Thursday, February 25, 2010
विक्रमादित्य .... रेकॉर्डकर
जगज्जेता, विक्रमादित्य, महाराष्ट्रभूषण, खेलरत्न, पद्मविभूषण, मास्टर ब्लास्टर ....... अशी केवढी मोठी बिरुदावली सचिन तेंडुलकरच्या नांवाला लागलेली आहे! काल परवा त्यात एक नवीन भर पडलेली पाहिली. कोणीतरी त्याचे आडनांवच 'रेकॉर्डकर' असे ठेऊन दिले आहे. तो एका मागोमाग एक नवनवे रेकॉर्ड करत आला आहे आणि करत राहणारच आहे, "रेकॉर्ड कर" असे त्याला सांगायची मुळी गरजच नाही.
अर्थशास्त्राच्या खालोखाल क्रीडाजगतात आकडेवारीला खूप महत्व दिले जाते. धांवणे, पोहणे, लांब उडी, उंच उडी, भाला फेक, गोळा फेक वगैरे सगळ्या क्रीडाप्रकारात स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकारची आकडेवारी जमवली जात असते. फूटबॉल आणि हॉकीसारख्या सांघिक खेळांमध्ये कोणत्या संघाने किती सामन्यात भाग घेतला, त्यातले किती जिंकले, किती हरले वगैरेंचा हिशेब ठेवला जातो. त्याबरोबर त्या सामन्यांमध्ये किती गोल केले वगैरेंचा थोडासा तपशीलही असतो. पण इतर सर्व खेळांमध्ये मिळून जेवढी आकडेवारी जमा होत नसेल एवढी फक्त क्रिकेटच्या खेळात केली जाते. किती सामने खेळले, जिंकले, हरले वगैरे अगदी गौण बाब झाली. कोणकोणत्या देशांबरोबर कुठे कुठे ते खेळले गेले, त्यातही स्वदेशात की परदेशात की त्रयस्थ देशात?, त्या देशामधल्या कोणत्या शहरातल्या कोणत्या मैदानात? कसोटी सामने की मर्यादित षटकांचे? दिवसा उजेडी की दिव्यांच्या प्रकाशझोतात? पन्नास किंवा साठ षटकांचा की वीस वीसचा? असे अनेक पर्याय फक्त खेळण्याबद्दल आहेत. त्याशिवाय पहिल्या आणि दुस-या पारीत वेगवेगळ्या आणि एकंदर किती किती धांवा काढल्या? त्यात पुन्हा देश, शहर, क्रीडांगण, वर्ष, महिना, दिवस रात्र वगैरेंचा स्थानमहिमा आणि कालमहिमा आलाच. जिंकलेल्या सामन्यात जास्तीत जास्त धांवा कधी आणि कुठे काढल्या त्याच प्रमाणे कमीत कमी किती धांवा काढूनही विजय मिळाला, जास्तीत जास्त धांवा काढूनसुध्दा विजय कांही मिळाला नाही आणि कमीत कमी धांवा असतांनाही सामना हातातून निसटला नाही वगैरे अनेक प्रकारचे आकडे कांही लोकांच्या ओठांवर (किंवा फिंगरटिप्सवर) असतात.
वैयक्तिक विक्रमांबद्दल तर विचारायलाच नको. कोणता खेळाडू किती प्रकारचे किती सामने कधी कधी आणि कुठे कुठे नुसते खेळला इथपासून आकडेवारीची सुरुवात होते आणि त्याने त्यात काढलेल्या धांवा, त्याला मिळालेल्या विकेट्स, त्याने पकडलेले (किंवा सोडलेले) झेल यांचे मोठमोठे तक्ते तयार केले जातात. त्यांवरून सर्वाधिक धांवा, सर्वाधिक विकेट्स आणि सर्वाधिक झेल वगैरेंच्या विक्रमांची नोंद ठेवली जाते. त्यात पुन्हा संघ, शहर, राज्य, देश आणि विश्व वगैरे पातळीवर वेगळे विक्रम असतात. शिवाय कमीत कमी वेळात किंवा कमीत कमी चेंडूंवर पन्नास, शंभर, दोनशे, तीनशे धांवा करणे, कमीत कमी षटकांमध्ये किंवा कमीत कमी धांवांचे मोल देऊन जास्तीत जास्त विकेट मिळवणे यांची नोंद असते. एकेक सामन्यामधल्या विक्रमांची गणना तर केली जातेच, शिवाय एका सीरीजमध्ये, एका कॅलेंडर वर्षात, सलग बारा महिन्यांच्या काळात, तसेच वीस, पंचवीस, तीस वर्षांचे वय गांठण्याच्या आधी किंवा तीस, पस्तीसचे वय गांठल्यानंतर कोणकोणते पराक्रम गाजवले यांची आकडेवारी ठेवली जाते. हे फक्त कांही नमूने झाले. प्रत्यक्षात ठेवल्या जात असलेल्या विक्रमांची संख्या अपरंपार आहे.
कोणता ना कोणता विक्रम केल्याचे श्रेय आणि समाधान अनेक खेळाडूंना मिळावे या उद्देशाने कदाचित असे अनेक प्रकारचे रेकॉर्ड्स ठेवले जात असतील, पण सचिन तेंडुलकरसारखा एकादा अद्वितीय खेळाडू असे सगळे विक्रम एकट्यानेच तोडू पाहतो. बॅटिंगच्या बाबतीत कसोटी सामने तसेच एक दिवशीय सामने या दोन्ही प्रकारात सर्वाधिक धांवा आणि सर्वाधिक शतके नोंदवून तो त्या बाबतीत आघाडीवर आहे आणि इतरांपेक्षाही अधिक वेगाने पुढे सरकत चालला आहे. त्यामुळे त्याच्या पांवलावर पाऊल टांकून त्याला गांठायच्या तयारीत असलेला कोणी दिसत नाही. सर्वाधिक सामनेही तो यापूर्वीच खेळलेला आहे. त्यामुळे ग्वाल्हेरच्या क्रीडांगणावर त्याने पाऊल ठेवले तेंव्हाच सर्वाधिक सामने खेळल्याचा त्याचा स्वतःचा रेकॉर्ड त्याने पार केला होता, त्यानंतर पहिली धांव काढली तेंव्हा सर्वाधिक धांवांचा, पन्नासावी रन घेतली तेंव्हा सर्वाधिक अर्धशतकांचा आणि शंभर धांवा काढतांच सर्वाधिक शतकांचा असे त्याने स्वतः केलेले विक्रम तो मोडत गेला. त्यानंतर १९५ धांवा काढून त्याने एकदिवसीय सामन्यांतला आंतरराष्ट्रीय विक्रम मोडला आणि २०० धांवा काढून पहिला व एकमेव द्विशतकवीर होण्याचा बहुमान त्याने मिळवला. शिवाय सामनावीर ठरल्यामुळे सर्वाधिक वेळा हा मान पटकावण्याचा आणखी एक विक्रम त्याने प्रस्थापित केला. म्हणजे एकाच सामन्यात किती रेकॉर्ड्स मोडले आणि किती नवे स्थापन झाले? अशा प्रकारे रेकॉर्ड्सचीच संख्या कोणी मोजत असेल तर नक्कीच तो मान सुध्दा सचिनलाच मिळेल यात शंका नाही.
क्रिकेटच्या जगतात आजही ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन हाच 'ऑल टाइम ग्रेटेस्ट' बॅट्समन समजला जातो. या ब्रॅडमनसाहेबांनी देखील सचिनचे तोंडभर कौतुक केले आहे. मात्र ते करतांना "सचिनसुध्दा माझ्यासारखाच खेळतो" असे त्यांनी सांगितले आहे. ब्रॅडमनच्या काळात आजच्याइतक्या रेकॉर्डिंगच्या सोयी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे आपल्याला त्यांच्या खेळाची फक्त झलक पहायला मिळते, पण सचिनचा खेळ पाहून आपण ब्रॅडमनच्या बॅटिंगची कल्पना करू शकतो. "रेकॉर्ड्स हे मोडण्यासाठीच असतात" असे सांगितले जाते, पण सचिनने एकट्यानेच इतके विक्रम नोंदवून ठेवले आहेत की ते सारे मोडले जाणे कठीणच दिसते. "नव्या विक्रमानंतर आता पुढे काय?" अशा एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर सचिनने दिलेले उत्तर अत्यंत शालीन तसेच मार्मिक आहे. त्याने सांगितले, "क्षितिजापलीकडे सुध्दा जग आहे"
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
दादा, नमस्कार! खुप छान लिहिता!!
Post a Comment