Friday, June 05, 2009

ग्रँड युरोप - भाग ३५

सहप्रवासी 1
युरोपच्या या सहलीमध्ये आमचा बत्तीसजणांचा समूह होता. सगळ्याची एकमेकांशी औपचारिक ओळख करून झालेली होतीच. प्रवासात असतांना बसमध्ये झालेल्या विविधगुणदर्शनाच्या कार्यक्रमांतून कांही लोकांच्या अंगच्या कलाकौशल्याची माहिती झाली. एकत्र फिरतांना किंवा जेवतांना जवळ बसलेल्या लोकांशी गप्पा व्हायच्या. नवीन माणसांबरोबर झटकन घनिष्ठ मैत्री जुळायचे वय कोणाचेच राहिले नव्हते. तरीही दोन आठवडे एकत्र राहतांना थोडी आत्मीयता निर्माण होतेच. रोजच्या संपर्कातून एकेकाचे थोडे थोडे स्वभावविशेष कळत गेले. त्यातले कांही आवडले, कांही खटकलेही असतील. जे आतापर्यंत लक्षात राहिले ते या भागात थोडक्यात सांगायचा प्रयत्न आहे. खरे तर सगळ्यांची नांवानिशी माहिती देण्याचा माझा विचार होता, पण त्यांची संमती घेतल्याखेरीज तसे करणे योग्य न वाटल्यामुळे टोपणनांवांचाच उपयोग करणार आहे.
आमच्या समूहातील कांही लोक दीर्घकाळ नोकरी करून सेवानिवृत्त झालेले होते. त्यांची मुले मोठी होऊन त्यांनी आपापले संसार थाटलेले असल्याने ते आपल्या प्राथमिक प्रापंचिक जबाबदा-यामधून जवळ जवळ मुक्त झालेले होते. आता कोठे त्यांना पूर्ण वेळ स्वतःकरता जगण्याची पहिली संधी मिळाली होती आणि त्याचा ते पुरेपूर उपभोग घेत असतांना दिसत होते. व्यावसायिक मंडळी मात्र बरेच वेळा आपापल्या कामाच्या संदर्भात टेलीफोनवर चौकशा आणि चर्चा करीत असत व निर्णय किंवा सल्ला देत असत. कांही लोकांची मुले अजून लहान होती. त्यांनासुद्धा रोजच्या रोज घरची खबरबात घेतल्याशिवाय चैन पडत नसे. एकत्र बसलेले असतांना फोनवर होत असलेल्या बोलण्यातले एक दोन शब्द कानांवर पडून त्यातले एवढे लक्षात येत असे. या लोकांच्या समस्या आणि जबाबदा-या त्याच्यासोबत इकडे आलेल्या असल्याचे जाणवत होते. यातील कांही लोकांचे मोबाईल फोन तांत्रिक कारणांमुळे तिकडे चालत नव्हते, त्यामुळे प्रत्येक जागी पोचल्यावर आधी फोनची सोय कशी होते हे शोधून काढून ते लोक तिकडे धांव घेत होते. आमच्या बत्तीस जणांच्या समूहात तेरा पतिपत्नींची जोडपी होती. सत्तरी ओलांडलेले मालाडचे काका आणि तिच्या जवळपास आलेल्या काकी हे दोघे सर्वात ज्येष्ठ होते. पण दोघेही अबोल वाटल्यामुळे त्यांचे अनुभवाचे बोल ऐकण्याची फारशी संधी मिळाली नाही. परिचय करून देतांनाही त्यांनी स्वतःबद्दल विशेष माहिती दिली नाही की नंतर कोठल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात खास उत्साह दाखवला नाही. त्यांना कोणत्या विषयात विशेष रस आहे तेच मला कधी समजले नाही आणि बोलण्याला एक समान सूत्र मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर माझा फारसा संवाद साधला गेला नाही.
बोरिवलीहून आलेल्या जोडप्याबरोबर मात्र त्यांचे चांगले सख्य जमले होते. हे गृहस्थ रिझर्व्ह बँकेतून सेवानिवृत्त झाले होते, त्यामुळे परकीय चलन यासारख्या विषयावर अधिकारवाणीने बोलत होते. झुंजार मनोवृत्ती असल्याने त्यांनी ग्राहकांच्या समस्या सोडवण्याच्या चळवळीमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली होती. ते मात्र सर्वांबरोबर मिळून मिसळून रहात होते. गप्पागोष्टीत आणि थट्टामस्करीत सहभागी होत होते. आपले मजेदार अनुभव सांगत होते. बोलता बोलता आम्हा दोघांच्याही परिचयाच्या अशा एक तिस-या व्यक्तीचा संदर्भ निघाला, त्यामुळे आमच्यातील जवळीक किंचितशी वाढली.
मुंबईतलेच एक पोलीस खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी होते. या सहलीला ते एकटेच आले होते. त्यामुळे ते आलटून पालटून इतर सर्वांशी हवापाणी यासारख्या सर्वसामान्य विषयांवर बोलत होते. नोकरीत असतांना पोलिस अधिकारी, गुन्हेगार, नेते आणि जनता या सर्वांबरोबर त्यांचा खूप संपर्क आलेला असणार. पण त्यांच्याबद्दलच्या आपल्या अनुभवाचा किस्सा त्यांनी कधीही सांगितला नाही की कोठल्या ज्वलंत विषयावर मतप्रदर्शन केले नाही. प्रशासकीय गोपनीयतेचे ते पुरेपूर पालन करीत होते. फक्त विमानतळावरील इमिग्रेशन चेकसाठी रांगेत उभे असतांना पूर्वी कांही काळ ते त्या केबिनच्या आंत बसून इतरांचे पासपोर्ट पहात होते, आता त्यांना बाहेर उभे राहून स्वतःचा पासपोर्ट दाखवावा लागतो आहे, एवढे सांगितले. पहिल्यांदा आमची दोघांची गांठ सहार विमानतळावरच पडली होती. त्या वेळेस ते नव्या ओळखी करून घ्यायला खूप उत्सुक दिसत होते, पण विमानतळावर आल्यानंतर आयत्या वेळी केसरीने दिलेले फराळाचे सामान आणि महत्वाची कागदपत्रे आपल्या सामानांत नीट जमवून ठेवण्यासाठी मी चार बॅगा उघडून बसलेलो होतो आणि गोंधळलेल्या स्थितीत असल्याने हवा तसा प्रतिसाद देऊ शकत नव्हतो. माझे काम आटोपेपर्यंत आमच्या प्रयाणाची वेळ होऊन गेली.
पुण्याहून आलेले कविवर्य कृषीक्षेत्रातील उच्च पदवीधारक होते आणि सेवेतून निवृत्त होईपर्यंत कृषीक्षेत्रातच कार्यरत होते. पण झाडे झुडुपे आणि पानेफुले यांच्याबरोबरीने त्यांनी काव्याचा मळा फुलवला होता. त्यांचे कवितासंग्रह छापून प्रसिद्ध झाले होते. त्यातल्या कांही पुस्तकांना शासनाकडून पुरस्कार मिळून त्यांचा गौरव केला गेला होता. अर्थातच त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला. कांही तरल नाजुक भावनापूर्ण तर कांही घणाघात करणा-या छंदबद्ध कविता त्यांनी वाचून दाखवल्या."लोक असं कां वागतात" आणि "आता मी रडत नाही" यासारख्या कवितांमध्ये त्यांनी खुमासदार शैलीत रोजच्या जीवनातील विसंगतींची उदाहरणे देत समाजातील मर्मांवर नेमके बोट ठेवले असल्याने सगळ्यांनी त्याची मनःपूर्वक वाहवा केली. मात्र अखेरीस त्यांनी वाचलेले एका स्त्रीच्या दारुण शोकांतिकेची करुण कहाणी सांगणारे दीर्घ काव्य मात्र सहलीचा उल्हासाचा मूड घालवणारे असल्याने तितकेसे भावले नाही. त्यांना वयपरत्वे कांही शारीरिक त्रास होत असावा असे त्यांना पाहतांना वाटत असे. रोमच्या विमानतळावर उतरल्यापासून पॅरिसच्या लिडोशोपर्यंत सर्व ठिकाणी जिथे जिथे वाट पहात उभे रहायची वेळ आली तिथे त्यांनी कोठला तरी आधार पाहून खाली बसकण मारून घेतली. असे असले तरी एरवी त्यांचा रसिक स्वभाव आणि उत्साह तरुणांना लाजवण्यासारखा असे. बहुतेक ठिकाणे पाहून परत येणा-या लोकांत ते शेवटचे असत.
डोंबिवलीचे गृहस्थसुद्धा साठी ओलांडल्यावर नोकरीतून निवृत्त झालेले असावेत असा आपला माझा अंदाज आहे. ओळखसमारंभात त्यांनी काय सांगितले होते ते मला आता आठवत नाही आणि नंतर त्याच्याबरोबर झालेल्या बोलण्यात कधीच त्यांच्या व्यवसायाचा विषय निघाला नाही. कदाचित ते एखादा व्यवसायही करीत असतील. पण ते फोनवर त्यासंबंधी विचारणा करतांना मला दिसले नाहीत. रोमला पोचल्याच्या पहिल्या दिवशीच संध्याकाळी ट्रेव्ही फाउंटनच्या आवारात हे जोडपे ठरलेल्या जागी वेळेवर परत येऊन न पोचल्याने थोडासा गोंधळ उडाला होता. त्यानंतर मात्र ते नेहमी वेळेआधी येऊन हजर व्हायचे. ते जोडपे चांगलेच व्यवहारकुशल निघाले. एका विक्रेत्याबरोबर घासाघीस करून कुठल्याशा वस्तूची किंमत आम्ही अर्ध्यावर आणली होती आणि स्वतःवर खूष झालो होतो. थोड्या वेळानंतर तीच वस्तू त्याच्याही अर्ध्या किंमतीत ते विकत घेऊन आले!
एकट्याने आलेल्या पोलिस इन्स्पेक्टरांची जोड एकट्यानेच आलेल्या त्यांच्या समवयस्क डॉक्टरांबरोबर घालून दिलेली होती. जळगांव इथे या डॉक्टरसाहेबांचा दातांचा दवाखाना होता. यापूर्वीही त्यांनी बरेच जागी भ्रमण केले होते आणि त्यांच्याकडे एकंदरीतच जगाचा चांगला अनुभव होता. त्याच्याबरोबर बोलतांना त्याचा प्रत्यय येत होता.
औरंगाबादहून आलेले मध्यमवयीन डॉक्टर जोडपे अत्यंत उत्साही होते. मिस्टरांनी घरून निघण्यापूर्वीच पुस्तके वाचून युरोपचा भरपूर अभ्यास केला होता आणि या दौ-याची चांगली पूर्वतयारी करून ठेवली होती. प्रत्येक जागेचे नेमके महत्व आणि तिथे काय पहायला मिळेल याची खडा न खडा माहिती त्यांनी आधीच मिळवलेली होती. प्रत्येक स्थानाची ओळख संदीप देत असतांना ते त्याला हमखास पुरवणी जोडत होते तसेच तिथे भेटणा-या गाईडला नेमके प्रश्न विचारून त्याच्याकडून बारकाईने माहिती काढून घेत होते. आम्हा सर्वांनाच त्याचा खूप फायदा झाला. माहिती काढण्यासाठी त्यांनी इंटरनेटचा उपयोग करून घेतला नाही याचे मात्र मला आश्चर्य वाटले. ल्यूसर्न सरोवरातल्या क्रूजमध्ये रेकॉर्डवर डान्स करण्यात त्या दोघांनी आधी पुढाकार घेतला आणि आग्रहाने बाकीच्यांना त्यात ओढून घेतले. या डॉक्टरद्वयांची सोबत असल्यामुळे आम्हा सर्वांनाच एक मानसिक आधार वाटत होता, एवढेच नव्हे तर कोणालाही गरज पडताच बारिक सारिक दुखण्यावरचे आपल्याकडील एकादे औषध ते तत्परतेने काढून देतही होते. वेळप्रसंगी कोणी वैद्यकीय सल्ला मागितला तर त्यांनी कधीही आढ्यता न दाखवता तो लगेच दिला.
दोन वयस्कर मैत्रिणींची एक जोडी पुण्याहून आली होती. अशाच एका सहलीमध्ये त्या एकमेकींना भेटल्या आणि त्यांचे आपसात चांगले सूत जमले. त्यानंतर त्या एकत्र फिरायला लागल्या होत्या. ड्रेस, खाणेपिणे वगैरे सगळ्या बाबतीत त्यांची हौशी वृत्ती दिसून येत होती. त्यांनासुद्धा दिलखुलासपणे बोलायला आवडत होते. बोलण्यात थोडासा पुणेरी खोचकपणा आलेला होता. त्यामुळे त्यांनी केलेल्या कौतुकामध्ये सुद्धा कुठेतरी तक्रारीचा बारीक सूर ऐकू येत असे. तेवढे सोडल्यास त्या चांगली कंपनी देत होत्या. मनोरंजनाच्या कार्यक्रमात एकीने पुणेरी विनोद ऐकवला तो असा.
एका पुणेरी माणसाने जीव देण्यासाठी आपल्या उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली उडी मारली. खाली पडतापडता त्याला स्वयंपाकघरात पोळ्या लाटत असलेली त्याची पत्नी दिसली. तिला पाहताच तो ओरडून म्हणाला, "रात्रीच्या जेवणात माझ्यासाठी पोळ्या करू नकोस, मी जेवायला नाही आहे." तिने खिडकीमधून खाली पहात ओरडून विचारले,"पण आत्ताच्या करून ठेवल्या आहेत त्या वाया जाणार त्यांचे काय? आधी सांगायला काय झालं होतं?"
उरलेली सगळी व्यावसायिक मंडळी होती. त्यांच्यात कोणी चार्टर्ड अकौंटंट, कॉंट्रॅक्टर, लघु उद्योजक, व्यापारी वगैरे विविधता होती. त्यातली मिरज सांगलीकडची तीन जोडपी होती. समवयस्क आणि समान आवडीनिवडी असल्याने त्यांचा कंपू पूर्वीपासून बनलेला होता. नेहमीच ते एकत्र कोठे ना कोठे ट्रिपला जातात. या वेळेस युरोपला येऊन जरा दूरचा पल्ला गाठला होता. त्यांच्यातले तीघेही नवरे, तीघी बायका किंवा सारेचजण सगळीकडे एकत्रच असत. त्यांचा स्वयंपूर्ण ग्रुप बनलेला असल्यामुळे त्यांत इतराचा शिरकाव जास्त करून होत नसे. तसे ते सगळेच मनमिळाऊ होते, मनमौजीसुद्धा होते. त्यांचे एकमेकांना डिवचणे, चिडवणे, जोक्स मारणे आणि हंसणे खिदळणे सारखे चाललेले असे. त्याचे थोडे तुषार सगळ्यांच्याच अंगावर उडत असत. त्यांच्यामुळे वातावरण नेहमी चैतन्यमय रहात होते. त्यांच्यातले थोडा कानडी हेल काढून बोलणारे गृहस्थ खूपच विनोदी होते. गाणे म्हणायचा आग्रह केल्यावर "ऑल्वेज यू आर इन अ हरी, डोन्ट टेल गठुडं टायायला, हाऊ आय कम नांदायला" अशी लावणी म्हणून खूप हंसवले. व्यवसायानिमित्त नेहमी प्रवास करावा लागणा-या एकाने परिचयाच्या वेळेस सांगितले, "मला परगांवी फिरायला जायला फार आवडतं, त्यातही एकट्याने जायला तर जास्तच!" त्यावर त्यांच्या पत्नीने सांगितले, "अहो, हे आठवड्यातले तीन चार दिवस पुण्याला जातात आणि तीन चार दिवस इथे असतात." "इथे" म्हणजे "सांगलीला" असे तिला म्हणायचे होते पण त्या वेळी ती इटलीमध्ये होती!
सांगलीहूनच आलेले आणखी एक वेगळे जोडपे होते. त्यातील 'सौ'चे ठाण्याला राहणारे मामा व मामीसुद्धा त्यांच्या जोडीने आले होते. त्यांचा एक चार जणांचा वेगळाच कौटुंबिक चौकोन होता. त्यांच्यात एका पिढीचा फरक असला तरी वयात तो तितका जास्त नव्हता. सांगलीकरांना मराठी गाण्यांची खूपच आवड होती आणि त्यांचा आवाजही चांगला बुलंद होता. वेगवेगळ्या प्रकारची छान गाणी म्हणून त्यांनी मजा आणली. आपला मुलगा मात्र खरोखरच फार सुंदर गातो, 'सारेगम'च्या स्पर्धेत त्याची निवड झाली होती पण कोठल्या तरी फेरीत अवधूत गुप्तेबरोबर झालेल्या लढाईमध्ये तो हरला हे ते आवर्जून सांगत होते. त्यांना गाण्याप्रमाणेच खाण्याचीदेखील भरपूर आवड असावी किंवा कॉँटिनेंटल न्याहारी फारशी रुचत नसावी. त्यामुळे सकाळीसुद्धा बसमध्ये त्यांचे खर्रम खुर्रम बरेच वेळा चाललेले असे.
मामासाहेबांना व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्याची प्रचंड आवड होती. प्रेक्षणीय स्थळे पहातांनाच नव्हे तर चालत्या बसमध्येसुद्धा सारखे त्यांचे शूटिंग चाललेले असायचे. बस सुरु होण्यापूर्वी होणारे ब्रीफिंगसुद्धा ते रेकॉर्ड करून घेत असत. त्यांनी बरोबर आणलेल्या आठदहा कॅसेट्स संपवून तिकडे आणखी विकत घेतल्या. परत गेल्यावर एवढ्या मोठ्या रेकॉर्डिंगचे ते काय करणार असावेत असा प्रश्न मला पडला होता. त्याचे एडिटिंग करून एक सुसंगत चलचित्र तयार करायचे तंत्र त्यांच्याकडून समजून घ्यावे असा विचार माझ्या मनात होता. पण त्यांनी कांही ताकाला तूर लावू दिली नाही. बसमधील प्रत्येकाने एक तरी आयटम सादर केलाच पाहिजे असे जेंव्हा ठरले, तेंव्हा त्यांनी खणखणीत आवाजात गणपतीअथर्वशीर्ष म्हणून "ही सहल निर्विघ्नपणे पार पडो" अशी गणरायाची भक्तीभावाने प्रार्थना केली. या मामासाहेबांनी एस्केलेटरचा उपयोग करण्यापेक्षा जिने चढून जाणे नेहमी अधिक पसंत केले. कां ते त्यांनाच माहीत!
पुण्याहून आलेल्या इंजिनियरांचा स्वतःचा छोटा कारखाना आहे. तो चालवण्याच्या कामात त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांना सक्रिय हातभार लावतात. दपस-या मोठ्या कारखान्यांमध्ये उपयोगाला येणारी खास प्रकारची यंत्रसामुग्री ते बनवतात. नव्या प्रकारचे आव्हानात्मक काम अंगावर घेऊन ते यशस्वीरीत्या पूर्ण करण्याची त्यांना मनापासून आवड आहे. त्यासाठी त्यातील प्रत्येक गोष्ट मूलभूत तत्वापासून चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक असते आणि अंगात संशोधकवृत्ती असेल तर ते जमते. माझ्या जीवनातील प्रवासाशी ही गोष्ट जुळत असल्याने ब-याच वेळा आमच्या गप्पा तांत्रिक विषयाकडे वळत असत. उदाहरणादाखल हॉलंडमधील नदीच्या पाण्याची पातळी समुद्रसपाटीखाली कशी राहू शकते? त्यात तिच्या प्रवाहाचे काय होत असेल? वेगवेगळ्या पवनचक्क्यांची रचना कशी असते? त्यांचा उपयोग कशासाठी होतो? असल्या प्रश्नावर आमची खूप सविस्तर चर्चा झाली व त्यातून दोघांनाही पूर्वी माहीत नसलेल्या कांही गोष्टी कळल्या. त्यांना अभिजात संगीताची खूप आवड आहे. त्याच्याकडे गाणारा सेल फोन आहे. दीड दोन तास चालतील इतकी मधुर गाणी त्यांनी त्यात ध्वनिमुद्रित करून ठेवली होती आणि आपला रिकामा वेळ ती गाणी स्वतः ऐकण्यात किंवा आम्हाला ऐकवण्यात ते घालवीत असत. करमणुकीच्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या सुरेल पण हलक्या आवाजात कांही जुनी गोड गाणी ऐकवली.
नव्या मुंबईत राहणारे चार्टर्ड अकाउंटंट आणि त्यांच्या पत्नी यांना मिळालेली सीट आमच्या सीटच्या रांगेत होती. त्यामुळे एकमेकांबरोबर आमचा संवाद सारखाच होत असे. दोघेही हौशी स्वभावाचे आणि अभिरुचीसंपन्न होते. बरोबर घेऊन जाण्यासाठी ते चोखंदळपणाने उत्कृष्ट वस्तू निवडत असत. केवळ इतर लोक घेत आहेत म्हणून कोठल्या गोष्टींची खरेदी त्यांनी केली नाही. कदाचित कोठल्याही वस्तूचे मूल्य आणि तिची बाजारातील किंमत याची तुलना त्याच्यातला अकाउंट्ट अचूक करीत असेल. त्यांना जुन्या हिंदी गाण्यांची आवड होती आणि बरीच गाणी तोंडपाठसुद्धा होती. ती त्यांनी म्हणून दाखवली. एकाच दिवशी असलेला त्यांचा जन्मदिन आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस हे दोन्ही सहलीत असतांनाच आले आणि प्रथेनुसार ते साजरे केले गेले. आभारप्रदर्शनासाठी त्यांनी माईक हातांत घेताच त्यांना पुन्हा हिंदी गाणी एकवण्याची फरमाईश झाली. ती त्यांनी पुरी केली पण त्यानंतर इतर सर्वांनीही गाणी, विनोद नकला असे कांही ना कांही सादर करावे असा आग्रह धरला. त्यानासुद्धा छायाचित्रणाची भयंकर आवड होती. त्यातसुद्धा प्रत्येक फ्रेममध्ये ते किंवा त्यांच्या पत्नी यायला हवेतच असा प्रयत्न ते करीत असत. याच्या बरोबर उलट, म्हणजे निसर्गसौंदर्यात माणसांचे चेहेरे मधेमधे दिसू नयेत असा माझा कटाक्ष असे.

No comments: