Friday, March 22, 2013

तेथे कर माझे जुळती १३ - ए.नटराजन (भाग ३)

आमच्या राजस्थानमधल्या पॉवर प्रॉजेक्टसाठी कॅनडाबरोबर टेक्निकल कोलॅबोरेशन होते आणि त्यांच्याकडून मोठे कर्जही मिळाले होते. पण त्याच्या पाठोपाठ तसाच दुसरा पॉवर प्रॉजेक्ट मद्रासजवळ कल्पकम इथे उभारला गेला तो पूर्णपणे स्वतःच्या प्रयत्नांमधून. त्यानंतर नरोरा इथे उभारलेल्या नव्या स्वरूपाच्या पॉवर प्रॉजेक्टच्या पायापासून शिखरापर्यंत पूर्ण डिझाइन आम्ही केले आणि त्यात सुधारणा करून काक्रापार, कैगा आणि पुन्हा कोटा या ठिकाणी वीजकेंद्रे उभारली. यातल्या प्रत्येक पायरीवर आमच्या कामाचे स्वरूप, व्याप आणि जबाबदारी यात भर पडत गेली. त्याचबरोबर अनेक नवे सहकारी आले आणि ऑफीसचा विस्तार होत गेला. नटराजन यांच्या समवयस्क अधिका-यांपैकी काही जणांची बदली झाली, काही जण नोकरी सोडून तर काही हे जगच सोडून गेले. दर वेळी त्यांच्याकडे असलेल्या कामाचा काही भाग नटराजन यांना सोपवण्यात आला आणि ऑफिसातले त्यांचे स्थान उंचावत गेले. आमच्या ऑफिसचे रिस्ट्रक्चरिंग किंवा रिऑर्गनायझेशनही होत होते. त्यात काही नवे ग्रुप किंवा सेक्शन बनले, काही जुन्या गटांचे विसर्जन किंवा विभाजन झाले. माझ्याकडे असलेल्या कामातही वाढ होत गेली, काही वेळा त्यातले काही काम काढून दुस-या ग्रुपकडेही दिले गेले. पण आश्चर्याची गोष्ट अशी की जवळजवळ तीस वर्षे मी मात्र सलगपणे नटराजन यांनाच डायरेक्टली रिपोर्ट करत राहिलो. याला योगायोग म्हणायचा की आणखी काही हे मलाही समजले नाही. माझ्या बॅचमधील इतर सगळ्या मुलांनी कधी ग्रुप बदलले, तर कधी त्यांचे बॉस बदलले गेले, पण माझ्या बाबतीत तसे झालेच नाही. जेंव्हा नटराजन यांना बढती मिळून वरची जागा मिळाली तेंव्हा त्यांची जागा मला मिळत गेली. मी त्यांच्यारोबर काम करायला सुरुवात केली त्या वेळी आम्ही फक्त दोघेच होतो. ते रिटायर झाले तेंव्हा शंभराहून जास्त माणसे त्यांच्या हाताखाली काम करत होती, त्यातले पंधरा वीस जण माझ्याहून वयाने मोठे आणि ग्रेडने सीनियर होते, पण त्यातल्या कोणाला आमच्या दोघांच्या मध्ये आणले गेले नाही. अधिकारी आणि त्याचा सहाय्यक अशा कोणत्याही एका जोडीने सलगपणे इतकी वर्षे मिळून काम केल्याचे असे दुसरे उदाहरण आमच्या ऑफिसमध्ये झाले नाहीच, पण माझ्या माहितीतल्या इतर कोणत्याच संस्थेत असे घडले नाही. कदाचित हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असण्याचीसुध्दा शक्यता आहे.

या दीर्घ सहवासामुळे आम्हा दोघांनाही एकमेकांच्या व्यक्तीमत्वाचे निरनिराळे पैलू समजत गेले. नटराजन यांचे इंग्रजी भाषेवर एका निराळ्या प्रकारचे उत्तम प्रभुत्व होते. ते कधीही वाङ्मयीन किंवा काव्यात्मक भाषेत बोलत नसत. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक यासारखे अलंकार, म्हणी, वाक्प्रचार, कोटेशन्स वगैरे कशाचाही त्यांच्या बोलण्यात समावेश होत नसे, ते कधीही द्व्यर्थी शब्द उच्चारत नसत, पण जे काही सांगत ते अत्यंत नेमकेपणाने, सोप्या भाषेत, लहान वाक्यांमध्ये आणि स्पष्टपणे सांगत. त्यांनी बोललेला एकादाही शब्द मला समजला नाही आणि त्याचा अर्थ विचारावा लागला असे कधीच झाले नाही. मोघम स्वरूपाची किंवा 'पण,' 'परंतु,' 'किंबहुना' अशी अव्यये जोडून गोंधळात टाकणारी परस्पर विरोधी विधाने त्यांच्या बोलण्यात येत नसत. सुरुवातीला मला त्यांच्याइतके अचूक बोलता येत नसे. तरीही जसे त्यांचे बोलणे मला व्यवस्थित समजत असे तसेच मला काय सांगायचे आहे ते त्यांना कळत असे. त्यांचे बोलणे ऐकून हळूहळू मी त्यातून शिकत गेलो. त्यांच्या बोलण्याचा एक मोठा गुण असा होता की त्यात चुकूनसुध्दा एकही अपशब्द येत नसे. अमेरिकेत राहूनसुध्दा तिथली स्लँग त्यांनी उचलली नव्हती. अत्यंत नाठाळ माणसाच्या हट्टीपणाला किंवा आडमुठेपणालासुध्दा "नरकात जा." (गो टू हेल) इतकी सौम्य रिअॅक्शन सुध्दा त्यांनी देतांना मी ऐकले नाही. मनुष्यस्वभावाप्रमाणे त्यांनाही राग येत असे, पण तोसुध्दा आरडाओरड, आदळ आपट, हातवारे यातले काहीही न करता ते सभ्य शब्दांमध्ये आणि ठामपणे व्यक्त करत असत. वेळप्रसंगी गरज पडल्यास ते आम्हाला चांगले फैलावर घेत असत, पण तरीही अपमानास्पद वागणूक देत नसत. त्यामुळे सर्वांना त्यांची जरब वाटत असे पण त्यांचा राग येत नसे.
  
जसे त्यांचे बोलणे मोजून मापून होते तसेच किबहुना त्याहूनही जास्त अचूकपणा त्यांच्या लिहिण्यात येत असे. आमच्या ऑफिसच्या प्रथेनुसार सुरुवातीच्या काळात आमच्या कामासंबंधी बाहेरच्या जगाशी होणारा सर्व पत्रव्यवहार त्यांच्या नावानेच होत असे. बाहेरून आलेली पत्रे त्यांच्याच नावाने येत आणि विषय पाहून त्या कामाशी निगडित असलेल्या सहाय्यकाकडे ते पाठवून देत. आलेल्या पत्राचा अभ्यास करून त्याच्या उत्तराचा मसूदा (ड्राफ्ट) घेऊनच मी त्यांच्याकडे जात असे. त्यातले अक्षरन् अक्षर वाचून त्यात व्याकरणातल्या चुका सापडल्या तर ते सुधारत असतच, शिवाय त्यातली शब्दरचना, वाक्यरचना यामधून नेमका अर्थ निघतो, त्याचा कोणी अनर्थ करू शकणार नाही याची काळजी घेत. त्यांनी वापरलेले शब्द आमच्या ओळखीचेच असले तरी ते जास्त योग्य असत. आम्हाला सुचलेल्या शब्दामधून वेगळ्या छटा निघण्याची शक्यता असे तशी त्यांनी केलेल्या दुरुस्तीमध्ये नसे. टेक्निकल स्पेसिफिकेशन्स लिहितांना अचूक शब्द वापरणे अत्यंत महत्वाचे असते. त्यात मोघमपणा आला तर गोंधळ उडण्याची शक्यता असल्यामुळे ते या बाबतीत खूप काळजी घेत असत. 

त्यांचे वागणेसुध्दा असेच काटेकोरपणाचे असायचे. ते ऑफीसमध्ये नेहमी वक्तशीरपणे येत आणि ऑफीसची वेळ संपल्यानंतर हातातले काम पूर्ण करून घरी जात असत, पण त्याचा देखावा करत नसत. ऑफीसमध्ये ते कधीही इतर विषयांवर बोलत नसत. कामाच्या वेळात चार मित्र किंवा सहका-यांना जमवून त्याच्यासोबत राजकारण, क्रीडा, सिनेमा, शेअर मार्केट अशा अवांतर विषयावर गप्पा मारणे त्यांना आवडत नव्हते. त्यांना ऑफिसचे काम सोडून कोणत्या विषयात रस होता हे मला इतक्या वर्षांच्या सहवासात कधीच कळले नाही. नाटक, सिनेमा, संगीत वगैरेंचा आस्वाद घेण्यासाठी ज्या ठिकाणी मी जात होतो त्यात कोठेही आमची कधीच गाठ पडली नाही. यात भाषेचा प्रश्नही होताच, कारण मी फक्त मराठी आणि हिंदी भाषेमधील कार्यक्रमांना हजर असत होतो आणि चाळीस वर्षे मुंबईत राहूनसुध्दा नटराजन यांना या दोन्ही भाषांमध्ये गोडी निर्माण झाली नव्हती. आमच्या ऑफिसचे काम इंग्रजीमधून चालत असले तरी सहका-यांबरोबर बोलणे बहुतेक वेळा हिंदीमध्येच होत असे. दक्षिण भारतीय आणि बंगाली भाषिक लोकसुध्दा त्यात सहभागी होत असत. पण ऩटराजन यांना मात्र इंग्लिश किंवा तामीळ सोडून इतर कोणत्याही भाषेत बोलतांना मी ऐकले नाही. बाजारात ते काय करत होते कोण जाणे.
   
त्यांना कसलेही व्यसन नव्हतेच, मद्य किंवा सिगरेटला ते मौज मजा म्हणूनदेखील कधीही स्पर्श करत नव्हते. चहा कॉफी वगैरेचे सेवनसुध्दा अगदी माफक आणि त्यांच्या केबिनमध्येच होत असे. ते कोणाबरोबर कँटीनमध्ये बसून टाइमपास करत आहेत असे दृष्य डोळ्यासमोर येतच नाही. त्यांची विचार करण्याची पातळी थोडी वेगळी होती. एरर, मिस्टेक आणि ब्लंडर (क्षुल्लक चूक, चूक आणि घोडचूक) या शब्दांच्या अर्थांमधल्या सीमारेषा पुसट आहेत, प्रत्येक माणूस आपापल्या परीने त्यांच्या व्याख्या ठरवत असतो असे असले तरी सर्वसाधारणपणे त्याचा एक सर्वमान्य अंदाज असतो. पण ज्या गोष्टी इतरांना साध्या ह्यूमन एरर वाटत त्यात नटराजन यांना कधीकधी बेजबाबदारपणा किंवा निष्काळजीपणा दिसत असे आणि जाणूनबुजून आळसामुळे किंवा दुष्टपणामुळे केलेल्या लहान सहान चुका त्यांच्या दृष्टीने गुन्हा असायचा. हा फरक माहीत नसलेल्या लोकांना ते तापट किंवा खडूस वाटत असत, पण त्यामुळे त्यांच्याविषयी पहिल्यांदा आढी निर्माण झाली तरी सहवासानंतर ती निघून जात असे. ते स्वतः कुणाबद्दलच मनात खुन्नस बाळगून त्याच्याशी सूडबुध्दीने वागत नव्हते.

नटराजन यांच्या बोलण्यात मला कधीच एकादे संस्कृत सुभाषित आलेले आठवत नाही, पण कर्मण्येवाधिकारस्तेमाफलेषुकदाचन ही गीतेमधील ओळ ते प्रत्यक्ष जगत होते. ऑफिसात वाट्याला आलेले काम एवढाच कर्म या शब्दाचा अर्थ घेतला तर ते पूर्ण करण्यासाठी जे काही शक्य असेल ते करायचे एवढेच त्यांना माहीत होते. दर महिन्याला मिळणारा पगार आणि इतर सुखसोयी एवढे फळ त्यांना पुरेसे वाटत होते. निदान असे ते आम्हाला सांगत असत. "कर्तव्य (ड्यूटी) आणि भावना (इमोशन्स) यात गल्लत करू नकोस." असे ते मला नेहमी बजावत असत आणि त्यांच्या वागण्यात ते दिसत असे. त्यामुळे कामात अडचणी आल्या तर ते विचलित होत नसत, त्या अचानक आल्या तर त्यांना धक्का बसत नसे, काम कसे पार पडेल याची चिंता करण्यात वेळ वाया घालवत नसत, अपयशाची भीती वाटत नसे, अपयश आले तर त्याचे जास्त वाईट वाटत नसे, त्यातून वैफल्य येत नसे आणि सगळे ठरवल्यासारखे झाले तर त्याचा खूप आनंदही होत नसे. तो सेलेब्रेट करावा असे वाटत नसे. एकादे लहानसे पण महत्वाचे काम पूर्ण केले किंवा त्यातला एक टप्पा पार केला म्हणून उत्साहाने त्यांना सांगायला गेलो तर त्याबद्दल पाठीवर शाबासकी मिळायच्या ऐवजी आणखी दोन नवी कामे गळ्यात पडण्याचीच शक्यता जास्त असे. माझे वडीलसुध्दा तोंडावर कधीच कौतुक करत नसत. त्यामुळे मला याची सवय होती. पण माझा स्वभाव वेगळा होता. मला माझ्या कामाबद्दल भावनिक एकात्मता (इमोशनल अटॅचमेंट) निर्माण झाल्याशिवाय रहात नसे. उत्साह, आतुरता, भय, चिंता, प्रेम, आपलेपणा, आशा, निराशा, आनंद, दुःख इत्यादी सर्व भावनांचा प्रत्यय मला माझ्या कामामधून मिळत होता. नटराजन एवढे स्थितप्रज्ञ कसे होऊ शकत हे मला अखेरपर्यंत गूढ राहिले.   

माझ्या मनावर लहानपणी आईवडिलांकडून जेवढे संस्कार झाले त्यानंतर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा पडला असेल तर तो नटराजन यांचाच. ते माझे सर्वार्थाने मेंटॉर होते. माझ्या कामामध्ये सुरुवातीच्या काळात ते सतत माझ्यासोबत होते. त्यांनी लावलेले वळण मला लागले आहे हे पाहून त्यांनी हळूहळू आपला हात हलकेच सोडवून घेतला. नटराजन यांच्यावर पडत गेलेल्या इतर जबाबदा-यांबरोबर ती कामे करणारे इतर सहकारीही त्यांच्या हाताखाली येत गेले, तसेच आमच्या मुळातल्या कामाचा व्यापही वाढत गेल्यामुळे त्यासाठी अनेक नवे सहकारी नेमले गेले. यामधील प्रत्येक सहका-याला भरपूर वेळ देणे नटराजन यांना अशक्य होत गेले. नव्या लोकांचे सांगणे आणि त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यावरील आपले म्हणणे त्यांना पटवून देणे यासाठी त्यांना जास्त वेळ द्यावा लागत असे, पण आमच्यातला सुसंवाद जमला असल्यामुळे माझे काम पटकन उरकत असे. त्यानंतर माझ्या कामात मला जेवढे स्वातंत्र्य मिळत गेले तेवढे इतरांना मिळत नसल्यामुळे त्यांना माझा हेवा वाटत असे.

ऑफिसमध्ये आमचे इतके चांगले सूत जमलेले असले तरी व्यक्तीगत आयुष्यात आमची कधीही जवळीक झालीच नाही. या बाबतीत ते जितके अलिप्तपणे वागायचे तसाच अलिप्तपणा त्यांच्याबाबतीत मीही दाखवत राहिलो. त्यांच्या शिस्तप्रिय वागण्यामुळे त्यांचे कोणतेही वैयक्तिक काम मला करायला त्यांनी कधीच सांगितले नाही. त्यानिमित्याने त्यांच्या घरी जाण्याची वेळ आली नाही. कधीही सहज भेटायला म्हणून त्यांनी आपल्या सहका-यांना घरी बोलावले नाही आणि मीही अगांतुकपणे कधी त्यांच्या घरी गेलो नाही. काही विशिष्ट कारणानिमित्यानेच शिष्टाचार पाळण्यासाठी एक दोन वेळा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि एकदा ते सहकुटुंब आमच्या घरी आले होते. आम्ही एका उपनगरात रहात नसल्यामुळे रस्त्यात किंवा बाजारात भेट होण्याची शक्यताही फार कमी होती. ऑफिसमधील स्नेहसंमेलने, पिकनिक यासारख्या मेळाव्यांमध्ये ते सहभागी होत नसत. इतर काही ग्रुपमधले उत्साही लोक मुद्दाम असे मेळावे घडवून आणत, पण नटराजनसाहेबांनी अशा कल्पनेला कधी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे आमचे व्यक्तीगत संबंध घनिष्ठ झालेच नाहीत.

ते सेवानिवृत्त होऊन गेल्यानंतर त्यांच्याबरोबर कसलाच संपर्क राहिला नाही. क्वचित कुठेतरी अचानक गाठ पडली आणि त्या वेळी "आपण मुद्दाम अमूक दिवशी अमूक ठिकाणी भेटू." असे ठरवायचा विचार मनात आला तरी तशी कृती मात्र झाली नाही. "त्यांनी पुढाकार घेतला नाही तरी मला ते करायला हवे होते, त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायला हवे होते, आयुष्यात एकदा तरी त्यांच्याबरोबर निवांतपणे बसून बोलायचे होते." असे आता लाख वेळा वाटून काही उपयोग नाही. एक दिवस मी ऑफिसात असतांनाच अचानक एक फोन आला आणि "नटराजनसाहेब आपल्याला सोडून गेले." ही धक्कादायक आणि क्लेशकारक बातमी समजली. त्याच्या आधी काही दिवस ते आजारी असल्याचे जर मला कळले असते तर हातातली सगळी कामे बाजूला ठेऊन मी त्यांना भेटायला ते जिथे असतील तिथे गेलो असतो, मला तसे जायलाच हवे होते, पण ती संधीही मिळाली नाही. त्यांचे अखेरचे दर्शन घडले ते स्मशानातच.

No comments: