माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या मोठ्या व्यक्तींच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या सदरात दोन शब्द लिहायचे असे मी पाच वर्षांपूर्वी ठरवले होते. यातल्या काही व्यक्तीबद्दल ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती थोडक्यात देणे मला शक्यही नाही, माझी तेवढी पात्रताही नाही आणि हे लेख लिहिण्यामागे माझा तसा उद्देशही नाही. "मी सुध्दा या थोर लोकांना भेटलो आहे." अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही, पण त्यांना भेटल्याचा मला निश्चितच आनंद आणि अभिमान वाटतो. फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी आणि या महान लोकांचा माझ्या जीवनावर पडलेला प्रभाव यासंबंधी माझे चार शब्द मी या निमित्याने मांडणार आहे. यामुळे यातसुध्दा कदाचित थोडासा मीच डोकावलेला दिसणार याला काही इलाज नाही. या लेख मालिकेतले हे पंधरावे पुष्प प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांना त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्य समर्पित करीत आहे.
मी कॉलेजात शिकत असतांना त्या काळातल्या वर्तमानपत्रांमध्ये एक सनसनाटी बातमी आली होती. ती अशी होती, "एका तरुण भारतीय, त्यातही महाराष्ट्रीय शास्त्रज्ञाने आइन्स्टाईनला खोटे ठरवले." त्या काळात आल्बर्ट आईन्स्टाईन हा जगातला सर्वात मोठा शास्त्रज्ञ गणला गेला होता, कदाचित आजसुध्दा असेल. त्याच्या आधी सर आयझॅक न्यूटनला सर्वात मोठा मानले जात होते, पण आईन्स्टाईनने न्यूटनला खोटे पाडल्यामुळे तो सर्वात मोठा शास्त्रज्ञ झाला. या न्यायाने पाहता हा तरुण महाराष्ट्रीय शास्त्रज्ञ आईन्स्टाईनपेक्षाही मोठा म्हणजे जगातला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ ठरायला पाहिजे असा तर्क काही लोक लावत होते. या शास्त्रज्ञाचे नाव होते डॉ.जयंत नारळीकर. त्यानंतर वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरेंमध्ये जयंतराव नारळीकरांचा परिचय छापून येत राहिला. त्यांचा जन्म कुठे आणि कधी झाला, शिक्षण कुठे झाले, त्यांचे थोर आईवडील कोण आहेत, त्यांनी केलेले विक्रम आणि त्यांचे कार्य वगैरेंचा भरणा त्या वृत्तांतांमध्ये असायचा. डॉ.जयंत नारळीकरांनी लावलेला शोध त्यांचा एकट्यांचा नव्हता, सुप्रसिध्द खगोलशास्त्री आणि जयंतरावांचे गुरू डॉ.फ्रेड हॉइल या जोडीने मिळून एक नवा सिध्दांत मांडलाहोता आणि तो त्या जोडीच्या नावाने प्रसिध्द झाला होता. ही माहिती पुढे आली. त्या काळातल्या वार्ताहरांनासुध्दा विज्ञान या विषयाचे वावडे असायचे. यामुळे हॉइल आणि नारळीकरांनी नेमका कसला शोध लावला होता हे काही समजले नाही. पहायला गेल्यास आईन्स्टाईनने काय सांगितले होते आणि न्यूटनची कोणती चूक दाखवून दिली होती याचाही त्या काळात मला पत्ता नव्हताच, त्यामुळे त्यातले काय खरे आणि काय खोटे हे समजून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
डॉ.जयंत नारळीकर हे पुण्याला येणार आहेत, त्यांचा जाहीर सत्कार होणार आहे आणि त्यात ते भाषण करणार आहेत असे समजल्यावर आमचा आनंद गगनात मावला नाही. त्या दिवशी आम्ही काही मित्र त्या जागी जाऊन पोचलो. तरुण, तेजस्वी, हंसतमुख आणि अत्यंत सालस असे जयंतराव मंचावर आले आणि एका जादूई स्मितहास्यानेच त्यांनी सर्व प्रेक्षकांची मने काबीज केली. त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल शक्य तितक्या सोप्या भाषेत ते बराच वेळ बोलले. पण त्यात आईन्स्टाईनला खोटे ठरवण्याचा उल्लेख कुठेच आला नाही. अंतराळाविषयीचे माझे त्या वेळचे ज्ञान फारच तोटके होते. आपल्या पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, मंगळ, गुरू, शनी, नेपच्यून वगैरे इतर ग्रहांसमवेत पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तसेच ती स्वतःभोवती फिरते. त्यामुळे आकाशात रात्री दिसणारे अगणित तारे आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतांना दिसतात. पण खरे तर ते जागच्या जागीच असतात. फक्त एवढेच शाळेत शिकलेले खगोलशास्त्र मला तेंव्हा ठाऊक होते. या असंख्य ताऱ्यांचेसुध्दा अनेक प्रकार असतात, त्यांनाही आयुष्य असते, त्यात बालपण, यौवन आणि वार्धक्य अशा अवस्था असतात अशा प्रकारच्या शक्यतासुध्दा तोंपर्यंत कधी मनात आल्या नव्हता. त्यामुळे डॉ.जयंत नारळीकर यांनी त्यांच्या व्याख्यानात काय काय सांगितले त्याचा अर्थ मला तेंव्हा काही नीटसा समजला नाही. फक्त त्यांची बोलण्याची शैली, शब्दोच्चार, वाक्यांची फेक, एकादा मुद्दा मांडण्यातले कौशल्य असे गुण जाणवले आणि त्यावर टाळ्या दिल्या. इतर श्रोत्यांच्याही बाबतीत कदाचित असेच घडले असल्याची शक्यता आहे. मंदपणे लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या बाबतीत जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये खूप संशोधन केले जात आहे, ते तारे सुध्दा एका जागी स्थिर नसून सतत एकमेकांपासून दूर दूर जात असतात असे कोणी म्हणत असत, पण नारळीकरांचे मत यावर वेगळे होते. इतपत त्यांच्या सांगण्याचा उलगडा झाला.
त्यानंतरच्या काळात डॉ.जयंत नारळीकर हे नाव वर्तमानपत्रांमध्ये येत राहिले ते आजतागायत येतेच आहे. त्यांचे शोधनिबंध कुठे प्रसिध्द झाले, त्यांना कोणती पदवी मिळाली, कुठला सन्मान मिळाला वगैरेची माहिती त्यात येत असे. तरुण वयातच ते आंतरराष्ट्रीय पातळीवरले तज्ज्ञ गणले जात आहेत हे त्यावरून दिसून येत होते. ते भारतात परत येणार आहेत असे वाचण्यात आले. ते आमच्या अणुशक्ती खात्यातल्या टी आय एफ आरमध्ये संशोधन करायला आले आहेत असे एक दिवस समजले तेंव्हा आता लवकरच आपल्याला त्यांना प्रत्यक्ष भेटताही येईल असे वाटून माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांची संस्था मुंबईतच असल्यामुळे एकाद्या कार्यक्रमात त्यांना भेटण्याची एकादी तरी संधी लवकरच मिळेल असे मला वाटले होते, पण अशी संधी अगदी अनपेक्षितपणे आणि अनपेक्षित जागी समोर चालून आली.
मी नोकरीला लागल्यापासूनच ऑफिसच्या कामासाठी नेहमी रेल्वेच्या पहिल्या वर्गात प्रवास करत होतो आणि पदोन्नती झाल्यानंतर विमानाने जाऊ लागलो होतो, पण त्या काळातला पगार बेताचाच असल्यामुळे वैयक्तिक आयुष्यात रेल्वेचा दुसरा वर्गच परवडण्यासारखा होता. त्यामुळे आम्ही सगळे मिळून कुठेही जातांना साध्या स्लीपरकोचनेच जात होतो. पत्नी आणि मुले याबद्दल किंचित असूया दाखवत असत. त्यांनाही एकदा वरच्या दर्जाचा प्रवास घडवून आणायचे ठरवले आणि मी त्याकाळी नव्यानेच सुरू झालेल्या वातानुकूलित स्लीपरची तिकीटे काढली. आम्ही सर्वजण महालक्ष्मी एक्सप्रेसच्या थंडगार डब्यातल्या आमच्या खणात जाऊन बसलो. गाडी सुरू व्हायला वेळ असल्यामुळे पडदा लावून घेतला नव्हता. त्यामुळे आमच्या समोरूनच एक ओळखीचा चेहेरा पुढे जातांना दिसला आणि आमच्या बाजूच्याच केबिनमध्ये त्यांनी प्रवेश केला. मी पॅसेजमध्ये जाऊन हळूच बाजूला पाहिले तर साक्षात तिथे डॉ.जयंत नारळीकर त्यांच्या पत्नीसह बसले होते. आमचे आयडॉल असे इतक्या जवळ आले होते आणि आम्हाला डिस्टर्ब करायला किंवा अडवायला तिथे इतर कोणीही नव्हते हे पाहिल्यावर आम्हाला राहवले जाणे शक्यच नव्हते. त्यांना जागेवर बसून स्थिरस्थावर होण्यासाठी दोन तीन मिनिटे दिली आणि त्यांनी पडदा लावून घ्यायच्या आधीच आम्ही त्यांच्या केबिनमध्ये जाऊन दाखल झालो.
आम्ही तर त्यांना कित्येक वर्षे आधीपासून ओळखत होतो, फक्त आमची ओळख त्यांना करून दिली. अशा वेळी काय बोलावे हे त्या क्षणी सुचतच नाही. मग मुंबईतले हवामान आणि भारतातले व अणुशक्तीखात्यातले वातावरण वगैरेंवर जुजबी चर्चा केली, त्यांनीही आमची थोडी औपचारिक विचारपूस केली, हस्तांदोलन केले, प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि निरोप घेतला. आपल्या केबिनमध्ये येऊन झोपून गेलो. ते दोघे कोल्हापूरपर्यंत जाणार होते, पण आम्हाला मिरजेलाच उतरायचे होते. आम्ही त्यावेळी त्यांना डिस्टर्ब करणे योग्य नव्हते.
डॉ.जयंत नारळीकर आणि मी एकाच सरकारी खात्यात काम करत असल्यामुळे एकादी कमिटी किंवा सबकमिटी, वर्किंग ग्रुप, टास्क फोर्स वगैरेंमध्ये किंवा सेमिनार, कॉन्फरन्स, वर्कशॉप, ट्रेनिंग प्रोग्रॅम वगैरेंमध्ये भेटण्याची शक्यता होती, निदान कशाचे तरी उद्घाटन, कोणाचा निरोप समारंभ, एकाद्या सहकाऱ्याच्या घरातल्या लग्नाचे रिसेप्शन अशा जागी तरी आमची गाठ पडेलच असे वाटले होते. आमच्या खात्यातल्या ज्या लोकांशी माझे कधीच प्रत्यक्ष काम पडले नव्हते अशा अनेक उच्चपदस्थांबरोबर अशा निमित्याने माझा परिचय झाला होता. पण नारळीकरांच्या बाबतीत मला अशी संधी मिळालीच नाही. भारतात परतण्याच्या आधीच ते इतक्या वरच्या पातळीवर जाऊन पोचलेले होते की इथे आल्यानंतर ते या बाबतीत कदाचित थोडेसे उदासीन राहिले असावेत. डिपार्टमेंटमध्ये त्यांनी कधीच हाय प्रोफाईल प्रेझेन्स ठेवली नसावी. त्यांच्यासाठी पुण्याला आयुका ही वेगळी संस्था स्थापन केली गेली आणि तिथल्या संचालकपदावर ते गेले आहेत असे एक दिवस समजले.
मी पुन्हा कधी नारळीकरांना प्रत्यक्ष भेटू शकलो नसलो तरी निरनिराळ्या प्रसारमाध्यमांमध्ये मी त्यांना नेहमी पहात आलो आहे. अॅस्ट्रॉनॉमी या अत्यंत स्पेशलाइज्ड विषयामधील उच्च दर्जाच्या संशोधनाखेरीज विज्ञान विषयाचे शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार यावर ते खूप काम करत आले आहेत. सर्वसामान्य वाचकांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक मनोरंजक पुस्तके लिहिली. लोकप्रिय विज्ञान (पॉप्युलर सायन्स) तसेच विज्ञानकथा (सायन्स फिक्शन) या दोन्हींमध्ये त्यांनी मोलाची भर घातली. त्यांनी लिहिलेली पुस्तके लोकांना खूप आवडली. त्यांनाही पुस्कार मिळाले. त्यांनी लिहिलेले अनेक लेख वर्तमानपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये आले. टेलिव्हिजनवर त्यांचे नेहमी दर्शन घडत आले, विविध प्रसंगी त्यांच्या मुलाखती घेऊन दाखवण्यात आल्या. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण यासारखे सर्वोच्च सन्मान त्यांना दिले गेले, याशिवाय इतर अनेक पुरस्कार त्याना मिळाले. भविष्यवाणी करणारे ज्योतिषशास्त्र (अॅस्ट्रॉलॉजी) या विषयाला सायन्स या सदराखाली आणण्याचे आटोकाट प्रयत्न एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याने केले होते. त्यांची सत्ता जिथे चालत होती त्या भागात त्यांनी ते अंमलातही आणले असेल. डॉ.जयंत नारळीकर यांनी याबाबतचे वैज्ञानिक विचार परखडपणे सांगितले आणि चर्चांमधून ते प्रभावीपणे मांडले. त्यावर उलटसुलट चर्चा होत राहिली. अशा प्रकारे ते सतत प्रकाशझोतात राहिले.
डॉ.जयंत नारळीकर यांनी दिलेल्या अनेक मुलाखतींपैकी काही गोष्टी माझ्या कायम लक्षात राहिल्या आहेत. ज्या काळात भारताला महासंगणक मिळू नये असे प्रयत्न प्रगत राष्ट्रांमध्ये चालले होते त्या काळात घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांना एक प्रश्न विचारला गेला "आता तुम्ही काय करणार? काँप्यूटरशिवाय आपला विषय विद्यार्थ्यांना कसा शिकवणार?"
त्यावर ते गंमतीने म्हणाले, "मला फक्त एक फळा आणि खडू मिळाला तरी माझा विषय शिकवायला तेवढे पुरेसे आहे."
त्यांना एकदा विचारले गेले, "तुमच्या या संशोधनाचा आम जनतेला काय फायदा मिळणार आहे?"
त्यावर त्यांनी हंसत हंसत सांगितले, "खरं सांगायचं तर मुळीसुध्दा नाही. मी आकाशातल्या अतीदूरस्थ ताऱ्यांचे निरीक्षण करत असतो. माझ्या या कामामुळे कोणालाही लगेच अन्न, वस्त्र, निवारा वगैरे मिळण्याची काही शक्यता नाही. पण मूलभूत विज्ञानामधील प्रगतीमुळेच माणसाला अनेक उपयुक्त असे शोध लागतात आणि त्यांच्या उपयोगाने त्याचे जीवन सुसह्य किंवा समृध्द बनते. नासासाठी विकसित केल्या गेलेल्या अनेक टेक्नॉलॉजीज आता रोजच्या जीवनावश्यक वस्तू बनवण्यासाठी कामाला येत आहेत."
नारळीकरांचा सहभाग असलेल्या एका चर्चासत्रामध्ये विश्वाची उत्पत्ती आणि पसारा यावर चर्चा झाली होती. एका हिंदुत्ववादी विदुषीनेही त्यात भाग घेतला होता. शास्त्रज्ञांनी केलेले प्रयोग, निरीक्षणे आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष याबद्दल नारळीकर शास्त्रीय माहिती देत होते, तर ती महिला कुठकुठल्या पोथ्यांचे संदर्भ देऊन भृगु, भारद्वाज वगैरे ऋषींनी काय काय सांगून ठेवले आहे हे सांगत होती. "पुराणकाळातले नारद मुनींसह आणखीही काही महापुरुष मंत्रशक्तीने विश्वभर संचार करत होते आणि हे सायंटिस्ट लोक आता कुठे फक्त चंद्रापर्यंत जाऊन पोचले आहेत." अशा प्रकारचे तारे तिने तोडल्यावर "यावर आपले काय म्हणणे आहे?" असे मुलाखत घेणारीने नारळीकरांना विचारले. त्यांनी जरासुध्दा विचलित न होता म्हंटले, "इट ईज नॉट फेअर टु कम्पेअर दीस फिंग्ज. माझे सांगणे आणि यांचे म्हणणे याची सांगड घालता येणार नाही. प्रत्यक्ष केलेल्या आणि जगन्मान्य झालेल्या संशोधनावरून मी बोलतो आहे. त्यातले प्रत्येक विधान कशाच्या आधारावर केले आहे हे मी सांगू शकतो. या विद्वान बाई फक्त पोथीतल्या गोष्टी (पुराणातली वांगी) सांगत आहेत. (त्याच्या मागे कसलेच स्पष्टीकरण नाही.)"
आज डॉ.जयंत नारळीकर यांच्या वयाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याचे वाचले. त्यांना वाढदिवसानिमित्य आणि शतक पूर्ण करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा

3 comments:
Our generation will be considered lucky by future generations for sharing lifetime with legends like Dr. Naralikar. It must have been amazing feeling to meet such great person in person. Thanks for sharing your experience.
प्रत्येक पिढीमध्ये आगळी वेगळी माणसे असतातच. त्यातले काही जण एकदम प्रकाशझोतात येतात पण तितक्याच वेगाने विस्मरणात जातात. काही लोकांचे महत्व समजायला बराच वेळ लागतो. डॉ.जयंत नारळीकरांसारखे लोक अचानक प्रसिध्द झाले असले तरी त्यानंतरही सातत्याने उत्कृष्ट दर्जाचे कार्य करून ते प्रेरणेचा एक अखंड स्त्रोत बनून राहिले. माझ्या पिढीमधल्या अशा काही थोर माणसांना भेटण्याचे भाग्य मला मिळाले.
डॉ. जयंत नारळीकर यांच्यावरील आपला लेख आवडला. मध्यंतरी एका खगोलशास्त्रप्रेमी लोकांच्या संस्थेने आपल्या कार्यक्रमात जयंतरावांची मुलाखत घेतली होती त्या कार्यक्रमास मी गेलो आणि तेथे डॉक्टरांचे नवीन पुस्तक विकत घेतले. तसेच त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी घेतली. जयंतराव या कार्यक्रमास अत्यंत साध्या वेशात आणि कोणताही लवाजमा न घेता आले होते. सर्व प्रेक्षकांच्या प्रश्नांना त्यांनी आपल्या विनम्र व मृदू पद्धतीत उत्तरे दिली. जयंतरावांना दीर्घायुष्य लाभो.
मंगेश नाबर
Post a Comment