Saturday, June 20, 2009

न्यू जर्सी (उत्तरार्ध)


मी म्हंटले, "ओके, न्यूजर्सी हे एक शहर आहे आणि नेवार्क हे इथल्या एअरपोर्टचं नांव आहे अशी माझी समजूत होती. पण न्यूजर्सी हे स्टेटचे नांव आहे तर नेवार्क काय आहे?"
"ओह, नेवार्क हे एक शहर आहे आणि लिबर्टी इंटरनॅशनल हे तिथल्या एअरपोर्टचे नांव आहे, पण ते जेएफकेएवढे विशेष प्रचलित नाही." सौरभने माहिती दिली.
"तुमचं हे पारसिपानी म्हणजे न्यूजर्सी शहराचे उपनगर असेल असेही मला वाटले होते." माझी आणखी एक शंका मी व्यक्त केली.
"पारसिपानी हे एक स्वतंत्र शहर आहे आणि ते न्यूजर्सीमध्येच येते, पण नेवार्कशी त्याचा कांही संबंध नाही."
माझ्या अज्ञानाचे पापुद्रे निघत गेले. बरेच वेळा ऐकीव माहितीचे असेच होते याचा मला अनुभव आहे. कांही लोक मात्र कुठेतरी कांहीतरी अर्धवट ऐकलेल्याच्या आधारावर ठामठोक विधाने करत असतात आणि ती बरोबरच आहेत म्हणून वाद घालतात तेंव्हा ऐकतांना मजा येते.
"तुमच्या पारसिपानीत मुसोलिनी, मार्कोनी यासारख्या इटालियन लोकांची वस्ती आहे कां?" मी गंमतीने विचारले.
त्याच अंदाजात त्याने उत्तर दिले, "इटालियन आहेत की नाहीत ते माहीत नाही, पण लाखानी, अंबानी यासारखे गुजुभाई मात्र भरपूर आहेत, थोडे अडवानी गिडवानीसुध्दा आहेत."त्यांच्या भागात अनिवासी भारतीयांचे (एनआरआयचे) वास्तव्य मोठ्या संख्येने आहे. कांही मराठी लोकसुध्दा आहेत, पण सर्वाधिक संख्या तेलुगूभाषिकांची आहे. शहरातून फिरतांनादेखील शहा, पटेल, भाटिया वगैरे नांवांच्या पाट्या बंगल्यांवर आणि दुकानांवर दिसत होत्या. ही मंडळी पूर्वीच येऊन इथे स्थायिक झाली होती आणि त्यांनी तिथे मालमत्ता संपादन केली होती. पूर्वीच्या पिढीत आलेले जास्त करून गुजराथी आणि नव्या पिढीतले अधिकांश आंध्रवासी असेच प्रमाण मी अल्फारेटालासुध्दा पाहिले.

दुपारचा चहा घेऊन शहरात भटकायला बाहेर पडलो तेंव्हा हवेत गारवा असला तरी वातावरण प्रसन्न होते. पण हे हवामान आता थोडेच दिवस असे राहणार होते. थंडी वाढून हिमवर्षाव सुरू झाला आणि दिवस लवकर मावळून अंधार पडायला लागला की संध्याकाळी असे मजेत फिरायला मिळणार नव्हते. म्हणूनच मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडलेले दिसले. त्यात पुन्हा भारतीय वंशाचेच खूप दिसले. अमेरिकन लोकांना पायी चालावे असे कधी वाटले तर ते आता बहुधा मोटारीत बसून जिममध्ये जातात आणि ट्रेडमिलवर वर्कआउट करतात, किंवा त्यासाठी घरातल्या एकाद्या खोलीत त्यांनी सगळ्या प्रकारची यंत्रे आणून ठेवली असतील. महानगरांमध्ये आपली गाडी पार्किंग लॉटमध्ये ठेवून कामाच्या जागेकडे तरातरा चालत जाणारे लोक दिसतात, पण मनात कसलाही उद्देश नसतांना रस्त्यातून केवळ रमतगमत फिरण्यातला आनंद बहुतेक भारतीयांनाच अनुभवता येत असावा. त्यात कांही मराठी माणसेसुध्दा दिसली, पण आता त्याचे एवढे अप्रूप वाटत नाही. त्यातून आम्ही त्या जागी चार दिवस राहणार असतो तर ती वेगळी गोष्ट होती, पण आम्हाला दुसरे दिवशीच निघायचे होते. पुन्हा कधी आम्ही अमेरिकेत आलो, त्यावेळी पारसीपानीला जवळचे कोणी रहात असले आणि त्यांना भेटायचे
ठरले तर पुन्हा त्या गांवी येण्याची संभावना होती, ती अर्थातच कमीच होती. कदाचित आम्हाला दिसलेली मराठी मंडळीसुध्दा अशीच एकदोन दिवसांसाठी तिथे आलेली असतील आणि त्यांनी असाच विचार केला असेल, त्यामुळे त्यातल्या कोणांबरोबर संवाद साधला गेला नाही.

पारसीपानी हे एक टुमदार म्हणावे असे शहर आहे. एवढ्या आकाराची जवळ जवळ शंभर शहरे फक्त न्यू जर्सीतच आहेत आणि न्यू जर्सी तर यूएसएच्या नकाशात नीट दिसतसुध्दा नाही, इतके लहान राज्य आहे. यावरून कल्पना येईल, असे असले तरी सर्व प्रकारच्या सुखसोयी तिथे उपलब्ध आहेत. मोठ्या शहरांमध्ये जास्तीत जास्त एफएसआय मिळवण्यासाठी आजकाल कदाचित सरळसोट चौकोनी इमारती उभ्या केल्या जात असाव्यात. लहान लहान गांवात मात्र आता फार सुरेख बंगले पहायला मिळतात. भारतात मैसूरला मला असाच अनुभव आला होता. पारसीपानीलासुध्दा कांही बंगल्याच्या वास्तू अत्यंत प्रेक्षणीय वाटल्या. गांवात अमेरिकन पध्दतीची अनेक दुकाने होती, त-हेत-हेची हॉटेले होती, त्यात चिनी तर होतीच, एक भारतीयसुध्दा होते. अनेक घरांच्या माथ्यावर किंवा समोर अमेरिकेचे राष्ट्रध्वज लावलेले होते. कांही ठिकाणी न्यू जर्सी संस्थानाचा वेगळा ध्वजसुध्दा लावलेला दिसला. ही सारी खाजगी मालमत्ता होती, सरकारी कार्यालये नव्हती. त्यामुळे त्याचे नवल वाटले. अमेरिकेत झेंडा लावण्याचे वेगळेच प्रस्थ आहे. अमेरिकेच्या झेंड्यातले स्टार अँड स्ट्राइप्स रंगवलेल्या असंख्य प्रकारच्या वस्तू आणि कपडे बाजारात मिळतात, लोक ते विकत घेता
त आणि हवे तसे वापरतात. त्यामुळे त्या ध्वजाचा अवमान होत नाही किंवा कोणाच्या नाजुक भावना त्यात दुखावल्या जात नाहीत.

पारसीपानीला एक विस्तीर्ण तलाव आहे. तलावाच्या काठाकाठाने फिरण्यासाठी छानसा रस्ता बांधला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत त्यात नौकाविहार करता येतो, मासे पकडायची व्यवस्था सुध्दा आहे. हिंवाळा सुरू झाल्यामुळे माणसांसाठी त्या बंद झाल्या होत्या, पण करकोच्यासारखा एक उंच मानेचा पक्षी ध्यान धरून उभा होता. आमच्यासमोर त्याला मत्स्यप्राप्ती झालेली दिसली नाही. आमची चाहूल लागताच तो भुर्रकन दूर उडून गेला. त्या भागात इतर जलाशयसुध्दा आहेत. पारसीपानी शहराच्या जवळच पाण्याची एक प्रचंड टाकी बांधलेली आहे. त्यातून बहुधा आजूबाजूच्या गांवांनासुध्दा पाणीपुरवठा होत असेल. तो टँक अमक्या नांवाच्या मेयरने बांधला असे त्या टाकीच्या भिंतीवर चांगल्या हातभर उंच अशा मोठमोठ्या ठळक आणि बटबटीत अक्षरात लिहिलेले वाचून मजा वाटली. बाजूच्या रस्त्यावरून सुसाट वेगाने धांवणा-या गाडीतील लोकांनासुध्दा वाचता यावे यासाठी ही योजना असावी. प्रसिध्दी मिळवण्याचा केवढा सोस ?

न्यू जर्सीहून परत आल्यानंतर त्या भागासंबंधी थोडीशी माहिती गुगलवरून काढली. न्यूयॉर्क हे महानगर त्याच नांवाच्या राज्याच्या आग्नेयेकडील अगदी टोकावर आहे. त्याला अगदी खेटून न्यू जर्सी हे एक वेगळे चिमुकले संस्थान आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्याचा पार सत्तेचाळीसाव्वा क्रमांक लागतो. अमेरिकेच्या नकाशात ते शोधून काढावे लागते. लोकसंख्येच्या बाबतीत मात्र त्याचा सातवा क्रमांक लागतो. अर्थातच हा तुलनेने दाट वस्तीचा प्रदेश आहे. नेवार्कपासून पारसीपानीपर्यंत आणि पारसीपानीपासून न्यूयॉर्कपर्यंत जेवढ्या भागात आम्ही फिरलो त्यात कोठेच अवाढव्य शेते किंवा घनदाट वृक्षराईने नटलेली जंगले दिसली नाहीत. कुठे दाट तर कुठे विरळ अशी मनुष्यवस्तीच जवळजवळ सलगपणे सगळीकडे दिसत होती. अधून मधून अमक्या शहराची हद्द इथे संपते आणि तमक्या शहराची हद्द सुरू होते अशा पाट्या वाचून आपण एका गांवातून दुस-या गांवात प्रवेश केला असे समजायचे. आपल्याकडील जिल्ह्याहून लहान आणि साधारणपणे तालुक्याएवढ्या आकाराच्या भूभागाला तिकडे काउंटी म्हणतात. न्यूयॉर्कच्या पश्चिमेकडे ईसेक्स कौंटीमध्ये नेवार्क शहर आहे. त्याच्या पलीकडे मॉरिस नांवाच्या काउंटीमध्ये असलेल्या पारसीपानीला आम्ही गेलो होतो. नेवार्क हे न्यूजर्सीमधले सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असले तरी या संस्थानाची राजधानी पार पश्चिमेकडल्या मर्सर कौंटीमध्ये असलेल्या ट्रेंटन या लहान शहरी आहे. हडसन कौंटीमधले जर्सी सिटी हे मोठे शहर तर न्यूयॉर्कचाच भाग वाटावा इतके त्याला जोडून आहे. सुप्रसिध्द स्वातंत्र्यदेवीचा पुतळा न्यूयॉर्कला आहे असले म्हंटले जात असले तरी तो ज्या द्वीपावर आहे ते लहानसे बेट न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या दोन्ही राज्यांच्या किना-यांपासून अगदी जवळ आहे. त्या बेटावरून पाहिल्यास न्यूयॉर्कचा मॅनहॅटन भाग आणि जर्सी सिटी बाजूबाजूला दिसतात, त्यामुळे दोन्ही ठिकाणच्य़ा लोकांना त्या पुतळ्याबद्दल आत्मीयता आहे. नकाशात पाहिले तर न्यूयॉर्क शहराचा कांही भाग न्यूजर्सी स्टेटने वेढलेला दिसतो, तर जर्सी सिटी न्यूयॉर्क स्टेटचा भाग वाटते. या भागाच्या राज्यपुनर्रचनेचा विचार कोणी केला नसावा.

4 comments:

Anonymous said...

न्युअर्क या नावाचा उल्लेख नेवार्क करण्यामागे काय कारण आहे?

Anand Ghare said...

या जागेबद्दल मला कांही माहिती नव्हती हे मी लिहिलेले आहेच. भारतात व न्यूजर्सीमध्ये असतांना मी इतर लोकांच्या बोलण्यात नेवार्क असेच नांव ऐकले म्हणून तसे लिहिले. न्यूअर्क हा उच्चार असल्याचे मला माहीत नाही. तो तरी बरोबर आहे की याची मला खात्री वाटत नाही.

Anonymous said...

इटालियन आहेत की नाहीत ते माहीत नाही????

Kaka, NY khalokhal NJ madhyech sarvat jasti Italian rahatat. (tabbal 15 lakh).


http://en.wikipedia.org/wiki/Italian_Americans

Anand Ghare said...

छान. माझे गेसवर्क बरोबरच होते. माहितीसाठी आभार.