Monday, February 22, 2010

पंपपुराण भाग ६सेंट्रिफ्यूगल पंपाचे कार्य कसे चालते हे आपण मागील भागात पाहिले, पण खोल विहिरीत असलेले पाणी जमीनीच्या वर कसे येते या कोड्याचा उलगडा कांही त्यातून झाला नाही. असा पंपसेट आणून विहिरीच्या कांठावर बसवला, त्याला विजेचे कनेक्शन दिले, पाईप जोडून तो विहिरीत खोलवर बुडवला आणि बटन दाबले की मोटर फिरू लागेल, पंपाचा इंपेलर फिरत असल्याचे आवाज त्यातून येतील, पण पाण्याचा मात्र एक थेंबसुध्दा बाहेर येणार नाही. 'आडातच नसेल तर पोह-यात कुठून येणार ?' अशी म्हण आहे. इथे मात्र आडात भरपूर पाणी असले तरी ते सेंट्रिफ्यूगल पंपाच्या बाउलमध्ये आल्यानंतरच इंपेलर त्याला पंपाच्या बाहेर ढकलू शकतो.

पारंपरिक पध्दतीच्या आडातून पाणी काढण्यासाठी एक घागर दोरीच्या एका टोकाला बांधून ती पाण्यात सोडतात आणि रहाटाचे चाक फिरवून ती भरलेली घागर पाण्याबाहेर उचलून घेतात. लहानसा हांतपंप बसवण्यासाठी मोठी विहीर खोदण्याची गरज नसते. जिथे जमीनीखाली भरपूर पाणी असते अशा जागी पुरेसे खोलवर खणून एक उभा पाईप त्यात गाडतात आणि त्यावर हांतपंप बसवतात. या पंपाची रचना बरीचशी रॉकेलच्या पंपासारखीच असते. त्याचे हँडल एका तरफेमार्फत पिस्टनला जोडलेले असते. ते खाली ओढले की वरील पाण्यासह पिस्टन वर येतो आणि ते पाणी तोटीतून बाहेर पडते. या पंपातसुध्दा विहिरीतील पाणी उचलून वर आणले जाते. पिचकारी उडवतांना त्यात असलेले रंगीत पाणी आपण दट्ट्याने ढकलून बाहेर उडवतो. अशा प्रकारे द्रव पदार्थ एका भांड्यात घालून उचलता येतात किंवा बंद नळीतून पुढे ढकलता येतात, पण दोरीला किंवा काठीला धरून ती ज्या प्रकारे ओढता येते तसा कोणताही द्रवपदार्थ आपण ओढू शकत नाही. पृथ्वी मात्र पाण्याला ओढण्याचे काम गुरुत्वाकर्षणातून करत असते. या तत्वाचाच उपयोग विहिरीतील पाणी पंपामार्फत बाहेर काढण्यात केला जातो.

वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे पंपाला जोडलेला पाईप पाण्यात बुडवला जातोच, त्याच्या तळाशी एक फूटव्हॉल्व्ह बसवतात. ही झडप फक्त आंतल्या बाजूला उघडते. ती विहिरीतल्या पाण्याला पाइपात जाऊ देते, पण पाइपात असलेल्या पाण्याच्या वजनानेच ती घट्ट मिटते आणि आंतील पाण्याला विहिरीत जाऊ देत नाही. नवा पंप बसवल्यानंतर त्याला जोडलेला पाईप आणि पंपाचे भांडे पाण्याने पूर्णपणे भरतात. पंपामधील हवा बाहेर जाण्यासाठी त्याच्या वरच्या बाजूला एक व्हेंट होल ठेवलेले असते. त्यातून पाणी बाहेर येऊ लागणे ही पंप पाण्याने भरल्याची खूण आहे. त्यानंतर त्याला घट्ट टोपण बसवून पंपाची मोटर सुरू करतात. इंपेलरच्या केंद्रभागी असलेले पाणी वेगाने बाहेर फेकले जाते. त्यामुळे त्या ठिकाणी निर्वात पोकळी निर्माण होते.

या वेळी फूटव्हॉल्व्हवर आंतल्या बाजूने त्यात असलेल्या पाण्याचे वजन त्याला बंद करत असते, तर बाहेरच्या बाजूने वातावरणातील हवेचा दाब विहिरीमधील पाण्याला ढकलून त्या झडपेला उघडत असतो. त्याचा जोर जास्त असला तर झडप उघडून पाणी आंत शिरते आणि पंपातील निर्वात पोकळी भरून काढते. वातावरणाचा हा दाब सुमारे दहा मीटर उंच पाण्याचा स्तंभ तोलून धरू शकतो. पण फूटव्हॉल्व्ह उघडण्यासाठी लागणारा जोर, पाण्याच्या प्रवाहाला घर्षणामुळे पाइपात होणारा विरोध, वातावरणाच्या दाबात वेळोवेळी होत असलेला बदल वगैरेंचा विचार करता प्रत्यक्षात विहिरीतले पाणी सात आठ मीटरपर्यंत वर चढू शकते आणि पंपातून त्याचा प्रवाह चालत राहतो. मात्र पंप सुरू करण्यापूर्वी त्याचे केसिंग आणि सक्शन पाईप यांचे पाण्याने भरलेले असणे आवश्यक असते. ते नसले तर आधी भरून घ्यावे लागतात. याला प्राइमिंग म्हणतात. हे सुलभ रीतीने करण्यासाठी पाण्याची वेगळी व्यवस्था केलेली असते.. . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: