Thursday, July 04, 2013

तेथे कर माझे जुळती - १४ - शंतनुराव किर्लोस्कर (पूर्वार्ध)



माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या मोठ्या व्यक्तींच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या सदरात दोन शब्द लिहायचे असे मी पाच वर्षांपूर्वी ठरवले होते. यातल्या एकेका व्यक्तीबद्दल ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती थोडक्यात देणे मला शक्यही नाही, माझी तेवढी पात्रताही नाही आणि हे लेख लिहिण्यामागे माझा तसा उद्देशही नाही. "या थोर लोकांबरोबर माझी ओळख होती." अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही. फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी आणि या महान लोकांचा माझ्यावर पडलेला प्रभाव यासंबंधी माझे चार शब्द मी या निमित्याने मांडणार आहे. यामुळे यातसुध्दा कदाचित थोडासा मीच डोकावलेला दिसणार याला काही इलाज नाही. या लेख मालिकेतले हे चौदावे पुष्प प्रख्यात उद्योगपती स्व.शंतनुराव किर्लोस्कर यांना समर्पित करीत आहे.

पन्नास वर्षांपूर्वीच्या काळातल्या दर्जेदार आणि लोकप्रिय मराठी मासिकांमध्ये किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर या मासिकांना मानाचे स्थान होते. या तीन्ही मासिकांचे प्रकाशन किर्लोस्कर कुटुंबीयांकडून होत असे. किर्लोस्करांच्या कारखान्यांसंबधी काही महत्वाचे व़त्तांतसुध्दा या मासिकांमध्ये संक्षिप्तपणे दिले जात असत. एकाद्या नव्या कारखान्याचे किंवा त्यातल्या नव्या भागाचे उद्घाटन, एकादा बक्षिस समारंभ, स्नेह संमेलन, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, माननीय स्थानिक किंवा परदेशी पाहुण्यांची भेट अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये उद्घाटक, वक्ते, प्रमुख पाहुणे, यजमान अशा निरनिराळ्या भूमिकांमध्ये श्री.शंतनुराव किंवा एस.एल. किर्लोस्कर यांचे दर्शन या पानांमधून नेहमी होत असे, त्या प्रसंगी त्यांनी दिलेल्या संदेशाचा गोषवारा दिलेला असे. त्या काळात मी वयाने लहान असलो तरी मासिकांची पाने सहज चाळता चाळता अशा बातम्यांकडेही माझी नजर वळत असे. त्यायोगे एक अद्वितीय आणि महान व्यक्ती अशी श्री. शंतनुराव किर्लोस्कर यांची प्रतिमा या वाचनामधून मनात तयार होत गेली.

मी शाळेत असतांनाच स्व.जमशेदजी टाटा यांचे अल्पचरित्र माझ्या वाचण्यात आले होते. त्यांनी लोखंड आणि पोलाद तयार कऱण्यासाठी भारतातला पहिला मोठा कारखाना उभारला होता. जमशेदपूर आणि टाटानगर अशी दोन शहरे त्यांच्या नावाने वसवली गेली होती. टाटांच्या कारखान्यात रेल्वे इंजिनासारखी अजस्त्र यंत्रे तयार केली जात होती, मुंबई महानगराला होणारा विजेचा पुरवठा टाटा कंपनीकडून केला जात होता, त्यासाठी बांधलेली धरणे त्यांच्या मालकीची होती, शिवाय तेल, साबण आणि मीठ यासारख्या रोजच्या उपयोगाच्या वस्तूही टाटा या नावाने बाजारात विकल्या जात होत्या. त्यामुळे त्या काळात टाटा कंपनी भारतातली सर्वात मोठी कंपनी होती यात काही शंका नव्हती. बिर्लांचे नाव मी ऐकले होते, पण त्या नावाने कोणतीही वस्तू स्थानिक बाजारात दिसत नव्हती, सेठ घनश्यामदास बिर्ला हे महात्मा गांधींचे निकटवर्ती होते असेही ऐकले असल्यामुळे ते बहुतेक चरखा, पंचा, धोतर वगैरेंचे उत्पादन करत असावेत असा एक तर्क मनात येत होता. त्या काळच्या बिर्ला यांच्या विशाल साम्राज्याची मला सुतराम कल्पना नव्हती. वालचंदनगर नावाचेही एक गाव ठाऊक होते, पण वालचंद ग्रुपबद्दल काही माहिती नव्हती. सिंघानिया, वाडिया, महिन्द्र वगैरेंची नावेदेखील ऐकली नव्हती, अंबानी, मित्तल, नारायणमूर्ती, प्रेमजी वगैरेंचा अद्याप उदय झाला नव्हता. यामुळे शालेय जीवनात असतांना माझ्या लेखी तरी टाटांच्या खालोखाल किर्लोस्करांचेच स्थान होते. शंतनुराव त्यांचे मुख्य असल्यामुळे तेही खूप ग्रेटच असणार यात शंका नव्हती.

पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजवर त्या काळी किर्लोस्कर या नावाची एक प्रकारची छाया पसरलेली असायची. पुण्यातच ख़डकी, हडपसर आणि कोथरूड या भागात त्यांचे तीन कारखाने होते आणि टिळक रोडवर मोठे ऑफिस होते. आम्हाला एक दोन वर्षांनी सीनीयर असलेली अनेक मुले किर्लोस्करांच्या यातल्या एकाद्या कंपनीमध्ये नोकरीला लागली होती. आपल्या मित्रांना भेटायला ती हॉस्टेलवर आली तर त्यांच्या बोलण्यात आपल्या कंपनीचे खूप गुणगान येत असे. आमच्या कॉलेजातले बरेचसे ज्यूनियर लेक्चरर्स, डेमॉन्स्ट्रेटर्स वगैरे लोक किर्लोस्करांकडे नोकरीची संधी शोधत असत आणि ती मिळाली की लगेच कॉलेज सोडून तिकडे जात असत, असे वारंवार घडत असे. आमच्या काही वर्गबंधूंचे काका, मामा किंवा मावस, आते वगैरे भावंडे किर्लोस्कर कंपनीत नोकरीला असत आणि त्यांच्याकडूनसुध्दा फक्त चांगलेच रिपोर्ट येत असत. किर्लोस्कर समूहाच्या अनेक कंपन्या आहेत आणि प्रत्येकीचे व्यवस्थापन निरनिराळी मंडळी करतात एवढे सामान्यज्ञान वाढलेले असले तरी या सर्वांवर शंतनुरावांचा वचक आहे आणि सगळ्या कंपन्यांचे तेच प्रमुख कर्ताधर्ता होते याबद्दल कोणालाही शंका नव्हती. त्या सर्वच कंपन्या आपापल्या क्षेत्रात करत असलेल्या घोडदौडीचे श्रेय शंतनुरावांना मिळत असे. त्याचप्रमाणे तिथे काम करत असणा-या कर्मचारी वर्गामधले शिस्त आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यालाही तेच मुख्यतः कारणीभूत असल्याचे बोलले जात होते.

इंजिनियरिंग शिकत असतांना केलेल्या शैक्षणिक सहलीमध्ये दक्षिण भारतातले मोठमोठे कारखाने आणि पॉवर स्टेशन्स पाहण्याची संधी मिळाली. उत्तर भारताची सहल पाकिस्तानबरोबरच्या लढाईमुळे रद्द झाली, पण त्या निमित्याने त्या कारखान्यांची माहिती मिळाली होती. यावरून एवढे लक्षात आले की किर्लोस्कर उद्योगसमूह मोठा असला तरी त्यांच्याहूनही मोठे अनेक कारखाने भारतात आहेत. सर्व प्रकारची कारखानदारी पाहता त्यातले  किर्लोस्करांचे स्थान मला आधी वाटत होते तसे शिखराजवळ नव्हते. इंजिनियरिंगच्या क्षेत्रात मात्र त्यांचेही नाव आघाडीवर होते.   

पदवी मिळाल्यानंतर कसेही करून परदेशी म्हणजे अमेरिकेला जायचे हे माझ्या बॅचमधल्या बहुतेक पुणेकर विद्यार्थ्यांचे पहिले स्वप्न असायचे आणि श्रीमंत बापांची पोरे व्यवस्थित प्लॅनिंग करून ते साकार करून घेत असत. पण मध्यम वर्गीयांच्या मुलांच्या बाबतीत ते खूपच कठीण असल्यामुळे किर्लोस्करांच्या कंपनीत नोकरी धरणे हे त्यानंतर दुस-या क्रमांकावर असलेले स्वप्न ते पहात आणि त्याची पूर्तता होतही असे. मला स्वतःला सुध्दा किर्लोस्करांच्या एका कंपनीकडून इंटरव्ह्यूचा कॉल आला तेंव्हा खूप आनंद झाला होता, पण त्याच दिवशी माझ्या काही पुण्यातल्या मित्रांनाही बोलावले होते. इंटरव्ह्यूमध्ये सगळेच पास झाले असते तर त्यातून निवड करतांना त्या स्थानिक कँडिडेट्सनाच अधिक पसंती मिळाली असती. त्यामुळे माझ्या निवडीची शक्यता कमी झाली असती. योगायोगाने त्याच दिवशी इंटरव्ह्यूसाठी मला अणुशक्तीखात्याच्या प्रशालेकडूनही बोलावणे आले. या दोन आमंत्रणांचा विचार करता मला दुसरा पर्याय बरा वाटला आणि मी तिकडे जायचा निर्णय घेतला. पण किर्लोस्कर उद्योगाबद्दल मनात एक अनुकूल जागा तयार झालेली होती ती तशीच राहिली.

. .  . . . . .  . . . . . . . .  . . . . .  (क्रमशः)

स्व.शंतनुराव किर्लोस्करांना मी कधी पाहिले, त्यांना कधी भेटलो वगैरे महत्वाचा मजकूर या लेखाच्या उत्तरार्धात वाचावात.
http://anandghan.blogspot.in/2013/07/blog-post_5.html

No comments: