Wednesday, July 17, 2013

विठ्ठल किती गावा ? (भाग ८ - अंतिम)

दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमाराला विठ्ठलाचे अभंग आणि भक्तीगीते यांचे सुरेल असे कार्यक्रम आयोजित केले जातात. बहुतेक वेळा त्यातल्या एकाद्या कार्यक्रमाला मी हजेरी लावतो. याचे मुख्य कारण म्हणजे मला ते अभंग, ती गाणी ऐकायला आवडतात. मला ती का आवडतात हे एक गूढ आहे. विठोबाचे नाव उच्चारल्याने आणि त्याचे दर्शन घेतल्याने अतीव आनंद होतो, देहभान हरपून जाते वगैरे वर्णने संतमंडळींनी केली आहेतच, माडगूळकर आणि खेबूडकरांसारख्या गीतकारांनीही केली आहेत. तसा थोडा फार अनुभव आपल्याला येतो असे सांगणारी माणसे भेटतात, देवळांमध्ये दर्शनाला आलेल्या काही भाविक लोकांच्या चेहे-यावर ते भाव उमटलेले दिसतात, पण मला स्वतःला मात्र असा कोणताच अनुभव आला नाही. कुठल्याचे देवाचे नाव घेताच मिठाई खाल्ल्याचा भास झाला नाही किंवा त्याच्याकडे पहात असतांना आजूबाजूला काय चालले आहे याची जाणीवही राहू नये असे काही झाले नाही. स्वर्ग, नरक, पुनर्जन्म, मोक्ष वगैरेंमध्ये मला काडीएवढाही इंटरेस्ट कधी वाटला नाही आणि कदाचित त्यामुळे पापपुण्याचा हिशोब ठेवणारा चित्रगुप्त आणि त्यावरून फैसला करणारा यमधर्म यांचेही महत्व वाटले नाही. देवाचे नुसते नाव जिभेवर घेतले किंवा त्याचे चित्र डोळ्यांनी पाहिले की पापाच्या राशी जळून जातात आणि पुण्याचे डोंगर उभे राहतात हे तर मला कधीच पटले नाही. पण असे असले तरी भजन, अभंग, भक्तीगीते वगैरे ऐकतांना मला खूप चांगले वाटते आणि मी त्यात इतके समरस होऊन ते गायन ऐकतो की क्वचित कधी तिथल्या श्रोत्यातला एकादा मुलगा किंवा मुलगी जाता जाता माझ्याही पाया पडून जाते.

गेल्या वर्षी आषाढी एकादशीच्या सुमाराला मी पुण्याला असतांना तिथे पण एक चांगला कार्यक्रम पाहिला होता आणि त्याबद्दल या ब्लॉगवर लिहिलेही होते. या वर्षी तर एकादशीच्या दहा बारा दिवसांपूर्वीच त्यानिमित्याने वाशीला पहिला सांगीतिक कार्यक्रम होऊन गेला. त्या वेळी सादर केली गेलेली गाणी ऐकता ऐकता त्या अनुरोधाने मला आणखी काही प्रसिध्द गाणी आठवत गेली. तेंव्हा त्यांचेच एक संकलन करायचे ठरवले. मराठी भाषेतच अशी गीते आणि अभंग असंख्य आहेत, त्यातली माझ्या माहितीतली आणि आवडती अशी काही गाणी मी या लेखमालिकेसाठी निवडली.

'विठ्ठल किती गावा ?' असे या लेखाचे शीर्षक ठेवले असल्यामुळे ज्या गीतांमध्ये विठोबाच्या गायनभक्तीचा उल्लेख आहे अशी गाणी आणि अभंग पहिल्या दोन भागात निवडले. यात संत तुकाराम महाराजांचे चार अभंग आणि स्व.माणिक वर्मा यांनी गायिलेली दोन भक्तीगीते होती. संत नामदेवांनी लिहिलेले सहा अभंग तिस-या भागात घेतले होते. त्यातले तीन विठ्ठलाच्या दर्शनासंबंधी आणि तीन त्याच्या नावाच्या उच्चारावर लिहिलेले होते. चौथ्या भागात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले सहा अभंग घेतले होते. यात सगुण आणि निर्गुण अशा विठ्ठलाच्या दोन्ही प्रकारच्या रूपांमधून मिळणा-या अवर्णनीय आनंदाचे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. संत एकनाथ, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा आणि त्यांची पत्नी संत सोयराबाई यांचे अभंग पाचव्या भागात घेतले होते. विठ्ठलाला मातेच्या जागी मानून त्याला विठू माउली, विठाबाई वगैरे नावांनी संबोधन करून लिहिलेले अभंग आणि गीते सहाव्या भागात घेतली होती. विठ्ठलाच्या सावळ्या पण मनोहर अशा रूपाचे वर्णन करणारे अभंग आणि गीते सातव्या भागात गोळा केली होती. आता निरनिराळ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांची राहिलेली गीते या आठव्या भागात एकत्र करून मी ही अष्टपदी संपवत आहे.  

विठोबाला 'माउली' असे संतांनी म्हंटले आहे, अर्थातच ही संतमंडळी त्याची आवडती 'लेकरे' झाली. अशा या लेकुरवाळ्या विठ्ठलाचे वर्णन खाली दिलेल्या अभंगात केले आहे. त्यात संत जनाबाईंनी हे वर्णन केले असल्यामुळे त्यांच्या काळामधले निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, गोरा कुंभार, चोखा मेळा, जीवा, बंका आणि नामदेव यांचे उल्लेख या अभंगात आहेत. संत एकनाथ आणि संत तुकाराम हे त्यानंतरच्या शतकांमध्ये होऊन गेले. या अभंगाच्या शेवटी 'जनी म्हणे' असे लिहिले असले तरी 'नामयाची जनी' अशी त्यांची नेहेमीसारखी सही नाही. कदाचित "संत जनाबाईंनी असा विचार केला असेल" अशी कल्पना करून हा अभंग आणखी कोणी तरी लिहिला असेल.

विठु माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ।।
  निवृत्‍ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी ।।१।।
  पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्‍ताबाई सुंदर ।।२।।
गोराकुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी ।।३।।
बंका कडेवरी, नामा करांगुली धरी ।।४।।
   जनी म्हणे गोपाळा, करी भक्‍तांचा सोहळा ।।५।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Vithu_Majha_Lekurvala

संत नामदेव महाराज विठ्ठलाचे लाडके भक्त होते. त्यांची विठ्ठलाशी इतकी जवळीक होती की त्याचे गुणगान करणे, दर्शन करणे एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्याच्याशी एकेरीवर येऊन (खोटे खोटे) भांडलेसुध्दा. असेच थोडेसे उद्दामपणाचे वाटणारे गा-हाणे त्यांनी खाली दिलेल्या अभंगात केले आहे. त्यांनी या अभंगात विठ्ठलाला जवळ जवळ जाबच विचारला आहे.

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा ।
करी अंग संगा, भक्‍ताचिया ॥१॥
    भक्‍त कैवारीया होसी नारायणा ।
    बोलता वचना, काय लाज ॥२॥
मागे बहुतांचे फेडियले ऋण ।
आम्हासाठी कोण, आली धाड ॥३॥
    वारंवार तुज लाज नाही देवा ।
    बोल रे केशवा, म्हणे नामा ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pandhari_Nivasa_Sakhya

कवीवर्य ग.दि.माडगूळकरांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या काही गीतांमध्ये संतांच्या रचनांमधला पूर्वापार भाव सुंदर रीत्या आणला आहे. सकाळी उठल्यानंतर भूपाळी गाऊन देवाची प्रार्थना करून त्यालाही जागवायचे अशी परंपरा आहे. 'उठा उठा हो गजमुख' यासारख्या पारंपारिक रचना आणि 'घनःशायामसुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' यासारख्या 'अमर भूपाळ्या' प्रसिध्द आहेत. विठ्ठलाला जाग आणण्यासाठी गदिमांनी लिहिलेली भूपाळी खाली दिली आहे.

प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला ।।ध्रु.।।
  दारी तव नामाचा चालला गजरू ।
  देव-देवांगना गाती नारद-तुंबरू ।
  दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणि थाटला ।।१।।
दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी ।
श्रवणिमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी ।
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला ।।२।।

स्व.ग.दि.माडगूळकरांनीच लिहिलेले एक अप्रतिम गीत अजरामर झालेले आहे. हे अत्यंत भावपूर्ण आणि अर्थपूर्ण गीत मला इतके आवडले की या एका गीतातल्या शब्दरचनेच्या मागे दडलेला अर्थ समजावून सांगण्यासाठी मी एक स्वतंत्र लेखमाला लिहिली होती. एक कुंभार आणि त्याने बनवलेली गाडगीमडकी यांच्या रूपकामधून त्यांनी परमेश्वर आणि मनुष्यप्राणी, आत्मा आणि व्यक्तीमत्व यांचे चित्रण या गीतात केले आहे.

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार ।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।ध्रु.।।
   माती, पाणी, उजेड, वारा,  तूच मिसळसी सर्व पसारा ।
   आभाळच मग ये आकारा ।
   तुझ्या घटांच्या उतरंडीला, नसे अंत, ना पार ।।१।।
घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे ।
तुझ्याविना ते कोणा नकळे ।
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ।।२।।
   तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसि तू, तूच ताडीसी ।
   न कळे यातुन काय जोडीसी ।
   देसी डोळे परि निर्मिसी तयांपुढे अंधार ।।३।।


स्व.वसंत प्रभू यांचे संगीत दिग्दर्शन आणि कवी पी.सावळाराम यांची शब्दरचना यांच्या संगमामधून अत्यंत अवीट अशा गोडीची अनेक भावगीते मराठी भाषिक रसिकांना मिळाली आहेत. त्यात काही गीते विठ्ठलरखुमाईंच्या संबंधी आहेत, पण त्यात सामाजिक आशय, मानवता वगैरे विषयांना वाचा फोडली आहे.  परंपरागत समजुतीप्रमाणे टाळ कुटून भजन न करता आणि देवदर्शनासाठी पंढरीची वारी न करता, आपले रोजचे जीवन मंगलमय ठेवल्यानेसुध्दा देव प्रसन्न होतो असा भाव खाली दिलेल्या पहिल्या गाण्यात आहे.

विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला ।
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला ।।ध्रु.।।
    तुळशी-माळ घालुनि गळा, कधी नाही कुटले टाळ ।
    पंढरीला नाही गेले, चुकूनिया एक वेळ ।
    देव्हार्‍यात माझे देव. ज्यांनी केला प्रतिपाळ ।
    चरणांची त्यांच्या धूळ, रोज लावी कपाळाला ।।१।।
सत्य वाच माझी होती, वाचली न गाथा पोथी ।
घाली पाणी तुळशीला, आगळीच माझी भक्‍ती ।
शिकवण मनाची ती,  बंधुभाव सर्वांभूती ।
विसरून धर्म जाती, देई घास भुकेल्याला ।।२।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Vitthal_To_Aala_Aala

हे गाणे परंपरागत प्रथांना सरळ सरळ धक्का देणारे असल्यामुळे ते ऐकून लहान मुलांच्या मनांवर 'वाईट संस्कार' होतील म्हणून "त्यांना ते ऐकू देता कामा नये" असा विचार करणारे काही वजीलधारी लोक माझ्या लहानपणी होते. पी.सावळाराम आणि वसंत प्रभू याच जोडीने आणलेल्या खाली दिलेल्या गाण्यात तर त्यांच्या मते कहर झाला होता. "पंढरपूर सोडून विठ्ठलाने निघून जावे" असा आग्रह खुद्द रखुमाईच करते असे या गाण्यात म्हंटले आहे. पण गंमत म्हणजे यातल्या कशाचाच काही अर्थ समजून न घेता त्या निमित्याने 'विठ्ठल' हे नाव कानावर पडते म्हणून हेसुध्दा 'देवाचे गाणे' आहे असे समजणारेही काही लोक त्या काळात होते.

    पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला ।
    विनविते रखुमाई विठ्ठला ।।ध्रु.।।
ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा ।
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्‍तजनांचा ।
भक्‍त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा ।
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला ।।१।।
    धरणे धरुनी भेटीसाठी, पायरीला हरिजन मेळा ।
    भाविक भोंदु पूजक म्हणती, केवळ आमुचा देव उरला ।
    कलंक अपुल्या महानतेला, बघवेना हो रखुमाईला ।
    यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला ।।२।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pandharinatha_Jhadakari

गेले अनेक दिवस पायपीट करून पुढे पुढे जात असलेल्या भक्तजनांच्या सगळ्या दिंड्या आज पंढरपूरला पोचतील. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे चंद्रभागेचे वाळवंट संकुचित झालेले असले तरी मिळेल तेवढ्या जागेत  झेंडा रोवून हरिनामाचा गजर करत राहतील. याचे वर्णन करणारे एक गाणे मी लहानपणी शिकलो होतो ते असे होते.
विठूचा, गजर हरिनामाचा, झेंडा रोविला ।
वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी, डाव मांडिला ॥

याच विषयावरचे भारुडाच्या अंगाने जाणारे एक वेगळे गाणे आता उपलब्ध आहे ते असे आहे.

या विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला ।
या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला ॥१॥
   कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण ।
   नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा ॥२॥    झेंडा रोविला ।
उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्‍गुरूजवळी ।
प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा ॥३॥    झेंडा रोविला ।
    पचतत्वांची गोफण, क्रोध पाखरे जाण ।
    धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण ।
    केशवदास म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा ॥४॥    झेंडा रोविला ।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ya_Vithucha_Gajar_Hari

उद्याच्या आषाढी एकादशीला क्षेत्र पंढरपूर इथे जमलेल्या असंख्य भाविकांना इथूनच नमन करून आणि त्यांच्या गजराचा आनंद टेलिव्हिजनवरून पहात ही मालिका आवरती घेत आहे.


.  . . . . .  . . . . . . . . . ..  . (समाप्त)


No comments: