लहानपणी उन्हाळ्य़ाच्या सुटीत रोज सकाळी आम्ही सगळी मुले गांवाबाहेर असलेल्या एकाद्या मळ्यातल्या विहीरीत पोहायला जात असू. आमच्या गांवात तरणतलाव नव्हता आणि कृष्णा नदी चार मैल दूर अंतरावर होती. गांवातल्या विहिरींचे पाणी लोकांच्या रोजच्या उपयोगात येत असल्यामुळे गणपती विसर्जन सोडून इतर कधीही कोणीही त्यात उतरत नसे. त्यामुळे आधी पोहायला शिकण्यासाठी आणि नंतर त्याची मजा घेण्यासाठी आम्हाला गांवाबाहेरच जावे लागे. पूर्वी या सगळ्या विहिरींवर बैलाने ओढायची मोटच चालत असे. उन्हाळ्याच्या दिवसात मळ्यात फारशी पिके नसल्यामुळे तीसुध्दा क्वचितच चालतांना दिसे. पुढे एका विहिरीवर पंपसेट बसवला गेला. तेंव्हा त्याचे सर्वांना प्रचंड अपरूप वाटले.
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच्या त्या काळात आमच्या जमखंडी संस्थानावर एका कांहीशा पुरोगामी विचारांच्या आणि थोड्या प्रजाहितदक्ष अशा राजाची राजवट होती. गांवाला वीज आणि पाणीपुरवठा करण्याची तत्कालीन उपलब्धतेनुसार त्याने चांगली सोय करून ठेवली होती. गांवाला वीजपुरवठा करणारे एक पिटुकले पॉवर हाऊस होते. तेलाच्या इंजिनावर चालणारा जनरेटर सेट त्यात बसवलेला होता. संस्थाने खालसा झाल्यानंतर त्याला कोणी वाली उरला नसावा. बरेच वेळा ते पॉवर स्टेशन बंदच असायचे. अधून मधून कधी कधी ते अनियमितपणे चालायचे. त्यातून डीसी (डायरेक्ट करंट) विजेचा पुरवठा होत असे. व्होल्टेज हा शब्द कोणी ऐकलेला नव्हता. संध्याकाळी अतीशय मंद दिवे लागत तेंव्हा विजेचे प्रेशर कमी आहे आणि मध्यरात्री ते प्रखर उजेड देत तेंव्हा ते प्रेशर फार वाढले आहे असे समजले जात असे. तांत्रिक दृष्ट्या योग्य परिभाषा वापरली गेली नसली तरी कॉमन सेन्सला पटणारा हा अर्थ बरोबरच होता. विजेवर चालणारे कोणतेही उपकरण, अगदी पंखादेखील, कोणाच्या घरी नव्हता. कदाचित एकाद्याने एकादे यंत्र आणले असले तरी त्या अनिश्चित आणि कमीजास्त दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे ते लवकरच बंद पडले असेल. पुढे अनेक वर्षानंतर आमच्या गांवात एक मोठा ट्रान्स्फॉर्मर बसवला गेला आणि ग्रिडमधून एसी विजेचा पुरवठा सुरू झाला. यातला फरक समजावून देणारा कोणीच 'विंजनेर' गांवात नसल्यामुळे त्या वेळी आम्हाला त्याचा फारसा उलगडा झाला नाही. गांवाबाहेर असलेल्या शेतात वीजपुरवठा असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी पाहिलेला पहिला पंपसेट डिझेल इंजिनाला जोडलेला होता.
गांवापासून चार पांच मैल अंतरावर कृष्णानदीवर छोटासा बंधारा घालून एक बारमहा पाणी साठवणारा डोह बनवला होता आणि पंपाच्या सहाय्याने ते पाणी गांवालगतच्या मेरूगिरीलिंगप्पा डोंगराच्या माथ्यावर बांधलेल्या टांकीत नेले जात असे. त्या टांकीमधून ते घरोघरी नळाद्वारे येत असे. हे पंपिंग स्टेशन कांही मला कधीच पहायला मिळाले नाही, गिर्यागोहण करून आम्ही बरेच वेळा टांकीवर मात्र जात असू. धाब्याची घरे असल्यामुळे छतावर टाकी बांधण्याची कल्पनाही कोणी करत नसे. नळातून आलेले पाणी जमीनीलगत असलेल्या हौदात साठवून वापरले जात असे. त्यामुळे पाण्याचा पंप हा प्रकार मला गांवाबाहेर असलेल्या मळ्यातच पहिल्यांदा दिसला.
घरी पाहिलेल्यी रॉकेलच्या किंवा स्टोव्हच्या पंपापेक्षा हा खूपच निराळा दिसत होता. एका बाजूने त्याला जोडलेला लांबलचक पाईप विहिरीत खोलवर नेऊन सोडला होता आणि दुस-या बाजूचा छोटासा पाइपाचा तुकडा एका उथळ हौदात सोडून ठेवला असायचा. पंपाला जोडलेले इंजिन सुरू केले की विहीरीतले पाणी आपोआप त्या हौदामध्ये बदाबदा कोसळू लागायचे. तिथून पुढे पाटांमधून वळवत वळवत ते पाणी पिकांना दिले जात असे. इंजिन सुरू करण्यासाठी ते हँडल मारून फिरवले जाई. त्याआधी पंपात वरून पाणी ओतून तो पाण्याने भरला असल्याची खात्री केली जात असे. इंजिन सुरू होऊन भकाभका धूर काढू लागले की पंपातून बदाबदा पाणी बाहेर येत असतांना पहायला खूपच मजा वाटत असे. मग ते पाणी हाताने एकमेकांच्या अंगावर उडवण्याचा खेळ सुरू होत असे. मुले जरा जास्तच दंगा करत आहेत असे वाटले तर त्या मळ्याचा मालक दमदाटी करून त्यांना पिटाळून देत असे.
. . . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment