Monday, June 29, 2009

सांचीचे स्तूप - भाग ३

अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी भारतात चांगलेच हातपाय पसरवले होते. मोगलाई आणि मराठेशाही लयाला चालली होती. त्यांच्या प्रमुख सरदारांना राजेपद आणि नबाबी देऊन इंग्रजांनी आपले मांडलिक बनवले होते. त्या राजांना संरक्षण, मदत, सल्ला वगैरे देण्याचे निमित्य करून जागोजागी इंग्रज अंमलदार पेरून ठेवले होते आणि त्यांच्या दिमतीला कवायती फौजा दिल्या होत्या. जे याला तयार झाले नाहीत त्यांची राज्ये खालसा करून इंग्रजांच्या अधिपत्याखाली आणण्याचा सपाटा चालवला होता. सन १८१८ मध्ये त्यांनी पुण्यातली पेशवाई कायमची बुडवली त्याच वर्षी भोपाळच्या नवाबाच्या पदरी असलेल्या जनरल टेलरला सांचीचा स्तूप अचानक सापडला. टेहेळणी करण्याकरता तो तिथल्या टेकडीवर चढून गेला असतांना झाडाझुडुपांच्या आत लपलेल्या स्तूपाचा भाग त्याला दिसला. झाडेझुडुपे तोडून आणि दगडमातीचा ढिगारा बाजूला केल्यावर त्याला स्तूपाचा आकार दिसला आणि त्याने त्या गोष्टीची नोंद केली.

त्या पुरातन वास्तूच्या आत एकादा खजिना गाडून ठेवला असल्याची भूमका उठली आणि त्याच्याबरोबरच त्या द्रव्याचे रक्षण करणारी एकादी दैवी किंवा पैशाचिक शक्ती त्या जागी वास करत असल्याच्या वावड्याही उठल्या. त्यांना न जुमानता कांही धीट भामट्यांनी स्तूपाच्या आतमध्ये आणि आजूबाजूला बरेच खोदून पाहिले आणि खजिन्यांऐवजी अस्थी किंवा राखेने भरलेले कलश मिळाल्यावर कपाळाला हात लावला आणि हाताला लागेल ते उचलून नेले. या सगळ्या गोंधळात येथील प्राचीन ठेव्याचा बराच विध्वंस झाला. अशोकाने स्तूप बांधतांना त्याच्या समोर दगडाचा एक सुरेख स्तंभ उभा केला होता. त्याचे तुकडे नंतर शेजारच्या गावातल्या जमीनदाराकडे मिळाले. तेलबियांमधून तेल गाळण्यासाठी किंवा उसाचा रस काढण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात होता म्हणे.

इंग्रजी राज्य स्थिरस्थावर झाल्यानंतर ब्रिटीशांच्या केंद्रीय सरकारमध्ये पुरातत्वशाखेची स्थापना करण्यात आली आणि त्या खात्यातर्फे या जागी योजनाबध्द रीतीने उत्खनन आणि साफसफाई करून जमीनीखाली दडलेली देवळे, स्तूप, कमानी, निवासस्थाने वगैरे काळजीपूर्वक रीतीने शोधून काढण्यात आली. पडझड जालेल्या सर्व स्तूपांची डागडुजी आणि आवश्यक तेवढी पुनर्बांधणी करून त्यांना पूर्वीची रूपे देण्यात आले. या कामाचे सर्वाधिक श्रेय सर जॉन मार्शल यांनी सन १९१२ ते १९१९ या काळात केलेल्या अभूतपूर्व अशा कामगिरीला जाते. त्यांनी पाया घालून दिल्यानंतर पुढे आलेल्या संशोधकांनी हे काम चालू ठेवलेच आणि आजही ते चाललेले आहे. जागतिक कीर्तीच्या पुराणकालीन अवशेषांमध्ये म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सांचीचा समावेश होतो आमि जगभरातले अभ्यासू या जागंला भेट देण्यासाठी इथे येतात.

इतस्ततः सापडलेले कमानींचे तुकडे गोळा करून आणि जोडून त्या उभ्या करण्यात आल्या. अशोकस्तंभ मात्र पुन्हा एकसंध करता येण्यासारखा नसल्यामुळे खंडितच राहिला. त्याचा जमीनीलगतचा खालचा भाग स्तूपाच्या जवळच जमीनीत गाडलेल्या स्थितीत आहे. मधला मोठा तुकडा आडवा करून एका शेडमध्ये ठेवला आहे आणि चार दिशांना चार सिंहाची तोंडे असलेला शीर्षभाग म्यूजियममध्ये ठेवला आहे. आतून भरीव असलेले स्तूपसुध्दा कालौघात अभंग राहिलेले नव्हते त्या ठिकाणी बांधकाम करून उभारलेली देवळे टिकणे शक्यच नव्हते. त्यामुळे ती सगळी भग्नावस्थेत सापडली आणि त्याच अवस्थेत राखून ठेवली आहेत. उभे असलेले सुंदर खांब, कांही तुळया, चौकटी, कोनाडे, शिखरांचे भाग वगैरेवरून तत्कालिन वास्तुशिल्पकलेचा पुरेसा अंदाज येतो. त्यातली कोणतीच वास्तु आकाराने भव्य नाही, पण ज्या आकाराच्या दगडांचा वापर त्यात केलेला दिसतो ते पाहता कोणत्याही यांत्रिक सहाय्याशिवाय या शिला खडकातून खोदून कशा काढल्या असतील, कशा तिथवर आणल्या असतील आणि कशा रीतीने खांबांवर चढवल्या असतील याचे कौतुक वाटते. एका जागी रांगेत ओळीने उभ्या असलेल्या सात आठ उंच खांबांवर सरळ रेषेत मोठमोठ्या फरशांच्या तुळया मांडून ठेवल्या आहेत. त्यांना पाहून अशा प्रकारच्या ग्रीक व रोमन अवशेषांची आठवण येते.

पूर्वीच्या काळातल्या मठांच्या अस्तित्वाच्या खुणा अनेक ठिकाणी दिसतात. त्यातील एका मुख्य जागी एक संपूर्ण मठच उत्खननातून बाहेर निघाला आहे. या आयताकृती जागेत सरळ रेषेत अत्यंत प्रमाणबध्द अशा अनेक लहान लहान चौकोनी खोल्या दगडांच्या भिंतीतून बांधल्या होत्या. देशविदेशातून आलेले बौध्द धर्माचे विद्वान, प्रसारक आणि विद्यार्थी तिथे राहून अध्ययन, अध्यापन, ध्यानधारणा वगैरे गोष्टी करत असतील. मठाच्या या इमारतींना लागूनच एक अवाढव्य आकाराचा दगडी कटोरा ठेवला आहे. सर्व भिख्खूंना मिळालेले अन्न त्यांनी त्यात टाकायचे आणि सर्वांनी मिळून ते भक्षण करायचे असा रिवाज त्या काळी असावा.

या जागी केलेल्या उत्खननात अगणित नाणी, मातीच्या भांड्यांचे तुकडे वगैरे मिळाले आहेत. अनेक लहान मोठ्या आकाराच्या दगडी प्रतिमा आहेत. त्यातील कांही बहुतांश शाबूत आहेत, कांहींचे थोडे तुकडे निघाले आहेत, तर कांही छिन्नविछ्छिन्न अवस्थेत आहेत. अनेक शिलालेख आहेतच, शिवाय खांब, तोरण वगैरेंवर लिहिलेला बराच मजकूर स्पष्टपणे दिसतो. पण तो बहुधा ब्राम्ही लिपीत असल्यामुळे आपल्याला वाचता येत नाही आणि पाली भाषेत असल्यामुळे कळणारही नाही. पुरातत्व खात्याच्या दृष्टीने सांची हे फार महत्वाचे ठिकाण आहे. त्यांचे तज्ज्ञ या सगळ्यांचा सुसंगत अर्थ लावून त्यातून निष्कर्ष काढत असतात.

.... . . . . . . (क्रमशः)

No comments: