Sunday, February 07, 2010

पंपपुराण - भाग २


आमच्या घरात असलेला दुसरा पंप हा घरातल्या प्रायमस स्टोव्हचा एक भाग होता. तो समजून घेण्याआधी या स्टोव्हची थोडी माहिती द्यायला हवी. पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळातल्या ग्रामीण भागात घरोघरी खरोखरच फक्त मातीच्या चुलीच असत आणि जळाऊ लाकडे हे मुख्य इंधन असे. त्याखेरीज शेणाच्या गोव-या, सुकलेले गवत, कागदाचे चिटोरे, कापडाच्या चिंध्या, लाकडाचा भुसा, नारळाची करवंटी, भुईमुगाच्या शेंगांची फोलपटे यासारखे जे कांही ज्वलनशील पदार्थ घरात असतील ते सारे बंबातल्या किंवा चुलीतल्या अग्नीनारायणाला स्वाहा केले जात असत. पण चूल पेटवायला बराच वेळ लागत असल्यामुळे तांतडीच्या कामासाठी किंवा फक्त थोडा वेळ काम असेल तर त्यासाठी प्रायमस स्टोव्हचा उपयोग केला जाई. चूल, शेगडी वगैरे साधने स्वयंपाकघरातल्या धुराड्याखाली एका ठराविक जागी जिथे जमीनीवर मांडलेली असतात त्या जागीच त्यांचा उपयोग करता येतो, पण हा स्टोव्ह उचलून कोठेही सहज नेता येत असल्यामुळे घराच्या कुठल्याही भागात त्याचा उपयोग करता येत असे. तसेच गरज पडल्यास चूल आणि शेगडी यांना पूरक म्हणूनही त्याचा उपयोग होत असे. असे हे एक सर्वगुणसंपन्न साधन असायचे. आज आमच्या जीवनाचा अत्यावश्यक अंग बनलेल्या गॅस आणि विजेवर चालणा-या शेगड्या त्या काळात आम्हाला ऐकून सुध्दा ठाऊक नव्हत्या.

या प्रायमस स्टोव्हमध्ये वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पितळेची टांकी असते. तिच्यात रॉकेल भरायचे. त्या टाकीच्या मधोमध असलेल्या उभ्या नळीतून ते वर येऊन तिच्या तोंडाशी बसवलेल्या नॉझल्समधून त्याचा फवारा पसरतो. त्यापूर्वीच त्या रॉकेलचे बाष्पीभवन झालेले असल्यामुळे तो फवारा लगेच पेट घेतो आणि रॉकेलचे पूर्ण ज्वलन होऊन तीव्र ऊष्णता देणा-या ज्वाला त्यातून निघतात. टांकीला जोडलेल्या तीन उभ्या सळ्यांवर एक तबकडी ठेवलेली असते. त्या तबकडीवर स्वयंपाकाचे भांडे ठेवले जाते. टांकीतले रॉकेल नळीतून वर चढण्यासाठी टांकीतल्या रॉकेलवर हवेचा दाब दिला जातो. हवेचा दाब जितका जास्त असेल तितक्या जास्त वेगाने रॉकेल वर ढकलले जाते आणि त्या प्रमाणात ती ज्वाला प्रखर होते.

टांकीतल्या हवेचा दाब वाढवण्यासाठी पंपाचा उपयोग केला जातो. या पंपातसुध्दा एक लहानसा सिलिंडर (नळकांडे) आणि त्यात मागे पुढे सरकणारा पिस्टन (दट्ट्या) असतो. त्या दट्ट्याच्या तोंडाशी चामड्याचा खोलगट आकाराचा वायसर (वॉशर) बसवलेला असतो आणि सिलिंडरच्या दुस-या टोकाला फक्त आंतल्या बाजूला उघडणारा व्हॉल्व्ह असतो. पिस्टन बाहेर ओढतांना बाहेरील हवा वायसरच्या बाहेरच्या बाजूने सिलिंडरमध्ये खेचली जाते आणि पिस्टन पुढे ढकलतांना खोलगट आकाराचा वॉशर सिलिंडरला घट्ट दाबला जातो. त्यामुळे आंतली हवा बाहेर पडू शकत नाही आणि तिचा दाब वाढत जातो. जेंव्हा तो टांकीमधील हवेच्या दाबापेक्षा जास्त होतो त्यानंतर व्हॉल्ह उघडून जास्त दाबाची हवा टांकीत जाऊन तेथील हवेचा दाब अधिक वाढवते. अशा प्रकारे हवेचा दाब वाढवून स्टोव्हची आंच वाढवली जाते. स्टोव्हची आंच कमी करायची असेल तर टांकीमधील हवेचा दाब कमी करण्यासाठी एक चावी ठेवलेली असते. ती थोडी सैल करताच आंतली थोडी हवा बाहेर पडून तिचा दाब कमी होतो. त्यानंतर ती लगेच आवळली नाही तर सगळा दाब नाहीसा होऊन स्टोव्ह बंद पडतो. काम संपल्यानंतर या चावीचा उपयोग करूनच स्टोव्ह विझवला जातो.

स्टोव्हमधील रॉकेल जळून कमी होत जाते तसतशी टांकीतली रिकामी जागा वाढत जाते आणि त्यामुळे तिच्यात असलेल्या हवेचा दाब कमी होतो. व्हॉल्व्ह आणि चावीमधून सूक्ष्म प्रमाणात हवा बाहेर पडूनसुध्दा तिचा दाब कमी होत असतो. त्यामुळे जळत असलेल्या स्टोव्हला अधून मधून पंप मारावाच लागतो. तसे नाही केले तर हवेचा दाब कमी झाल्यामुळे रॉकेल नळीतून वर चढणार नाही आणि स्टोव्ह विझून जाईल. हा पंप मारण्यासाठी एका हाताने स्टोव्हची टांकी घट्ट धरून ठेवावी लागते आणि दुस-या हाताने थोडा जोर लावावा लागतो. स्टोव्ह हा प्रकारच थोडा धोकादायक असल्यामुळे लहान मुलांना त्याच्या जवळ जाण्याची परवानगी नसे. या पंपाबद्दल माझ्या मनात बरेच कुतूहल असले तरी तो हाताळण्यासाठी मला बरीच वर्षे वाट पहावी लागली.

No comments: