Friday, July 05, 2013

तेथे कर माझे जुळती - १४ - शंतनुराव किर्लोस्कर (उत्तरार्ध)

 

माझ्या लहानपणच्या शंतनुरावांसंबंधीच्या आठवणी पूर्वाधात दिल्या आहेत.
http://anandghan.blogspot.in/2013/07/blog-post.html

शंतनुराव किर्लोस्कर यांचे नाव आणि फोटो मला वर्तमानपत्रांमध्ये आणि टीव्हीवर वरचेवर दिसत असत आणि त्याबरोबर येणारा मजकूर वाचून मनामधली त्यांची प्रतिमा अधिकाधिक उज्ज्वल होत गेली. त्यातल्या एकेका बातमीतून किंवा लेखामधून अत्यंत हुषार, धोरणी, कार्यक्षम, कर्तबगार, तत्वनिष्ठ असूनही प्रॅक्टिकल, सज्जन, विचारवंत, कल्पक, दूरदर्शी, मनमिळाऊ, लोकप्रिय, प्रामाणिक, निर्भिड, निर्भय वगैरे अनेक विशेषणे मनातल्या त्यांच्या व्यक्तीरेखेशी जोडली जात होती. त्यांची पर्सनॅलिटी, बोलणे, चालणे, वागणे वगैरे सगळे रुबाबदार होते, माझ्या मनावर आपोआपच त्यांची छाप पडत होती. त्यांनी वार्ताहरांना दिलेल्या मुलाखतींमधले काही मुद्दे दीर्घकाळ लक्षात राहण्यासारखे होते.

एकदा एका मुलाखतकाराने त्यांना विचारले की पुण्याला त्यांचे तीन चार कारखाने असतांना त्यातल्या कामगारांसाठी वसाहत बांधायचा विचार त्यांनी का केला नाही? त्याला अत्यंत समर्पक उत्तर देतांना त्यांनी सांगितले, "आम्हाला इंजिनियरिंगमधले जास्त समजते म्हणून आम्ही या क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. इमारतींचे बांधकाम, त्याचा मेंटेनन्स, इस्टेट मॅनेजमेंट वगैरेतले आम्ही तितकेसे जाणत नाही आणि ते शिकून घेण्याची आम्हाला इच्छा नाही, आमचा अमूल्य वेळ आम्हाला त्यात घालवायचा नाही. या कारणासाठीच आम्ही कारखान्यांसाठी जागांची निवड करतांना पुणे आणि बंगलोरसारखी मोठी शहरे निवडली. या ठिकाणी घरे बांधून देण्याचे काम जाणणारे अनेक व्यावसायिक आहेत. त्यांचे काम त्यांनाच करू देत. आमच्या कामगारांना ती घरे विकत किंवा भाड्याने घेण्यासाठी आम्ही अर्थसहाय्य करू शकतो, पण आम्हाला स्वतःला त्या उद्योगात पडायचे नाही."
"मग किर्लोस्करवाडी तरी कशाला वसवली?" या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते, "तो काळ वेगळा होता. कारखान्यात काम करण्यासाठी जे कामगार येतील त्यांच्या निवासाची चांगली सोय करणे तेंव्हा आवश्यकच होते. त्या काळात नवा कारखाना उभा करण्यासाठी मिळालेल्या ओसाड जमीनीवर शून्यामधून नवे विश्व उभे करायचे होते. या ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी जे काही आवश्यक होते ते माझ्या वडिलांना करावे लागले आणि त्यांनी ते आनंदाने केले. पण आजही आम्ही त्याच ठिकाणी उभे रहायला हवे का? आज उपलब्ध असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि आमच्या क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग कशात होणार आहे हे पाहून आम्हाला त्या दिशेने पुढे जायला पाहिजे ना?" 

किर्लोस्करांचे उद्योगविश्व सांभाळत असतांनाच ते पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याची विचारपूर्वक तयारी शंतनुरावांनी केली. त्या व्यापातली दैनंदिन व्यवहार पहाण्याची आणि जबाबदारी संभाळण्याची एकेक कामे त्यांनी पुढच्या पिढीकडे सोपवली आणि धोरण ठरवणे, मार्गदर्शन करणे वगैरेसारख्या मूलभूत मुद्यांवर ते अधिक लक्ष देऊ लागले होते. त्या काळातल्या एका वार्ताहरपरिषदेत एका रिपोर्टरने त्यांना खवचटपणे विचारले, "तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी तुम्ही प्रोफेशनल मॅनेजर्स का ठेवत नाही?"
शंतनुरावांनी त्यालाच उलट विचारले, "असे तुम्हाला कुणी सांगितले?" ते पुढे म्हणाले, "आमच्या कंपन्यांच्या टॉप मॅनेजमेंटमधले सारेजण उच्चशिक्षित आहेत. इंजिनियरिंग, मॅनेजमेंट, फायनॅन्स वगैरेंमध्ये त्यांनी जगप्रसिध्द संस्थांमधून शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतले आहे. आधुनिक काळातली सगळी मॅनेजमेंट टूल्स वापरण्यात ते निष्णात आहेत. प्रोफेशनल मॅनेजर होण्यासाठी आणखी काय असायला पाहिजे?"
यावर काही उत्तर येण्याआधीच शंतनुरावांनी हल्ला चढवला, "एकादी आगबोट बुडण्याची भीती वाटली तर सगळ्यात आधी त्या बोटीवरचे उंदीर पळ काढतात, तशा पळपुट्या किंवा कुणीतरी मोठे गाजर दाखवले की तिकडे धाव घेणा-या आधाशी लोकांनाच तुम्ही प्रोफेशनल मॅनेजर म्हणणार का? बिकट परिस्थिती आली तरी आमचे लोक तसे घाबरून पळून जाणार नाहीत, तिला खंबीरपणे तोंड देतील. शिवाय आणखी कुठे आणखी काय मिळते का हे शोधत ते फिरत नाहीत म्हणून त्यांचे प्रोफेशनल स्किल कमी ठरते का?"
या उत्तराने गांगरून जाऊन तो पत्रकार गारेगार पडला. "हे सगळे गुण किर्लोस्कर आडनावाच्या लोकांमध्येच असतात का?" असा दुसरा कुजकट प्रश्न त्याने विचारलाही असता तरी त्यालाही शंतनुरावांनी समर्पक उत्तर दिलेच असते. आपण जे काही करतो ते बरोबरच आहे याची खात्री आणि आत्मविश्वास त्यांच्या रोखठोक बोलण्यात व्यक्त होत असे. गुळमुळीत उत्तर देणे किंवा प्रश्नाला बगल देणे असे ते सहसा करत नसावेत.

शंतनुराव किर्लोस्करांना प्रत्यक्ष पाहण्याची पहिली संधी मला गुणवत्ता या विषयावरील एका कॉन्फरन्स किंवा सेमिनारमध्ये मिळाली. अर्थातच त्या वेळी मी प्रेक्षकांमध्ये बसलो होतो आणि ते प्रमुख वक्ते म्हणून व्यासपीठावर विराजमान झाले होते. संस्थेचे पदाधिकारी आणि उद्योगपती, सनदी अधिकारी, राजकीय नेते वगैरे इतर काही मान्यवर त्यांच्यासोबत बसले होते. सूत्रसंचालक, स्वागताध्यक्ष आणि इतर मान्यवरांनी आपापल्या भाषणात गुणवत्तेचे अमाप कौतुक करून "आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट टॉप क्वालिटी असली पाहिजे", "आमच्या कारखान्यात तयार होणारी प्रत्येक वस्तू बेस्ट क्वालिटीचीच असते." वगैरे वारेमाप विधाने केली. शंतनुरावांनी त्यांच्या 'की नोट अॅड्रेस'ची सुरुवात अशी केली. "क्वालिटी या शब्दाचा अर्थ फक्त बेस्ट क्वालिटी असा होत नाही." एवढे बोलून त्यांनी एक छोटासा पॉज घेतला आणि व्यासपीठावरील इतर मंडळींवर नजर टाकली. "आतापर्यंत जे काही बोलले गेले ते कसे निरर्थक होते." असा त्या नजरेचा अर्थ सुजाण श्रोत्यांना त्या नजरेमधून समजला. कुठल्याही कारखान्यात जी वस्तू किंवा जे यंत्र तयार होते ते कशासाठी वापरायचे असते हा उद्देश ठरलेला असतो आणि त्या कारणासाठी ते विकत घेणा-या ग्राहकांच्या तशा अपेक्षा असतात. त्या पूर्ण होतील अशी खात्री देणे म्हणजे 'गुणवत्ता'. प्रत्येक बाबतीत 'बेस्ट क्वालिटी'चा हट्ट धरण्यापेक्षा खात्रीलायक 'अॅप्रोप्रिएट क्वालिटी' आणणे हा त्याच्या इंजियरिंगचा गाभा असला पाहिजे. या दृष्टीने स्टँडर्डायझेशन करून प्रत्येक उत्पादनाचे वर्गीकरण करून त्यातल्या प्रत्येक ग्रेडचे गुणधर्म ठरवले जातात आणि ते जाणून घेण्यासाठी कोणकोणत्या तपासण्या करायच्या हे ठरवले जाते. आपले उत्पादन त्या तपासण्यामधून शंभर टक्के पास होत असले तर त्याचा अर्थ त्याची गुणवत्ता समाधानकारक आहे. स्टेनलेस स्टीलमध्ये साध्या पोलादापेक्षा अनेक बाबतीत चांगले गुण असतात, पण गरज नसतांनासुध्दा 'बेटर क्वालिटी' म्हणून साध्या पोलादाऐवजी स्टेनलेस स्टील वापरले तर त्यामुळे त्या वस्तूची किंमत जेवढी वाढते त्या प्रमाणात त्याची गुणवत्ता वाढत नाही. सोने हा काही दृष्टीने सर्वोत्कृष्ट म्हणजे 'बेस्ट क्वालिटी'चा धातू असला तरी यंत्राचे भाग सोन्याचे करून काहीच फायदा नाही, उलट ते यंत्र चालणारसुध्दा नाही. अशा प्रकारची अनेक उदाहरणे देऊन 'क्वालिटी' किंवा 'गुणवत्ता' या संकल्पनेचा अर्थ त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे समजावून सांगितला की सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन त्यांचे व्याख्यान ऐकत राहिले.
     
आमच्या एका प्रकल्पासाठी काही अतिविशिष्ट यंत्रसामुग्री तयार करण्याचे कठीण काम किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीला दिले होते. श्री.संजय किर्लोस्कर त्या आव्हानात्मक कामगिरीकडे जातीने लक्ष ठेवत असल्यामुळे त्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर आमची त्यांच्याशी चर्चा होत असे. या निमित्याने आमच्या भेटी होत असतांना शंतनुरावांशी एकदा भेटण्याची मनापासूनची इच्छा आम्ही व्यक्त केली. संजय यांनीही विचार विनिमय करून त्या भेटीची तारीख आणि वेळ ठरवली. त्यानुसार माझे वरिष्ठ अधिकारी आणि मी पुण्याला जाऊन पोचलो. त्यांच्या 'लकाकि' बंगल्यात आम्हाला नेण्यात आले. शंतनुरावांचे वडील आणि किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आद्य संस्थापक कै.लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या नावाची आद्याक्षरे घेऊन त्या बंगल्याचे नामकरण केले असणार. तो टुमदार बंगला सुंदर आणि नीटनेटका दिसत होता. त्या परिसरातल्या आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये कोण रहात होते आणि ते किती मोठे होते याची मला काही कल्पना नाही, पण जगप्रसिध्द उद्योगपती शंतनुराव या बंगल्यात रहातात असे त्याचे वेगळेपण दाखवणारी कोणतीही ठळक खूण मला तरी तिथे दिसली नाही.

लहानपणापासून मला शंतनुराव हिमालयासारखे उत्तुंग वाटत होते आणि मी त्यांच्या पायथ्याशी तरी कधी पोचेन असे वाटले नव्हते. इतक्या वर्षांपासून स्वप्नवत वाटणारी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा पूर्ण होण्याची वेळ जवळ आली होती, पण त्यासाठी मी काहीच तयारी केली नव्हती. वयाने मी त्यांच्या वयाच्या अर्ध्याहूनही लहान होतोच, ज्ञान, अनुभव, यश, समृध्दी, सामर्थ्य अशा कुठल्याही बाबतीत त्यांच्या पायाच्या बोटाच्या नखाचीसुध्दा मला सर आली नसती. त्यामुळे त्यांच्यासमोर गेल्यावर काय बोलावे हेच मला समजत नव्हते, चुकून एकादा वावगा शब्द तोंडातून बाहेर पडला तर जन्मभर पस्तावा करावा लागणार अशी धाकधूक मनात वाटत होती. अनुभवी लोकांना विचारून घेऊन बोलण्यासारखी दोन चार वाक्ये तयार करावी एवढेही मला आधी सुचले नव्हते. 'लकाकि' बंगल्यात प्रवेश करतांना माझ्या मनात असे विचार येत होते. बंगल्याच्या दिवाणखान्यात जाताच शंतनुरावांचे दर्शन झाले. ऐंशीच्या घरात पोचल्यानंतरसुध्दा त्यांचा चेहेरा तितकाच तेजःपुंज होता. शक्य तेवढे वाकून त्यांना अभिवादन केले. त्यांनी आम्हाला समोर बसवून घेतले. संजयने आमची ओळख करून दिली.

चेर्नोबिलच्या आधीच्या त्या काळात अणुशक्तीविरोधाचे वातावरण तयार झालेले नव्हते, पण पोखरण होऊन गेल्यानंतर भारतावर अनेक प्रतिबंध लादण्यात आलेले होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही स्वावलंबी होण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. देशाच्या स्वावलंबनाबाबत शंतनुराव अनुकूल होते, पण सार्वजनिक क्षेत्राबद्दल त्यांची मते फारशी अनुकूल नसावीत. असा आमचा अंदाज होता. अशा उलटसुलट परिस्थितीत ते कितपत आमच्या पाठीशी आहेत याबद्दल आमच्या मनात संभ्रम होता. तरीही त्यांनी आम्हाला भेटण्याची संधी दिली ही आशेची बाजू होती. माझ्या बॉसने आमचा प्रॉजेक्ट आणि त्यात किर्लोस्करांचा सहभाग यावर थोडक्यात माहिती दिली. त्यांच्याकडे तेवढी माहिती नक्कीच होती, पण संभाषणाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने ते सुसंगत होते. आमच्या क्षमतेवर त्यांचा किती विश्वास होता हे कळायला मार्ग नव्हता, त्यामुळे आम्ही हातात घेतलेले काम आमच्या आवाक्यात आहे की नाही याबद्दल ते कदाचित साशंक असण्याची शक्यता होती. आमच्या प्रकल्पाच्या आर्थिक बाजूवर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आमच्याकडे समाधानकारक उत्तरे नव्हती. त्यामुळे देशाची आन, बान, शान, इभ्रत आणि नवे तंत्रज्ञान विकसित करणे वगैरेंवर आम्ही भर दिला. या प्रयत्नात किर्लोस्कर उद्योगाच्या महत्वपूर्ण सहभागाची प्रशंसा केली. पण यामधून तात्कालिक किंवा भविष्यकाळात कोणता लाभ होणार आहे बाबद्दल ते विचारणा करत राहिले. या प्रयत्नामुळे भारताची इभ्रत वाढली आणि किर्लोस्कर उद्योगसमूहाचा लौकिक वाढला तरी त्यामधून निर्यात करण्याच्या संधी वाढण्याची शक्यता ते आजमावून पहात असावेत. तोपर्यंत ते वैश्विक पातळीवर विचार करू लागलेले होते. दहा पंधरा मिनिटे वार्तालाप आणि चहापान करून झाल्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला. त्यांच्याकडून पाठीवर थाप किंवा हात ठेवणारे आश्वासन पदरात पडले नसले तरी आमची बाजू मांडायची संधी मिळाली होती. माझ्या व्यक्तीगत दृष्टीने पाहता त्यांचे जवळून दर्शन घडले हेच खूप महत्वाचे होते.

कॅक्टस अँड रोजेस या नावाने शंतनुरावांनी लिहिलेल्या आत्मचरित्रामध्ये त्यांना आलेले कटु व चांगले अनुभव लिहिलेले आहेत. त्यातले एक वाक्य एपीजे अब्दुल कलाम यांनी शंतनुरावांच्या शतसांवत्सरिक समारंभात भाषण करतांना उद्धृत केले होते. ते असे आहे. 'when productively used capital and materials, men and machines, yield results in proportions to the skill and brains of the user'. साधनसामुग्री, मनुष्यबळ आणि यंत्रे या सर्वांचा कौशल्य आणि बुध्दीमत्ता यांच्या सहाय्याने उपयोग करून घेतला तर त्यामधून चांगला विकास होतो, प्रगती होते. यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि ते साधण्याचा प्रयत्न ते सदोदित करत राहिले होते. त्यांच्या शतसांवत्सरिक समारंभाचे जे आमंत्रण मला आले होते, त्यात त्यांच्या यापूर्वी मला माहीत नसलेल्या एका पैलूचे दर्शन झाले. ते म्हणजे शंतनुराव एक उत्कृष्ट चित्रकारसुध्दा होते. त्यांनी काढलेल्या रंगीत चित्रांचा संच या निमंत्रणासोबत मिळाला होता. त्यातल्या काही चित्रांचे अंश या लेखाच्या वर दिले आहेत. त्यांच्या आठवणीने फक्त हातच जोडले जात नाहीत तर त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावे असे वाटते.
.  . . . . . . . . . . . . . . . . . . . . .  (समाप्त) 
     

2 comments:

mannab said...

कै. शंतनुराव किर्लोस्कर यांसारख्या एका बलाढ्य व्यक्तिमत्वाचे चित्रण आपण सुरेख केलेले आहे. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने " काळापुढती चार पावले " हे अत्यंत समर्पक शीर्षक असलेले त्यांचे चरित्र श्री. सविता भावे यांनी लिहिलेले मी वाचले होते त्यात शंतनुराव यांच्या अनेकविध गुणांचा आलेख आहे, त्याची आठवण आली . आपण हे नक्की वाचलेले असणार.
मंगेश नाबर

Anand Ghare said...

धन्यवाद. त्या काळात कामाच्या रगाड्यात मला पुस्तके वाचणे वगैरे जमले नव्हते. माझे सध्याचे बहुतेक सगळे लिखाण माझी समज, सामान्य ज्ञान आणि स्मृती यावरच आधारलेले आहे. आपण सुचवलेले पुस्तक मिळाल्यास वाचण्याचा प्रयत्न करेन.