माझी आई समर्थ रामदासांची परमभक्त होती. तिचे शालेय शिक्षण अक्षरे ओळखण्याइतपतच झालेले असले तरी समर्थांनी लिहिलेले असंख्य श्लोक, ओव्या वगैरे नेहमीच तिच्या जिभेवर असत. तिच्या बोलण्यातून सज्जनगड, कल्याणस्वामी वगैरे उल्लेख येत असत. 'केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे' हे समर्थ रामदासांचे सुप्रसिद्ध वचन माझी आई दर दहा पंधरा दिवसांत एकदा तरी मला ऐकवायचीच. तिने सांगितलेले घरातले एखादे काम करणे आळसापोटी टाळण्यासाठी "मला ते येत नाही", "मी ते शिकलो नाही", "मी ते यापूर्वी कधी केलेले नाही", "उगाच असं करायला गेलो आणि तसं झालं तर पंचाईत होईल" वगैरे सबबी मी पुढे करीत असे. त्यावर तिचे उत्तरही ठरलेले असे. "शिकला नसशील तर आता शिकून घे", "करायला घेतलेस की यायला लागेल", "प्रत्येक गोष्ट तू कधी तरी पहिल्यांदा करणारच आहेस, आज हे काम कर", "'असं'च्या ऐवजी 'तसं' होणार नाही याची आधी काळजी घे आणि तरीही 'तसं' झालंच तर काय करायचं ते आपण तेंव्हा पाहू." वगैरे सांगितल्यावर मला ते काम करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नसे. मात्र एकदा ते काम हाती घेतल्यावर ते फक्त यायलाच लागत असे एवढेच नव्हे तर ते मनापासून आवडू लागे. या अनुभवाचा मला पुढील आयुष्यात खूप उपयोग झाला. सरकारी नोकरीत असतांना बहुतेक सहकारी 'लकीर के फकीर' मनोवृत्तीचे असायचे. प्रत्येक बाबतीत 'प्रिसिडंट' शोधत रहायचे. पण माझे कामच मुळी शून्यातून नवी निर्मिती करण्यासंबंधी होते. जी यंत्रसामुग्री भारतात यापूर्वी कधीच तयार झाली नव्हती ती तयार करवून घेण्याची जबाबदारी आमच्यावर होती. त्यामुळे वरिष्ठांची अनुमती मिळवून आणि कनिष्ठांना सोबत घेऊन नवीन कल्पनांचा पाठपुरावा करायचा असे. लहान सहान प्रयोग करून धडपडत पुढे जात जेंव्हा ते यंत्र तयार होऊन मनासारखे काम करू लागे तेंव्हा त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असे.
सात वर्षांपूर्वी मराठी ब्लॉगविश्व फारसे आकाराला आले नव्हते. मी मराठीमध्ये ब्लॉग सुरू करायला घेतला तेंव्हा ब्लॉग कसा तयार करायचा यासंबंधी मला कांहीच माहिती नव्हती. मी त्यापूर्वी ई मेल वगळता इंटरनेटवर कुठलेही काम केलेले नव्हते, कुठल्याही वेबसाईटवर काहीही अपलोड केलेले नव्हते. त्यामुळे कुठून सुरुवात करायची हेसुध्दा कळत नव्हते. माझे बोट धरून मला चालवत घेऊन जाणारा कोणीही ओळखीचा माणूस नव्हता. पण 'केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे।' असे म्हणत कामाला लागल्यानंतर त्यातून एक एक गोष्ट शिकून घेत, चुका करीत, त्या सुधारीत कसाबसा माझा हा ब्लॉग तयार झाला आणि याहू ३६० वर दुसरा ब्लॉगही सुरू केला. आता ते स्थळ बंद झाले आहे. त्या ठिकाणी ब्लॉगच्या मथळ्याशेजारीच एक बोधवाक्य द्यायचे असे, ते कोणते द्यावे याचा जास्त विचार करायची गरजच नव्हती. 'केल्याने होत आहे रे. आधी केलेच पाहिजे।' हे त्या काळात मनांत घोळत असलेले वाक्य देऊन टाकले.
दोन तीन महिन्यांनी दासनवमी आली. तोपर्यंत मी आपल्या ब्लॉगवर थोडी थोडी माहिती देण्यास सुरुवात केली होती. "आपले बोधवचन आता धूळ खाऊ लागले आहे, ते कधी बदलणार?" अशा अर्थाचे संदेश याहूवर दिसूलागले होते. तेंव्हा समर्थ रामदासांचेच दुसरे सुप्रसिद्ध वचन "जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, शाहाणे करून सोडावे सकळ जन " आपले बोधवाक्य बनवले. यांतील "शाहाणे करोन सोडावे" हा भाग नक्कीच माझ्या आंवाक्याबाहेरचा होता, पण पहिला अर्धा भाग अंमलात आणायचा थोडा तरी प्रयत्न करून पहावा असे ठरवले. पुढील दासनवमीला पुन्हा समर्थ रामदासस्वामींचे वचन घ्यावेसे वाटले. यावेळी "मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ।। " हे निवडले. कुणीही कांहीही म्हंटले तरी आपण आपली शांतगंभीर वृत्ती सोडता कामा नये हा उपदेश समोर असला म्हणजे टीका आणि कुचेष्टा यांनी विचलित न होता मनावर ताबा ठेवायला त्याचा उपयोग होतो.
रामदासांचे आणखी एक वचन माझी आई आम्हाला नेहमी ऐकवत असे, ते होते, "सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे।।". " उद्यमेन हि सिध्द्यंती कार्याणि न मनोरथै। न हि सुप्तेषु सिंहेषु प्रविशंति मुखे मृगाः।" या सुभाषितामधला भाव या वचनाच्या पहिल्या दोन ओळींमध्ये होता. तेवढा आम्हाला उद्देशून होता. त्याला भगवंताने पाठिंबा द्यायचा की नाही हे देवच जाणो, पण आपला उद्योग किंवा चळवळ विघातक असेल, त्यात दुष्टबुध्दी असेल, त्यातून कोणाचे नुकसान होणार असेल तर त्याला भगवंताचे अधिष्ठान मिळणार नाही आणि त्यमुळे त्याला सामर्थ्य मिळणार नाही हे ओघानेच आले. तेवढे करणे टाळले तरच 'प्रयत्नांती परमेश्वर' येतो.
रामदासांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांमधील काही ओळी आता म्हणी किंवा वाक्प्रचारांसारख्या झाल्या आहेत. निरनिराळ्या संदर्भांमध्ये त्या कानावर पडतात किंवा वाचनात येतात. मानवी जीवनावर भाष्य करणा-या या ओळी अनेक जागी उध्दृत केल्या जातात. उदाहरणार्थ
जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ।
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
कोणाला उपदेश करतांना किंवा सल्ला देतांना रामदासांच्या मनाच्या श्लोकांमधील खाली दिलेल्या ओळी नेहमी सांगितल्या जातात.
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ।।
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥
विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना सर्वथा सत्य सांडू नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना अल्प संकल्प तोही नसावा । सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ॥
अशा प्रकारे चारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी दिलेली शिकवण आमूलाग्र बदललेल्या आजच्या परिस्थितीमध्येसुध्दा मोलाची आहे. त्रिकालाबाधित किंवा अजरामर असे यालाच म्हणतात.

No comments:
Post a Comment