Sunday, July 14, 2013

विठ्ठल किती गावा ? (भाग ६)

"त्वमेव माता पिता त्वमेव .." असा एक संस्कृत श्लोक आहे, "तुमही हो माता पिता तुमही हो। ..." असे त्याचे हिंदीमधले रूपांतरही प्रसिध्द आहे. "देव हाच आपला माता, पिता. भ्राता. त्राता, मित्र, सखा वगैरे सगळे काही असतो." किंवा "माता, पिता. भ्राता. त्राता, मित्र, सखा वगैरे सगळी रूपे घेऊन देवच आपल्या पाठीशी सदैव उभा असतो." अशी सुवचने ऐकण्यात आणि वाचण्यात येत असतात. सर्वव्यापी असा एकच परमेश्वर या सर्वांमध्ये अभिप्रेत असतो. पण संत नामदेव मात्र त्यांच्या परमप्रिय विठ्ठलाला या सर्व आप्तेष्टांच्या रूपांमध्ये तर पहातातच, शिवाय तीर्थक्षेत्रासारखे ठिकाण आणि देवपूजेसारखा विधी हे देखील खालील अभंगाप्रमाणे त्यांना विठ्ठलमय झालेले दिसतात.

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥
   माता विठ्ठल, पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल । निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥
   नामा म्हणे मज विठ्ठल सापडला । म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Tirtha_Vitthal_Kshetra_Vitthal

सर्व विश्वात भरलेला एकच परमेश्वर असला तरी हिंदू धर्मामध्ये त्याची उपासना अनेक नावांनी केली जाते. त्यातही लक्ष्मीनारायण आणि शंकरपार्वती अशा पतिपत्नींच्या काही जोड्या आहेत. त्यांच्यातल्या लक्ष्मी, पार्वती आणि अंबाबाई, भवानी, दुर्गा, काली वगैरे त्यांची रूपे मातेच्या ठिकाणी मानली जातात. भगवान विष्णू, महादेव, मारुती, गणपती आदि पुरुष देवांना कोणी "आई" अशी साद घातलेली सहसा ऐकण्यात किंवा वाचण्यात येत नाही. विठ्ठल हे भगवंताचे रूप मात्र याला अपवाद म्हणावे लागेल. विठोबा हा देवच मुळी त्याच्या भक्तांना फार जवळचा, अगदी घरातल्या व्यक्तीसारखा वाटतो. तो कुठे तरी दूर स्वर्गात, कैलास पर्वतावर किंवा वैकुंठधामामध्ये वास करत नसून त्याच्या भक्तांच्या अगदी जवळपास असतो. घरातल्या माणसांमध्येसुध्दा आईच सर्वांना अत्यंत जवळची असते. यामुळे अनेक संतांनी विठ्ठलाला प्रेमाने आई असे संबोधले आहे.

संत नामदेवांनीच लिहिलेल्या विठोबाच्या आरतीमध्ये त्याला आईच्या रूपामध्ये येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आईच्या येण्याची आपण किती आतुरतेने वाट पहात आहोत हे लिहिल्यानंतर विठोबाची स्तुतीही केली आहे.  एका अभंगामध्येसुध्दा नामदेवांनी असेच आवाहन करतांना विठ्ठलाला फक्त स्वतःची आई न म्हणता सर्व विश्वाची जननी असे संबोधित केले आहे आणि फक्त स्वतःला येऊन भेटण्याऐवजी सर्व भक्तांचा उध्दार करायला सांगितले आहे.

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
   आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
   पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥
   येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ १ ॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ २ ॥
    विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
    विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥
    येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ ३ ॥

येई वो विठ्ठले भक्तजनवत्सले। करुणाकल्लोळे पांडुरंगे ।।१।।
सजलजलदघन पितांबरपरिधान । येई उद्धरणे केशिराजे भक्तजनवत्सले ।।२।।
नामा म्हणे तू विश्वाची जननी । क्षीराब्धीनिवासिनी जगदंबे ।।३।।
http://www.youtube.com/watch?v=1sqHcGA1f0Q

स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेणा-या संत जनाबाईंनीसुध्दा विठ्ठलाला विठाबाई करून आईचे स्थान दिले आहे. तिला बोलावणे करतांना तिच्यासोबत भीमा आणि चंद्रभागा यांनाही घेऊन येण्याची विनंती जनाबाईंनी केली आहे. आशा भोसले यांनी गायिलेली या अभंगाची ध्वनिमुद्रिका प्रसिध्द असली तरी हा अभंग मी इतर काही सुप्रसिध्ध गायकांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींमध्ये सुध्दा आळवून आळवून गायिलेला ऐकला आहे.
येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई ॥१॥
   भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा ॥२॥
इतुक्यासहित त्वां बा यावें, माझे रंगणी नाचावें ॥३॥
    माझा रंग तुझे गुणीं, म्हणे नामयाची जनी ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Yega_Yega_Vithabai

चित्रपट या आजच्या युगामधल्या माध्यमातले प्रसिध्द गीतकार स्व.जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेल्या एका गीतामध्ये त्यांनीसुध्दा "विठुमाऊली" अशी साद घालून तिला "तू माऊली जगाची" असे सांगतांनाच आपल्या माउलीत विठ्ठलाची मूर्ती पाहिली आहे.

विठुमाऊली तू माउली जगाची।
माउलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।ध्रु.।।

काय तुझी माया सांगु शिरीरंगा ।
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा ।
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा।
अमृताची गोडी आज आलीया अभंगा, विठ्ठला पांडुरंगा ।
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची ।
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।१।।
   लेकरांची सेवा केलीस तू आई ।
   कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई ।
   तुझ्या उपकारा जगी तोड नाही ।
   ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला मायबापा ।
   जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची ।
   माउलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।२।।
http://www.youtube.com/watch?v=0bt66pFaMro

 . . . .  . . . . . . . . . . . . .  (क्रमशः)

No comments: