Thursday, February 18, 2010

आद्य क्रांतीकारक


परवा १७ फेब्रूवारीच्या पेपरात एक उपयुक्त माहिती वाचली. महाराष्ट्रातील महापुरुष आणि समाजसुधारक यांचे थोडक्यात संकलन त्यात दिले होते. वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू दिन १७ फेब्रूवारी १८८३ अशी त्यातली शेवटची नोंद होती. मी ती नोंद त्याच दिवशी वाचली हा एक योगायोगाचा भाग झाला. त्या दिवसानिमित्य वासुदेव बळवंतांबद्दल इतरत्र कांही लिहिले आहे का हे पाहिले, पण कांही सापडले नाही. कदाचित त्या दिवशी कोठे तरी एकादी सभा झाली असेल, त्यांच्याबद्दल कोणी व्याख्यान दिले असेल, निदान त्यांच्या पुतळ्याला कोणी हार घातला असेल. पण असे कोणतेच वृत्त काल आणि आजच्या वर्तमानपत्रात आले नाही. त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचे पुण्यस्मरण कोणाला झालेच नाही की त्याला प्रसिध्दी मिळाली नाही हे सांगता येणार नाही. आजकाल रोजच कोणा ना कोणा संत, महंत, पुढारी, हुतात्मा यांपैकी कोणाची तरी जन्मतारीख किंवा पुण्यतिथी असते त्यामुळे या आद्य क्रांतीकारकाला आता बातमीमूल्य (न्यूजव्हॅल्य्) राहिले नसावे. आजच्या अँग्री आजोबा आणि अँग्री पणजोबांनी एकमेकांवर उधळलेली मुक्ताफळे वाचण्यातच आजच्या वाचकांना रस वाटत असावा आणि त्यामुळे सव्वाशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या अँग्री यंग मॅनला महत्व देण्याचे कारण उरले नसावे.

इतर कोणाचे कांही असो, वासुदेव बळवंत फडके हे नांव वाचताक्षणीच त्यांचा अद्भुत जीवनपट सर्रकन माझ्या डोळ्यासमोरून उलगडत गेला. माझ्या लहानपणी आम्हाला वर्षातून एक किंवा दोन चित्रपट दाखवले जात असत. ते एक तर देवदेवतांच्या कथानकांवरचे पौराणिक चित्रपट असत किंवा भक्तांच्या मदतीसाठी धावून आलेल्या ईश्वराने केलेले चमत्कार त्यात दाखवले जात. त्यातल्या ट्रिकसीन्सवर आम्ही बेहद्द खूष होत असू. त्या काळातच मला वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावरचा जुना सिनेमा पहायला मिळाला. कदाचित इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असा तो अपवाद असल्यामुळे मनाला जास्त भिडला आणि कायमचा लक्षात राहिला. त्यानंतर पन्नास वर्षांनी तिस-या पिढीतल्या कलाकारांनी निर्माण केलेला त्याच विषयावरचा चित्रपट अलीकडे पाहिला. अर्थातच या वेळी तो जास्त समजला आणि अधिक परिणामकारक वाटला. याशिवाय अधून मधून वाचलेले लेख, ऐकलेली भाषणे वगैरेंमधून वेळोवेळी त्यांच्याबद्दल माहिती मिळत गेली होतीच.

पनवेलजवळ असलेल्या शिरढोण गांवात वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म सन १८४५ च्या ४ नोव्हेंबर रोजी झाला. तोंपर्यंत पेशवाईचा अस्त झाला होता आणि ब्रिटीश राजवटही पूर्णपणे प्रस्थापित झालेली नव्हती. त्या स्थित्यंतराच्या काळात शालेय शिक्षणाचे काय स्वरूप होते कोण जाणे, पण जे कांही होते ते मुळातच बंडखोर वृत्तीच्या असलेल्या लहान वासुदेवाला पटले नाही आणि त्याने आपले शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि त्यापेक्षा व्यायाम, कुस्ती वगैरे माध्यमातून शरीरसंवर्धनाला महत्व दिले. पण पुढे त्याला नोकरी करावीशी वाटली किंवा त्याची गरज भासली यामुळे तो पुण्याला जाऊन इंग्रजांच्या लष्कराच्या मुलकी सेवेत काम करायला लागला. सन १८७० च्या सुमारास त्या काळातले भारतीय नेते सनदशीर मार्गाने ब्रिटीशांचे मन वळवून जनतेसाठी कांही सवलती मिळवून घेण्याच्या प्रयत्नात होते. ब्रिटीश राजवटीत जनतेवर होत असलेला अन्याय त्यांच्या लिहिण्या बोलण्यातून व्यक्त होत होता. अंग्री यंग मॅन वासुदेवाला मात्र हे सहन होण्यासारखे नव्हते. तरीही संयम बाळगून त्याने आपली चाकरी चालू ठेवली, पण त्या बरोबरच ब्रिटीशांच्या राजवटीची बलस्थाने आणि त्यातले कमकुवत दुवे यांची बारकाईने पहाणी केली. एका अधिका-याच्या आंकडूपणामुळे त्याला आपल्या मरणासन्न आईची अखेरची भेट घेता आली नाही हा व्यक्तीगत घाव मात्र त्याला सहन झाला नाही आणि ब्रिटीशांचे अन्याय्य राज्यच उलथून पाडण्याचा चंग बांधला.

शहरात राहणा-या सुशिक्षित किंवा पुढारलेल्या समाजाकडून त्याच्या प्रत्यक्ष कृतीला भरीव पाठिंबा मिळण्याची शक्यताच नव्हती. जनमानसावर प्रभाव असलेल्या तत्कालीन संतमहंतांची भेटही घेऊन पाहिली, पण त्याचा उपयोग झाला नाही. रानावनातल्या तथाकथित मागासलेल्या जमातीतल्या लोकांची टोळी बनवून त्याने आपल्या संघर्षाची सुरुवात केली. इंग्रजांशी लढाई करायची असेल तर त्यासाठी सैन्याची उभारणी करायला हवी, त्यांच्या हाती शस्त्रे देण्यासाठी पैशाची तरतूद व्हायला हवी. तो कोठून आणणार? ब्रिटीशांबरोबर लढण्यासाठी त्यांचाच पैसा लुबाडण्याचे वासुदेवाने ठरवले आणि सरकारी तिजोरीवर डल्ला घातला. जनतेकडून लुबाडलेला कर जनतेच्या स्वातंत्र्ययुध्दासाठी कामी आणण्यात कांही गैर नाही अशी तात्विक बैठकही त्या मागे होती. मिलिटरीमध्ये नोकरी करतांना आलेल्या अनुभवाचा आणि मिळवलेल्या माहितीचा चांगला उपयोग करून घेऊन त्याने अशा गनिमी काव्याने हल्ले करण्याचा सपाटाच लावला. त्याला पकडून देण्यासाठी इंग्रज सरकारने बक्षिस जाहीर केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी थेट गव्हर्नर पासून अन्य इंग्रज अधिका-यांना पकडून देण्यासाठी वासुदेव बळवंताने बक्षिसे जाहीर केली. यावरून त्याच्या झुंजार स्वभावाचे दर्शन घडते.

पुण्याच्या परिसरातल्या जंगलामध्ये त्याने आपले ठाणे बनवले होते. सरकारी तिजोरी लुटण्यामागचा मुख्य उद्देश समजून न घेता त्या लुटीतूनच आपला वाटा मागायला कांही सहका-यांनी सुरुवात केली तेंव्हा निराश होऊन वासुदेव बळवंताने तात्पुरते दक्षिणेकडे स्थलांतर केले आणि तत्कालीन हैदराबाद संस्थानात जाऊन रोहिले आणि अरबांची फौज जमवली. महाराष्ट्रात तसेच भारताच्या इतर भागात जमवाजमव करून इंग्रजांवर अनेक बाजूंनी हल्ला करण्याची मोठी योजना त्याने आंखली होती. पण आता ब्रिटीश सरकार सावध झाले होते. त्यांचे अधिकारी हात धुवून वासुदेवाच्या मागे लागले. दोघांच्या फौजांमध्ये एक चकमक सुध्दा झाली. अखेर जंगलातून मार्गक्रमण करत असतांना त्याच्याच एका सहका-याने केलेल्या दगाबाजीमुळे वासुदेव बळवंत पकडले गेले. त्यांच्यावर पुण्यातल्या कोर्टात खटला चालला आणि त्यांना तुरुंगवासासाठी दूर एडनला धाडण्यात आले. तिथल्या त्या तुरुंगातून पलायन करण्यातही ते यशस्वी झाले होते, पण परमुलुखात असल्यामुळे पुन्हा पकडून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यानंतर मात्र सुटकेची आशा न उरल्यामुळे त्यांनी आमरण उपोषण करून प्राणत्याग केला. अशा प्रकारे या अलौकिक पुरुषाची प्राणज्योत त्याने स्वतःच मालवली.

No comments: