Tuesday, February 02, 2010

निकष

आपल्या पुराणात एक मजेदार आणि बोधप्रद रूपककथा आहे. एक ऋषी आपल्या तपश्चर्येत मग्न असतांना एक उंदराचे पिल्लू येऊन त्याच्या अंगाखांद्यावर बागडू लागले. आता या लहानशा पिल्लाला शिक्षा तरी कशी करायची असा विचार करून त्या ऋषीने आपल्या तपोसामर्थ्याने त्याचे रूपांतर एका कन्यकेत केले. ती मुलगी वाढून वयात आली तेंव्हा कुठल्याही बापाप्रमाणे तो ऋषीसुध्दा तिच्या विवाहाच्या विचाराला लागला. जगातील सर्वश्रेष्ठ पुरुषाबरोबर तिचे लग्न लावावे असे त्याने ठरवले आणि याबाबतीत त्या मुलीच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने तिच्याबरोबर बोलतांना हा विषय काढला. जगातील सर्वात तेजस्वी असा सूर्यनारायण तिला कसा वाटतो असे विचारल्यावर ती उद्गारली, "पण एक काळा ढग सुध्दा त्याचे तेज झाकून टाकतो. तो कसा सर्वश्रेष्ठ असेल?"
पुढे जाऊन "त्या ढगाला एका जागी स्थिर उभेसुध्दा राहता येत नाही. वारा त्याला जिकडे नेईल तिकडे तो जातो.", "वा-याचे सुध्दा उंच पर्वतापुढे कांही चालत नाही. तो वा-याला अडवतो"
वगैरे झाल्यावर "मग नगाधीश तुला चालेल कां?" या प्रश्नावर उत्तर आले, "त्याच्या अंगावर छिद्रे पाडून त्या बिळात उंदीर राहतात, त्यांना देखील तो पर्वत काही करू शकत नाही." ही गोष्ट समोर आली. उंदराचा उल्लेख करतांना ती मुलगी छानशी लाजली. हे पाहून त्या ऋषीने तिला पुन्हा तिचे मूळ रूप परत दिले आणि मूषकराजाबरोबर विवाह करून ती उंदरी त्याच्या बिळात सुखाने रहायला गेली."

श्रेष्ठता आणि क्षुद्रपणा ठरवतांना कसे सापेक्ष निकष लावले जातात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. सूर्याची तर दोन्ही बाजूंनी पंचाईत आहे. ढगाआड जाऊन तो निष्प्रभ होतो आणि त्याचे निरभ्र आभाळात तळपणारे ऊनही सहन होत नाही. "तुझे मै चाँद कहता था मगर उसमे भी दाग है।" असे म्हणून चंद्राला नाकारून झाल्यावर "तुझे सूरज मै कहता था मगर उसमेंभी आग है।" असे म्हणून शायर त्याचाही निकाल लावतो. राम आणि कृष्ण या महाविष्णूच्या अवतारांनासुध्दा त्यांच्या अवताराच्या काळातच टीकेला सामोरी जावे लागले होते. "रामाने आपल्या कर्तव्यात कसूर केली" असा आक्षेप एका धोब्याने घेतला आणि शिशुपालाने श्रीकृष्णाला शंभर दूषणे दिली होती. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कथांमधील प्रसंगांचा आजकाल काय काय अर्थ लावला जात आहे हे पाहिल्यावर कदाचित "संभवामि युगे युगे।" या कृष्णाने दिलेल्या आश्वासनावर त्याला पुनर्विचार करावेसे वाटेल.

देवादिकांची ही कथा असली तर मनुष्य म्हणजे सद्गुण आणि दुर्गुण, क्षमता आणि न्यूनता यांचे गाठेडेच असणार. त्यातही अर्थातच वर लिहिल्याप्रमाणे चांगले वाईट ठरवण्याचे माझे निकष इतरांपेक्षा वेगळे असणारच. एकाद्या माणसाबद्दल लिहितांना त्याच्यातला मला न आवडलेला भाग सोडून द्यायचा, मला खुपलेल्या भागाबद्दल फार तर एकादा चिमटा काढायचा, पण कडाडून हल्ला करायचा नाही असे धोरण या ब्लॉगवर लिहितांना मी ठरवले आहे. वाईट साईट लिहिल्यामुळे उगाच कुणाच्या तरी भावना दुखवल्या जायचा धोका कशाला पत्करायचा? कोणाबद्दल चांगले लिहितांना मात्र "वचने किम् दरिद्रता?" या सुभाषितानुसार त्याला जरासे झुकते माप दिले. पण अप्रस्तुत आणि अतीशयोक्त असे कांही लिहिले असेल असे मला वाटत नाही.

माझ्या आयुष्यात जी माणसे मला भेटली त्यातल्या कांही सर्वसामान्य माणसांमधले असामान्य गुण त्यांच्याबरोबर दीर्घकाळ घडलेव्या स्नेहसंबंधातून माझ्या नजरेला पडत गेले, तर कांही महान लोकांबरोबर घडलेल्या पांच दहा मिनिटांच्या भेटीतच त्यांच्यामध्ये असलेल्या दिव्यत्वाची प्रचीती आली. अशा कांही निवडक माणसांची व्यक्तीचित्रे मी 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेत काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी अनेक लोकांबद्दल पुढे लिहिणार आहे. आभाळाएवढी उंची असलेल्या या माणसांचे पायसुध्दा जमीनीलाच टेकलेले आहेत हे मला जाणवले असले तरी ते मुद्दम नमूद करण्याचे कारण नव्हते. त्याखेरीज मला भावलेल्या कांही सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल लिहितांना कलाविश्वातल्या संबंधित लोकांचा परिचय करून दिला तेव्हा त्यांच्याबद्दल चार चांगले शब्द लिहिले आहेत. यातल्या कोणीसुध्दा मला ते करायला सांगितले नाही, कारण कधीकाळी मी कुठेतरी कांही तरी लिहिणार आहे हे मला स्वतःलाच माहीत नव्हते. त्यासाठी त्यांनी मला कांही लालूच दाखवायचा तर प्रश्नच नाही.

कोणाबद्दल चार चांगले शब्द लिहिल्यामुळे दुसरेच कोणी माझ्यावर नाराज होईल असे मला चुकूनही वाटले नव्हते. पण हा गैरसमजसुध्दा आता दूर झाला. बक्षिससमारंभाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांबद्दल आदरच व्यक्त करायची प्रथा आहे. त्याची ओळख करून देतांना त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीमत्वाची आणि कामगिरीची आठवण काढणे या प्रथेला धरून आहे. एका हरहुन्नरी व्यक्तीबद्दल लिहितांना आजच्या काळातली अशी दुसरी अष्टपैलू व्यक्ती माझ्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आली नाही असे मी लिहिले आणि ते खरेच आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करता करता तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन केले आणि त्या निमित्याने व्यवस्थापनकौशल्य आणि अर्थशास्त्र या विषयांचे बिगरीचे धडे घेतले. एक श्रोता आणि प्रेक्षक या नात्याने रंगमंच आणि पडद्याच्या आजूबाजूला घुटमळत राहिलो. त्यामुळे या क्षेत्रांमधील नामवंतांची नांवे मला परिचयाची असली तरी ती वेगवेगळी आहेत. या चारही क्षेत्रांत वावरणारी दुसरी व्यक्ती मला तरी भेटलेली नाही.

त्या व्यक्तीला मी कांही 'थोर' किंवा 'महान' वगैरे विशेषणे लावली नव्हती किंवा 'सर्वश्रेष्ठ' म्हंटले नव्हते. तरीसुध्दा भूतकाळातल्या कांही महात्म्यांचे दाखले देऊन त्यांना तुम्ही कसे ओळखणार? त्यांनी तुमच्यापुढे बक्षिसाचा तुकडा कुठे टाकला होता? असे प्रश्न उपस्थित करून माझी जागा मला दाखवून दिली. देशभक्ती, नेतृत्वक्षमता, त्याग, निष्ठा वगैरे महान गुण आणि अनेक विषयांचा सखोल अभ्यास करून एकाच वेळी त्यात पारंगत होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यांचे मोल ठरवण्याचे निकष वेगवेगळे असतात. त्यातही ज्या महात्म्यांना पूजेच्या देव्हा-यात स्थान मिळाले आहे त्यांची तुलना मर्त्य मानवाबरोबर करता येत नाही कारण आपण सर्वसामान्य लोक त्यांच्याबद्दल त्रयस्थपणे विचार करू शकत नाही.

"पुस्तके काय कोणीही लिहील आणि आजकाल कुणाचाही सन्मान आणि सत्कार केला जातो, तेंव्हा त्याला काही अर्थ नाही" असे प्रतिपादन केले गेले. कुठलेही अभ्यासपूर्ण पुस्तक न वाचताच ते लिहिणारा लेखक विद्वान नसेलच, त्याने केवळ उचलेगिरी केली असणार असे ठरवून टाकायचे आणि अनेक ठिकाणी त्याला मिळालेला सारा मानमरातब त्याने वशीलेबाजी आणि कारस्थाने करून प्राप्त केला असणार असे गृहीत धरायचे झाले तर मग कोणाचा चांगलेपणा ठरवायचा तरी कसा? त्यासाठी कोणता निकष वापरायचा? चांगली माणसे फक्त इतिहासकाळातच होऊन गेली का? देवाने आपला चांगली माणसे तयार करायचा कारखाना आता बंद करून ठेवला आहे का? असे प्रश्न पडतात. 'जुने ते सोने' ही म्हण ऐकली होती, पण 'फक्त जुने तेवढेच सोने' हा निकष पटणारा नाही.

13 comments:

हेरंब said...

काका, हा लेख तुम्ही का लिहिला आहेत ते येतंय माझ्या लक्षात. पण तुम्ही उगाच "कोणाही" कडे लक्ष देऊ नका.
तुमचा इ-मेल आय डी मिळू शकेल का? मी वर जे म्हणतोय त्याच्या पुराव्यादाखल काही इ-मेल्स पाठवेन.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

तुमचं मत १००% पटलं काका. फक्त जुनं तेवढंच सोनं नसतं. आपलं मत प्रांजळपणे व्यक्त करणं कधीकधी आपल्यालाही त्रासदायक होतं पण म्हणून आपण आपला स्पष्टवक्तेपणा सोडून देऊ शकत नाही.

Anand Ghare said...

आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
मला साक्षी पुरावे काढून कांही सिध्द करावयाचे नाही.एकाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या प्रकारे कसे पाहिले जाते एवढे दाखवायचे होते.

Naniwadekar said...

घारे काका, तुम्ही माझी टीका फारच मनाला लावून घेतलेली दिसते. आज़काल कसल्याही स्पर्धा घेऊन त्यात विजेते ठरवून समारंभ करत बसण्याची पद्‌धत निघाली आहे आणि मला 'स्टार माझा'चा हा उपक्रम अर्थशून्य वाटतो, पण 'तुमच्यापुढे बक्षिसाचा तुकडा टाकला' असा आरोप माझ्या मनात नव्हता. 'महात्म्यांची मर्त्य मानवाबरोबर तुलना करता येत नाही' हे मला मान्य नाही. उलट कधीकधी चौरसियाची बासरी ऐकल्यावर कृष्ण तरी यापेक्षा काय चांगली वाज़वत असेल, असं वाटतं. (पण चौरसिया माझा आवडता वादक नाही, कारण त्या वाद्‌याला मर्यादा आहेत, आणि तो माणूस कलेशी इमान राखणारा नाही. 'ओ मेरी चाँदनी' सारखं सडकछाप घाणेरडं गाणं देताना त्या माणसाला लाज़ वाटली नाही.) 'फक्त जुने तेवढेच सोने' हा निकष मी मांडलेला नाही. मी न बोललेल्या गोष्टी तुम्ही माझ्या तोंडी घालू नये. कालच मी एका ब्लॉगलेखिकेला त्यांची कविता कुसुमाग्रजांचं स्मरण ज़ागवून गेली अशी पावती दिली होती. (आता ती कविता तुम्हांला बेकार वाटली तर तुम्ही ते म्हणायला मोकळे आहात.) तसंच कुसुमाग्रजांनी, ते कवि म्हणून मला अगदी देवाच्या ज़ागी असले तरी, अनेक फालतू कविता लिहिल्या आहेत आणि याबद्‌दल तुमचा मतभेद असला तर असला. प्रत्येकाला आपलं मत मांडायचं स्वातंत्र्य आहेच.

'अशी व्यक्ती माझ्या ऐकण्यात देखील नाही' या विधानाचा अर्थ ती 'इतकी महान' आहे, असाच होतो. आणि माझ्या ऐकीव माहितीनुसार अच्युत गोडबोले हा एक सामान्य माणूस आहे. गोडबोले शिवाजी, टिळक यांच्याहीपेक्षा महान असल्याचं माझं मत झालं तर मी ते मांडीनही. पण तुम्ही त्यांची नको तितकी, अगदी हास्यास्पद वाटली इतकी, स्तुती केली या माझ्या विधानावर मी कायम आहे.

'कोणाबद्दल चार चांगले शब्द लिहिल्यामुळे दुसरेच कोणी माझ्यावर नाराज होईल असे मला चुकूनही वाटले नव्हते.' आपण एक उदाहरण घेऊ. 'सुमन कल्याणपूरांच्या तोडीची गायिका मी ऐकलेली नाही.' हे 'चांगले शब्द' आहेत की 'हास्यास्पद विधान'? एखाद्‌या विधानावर टीका केली, तिथे तुमच्यावर नाराज़ वगैरे होण्याचा प्रश्नच कुठे येतो? मी नाराज़ झालो, हा तुमचा गैरसमज़ कृपया काढून टाका.

- डी एन

Anand Ghare said...

'महात्म्यांची मर्त्य मानवाबरोबर तुलना करता येत नाही' हे मला मान्य नाही.
... याबद्दल आपली मते भिन्न असू शकतात

प्रत्येकाला आपलं मत मांडायचं स्वातंत्र्य आहेच.
..... मान्य आहे

'अशी व्यक्ती माझ्या ऐकण्यात देखील नाही'
........ हे वाक्य मी लिहिलेले नाही.
'इतक्या वेगवेगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यात इतकी उंची गाठलेली दुसरी कोणती व्यक्ती माझ्या पहाण्यातच काय, ऐकण्यातही नाही' असे मी लिहिले आहे. त्यात 'अशी' या शब्दाचे स्पष्टीकरण दिसेल. अमेरिकेत वास्तव्य असलेली एक गायनॅकॉलॉजिस्ट लावण्यांचा सुरेख कार्यक्रम बसवते आणि मराठी भाषेत पुस्तके लिहिते किंवा अनेक विषयात डॉक्टरेट मिळवणारा एक माणूस राजकारणात शिरतो (दुर्दैवाने ते ही आज हयात नाहीत), अनेक वैद्यकीय पदवीधरांनी मराठी रंगभूमीला आणि संगीतविश्वाला समृध्द केले आहे अशी अनेक नांवे माझ्या डोळ्यासमोर आहेत, त्यातले उदाहरण आपण दिले असते तर त्यावर चर्चा करता आली असती. केमिकल इंजिनिअरिंग, संगणकशास्त्र, संशोधकांची चरित्रे, अर्थशास्त्र, व्यवस्थापन कौशल्य आणि शास्त्रीय संगीत यांचा पसारा माझ्या मते खूप विस्तृत आहे. यातील प्रत्येक क्षेत्रात गोडबोले यांच्यापेक्षा खूप उच्च पातळीवर गेलेले अनेक विद्वान आहेत यात शंका नाही. या ठिकाणी तो मुद्दा येत नाही. अशा अनेक क्षेत्रांचा अभ्यास त्यांनी केला हे मला कौतुकास्पद वाटले

तुम्ही त्यांची नको तितकी, अगदी हास्यास्पद वाटली इतकी, स्तुती केली ..... मी या विधानाशी सहमत नाही. मी फक्त त्यांनी भूषवलेल्या पदांची आणि पुस्तकांची जंत्री दिली आहे. मला ती इम्प्रेसिव्ह वाटली. त्यांच्याबद्दल मलाही यापेक्षा अधिक कांही माहीत नाही. त्यामुळे त्यांना थोर, महान, श्रेष्ठ यासारखी विशेषणे लावण्याएवढी स्तुती मी केलेली नाही

'सुमन कल्याणपूरांच्या तोडीची गायिका मी ऐकलेली नाही'
.... असे मी ही कधीच म्हणणार नाही, पण सुदेश भोसले यांना एक स्वतंत्र गायक म्हणून फार मोठे स्थान नसले तरीसुध्दा त्यांच्यासारखा अनेक गायकांच्या आवाजात गाणी गाणारा दुसरा कोणी आज दिसत नाही असे म्हंटले तर ते चुकीचे विधान होणार नाही.

मी नाराज़ झालो, हा तुमचा गैरसमज़ कृपया काढून टाका.
... काढून टाकला. आता बट्टी करायची कां?

आपल्या प्रतिसादांमुळे या ब्लॉगला थोडे चैतन्य आले याबद्दल आभारी आहे.

Anonymous said...

> त्यांना थोर, महान, श्रेष्ठ यासारखी विशेषणे लावण्याएवढी स्तुती मी केलेली नाही.
>---

मला वाटतं यापुढे आपण दोघेही आपली आधीची विधानंच परत मांडणार. तरी अज़ून एकदा. 'महान' हे विशेषण अतिवापरामुळे गुळगुळीत, अर्थहीन झालं आहे. शिवाय 'महान' म्हणजे नक्की किती महान ही संदिग्धता उरतेच. तुम्ही गोडबोले 'महान' आहेत, अशी स्तुती केली असती तर मी लक्षही दिलं नसतं. तुम्ही त्याच्याही पलीकडे गेलात आणि 'अशी' व्यक्ती पाहण्यातही नाही, वगैरे माहिती दिली. म्हणून मी वेगवेगळ्या विषयात उंची गाठलेली उदाहरणं दिली.

आता 'अशी' म्हणजे कशी? 'इतक्या वेगवेगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यात इतकी उंची गाठलेली'. व्यावहारिक यश अनेकदा नशीबानी मिळतं. अशा व्यक्तीला संशोधकांची चरित्रे, संगीतावर लेख सहज़ लिहिता येतात. मला त्याची मातबरी वाटत नाही. उंच ज़ाणारं नाव हे वेगवेगळ्या विषयांत खोल-खोल गेल्यानी उंच-उंच ज़ातं आहे की तो टाचणी लागताच पितळ उघडं पडेल असा फुगा आहे, हा प्रश्न असतो. पण यासंबंधात मला गोडबोल्यांविषयी फार माहिती नाही, आणि तुम्हालाही 'भूषविलेल्या पदांची जंत्री' यापलीकडे फारशी माहिती दिसत नाही.

गोडबोल्यांना संगीतात किती गती आहे, याचं मूल्यमापन मी त्यांचे लेख वाचायला मिळाले तर सहज़ करू शकीन.

एकाही विषयात माणसानी उंची गाठली तरी मला पुरे आहे. मल्लिकार्जुन मनसूरांचं शिक्षण असेल-नसेल; ते संगीतावरही धड बोलू शकायचे नाही. पण नुसत्या त्यांच्या गायनकलेमुळे त्यांची थोरवी सिद्‌ध झाली. अनेक विषयांत अव्वल असलेले पुलंसारखेही लोक आहेत. ज़र गोडबोले अशा तुलनेला पात्र असतील, तर तुमच्या विधानाला अर्थ राहील. पण अशी तुलना शक्य नसल्याची तुमची भूमिका आहे, तेव्हा माझ्यापुरता हा विषय संपवायला हरकत दिसत नाही.

- डी एन

नीरजा पटवर्धन said...

अरे बापरे.. घारे काका नाही ते कशाला मनावर घेताय. ब्लॊग माझा स्पर्धेमुळे आपली सगळ्यांची एकमेकांशी ओळख झाली हे काय कमी आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणा आणि सोडून द्या.

Anand Ghare said...

मराठी भाषेतील प्रचलित शब्दांचा सर्वमान्य रूढ अर्थ बाजूला सारणे, नसलेला अर्थ जोडणे आणि न केलेल्या चुकांचे खापर फोडणे वगैरे गोष्टी नकारात्मक वितंडवादाची लक्षणे आहेत. मी नेहमी लिहीत असलेल्या गुळमट मजकुरापेक्षा वेगळे आणि मनोरंजक असे एकादे तिखट खारट 'सँपल' रुचिपालट म्हणून वाचायला मिळावे एवढ्याच उद्देशाने मी हा निरर्थक वाद थोडा वाढवला होता. "कोणाच्याही असल्या गोष्टी मनावर घेऊ नयेत" या हेरंब, कांचन आणि नीरजा यांनी दिलेल्या सूज्ञ सल्ल्यानुसार आता या वादावर पडदा पाडीत आहे. त्या सर्वांचा मी आभारी आहे. यापूर्वी या ब्लॉगवर आलेले कोणाचेही प्रतिसाद प्रसिध्द करणे मी नाकारले नसले तरी यापुढे कदाचित मला ते करावे लागेल.

Anand Ghare said...

या विषयावरील चर्चा आता थांबवली असल्याचे मी काल लिहिले होते, पण आज सकाळी आलेल्या वर्तमानपत्रात श्री अच्युत गोडबोले यांनी लिहिलेल्या 'अर्थात' या पुस्तकाबद्दल वाचले आणि हा प्रतिसाद लिहिल्याशिवाय रहावले गेले नाही. एका प्रमुख बँकेच्या प्रमुख अर्थशास्त्रज्ञाच्या पदावर काम करणा-या म्हणजेच या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीने हा लेख लिहिला आहे. या पुस्तकाचा परिचय असा करून दिला आहे.

"एका अभियांत्रिकी व भौतिक विज्ञानांच्या अभ्यासात रमून गेलेल्या व्यक्तीने बौद्धिक कुतूहलापोटी व तीव्र संवेदनक्षमतेतून अर्थशास्त्राच्या अभ्यासाकडे वळून, अत्यंत नेकीने या विषयातील मूलभूत संकल्पनांचा व उपपत्तींचा सखोल अभ्यास करून, या विषयाचे समाज, संस्कृती व राजकारण यांबरोबर असलेले नाते समजून घेऊन हे ग्रंथलिखाणाचे काम केले आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचे औपचारिक व इझम्च्या चौकटीत बंदिस्त करणारे असे अर्थशास्त्राचे शिक्षण न घेतल्यामुळे त्यांचा या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोण निकोप व निरोगी असल्याचे जाणवते. लेखकाला अमूर्त संकल्पनांइतकाच मनुष्यस्वभावातही रस असल्यामुळे अनेक अर्थतज्ज्ञांच्या स्वभावातील वैशिष्टय़े, वैयक्तिक आयुष्यामधील किस्से व करामतींचा आढावाही अच्युत गोडबोले यांच्या ‘अर्थात’ या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथात वाचायला मिळतो."

"बौद्धिक कुतूहलापोटी एखाद्या विषयाकडे वळायचं, त्याचा ‘गाभा’ समजून घेण्यासाठी झपाटल्यासारखं वाचन करायचं, सतत लिखाण करून व तज्ज्ञांबरोबर चर्चा करून त्या विषयातील महत्त्वाच्या संकल्पना पारखून घ्यायच्या व जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो विषय पोचविण्यासाठी धडपडायचं’, हे ते अत्यंत सहजपणे करत आले आहेत. त्यांची आतापर्यंतची ग्रंथनिर्मिती याच गोष्टीची साक्ष देते."

नरेंद्र गोळे said...

घारेसाहेब, स्टारचे निकष काहीही असोत. मी तुमच्या लेखनाचा चाहता आहे. स्टारने निवड केली म्हणून केवळ, तुमच्या लिखाणात उणीव निर्माण होत नाही. शिवाय, स्टारच्या निवडीचे समर्थन करण्याची तुम्हाला खरे तर गरजच नाही. तुमचे लिखाण स्वयंप्रकाशित आहे.

नानिवडेकरसाहेब, मनात जे खुपतय तेच नेमके व्यक्त करण्याचे थोडेसे कसब तुम्ही दाखवावे अशी माझी सार्थ अपेक्षा आहे. स्टारचे निकष आणि निवड व ती करणारे यांच्याबाबतचे तुमच्या मनातील आक्षेप मी समजू शकतो. मात्र त्यांचे मूल्य, घारेंना निकषाच्या समर्थनार्थ हा लेख लिहावा लागावा, एवढे मोठे नाही.

मनुष्याची भाषा अभिव्यक्ती; वर्णन, स्तुती, निंदा या सार्‍यांचीच जननी आहे. तरीही आपल्या सर्व पूर्वसुरींनी स्तोत्रेच गायीली. "रावणनिंदा" असा काही ग्रंथ तुमच्या पाहण्यात आहे का? तेव्हा निंदाव्यंजनात ऊर्जा खर्च करू नका. त्यामुळे घारेसाहेबांसारख्या विद्वानाची ऊर्जा "निकष" हुडकण्यात जायबंदी न होता, पंपांच्या रहस्य वोमोचनात कामी येईल आणि अनेकांना तांत्रिक विषयांची कवाडे मराठीत खुली होतील. तेव्हा सहकार करा ही नम्र विनंती.

Anand Ghare said...

श्री.नरेंद्र गोळे यांचे आभार.
दस-या एका माणसाचा मी करून दिलेला परिचय तिस-या व्यक्तीला पसंत पडला नाही यावरून मूल्यमापन करण्याचे निकष कसे वेगळे असू शकतात हे मी या लेखात उदाहरणासह दाखवले.

माझ्या लिखाणाच्या निवडीचे समर्थन करण्याचा प्रयत्न मी या लेखात केलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी.

नरेंद्र गोळे said...

माझ्या लिखाणाच्या निवडीचे समर्थन करण्याचा प्रयत्न मी या लेखात केलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी.>>

नक्कीच. मीही तसे काही म्हटलेले नव्हतेच.

तुमचे पंपपुराण मला आवडले. सोप्या भाषेत अवघड तांत्रिक माहिती समजावून सांगण्याचे तुमचे कसबही आवडले.

याच अनुषंगाने सायफनचे तत्त्व समजावून सांगितलेत तर किती छान होईल, असे मला वाटले! कराल का हे?

Anand Ghare said...

पंपपुराण आताशी कुठे सुरू झाले आहे. बालवयातून मोठे होऊन इंजिनियर झाल्यानंतर पंपांचे अंतरंग दिसायला लागेल. अजून बरेच कांही बाकी आहे.

त्बानंतर किंवा त्याच्या अनुषंगाने पाइपिंग घेतले तर त्यात सायफन येईल.