Saturday, February 27, 2010

एकावर एक ....




एका मोठ्या कंपनीच्या डायरेक्टरच्या सेक्रेटरीची जागा अचानक रिकामी झाली. त्या महत्वाच्या जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी कंपनीमधल्या व्यक्तींमध्ये चुरस, चढाओढ, खटपटी लटपटी, दबावतंत्र वगैरे सुरू व्हायच्या आधीच बाहेरून एक हुषार, चुणचुणीत आणि कार्यक्षम नवी सेक्रेटरी निवडून तिला आणायचे त्या डायरेक्टरने ठरवले आणि प्लेसमेंट सर्व्हिस चालवणा-या आपल्या मित्राला फोन करून चोवीस तासात ही निवड करून द्यायला सांगितले. हे आव्हान स्वीकारून ती एजन्सी लगेच कामाला लागली. अनेक उमेदवारांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे होतीच. त्यांची छाननी करून टेलीफोन, एसएमएस, ईमेल वगैरे माध्यमांतून चाळीस पन्नास जणींना दुसरे दिवशी परीक्षा आणि मुलाखतीसाठी बोलावून घेतले. विविध विषयांमधील प्रश्नांचे संच तयार होतेच, त्यातून निवडक प्रश्न घेऊन त्याचा वेगळा संच तयार केला. परीक्षण करण्यासाठी आणि मुलाखत घेण्यासाठी तज्ज्ञ मंडळींना बोलावून घेतले. पन्नास मल्टीमीडिया कांप्यूटर तपासून घेऊन सर्व्हरला जोडून दिले. अशी सगळी जय्यत तयारी त्या दिवशीच करून ठेवली.

दुसरे दिवशी ठरलेल्या वेळी तीस पस्तीस मुली हजर झाल्या. त्यांना परीक्षेला बसवून त्या मित्राने डायरेक्टरला फोन लावला,"खूप उमेदवार आलेले आहेत. त्यांची परीक्षा तासभर चालेल. त्यानंतर विश्रांती आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. त्यात तासभर जाईल. तोंपर्यंत आमची तज्ज्ञ मंडळी परीक्षण करून योग्य मुली निवडतील. त्यानंतर या मुलींच्या मुलाखती घेण्यासाठी तुम्ही येऊ शकाल कां? म्हणजे त्या एकदा तुमच्या नजरेखालून जातील."
"छे! माझ्याकडे एवढा वेळ नाही. हे कामही तुम्हीच करायला पाहिजे."
"ठीक आहे. आम्ही त्या सर्वांचे तांत्रिक कौशल्य तपासून पाहू. आमचे मानसशास्त्रतज्ज्ञ त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेतील. त्यात चांगले वाईट असे नसते, तुम्हाला काय उपयोगाचे आहे ते तुम्हाला ठरवावे लागेल. त्यामुळे तुम्ही येऊन एकदा त्यावर फायनल निर्णय दिलात तर ते बरे होईल."
"ठीक आहे, पण माझ्याकडे फक्त पाच दहा मिनिटे एवढाच वेळ आहे."
"हरकत नाही. आमचे तज्ज्ञ प्रत्येकीला फक्त एकच प्रश्न विचारून शितावरून भाताची परीक्षा करतील."
"ओ के"

चांचणी परीक्षा देत असलेल्या प्रत्येक मुलीला एक वेगळा संगणक दिलेला होताच, कानाला हेडफोन लावले होते आणि गळ्यात माइक अडकवला होता. प्रश्नपत्रिकेतचे स्वरूप अजब होते. प्रश्न वाचून त्याखाली उत्तरे देणे होतेच, शिवाय एकादा प्रश्न मॉनिटरवर दिसायचा त्याचे उत्तर माईकवर सांगायचे तर एकादा आदेश हेडफोनवर विचारला जायचा त्याप्रमाणे सांगितलेला प्रोग्रॅम सुरू करून त्यावर दिलेली कृती करायची. एकादा प्रश्न वाचल्यानंतर अदृष्य होऊन जायचा तर एकादे उत्तर लिहिण्याची खिडकी फक्त कांही सेकंदांसाठी उघडी रहात असे. कांही प्रश्नाचे उत्तर एका शब्दात द्यायचे होते तर दिलेल्या एकेका शब्दावर तीन चार वाक्ये लिहायची होती. सामान्य ज्ञान, ऑफीस प्रोसीजर्स, हिशोब, भाषा, व्याकरण, यांसारख्या विषयांची चाचपणी त्यात होतीच, शिवाय संगणक ज्ञान, शॉर्टहँड, टाइपिंग, वाचन, कथन, विवेचन, आकलनशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, विचारशक्ती, विनोदबुध्दी, हजरजबाबीपणा वगैरेचासुध्दा कस लागत होता. त्यातला एक प्रश्न मानसशास्त्रातला होता.

एक तास संपल्यावर सर्वांनी हुःश केले. या मॅरॅथॉननंतर त्यांना विश्रांतीची नितांत गरज होतीच. थोडे फ्रेश होऊन सा-या रिफ्रेशमंटसाठी गोळा झाल्या. गप्पांसाठी त्यांना एक छान विषय आयता मिळाला होता. कोणी त्या परीक्षेत विचारलेल्या नमूनेदार प्रश्नांचे कौतुक करत होती तर कोणी त्यांची टिंगल करत होती. कोणी हेडफोनवर ऐकलेल्या आवाजाची नक्कल करून दाखवत होती तर कोणी आपण माईकवर कशी गंमतीदार उत्तरे दिली याचे प्रात्यक्षिक दाखवत होती. कोणी बिनधास्तपणे बोलत होत्या तर हे बोलणेसुध्दा टेप होत असेल या धास्तीने कोणी आपण खाण्यात मग्न असल्याचे दाखवून बोलणेच टाळत होत्या.

परीक्षकांनी प्राथमिक फेरीमधून पंधरा सोळा जणींना निवडून मुलाखतीसाठी थांबवून ठेवले आणि इतरांना निरोपाचा नारळ दिला. मुलाखत घेणा-यांनी चार पांच प्रश्न विचारून सेक्रेटरीचे काम करण्यातले त्यांचे प्राविण्य तपासून पाहिले. त्यात अॅपॉइंटमेंट्स देणे किंवा घेणे, डायरी ठेवून कामाचे नियोजन करणे, पुढच्या कामाची सूचना आणि वेळेवर आठवण करून देणे वगैरेंचा समावेश होता आणि एकंदर व्यक्तीमत्व, चालणे बोलणे, त्याती अदब, मार्दव, हांवभाव वगैरे पाहून घेतले. त्यातून पाचसहा जणींची अखेरच्या फेरीसाठी निवड झाली.

ठरल्याप्रमाणे डायरेक्टरसाहेब आले आणि एकेकजणीला बोलावून फक्त एकच प्रश्न विचारला गेला. तो होता," १ आणि १ मिळून किती होतील?"
"०, १, २, ३, ११" अशी या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे आली आणि त्यावर तज्ज्ञांची चर्चा सुरू झाली.

" ० उत्तर देणारी मुलगी नकारात्मक विचार करणारी आहे"
"म्हणजे भांडखोर, एकमेकाशी क्रॉस करून दोघांनाही रद्द करणारी"
"किंवा विध्वंसक प्रवृत्तीची"
"कदाचित अखेरच्या फेरीत असला (?) प्रश्न विचारला यावर तिचा हा मार्मिक शेरा असेल"

"बरं, १ उत्तर देणारी मुलगी स्वतःला विरघळून टाकणारी आहे."
"म्हणजे ती स्वतःचे अस्तित्वच नाकारणार!"
"उलट कदाचित ती दुस-यालाच खाऊन टाकणारी निघाली तर?"
"दोघांनी मिळून एकदिलाने काम करायचे असे ती सुचवते आहे."
"किंवा दोघांच्या वाटा एकाच दिशेने जात आहेत असे..."

" २ असे उत्तर देणारी मुलगी सरळमार्गी दिसते."
"सरधोपट विचार करणारी, अगदी सामान्य कुवतीची.."
"किंवा दोघे मिळून दुप्पट काम होईल असे तिला म्हणायचंय्"
"किंवा दोन वाटांचे पर्याय सापडतील असे.."

" ३ उत्तर देणारी रोमँटिक दिसते आहे"
"किंवा सृजनशील"
"तिला सिनर्जी माहीत आहे"
"नाही तर तुला ही नको, मलाही नको, घाल तिस-याला असा विचार करत असेल"

"११ सांगणारी खूप महत्वाकांक्षी दिसते"
"किंवा कल्पनेच्या भरारीत रमणारी.. "
"किंवा एकावर एक अकरा चे निर्बुध्दपणे पाठांतर करणारी"

तोंडी उत्तरांचा अर्थ लावून झाल्यानंतर चांचणी परीक्षेत दिलेल्या मानसशास्त्रीय प्रश्नाच्या उत्तरांवर चर्चा सुरू झाली. एक या अंकाचा एक ठळक व मोठा आणि एक लहान व पुसट आंकडा देऊन त्यांना पाहिजे तशा प्रकाराने स्क्रीनवर मांडायला त्या प्रश्नात सांगितले होते.

"या चित्रातला लहान १ दूर उभा आहे. ही मुलगी फार संकोची स्वभावाची वाटते."
"किंवा सावधगिरी बाळगून राहणारी"
"किंवा पुढच्यावर दुरून लक्ष ठेवणारी"

"हा १ पुढच्या १ ला चिकटला आहे. ही मुलगी पावलावर पाऊल टाकून अनुकरण करणारी आहे."
"किंवा पाठीराखीण .. "
"किंवा पाठीमागे लागणारी.."
"म्हणजेच पाठपुरावा करणारी .."

"यातल्या लहान १ चे डोके मोठ्या १ च्या डोक्याच्या पातळीवर ठेवले आहे. ही समतावादी दिसते."
"म्हणजेच न्यूनगंड न बाळगणारी .."
"कदाचित स्वतःची उन्नती साधू पाहणारी असेल"

"यातला लहान १ मोठ्या १ च्या डोक्यावर उभा आहे. ही डोक्यावर चढून बसणारी असणार"
"म्हणजे अक्षरशः एकावर एक! वन अप(वू)मन !"
"दोघे मिळून जास्त उंची कशी गाठू शकतात हे ती दाखवते आहे."
"खांद्यावर उभे राहणा-याला अधिक दूरवरचे दिसते हे न्यूटनचे वाक्य तिला ठाऊक आहे"

"यातला लहान १ मोठ्या १ च्या पुढे दाखवला आहे. ही मुलगी कोणत्याही बाबतीत पुढाकार घेणारी आहे."
"समोरून येणारा हल्ला स्वतःच्या अंगावर घेण्याची तिची धडाडीची तयारी आहे."
"अनावर उत्सुकतेपोटी ती पुढे जाणारी दिसते"
"आपल्या पाठीशी कोणी आहे याचा तिला विश्वास वाटतो आहे."
"किंवा तिच्याकडे जबर आत्मविश्वास आहे."

"या चित्रातल्या लहान १ ने मोठ्या १ ला चाट मारून आडवे पाडले आहे. ही खट्याळ दिसते."
"किंवा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तिला दाखवायचे आहे."
"ती तर खाली पडलेल्या मोठ्या १ ला मदत करायला जवळ आली आहे, सुस्वभावी दिसते."

"या चित्रातला लहान १ मोठ्या १ च्या पाठीवर ङभा आहे."
" दुर्गामाता दिसते आहे."
"ती कांहीच नाही, या चित्रातली पहा. यातल्या लहान १ ने मोठ्या १ ला साफ उताणे पाडले आहे."
" आणि त्याच्या छाताडावर उभा आहे."

"आता ही दोन्ही प्रकारची उत्तरे एकत्र पहायला पाहिजेत."

ही चर्चा थांबवून डायरेक्टरने विचारले,"या सगळ्या मुलींना टाइपिंग, शॉर्टहँड येते ना ?"
"हो. सर्वांची त्यात चांगली गती आहे."
"आणि सगळ्याजणी ते बिनचूक करतात."
"अवघड जोडाक्षरे व्यवस्थित लिहितात."
"व्याकरणातले नियम नीट पाळतात."
"त्यांच्याकडे पुरेशी शब्दसंपत्ती (व्होकॅब्युलरी) आहे."

"डायरी कशी ठेवायची हे त्यांना माहीत आहे ना?"
"हो. अॅपॉइंटमेंट्स कशा द्यायच्या हे त्या जाणतात."
"कुणाला ती लगेच द्यायची आणि कुणाला टिंगवायचे हे सुध्दा .. "
"कोणती अॅपॉइंटमेंट घेणे जास्त महत्वाचे आहे याची जाण त्यांना आहे."
"आणि ती कशी मिळवायची असते याची पण.. "

"या सर्वांना नेहमीचे काँप्यूटर प्रोग्रॅम्स येतात ना?"
"हो. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट वगैरे एमएस ऑफीसची माहिती यातल्या सगळ्या मुलींना आहे."
"ई-मेल उघडणे, त्याचे उत्तर पाठवणे, त्याची अटॅचमेंट्स पाहणे आणि जोडणे वगैरे कामे या सर्वजणींना येतात."
"इंटरनेटवर ब्राउजिंग करून आवश्यक ती माहिती शोधायला पण येते."

"झालं तर मग. ही लाल स्कर्ट आणि सोनेरी टॉप घालून आलेली पोरगी बरी वाटते. तिला जरा चांगले गुण जोडायचे आणि ते माझ्या ऑफीसला कसे उपयोगी ठरतील हे पहायचे काम तुमचे. तेवढे करून तिच्या नांवाने शिफारस देऊन टाका आणि तिला लगेच कामावर हजर व्हायला सांगा.


"?" "?" "?" "?" "?" "?" "?" "?" (कमिटी मेंबर्सच्या चेहे-यावरील भाव)

हा लेख हास्यगारवा या होळीनिमित्य काढलेल्या ईविशेषांकावर प्रसिध्द झाला आहे.
या विशेषांकाचा दुवा


हास्यगारवा

पंपपुराण भाग ७


सेंट्रिफ्यूगल पंप सुरू केला की त्यातले चक्र फिरू लागते, ते पंपाच्या पात्रातील पाण्याला गोल फिरवते आणि ते पाणी फिरत फिरत पंपाबाहेर पडते, वातावरणाच्या दाबामुळे विहिरीतले पाणी पाइपातून वर चढून पंपात झालेली रिकामी जागा भरते आणि गोल गोल फिरत ते सुध्दा पंपाबाहेर पडते. अशा प्रकारे पाण्याचा ओघ चालत राहतो हे आपण मागील भागात पाहिले. भूमीगत पाण्याला उपसून जमीनीवर आणण्यासाठी माणसाला पडणारे कष्ट अशा प्रकारे वाचल्यानंतर पंपाच्या क्षमतेचा उपयोग करून अनेक नव्या गोष्टी माणूस करू लागला. पूर्वी ज्या भागात पाटाचे पाणी जाऊ शकत नव्हते अशा जमीनींना पाणीपुरवठा करून त्या लागवडीखाली आणल्या, ठिबकसिंचन आणि फवारासिंचनाने झाडाच्या मुळांना किंवा त्यांच्या शेंड्यावर, जिथे हवे तिथे पाणी देता योऊ लागले, बहुमजली इमारती बांधून त्यांच्या वरच्या मजल्यापर्यंत पाणी देण्याची सोय झाली, गांवे, शहरे यांच्यासाठी पाणीपुरवठ्याच्या योजना करून नळावाटे घरोघरी पाणी पोचवले गेले, लग्नसमारंभासारख्या प्रसंगी सजावटीसाठी तात्पुरते कृत्रिम कारंजे थुईथुई नाचवले जाऊ लागले, वगैरे वगैरे अनंत कामे पंपामुळे शक्य झाली. कारखान्यांमध्ये होत असलेला पंपांचा वापर पाहिला तर इंजिनानंतर पंप हेच सर्वाधिक उपयोगाचे यंत्र आहे असे म्हणता येईल.

ज्याप्रमाणे तलवारीने दाढी करता येत नाही किंवा रेझरने भाजी चिरता येत नाही, त्यासाठी वेगवेगळी साधने वापरावी लागतात, त्याच प्रमाणे लहानमोठी निरनिराळी कामे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकारांच्या पंपाचा उपयोग केला जातो. पण योग्य अशा पंपाची निवड करण्यासाठी सर्वात आधी दोन मुख्य बाबी पहतात. पहिली म्हणजे दर मिनिटाला किती गॅलन किंवा दर सेकंदाला किती लीटर किंवा घनमीटर पाणी त्याने पुरवायला हवे. याला पंपाची क्षमता किंवा कपॅसिटी म्हणतात. दुसरी गोष्ट अशी की ते पाणी किती उंच उचलण्याची गरज आहे. याला हेड असे म्हणतात. पंपापासून जितक्या उंचावर पाणी चढवायचे आहे तेवढा पाण्याचा दाब त्यावर पडतो. त्यामुळे पंपाचे हेड आणि पाण्याचा दाब हे समानार्थी शब्द आहेत.

सेंट्रिफ्यूगल पंपाचे कार्य पाहता असे लक्षात येईल की त्याच्या इंपेलरचा व्यास जितका जास्त असेल तितक्या जास्त वेगाने पाणी परीघाकडे फेकले जाते आणि ते अधिक उंच जाऊ शकते. यामुळे जास्त हेड हवे असेल तर इंपेलरचा व्यास मोठा घेतात. इंपेलरची रुंदी वाढवली तर जास्त पाणी त्यात सामावले जाते आणि कपॅसिटी वाढते. त्याचा फिरण्याचा वेग वाढवला तर दर मिनिटाला अधिक पाणी अधिक वेगाने बाहेर फेकले जाईल म्हणजे हेड आणि कपॅसिटी या दोन्ही गोष्टी वाढतील. याशिवाय कांही उपाय करून पंपाची कार्यक्षमता आणि उपयोग वाढवता येतो, पण या सर्व गोष्टींना मर्यादा असतात. त्यांचा विचार करून आणि मुख्य म्हणजे आपली गरज कमीत कमी खर्चात कशी भागवता येईल या दृष्टीने पंपाची निवड केली जाते. बैलगाडीला हत्ती जोडण्यात कांही फायदा नसतो, त्याप्रमाणेच गरजेहून जास्त क्षमतेचा पंप वापरल्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते. पण भरलेली बैलगाडी माणूस ओढू शकत नाही, ती जागच्या जागी अडून बसते. हे ही बरोबर नाही. यामुळे पंपाची निवड विचारपूर्वक करावी लागते.

दुस-या बाजूने विचार केला तर आपली गरज वारंवार बदलण्याची शक्यता असते. आणि त्यासाठी रोज वेगवेगळा पंप बसवता येत नाही. त्यामुळे जो पंप आपण बसवू त्याने आपली कमीत कमी पासून जास्तीत जास्त जेवढी गरज असेल ती पुरी करता येईल हे पहावे लागते, किंवा तो पंप ज्या रेंजमध्ये काम करू शकेल त्यानुसार आपल्या गरजा ठरवाव्या लागतात.

. . . . . (क्रमशः)

Thursday, February 25, 2010

विक्रमादित्य .... रेकॉर्डकर


जगज्जेता, विक्रमादित्य, महाराष्ट्रभूषण, खेलरत्न, पद्मविभूषण, मास्टर ब्लास्टर ....... अशी केवढी मोठी बिरुदावली सचिन तेंडुलकरच्या नांवाला लागलेली आहे! काल परवा त्यात एक नवीन भर पडलेली पाहिली. कोणीतरी त्याचे आडनांवच 'रेकॉर्डकर' असे ठेऊन दिले आहे. तो एका मागोमाग एक नवनवे रेकॉर्ड करत आला आहे आणि करत राहणारच आहे, "रेकॉर्ड कर" असे त्याला सांगायची मुळी गरजच नाही.

अर्थशास्त्राच्या खालोखाल क्रीडाजगतात आकडेवारीला खूप महत्व दिले जाते. धांवणे, पोहणे, लांब उडी, उंच उडी, भाला फेक, गोळा फेक वगैरे सगळ्या क्रीडाप्रकारात स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकारची आकडेवारी जमवली जात असते. फूटबॉल आणि हॉकीसारख्या सांघिक खेळांमध्ये कोणत्या संघाने किती सामन्यात भाग घेतला, त्यातले किती जिंकले, किती हरले वगैरेंचा हिशेब ठेवला जातो. त्याबरोबर त्या सामन्यांमध्ये किती गोल केले वगैरेंचा थोडासा तपशीलही असतो. पण इतर सर्व खेळांमध्ये मिळून जेवढी आकडेवारी जमा होत नसेल एवढी फक्त क्रिकेटच्या खेळात केली जाते. किती सामने खेळले, जिंकले, हरले वगैरे अगदी गौण बाब झाली. कोणकोणत्या देशांबरोबर कुठे कुठे ते खेळले गेले, त्यातही स्वदेशात की परदेशात की त्रयस्थ देशात?, त्या देशामधल्या कोणत्या शहरातल्या कोणत्या मैदानात? कसोटी सामने की मर्यादित षटकांचे? दिवसा उजेडी की दिव्यांच्या प्रकाशझोतात? पन्नास किंवा साठ षटकांचा की वीस वीसचा? असे अनेक पर्याय फक्त खेळण्याबद्दल आहेत. त्याशिवाय पहिल्या आणि दुस-या पारीत वेगवेगळ्या आणि एकंदर किती किती धांवा काढल्या? त्यात पुन्हा देश, शहर, क्रीडांगण, वर्ष, महिना, दिवस रात्र वगैरेंचा स्थानमहिमा आणि कालमहिमा आलाच. जिंकलेल्या सामन्यात जास्तीत जास्त धांवा कधी आणि कुठे काढल्या त्याच प्रमाणे कमीत कमी किती धांवा काढूनही विजय मिळाला, जास्तीत जास्त धांवा काढूनसुध्दा विजय कांही मिळाला नाही आणि कमीत कमी धांवा असतांनाही सामना हातातून निसटला नाही वगैरे अनेक प्रकारचे आकडे कांही लोकांच्या ओठांवर (किंवा फिंगरटिप्सवर) असतात.

वैयक्तिक विक्रमांबद्दल तर विचारायलाच नको. कोणता खेळाडू किती प्रकारचे किती सामने कधी कधी आणि कुठे कुठे नुसते खेळला इथपासून आकडेवारीची सुरुवात होते आणि त्याने त्यात काढलेल्या धांवा, त्याला मिळालेल्या विकेट्स, त्याने पकडलेले (किंवा सोडलेले) झेल यांचे मोठमोठे तक्ते तयार केले जातात. त्यांवरून सर्वाधिक धांवा, सर्वाधिक विकेट्स आणि सर्वाधिक झेल वगैरेंच्या विक्रमांची नोंद ठेवली जाते. त्यात पुन्हा संघ, शहर, राज्य, देश आणि विश्व वगैरे पातळीवर वेगळे विक्रम असतात. शिवाय कमीत कमी वेळात किंवा कमीत कमी चेंडूंवर पन्नास, शंभर, दोनशे, तीनशे धांवा करणे, कमीत कमी षटकांमध्ये किंवा कमीत कमी धांवांचे मोल देऊन जास्तीत जास्त विकेट मिळवणे यांची नोंद असते. एकेक सामन्यामधल्या विक्रमांची गणना तर केली जातेच, शिवाय एका सीरीजमध्ये, एका कॅलेंडर वर्षात, सलग बारा महिन्यांच्या काळात, तसेच वीस, पंचवीस, तीस वर्षांचे वय गांठण्याच्या आधी किंवा तीस, पस्तीसचे वय गांठल्यानंतर कोणकोणते पराक्रम गाजवले यांची आकडेवारी ठेवली जाते. हे फक्त कांही नमूने झाले. प्रत्यक्षात ठेवल्या जात असलेल्या विक्रमांची संख्या अपरंपार आहे.

कोणता ना कोणता विक्रम केल्याचे श्रेय आणि समाधान अनेक खेळाडूंना मिळावे या उद्देशाने कदाचित असे अनेक प्रकारचे रेकॉर्ड्स ठेवले जात असतील, पण सचिन तेंडुलकरसारखा एकादा अद्वितीय खेळाडू असे सगळे विक्रम एकट्यानेच तोडू पाहतो. बॅटिंगच्या बाबतीत कसोटी सामने तसेच एक दिवशीय सामने या दोन्ही प्रकारात सर्वाधिक धांवा आणि सर्वाधिक शतके नोंदवून तो त्या बाबतीत आघाडीवर आहे आणि इतरांपेक्षाही अधिक वेगाने पुढे सरकत चालला आहे. त्यामुळे त्याच्या पांवलावर पाऊल टांकून त्याला गांठायच्या तयारीत असलेला कोणी दिसत नाही. सर्वाधिक सामनेही तो यापूर्वीच खेळलेला आहे. त्यामुळे ग्वाल्हेरच्या क्रीडांगणावर त्याने पाऊल ठेवले तेंव्हाच सर्वाधिक सामने खेळल्याचा त्याचा स्वतःचा रेकॉर्ड त्याने पार केला होता, त्यानंतर पहिली धांव काढली तेंव्हा सर्वाधिक धांवांचा, पन्नासावी रन घेतली तेंव्हा सर्वाधिक अर्धशतकांचा आणि शंभर धांवा काढतांच सर्वाधिक शतकांचा असे त्याने स्वतः केलेले विक्रम तो मोडत गेला. त्यानंतर १९५ धांवा काढून त्याने एकदिवसीय सामन्यांतला आंतरराष्ट्रीय विक्रम मोडला आणि २०० धांवा काढून पहिला व एकमेव द्विशतकवीर होण्याचा बहुमान त्याने मिळवला. शिवाय सामनावीर ठरल्यामुळे सर्वाधिक वेळा हा मान पटकावण्याचा आणखी एक विक्रम त्याने प्रस्थापित केला. म्हणजे एकाच सामन्यात किती रेकॉर्ड्स मोडले आणि किती नवे स्थापन झाले? अशा प्रकारे रेकॉर्ड्सचीच संख्या कोणी मोजत असेल तर नक्कीच तो मान सुध्दा सचिनलाच मिळेल यात शंका नाही.

क्रिकेटच्या जगतात आजही ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन हाच 'ऑल टाइम ग्रेटेस्ट' बॅट्समन समजला जातो. या ब्रॅडमनसाहेबांनी देखील सचिनचे तोंडभर कौतुक केले आहे. मात्र ते करतांना "सचिनसुध्दा माझ्यासारखाच खेळतो" असे त्यांनी सांगितले आहे. ब्रॅडमनच्या काळात आजच्याइतक्या रेकॉर्डिंगच्या सोयी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे आपल्याला त्यांच्या खेळाची फक्त झलक पहायला मिळते, पण सचिनचा खेळ पाहून आपण ब्रॅडमनच्या बॅटिंगची कल्पना करू शकतो. "रेकॉर्ड्स हे मोडण्यासाठीच असतात" असे सांगितले जाते, पण सचिनने एकट्यानेच इतके विक्रम नोंदवून ठेवले आहेत की ते सारे मोडले जाणे कठीणच दिसते. "नव्या विक्रमानंतर आता पुढे काय?" अशा एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर सचिनने दिलेले उत्तर अत्यंत शालीन तसेच मार्मिक आहे. त्याने सांगितले, "क्षितिजापलीकडे सुध्दा जग आहे"

Monday, February 22, 2010

पंपपुराण भाग ६



सेंट्रिफ्यूगल पंपाचे कार्य कसे चालते हे आपण मागील भागात पाहिले, पण खोल विहिरीत असलेले पाणी जमीनीच्या वर कसे येते या कोड्याचा उलगडा कांही त्यातून झाला नाही. असा पंपसेट आणून विहिरीच्या कांठावर बसवला, त्याला विजेचे कनेक्शन दिले, पाईप जोडून तो विहिरीत खोलवर बुडवला आणि बटन दाबले की मोटर फिरू लागेल, पंपाचा इंपेलर फिरत असल्याचे आवाज त्यातून येतील, पण पाण्याचा मात्र एक थेंबसुध्दा बाहेर येणार नाही. 'आडातच नसेल तर पोह-यात कुठून येणार ?' अशी म्हण आहे. इथे मात्र आडात भरपूर पाणी असले तरी ते सेंट्रिफ्यूगल पंपाच्या बाउलमध्ये आल्यानंतरच इंपेलर त्याला पंपाच्या बाहेर ढकलू शकतो.

पारंपरिक पध्दतीच्या आडातून पाणी काढण्यासाठी एक घागर दोरीच्या एका टोकाला बांधून ती पाण्यात सोडतात आणि रहाटाचे चाक फिरवून ती भरलेली घागर पाण्याबाहेर उचलून घेतात. लहानसा हांतपंप बसवण्यासाठी मोठी विहीर खोदण्याची गरज नसते. जिथे जमीनीखाली भरपूर पाणी असते अशा जागी पुरेसे खोलवर खणून एक उभा पाईप त्यात गाडतात आणि त्यावर हांतपंप बसवतात. या पंपाची रचना बरीचशी रॉकेलच्या पंपासारखीच असते. त्याचे हँडल एका तरफेमार्फत पिस्टनला जोडलेले असते. ते खाली ओढले की वरील पाण्यासह पिस्टन वर येतो आणि ते पाणी तोटीतून बाहेर पडते. या पंपातसुध्दा विहिरीतील पाणी उचलून वर आणले जाते. पिचकारी उडवतांना त्यात असलेले रंगीत पाणी आपण दट्ट्याने ढकलून बाहेर उडवतो. अशा प्रकारे द्रव पदार्थ एका भांड्यात घालून उचलता येतात किंवा बंद नळीतून पुढे ढकलता येतात, पण दोरीला किंवा काठीला धरून ती ज्या प्रकारे ओढता येते तसा कोणताही द्रवपदार्थ आपण ओढू शकत नाही. पृथ्वी मात्र पाण्याला ओढण्याचे काम गुरुत्वाकर्षणातून करत असते. या तत्वाचाच उपयोग विहिरीतील पाणी पंपामार्फत बाहेर काढण्यात केला जातो.

वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे पंपाला जोडलेला पाईप पाण्यात बुडवला जातोच, त्याच्या तळाशी एक फूटव्हॉल्व्ह बसवतात. ही झडप फक्त आंतल्या बाजूला उघडते. ती विहिरीतल्या पाण्याला पाइपात जाऊ देते, पण पाइपात असलेल्या पाण्याच्या वजनानेच ती घट्ट मिटते आणि आंतील पाण्याला विहिरीत जाऊ देत नाही. नवा पंप बसवल्यानंतर त्याला जोडलेला पाईप आणि पंपाचे भांडे पाण्याने पूर्णपणे भरतात. पंपामधील हवा बाहेर जाण्यासाठी त्याच्या वरच्या बाजूला एक व्हेंट होल ठेवलेले असते. त्यातून पाणी बाहेर येऊ लागणे ही पंप पाण्याने भरल्याची खूण आहे. त्यानंतर त्याला घट्ट टोपण बसवून पंपाची मोटर सुरू करतात. इंपेलरच्या केंद्रभागी असलेले पाणी वेगाने बाहेर फेकले जाते. त्यामुळे त्या ठिकाणी निर्वात पोकळी निर्माण होते.

या वेळी फूटव्हॉल्व्हवर आंतल्या बाजूने त्यात असलेल्या पाण्याचे वजन त्याला बंद करत असते, तर बाहेरच्या बाजूने वातावरणातील हवेचा दाब विहिरीमधील पाण्याला ढकलून त्या झडपेला उघडत असतो. त्याचा जोर जास्त असला तर झडप उघडून पाणी आंत शिरते आणि पंपातील निर्वात पोकळी भरून काढते. वातावरणाचा हा दाब सुमारे दहा मीटर उंच पाण्याचा स्तंभ तोलून धरू शकतो. पण फूटव्हॉल्व्ह उघडण्यासाठी लागणारा जोर, पाण्याच्या प्रवाहाला घर्षणामुळे पाइपात होणारा विरोध, वातावरणाच्या दाबात वेळोवेळी होत असलेला बदल वगैरेंचा विचार करता प्रत्यक्षात विहिरीतले पाणी सात आठ मीटरपर्यंत वर चढू शकते आणि पंपातून त्याचा प्रवाह चालत राहतो. मात्र पंप सुरू करण्यापूर्वी त्याचे केसिंग आणि सक्शन पाईप यांचे पाण्याने भरलेले असणे आवश्यक असते. ते नसले तर आधी भरून घ्यावे लागतात. याला प्राइमिंग म्हणतात. हे सुलभ रीतीने करण्यासाठी पाण्याची वेगळी व्यवस्था केलेली असते.



. . . . . . . . . . . (क्रमशः)

Saturday, February 20, 2010

पंपपुराण भाग ५


मी लहानपणी आमच्या गांवात पाहिलेल्या पहिल्या पाण्याच्या पंपाला इंजिन जोडलेले होते, पण कधी तरी परगांवी नातेवाइकांकडे गेलो असतांना इलेक्ट्रिक मोटरवर चालणारा पाण्याचा पंपसेटही दिसला. दोन्हीमधला पंपाचा भाग दिसायला तसा सारखाच होता, फक्त पंपातून बाहेर आलेल्या फिरत्या दांड्याला (शाफ्टला) अवजड इंजिनाऐवजी सुटसुटीत मोटर जोडलेली होती. शंखाच्या आकाराच्या त्या अजब पात्राच्या आतमध्ये एक चक्र असते आणि पंप सुरू करताच ते गरगर फिरू लागते एवढा बोध त्या वयात झाला होता, पण वीतभर चक्राच्या फिरण्यामुळे विहिरीच्या आतमध्ये तीन चार पुरुष खोलवर असलेले पाणी पाइपातून वरती चढून पंपातून बाहेर कसे निघते हा चमत्कारच वाटत असे. त्याचा उलगडा मात्र इंजिनियरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतर झाला.

विहिरीतून पाणी उपसण्यासाठी सेंट्रिफ्यूगल पंपाचा वापर केला जातो. याची रचना मी पूर्वीच्या भागात दाखवलेल्या रॉकेलच्या किंवा सायकलच्या पंपांपेक्षा अगदीच वेगळी असते. वरील चित्रात दाखवल्यानुसार व्हॉल्यूट केसिंग आणि इंपेलर हे या पंपाचे मुख्य भाग असतात. इंपेलरचा आकार अनेक वक्राकृती पाकळ्या असलेल्या फुलाच्या आकृतीसारखा असतो. फुलाच्या मधोमध देठ असते तसा या इंपेलरला एक दांडा जोडलेला असतो. हा शाफ्ट गरगर फिरवला की इंपेलरचे चक्र फिरू लागते. हे चाक शंखासारखा आकार असलेल्या एका पात्रात बसवलेले असते. त्या पात्राला व्हॉल्यूट केसिंग अशी संज्ञा आहे. इन्व्हॉल्यूट या प्रकारच्या वक्ररेषेचा आकार देऊन बनवले जात असल्यामुळे हे नांव त्या केसिंगला दिले आहे. मध्यबिंदूपासून त्याच्या परीघापर्यंतचे अंतर (त्रिज्या) सारखे वाढत जाणे हे या आकाराचे वैशिष्ट्य आहे.

इंपेलरच्या पाकळ्यांची रचना अशा प्रकारे केलेली असते की त्याचे चक्र फिरू लागताच त्या पाकळ्या त्यांच्या केंद्रबिंदूपाशी असलेल्या द्रवाला (पाण्याला) बाहेरच्या बाजूला वेगाने ढकलतात. विशिष्ट कोन करून केसिंगला आपटल्यानंतर ते पाणी केसिंगच्या आकारानुसार वक्ररेषेत फिरू लागते. मध्यभागातून परीघाकडे आणखी पाणी येतच असते. इन्व्हॉल्यूटच्या आकारामुळे केसिंगचा परीघ आणि इंपेलरचे वर्तुळ यामधली मोकळी जागा क्रमाक्रमाने वाढत जाते आणि त्यातून गोल फिरणा-या पाण्याचा प्रवाह निर्माण होतो. इन्व्ह़ल्यूटच्या मुळापासून मुखापर्यंत वहात आलेल्या पाण्याला बाहेर जाण्याचा मार्ग मिळाल्यावर ते पंपामधून वेगाने बाहेर पडते. अशा प्रकारे वर्तुळाच्या केंद्रापासून दूर जाण्याच्या प्रवृत्तीला सेंट्रिफ्यूगल म्हणतात. यावरून अशा प्रकारच्या पंपांना सेंट्रिफ्यूगल पंप असे नांव दिले आहे।

कोणतीही वस्तू वर्तुळाकार मार्गाने गतिमान असतांना केंद्रापासून दूर फेकली जात असल्याचा अनुभव आपल्याला रोजच्या जीवनात येतो. लहान बाळाच्या पाळण्यावर टांगलेले खेळणे किंवा जत्रेतील मेरी गो राउंडमधले घोडे त्यांना जोडणारे चक्र फिरू लागताच बाजूला फेकले जात असतांना दिसतात. मोटारीतून जातांना वळणावर आपण बसल्याजागी बाहेरच्या बाजूला सरकतो. ही सेंट्रिफ्यूगल फोर्सची उदाहरणे सुपरिचित आहेत. द्रवरूप पदार्थ वाहू शकत असल्यामुळे त्यांवर होणारा परिणाम जास्त सहजपणे लक्षात येतो. मिक्सरमध्ये ताक घुसळतांना ते भांड्याच्या कडेने वरपर्यंत उसळतांना दिसते. चित्रात दाखवल्याप्रमाणे एका पातेल्यात पाणी भरले तर ते स्थिर असतांना पाण्याची पातळी सपाट दिसते. ते पातेले गोल फिरवले की त्याच्या मध्यभागातले पाणी कडेला सरकते आणि पातेल्याबाहेर उसळते. पाण्याची पातळी वक्राकार होऊन मध्यभागी खड्डा पडलेला दिसतो. पातेल्याच्या फिरण्याचा वेग वाढवत नेला तर हा खड्डा अधिकाधिक खोल होत जातो आणि अधिकाधिक पाणी पातेल्याच्या बाहेर पडते.

सेंट्रिप्यूगल पंपामधले इंपेलर खूप वेगाने फिरत असल्यामुळे त्याच्या केंद्रभागी असलेले पाणी वेगाने परीघाकडे फेकले जाते आणि तिथून ते बाहेर पडते. केंद्रभागी रिकामी झालेली जागा नव्याने आंत येऊ पाहणारे पाणी घेते. ते बाहेर फेकले गेले की आणखी नवे पाणी आंत येते. अशा प्रकारे पंपामधून पाण्याचा अखंड प्रवाह चालत राहतो.


. . . . . . . . . . . (क्रमशः)

Friday, February 19, 2010

सव्वाशे वर्षांनंतर

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल लिहिण्याची प्रेरणा मला त्यांच्या पुण्यतिथीच्या तारखेला मिळाली हा जसा एक योगायोग होता. त्याचप्रमाणे आज शिवजयंतीच्या दिवशी मी या विषयावर पुढे लिहिणार आहे हा आणखी एक योगायोग जुळून आला आहे. वासुदेव बळवंतांची कार्यपध्दती पाहिली तर त्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनावरून स्फूर्ती मिळाली असणार असा विचार मनात येतो. जुलमी परकीय राज्यकर्त्यांनी केलेला अन्याय सहन न करणे, त्याचा प्रतिकार करण्यासाठी न डगमगता खंबीरपणे उभे राहणे, तळागाळातल्या गरीब व सामान्य जीवन जगणा-या माणसांना प्रेरित करून आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्यांना निष्ठेने कामाला लावणे, शत्रूला एकापाठोपाठ एक धक्के देत राहणे अशासारखी त्यांच्या जीवनातील उदाहरणे हे सुचवतात.

वासुदेव बळवंतांच्या जीवनाला आता जवळ जवळ सव्वाशे वर्षे लोटून गेली आहेत. या दरम्यान भारतातली परिस्थिती इतकी बदलली आहे की आज आपण त्या जुन्या कालखंडाची कल्पनासुध्दा करू शकत नाही. मी जे कांही वाचले, ऐकले किंवा पडद्यावर पाहिले आहे ते सगळे अलीकडील लोकांनी लिहिले, सांगितले आणि दाखवले आहे. त्या लोकांनी ते कशाच्या आधारावर केले होते याची मला सुतराम कल्पना नाही. हे असे लिहिण्यामागे तसेच एक कारण आहे.

हा लेख लिहिण्यापूर्वी मी आपल्याकडल्या माहितीची उजळणी करण्यासाठी आंतरजालावर थोडेसे उत्खनन केले. त्यात मला जी माहिती सापडली ती म्हणावे तर जराशी मनोरंजक आणि खरे तर चिंताजनक वाटली. विकीपीडिया या आजकाल थोडी फार मान्यता प्राप्त झालेल्या कोषावर दिलेली माहिती वाचून माझ्या मनात वासुदेव बळवंतांची जी प्रतिमा होती तीच दृढ झाली. त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा तारीखवार तपशील मिळाला. मात्र वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे गुरू तसेच अनुयायी यांचा जातीनिहाय उल्लेख त्या लेखात केला होता. सव्वाशे वर्षांपूर्वी त्या गोष्टीला कदाचित प्रचंड महत्व होते. आजसुध्दा कांही लोकांच्या मनात त्याविषयी तीव्र भावना कदाचित असतील आणि त्यामुळेच ते विस्ताराने लिहिले गेले असेल. पण मला ते योग्य वाटले नाही. अमक्या तमक्या जातीचा असा शिक्का मारण्याऐवजी समाजातील विशिष्ट स्तरावरील लोकांनी त्यानुसार प्रतिसाद दिला असावा असे मला वाटते. म्हणून माझ्या लेखात मी जातीनिहाय उल्लेख केले नाहीत.

या विषयावरील दुसरा लेख मला एका हिंदुत्ववादी संकेतस्थळावर वाचायला मिळाला. त्या लेखातील जवळजवळ प्रत्येक वाक्यात हिंदुत्वाचा उल्लेख घुसवला आहे. "ब्रिटीशांनी हिंदू लोकांवर अत्याचार केले". "अन्याय सहन न करण्याच्या हिंदू परंपरेनुसार वासुदेव बळवंत त्याच्या विरोधात दंड ठोकून उभे राहिले", "हिंदूराष्ट्र उभे करण्याचा ध्यास त्यांनी घेतला", "ज्या हिंदू मराठा लोकांनी अफगाण आणि मोगलांचे कंबरडे मोडले अशा मर्द मराठ्यांची सेना उभारून त्यांनी इंग्रजांना बेजार केले", "त्यासाठी अमक्या देवळात जाऊन देवदर्शन घेतले आणि तमक्या देवळात मुक्कामाला असतांना आपली रोजनिशी लिहिली" वगैरे लिहून झाल्यानंतर अखेरीस "एका मुसलमानाने त्यांना पकडून दिले" असे गरळ ओकून "वासुदेव बळवंत फडके हे आद्य हिंदू क्रांतीकारक होते" असा शोध लावला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात मुसलमान शिपाईसुध्दा हिंदू सैनिकांच्या खांद्याला खांदा भिडवून लढले होते ही गोष्ट सोयिस्कररीत्या विसरून वासुदेव बळवंत यांनी मराठे आणि शीख लढवय्यांची परंपरा सांभाळली असे प्रतिपादन या लेखात केले आहे.

वासुदेव बळवंत फडके यांच्या नांवाने भारत सरकारने काढलेल्या तिकीटाचा शोध घेता घेता मी विशिष्ट उपजातीच्या संकेतस्थळावर जाऊन पोचलो. त्यात त्या उपजातीतील लोकांच्या नांवाने काढलेल्या टपाल तिकीटांची चित्रे मिळाली. त्यात दाखवलेल्या बहुतेक व्यक्तींनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा अजरामर ठसा उमटवला आहे. त्या महात्म्यांनी आपले सर्व जीवन जातीयतेचे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नात घालवले होते. त्यातल्या कोणाला तेल्यातांबोळ्यांचा पुढारी म्हणून हिणवले गेले तर कोणाला जातीतून बहिष्कृत करण्यात आले होते. समाजातून होणा-या विरोधाकडे लक्ष न देता आपल्या सदसद्विवेकबुध्दीला जागून त्यांनी आपले जीवितकार्य चालवले होते. वासुदेव बळवंतांची विचारसरणी देखील पुरोगामीच होती. पण विशिष्ट आडनांव असल्यामुळे त्या सर्वांची गणना एवढ्या संकुचित विश्वात व्हावी?

अशा प्रकारच्या लेखांचे वाचन करून भूतकाळात डोकावणारी भविष्यकाळातली पिढी आणखी पन्नास वर्षांनंतर आपल्या इतिहासातल्या महान व्यक्तींना किती खुजे ठरवेल ?

Thursday, February 18, 2010

आद्य क्रांतीकारक


परवा १७ फेब्रूवारीच्या पेपरात एक उपयुक्त माहिती वाचली. महाराष्ट्रातील महापुरुष आणि समाजसुधारक यांचे थोडक्यात संकलन त्यात दिले होते. वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू दिन १७ फेब्रूवारी १८८३ अशी त्यातली शेवटची नोंद होती. मी ती नोंद त्याच दिवशी वाचली हा एक योगायोगाचा भाग झाला. त्या दिवसानिमित्य वासुदेव बळवंतांबद्दल इतरत्र कांही लिहिले आहे का हे पाहिले, पण कांही सापडले नाही. कदाचित त्या दिवशी कोठे तरी एकादी सभा झाली असेल, त्यांच्याबद्दल कोणी व्याख्यान दिले असेल, निदान त्यांच्या पुतळ्याला कोणी हार घातला असेल. पण असे कोणतेच वृत्त काल आणि आजच्या वर्तमानपत्रात आले नाही. त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचे पुण्यस्मरण कोणाला झालेच नाही की त्याला प्रसिध्दी मिळाली नाही हे सांगता येणार नाही. आजकाल रोजच कोणा ना कोणा संत, महंत, पुढारी, हुतात्मा यांपैकी कोणाची तरी जन्मतारीख किंवा पुण्यतिथी असते त्यामुळे या आद्य क्रांतीकारकाला आता बातमीमूल्य (न्यूजव्हॅल्य्) राहिले नसावे. आजच्या अँग्री आजोबा आणि अँग्री पणजोबांनी एकमेकांवर उधळलेली मुक्ताफळे वाचण्यातच आजच्या वाचकांना रस वाटत असावा आणि त्यामुळे सव्वाशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या अँग्री यंग मॅनला महत्व देण्याचे कारण उरले नसावे.

इतर कोणाचे कांही असो, वासुदेव बळवंत फडके हे नांव वाचताक्षणीच त्यांचा अद्भुत जीवनपट सर्रकन माझ्या डोळ्यासमोरून उलगडत गेला. माझ्या लहानपणी आम्हाला वर्षातून एक किंवा दोन चित्रपट दाखवले जात असत. ते एक तर देवदेवतांच्या कथानकांवरचे पौराणिक चित्रपट असत किंवा भक्तांच्या मदतीसाठी धावून आलेल्या ईश्वराने केलेले चमत्कार त्यात दाखवले जात. त्यातल्या ट्रिकसीन्सवर आम्ही बेहद्द खूष होत असू. त्या काळातच मला वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावरचा जुना सिनेमा पहायला मिळाला. कदाचित इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असा तो अपवाद असल्यामुळे मनाला जास्त भिडला आणि कायमचा लक्षात राहिला. त्यानंतर पन्नास वर्षांनी तिस-या पिढीतल्या कलाकारांनी निर्माण केलेला त्याच विषयावरचा चित्रपट अलीकडे पाहिला. अर्थातच या वेळी तो जास्त समजला आणि अधिक परिणामकारक वाटला. याशिवाय अधून मधून वाचलेले लेख, ऐकलेली भाषणे वगैरेंमधून वेळोवेळी त्यांच्याबद्दल माहिती मिळत गेली होतीच.

पनवेलजवळ असलेल्या शिरढोण गांवात वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म सन १८४५ च्या ४ नोव्हेंबर रोजी झाला. तोंपर्यंत पेशवाईचा अस्त झाला होता आणि ब्रिटीश राजवटही पूर्णपणे प्रस्थापित झालेली नव्हती. त्या स्थित्यंतराच्या काळात शालेय शिक्षणाचे काय स्वरूप होते कोण जाणे, पण जे कांही होते ते मुळातच बंडखोर वृत्तीच्या असलेल्या लहान वासुदेवाला पटले नाही आणि त्याने आपले शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि त्यापेक्षा व्यायाम, कुस्ती वगैरे माध्यमातून शरीरसंवर्धनाला महत्व दिले. पण पुढे त्याला नोकरी करावीशी वाटली किंवा त्याची गरज भासली यामुळे तो पुण्याला जाऊन इंग्रजांच्या लष्कराच्या मुलकी सेवेत काम करायला लागला. सन १८७० च्या सुमारास त्या काळातले भारतीय नेते सनदशीर मार्गाने ब्रिटीशांचे मन वळवून जनतेसाठी कांही सवलती मिळवून घेण्याच्या प्रयत्नात होते. ब्रिटीश राजवटीत जनतेवर होत असलेला अन्याय त्यांच्या लिहिण्या बोलण्यातून व्यक्त होत होता. अंग्री यंग मॅन वासुदेवाला मात्र हे सहन होण्यासारखे नव्हते. तरीही संयम बाळगून त्याने आपली चाकरी चालू ठेवली, पण त्या बरोबरच ब्रिटीशांच्या राजवटीची बलस्थाने आणि त्यातले कमकुवत दुवे यांची बारकाईने पहाणी केली. एका अधिका-याच्या आंकडूपणामुळे त्याला आपल्या मरणासन्न आईची अखेरची भेट घेता आली नाही हा व्यक्तीगत घाव मात्र त्याला सहन झाला नाही आणि ब्रिटीशांचे अन्याय्य राज्यच उलथून पाडण्याचा चंग बांधला.

शहरात राहणा-या सुशिक्षित किंवा पुढारलेल्या समाजाकडून त्याच्या प्रत्यक्ष कृतीला भरीव पाठिंबा मिळण्याची शक्यताच नव्हती. जनमानसावर प्रभाव असलेल्या तत्कालीन संतमहंतांची भेटही घेऊन पाहिली, पण त्याचा उपयोग झाला नाही. रानावनातल्या तथाकथित मागासलेल्या जमातीतल्या लोकांची टोळी बनवून त्याने आपल्या संघर्षाची सुरुवात केली. इंग्रजांशी लढाई करायची असेल तर त्यासाठी सैन्याची उभारणी करायला हवी, त्यांच्या हाती शस्त्रे देण्यासाठी पैशाची तरतूद व्हायला हवी. तो कोठून आणणार? ब्रिटीशांबरोबर लढण्यासाठी त्यांचाच पैसा लुबाडण्याचे वासुदेवाने ठरवले आणि सरकारी तिजोरीवर डल्ला घातला. जनतेकडून लुबाडलेला कर जनतेच्या स्वातंत्र्ययुध्दासाठी कामी आणण्यात कांही गैर नाही अशी तात्विक बैठकही त्या मागे होती. मिलिटरीमध्ये नोकरी करतांना आलेल्या अनुभवाचा आणि मिळवलेल्या माहितीचा चांगला उपयोग करून घेऊन त्याने अशा गनिमी काव्याने हल्ले करण्याचा सपाटाच लावला. त्याला पकडून देण्यासाठी इंग्रज सरकारने बक्षिस जाहीर केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी थेट गव्हर्नर पासून अन्य इंग्रज अधिका-यांना पकडून देण्यासाठी वासुदेव बळवंताने बक्षिसे जाहीर केली. यावरून त्याच्या झुंजार स्वभावाचे दर्शन घडते.

पुण्याच्या परिसरातल्या जंगलामध्ये त्याने आपले ठाणे बनवले होते. सरकारी तिजोरी लुटण्यामागचा मुख्य उद्देश समजून न घेता त्या लुटीतूनच आपला वाटा मागायला कांही सहका-यांनी सुरुवात केली तेंव्हा निराश होऊन वासुदेव बळवंताने तात्पुरते दक्षिणेकडे स्थलांतर केले आणि तत्कालीन हैदराबाद संस्थानात जाऊन रोहिले आणि अरबांची फौज जमवली. महाराष्ट्रात तसेच भारताच्या इतर भागात जमवाजमव करून इंग्रजांवर अनेक बाजूंनी हल्ला करण्याची मोठी योजना त्याने आंखली होती. पण आता ब्रिटीश सरकार सावध झाले होते. त्यांचे अधिकारी हात धुवून वासुदेवाच्या मागे लागले. दोघांच्या फौजांमध्ये एक चकमक सुध्दा झाली. अखेर जंगलातून मार्गक्रमण करत असतांना त्याच्याच एका सहका-याने केलेल्या दगाबाजीमुळे वासुदेव बळवंत पकडले गेले. त्यांच्यावर पुण्यातल्या कोर्टात खटला चालला आणि त्यांना तुरुंगवासासाठी दूर एडनला धाडण्यात आले. तिथल्या त्या तुरुंगातून पलायन करण्यातही ते यशस्वी झाले होते, पण परमुलुखात असल्यामुळे पुन्हा पकडून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यानंतर मात्र सुटकेची आशा न उरल्यामुळे त्यांनी आमरण उपोषण करून प्राणत्याग केला. अशा प्रकारे या अलौकिक पुरुषाची प्राणज्योत त्याने स्वतःच मालवली.

Wednesday, February 17, 2010

कोळसा उगाळावा तेवढा ... (उत्तरार्ध)



'झुकूझुकूझुकुझुकु अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी' या बालगीतातील कू ssss अशी लांब शिट्टी मारणारे वाफेचे इंजिन आणि चालत्या गाडीतल्या त्या इंजिनाच्या भट्टीत कोळसा झोकून देत असलेले कामगार यांचे दृष्य प्रत्यक्षात किंवा निदान सिनेमात तरी बहुतेक लोकांनी पाहिलेले असेलच. विद्युत उत्पादन केंद्रातली कोळशाची भट्टी मात्र आकाराने तिच्यापेक्षा खूपच मोठी असते आणि त्यात कोळसा टाकण्याचे काम माणसे करत नाहीत. खाणीमधून त्या केंद्रात आलेला कोळसा आधी एका क्रशरमध्ये चिरडून त्याचे लहान तुकडे करतात आणि ते तुकडे एका प्रचंड जात्यात दळून त्याचे पीठ केले जाते. हवेच्या वेगवान झोताबरोबर ही कोळशाची भुकटी भट्टीत फेकली जाते. तिथे असलेल्या ज्वाळांमुळे ती लगेच पेट घेते आणि तिचे रूपांतर धूर व राख यात होते. धुरावर प्रक्रिया करून तो चिमणीतून आकाशात सोडला जातो राख गोळा करून तिची वेगळ्या प्रकारे विल्हेवाट लावली जाते.

यातला कोळसा जितका उच्च प्रतीचा असेल त्यानुसार त्यातून अधिक ऊष्णता निर्माण होते आणि ठरावीक मेगावॉट वीजनिर्मिती करण्यासाठी तुलनेने कमी कोळसा जाळावा लागतो. त्यामुळे त्यातून कमी राख निर्माण होते, शिवाय चांगल्या प्रतीच्या कोळशातली राखेची टक्केवारी आधीच कमी असल्यामुळे तिची निर्मिती आणखीनच कमी होते. अशा प्रकारे कोळसा आणि राख यांना हाताळणा-या यंत्रांवर कामाचा बोजा कमी पडतो, त्यांची झीज कमी होते, तसेच दुरुस्ती करण्याचे प्रमाण कमी होते. या सगळ्यांचा विचार करता वीज निर्माण करणारे अभियंते उच्च दर्जाच्या कोळशावर खूष असतात. पण खाणीतूनच तो तसा निघत नसेल तर नाइलाजाने जसा कोळसा मिळेल तसा त्यांना वापरावा लागतो.

खाणीतून निपजलेल्या निकृष्ट कोळशाचा दर्जा कांही प्रमाणात वाढवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यासाठी हा कोळसा बेनेफिकेशन प्लँट किंवा वॉशरीमध्ये नेऊन तिथे थोडासा चिरडतात. त्यामुळे त्यातल्या मातीची ढेकळे फुटतात. पाण्याने धुतल्यानंतर ही माती वाहुन जाते आणि स्वच्छ झालेला कोळसा जास्त चांगल्या दर्जाचा असतो. हा लाभ पाहता सर्वच कोळसा धुतला जायला पाहिजे असे कोणालाही वाटेल. मात्र प्रत्यक्षात भारतातल्या खाणींमधून जेवढा कोळसा निघतो त्यातला फक्त पाव हिस्सा धुतला जातो. यामागे तांत्रिक, आर्थिक आणि कांही इतर कारणे आहेत.

तांत्रिक दृष्ट्या पाहतां, कोळसा धुण्यासाठी पाण्याचा मुबलक पुरवठा हवा, तसेच गढूळ पाण्याचा निचरा करण्याची सोय पाहिजे. त्याच पाण्याचा पुनर्वापर करायचा असेल तर पाण्यातली माती वेगळी करण्याची संयंत्रे बसवावी लागतील. नैसर्गिक कोळसा, स्वच्छ केलेला कोळसा, त्यातून निघालेली माती आणि स्वच्छ तसेच गढूळ पाणी वगैरेंना वेगवेगळे साठवण्यासाठी भरपूर मोकळी जागा लागेल आणि त्यांच्यासाठी लागणारी वाहतूक व्यवस्था अत्यंत सक्षम असायला हवी. कोळसा धुतला जातांना त्यातल्या मातीबरोबर कोळशाचे कणही वाहून जातात, तसेच त्यात दडून बसलेले वायुरूप ज्वलनशील पदार्थ नष्ट होतात. कोरडा कोळसा पाण्यात भिजल्यामुळे त्यातली आर्द्रता वाढते. यामुळे कोळशाचा दर्जा उंचावतांनाच त्यात थोडी तूटही येते.

वॉशरी स्थापन करण्यासाठी मोठे भांडवल गुंतवावे लागते, तसेच हे सगळे काम करण्यात जो खर्च येतो त्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागते. यातली गुंतवणूक, खर्च आणि कोळशाच्या वजनात होणारी घट या सर्व गोष्टी विचारात घेऊन धुतलेल्या कोळशाला त्यानुसार चांगली किंमत मिळाली तरच ते काम लाभकारक ठरते. खाणीपासून विद्युत उत्पादन केंद्र जवळच असेल तर पुरेसा लाभ पदरात पडत नाही. मात्र हा कोळसा दूर वाहून न्यायचा असेल तर त्याच्या परिवहनावरच खूप खर्च येतो आणि स्वच्छ कोळशाचे आकारमान व वजन कमी असल्याने त्यात जी बचत होते त्यामुळे धुतलेला कोळसा वापरणे परवडते.

या प्रकारच्या तांत्रिक बाबींची चर्चा होत असतांनाच कांही गोष्टींचे व्यासपीठावरून प्रच्छन्न उल्लेख होत होते आणि खाजगी बोलण्यात त्या उघडपणे व्यक्त होत होत्या. भारतात आता इतर अनेक क्षेत्रात मुक्त बाजार व्यवस्था अंमलात आली असली तरी कोळसा आणि पेट्रोलजन्य इंधने यांचा पुरवठा तसेच ग्राहकांकडून आकारण्याची किंमत या दोन्हींवर सरकारचे नियंत्रण आहे. व्यापा-यांना मोकळीक दिली तर त्यांचे भाव गगनाला भिडतील आणि भारताची सर्व अर्थव्यवस्था कोलमडून पडेल अशी भीती दाखवून त्याचे समर्थन केले जाते ते कांही अंशी खरे असेलही. पण कोळसाखाण उद्योग क्षेत्राचा कारभार कशा प्रकारे चालवला जातो आणि ज्या प्रदेशात मुख्यत्वेकरून या खाणी आहेत त्या भागातली कायदा आणि सुव्यवस्था यांची एकंदरीत परिस्थिती कशी आहे हे दाखवून देणा-या बातम्या आपण वरचेवर वाचत असतो. तिथल्या समाजजीवनाचे विदारक चित्रण करणारा एक हिंदी चित्रपटसुध्दा मध्यंतरी आला होता. या अशा व्यवस्थेतून ज्या अनेक उपसमस्यांच्या व्याधी निर्माण झाल्या आहेत त्यांच्यावर मात्र वर वर मलमपट्टी करण्यापलीकडे कांहीच करता येत नाही ही खंत मनात राहते.

कोळशाचा वापर करणारा कोणताही कारखाना उभारतांनाच तो कोळसा कुठून आणायचा हे ठरवले जाते आणि त्यासाठी केलेल्या दीर्घ मुदतीच्या करारात सहसा बदल करता येत नाही. कोणत्या दर्जाच्या कोळशासाठी किती मूल्य द्यायचे हे ठरलेले असते आणि आगाऊच घेतले जाते. हा कोळसा वाहून नेण्यासाठी वाघिणी आणि इंजिन उपलब्ध करणे आणि त्यांना रुळावरून नेण्याचे काम रेल्वे करते. यांचा समन्वय साधण्यासाठी लायसन एजन्सी नेमाव्या लागतात. गांवोगांवी असलेले त्यांचे प्रतिनिधी त्या वाहतुकीचा पाठपुरावा करतात आणि त्याच्या प्रगतीबद्दल माहिती देतात. हे सगळे असले तरी कोणत्या दर्जाचा किती कोळसा कधी येऊन पोचेल याची शाश्वती नसते. रेल्वे रिसीटमध्ये लिहिलेला दर्जा आणि वजन यांचा प्रत्यक्ष मिळालेल्या मालाशी मेळ जुळत नाही. कोळशाची कसून चांचणी करू शकणा-या एका आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळेतल्या तज्ज्ञाचे व्याख्यान झाले. आज उपलब्ध असलेल्या तपासणी करण्याच्या पध्दतींच्या अचूकपणाबद्दल त्यात सांगितले गेले, पण त्यांच्याकडे जे नमूने येतील त्यांचीच ते तपासणी करून रिपोर्ट देतील हे स्पष्ट केल्यानंतर झालेल्या चर्चेत नमूने घेण्यातल्या गोंधळावर उजेड पडला.

कोळशाची खाण चालवणारे, तो धुवून स्वच्छ करणारे, त्याची वाहतूक करणारे इतकेच नव्हे तर त्याची तपासणी करणारे यातल्या कोणाबद्दलच भरवसा वाटत नसेल आणि वाटेत इतर प्रकारचे गैरव्यवहार व वाटमारी होण्याची शक्यता असेल तर त्याची तक्रार कोणा कोणाकडे करणार आणि संपूर्ण चौकशी तरी कशी होणार? शिवाय कोळशाबद्दल ज्यांना तक्रार आहे त्या विद्युत क्षेत्राची जनमानसातली प्रतिमा तरी किती संशयातीत आहे? आलेल्या कोळशाबद्दलचा अहवाल एक उपचार म्हणून नोंदून ठेवला जातो आणि गोष्टी फारच खालच्या तळाला जाऊ लागल्या आणि केंद्र चालवणेच अशक्य होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर गहजब करावा लागतो. मुख्य म्हणजे आलेला हजारो टनावारी माल स्वीकारण्यावाचून गत्यंतर नसते. तो परतही पाठवता येत नाही कारण दुसरा चांगला कोळसा मिळवण्याची पर्यायी व्यवस्थाच नसते. त्यामुळे जमेल तेवढी कुरकुर करून झाल्यानंतर पदरी पडलेल्या कोळशाचा उपयोग करण्यासाठी पुढील मार्ग शोधून काढावा लागतो. अधूनमधून आपले निरीक्षक खाणीवर पाठवणे, संयुक्तपणे कोळशाची तपासणी करणे वगैरे उपायांनी तात्पुरता थोडा फरक पडतो. निकृष्ट प्रतीच्या कोळशात थोडा आयात केलेला उत्कृष्ट कोळसा मिसळून (ब्लेंडिंग करून) त्याचा सरासरी दर्जा वाढवणे हा त्याचा उपयोग करून घेण्याचा एक मार्ग झाला.

अनेक वेळा या कोळशातून दगड, गोटे, फरशा वगैरे येतात. कोळशासोबत त्या गोष्टी यंत्रात गेल्या तर त्या यंत्रांची नासधूस होते. यामुळे अशा गोष्टी वेचून बाजूला काढणे आवश्यक असते. पूर्वीच्या काळी रेशनवर मिळणा-या धान्यात खडे मिसळलेले असत आणि ते वेचून धान्य निवडणे हे गृहिणीचे एक मुख्य काम असे. वेचणीच्या कामात वाकबगार असलेले कामगार नेमून कोळसा स्वच्छ करून घेण्याचे किचकट काम कोळशाची जबाबदारी सांभाळणा-या अधिका-यांना स्वतःच्या देखरेखीखाली करून घ्यावे लागते. कोळशासोबत आलेली पोती किंवा प्लॅस्टिकच्या थैल्या यांसारखा सॉफ्ट कचरा बाजूला काढण्याचे काम करण्याचे एक खास यंत्र एका कारखान्यात तयार केले आहे. ज्या गोष्टी खाणीमधून निघतच नाहीत असा कचरा कोळशासोबत येतो आणि तो बाजूला काढण्यासाठी अशा प्रकारचे उपाय करणे हे आता संवयीचेच झाले आहे.

आयात होणा-या कोळशाच्या बाबतीत वेगळ्या समस्या आहेत. परदेशी बाजारपेठेतून त्याची योग्य वेळी योग्य तेवढी खरेदी करणे, मालवाहू जहाजांमधून त्याची बंदरांपर्यंत वाहतूक करणे आणि तो उतरवून घेतल्यानंतर त्याची देशांतर्गत वाहतूक करणे हे त्याचे तीन मुख्य टप्पे आहेत. शिवाय आयात करण्यासाठी सरकारची मंजूरी लागतेच. या सर्व बाबी सांभाळून कोळशाचा पुरवठा करणारे मोजकेच व्यापारी आहेत, पण ते सगळेच आपला पुरेपूर फायदा वसूल करून घेतात. त्यामुळे डोक्याला ताप नसला तरी त्याची जबर किंमत मोजावी लागते आणि वीजपुरवठ्याचे दर नियंत्रणाखाली असल्यामुळे ती सहजासहजी ग्राहकांवर ढकलता येत नाही. जगभरात सर्व प्रकारच्या आयात निर्यातीचा व्यवसाय करणारे लोक सहजपणे इकडचा माल तिकडे आणि तिकडचा इकडे करत असतात. फक्त एकाच वस्तूची खरेदी आणि वाहतूक करतांना त्यांच्याशी स्पर्धा करण्यात अडचणी येऊ शकतात. या क्षेत्रातसुध्दा तांत्रिक अडचणींपेक्षा इतर समस्याच अधिक तापदायक ठरतात.

हे सगळे ऐकल्यावर वाटले, जाऊ दे, कोळसा उगाळावा तेवढा काळाच निघायचा ! पण तसा असला तरी त्याच्यामुळे आज आपण सुखात रहात आहोत हे सुध्दा महत्वाचे आहे.

Sunday, February 14, 2010

कोळसा उगाळावा तेवढा ... (पूर्वार्ध)


हवा, पाणी, अन्न यासारख्या गोष्टी सर्वच प्राणीमात्रांना जगण्यासाठी आवश्यक असतात. मानवाने त्यात भर घालून वस्त्र आणि निवारा यांचा समावेश आपल्या मूलभूत गरजांमध्ये केला. लोखंड तयार करायला शिकल्यानंतर त्यापासून विविध प्रकारची आयुधे आणि अवजारे तो बनवत गेला. त्यांचा उपयोग करून साम्राज्ये स्थापन झाली आणि लयाला गेली, नकाशावरील सीमारेषा बदलत गेल्या, अनेकविध वस्तूंचे उत्पादन आणि परिवहन होत गेले आणि त्यांनी त्याचे रोजचे जीवन बदलून टाकले. अशा प्रकारे लोखंड या पदार्थाने इतिहास, भूगोल आणि समाजजीवन या सर्वांवर प्रचंड प्रभाव टाकला. आज सुध्दा घर, शेत, कार्यालय, बाजारपेठ आणि कारखाने या सगळ्या जागी आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये पदोपदी लोखंड दिसत असते. त्यामुळे लोखंड हा आजच्या जीवनप्रणालीसाठी एक अत्यावश्यक पदार्थ झाला आहे.

पण हे लोखंड तयार होण्यामध्ये लोखंडाच्या खनिजाएवढाच दगडी कोळशाचा वाटा असतो. दगडी कोळसा जाळून मिळणा-या ऊर्जेचा वापर करून वाफेवर चालणारे इंजिन तयार झाले आणि तिथून औद्योगिक क्रांती सुरू झाली. आगगाड्या आणि आगबोटी ही दळणवळणाची साधने सुरुवातीला दगडी कोळशावर चालत. त्यांनी दळणवळणात क्रांतीकारक सुधारणा झाली. आज बहुतेक यंत्रे विजेवर चालत असली तरी ती वीज निर्माण करण्यासाठी दगडी कोळशाचाच उपयोग सर्वात जास्त होत असतो. रोजच्या जीवनात आपल्या दृष्टीलासुध्दा पडत नसल्यामुळे दगडी कोळसा हा देखील आपल्यासाठी लोखंडाइतकाच महत्वाचा आहे हे लक्षात येत नाही.

अशा या दगडी कोळशाचा महाराष्ट्रातील विद्युत केंद्रांमध्ये वीजनिर्मितीसाठी होणारा वापर या विषयावर भरलेल्या एका कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मला नुकतीच मिळाली. मला ठाऊक असलेल्या अनेक तांत्रिक बाबींची सविस्तर उजळणी त्यात झालीच, शिवाय मी यापूर्वी न पाहिलेल्या किंवा न ऐकलेल्या कांही नव्या जुन्या गोष्टी समजल्या. दगडी कोळशाच्या उत्खननाचा भाग सोडून त्यानंतर खाणीतून तो बाहेर आल्यापासून ते भट्टीत जळून खाक होईपर्यंत त्याच्या प्रवासाचा धांवता आढावा या कार्यशाळेत घेतला गेला. या कार्यशाळेत झालेल्या चर्चासत्रांमध्ये कांही प्रमाणात कोळशाचा पार भुगा करून टाकला गेला किंवा तो उगाळ उगाळ उगाळला गेला.

कोळसा म्हणजे कार्बन हे मूलभूत द्रव्य असे सर्वसाधारण समीकरण आहे. पण हे द्रव्य शुध्द स्वरूपात नसते. दगडी कोळशामध्ये इतर असंख्य प्रकारचे पदार्थ मिसळलेले असतात. त्यातले कांही पदार्थ जर मूल्यवान असतील तर कोळशापासून ते वेगळे काढणारी संयंत्रे निघाली असती. कदाचित ती निघाली असतीलही. पण या कार्यशाळेत तसा उल्लेख कोणाच्या भाषणात झाला नाही. कोळशाचे संपूर्ण रासायनिक पृथक्करण करून त्यातील सर्व मूलद्रव्ये वेगळी करण्याचे काम त्या संबंधी संशोधन करणा-या प्रयोगशाळांमध्ये होत असते. औद्योगिक उपयोगासाठी जे परीक्षण केले जाते त्यात मात्र कोळशातला ज्वलनशील भाग सोडून इतर सर्व कचरा असेच समजून आणि कोळशातील उपयुक्त द्रव्ये आणि त्रासदायक तत्वे एवढीच विभागणी करून त्यांचे प्रमाण मोजले जाते.

कोळशाची तपासणी करतांना पुढील घटक मोजले जातात. एक किलोग्रॅम कोळसा जाळून किती किलोकॅलरी ऊष्णता निर्माण होते हे मोजतात. त्याला कॅलरीफिक व्हॅल्यू असे म्हणतात. वीजनिर्मिती करण्यासाठी किती कोळशाची गरज आहे हे यावरून ठरते. एक किलो कोळसा जाळल्यानंतर किती राख शिल्लक उरते (अॅश कन्टेन्ट) हे महत्वाचे मोजमाप आहे, कारण या राखेचे प्रमाण खूप मोठे असल्यामुळे तिचे काय करायचे हा मोठा प्रश्न सोडवावा लागतो. कोळशामध्ये असलेली आर्द्रता मोजली जाते. ज्वलनापासून मिळालेल्या ऊर्जेचा कांही भाग या दंमटपणातून निघालेल्या वाफेची निर्मिती करण्यात खर्च होत असतो. शिवाय बॉयलरची रचना करतांना या गोष्टीचा विचार करावा लागतो. याखेरीज सल्फरसारख्या पर्यावरणाला हानीकारक अशा तत्वांची गणना केली जाते.

कोळशामधला इतर कचरा पंधरा वीस टक्क्यांएवढा असेल तर तो कोळसा उत्कृष्ट प्रतीचा समजला जातो आणि चाळीस पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत असल्यास त्याचा उपयोग वीजनिर्मितीसाठी केला जातो. याहूनही अधिक निकृष्ट दगडी कोळशाचा विचार या कार्यशाळेत केला गेला नाही. उत्कृष्ट प्रतीचा दगडी कोळसा भारतात फारसा मिळतच नाही. कधी काळी तो उपलब्ध असलाच तरी आतापर्यंत त्याचा साठा शिल्लक राहिलेला नसावा. एकाद्या कामासाठी चांगला कोळसाच हवा असेल तर परदेशातून तो आयात करावा लागतो.

दगडी कोळशाचे भूमीगत साठे आणि त्याचे उत्खनन करून उत्पादन या दोन्ही बाबतीत भारताचा समावेश जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या देशांत होतो, पण वीजनिर्मिती, इतर औद्योगिक प्रक्रिया आणि घरगुती वापर यांसाठी त्याचा होत असलेला वापर सुध्दा भरपूर प्रमाणात होतो. त्यामुळे त्याची कमतरता भासते आणि ती भरून काढण्यासाठी थोड्या प्रमाणात कोळशाची आयात करावी लागतेच. शिवाय कांही विशिष्ट प्रक्रियांमध्ये उत्कृष्ट प्रतीचा कोळसा वापरणे आवश्यक असते, तसेच प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कांही ठिकाणी फक्त विशिष्ट दर्जाचा कोळसाच वापरावा लागतो. मुंबई शहरात असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रातून निघणा-या धुरातून होणा-या प्रदूषणावर जे निर्बंध आहेत ते पाळण्यासाठी अत्यल्प प्रमाणात सल्फर असलेला कोळसाच जाळण्याची परवानगी आहे. त्यामुळे अशा खास प्रकारचा कोळसा आयात करावाच लागतो.

खाणीतून बाहेर काढलेला कोळसा प्रामुख्याने रेल्वेच्या मालगाड्यांमधून विद्युत निर्मिती केंद्रांपर्यंत वाहून नेला जातो. खाणींच्या अगदी जवळ असलेल्या कांही ठिकाणी तो ट्रॉली, ट्रक, ट्रेलर वगैरेंमधून पुरवला जातो. पॉवर स्टेशनमध्ये बसवलेल्या अवजड यंत्रांद्वारे तो रेल्वे वॅगनमधून काढून सरकत्या पट्ट्यांवरून थेट बॉयलरपर्यंत नेला जाऊ शकतो. पण कोळशाचे मालगाडीतून आगमन आणि बॉयलरमध्ये त्याचे ज्वलन या दोन्हींमध्ये सतत समन्वय साधणे जवळ जवळ अशक्य असल्यामुळे तो उतरवून घेतल्यानंतर केंद्राच्या आवारातच एका ठरावीक जागी ढिगारा करून साठवून ठेवतात आणि वेगळ्या यंत्राद्वारे तिथून उचलून बॉयलरकडे नेतात. परदेशातून कोळसा वाहून आणणा-या जहाजांना सामान्य गोदीत बर्थ मिळत नाही. खोल समुद्रात असलेल्या अँकरिंग पॉइंटवर ती जहाजे उभी करतात आणि तराफ्यांमधून तो कोळसा किना-यावरील जेटीवर आणतात. तिथून पुढे तो वेगवेगळ्या प्रकारे वाहून नेला जातो.

कोळसा इकडून तिकडे वाहून नेण्याच्या यंत्रणांमध्ये खूप विविधता असते. कांही ठिकाणी असलेले कुशल कामगार तो साध्या खो-या फावड्यानेच पण अत्यंत सफाईने हाताळतात असे सांगितले गेले तर एका केंद्रात आगबोटीतून आणि बार्जवरून आलेला सारा कोळसा स्वयंचलित यंत्राद्वारे परस्पर उचलून हस्तस्पर्शविगहित पध्दतीने साठवण्याच्या ठिकाणापर्यंत नेला जातो. या यंत्राची एक आगळीच गंमत आहे. आधी पहिल्या कन्व्हेयर यंत्राने बोटीतून उचललेला कोळसा एका आडव्या पट्ट्यावर ठेवला जातो. तो पट्टा पुढे सरकत असतांनाच त्याच्या कडा आंतील बाजूने दुमडून वळत जातात आणि त्या चपट्या पट्ट्याचा आकार एका गोलाकार पाइपासारखा होतो. दुस-या टोकाला पोचण्यापूर्वी तो पट्टा पुन्हा उलगडत जातो आणि आडव्या झालेल्या पट्ट्यावरून आलेला कोळसा पुढे जाऊन खाली पडतो. मधील काळात तो कोळसा पूर्णपणे बंदिस्त पाइपात असल्यामुळे त्याची धूळ इकडे तिकडे उडत नाही. अशा प्रकारचा पाइप कन्व्हेयर कांही किलोमीटर इतका लांबसुध्दा बनवता येतो. अर्थातच हा प्रकार जरा खर्चिक आहे.

. . . . . . . . . . . . (पुढील भाग उत्तरार्धात)

Friday, February 12, 2010

पंपपुराण भाग ४

लहानपणी उन्हाळ्य़ाच्या सुटीत रोज सकाळी आम्ही सगळी मुले गांवाबाहेर असलेल्या एकाद्या मळ्यातल्या विहीरीत पोहायला जात असू. आमच्या गांवात तरणतलाव नव्हता आणि कृष्णा नदी चार मैल दूर अंतरावर होती. गांवातल्या विहिरींचे पाणी लोकांच्या रोजच्या उपयोगात येत असल्यामुळे गणपती विसर्जन सोडून इतर कधीही कोणीही त्यात उतरत नसे. त्यामुळे आधी पोहायला शिकण्यासाठी आणि नंतर त्याची मजा घेण्यासाठी आम्हाला गांवाबाहेरच जावे लागे. पूर्वी या सगळ्या विहिरींवर बैलाने ओढायची मोटच चालत असे. उन्हाळ्याच्या दिवसात मळ्यात फारशी पिके नसल्यामुळे तीसुध्दा क्वचितच चालतांना दिसे. पुढे एका विहिरीवर पंपसेट बसवला गेला. तेंव्हा त्याचे सर्वांना प्रचंड अपरूप वाटले.


स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच्या त्या काळात आमच्या जमखंडी संस्थानावर एका कांहीशा पुरोगामी विचारांच्या आणि थोड्या प्रजाहितदक्ष अशा राजाची राजवट होती. गांवाला वीज आणि पाणीपुरवठा करण्याची तत्कालीन उपलब्धतेनुसार त्याने चांगली सोय करून ठेवली होती. गांवाला वीजपुरवठा करणारे एक पिटुकले पॉवर हाऊस होते. तेलाच्या इंजिनावर चालणारा जनरेटर सेट त्यात बसवलेला होता. संस्थाने खालसा झाल्यानंतर त्याला कोणी वाली उरला नसावा. बरेच वेळा ते पॉवर स्टेशन बंदच असायचे. अधून मधून कधी कधी ते अनियमितपणे चालायचे. त्यातून डीसी (डायरेक्ट करंट) विजेचा पुरवठा होत असे. व्होल्टेज हा शब्द कोणी ऐकलेला नव्हता. संध्याकाळी अतीशय मंद दिवे लागत तेंव्हा विजेचे प्रेशर कमी आहे आणि मध्यरात्री ते प्रखर उजेड देत तेंव्हा ते प्रेशर फार वाढले आहे असे समजले जात असे. तांत्रिक दृष्ट्या योग्य परिभाषा वापरली गेली नसली तरी कॉमन सेन्सला पटणारा हा अर्थ बरोबरच होता. विजेवर चालणारे कोणतेही उपकरण, अगदी पंखादेखील, कोणाच्या घरी नव्हता. कदाचित एकाद्याने एकादे यंत्र आणले असले तरी त्या अनिश्चित आणि कमीजास्त दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे ते लवकरच बंद पडले असेल. पुढे अनेक वर्षानंतर आमच्या गांवात एक मोठा ट्रान्स्फॉर्मर बसवला गेला आणि ग्रिडमधून एसी विजेचा पुरवठा सुरू झाला. यातला फरक समजावून देणारा कोणीच 'विंजनेर' गांवात नसल्यामुळे त्या वेळी आम्हाला त्याचा फारसा उलगडा झाला नाही. गांवाबाहेर असलेल्या शेतात वीजपुरवठा असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी पाहिलेला पहिला पंपसेट डिझेल इंजिनाला जोडलेला होता.

गांवापासून चार पांच मैल अंतरावर कृष्णानदीवर छोटासा बंधारा घालून एक बारमहा पाणी साठवणारा डोह बनवला होता आणि पंपाच्या सहाय्याने ते पाणी गांवालगतच्या मेरूगिरीलिंगप्पा डोंगराच्या माथ्यावर बांधलेल्या टांकीत नेले जात असे. त्या टांकीमधून ते घरोघरी नळाद्वारे येत असे. हे पंपिंग स्टेशन कांही मला कधीच पहायला मिळाले नाही, गिर्यागोहण करून आम्ही बरेच वेळा टांकीवर मात्र जात असू. धाब्याची घरे असल्यामुळे छतावर टाकी बांधण्याची कल्पनाही कोणी करत नसे. नळातून आलेले पाणी जमीनीलगत असलेल्या हौदात साठवून वापरले जात असे. त्यामुळे पाण्याचा पंप हा प्रकार मला गांवाबाहेर असलेल्या मळ्यातच पहिल्यांदा दिसला.

घरी पाहिलेल्यी रॉकेलच्या किंवा स्टोव्हच्या पंपापेक्षा हा खूपच निराळा दिसत होता. एका बाजूने त्याला जोडलेला लांबलचक पाईप विहिरीत खोलवर नेऊन सोडला होता आणि दुस-या बाजूचा छोटासा पाइपाचा तुकडा एका उथळ हौदात सोडून ठेवला असायचा. पंपाला जोडलेले इंजिन सुरू केले की विहीरीतले पाणी आपोआप त्या हौदामध्ये बदाबदा कोसळू लागायचे. तिथून पुढे पाटांमधून वळवत वळवत ते पाणी पिकांना दिले जात असे. इंजिन सुरू करण्यासाठी ते हँडल मारून फिरवले जाई. त्याआधी पंपात वरून पाणी ओतून तो पाण्याने भरला असल्याची खात्री केली जात असे. इंजिन सुरू होऊन भकाभका धूर काढू लागले की पंपातून बदाबदा पाणी बाहेर येत असतांना पहायला खूपच मजा वाटत असे. मग ते पाणी हाताने एकमेकांच्या अंगावर उडवण्याचा खेळ सुरू होत असे. मुले जरा जास्तच दंगा करत आहेत असे वाटले तर त्या मळ्याचा मालक दमदाटी करून त्यांना पिटाळून देत असे.


. . . . . . . . . . . (क्रमशः)

Monday, February 08, 2010

पंपपुराण - भाग ३


आमच्या घराजवळच एक सायकलचे दुकान होते; म्हणजे सायकली विकण्याचे नव्हे, त्या तासागणिक भाड्याने देण्याचे. तिथे काम करणारी मुले पंपाने सायकलींच्या चांकांमध्ये हवा भरतांना दिसायची. स्टोव्हची आग प्रखर करणे आणि सायकलची चाके टणक बनवणे हे त्या दोन कृतींचे अगदी वेगवेगळे उपयोग आहेत. पण वातावरणामधील हवेला एका बंदिस्त जागेत कोंबून तिचा दाब वाढवणे हे मात्र या दोन्हीं पंपांचे समान उद्दिष्ट असते. त्यामुळे त्यांची रचना आणि कार्यपद्धती या दोन्हींमध्ये खूप साम्य आहे. स्टोव्हचा पंप जेमतेम बोटभर असतो आणि तो सुध्दा टांकीच्या आंत घुसवून ठेवलेला असल्यामुळे त्याचे बारके टोक तेवढे बाहेरून दिसते. त्याला चिमटीत पकडून तो पंप मारायचा असतो. सायकलचा पंप चांगला हांतभर लांब आणि मनगटाएवढा रुंद असतो, शिवाय त्याला रबराच्या नळीचे दोन हात लांब शेपूट जोडलेले असते. त्या पंपाच्या स्टँडवर दोन्ही पाय भक्कमपणे रोवून उभे राहिल्यावर दोन्ही हातांनी त्या पंपाचा दांडा वर खाली करून हवा भरायची असते. ते काम करतांना अंगाला घाम फुटतो.

स्टोव्हचा पंप आडवा असतो आणि सायकलीच्या चांकांत म्हणजे तिच्या टायरच्या आंतील ट्यूबमध्ये हवा भरणारा पंप उभा धरून चालवतात एवढा फरक सोडला तर सिलिंडर, पिस्टन, वॉशर वगैरे त्याचे भाग स्टोव्हच्या पंपासारखेच पण मोठ्या आकाराचे असतात. चांकात भरलेली हवा पंपात परत येऊ नये यासाठी आवश्यक असलेली झडप सायकलच्या चाकाच्या ट्यूबलाच जोडलेली असते. ट्यूबमध्ये हवा भरण्यासाठी पंपाची नळी त्या व्हॉल्व्हला जोडतात. पंपाचा दांडा वर ओढतांना आजूबाजूची हवा सिलिंडरमध्ये शिरते आणि तो खाली दाबला की त्या हवेचा दाब वाढतो आणि व्हॉल्व्ह उघडून ती हवा सायकलच्या ट्यूबमध्ये भरली जाते. हवा भरून पंपाची नळी बाजूला केल्यानंतर तो व्हॉल्व्ह आंतील हवेला एकदम बाहेर जाऊ देत नाही. पण सायकलीचा उपयोग करतांना ती सूक्ष्म प्रमाणात हळू हळू लीक होते आणि तिचा दाब कमी होत जातो. त्यामुळे चांकाचे टायर मऊ आणि चपटे होऊ लागतात, ते आपल्याला जाणवते. ट्यूबला एकादे छिद्र पडले किंवा झिजून ती फाटली तर त्यातून आतली सगळी हवा फुसकन बाहेर पडते. त्या नंतर ट्यूबचे पंक्चर काढून किंवा ट्यूबच बदलून तिच्यात पंपाने हवा भरून तिला फुगवतात.

स्वयंचलित वाहनांच्या चांकामध्ये हवा भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर वेगळे यंत्र बसवलेले असते. त्याला मात्र काँप्रेसर म्हणतात. यातही एक गंमत आहे. बंदिस्त जागेतल्या हवेचा दाब वाढवण्यासाठी त्यात आणखी हवेला घुसवणारे यंत्र काँप्रेसर म्हणून ओळखले जाते, पण त्याच जागेत आधीपासून असलेली हवा बाहेर काढून तिथे निर्वात पोकळी पाहिजे असेल तर त्यासाठी वेगळे यंत्र लागते आणि त्याला व्ह्यॅक्यूम पंप असे संबोधतात. याचा अर्थ काँप्रेसर हा देखील पंपाचाच एक उपप्रकार आहे असे म्हणता येईल. हे पंपपुराण संपल्यानंतर त्यांचाही विचार करता येईल.

मी अगदी लहान असतांनासुध्दा आमच्या गांवाबाहेर एक पेट्रोल पंपसुध्दा होता; म्हणजे आम्ही त्याबद्दल ऐकले होते. पूर्वी संस्थान असतांना आपल्या गाड्यांना व्यवस्थित तेल पाणी मिळावे या उद्देशाने संस्थानिकांनी कदाचित तो प्रायोजित केला असावा. पण संस्थानांचे विलीनीकरण झाल्यानंतर गांवात खाजगी मालकीच्या फारशा मोटारगाड्या उरल्या नव्हत्या आणि बाहेरगांवाहून मोटारीत बसून येणा-यांची संख्याही नगण्यच असायची. मालवाहतूकीसाठी कधी तरी येणा-या ट्रकगाड्या आणि प्रवाशांची वाहतूक करणा-या सर्व्हिसच्या गाड्या याच तिथे जात असतील किंवा कदाचित तो बंदच पडला असेल. तिकडे फिरकण्याचे मला कांहीच कारण किंवा निमित्य मिळाले नसावे. त्यामुळे तो ऐतिहासिक पंप पाहिल्याचे आठवत नाही. पण गांवाची प्रगती होत गेली, नवनवे चांगले रस्ते तयार झाले, तसतशी वाहतूक वाढत गेली आणि माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत गांवाच्या वेशीच्या आंतच एक नवा पेट्रोल पंप उभा राहिला. तो बांधला जात असतांना पासून जाता येतांना दिसत असल्यामुळे जमीनीखाली मोठमोठ्या टांक्या बांधल्या आहेत आणि टँकरमधून आलेले तेल त्यात साठवले जाते एवढे समजले होते आणि रबराच्या एका नळीतून ते मोटारीच्या टँकमध्ये भरतात हे दिसत होते. ते भरतांना किती तेल भरले आहे हे दाखवणारा कांटा फिरतांना पाहतांना मजा वाटायची. पण यात 'पंप' कशाला म्हणायचे? हे कांही त्या वेळी समजले नाही. जमीनीखाली असलेले पेट्रोल त्या होजमधून वर कसे येऊ शकते असा भौतिकशास्त्रातला प्रश्नही त्या वयात मला त्रास द्यायला मनात आला नाही.

Sunday, February 07, 2010

पंपपुराण - भाग २


आमच्या घरात असलेला दुसरा पंप हा घरातल्या प्रायमस स्टोव्हचा एक भाग होता. तो समजून घेण्याआधी या स्टोव्हची थोडी माहिती द्यायला हवी. पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळातल्या ग्रामीण भागात घरोघरी खरोखरच फक्त मातीच्या चुलीच असत आणि जळाऊ लाकडे हे मुख्य इंधन असे. त्याखेरीज शेणाच्या गोव-या, सुकलेले गवत, कागदाचे चिटोरे, कापडाच्या चिंध्या, लाकडाचा भुसा, नारळाची करवंटी, भुईमुगाच्या शेंगांची फोलपटे यासारखे जे कांही ज्वलनशील पदार्थ घरात असतील ते सारे बंबातल्या किंवा चुलीतल्या अग्नीनारायणाला स्वाहा केले जात असत. पण चूल पेटवायला बराच वेळ लागत असल्यामुळे तांतडीच्या कामासाठी किंवा फक्त थोडा वेळ काम असेल तर त्यासाठी प्रायमस स्टोव्हचा उपयोग केला जाई. चूल, शेगडी वगैरे साधने स्वयंपाकघरातल्या धुराड्याखाली एका ठराविक जागी जिथे जमीनीवर मांडलेली असतात त्या जागीच त्यांचा उपयोग करता येतो, पण हा स्टोव्ह उचलून कोठेही सहज नेता येत असल्यामुळे घराच्या कुठल्याही भागात त्याचा उपयोग करता येत असे. तसेच गरज पडल्यास चूल आणि शेगडी यांना पूरक म्हणूनही त्याचा उपयोग होत असे. असे हे एक सर्वगुणसंपन्न साधन असायचे. आज आमच्या जीवनाचा अत्यावश्यक अंग बनलेल्या गॅस आणि विजेवर चालणा-या शेगड्या त्या काळात आम्हाला ऐकून सुध्दा ठाऊक नव्हत्या.

या प्रायमस स्टोव्हमध्ये वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पितळेची टांकी असते. तिच्यात रॉकेल भरायचे. त्या टाकीच्या मधोमध असलेल्या उभ्या नळीतून ते वर येऊन तिच्या तोंडाशी बसवलेल्या नॉझल्समधून त्याचा फवारा पसरतो. त्यापूर्वीच त्या रॉकेलचे बाष्पीभवन झालेले असल्यामुळे तो फवारा लगेच पेट घेतो आणि रॉकेलचे पूर्ण ज्वलन होऊन तीव्र ऊष्णता देणा-या ज्वाला त्यातून निघतात. टांकीला जोडलेल्या तीन उभ्या सळ्यांवर एक तबकडी ठेवलेली असते. त्या तबकडीवर स्वयंपाकाचे भांडे ठेवले जाते. टांकीतले रॉकेल नळीतून वर चढण्यासाठी टांकीतल्या रॉकेलवर हवेचा दाब दिला जातो. हवेचा दाब जितका जास्त असेल तितक्या जास्त वेगाने रॉकेल वर ढकलले जाते आणि त्या प्रमाणात ती ज्वाला प्रखर होते.

टांकीतल्या हवेचा दाब वाढवण्यासाठी पंपाचा उपयोग केला जातो. या पंपातसुध्दा एक लहानसा सिलिंडर (नळकांडे) आणि त्यात मागे पुढे सरकणारा पिस्टन (दट्ट्या) असतो. त्या दट्ट्याच्या तोंडाशी चामड्याचा खोलगट आकाराचा वायसर (वॉशर) बसवलेला असतो आणि सिलिंडरच्या दुस-या टोकाला फक्त आंतल्या बाजूला उघडणारा व्हॉल्व्ह असतो. पिस्टन बाहेर ओढतांना बाहेरील हवा वायसरच्या बाहेरच्या बाजूने सिलिंडरमध्ये खेचली जाते आणि पिस्टन पुढे ढकलतांना खोलगट आकाराचा वॉशर सिलिंडरला घट्ट दाबला जातो. त्यामुळे आंतली हवा बाहेर पडू शकत नाही आणि तिचा दाब वाढत जातो. जेंव्हा तो टांकीमधील हवेच्या दाबापेक्षा जास्त होतो त्यानंतर व्हॉल्ह उघडून जास्त दाबाची हवा टांकीत जाऊन तेथील हवेचा दाब अधिक वाढवते. अशा प्रकारे हवेचा दाब वाढवून स्टोव्हची आंच वाढवली जाते. स्टोव्हची आंच कमी करायची असेल तर टांकीमधील हवेचा दाब कमी करण्यासाठी एक चावी ठेवलेली असते. ती थोडी सैल करताच आंतली थोडी हवा बाहेर पडून तिचा दाब कमी होतो. त्यानंतर ती लगेच आवळली नाही तर सगळा दाब नाहीसा होऊन स्टोव्ह बंद पडतो. काम संपल्यानंतर या चावीचा उपयोग करूनच स्टोव्ह विझवला जातो.

स्टोव्हमधील रॉकेल जळून कमी होत जाते तसतशी टांकीतली रिकामी जागा वाढत जाते आणि त्यामुळे तिच्यात असलेल्या हवेचा दाब कमी होतो. व्हॉल्व्ह आणि चावीमधून सूक्ष्म प्रमाणात हवा बाहेर पडूनसुध्दा तिचा दाब कमी होत असतो. त्यामुळे जळत असलेल्या स्टोव्हला अधून मधून पंप मारावाच लागतो. तसे नाही केले तर हवेचा दाब कमी झाल्यामुळे रॉकेल नळीतून वर चढणार नाही आणि स्टोव्ह विझून जाईल. हा पंप मारण्यासाठी एका हाताने स्टोव्हची टांकी घट्ट धरून ठेवावी लागते आणि दुस-या हाताने थोडा जोर लावावा लागतो. स्टोव्ह हा प्रकारच थोडा धोकादायक असल्यामुळे लहान मुलांना त्याच्या जवळ जाण्याची परवानगी नसे. या पंपाबद्दल माझ्या मनात बरेच कुतूहल असले तरी तो हाताळण्यासाठी मला बरीच वर्षे वाट पहावी लागली.

Saturday, February 06, 2010

पंपपुराण - भाग १



माझा जन्म होण्याआधीच पंप या वस्तूने आमच्या घरात प्रवेश केला होता आणि तो रोजच्या वापरात होता. त्यामुळे मला समजायला लागल्यापासून पंप हा शब्द ओळखीचा होता. आमच्या घरात दोन लहानसे पंप असायचे, पण त्यातल्या एकाचाही पाण्याशी कांही संबंध नव्हता. किंबहुना त्यांचा पाण्याशी स्पर्शसुध्दा होता कामा नये अशी काळजी घेतली जात असे.

त्या काळात चार गॅलनच्या टिनाच्या चौकोनी डब्यातून केरोसीन किंवा घासलेट घरी आणले जात असे. आमच्या घरी त्याचा उल्लेख 'राकेल' या नांवाने होत असे. एका पंपाचा उपयोग करून ते राकेल त्या डब्यातून एका उभ्या बाटलीत काढले जात असे आणि त्या बाटलीतून ते रोजच्या उपयोगासाठी वापरले जात असे. यासंबंधातल्या सगळ्या वस्तू परदेशातून आल्या तेंव्हा त्यांच्या नांवाची मराठी रूपांतरे होत गेली. 'रॉक ऑइल' चे 'राकेल' झाल्यावर खोबरेलसारखेच ते एक प्रकारचे तेल झाले. अत्यंत दर्गंधी असल्यामुळे त्याचा उपयोग मात्र फक्त जाळण्यासाठी किंवा रंगांचे डाग काढण्यासाठी होत असे. 'गॅस लाईट' चे 'घासलेट' झाले, 'बॉटल'ची बाटली झाली. 'फनेल'च्या आकाराला 'नरसाळे' हा शब्द होता, पण बोलीभाषेत त्याला आम्ही 'नाळके' म्हणत होतो. 'पंप' हा आंग्ल शब्द मात्र 'संथ', 'कंद', 'संप' यासारखा वाटत असल्यामुळे मराठी भाषेत चपखल बसला. हा शब्द परभाषेतून आला असेल असे कधी वाटलेच नाही. त्या काळात आमची घ्राणेंद्रिये जरा जास्तच संवेदनाशील असल्यामुळे आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून रॉकेलचा डबा, बाटली, पंप आणि नाळके या सगळ्या वस्तू एका वेगळ्या खोलीतल्या कपाटात बंद करून ठेवल्या जात असत. गरज पडेल तेंव्हाच त्या बाहेर काढून काम झाल्यानंतर परत त्या जागी नेऊन ठेवल्या जात.

डब्यातून केरोसीन उपसण्यासाठी लागणा-या पंपाची रचना अगदी साधी सोपी असते. एका उभ्या नळकांडीच्या तळाला एक भोक ठेवलेले असते. त्यावर एक साधी झडप ठेवलेली असे. ती एकाच बाजूने उघडली जात असल्यामुळे पंपात आलेले रॉकेल डब्यात माघारी जात नाही. त्या पंपाच्या आत एक दट्ट्या असतो. एका बारीकशा सळीच्या तळाला एक पत्र्याची चकती जोडून तो तयार केलेला असतो. चिमटीत पकडून धरण्यासाठी ती सळी वरच्या टोकाला वाकवलेली असते. पंपाच्या वरच्या बाजूला एक तोटी बसवलेली असते. पंपाने वर खेचलेले तेल या तोटीतून बाहेर पडते.

डब्यातून रॉकेल काढण्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे डब्याच्या शेजारी बाटली ठेऊन तिच्या तोंडावर नरसाळे बसवले जाते. डब्याच्या वरच्या बाजूच्या एका कोप-यात असलेल्या लहानशा तोंडावरील झांकण उघडून तो पंप त्यातून आत सोडला की त्या पंपाच्या नळकांडीच्या तळाशी असलेल्या भोकामधून डब्यातले तेल पंपात शिरते. हाताने दट्ट्या वर उचलल्यावर त्याला जोडलेल्या चकतीच्या वर असलेला रॉकेलचा स्तंभ वर उचलला जातो आणि तोटीमधून ते तेल नरसाळ्यात पडून बाटलीत जाते. चकती आणि नळकांडे यामधील बारीक पोकळीतून ते या वेळी हळू हळू खाली पडत असते. पण दट्ट्या झटक्यात ओढल्याने बरेचसे रॉकेल त्याच्यासोबत वर उचलून बाहेर काढता येते. तो सावकाशपणे ओढला तर मात्र सर्व रॉकेल बाजूने खाली पडून जाईल आणि नरसाळ्यात कांहीच येणार नाही. डब्यातील रॉकेलची पातळी जसजशी खाली जात जाईल तसतसे त्याचे दर स्ट्रोकमध्ये पंपातून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होत जाते.

दट्ट्या खाली ढकलतांना मात्र याच्या उलट परिस्थिती असते. तो झटक्यात खाली ढकलला तर नळकांड्यामधील रॉकेलचा त्याला विरोध होतो आणि तो मोडून काढण्यासाठी जास्त जोर लावला तर पंपाच्या दट्ट्याची सळी वाकण्याचा किंवा तिला जोडलेली चकती निसटण्याचा धोका असतो. त्यामुळे तो किंचित कमी गतीने जरा जपून खाली ढकलायचा आणि झटक्यात वर ओढायचा अशा प्रकारचे थोडे कौशल्य या कामात लागते. डब्यातून बाटलीत रॉकेल काढण्याचे काम नेहमी घरातल्या मुलांकडेच असायचे. त्यामुळे कमीत कमी सेकंदात किंवा कमीत कमी स्ट्रोक्समध्ये बाटलीभर रॉकेल कोण काढतो याची त्यांच्यात चढाओढ असायची. पण बक्षिस म्हणून हे कामच गळ्यात पडले आहे हे लक्षात आल्यावर तो मुलगा चँपियनचा इन्स्ट्रक्टर बनून लहान भावाला तयार करायच्या प्रयत्नाला लागत असे.

. . . . . . . . (क्रमशः)

Tuesday, February 02, 2010

निकष

आपल्या पुराणात एक मजेदार आणि बोधप्रद रूपककथा आहे. एक ऋषी आपल्या तपश्चर्येत मग्न असतांना एक उंदराचे पिल्लू येऊन त्याच्या अंगाखांद्यावर बागडू लागले. आता या लहानशा पिल्लाला शिक्षा तरी कशी करायची असा विचार करून त्या ऋषीने आपल्या तपोसामर्थ्याने त्याचे रूपांतर एका कन्यकेत केले. ती मुलगी वाढून वयात आली तेंव्हा कुठल्याही बापाप्रमाणे तो ऋषीसुध्दा तिच्या विवाहाच्या विचाराला लागला. जगातील सर्वश्रेष्ठ पुरुषाबरोबर तिचे लग्न लावावे असे त्याने ठरवले आणि याबाबतीत त्या मुलीच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने तिच्याबरोबर बोलतांना हा विषय काढला. जगातील सर्वात तेजस्वी असा सूर्यनारायण तिला कसा वाटतो असे विचारल्यावर ती उद्गारली, "पण एक काळा ढग सुध्दा त्याचे तेज झाकून टाकतो. तो कसा सर्वश्रेष्ठ असेल?"
पुढे जाऊन "त्या ढगाला एका जागी स्थिर उभेसुध्दा राहता येत नाही. वारा त्याला जिकडे नेईल तिकडे तो जातो.", "वा-याचे सुध्दा उंच पर्वतापुढे कांही चालत नाही. तो वा-याला अडवतो"
वगैरे झाल्यावर "मग नगाधीश तुला चालेल कां?" या प्रश्नावर उत्तर आले, "त्याच्या अंगावर छिद्रे पाडून त्या बिळात उंदीर राहतात, त्यांना देखील तो पर्वत काही करू शकत नाही." ही गोष्ट समोर आली. उंदराचा उल्लेख करतांना ती मुलगी छानशी लाजली. हे पाहून त्या ऋषीने तिला पुन्हा तिचे मूळ रूप परत दिले आणि मूषकराजाबरोबर विवाह करून ती उंदरी त्याच्या बिळात सुखाने रहायला गेली."

श्रेष्ठता आणि क्षुद्रपणा ठरवतांना कसे सापेक्ष निकष लावले जातात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. सूर्याची तर दोन्ही बाजूंनी पंचाईत आहे. ढगाआड जाऊन तो निष्प्रभ होतो आणि त्याचे निरभ्र आभाळात तळपणारे ऊनही सहन होत नाही. "तुझे मै चाँद कहता था मगर उसमे भी दाग है।" असे म्हणून चंद्राला नाकारून झाल्यावर "तुझे सूरज मै कहता था मगर उसमेंभी आग है।" असे म्हणून शायर त्याचाही निकाल लावतो. राम आणि कृष्ण या महाविष्णूच्या अवतारांनासुध्दा त्यांच्या अवताराच्या काळातच टीकेला सामोरी जावे लागले होते. "रामाने आपल्या कर्तव्यात कसूर केली" असा आक्षेप एका धोब्याने घेतला आणि शिशुपालाने श्रीकृष्णाला शंभर दूषणे दिली होती. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कथांमधील प्रसंगांचा आजकाल काय काय अर्थ लावला जात आहे हे पाहिल्यावर कदाचित "संभवामि युगे युगे।" या कृष्णाने दिलेल्या आश्वासनावर त्याला पुनर्विचार करावेसे वाटेल.

देवादिकांची ही कथा असली तर मनुष्य म्हणजे सद्गुण आणि दुर्गुण, क्षमता आणि न्यूनता यांचे गाठेडेच असणार. त्यातही अर्थातच वर लिहिल्याप्रमाणे चांगले वाईट ठरवण्याचे माझे निकष इतरांपेक्षा वेगळे असणारच. एकाद्या माणसाबद्दल लिहितांना त्याच्यातला मला न आवडलेला भाग सोडून द्यायचा, मला खुपलेल्या भागाबद्दल फार तर एकादा चिमटा काढायचा, पण कडाडून हल्ला करायचा नाही असे धोरण या ब्लॉगवर लिहितांना मी ठरवले आहे. वाईट साईट लिहिल्यामुळे उगाच कुणाच्या तरी भावना दुखवल्या जायचा धोका कशाला पत्करायचा? कोणाबद्दल चांगले लिहितांना मात्र "वचने किम् दरिद्रता?" या सुभाषितानुसार त्याला जरासे झुकते माप दिले. पण अप्रस्तुत आणि अतीशयोक्त असे कांही लिहिले असेल असे मला वाटत नाही.

माझ्या आयुष्यात जी माणसे मला भेटली त्यातल्या कांही सर्वसामान्य माणसांमधले असामान्य गुण त्यांच्याबरोबर दीर्घकाळ घडलेव्या स्नेहसंबंधातून माझ्या नजरेला पडत गेले, तर कांही महान लोकांबरोबर घडलेल्या पांच दहा मिनिटांच्या भेटीतच त्यांच्यामध्ये असलेल्या दिव्यत्वाची प्रचीती आली. अशा कांही निवडक माणसांची व्यक्तीचित्रे मी 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेत काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी अनेक लोकांबद्दल पुढे लिहिणार आहे. आभाळाएवढी उंची असलेल्या या माणसांचे पायसुध्दा जमीनीलाच टेकलेले आहेत हे मला जाणवले असले तरी ते मुद्दम नमूद करण्याचे कारण नव्हते. त्याखेरीज मला भावलेल्या कांही सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल लिहितांना कलाविश्वातल्या संबंधित लोकांचा परिचय करून दिला तेव्हा त्यांच्याबद्दल चार चांगले शब्द लिहिले आहेत. यातल्या कोणीसुध्दा मला ते करायला सांगितले नाही, कारण कधीकाळी मी कुठेतरी कांही तरी लिहिणार आहे हे मला स्वतःलाच माहीत नव्हते. त्यासाठी त्यांनी मला कांही लालूच दाखवायचा तर प्रश्नच नाही.

कोणाबद्दल चार चांगले शब्द लिहिल्यामुळे दुसरेच कोणी माझ्यावर नाराज होईल असे मला चुकूनही वाटले नव्हते. पण हा गैरसमजसुध्दा आता दूर झाला. बक्षिससमारंभाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांबद्दल आदरच व्यक्त करायची प्रथा आहे. त्याची ओळख करून देतांना त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीमत्वाची आणि कामगिरीची आठवण काढणे या प्रथेला धरून आहे. एका हरहुन्नरी व्यक्तीबद्दल लिहितांना आजच्या काळातली अशी दुसरी अष्टपैलू व्यक्ती माझ्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आली नाही असे मी लिहिले आणि ते खरेच आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करता करता तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन केले आणि त्या निमित्याने व्यवस्थापनकौशल्य आणि अर्थशास्त्र या विषयांचे बिगरीचे धडे घेतले. एक श्रोता आणि प्रेक्षक या नात्याने रंगमंच आणि पडद्याच्या आजूबाजूला घुटमळत राहिलो. त्यामुळे या क्षेत्रांमधील नामवंतांची नांवे मला परिचयाची असली तरी ती वेगवेगळी आहेत. या चारही क्षेत्रांत वावरणारी दुसरी व्यक्ती मला तरी भेटलेली नाही.

त्या व्यक्तीला मी कांही 'थोर' किंवा 'महान' वगैरे विशेषणे लावली नव्हती किंवा 'सर्वश्रेष्ठ' म्हंटले नव्हते. तरीसुध्दा भूतकाळातल्या कांही महात्म्यांचे दाखले देऊन त्यांना तुम्ही कसे ओळखणार? त्यांनी तुमच्यापुढे बक्षिसाचा तुकडा कुठे टाकला होता? असे प्रश्न उपस्थित करून माझी जागा मला दाखवून दिली. देशभक्ती, नेतृत्वक्षमता, त्याग, निष्ठा वगैरे महान गुण आणि अनेक विषयांचा सखोल अभ्यास करून एकाच वेळी त्यात पारंगत होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यांचे मोल ठरवण्याचे निकष वेगवेगळे असतात. त्यातही ज्या महात्म्यांना पूजेच्या देव्हा-यात स्थान मिळाले आहे त्यांची तुलना मर्त्य मानवाबरोबर करता येत नाही कारण आपण सर्वसामान्य लोक त्यांच्याबद्दल त्रयस्थपणे विचार करू शकत नाही.

"पुस्तके काय कोणीही लिहील आणि आजकाल कुणाचाही सन्मान आणि सत्कार केला जातो, तेंव्हा त्याला काही अर्थ नाही" असे प्रतिपादन केले गेले. कुठलेही अभ्यासपूर्ण पुस्तक न वाचताच ते लिहिणारा लेखक विद्वान नसेलच, त्याने केवळ उचलेगिरी केली असणार असे ठरवून टाकायचे आणि अनेक ठिकाणी त्याला मिळालेला सारा मानमरातब त्याने वशीलेबाजी आणि कारस्थाने करून प्राप्त केला असणार असे गृहीत धरायचे झाले तर मग कोणाचा चांगलेपणा ठरवायचा तरी कसा? त्यासाठी कोणता निकष वापरायचा? चांगली माणसे फक्त इतिहासकाळातच होऊन गेली का? देवाने आपला चांगली माणसे तयार करायचा कारखाना आता बंद करून ठेवला आहे का? असे प्रश्न पडतात. 'जुने ते सोने' ही म्हण ऐकली होती, पण 'फक्त जुने तेवढेच सोने' हा निकष पटणारा नाही.