Saturday, February 06, 2010

पंपपुराण - भाग १



माझा जन्म होण्याआधीच पंप या वस्तूने आमच्या घरात प्रवेश केला होता आणि तो रोजच्या वापरात होता. त्यामुळे मला समजायला लागल्यापासून पंप हा शब्द ओळखीचा होता. आमच्या घरात दोन लहानसे पंप असायचे, पण त्यातल्या एकाचाही पाण्याशी कांही संबंध नव्हता. किंबहुना त्यांचा पाण्याशी स्पर्शसुध्दा होता कामा नये अशी काळजी घेतली जात असे.

त्या काळात चार गॅलनच्या टिनाच्या चौकोनी डब्यातून केरोसीन किंवा घासलेट घरी आणले जात असे. आमच्या घरी त्याचा उल्लेख 'राकेल' या नांवाने होत असे. एका पंपाचा उपयोग करून ते राकेल त्या डब्यातून एका उभ्या बाटलीत काढले जात असे आणि त्या बाटलीतून ते रोजच्या उपयोगासाठी वापरले जात असे. यासंबंधातल्या सगळ्या वस्तू परदेशातून आल्या तेंव्हा त्यांच्या नांवाची मराठी रूपांतरे होत गेली. 'रॉक ऑइल' चे 'राकेल' झाल्यावर खोबरेलसारखेच ते एक प्रकारचे तेल झाले. अत्यंत दर्गंधी असल्यामुळे त्याचा उपयोग मात्र फक्त जाळण्यासाठी किंवा रंगांचे डाग काढण्यासाठी होत असे. 'गॅस लाईट' चे 'घासलेट' झाले, 'बॉटल'ची बाटली झाली. 'फनेल'च्या आकाराला 'नरसाळे' हा शब्द होता, पण बोलीभाषेत त्याला आम्ही 'नाळके' म्हणत होतो. 'पंप' हा आंग्ल शब्द मात्र 'संथ', 'कंद', 'संप' यासारखा वाटत असल्यामुळे मराठी भाषेत चपखल बसला. हा शब्द परभाषेतून आला असेल असे कधी वाटलेच नाही. त्या काळात आमची घ्राणेंद्रिये जरा जास्तच संवेदनाशील असल्यामुळे आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून रॉकेलचा डबा, बाटली, पंप आणि नाळके या सगळ्या वस्तू एका वेगळ्या खोलीतल्या कपाटात बंद करून ठेवल्या जात असत. गरज पडेल तेंव्हाच त्या बाहेर काढून काम झाल्यानंतर परत त्या जागी नेऊन ठेवल्या जात.

डब्यातून केरोसीन उपसण्यासाठी लागणा-या पंपाची रचना अगदी साधी सोपी असते. एका उभ्या नळकांडीच्या तळाला एक भोक ठेवलेले असते. त्यावर एक साधी झडप ठेवलेली असे. ती एकाच बाजूने उघडली जात असल्यामुळे पंपात आलेले रॉकेल डब्यात माघारी जात नाही. त्या पंपाच्या आत एक दट्ट्या असतो. एका बारीकशा सळीच्या तळाला एक पत्र्याची चकती जोडून तो तयार केलेला असतो. चिमटीत पकडून धरण्यासाठी ती सळी वरच्या टोकाला वाकवलेली असते. पंपाच्या वरच्या बाजूला एक तोटी बसवलेली असते. पंपाने वर खेचलेले तेल या तोटीतून बाहेर पडते.

डब्यातून रॉकेल काढण्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे डब्याच्या शेजारी बाटली ठेऊन तिच्या तोंडावर नरसाळे बसवले जाते. डब्याच्या वरच्या बाजूच्या एका कोप-यात असलेल्या लहानशा तोंडावरील झांकण उघडून तो पंप त्यातून आत सोडला की त्या पंपाच्या नळकांडीच्या तळाशी असलेल्या भोकामधून डब्यातले तेल पंपात शिरते. हाताने दट्ट्या वर उचलल्यावर त्याला जोडलेल्या चकतीच्या वर असलेला रॉकेलचा स्तंभ वर उचलला जातो आणि तोटीमधून ते तेल नरसाळ्यात पडून बाटलीत जाते. चकती आणि नळकांडे यामधील बारीक पोकळीतून ते या वेळी हळू हळू खाली पडत असते. पण दट्ट्या झटक्यात ओढल्याने बरेचसे रॉकेल त्याच्यासोबत वर उचलून बाहेर काढता येते. तो सावकाशपणे ओढला तर मात्र सर्व रॉकेल बाजूने खाली पडून जाईल आणि नरसाळ्यात कांहीच येणार नाही. डब्यातील रॉकेलची पातळी जसजशी खाली जात जाईल तसतसे त्याचे दर स्ट्रोकमध्ये पंपातून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होत जाते.

दट्ट्या खाली ढकलतांना मात्र याच्या उलट परिस्थिती असते. तो झटक्यात खाली ढकलला तर नळकांड्यामधील रॉकेलचा त्याला विरोध होतो आणि तो मोडून काढण्यासाठी जास्त जोर लावला तर पंपाच्या दट्ट्याची सळी वाकण्याचा किंवा तिला जोडलेली चकती निसटण्याचा धोका असतो. त्यामुळे तो किंचित कमी गतीने जरा जपून खाली ढकलायचा आणि झटक्यात वर ओढायचा अशा प्रकारचे थोडे कौशल्य या कामात लागते. डब्यातून बाटलीत रॉकेल काढण्याचे काम नेहमी घरातल्या मुलांकडेच असायचे. त्यामुळे कमीत कमी सेकंदात किंवा कमीत कमी स्ट्रोक्समध्ये बाटलीभर रॉकेल कोण काढतो याची त्यांच्यात चढाओढ असायची. पण बक्षिस म्हणून हे कामच गळ्यात पडले आहे हे लक्षात आल्यावर तो मुलगा चँपियनचा इन्स्ट्रक्टर बनून लहान भावाला तयार करायच्या प्रयत्नाला लागत असे.

. . . . . . . . (क्रमशः)

No comments: