Sunday, July 14, 2013

विठ्ठल किती गावा ? (भाग ५)

विठ्ठलाला पाहतांना आपली काय अवस्था होते, देहभान हरपून जाते, मन मुग्ध होते वगैरे अनुभव संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या अभंगात सांगितले आहेत. संत तुकाराम आणि संत नामदेवांनीसुध्दा वेगळ्या पध्दतीने असेच काहीसे सांगितले आहे. हे आपण यापूर्वीच्या भागांमध्ये पाहिले. इतर संतमंडळींचे अभंग या भागात पाहू.

संत एकनाथ महाराज तर काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल असे ते पांडुरंगाशी एकरूप झाले होते. विठ्ठल हा वेगळा कोणी नसून आपला अंतरात्मा आहे असे तत्वज्ञान त्यांनी या अभंगात सांगितले आहे. त्या अनुषंगाने भावभक्ती म्हणजे चंद्रभागा नदीतले पाणी, दया क्षमा शांती हे गुण म्हणजे तिच्या तीरावरले वाळवंट, ज्ञान ध्यान पूजा विवेक म्हणजे वाद्याचा नाद, पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये हे सगळे मिळून झालेले शरीर म्हणजेच पंढरपूर अशी एकाहून एक वरचढ रूपके त्यांनी या अभंगात दिली आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास विठ्ठलाच्या दर्शनासाठी दूर पंढरपुराला जाण्याची गरज नाही. तो या इथे तुमच्या शरीरात आत्म्याच्या रूपाने सदैव वास करत असतो असे त्यांना सांगायचे आहे असे दिसते.

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
   भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे ।
   बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेंचि वाळुवंट ।
मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
    ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ।
    हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला ।
ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
   देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं ।
   एका जनार्दनी वारी करी ॥६॥
www.aathavanitli-gani.com/Song/Kaya_Hi_Pandhari

संत कान्होपात्रा ही एका गणिकेची मुलगी होती, पण चिखलातून कमळ उगवावे याप्रमाणे ती वेगळी होती. आईचा पेशा न पत्करता तिने विठ्ठलाची भक्ती केली. या अभंगात तिने विठ्ठलाला आपला सखा म्हणून त्यालाच आपले रक्षण करण्याची विनंती केली आहे.

अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥
   अगा नारायणा ।
   अगा वासुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥
    अगा रखुमाईच्या कांता ।
    कान्होपात्रा राखी आता ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Aga_Vaikunthichya_Raya

"ऊस डॊंगापरी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा?" यासारख्या अभंगांमधून समाजाला निरुत्तर करणारा प्रश्न विचारणा-या संत चोखा मेळा यांनी विठ्ठलाच्या नामाच्या गजराने दुमदुमलेल्या पंढरपूर नगरीचे वर्णन असे केले आहे. विठ्ठलाचा नामघोष. त्याचे भजन कीर्तन वगैरेंची त्यांनासुध्दा किती गोडी होती हे यात दिसते.
विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
  होतो नामाचा गजर ।
  दिंड्या पताकांचा भार ॥२॥
निवृत्‍ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥
    हरि कीर्तनाची दाटी ।
    तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

संत चोखा मेळा यांची पत्नी संत सोयराबाईसुध्दा परम विठ्ठलभक्त होती. तिनेही स्वतः सुंदर अभंग लिहिले आहेत, पण त्यांच्या शेवटच्या ओळीत स्वतःचा उल्लेख मात्र चोखियाची महारी असा केला आहे. या काहीशा अपरिचित कवयित्रीचे दोन प्रसिध्द अभंग खाली दिले आहेत. विठोबाचे नाम गायिल्याने संसार सुखाचा होईल, कामक्रोध आदि गळून जातील वगैरे जो उपदेश इतर संतांनी केला होता तोच तिच्या पहिल्या अभंगांमध्येही आहे. विठ्ठलाच्या दर्शनामुळे मीपण गळून पडले, देहभान राहिले नाही वगैरे मनाची उन्मन झालेली अवस्था दुस-या अभंगात वर्णलेली आहे. तेराव्या शतकातल्या संत कान्होपात्रा, संत चोखामेळा आणि संत सोयराबाई या व्यक्ती त्या काळातल्या समाजाच्या तळागाळातल्या समजल्या जात होत्या असे त्यांच्यासंबंधी असलेल्या माहितीत सांगितले जाते. यावरून त्या बहुधा अशिक्षित असाव्यात असे वाटेल, पण हे अभंग पाहिले तर असे दिसते की त्यांनासुध्दा मराठी भाषा उत्तम प्रकारे अवगत होती आणि त्यांनी चांगल्या साहित्यरचना करून ठेवल्या आहेत.

सुखाचें हें नाम आवडीनें गावें ।
वाचे आळवावें विठोबासी ॥१॥
    संसार सुखाचा होईल निर्धार
    नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥
कामक्रोधांचें न चलेचि कांही ।
आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥
     आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि ।
     म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Sukhache_He_Naam

अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥१॥
  मी तूं पण गेले वाया । पाहतां पंढरीच्या राया ॥२॥
नाही भेदाचे ते काम । पळोनि गेले क्रोध काम ॥३॥
   देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही ॥४॥
पाहते पाहणें गेले दूरी । म्हणे चोखियाची महारी ॥५॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Avagha_Rang_Ek_Jhala

 . . .. .  . . ..  . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: