Wednesday, September 02, 2009

यंदाचा आमचा गणेशोत्सव

फार पूर्वीपासून म्हणजे माझ्या जन्मापूर्वीपासून आमच्या घरी पांच दिवसाचा गणेशोत्सव होत आला आहे. आमचे घर बांधतांनाच त्यातल्या सोप्याच्या मधोमध एक खास 'गणपतीचा कोनाडा' ठेवण्यात आला होता. एकादा लहान मुलगा त्यात चढून बसू शकेल इतका तो रुंद, उंच आणि खोल होता. त्याच्या आजूबाजूच्या भिंतीसुध्दा थोड्या सजवलेला होत्या. एरवी त्यात इतर शोभेच्या किंवा अत्यावश्यक वस्तू ठेवल्या जात. गणेशचतुर्थीच्या आधी तो रिकामा करून रंगरंगोटी करून तयार ठेवला जाई. घरातली मुले आपले कलाकौशल्य पणाला लावून दरवर्षी नवे मखर आणि इतर सजावट करीत असत. कॉलेजला गेल्यानंतर दिवाळीला घरी जायचे असायचे. त्यापूर्वी गणपतीसाठी एक वेगळी ट्रिप करणे शक्य नसल्यामुळे स्थानिक नातेवाईकांना भेट देणे आणि सार्वजनिक गणेशोत्सवांची आरास पहात तिथले थोडे गाण्याबिण्याचे कार्यक्रम पाहणे एवढाच माझा गणेशोत्सवात सहभाग होत असे. लग्न करून घर थाटल्यानंतर दोन खोल्यांच्या इवल्याशा घरात गणपतीची पिटुकली मूर्ती आणून आमचा वेगळा घरचा गणेशोत्सव सुरू केला. बदलत्या परिस्थितीनुसार दरवर्षी कांहीतरी नवे आणि चांगले करण्याच्या प्रयत्नामधून त्यात सुधारणा होत गेली.
सेवानिवृत्तीनंतर प्रशस्त सरकारी निवास सोडून लहानशा सदनिकेत रहायला गेलो. त्यानंतर कांही महिन्यांनी एक मोठे दुखणे येऊन गेले. २००६ च्या गणेशोत्सवापर्यंत मी त्यातून हळूहळू मार्गावर येत होतो, पण अजून हिंडू फिरू लागलो नव्हतो आणि काही काम करायला अंगात फारसे त्राण नव्हते. त्यामुळे नव्या घरात पुन्हा एकदा लहान प्रमाणात गणेशोत्सव सुरू केला. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे २००७ साली पुण्याला मुलाकडे गणपती ठेवायचे ठरवले. सर्वांनी खूप उत्साहात हा सण साजरा केला. मागल्या वर्षी घरात आम्ही दोघेच राहिलो होतो, त्यामुळे जुन्या आठवणी काढत आणि शेजारपाजारच्या लोकांना बोलवत गणेशोत्सव साजरा केला.
यंदा मात्र पुन्हा एकदा गणेशचतुर्थीला घराचे गोकुळ झाले होते. त्यामुळे सर्वांच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले होते. पण आता दिवस बदलले आहेत. पूर्वीप्रमाणे आपल्या कलाकौशल्याला वाव देऊन कांही नवी निर्मिती करण्याला तितकेसे महत्व राहिलेले नाही. उगाच आपल्या डोक्याला ताप देण्यापेक्षा बाजारातून रेडीमेड वस्तू आणणे सोईचे वाटते. नाना प्रकारची मखरे आणि सजावट करण्यासाठी असंख्य प्रकारच्या सुबक आणि झगमगीत गोष्टी बाजारात खचाखच भरलेल्या असतात. उपलब्ध जागा आणि खिशाचा विचार करून त्यातल्या कांही आणल्या आणि फटाफट जोडून टाकल्या. गणपतीच्या नैवेद्यापुरते एक दिवस तळलेले आणि एकदा उकडीचे मोदक घरी केले होते. त्याशिवाय पुण्याहून चितळे बंधूंची आंबाबर्फी आणि बाकरवडी आणली होती, हल्दीरामची सोनपापडी, बिकानेरची दाळमोठ आणि गुलाबजाम, शिवकृपाचे फरसाण आणि काजू कटली, गोडबोल्यांचे लाडू आणि शंकरपाळी, आणखी कोठले कांही, कोठले कांही अशा नाना त-हेच्या मिठाया आणि नमकीन खाद्यवस्तूंची लयलूट होती. या निमित्याने अनेक आप्तेष्ट येऊन भेटून गेले. त्या गडबडीत पाच दिवसाचा उत्सव कसा संपला ते कळलेच नाही.
ब्लॉगगिरी सुरू केल्यापासून दरवर्षी गणेशोत्सवात कांही तरी प्रासंगिक लिहायचे असे ठरवले होते. पहिल्या वर्षी म्हणजे २००६ साली घरबसल्याच वृत्तपत्रे आणि टीव्हीवर जेवढे गणेशोत्सव पाहिले त्यावरून गणेशाच्या 'कोटी कोटी रूपां'वर एक लेखमालिका लिहिली. सलग अकरा दिवस मी स्वतः, माझा संगणक आणि आंतर्जाल सक्षम राहिलो आणि रोज एक लेख लिहून तो ब्लॉगवर टाकू शकलो ही त्या श्रीगणेशाची कृपाच. पुढील वर्षी मी मुंबईत नव्हतोच, पण आधीपासून थोडी तयारी केली आणि आंतर्जालावर भ्रमण करून थोडी शोधाशोध केली आणि पुण्याला राहूनच रोज एक गजाननाचे गीत ब्लॉगवर टाकत राहिलो. मागल्या वर्षी 'गणेशोत्सव आणि पर्यावरण' या विषयावर एक लेखमाला लिहिली होती. या वर्षी काय करायचे किंवा काय करता येईल हे ठरत नव्हते. योगायोगाने काही विचार सुचले, कांही जुने कागद हाताशी लागले आणि त्यातून 'आधी वंदू तुज मोरया', 'मूषक आणि माउस', 'लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव' हे लेख लिहिले गेले. आणि आजचे हे पुनरावलोकन.

1 comment:

www.in-marathi.com said...

kolhapur mahalaxmi
https://www.kolhapurmahalaxmi.com/2019/12/kolhapur-mahalaxmi-temple-history.html