Friday, June 05, 2009

ग्रँड युरोप - भाग ३५


सहप्रवासी -2


मुंबईचीच एक पितापुत्रांची जोडी होती. त्यातील शोडशवर्षीय अद्वैत हा अजून विद्यार्थीदशेत होताच. त्याचे वडीलसुद्धा इतर सर्व प्रवाशात वयाने सर्वाधिक तरुण होते. म्हणजे वयाने सर्वात ज्येष्ठांची एक जोडी होती तशीच सर्वात लहानांची एक जोडीच होती. ते लोक यापूर्वी पूर्व आशियामधील देशांच्या सहलीला जाऊन आले होते. अशा प्रकारे अद्वैतच्या सुदैवाने एवढ्या लहान वयात त्याला भरपूर जग पहायला मिळाले होते. या ग्रुपमध्ये इतर सगळे लोक त्याच्या वडिलांपेक्षा मोठे, कांहीतर आजोबांच्या वयाचे असल्याने त्याला समवयस्क सवंगड्यांची साथ नव्हती. पण आपले असे एकटेपण त्याने कधी जाणवू दिले नाही. नेहमी सर्वांचा आदर राखून तो सर्वांशी आपलेपणाने वागत होता. कोठलीही गोष्ट सर्वांना वाटायची असेल ते काम तो आपणहून करायचा, कोणाला लागेल ती मदत करायला हंसतमुखाने तत्पर असायचा. नव्या पिढीतल्या, विशेषतः आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या घरातील मुलांबद्दल जो कांही समज प्रसारमाध्यमातील नाटकसिनेमा किंवा मालिकांमधील पात्रांद्वारे करून दिला जातो, तसा तो अजीबात नव्हता. त्यामुळे तो तर सगळ्याच प्रवाशांचा लाडका झाला होता. त्याच्या वडिलांनासुद्धा छायाचित्रणाचा प्रचंड सोस होता. त्यांच्य़ा गळ्यात किंवा हातात सतत कॅमेरा असायचाच. साल्झबर्गला कॅथेड्रलमधील सुंदर कलाकृतींची चित्रे घेता घेता ते मागेच राहून गेले आणि बाकीचे लोक कोठल्या दिशेने पुढे गेले ते न समजल्याने शोधत राहिले. बरेच अंतर गेल्यानंतर आमच्याही ते लक्षात आले आणि त्यांचा शोध सुरू झाला. बराच वेळ रहस्यमय वातावरणात गेल्य़ावर एकदाचे ते सांपडले. पण तोपर्यंत अद्वैत धीरगंभीरपणे आमच्याबरोबर उभा होता. त्याने गांगरून जाऊन हलकल्लोळ वगैरे कांही केला नाही. आम्ही दोघे अखेरचे होतो. अलकाकडे दोन हुकुमाचे एक्के होते. एक तर तिने शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अनेक वर्षे घालवलेली असल्याने तिच्या गायनाला खूप मागणी होती. अहीरभैरव रागाच्या रागदारीपासून ते मराठी लावणीपर्यंत वेगवेगळ्या ढंगाची गाणी तिने ऐकवली. दुसरे म्हणजे यापूर्वी पाश्चिमात्य जगात जाऊन आलेली ती एकमेव महिला होती. त्यामुळे सगळ्या ठिकाणी आपला अनुभव सांगण्याचा आणि विचार व मते मांडायचा हक्क तिला मिळाला होता, तो तिने बजावून घेतला. माझ्या स्वतःबद्दल काय सांगणार? हा ब्लॉग वाचणा-या मित्रांना थोडा अंदाज आलाच असणार! याच सहलीमध्ये केसरीचा दुसरा ग्रुप सगळीकडे आमच्या मार्गानेच फिरत होता. अनेक जागी ते लोक भेटत असत. स्विट्झर्लंडमधील आल्प्सच्या शिखरांवर आम्ही एकत्र गेलो आणि सर्व नौकाविहारांमध्ये आम्ही बरोबर असत असू. गोंधळ टाळण्यासाठी 'संदीप ग्रुप' आणि 'विवेक ग्रुप' असे त्यांचे नामाभिधान करून घेतले होते. 'विवेक ग्रुप'बहुभाषिक असल्याने त्यांचा कारभार हिंदी माध्यमातून चालत होता. कडेवरच्या बाळापासून ते शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणारी वेगवेगळ्या वयातली मुलेमुली त्या ग्रुपमध्ये होती. अहमदनगरहून आलेल्या जोडप्याचे बाळ फारच गोड होते. त्या बाळाचा दुडूदुडू धांवणारा चपळ दादासुद्धा बरोबर होता. दोघांचेही सगळे लोक खूप कौतुक करीत. प्रवासात या मुलांच्या जेवणखाण्यासाठी खास व्यवस्था करावी लागत असे. ते त्यासाठी जय्यत तयारीनिशी आले होते. शक्य तितक्या जागी त्यांच्यासाठी ताजा गुरगुट भात किंवा खिचडी शिजवून घेत. त्याशिवाय गरम पाण्यात किंवा दुधात मिसळून लापशी बनवण्यासारखे अनेक पदार्थ त्यांनी तयार करून आणले होते. त्यासाठी त्यांची दीड महिना आधीपासून तयारी चालली होती असे त्यांनी सांगितले. दोन मुलांना सांभाळत त्यांनी सहलीचा पुरेपूर आनंद घेतला. समोरच्या 'विवेक ग्रुप'मधील जोडप्याबरोबर जेवताना गप्पा चालल्या होत्या. नाटक, सिनेमा, मालिका वगैरे विषय यासाठी बरा असतो. ते सगळ्यांना माहीत असतात आणि त्यात व्यक्तीगत असे कांही नसल्याने कांहीही बोलायला कोणाला संकोच वाटत नाही. समोरच्या लोकांची अंगकाठी, चेहेरेपट्टी, वेषभूषा वगैरेवरून मी त्यांना गुजराथी समजत होतो. ते मला कोण समजत होते ते माहीत नाही. आमचे बोलणे हिंदी, इंग्रजी, मराठी अशा मिश्रणातून चालले होते. कुठल्याशा नटाच्या संदर्भात ते म्हणाले, "मराठी नसूनसुद्धा तो किती फ्ल्यूएंटली मराठी बोलतो नाही कां?" अनवधानाने मी बोलून गेलो,"हो. ते तर खरंच, पण तुम्हीसुद्धा छान मराठी बोलता." "म्हणजे काय? आम्ही पक्के मराठीच आहोत." ते उद्गारले. त्यानंतर आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. अशी विविध प्रकारची माणसे या सहलीच्या निमित्ताने भेटली. चार घटिका मौजमजा करणे एवढाच सर्वांचा समान उद्देश असल्यामुळे हलके फुलके बोलणे होत होते. सगळे लोक सुशिक्षित व सुसंस्कृत असल्याने विनम्रतेने वागत होते. त्यात मान अपमान, रुसले फुगवे येण्याचे कारण नव्हते. कोणाबरोबर घनिष्ठ संबंधही जुळले नाहीत की कोणाशी वितुष्ट निर्माण झाले नाही. वेगवेगळ्या वागण्याच्या त-हा मात्र पहायला मिळाल्या. प्रेक्षणीय स्थळे पहातांना मिळालेला हा बोनस होता.

No comments: