संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलभक्तांच्या संप्रदायाचा पाया घातला, संत नामदेवांनी त्यावर भव्य इमारत उभी केली आणि संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला असे म्हंटले जाते. या संतशिरोमणी तुकोबांनी ज्ञानेश्वरांना "ज्ञानियांचा राजा गुरू महाराव" असे म्हंटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला संस्कृत भाषेत केलेल्या गीतोपदेशाची सविस्तर उकल मराठी भाषेत केल्याबद्दल "ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता" असे मराठी भाषा म्हणते असे गीतकार स्व.पी.सावळाराम लिहितात. संत ज्ञानदेवांचे ज्ञान, प्रतिभा, कल्पनाशक्ती वगैरे अलौकिक गुणांचा स्पर्श त्यांच्या काव्यरचनांना झालेला जाणवतो.
दृष्टी, ध्वनि, स्पर्श, गंध आणि चंव हे गुण आपल्या ज्ञानेंद्रयांकडून आपल्याला समजतात. यांच्या बाबतीत दुस-याला आलेले अनुभव आपण स्वतःच्या अनुभवावरून समजून घेऊ शकतो. अॅबस्ट्रॅक्ट गोष्टींची फक्त कल्पनाच करू शकतो. आपल्या मनातली कल्पना स्पष्टपणे व्यक्त करून ती इतरांना सांगता येत नाही. यामुळे चराचरामध्ये व्यापलेला निर्गुण निराकार असा परमेश्वर सामान्य कुवतीच्या माणसाला समजणे फार कठीण आहे. ज्ञानमार्गाने जाणारे साधकच त्या संकल्पनेचा विचार करू शकतात. त्या मानाने सोपा असा भक्तीमार्ग संतांनी दाखवला, सर्वसामान्य लोकांना तो पटला आणि त्यांनी त्यानुसार त्याचा अवलंब केला. कोणत्याही दैवतावर भक्ती करण्यासाठी त्याचे एक सगुण साकार रूप असले तर त्याची मूर्ती किंवा चित्र आपण डोळ्यांनी पाहू शकतो, त्याचे वर्णन कानाने ऐकू शकतो किंवा बोलण्यातून व गायनातून करू शकतो. संत तुकारामांनी विठ्ठलाच्या गुणगानाला कसे महत्व दिले होते आणि संत नामदेवांनी त्याच्या दर्शनाला प्राधान्य दिले होते याची उदाहरणे आपण या आधीच्या भागांमध्ये पाहिली. ही सगळी त्याच्या सगुण रूपाची भक्ती होती.
संत ज्ञानेश्वरांनीसुध्दा विठ्ठलाला भेटण्याची आणि त्याला डोळे भरून पाहण्याची महती काही अभंगांमधून केली आहे. विठ्ठलाच्या भजनाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला रूपाचा अभंग गाऊन करायची वारकरी संप्रदायाची एक प्रथा आहे. काही देवळांमधले भजन नेहमी या अभंगापासून सुरू केले जाते. विठ्ठलाचे रूप पाहून खूप आनंद झाला, पूर्वपुण्याईमुळेच विठ्ठलाविषयी आवड निर्माण झाली असा साधा संदेश त्यांनी या अभंगात दिला आहे.
रूप पाहतां लोचनी । सुख जाले वो साजणी ।।१।।
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।२।।
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठली आवडी ।।३।।
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ।।४।।
याच कल्पनेचा विस्तार करून हा आनंद मिळवण्यासाठी पंढरपूरला जाऊन त्याला भेटेन, मला माझ्या माहेरी गेल्याचे आणि माहेरच्या मायेच्या आप्तांना भेटण्याचे सुख त्यातून मिळेल, माझ्या पुण्याईचे फळ मला त्यात मिळेल, माझे सारे विश्वच आनंदाने भरून जाईन वगैरे वर्णन त्यांनी खाली दिलेल्या अभंगात दिले आहे.
अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Avaghachi_Sansar_Sukhacha
संत ज्ञानेश्वर महाज्ञानी होते, निर्गुण परमेश्वराची उपासना करणे त्यांना साध्य होते, पण इतरेजनांसाठी विठ्ठलाच्या सगुण रूपाची भक्ती करणे शक्य आहे हे त्यांनी जाणले होते. यामुळे सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपांचा त्यांनी पुरस्कार केला. सगुण निर्गुण ही दोन्ही रूपे विलक्षण आहेत असे सांगतांना त्याच्या दृष्य (सगुण) रूपाचे कसलेच वर्णन न करता पतितांना पावन करणारा, मनाला मोह घालणारा अशासारखे त्याचे महात्म्य आणि ध्येय, ध्यास, ध्यान वगैरे मानसिक क्रियांमधून चित्ताला भेटणारा असा हा परब्रह्म हे विठ्ठलाचे वर्णन या अभंगात दिले आहे.
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।१।।
पतितपावन मानसमोहन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।२।।
ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन ।। ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।३।।
ज्ञानदेव म्हणे आनंदाचे गान । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।४।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Sagun_Nirgun_Donhi
संगीताबरोबरच वाङ्मयाचासुध्दा सखोल अभ्यास केलेल्या पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ज्ञानदेवांचे काही वैशिष्टपूर्ण असे अभंग निवडले, त्यांचा भावार्थ समजून घेऊन त्यांना अप्रतिम चाली लावल्या आणि लतादीदी व आशाताई यांनी त्या तितक्याच सुरेलपणे गायिल्या. यामधून काही अपूर्व अशी भक्तीगीते तयार झाली आहेत. पं.हृदयनाथ यांच्या बहुतेक सगळ्या कार्यक्रमांमध्ये यातली एक दोन तरी गीते असतातच. त्यावेळी त्यातल्या गहन अर्थाबद्दल जे निरूपण ते करतात तेसुध्दा त्या मधुर गाण्याइतकेच सुश्राव्य असते. विठ्ठलाचे गुणगान करण्यासंबंधीची त्यातली तीन गाणी खाली दिली आहेत.
घराजवळ कावळा कावकाव करायला लागला तर तो पाहुणा येणार असल्याची पूर्वसूचना देतो अशी एक समजूत आहे. त्याचा आधार घेऊन प्रत्यक्ष पंढरीनाथ विठोबाच येणार आहेत अशी कल्पना ज्ञानेश्वरांनी खाली दिलेल्या अभंगात रंगवली आहे. त्या विठ्ठलाबद्दल काही तरी सांग, तो कधी येणार आहे, केंव्हा भेटणार आहे हे सांगितलेस तर मी तुला दूधदहीभात खायलाप्यायला देईन, तुझ्या पायात सोन्याचे दागीने घालीन वगैरे लालूच त्याला दाखवतात, आपली आतुरता त्यातून दर्शवतात. या सगळ्यांच्या मागे गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला असणार.
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये तयाची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबिया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pail_To_Ge_Kau
खाली दिलेल्या अभंगात त्यांनी सगुण आणि निर्गुण रूपांना एकत्र आणले आहे. विठ्ठलाच्या दिव्य तेजस्वी रूपाची शोभा केवळ अवर्णनीय आहे असे सांगून झाल्यावर पुढच्या कडव्यातल्या शब्दांवरून 'कानडा हो विठ्ठलू'ची मूळ भाषा कानडी होती त्यामुळे पुढे 'बोलणेच खुंटले' आणि 'शब्देविण संवादू' झाला असे कोणाला कदाचित वाटेल, पण ते तसे नाही. कानडा या शब्दाचा अर्थ या अभंगात 'आपल्याला न समजण्यासारखा, अगम्य, अद्भुत' असा आहे. तो नाना त-हेची नाटके रचत असतो, त्याची लीला दाखवीत असतो. ती पाहून मन थक्क होऊन जाते. त्याच्या दिव्य तेजाने डोळे दिपतात, त्याचे अवर्णनीय लावण्य पाहून मन मुग्ध होते. अवाक् झाल्यामुळे बोलायला शब्द सांपडत नाहीत, पण मनोमनी संवाद होतो. त्याच्या दर्शनाने दिग्मूढ होऊन कांही कळेनासे झाले. पाया पडायला गेले तर पाऊल सांपडेना इतकेच नव्हे तर त्याचे अमूर्त रूप आंपल्याकडे पाहते आहे की पाठमोरे उभे आहे ते सुध्दा समजत नाही. त्याला भेटण्यासाठी दोन्ही हांतानी कवटाळले पण मिठीत कांहीच आले नाही. असा हा 'कानडा हो विठ्ठलू' आहे. शरीरातील इंद्रियांकरवी तो जाणता आला नाही पण हृदयाने त्याचा रसपूर्ण अनुभव घेतला. असे त्याचे अवर्णनीय वर्णन ज्ञानोबारायांनी या अभंगात केले आहे. या अभंगाला अत्यंत मधुर अशी चाल पं.हृदयनाथ मंगेशकरांनी लावली आहे. त्यांच्याच 'भावसरगम' या कार्यक्रमात त्यांनी हा अभंग गातांना त्याविषयी ही माहिती सांगितली.
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथीची शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pandurang_Kanti_Divya_Tej
संत तुकाराम आणि संत नामदेव यांनी विठ्ठलाच्या नामाचा घोष, त्याच्या रूपाचे दर्शन वगैरेंमधला आनंद दाखवून दिला. संत ज्ञानेश्वरांनीही तो दाखवलाच, पण खाली दिलेल्या अभंगात ते सांगतात की त्याच्या सान्निध्यामुळे वातावरणात एक अद्भुत सुगंध दरवळला. मला त्यामधून त्याचे आगमन झाल्याचे समजले आणि पुढे होऊन त्याचे दर्शन घेतल्यावर तर माझे देहभान हरपून गेले. हे गोड गाणे लतादीदी आणि किशोरीताई या दोघींनीही गायिले आहे.
अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।
मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥
चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥
तो सावळा सुंदरू कांसे पितांबरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥
बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Avachita_Parimalu
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments:
Post a Comment