आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल लिहिण्याची प्रेरणा मला त्यांच्या पुण्यतिथीच्या तारखेला मिळाली हा जसा एक योगायोग होता. त्याचप्रमाणे आज शिवजयंतीच्या दिवशी मी या विषयावर पुढे लिहिणार आहे हा आणखी एक योगायोग जुळून आला आहे. वासुदेव बळवंतांची कार्यपध्दती पाहिली तर त्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनावरून स्फूर्ती मिळाली असणार असा विचार मनात येतो. जुलमी परकीय राज्यकर्त्यांनी केलेला अन्याय सहन न करणे, त्याचा प्रतिकार करण्यासाठी न डगमगता खंबीरपणे उभे राहणे, तळागाळातल्या गरीब व सामान्य जीवन जगणा-या माणसांना प्रेरित करून आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्यांना निष्ठेने कामाला लावणे, शत्रूला एकापाठोपाठ एक धक्के देत राहणे अशासारखी त्यांच्या जीवनातील उदाहरणे हे सुचवतात.
वासुदेव बळवंतांच्या जीवनाला आता जवळ जवळ सव्वाशे वर्षे लोटून गेली आहेत. या दरम्यान भारतातली परिस्थिती इतकी बदलली आहे की आज आपण त्या जुन्या कालखंडाची कल्पनासुध्दा करू शकत नाही. मी जे कांही वाचले, ऐकले किंवा पडद्यावर पाहिले आहे ते सगळे अलीकडील लोकांनी लिहिले, सांगितले आणि दाखवले आहे. त्या लोकांनी ते कशाच्या आधारावर केले होते याची मला सुतराम कल्पना नाही. हे असे लिहिण्यामागे तसेच एक कारण आहे.
हा लेख लिहिण्यापूर्वी मी आपल्याकडल्या माहितीची उजळणी करण्यासाठी आंतरजालावर थोडेसे उत्खनन केले. त्यात मला जी माहिती सापडली ती म्हणावे तर जराशी मनोरंजक आणि खरे तर चिंताजनक वाटली. विकीपीडिया या आजकाल थोडी फार मान्यता प्राप्त झालेल्या कोषावर दिलेली माहिती वाचून माझ्या मनात वासुदेव बळवंतांची जी प्रतिमा होती तीच दृढ झाली. त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा तारीखवार तपशील मिळाला. मात्र वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे गुरू तसेच अनुयायी यांचा जातीनिहाय उल्लेख त्या लेखात केला होता. सव्वाशे वर्षांपूर्वी त्या गोष्टीला कदाचित प्रचंड महत्व होते. आजसुध्दा कांही लोकांच्या मनात त्याविषयी तीव्र भावना कदाचित असतील आणि त्यामुळेच ते विस्ताराने लिहिले गेले असेल. पण मला ते योग्य वाटले नाही. अमक्या तमक्या जातीचा असा शिक्का मारण्याऐवजी समाजातील विशिष्ट स्तरावरील लोकांनी त्यानुसार प्रतिसाद दिला असावा असे मला वाटते. म्हणून माझ्या लेखात मी जातीनिहाय उल्लेख केले नाहीत.
या विषयावरील दुसरा लेख मला एका हिंदुत्ववादी संकेतस्थळावर वाचायला मिळाला. त्या लेखातील जवळजवळ प्रत्येक वाक्यात हिंदुत्वाचा उल्लेख घुसवला आहे. "ब्रिटीशांनी हिंदू लोकांवर अत्याचार केले". "अन्याय सहन न करण्याच्या हिंदू परंपरेनुसार वासुदेव बळवंत त्याच्या विरोधात दंड ठोकून उभे राहिले", "हिंदूराष्ट्र उभे करण्याचा ध्यास त्यांनी घेतला", "ज्या हिंदू मराठा लोकांनी अफगाण आणि मोगलांचे कंबरडे मोडले अशा मर्द मराठ्यांची सेना उभारून त्यांनी इंग्रजांना बेजार केले", "त्यासाठी अमक्या देवळात जाऊन देवदर्शन घेतले आणि तमक्या देवळात मुक्कामाला असतांना आपली रोजनिशी लिहिली" वगैरे लिहून झाल्यानंतर अखेरीस "एका मुसलमानाने त्यांना पकडून दिले" असे गरळ ओकून "वासुदेव बळवंत फडके हे आद्य हिंदू क्रांतीकारक होते" असा शोध लावला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात मुसलमान शिपाईसुध्दा हिंदू सैनिकांच्या खांद्याला खांदा भिडवून लढले होते ही गोष्ट सोयिस्कररीत्या विसरून वासुदेव बळवंत यांनी मराठे आणि शीख लढवय्यांची परंपरा सांभाळली असे प्रतिपादन या लेखात केले आहे.
वासुदेव बळवंत फडके यांच्या नांवाने भारत सरकारने काढलेल्या तिकीटाचा शोध घेता घेता मी विशिष्ट उपजातीच्या संकेतस्थळावर जाऊन पोचलो. त्यात त्या उपजातीतील लोकांच्या नांवाने काढलेल्या टपाल तिकीटांची चित्रे मिळाली. त्यात दाखवलेल्या बहुतेक व्यक्तींनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा अजरामर ठसा उमटवला आहे. त्या महात्म्यांनी आपले सर्व जीवन जातीयतेचे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नात घालवले होते. त्यातल्या कोणाला तेल्यातांबोळ्यांचा पुढारी म्हणून हिणवले गेले तर कोणाला जातीतून बहिष्कृत करण्यात आले होते. समाजातून होणा-या विरोधाकडे लक्ष न देता आपल्या सदसद्विवेकबुध्दीला जागून त्यांनी आपले जीवितकार्य चालवले होते. वासुदेव बळवंतांची विचारसरणी देखील पुरोगामीच होती. पण विशिष्ट आडनांव असल्यामुळे त्या सर्वांची गणना एवढ्या संकुचित विश्वात व्हावी?
अशा प्रकारच्या लेखांचे वाचन करून भूतकाळात डोकावणारी भविष्यकाळातली पिढी आणखी पन्नास वर्षांनंतर आपल्या इतिहासातल्या महान व्यक्तींना किती खुजे ठरवेल ?
No comments:
Post a Comment