Saturday, June 20, 2009

गांधर्व महाविद्यालयाचा वर्षदिन


गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीसुध्दा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला हजर रहायची संधी मला मिलाली. इतके मोठे नांव तसेच नांवलौकिक असलेल्या या संस्थेचा कार्यक्रम म्हणजे तो दणकेबाज असणार असे वाटेल. पण त्या मानाने तो फारच किरकोळ वाटला. संस्थेच्या वाशी येथील इमारतीच्या प्रांगणात उघड्यावरच शंभर दीडशे खुर्च्या मांडल्या होत्या. सुरुवात झाली तेंव्हा त्यातल्या अर्ध्या सुध्दा भरल्या नव्हत्या. या संस्थेतर्फे घेण्यात येणा-या परीक्षांना हजारोंच्या संख्येने परीक्षार्थी दर वर्षी बसत असतात. त्या सर्व केंद्रसंचालकांनी जरी आपापले फक्त पांच दहा प्रतिनिधी पाठवले असते तरी उपस्थिती निदान दहापट झाली असती. पण तशा प्रकारचे आवाहन केले जात नसावे. त्यामुळे बहुतेक स्थानिक मंडळीच आलेली दिसली. कार्यक्रम मात्र उच्च दर्जाचा होता यात शंका नाही.

संस्थेच्या पदाधिकारी श्रीमती सुधाताईंनी स्व.पं.विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या महान कार्याची थोडक्यात पण हृद्य अशी माहिती सांगितली. त्यांच्या कांही आठवणी सांगितल्या. विष्णु दिगंबरांचे बालपण मिरजेत गेले. त्या वेळच्या मिरजेच्या संस्थानिकांचे चिरंजीव त्यांचे बालमित्र होते. एकदा पंडितजी त्यांच्या गुरूजींसोबत मिरजेतल्या रस्त्यावरून पायी चालत जात असतांना महाराजांची बग्गी आली असा कोलाहल झाला आणि रस्त्यावरून चालणारे सारे लोक लगबगीने सरकून एका बाजूला झाले. ती बग्गी बालक विष्णूच्या जवळ येऊन थांबली, आंत बसलेल्या राजकुमाराने त्यांना बग्गीत घेतले आणि ते पुढे चालले गेले. त्यांचे गुरूजी पायीच चालत त्यांच्या मागे मागे गेले. त्या काळात ते महान संगीतज्ञ पंडित वगैरे असले तरी राजकुमाराच्या नजरेतून ते राजाचे सेवकच होते, त्यामुले त्याच्या बरोबरीने ते बग्गीत कसे बसू शकतील ?

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुःसाक्षात् परब्रह्मो तस्मैश्रीगुरुवेनमः।। अशी भावना मनात बाळगणा-या विष्णु दिगंबरांना ही गोष्ट खटकली आणि संगीत व संगीतज्ञ यांना मान सन्मान, प्रतिष्ठा मिळवून देणे हेच त्यांनी आपले जीवनकार्य ठरवले. पण त्या काळात कसल्याच आधाराशिवाय ते काय करू शकत होते? असा विचार करून ते खचले नाहीत. दुर्दैवाने त्यांचे डोळे अधू झाल्यामुळे त्यांना शालेय शिक्षणसुध्दा अर्धवट सोडावे लागले. त्यांनी घर सोडले, वेगवेगळ्या गुरूंच्या पदरी राहून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले, त्यानंतर गुरूंचा आशीर्वाद आणि निरोप घेऊन भारतभर भ्रमण केले. अखेर लाहोरला गेले असतांना तिथे कांही काळ राहून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची स्थापना सन १९०१ मध्ये केली. भारतभरातून आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातून त्यांनी अत्यंत गुणी शिष्य निवडून त्यांना शास्त्रीय संगीताचे आणि त्याबरोबरच संस्था संचालनाचे शिक्षण दिले. त्या काळात पंडितजी आपल्या संगीताचे कार्यक्रम करून जे कांही उत्पन्न मिळवीत असत त्यातले स्वतःसाठी कांहीही न ठेवता ते सारेच्या सारे आपल्या विद्यार्थ्यांसाठी खर्च करत. त्यातून त्यांच्यासारखेच ध्येयासक्त विद्यार्थी तयार झाले, त्यांनी भारतभरात चहू दिशांना जाऊन जागोजागी संस्था स्थापन केल्या आणि आपला शिष्यवर्ग निर्माण करून ही ज्योत पुढे नेली. आज शंभर वर्षानंतरसुध्दा ती तेवत राहिली आहे.

औपचारिक भाषणांचा कार्यक्रम थोडक्यात आंवरून मुख्य कार्यक्रम सुरू झाला. ज्येष्ठ गायिका आणि संगीतज्ञ डॉ.अलका देव मारुलकर यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम या निमित्याने ठेवला होता. त्यांनी आपल्या नेहमीच्या सफाईने आणि गायनकौशल्याने पूर्वी राग सादर केला. पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी दयाघना, कां तुटले चिमणे घरटे हे अजरामर गाणे याच रागातील एका बंदिशेवर बांधले आहे. त्यानंतर थोडी तिलककामोद रागाची झलक त्यांनी एका सुरेख तराण्यातून दाखवली. लोकसंगीतातल्या प्राविण्याबद्दल अलकाताई प्रसिध्द आहेत. त्याला साजेशा अंदाजात त्यांनी कलिंगडा रागावर आधारित एक चैती सादर केली. पण ती रंगात आलेली असतांनाच समोरच्या रस्त्यावर एक लग्नाची वरात बेंडबाजा वाजवत आल्याने रंगाचा बेरंग झाला. त्यातच भरीला भर म्हणून फटाके वाजू लागले. हा गोंगाट सहन करण्याच्या पलीकडे असल्यामुळे नाइलाजाने अलकाताईंना त्यांचे गाणे थांबवावेच लागले. पण त्यांनी आणि श्रोत्यांनी पराकोटीचा संयम बाळगून पंधरा मिनिटे शांतपणे बसून त्या वरातीला पुढे जाऊ दिले. त्यानंतर जणु कांही झालेच नव्हते अशा थाटात अलकाताईंनी भैरवी सुरू केली. स्व.बेगम अख्तर यांनी अजरामर करून ठेवलेली हमरी अटरियापे आजा सांवरिया, देखादेखी बलम हुई जाये ही ठुमरी त्यांनी तितक्याच ताकतीने सादर करून श्रोत्यांचे कान तृप्त केले.

No comments: