फक्त वातावरण लागते आणि ते पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यापूर्वीपासून अस्तित्वात आहे. मुंबई व न्यूयॉर्क ही शहरे वसण्यापूर्वीच युक्लिडने आपले सिध्दांत सांगितले होते. भूगोलाच्या रचनेचा अभ्यासही पूर्वीपासून होत आला आहे. शंभर वर्षांपूर्वी जेंव्हा राईट बंधूंनी पहिले सुनियंत्रित विमान उडवले होते तेंव्हाच मुंबईपासून न्यूयॉर्कचे कमीत कमी अंतर कोठल्या मार्गाने ठरेल याची माहिती शास्त्रज्ञांना बहुधा उपलब्ध असावी. प्रत्यक्षात कोणत्या मार्गाने विमान न्यायचे हे तांत्रिक प्रगती व राजकीय परिस्थिती या कारणांनी ठरते.
भारतातून उत्तर ध्रुवावरून अमेरिकेकडे विमान नेण्यासाठी वाटेत न थांबता तितके लांबचे अंतर उडत जाण्याची क्षमता असलेले विमान हवे किंवा वाटेत थांबून इंधन भरण्याची सोय असायला हवी. तसेच पूर्वीच्या सोव्हिएट युनियनकडून किंवा नंतरच्या काळात त्यामधून फुटून निघालेल्या राष्ट्रांची परवानगी हवी. त्या भागावरून जातांना तिथे जमीनीवरून विमानांना मार्गदर्शन करणारी सक्षम व सुसज्ज अशी यंत्रणा पाहिजे. आणीबाणीचा प्रसंग उद्भवला तर उत्तर ध्रुवापाशी कोठेही ते विमान खाली उतरवणे अशक्य आहे याची जाणीव ठेवून त्याची तरतूद करायला पाहिजे. अशा अनेक कारणांमुळे वीसाव्या शतकात अशी व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली नाहीत. हेरगिरी करणारी खास विमाने कधीपासून जगभर सगळीकडे फिरत आली आहेत.

Monday, November 10, 2008

वृक्षांची रंगसंगती


उत्तर अमेरिकेत भ्रमण करतांना फॉल कलर्समध्ये रंगलेल्या वृक्षराजीचे अनुपम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले. मात्र ते पहात असतांना ही किमया कशामुळे आणि कशासाठी घडत असेल याचे कुतूहल राहून राहून वाटतच होते. त्यामागची कारणपरंपरा समजल्यावर कुतूहलाची जागा अचंभ्याने घेतली.
इथे नेमके काय घडते ते समजण्यापूर्वी आपल्याला ठाऊक असलेल्या वनस्पतीशास्त्राची थोडक्यात उजळणी केली तर तुलनेसाठी ते सोपे जाईल. सगळ्या झाडांना फुटणारे कोवळे कोंब फिकट हिरव्या, पिवळ्या किंवा तांबूस रंगाचे तसेच मोहक, नाजुक, रसरशीत आणि तजेलदार असतात. ती पाने पाहतां पाहतां वाढतांना हिरवी गार होतात. थोडी जून झाल्यानंतर ती निबर होतात तसेच त्यांचा गडद हिरवा रंग जरासा काळपट वाटू लागतो. कालांतराने ती पाने पिकून पिवळी पडतात, सुकत जातात आणि अखेरीस गळून पडतात. बहुतेक झाडांना रंगीबेरंगी, सुरेख आणि सुवासिक अशी फुले लागतात. फुलपाखरे, भुंगे, मधमाशा अशासारखे कीटकांना ती फुले आपल्याकडे आकर्षित करतात. या कीटकांद्वारे फुलांचे परागकण दुस-या फुलांपर्यंत पोचतात आणि त्यामुळे फलधारणा होते. झाडांची फळेसुध्दा आपले रंग, रूप, चंव यांनी पक्ष्यांना व प्राण्यांना आपल्याकडे ओढून घेतात. त्यांच्याकडून या झाडांच्या बिया दूरवर पसरतात. यातून त्याच जातीची नवी झाडे उगवतात. अशा प्रकारे वनस्पतींचे प्रजनन चालत राहते.
आपल्याकडे दिसणारे वड, पिंपळ, आंबा, चिंच, बाभूळ, गुलमोहोर आदी मोठे वृक्ष अगदी लहानपणापासून पहाण्यात असतात. त्यातले कांही तर आजोबा, पणजोबांच्या काळातले असतात. म्हणजे त्यांचा बुंधा आणि मुख्य शाखा पूर्वीच्या असतात. फुले आणि फळे तर अगदी अल्पकाल झाडांवर असतात आणि पानेंसुध्दा बदलत राहतात. कांही विशिष्ट ऋतूंमध्ये या झाडांना जोमाने नवी पालवी फुटते आणि कांही काळात त्यांची पिकली पाने जास्त संख्येने गळतात असे दिसले तरी बाराही महिने ही झाडे मुख्यतः हिरवी गार असतात. हा हिरवा रंग पानांमधल्या क्लोरोफिल या रासायनिक तत्वामुळे त्यांना प्राप्त होतो. जमीनीतून मुळांनी शोषलेले पाणी आणि क्षार यांचा हवेमधील कर्बद्विप्राणिल वायूंबरोबर संयोग घडवून आणण्याचे काम हे क्लोरोफिल फोटोसिन्थेसिस या क्रियेमधून करते. यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि यातून अन्न तयार होते. या अन्नावर झाडांची वाढ होते, तसेच हे अन्न खाऊन कीटक, पक्षी आणि शाकाहारी प्राणी जगतात. मांसाहारी प्राण्यांचा उदरनिर्वाह त्यांना खाऊन होतो. हे सारे पशुपक्षी श्वसनक्रियेत हवेतला प्राणवायू घेतात आणि कर्बद्विप्राणिल वायू हवेत सोडतात. अशा प्रकाराने सृष्टीमधील जीवनाचे संपूर्ण चक्र चालत राहते.
ऊष्ण कटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधाच्या दक्षिणेकडल्या भागांत हे असे युगानुयुगे चालत आलेले आहे, पण त्याहून उत्तरेकडे वेगळ्या प्रकारचे हवामान असते. अमेरिकेच्या उत्तर भागात हिंवाळ्याच्या दिवसात तपमान शून्य अंशाच्या खाली जाऊन सगळीकडे बर्फाचे साम्राज्य पसरते. दिवसाचा कालावधी अगदी लहान होतो आणि त्या वेळेतही सूर्यनारायण क्षितिजावरून जेमतेम हांतभर वर येऊन पुन्हा खाली उतरतो. यामुळे कडक ऊन असे फारसे पडतच नाही. सगळे पाणी गोठून गेल्यामुळे झाडांची मुळे पाणी शोषून घेऊन त्याला फांद्यांपर्यंत पोचवू शकत नाहीत. त्यामुळे फोटोसिन्थेसिस ही क्रिया मंदावते. आपल्याकडली बारमाही हिरवी झाडे अशा वातावरणात तग धरू शकणार नाहीत. पण या थंड हवामानात वाढलेल्या वृक्षांच्या जातींनी या संकटावरचा मार्ग शोधून काढला आहे.
या वृक्षांना वसंत ऋतूमध्ये पानाफुलांचा बहर येतो. इथल्या उन्हाळ्यातले मोठे दिवस, त्यात भरपूर सूर्यप्रकाश आणि पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे त्यांचा सदुपयोग करून ही झाडे झपाट्याने वाढतात, तसेच अन्न तयार करण्याचा कारखाना जोरात चालवून त्याचा भरपूर साठा जमवून ठेवतात. कडक थंडीत आणि अंधारात फोटोसिन्थेसिस होत नसल्यामुळे पानांचा फारसा उपयोग नसतो, त्याशिवाय त्यांचे क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे त्यातून जास्त बाष्पीभवन होते, त्यावर जास्त बर्फ सांचून त्याचा भार वृक्षाला सोसावा लागतो असे तोटेच असतात. हे टाळण्यासाठी हे वृक्ष आधीपासूनच तयारीला लागतात.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हे वृक्ष आपली वाढ थांबवतात आणि त्यांच्या पानांमधल्या क्लोरोफिलचे विघटन होणे सुरू होते, तसेच पानांमधले रस झाडाच्या आंतल्या बाजूला शोषले जाऊ लागतात. ते फांद्या आणि खोडांमधून अखेर मुळांपर्यंत जाऊन पोचतात आणि सुरक्षितपणे साठवले जातात. झाडांना थंडीत न गोठण्यासाठी यांचा उपयोग होतो. पण यामुळे मरगळ येऊन ती पाने सुकायला लागतात आणि गळून पडतात. पाने नसल्यामुळे झाडांचे श्वसन जवळ जवळ बंद होते आणि मुळांकडून पाण्याचा पुरवठा थांबल्यामुळे रसांचे अभिसरण होऊ शकत नाही. त्यापूर्वीच ही झाडे झोपेच्या पलीकडल्या डॉर्मंट स्थितीत जातात. आपल्याकडचे योगीराज सर्व शारीरिक क्रिया अतिमंद करून वर्षानुवर्षे ध्यानस्थ राहात असत असे म्हणतात. ही झाडेसुध्दा दोन तीन महिने ध्यानावस्थेत काढून स्प्रिंग येताच खडबडून जागी होतात.
पानांमध्ये हिरव्या रंगाच्या क्लोरोफिलखेरीज कॅरोटिनाइड्स, क्झँथोफिल, अँथोसायनिन यासारखी पिवळ्या आणि तांबड्या रंगांची रसायनेसुध्दा असतात. एरवी क्लोरोफिलचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे इतर रंग झाकले जातात. जेंव्हा क्लोरोफिल नष्ट होते तेंव्हा इतर द्रव्यांचे रंग दिसायला लागतात. कांही झाडे फॉलच्या काळात लाल रंगाचे अँथोसायनिन तयारही करतात. या द्रव्यांमुळे निर्माण होणारे रंग एकमेकात मिसळून त्यांच्या प्रमाणानुसार रंगांच्या वेगवेगळ्या असंख्य छटा तयार होतात. मात्र ही झाडे कोणालाही आकर्षित करण्यासाठी हे रंग धारण करत नाहीत. थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांची जी धडपड चाललेली असते त्यात ते बायप्रॉडक्ट्स तयार होतात. हे सगळे पाहता झाडांना फक्त जीव असतो एवढेच नसून त्यांना बुध्दी, विचारशक्ती आणि दूरदृष्टीसुध्दा असते की काय असे वाटायला लागते.