आपल्या संतांच्या काळात फोटोग्राफर नव्हते की प्रिंटिंग प्रेस नव्हत्या. त्या काळातल्या चित्रकारांनी त्या विभूतींची चित्रे रंगवून ठेवली असली तरी ती आता कुठे असतील कोण जाणे? अलीकडल्या म्हणजे गेल्या शंभर वर्षांमधल्या काळात रंगवलेल्या त्यांच्या तसबिरीच आपल्याला घरोघरी पहायला मिळतात. यात संत ज्ञानेश्वर हे बहुधा मांडी घालून बसलेले आणि हातात पोथीचे एक पान धरून ते वाचतांना किंवा काही तरी नवे लिहितांना दिसतात, तर समर्थ रामदासस्वामी हातात कमंडलू घेऊन कुठे तरी जाण्याच्या तयारीत असतात. संत तुकारामांनी एका हातात छोटीशी वीणा आणि दुस-या हातात चिपळ्या धरलेल्या दाखवतात. हे चित्र पाहता ते वीणेच्या झंकाराचा सुर आणि चिपळ्यांचा ताल धरून अभंग गात असावेत किंवा "जय जय रामकृष्ण हरी", "जय जय विठ्ठल रखुमाई" असा नामघोष करत असावेत असे वाटते. विठ्ठलाच्या नावाचा उच्चार करणे किती आनंददायी आहे, तसेच लाभप्रद आहे हे तुकोबांनी आपल्या अनेक अभंगांमधून सांगितले आहे. "विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥" आणि "विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा ॥" या दोन अभंगांबद्दल मी या लेखाच्या पहिल्या भागात लिहिले होते. संतश्रेष्ट तुकारामांचेच अत्यंत अर्थपूर्ण आणि लोकप्रिय असे आणखी दोन अभंग खाली दिले आहेत.
फक्त वाचेनेच विठोबाचे गोड नाव उच्चारून तिथे थांबू नका, तर शरीराच्या इतर ज्ञानेंद्रियांना आणि मनालासुध्दा त्याचा लाभ घेऊ द्या असे पहिल्या अभंगात त्यांनी सांगितले आहे. डोळ्यांनी त्याची मूर्ती पहा आणि ते सुंदर रूप साठवून ठेवा, पण त्यावेळी मन मात्र त्याच्या चरणापाशी लीन झालेले असू दे, आपल्या जिवाचे कान करून विठ्ठलाचे गुणगान लक्षपूर्वक ऐका, असे केलेत तर देहभान हरपून जाईल, जिवाला विठोबापासून दूर होण्याची इच्छा होणार नाही. असे तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. पुढल्या काळात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात भक्तांची इतकी गर्दी होईल की कुणालाही त्याच्या पाया पडून एक मिनिटसुध्दा तिथे थांबू दिले जाणार नाही याची त्यांना कल्पना नसेल. देवाचे दर्शन घेण्यासाठी त्याने मानवाला डोळे दिले आहेत, त्याचे नाव घेण्यासाठी जिव्हा दिली आहे, ते ऐकण्यासाठी कान दिले आहेत, दान देण्यासाठी हात दिले आहेत वगैरे गोष्टी एका प्रसिध्द हिंदी संताच्या रचनेमध्येसुध्दा सांगितल्या गेल्या आहेत. संत तुकारामांचे सांगणे देखील साधारणपणे असेच आहे.
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥
डोळे तुम्ही घ्या रे सुख । पहा विठोबाचें मुख ॥२॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचें गुण ॥३॥
मना तिथें धांव घेई । राहे विठोबाचे पायी ॥४॥
रूपी गुंतले लोचन । पायी स्थिरावले मन ॥५॥
देहभाव हरपला । तुज पाहता विठ्ठला ॥६॥
तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥७॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ghei_Ghei_Majhe_Vache
हाच उपदेश तुकारामांनी खाली दिलेल्या अभंगातही केला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने, गुणगानाने मनातले काम. क्रोध लोभ आदी षड्रिपू मनातून चालले जातात आणि त्चांनी रिकामी केलेली पोकळी विठ्ठलाने भरली जाते. भक्त विठ्ठलमय होऊन जातो. असे संत तुकाराम या अभंगात सांगतात.
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरे । परती माघारें घेत नाहीं ॥२॥
बंधनापासुनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
हा अंभंग पं. जितेंद्र अभिषेकी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर या दोन सुप्रसिध्द गायक गायिकांनी निरनिराळ्या पध्दतीने गायिला आहे हे या अभंगाचे एक वैशिष्ट्य आहे.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Bolava_Vitthal_Pahava_Vitthal
संत तुकारांमांना स्वर्गलोकी जाऊन तीन साडेतीनशे वर्षे होऊन गेल्यानंतरच्या आजच्या काळातल्या कवींनीसुध्दा विठ्ठलाच्या नामाच्या उच्चारण्याबद्दल गीते लिहिली आहेत. खाली दिलेले गाणे आजच्या काळात लिहिले गेले असले तरी त्यात संतांच्या काळाचेच वर्णन केलेले आहे. "माझा म-हाटाचि बोलू कवतुके। तरी अमृताते पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।" असे आत्मविश्वासाने लिहिणारे संत ज्ञानदेव, "पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग।।" असे सांगणारे संत चोखा मेळा आणि "नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥" अशी भावना बाळगणारे संत नामदेव हे सारे जण पंढरपूरच्या इंद्रायणीकाठी वाळवंटावर गोळा झाले आहेत. विठ्ठलाच्या नामसंकीर्तनात दंग झाल्याने ते निस्संग होऊन नाचत आहेत आणि त्यांच्यासाठी एकतारीच विठ्ठलाचे गीत गात आहे असे या गाण्यात कवीने लिहिले आहे. हे संत प्रत्यक्षात एकाच वेळी पंढरपूरला कदाचित कधी आलेही नसतील, असे असले तरी कवीच्या कल्पनेमध्ये ते एकत्र आले आहेत.
एकतारि गाते, गाते गीत विठ्ठलाचे ।
वाळवंटी ध्वजा, ध्वजा वैष्णवांची नाचे ।।
मराठीचा बोल, बोल जगी अमृताचा ।
ज्ञानियांचा देव, देव ज्ञानदेव नाचे ।।
नाचे चोखामेळा, मेळा नाचे वैष्णवांचा ।
नाचे नामदेव, देव कीर्तनात नाचे ।।
अनाथांचे नाथ, नाथ माझे दीनानाथ ।
भाग्यवंत संत, संत रूप अनंताचे ।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ektari_Gate_Geet_Vitthalache
खाली दिलेल्या गीतात कवीने पांडुरंगाचे वर्णन एका विणकराच्या रूपकात केलेले आहे. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे या गाण्यात हेच रूपक वापरले आहे. पण माझ्या आठवणीप्रमाणे खाली दिलेले गाणे जास्त जुने असावे. या गाण्यात त्या महान विणकराचे नामस्मरण करण्याचा संदेश दिलेला आहे. अक्षांश आणि रेखांशाचे आडवे, उभे धागे आहेत अशी कल्पना करून यामधून पृथ्वीचा पृष्ठभाग तयार झाला आहे (विठ्ठलाने अशी रचना केली आहे). अशी वेगळी (भौगोलिक स्वरूपाची) कल्पना कवीने केली आहे. आणि पृथ्वीपुरता विचार करायचा झाल्यास तेच सर्वात पहिले विणकाम असे म्हणता येईल. या गाण्याच्या दुस-या चरणात कवी माणसांच्या जगात येतो. हात आणि पाय ही त्याची कर्मेंद्रिये असली तरी मनाने (किंवा बुध्दीने) दिलेल्या आज्ञांचे ते फक्त यंत्रवत पालन करतात, म्हणून त्यांना मागाची उपमा दिली आहे. माणसांनी मनांमध्ये मने गुंतवून त्याचा बहारदार शेला विणावा, बंधुभावाच्या चरख्यावर एकजुटीचा मजबूत धागा तयार करावा वगैरे सूचना केल्या आहेत. त्यात विठ्ठलाच्या भक्तीपेक्षा चांगल्या आचरणावरच जास्त भर दिला आहे.
धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया ।।
अक्षांशाचे रेखांशाचे, उभे आडवे गुंफुन धागे ।
विविध रंगी वसुंधरेचे, वस्त्र विणिले पांडुरंगे ।
विश्वंभर तो विणकर पहिला, कार्यारंभी नित्य स्मरुया ।।१।।
करचरणांच्या मागावरती, मनामनांचे तंतू टाका ।
फेकुन शेला अंगावरती, अर्धी उघडी लाज राखा ।
बंधुत्वाचा फिरवित चरखा, एकत्वाचे सूत्र धरूया ।।२।।
http://www.youtube.com/watch?v=vNdCT3psfcA
. . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment