Wednesday, March 13, 2013

तेथे कर माझे जुळती १३ - ए.नटराजन (भाग १)

अणुशक्तीखात्यात माझी निवड झाल्यानंतर मी तिथल्या प्रशालेचा अभ्यासक्रम पूर्ण करून वर्षभर रिअॅक्टर्स चालवण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर माझी पॉवर प्रॉजेक्ट्स इंजिनियरिंग डिव्हिजनमध्ये बदली झाली. भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमधल्या निवडक कर्मचा-यांना घेऊन काही महिन्यांपूर्वीच हे नवे ऑफीस सुरू केलेले होते. माझ्याबरोबरच माझा मित्र मानबेन्द्र दास याचीही बदली झाली होती. आम्ही दोघे मिळूनच भायखळ्याला असलेल्या त्या ऑफीसमध्ये गेलो आणि थेट तिथल्या सर्वोच्च अधिका-यांना जाऊन भेटलो. त्यांच्या लहानशा केबिनमध्ये त्यांच्या टेबलासमोर चार खुर्च्या मांडलेल्या होत्या, त्यातल्या मधल्या दोन खुर्च्यांवर आम्हाला बसायला त्यांनी सांगितले आणि पीएला बोलावून काही सूचना दिली. आमची नावे, शिक्षण, प्रशिक्षण वगैरेंबद्दल अत्यंत जुजबी स्वरूपाचा वार्तालाप चालला असतांना दोन वरिष्ठ अधिकारी त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यातले गोरेगोमटे, उंचेपुरे आणि एकाद्या फिल्मी हीरोसारखे देखणे दिसणारे रस्तोगीसाहेब मानबेंद्र दासच्या पलीकडे बसले आणि काळेसावळे, थोडासा उग्र चेहरा असलेले आणि कोणासारखेच खास न दिसणारे नटराजनसाहेब माझ्या शेजारी येऊन बसले. त्या दोघांना उद्देशून मोठे साहेब म्हणाले, "तुम्हाला सहकारी पाहिजे आहेत ना? हे दोघे नवे इंजिनियर आजपासून आपल्याकडे आले आहेत." असे म्हणून हातानेच खूण करत ते म्हणाले, "तुम्ही याला घेऊन जा आणि तुम्ही याला घेऊन जा." अशा प्रकारे एका सेकंदात घेतल्या गेलेल्या त्या निर्णयाने आमच्या पुढल्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरून गेली. आमचा बायोडेटा, अॅप्टिट्यूड वगैरेची चर्चा झाली नाही किंवा काउन्सेलिंग वगैरेही काही झाले नाही. असे काही असते हे सुध्दा तेंव्हा आम्हालाही ठाऊकच नव्हते.

प्रशालेमध्ये असतांना दर आठवड्याला एक किंवा दोन विषयांची परिक्षा होत असे, त्या सगळ्या टेस्ट्समध्ये मला भरघोस मार्क मिळाले असल्यामुळे एकाद्या नव्या विषयाचा अभ्यास करून तो आत्मसात करण्याची माझी क्षमता त्यातून सिध्द झाली होती. रिअॅक्टिव्हिटी, रेडिएशन यासारखे फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्सशी संबंधित थिअरॉटिकल स्वरूपाचे काम रस्तोगी यांच्याकडे होते आणि प्रॉजेक्टसाठी लागणारी निरनिराळी यंत्रसामुग्री आणि इतर भाग तयार करवून घेण्याची जबाबदारी नटराजन यांच्याकडे होती. या नोकरीत निवड होण्यापूर्वी दासने एक वर्ष कलकत्याच्या एका मोठ्या कारखान्यात काम केले असल्यामुळे त्याला त्या कामाचा थोडा अनुभव होता. या गोष्टींचा कोणी वर वर जरी विचार केला असता तर त्याने नक्कीच वेगळा निर्णय घेतला असता. पण 'देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो' असे म्हणतात तसे कदाचित तेंव्हा झाले असेल. त्या वेळी आर्बिट्ररी प्रकाराने झालेल्या कामाच्या वाटणीमुळे नटराजनसाहेबांसोबत काम करायची संधी मला मिळाली आणि त्यांना माझ्यासारखा सहकारी मिळाला. अगदी योगायोगाने आमच्यात निर्माण झालेले हे नाते ते सेवानिवृत्त होईपर्यंत अखंड राहिले. त्या वेळी मला किंवा दासला या ऑफीसबद्दलच काहीही माहिती नव्हती आणि आम्हा दोघांनाही मिळेल ते काम सुरू करण्याची मनोमन तीव्र इच्छा होती. त्यामुळे कामाच्या स्वरूपाचा विचार आमच्या मनात आला नाही.

मला बरोबर घेऊन नटराजन त्याच्या केबिनपाशी आले. रेल्वेच्या लोकल गाडीच्या ड्रायव्हरकडे असते तशी ती पिटुकली केबिन होती. त्यात ठेवलेल्या टेबलाच्या समोरच्या आणि उजव्या बाजूच्या अशा दोन कडांना पुरुषभर उंचीचे पत्र्याचे पार्टिशन ठोकलेले होते आणि साहेबांच्या खुर्चीच्या मागे लगेच पलीकडच्या केबिनचे पार्टीशन होते. त्यांनी आपली खुर्ची पुढे सरकावून माझ्यासाठी वाट करून दिली आणि मला पलीकडे जायला सांगितले. टेबलाच्या त्या चौथ्या कडेजवळ एक बिनहाताची खुर्ची ठेवलेली होती, तिच्यावर मला बसायला सांगितले. मग त्यांनी आपली खुर्ची मागे ओढून ते स्थानापन्न झाले. आता माझा बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यांच्या टेबलावर काही पुस्तके, कागद, फाइली वगैरे पडलेल्या होत्या. त्यांना थोडेसे बाजूला सरकवून त्यांनी माझ्यासाठी टेबलावरच फूटभर रुंद जागाही रिकामी करून दिली.  माझे नाव, गाव, शिक्षण वगैरेंबद्दल अगदी त्रोटक माहिती विचारून झाल्यानंतर त्यांनी सरळ कामाबद्दल बोलायला सुरुवात केली. त्यावेळी राजस्थानमधील कोटा या शहराजवळ आमचा अॅटॉमिक पॉवर प्रॉजेक्ट बांधला जात होता. त्या प्रकल्पाबद्दल थोडीशी माहिती देऊन त्यात आपल्याला काय करायचे आहे हे विस्ताराने पण मोजक्या आणि नेमक्या शब्दांमध्ये त्यांनी सांगितले, तसेच त्यासाठी कुठून सुरुवात करायची याचीही स्पष्ट कल्पना दिली. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. घरून आणलेला डबा घेऊन ते त्यांच्या एका मित्राकडे गेले आणि मीही जेवून येण्यासाठी बाहेर आलो.

बाहेर एका हॉलमध्ये एका रांगेमध्ये पाचसहा टेबले मांडून ठेवलेली होती आणि त्यांच्याजवळच सातआठ जास्तीच्या खुर्च्या ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी दहाबाराजण बसलेले होते. त्यात मानबेंद्र दास होताच, शिवाय अजीत, संपत आणि सुभाष हे आमचे बॅचमेटही होते. उरलेली मुले आम्हाला एक दोन वर्षांनी सीनियर होती. बीएआरसीमधून त्यांची बदली झाली तेंव्हा ते आपापल्या टेबलखुर्च्यांसहित या नव्या ऑफीसमध्ये आलेले होते. नव्याने आलेले इंजिनियर त्यांची टेबले शेअर करत होते. आपोआपच मीदेखील त्यांच्यात सामील झालो. असे होणार हे नटराजनना नक्कीच ठाऊक होते, पण मला ऑफीसात आल्या आल्या आधी स्वतःसाठी स्वतःच जागा शोधायला सांगणे त्यांना बरे वाटत नव्हते म्हणून त्यांनी आपल्यातली एक चतुर्थांश जागा मला देऊ केली होती. शिवाय त्यांना पहिल्या दिवसापासून मला कामाला लावायचे होते आणि माझ्याकडे जागा नाही ही सबब त्यांना दाखवता येऊ नये अशा विचारही त्यांनी केला असेल.

माझ्या मित्रांनी मला त्या लहानशा ऑफिसाची माहिती सांगितली. एका जागी लायब्ररीच्या नावाने दोन तीन कपाटे होती, त्यात काही मॅन्युअल्स, रिपोर्ट्स वगैरे ठेवले होते. तीन चार फाइलिंग कॅबिनेट्समध्ये सारा पत्रव्यवहार फाईल करून ठेवला होता. ड्रॉइंग्ज रेकॉर्ड सेक्शनमध्ये चार पाच रॅक्समध्ये बरीचशी ड्रॉइंग्ज रचून ठेवली होती. आमचा तो प्रॉजेक्ट कॅनडाच्या सहाय्याने बनणार होता. त्या काळात भारतात उभारल्या जात असलेल्या मोठ्या पॉवर प्रॉजेक्ट्समध्ये त्याची गणना होत होती. त्याच्या पहिल्या युनिटसाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्री कॅनडामध्येच तयार होऊन भारतात येणार होती आणि दुस-या युनिटसाठी तशीच्या तशीच शक्य तितकी यंत्रसामुग्री भारतात तयार करवून घेण्याचा विचार होता. त्यासाठी तिकडून येत असलेली सगळी डॉक्युमेंट्स पाहून त्यावर आम्हाला अंमलबजावणी करायची होती. ही डॉक्युमेंट्स विमानाने किंवा आगबोटीने यायला नुकतीच सुरुवात झालेली होती. तसेच त्यावर काम करण्यासाठी आमच्या ऑफीसची यंत्रणा उभारली जात होती. एवढ्या मोठ्या प्रॉजेक्टसाठी शेकडो इंजिनियर लागणार होते. त्यांची जमवाजमव सुरू झालेली होती आणि त्यासाठी काही लोकांना ट्रेनिंगसाठी कॅनडाला पाठवले गेले होते, काहीजण बीएआरसीच्या आवारातच यावर काम करत होते. आम्हीही त्या यंत्रणेचा त्या वेळचा एक लहानसा भाग होतो. थोड्याच दिवसांनी आमचे ऑफीस गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेल्या मोठ्या जागेत गेले आणि पुढे त्याचा विस्तार होत गेला.

आमच्या प्रॉजेक्टच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्याचे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे मुख्य भाग केले होते आणि त्यातली कामे निरनिराळ्या वरिष्ठ अधिका-यांना वाटून दिली होती. नटराजन यांच्याकडे प्रॉजेक्टच्या ज्या भागाचे काम सोपवले होते त्यासंबंधी कोणकोणती मॅन्युअल्स, स्पेसिफिकेशन्स, ड्रॉइंग्ज वगैरे कॅनडाहून आली आहेत आणि त्यासंबंधी झालेला पत्रव्यवहार वगैरे पाहणे हेच माझे पहिले काम होते. ते पाहता पाहता त्यांचा अर्थ समजून घ्यायचा होता. मी एक जाडजूड रफपॅड घेतले आणि कामाला लागलो. आमच्या कामाशी संबंधित कोणते दस्तऐवज लायब्ररीत किंवा रेकॉर्ड सेक्शनमध्ये आहेत हे पाहून त्यांची यादी बनवली आणि ते करता करता त्यांच्यावर नजर फिरवून काही नोट्स काढल्या. दिवसातून दोन तीन वेळा तरी नटराजनसाहेबांना त्या दाखवत होतो आणि माझ्या मनात आलेल्या शंका विचारून घेत होतो. त्या काळात कॅनडामधून आलेली ड्रॉइंग्ज अतीशय किचकट आणि दुर्बोध तर होतीच, त्यांची क्वालिटीही खराब होती. स्टेन्सिल्सचा उपयोग न करता सगळे हाताने लिहिलेले होते आणि काही ड्रॉइंग्जवर लिहिलेले नीट वाचताही येत नव्हते. एवीतेवी भारतीय लोकांना यातले काही कळणार नाही अशी गुर्मी त्याच्या मागे होती किंवा त्यांना काही समजू नये असा डाव होता कोण जाणे. वाचलेले समजून घेण्यासाठी मला नटराजन यांच्याकडे जावे लागत असे. ते सुध्दा किंचितही रोष न दाखवता मला त्यात मदतच करायचे आणि आळस न करता नीट समजावून सांगायचे. असली विचित्र ड्रॉइंग्ज ते ही पहिल्यांदाच पहात असले तरी त्यांना थोडा अनुभव होता आणि दोन वर्षे अमेरिकेत राहून आलेले असल्यामुळे तिकडे वापरात असलेले सिम्बॉल्स, शॉर्टफॉर्म्स वगैरे त्यांना लगेच समजत होते. आम्ही दोघे मिळून त्यांचा जमेल तेवढा अर्थ लावत होतो.

आमचे हे काम चालले असतांना अधून मधून ड्रॉइंग्जचे नवे नवे गठ्ठे येत होते. ते उघडून त्यांचे संदर्भ एकमेकांशी जुळवून पहातांना आम्हाला त्यांचा अर्थ जास्त चांगला कळत गेला. तरीसुध्दा कागदावर मारलेल्या लहान लहान आडव्याउभ्या रेखा पाहून त्यावरून अगडबंब आकाराच्या त्रिमिति वस्तूची कल्पना डोळ्यासमोर येण्याइतकी माझी नजर तयार होत नव्हती. फाइलींमधला पत्रव्यवहार वाचतांना असे लक्षात आले की आमच्या प्रॉजेक्टच्या पहिल्या युनिटसाठी लागणारी काही यंत्रसामुग्री भारतात येऊन साईटवर पोचली आहे आणि तिची उभारणी करण्यासाठी काही कॅनेडियन एक्स्पर्ट्सही आलेले आहेत. आम्ही दोघांनीही कोट्याला जाऊन ती प्रत्यक्ष पाहून येण्याचे ठरवले. त्यासाठी एक निमित्य मिळताच त्यांनी आम्हा दोघांसाठी वरिष्ठांकडून मंजूरी मिळवली आणि रेल्वेच्या तिकीटांची व्यवस्था केली. फ्राँटियर मेलमधून फर्स्टक्लासने केलेला हा माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रवास मी नटराजनसाहेबांसोबत केला. त्या वेळी साईटवर कसलीशी मीटिंग ठरलेली असल्यामुळे आमच्या ऑफिसमधले आणखी काही सहकारीही आमच्याबरोबरच होते. सगळे मिळून गप्पा मारत आणि पत्ते खेळत केलेल्या या प्रवासात ज्यूनियर्स आणि सीनियर्स यांच्यामध्ये असलेला बराचसा दुरावा कमी झाला आणि आमच्यात एक खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले. मुंबईतल्या माझ्या निवासस्थानापासून प्रॉजेक्टसाईटवरील गेस्टहाउसपर्यंत सरकारी वाहनांमधून झालेला अशा प्रकारचा माझा हा पहिलाच ऑफीशियल प्रवास असल्यामुळे मला त्यातले सगळेच नवे होते. ते अद्भुतही वाटत होते आणि थोडे बावचळायला वाटणारे होते. नटराजन यांनी त्या संपूर्ण प्रवासात एकाद्या वडीलधारी माणसाने लहान मुलाची घ्यावी तशी माझी काळजी घेतली.

नटराजन माझ्याहून दहा वर्षांनी मोठे असले तरी स्वतः ड्रॉइंग्ज आणि स्पेसिफिकेशन्स तयार करून किंवा ती डॉक्युमेंट्स समजून घेऊन त्यानुसार यंत्रसामुग्री तयार करून घेणे अशा स्वरूपाचे भरीव काम त्यांनीही यापूर्वी केलेले नव्हतेच. त्यांना वेगळ्या प्रकारचा अनुभव होता, त्यांनी अमेरिकेत शिकून एमएस ही पदवी मिळवली होती, त्यासाठी परदेशभ्रमण केले होते, जगातल्या इतर देशांमधली राहणी पाहिली होती, भारतातसुध्दा इतर संस्था आणि सरकारी ऑफीसांमधील उच्चपदावरील अधिका-यांना भेटून त्यांच्याशी बोलणी केली होती. एकंदरीतच त्यांची विचारपध्दती विस्तारलेली (ब्रॉडमाइंडेड) होती. ते बुध्दीमान होतेच, त्यांची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती चांगली होती. त म्हणताच ताकभात हे ओळखू शकत होते. पण या कशाचाही त्यांना गर्व नव्हता, त्यातून त्यांना शिष्टपणा आला नव्हता. मोकळेपणाने चर्चा करायला ते तयार असत. याचा अर्थ ते आपला मुद्दा सोडायला तयार असत असा नाही, पण समोरच्या व्यक्तीला तो शांतपणे पटवून देण्याची त्यांची तयारी असे. याच्या उलट मी एका लहानशा गावामधून आलेला आणि स्वभावाने जरासा बुजरा आणि अल्लडच होतो, घरातले लोक आणि जवळचे मित्र यांना सोडून कोणाशी बोलत नव्हतो, एटीकेट्स कशाला म्हणतात याची कधीच पर्वा केली नव्हती. माझे एक्स्पोजर फारच कमी होते. पुस्तकी ज्ञान सोडले तर मी अगदी रॉ मटीरियल होतो. अशा अवस्थेतल्या मला घडवण्याचे बरेचसे काम नटराजनसाहेबांनी केले.
परदेशात आणि मुंबईत बराच काळ राहिल्यामुळे त्यांच्या बोलण्यातला तामीळ अॅक्सेंट कमी झाला होता आणि इतर भाषिकांबरोबर राहून माझे मिंग्लिश सुधारले होते तसेच अनेक तामीळ मित्रांबरोबर बोलणे झाल्यामुळे मलाही टॅम्लिश समजू लागले होते. यामुळे पहिल्या दिवसापासून आमच्या दोघांमध्ये कधीच भाषेचा प्रॉब्लेम आला नाही. आमची फ्रिक्वेन्सी बरीच जुळत असल्यामुळे आमच्यात सहसा समजुतीचे घोटाळे होत नव्हते किंवा रिपीटीशन करावे लागत नव्हते. ते निर्विवादपणे सर्वच बाबतीत माझ्याहून मोठे असल्यामुळे आमच्यात संघर्ष होण्याची वेळ येत नव्हती. शिवाय मी माझ्या घरात सर्वात लहान असल्यामुळे मला ऐकून घेण्याची सवय होती. एकंदरीत पाहता आमचे बरे जमत गेले.

 . . . . . . . . .  . . . . . . . . (क्रमशः)


1 comment:

Yashodhan said...
This comment has been removed by the author.