शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।
कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।
जयजय रघुवीर समर्थ ।।
हा श्लोक मी लहानपणी किती वेळा म्हंटला असेल त्याची गणती नाही. पण वैराग्य, ज्ञान आणि कवित्व या शब्दांचा अर्थच न समजण्याच्या वयात त्या सगळ्याचा अर्थ रामदासस्वामी हे एक महान सत्पुरुष होऊन गेले एवढाच तेंव्हा समजला असेल. सखोल अभ्यासामधून ज्ञान संपादन करता येते, कवीची प्रतिभा जन्मजात असते आणि हे दोन्ही गुण अंगात असलेल्या माणसाला अहंभाव असू नये, कसलीही आसक्ती असू नये असे वैराग्य प्राप्त करण्यासाठी स्वतःवर केवढे नियंत्रण मिळवावे लागले असेल! हे तीन गुण ज्या समर्थांच्या अंगी एकवटले होते ते अलौकिक व्यक्तीमत्वच असणार!
रामदासांबद्दल अनेक आख्यायिका प्रसिध्द आहेत. त्यातली पहिली अशी की नारायण नावाचा बालक लग्नाच्या बोहल्यावर उभा असतांना त्याने मंगलाष्टकामधले "शुभमंगल सावधान" हे शब्द ऐकले आणि तो लगेच सावध झाला. आपला जन्म संसारात रमण्यासाठी झालेला नाही हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने बोहल्यावरून जी धूम ठोकली ती पुन्हा मागे वळून न पाहण्यासाठी. तो रानोमाळ हिंडला, योग्य गुरू शोधून त्याने त्यांच्याकडून सर्व घर्मशास्त्रांचे शिक्षण घेतले, त्यावर चिंतन, मनन वगैरे करून आपण काही कार्य करायचे ठरवले आणि रामदास या नावाने ते हाती घेऊन आजन्म करत राहिले. या काळात त्यांनी अनेक ग्रंथरचना केल्या, तसेच गावोगावी हिंडून जनजागृती केली. अत्यंत सुबोध भाषेत तशाच तालबध्द आणि सुरेल अशा आरत्या त्यांनी रचल्या. गेली चारशे वर्षे त्या आरत्या घराघरातून गायिल्या जात आहेत. "करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी।" अशा सारखी शब्दरचना थक्क करते त्याचप्रमाणे ती गातांना जोश निर्माण करते. अत्यंत सोप्या भाषेतले आणि छंदबध्द असे मनाचे श्लोक नकळत किती चांगले मार्गदर्शन करून जातात! सर्वसामान्य लोक पाठ करू शकतील, त्यांच्या लक्षात राहू शकतील अशा छोट्या आरत्या आणि चार चार ओळींचे श्लोक समर्थ रामदासांनी लिहिले त्याचप्रमाणे अभ्यास करू इच्छिणा-यांसाठी दासबोध हा मोठा ग्रंथ लिहिला. त्यातून परमार्थ आणि नित्य जीवन या दोन्हीसंबंधी उत्कृष्ट असा उपदेश केला.
ते स्वतः श्रीरामाचे अनन्य भक्त होते, पण त्यांनी रामभक्त हनुमानाची देवळे ठिकठिकाणी स्थापन केली. एक बलदंड आणि निष्ठावान सेवक अशी मारुतीची प्रतिमा आदर्श म्हणून समाजासमोर ठेवणे हा उद्देश त्यामागे होता. प्रत्यक्ष देवाचे, विशेषतः श्रीरामासारख्या उदात्त चरित्रनायकाचे अनुकरण करणे सामान्य मानवाला शक्य नाही, तसा प्रयत्नही कोणी करणार नाही, पण हनुमानासारखी बलोपासना करणे प्रयत्नसाध्य आहे आणि त्याची समाजाला गरज आहे असा दूरदर्शी विचार त्यामागे असण्याची शक्यता आहे. आपले कार्य पसरत आणि वाढत जावे यासाठी समर्थांनी शिष्यवर्ग तयार केला, मठांची स्थापना केली, त्यातून एक संप्रदाय निर्माण झाला.
समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकालीन होतेच. त्यांचे परस्पराशी नेमके कसे संबंध होते यावर वाद घातले जातात. खाली दिलेल्या उदाहरणाने या संबंधात काही माहिती मिळते. स्वराज्याच्या उभारणीच्या सुरुवातीच्या काळात विजापूरच्या आदिलशाहीची सत्ताच महाराष्ट्रावर चालत असे. शिवाजी तेंव्हा छत्रपती झालेले नव्हते. सह्याद्री पर्वतावरील अनेक किल्ले आणि आजूबाजूचा प्रदेश त्यांच्या ताब्यात होता, पण सपाट भूभागावर आदिलशहाची हुकूमतच चालत असे. त्या काळात जेंव्हा शिवाजीचे पारिपत्य करण्याचा विडा उचलून अफजलखान विजापूराहून निघाला तेंव्हा ती बातमी रामदासांना कळताच त्यांनी ती खुबीने शिवाजीमहाराजांपर्यंत पोचवली. खाली दिलेल्या श्लोकांमध्ये परमेश्वराचे गुणगान केले आहे आणि साधा उपदेश केला आहे असे वाटते, पण प्रत्येक चरणाचे पहिले अक्षर घेतले तर "विजापूरचा सरदार निघाला आहे" ही सूचना देऊन त्याचा विचार करून योजना करावी असा संदेश त्यात दिलेला दिसतो. पुढे शिवाजी महाराजांनी अप्रतिम योजनाकौशल्याने अफझलखानाला आणि त्याच्या अचाट सैन्याला कशी धूळ चारली हा इतिहास सर्वश्रुत आहेच.
विवेके करावे कार्य साधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूडील भविष्यार्थी मन ।
रहाटेचि नये ।
चालु नये असन्मार्गी ।
सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीरकृपा ते प्रसंगी ।
दासमहात्म्य वाढवी ।
रजनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।
आदिमाया मूळभवानी ।
हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।
समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्याची खूप प्रशंसा केली आहे. त्यांची दोन अप्रतिम गीते मी या ब्लॉगवर दिली आहेत.
http://anandghan.blogspot.in/2013/02/blog-post_19.html
पहिल्या गीतात ते शिवाजी महाराजांना "निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ॥" आणि त्याबरोबरच "यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा ॥ असे म्हणतात. "आचारशील विचारशील, दानशील धर्मशील । सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठायीं ॥ धीर उदार गंभीर, शूर क्रियेसि तत्पर ॥ " अशा या राजाबद्दल बोलतांना "या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही । महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे ॥ कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसि धाक सुटला । कित्येकांस आश्रयो जाहला, शिवकल्याणराजा॥" असे ते म्हणतात. या गीतामधला प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आणि महाराजांचे नेमके गुण दर्शवणारा आहे.
छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये प्रत्यक्ष स्वर्ग कसा निर्माण झाला हे रामदास स्वामी "स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी । तीर्थासी तुळणा नाही। भक्तांसी रक्षिले मागे, आताही रक्षिते पहा । भक्तांसी दिधले सर्वे। बुडाली सर्व ही पापे, हिंदुस्थान बळावले । अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी ।। यासारख्या शब्दांमध्ये समर्थपणे व्यक्त करतात.
2 comments:
कवी वाल्मिकीसारखा मान्य ऐसा. खरं म्हणजे वाल्मिका सारखा मध्यें थोडासा वृत्तभंग होतो.
बहोत सुंदर
Post a Comment