मला पहिल्यापासूनच प्रवासाची आवड आहे. प्रवास करण्यात मला कसलाही त्रास वाटत नाही किंवा कधी कंटाळा येत नाही अशा नकारार्थी कारणांमुळे नव्हे तर त्यात पहायला मिळणारी अनुपम दृष्ये, कानावर पडणारे मंजुळ ध्वनी, चाखायला मिळणारे चविष्ट खाद्यपदार्थ, भेटणारी वेगवेगळी माणसे आणि निरनिराळ्या वातावरणात रहाण्याचा मिळणारा अनुभव या सर्वांमधून जी एक सर्वांगीण अनुभूती होते ती मला सुखावते. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या निमित्याने मी प्रत्येकी कांहीशेहे वेळा परगांवी जाऊन आलो आहे. असे असले तरी नोकरीत असेपर्यंत कधीही सलग दोन तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ बाहेरगांवी जाऊन तिथे राहिलेलो मात्र नव्हतो. मला तशी संधीच मिळाली नसेल असे कोणी म्हणेल, किंवा नाइलाजाने कुठेतरी जाऊन राहण्याची आवश्यकता पडली नसेल असेही कोणी म्हणेल. दोन्हीही कारणे खरीच असतील, तसे घडले नाही एवढे मात्र खरे.
सेवेतून निवृत्त झाल्यानंतर घरी परतण्याची एवढी घाई नसायची आणि त्यासाठी सबळ अशी कारणे देता येत नव्हती त्यामुळे हा कालावधी चार पाच आठवड्यांपर्यंत लांबत गेला. मागच्या वर्षी मुलाला भेटून येण्यासाठी अमेरिकेला जायचे ठरले तेंव्हा त्यासाठी सहा आठवडे एवढा कालावधी माझ्या मनात आला होता. त्यासंबंधी सखोल अभ्यास, विश्लेषण वगैरे करून त्यावर मी कांही फार मोठा विचार केला होता अशातला भाग नव्हता, पण सहा आठवड्याहून जास्त काळ आपण परदेशात राहू शकू की नाही याची मला खात्री वाटत नव्हती. उन्हाळ्यात अमेरिकेतले हवामान अनुकूल असते, त्यामुळे बहुतेक लोक तिकडे जायचे झाल्यास उन्हाळ्यात जाऊन येतात, पण आम्हाला गेल्या वर्षी ते कांही जमले नाही. उद्योग व्यवसायात आलेली जागतिक मंदी आणि अमेरिकेची होत चाललेली पीछेहाट पाहता पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत वाट न पाहता त्याआधीच जाऊन यायचे ठरले. शिवाय उद्या कुणी पाहिला आहे हा एक प्रश्न होताच. घरातला गणेशोत्यव झाल्यानंतर इकडून निघायचे आणि दिवाळी साजरी करून कडाक्याची थंडी सुरू होण्याच्या आधी परतायचे असा माझा बेत होता.
आमच्या चिरंजीवांच्या डोक्यात वेगळे विचारचक्र फिरत होते. आमचे अमेरिकेला जायचे नक्की झाल्यापासून सर्व संबंधित दस्तावेज गोळा करून त्यासाठी लागणारी सरकारी अनुमती मिळवणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रवासाला निघण्यासाठी बांधाबांध करणे यात कित्येक महिन्यांचा काळ लोटला होता. एवढ्या सायासाने अमेरिकेला जाऊन पोचल्यानंतर तिथे सहा महिने राहण्याची परवानगी मिळाली होती तिचा पुरेपूर फायदा आम्ही घेतला पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. तर्कदृष्ट्या ते अगदी बरोबर होतेच आणि तशी त्याची मनापासून इच्छा होती. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे 'पोटापुरता पसा' तो 'देणा-याच्या हांता'ने अगदी घरबसल्या मिळत होता आणि 'पोळी पिकण्या'साठी मी भारतातसुध्दा कसलीच हालचाल करत नव्हतो. अमेरिकेत तर मला कुठलाही कामधंदा करून अर्थार्जन करायला तिकडच्या कायद्याने बंदी होती. तसे झाल्याचे आढळल्यास तडकाफडकी माझी उचलबांगडी करण्यात येईल असा दम मला प्रवेश करण्याची परवानगी देतांनाच भरला गेला होता. माझा तसा इरादाही नव्हता. मी स्वतःला इथल्या कुठल्या समाजकार्यात गुंतवून घेतलेले नव्हते. इथे भारतात राहतांना मी लश्करच्या भाक-या कधी भाजल्या नाहीत तेंव्हा परदेशात जाऊन कुणा परक्यासाठी कांही करायला मी कांही अमेरिकन नव्हतो. त्यामुळे इथे असतांनाही माझा सगळा वेळ स्वतःच्या सुखासाठी आणि आपल्या माणसांसाठी यातच खर्च होत असे आणि ते करणे मला अमेरिकेतसुध्दा शक्य होते. मग भारतात परत जायची घाई कशाला करायची? या युक्तीवादाचा माझ्यापाशी तोड नव्हती.
अमेरिकेतील आमचे वास्तव्य अत्यंत सुखासीन रहावे यासाठी मुलाने चंगच बांधला होता असे दिसत होते. भारतात आमच्या घरात असलेल्या एकूण एक सुखसोयी तिथे उपलब्ध होत्याच, त्या चांगल्या दर्जाच्या असल्यामुळे सहसा त्यात बिघाड उत्पन्न होत नसे. पाणी टंचाई, विजेचे भारनियमन यासारख्या कारणांमुळे त्या कधी बंद ठेवाव्या लागत नसत. यात घरकाम आणि आराम करण्याची साधने आली तसेच करमणुकीचीसुध्दा आली. तिकडच्या टेलीव्हिजनवर शेकडो वाहिन्यांवर चाललेले कार्यक्रम लागायचे, शिवाय दीडशेच्या वर चित्रपट 'ऑन डिमांड' म्हणजे आपल्याला हवे तेंव्हा पाहण्याची सोय होती. भारतात जर आपल्याला पहायचा असलेला चित्रपट टीव्हीवर लागणार असेल तर आधीपासून ठरवून त्या वेळी करायची इतर कामे बाजूला सारून टीव्हीच्या समोर फतकल मारून बसावे लागते आणि दर दहा मिनिटांनी येणा-या जाहिराती पहाव्या लागतात तसे तिथे नव्हते. आपल्या सोयीनुसार आपल्याला हवा तेंव्हा तो पाहता येत असेच, शिवाय वाटल्यास आपणच पॉज बटन दाबून त्यात लंचब्रेक घेऊ शकत होतो. ब्लॉकबस्टर नांवाच्या कंपनीकडून दोन नवीन सिनेमांच्या डीव्हीडी घरपोच येत, त्या पाहून झाल्यानंतर दुकानात देऊन आणखी दोन डीव्हीडी निवडून घ्यायच्या आणि त्या परत केल्या की लगेच आणखी दोन नव्या डीव्हीडी घरी यायच्या अशी व्यवस्था होती. त्यातून नवनव्या तसेच गाजलेल्या जुन्या चित्रपटांचा एक प्रवाहच वहात होता असे म्हणता येईल.
असे असले तरी इतके इंग्रजी पिक्चर्स पाहण्यात आम्हाला रुची नसेल म्हणून हवे तेवढे हिंदी चित्रपट पहायची वेगळी व्यवस्था होती. मुलाने भारतातून जातांनाच अनेक सीडी आणि डीव्हीडी नेल्या होत्या, इतर जाणा-या येणा-यांकडून मागवल्या होत्या, तसेच आमच्याकडील हिंदी आणि मराठी डिस्क आम्ही नेल्या होत्या. अशा प्रकारे घरात जमवून ठेवलेला ब-यापैकी मोठा स्टॉक होताच, त्याशिवाय आता अमेरिकेतसुध्दा हिंदी चित्रपटांच्या डीव्हीडीज विकत किंवा भाड्याने मिळू लागल्या आहेत. मुलाच्या मित्रांच्याकडून कांही मिळाल्या आणि किती तरी सिनेमे चक्क इंटरनेटवर सापडले. यापूर्वी आयुष्यातल्या कुठल्याही तीन महिन्यात, अगदी कॉलेजात असतांनासुध्दा पाहिले नसतील इतके हिंदी, मराठी आणि इंग्रजी सिनेमे मी या वेळी अमेरिकेत पाहून घेतले.
सिनेमा पाहणे हा मनोरंजनाचा एक थोडा जुना झालेला भाग झाला. आज टेलिव्हिजन पाहणे हा एक मनोरंजनाचा भाग न राहता जीवनाचा भाग बनून गेला आहे. आपली आवडती मालिका पाहिल्याखेरीज चैन पडेनासे झाले आहे. पण कांही हरकत नाही. भारतात जे कार्यक्रम पाहण्याची संवय जडली आहे तेसुध्दा वॉच इंडिया नांवाच्या वेबसाइटवर जगभर दाखवले जातात. त्याचेही सभासदत्व घेऊन ठेवले होते. भारतात रात्री प्रक्षेपित होत असलेले कार्यक्रमच आम्ही मुख्यतः पहात असू, पण त्यावेळी अमेरिकेत सकाळ असे एवढा फरक होता. त्यामुळे आपली रोज सकाळी करायची कामे विशिष्ट कार्यक्रमांच्या वेळा पाहून त्यानुसार करीत होतो.
निवृत्तीनंतर रिकामेपणाचा उद्योग म्हणून आणि कांही तरी करीत असल्याचा एक प्रकारचा आनंद प्राप्त करण्यासाठी मी ब्लॉगगिरी सुरू केली आहे. त्यात खंड पडू नये याची संपूर्ण व्यवस्था करून ठेवली होती. अमेरिकेत दुर्लभ असलेली मराठी (देवनागरी) लिपी घरातल्या संगणकावर स्थापित झाली होती. अत्यंत वेगवान असे इंटरनेट कनेक्शन तर चोवीस तास उपलब्ध होतेच. एकाच कॉम्प्यूटरवर टेलिव्हिजन पाहणे आणि लेखन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येणार नाहीत म्हणून चक्क एक वेगळा संगणक घरी आणला.
बहुतेक दर शनिवार रविवार आसपास असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यात जात असे. आता भारतातसुध्दा मॉल संस्कृती आली आहे, तिकडे ती पूर्णपणे विकसित झालेली आहे. त्यामुळे एक एक मोठा मॉल किंवा स्टोअर म्हणजे एक भव्य असे प्रदर्शनच असते. सगळीकडे दिव्यांचा झगमगाट, अत्यंत कलात्मक रीतीने सजवून आणि व्यवस्थित रीतीने मांडून ठेवलेल्या वस्तू पहातांना मजा येते. त्यातले शोभेच्या वस्तू असलेले दालन म्हणजे तर एकादे म्यूजियमच वाटावे इतक्या सुंदर कलाकुसर केलेल्या वस्तू तिथे पहायला मिळतात. त्या दुकानांत कोणीही वाटेल तितका वेळ हिंडावे, कांही तरी विकत घ्यायलाच पाहिजे असा आग्रह नाही. इतक्या छान छान गोष्टी पाहून आपल्यालाच मोह होतो यातच त्यांचे यश असते. दिवसभर भटकंती केल्यानंतर बाहेरची खाद्यंतीही ओघानेच आली. त्यासाठी मेक्सिकन, इटॅलियन ते चिनी आणि थाय प्रकारची भोजनगृहे आहेतच, पण उत्कृष्ट भारतीय भोजन देणारी निदान चार पांच हॉटेले मिळाली.
अशा प्रकारे आमची मजाच मजा चालली असली तरी घरी परतायची एक ओढ लागतेच. शिवाय घरात करता येण्याजोग्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करता आली तरी घराबाहेरचे वातावरण कांही आपल्याला बदलता येत नाही. कडाक्याच्या थंडीशी जमवून घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती आपला हात दाखवते आणि शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्यानंतर तो त्रास सहन करणे सुखावह वाटत नाही. अशा कारणांमुळे मी योजलेले सहा आठवडे आणि मुलाने ठरवलेले सहा महिने म्हणजे सव्वीस आठवडे यातला सोळा हा सुवर्णमध्य अखेर साधला गेला आणि अमेरिकेत गेल्यापासून सोळा आठवड्यांनी आम्ही अमेरिकेचा निरोप घेऊन जानेवारीच्या अखेरीस आम्ही मातृभूमीकडे परत आलो. यादरम्यान तिकडे पाहिलेल्या कांही जागांची वर्णने मी या ब्लॉगवर केलेली आहेत. उरलेले अनुभव हळू हळू सांगत राहणार आहे.
2 comments:
छान लिहिलं आहे.
काका, एक सांगू काय? ब्लॉग वर थोडे रंग आणि थोडासा मोठा फॉण्ट वापरलात तर वाचणार्यांना अजुन मजा येईल.
आत्ता पांढरा रंग आणि भरपूर मजकूर असल्यापेक्षा अजुन थोडसं चांगलं वाटेल कदाचित!
आपल्या सूचनांबद्दल आभारी आहे. मी आधीच मोठा फॉंट वापरला आहे. आय.ई.च्या टूल्सचा वापर करून आपण त्याला अजून मोठा करू शकता. पूर्वी मी बॅकग्राउंड कलर वापरत असे, पण त्यामुळे अक्षरे स्पष्ट दिसत नाहीत अशी तक्रार आल्यामुळे कृष्णधवल पट निवडला.
Post a Comment