Sunday, March 31, 2013

संत एकनाथांच्या रचना

संत बहिणाबाईंनी आपल्या प्रसिध्द अभंगात म्हटले आहे, संतकृपा जाली | इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर | तेणे रचिले तें आवार ।।
जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ।। तुका जालासे कळस | भजन करा सावकाश ।।

ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम या संतश्रेष्ठांच्या समवेत संत बहिणाबाईंनी या यादीमध्ये संत एकनाथांचाही समावेश केला आहे. एकनाथ हे भागवत सांप्रदायाच्या किंवा वारकरी पंथाच्या इमारतीतले स्तंभ आहेत. 'ओवी ज्ञानेशाची' आणि 'अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची' हे पद्यांच्या त्या दोन वृत्तांमधले (गेल्या कित्येक शतकांमधले) सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून नावाजले गेले आहे. संत नामदेव विठ्ठलाचा अत्यंत लाडका भक्त होता. विठ्ठलावरील त्यांच्या प्रेमाचे दर्शन अनेक आख्यायिकांमधून होतेच, त्यांच्या अभंगामधून ते प्रतीत होते. शीखांच्या गुरू ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या काही रचना दिल्या आहेत. या तीन संतश्रेष्ठांच्या मानाने संत एकनाथ किंचित कमी प्रसिध्द असतील, पण त्यांनी केलेल्या रचनासुध्दा आजही खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या रचनांमधील विविधता हे त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

संस्कृत भाषेमध्ये असलेली भगवद्गीता लोकांना समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत लिहिलेली ज्ञानेश्वरीसुध्दा तात्विक दृष्ट्या फार उच्च पातळीवर आहे. संत तुकाराम आणि संत नामदेव महाराजांचे अभंग सर्वसामान्य लोकांच्या ओठावर सहज बसावेत असे सोपे आणि सुंदर आहेत. संत एकनाथ महाराजांनी ओवीबध्द ग्रंथरचना केली, भजनामध्ये गायिले जाणारे अभंग लिहिले, त्याशिवाय मनोरंजक अशी भारुडे, गवळणी वगैरे लिहिल्या. घरातल्या देव्हा-यासमोर बसून ज्ञानी पंडित लोकांनी वाचावे असे आध्यात्मिक वाङ्मय, ओसरीवर बसून श्रोत्यांना वाचून ऐकवण्यासाठी पोथ्या, देवळातल्या सभामंटपात भक्तजनांनी टाळमृदुंगाच्या साथीवर भजन करतांना म्हणावेत असे भक्तीपूर्ण आणि रसाळ अभंग आणि लोकगीतांच्या मंचावर शाहीरांनी डफ झांज आणि तुणतुण्याच्या साथीने गाव्यात अशी भारुडे, गवळणी वगैरे अशा विविध जागी संत एकनाथांच्या रचना ऐकायला मिळतात. त्याशिवाय गेल्या शतकातल्या मान्यवर संगीत दिग्दर्शकांनी संत एकनाथांच्या रचनांना सुमधुर चाली लावून त्या दृक्श्राव्य माध्यमांमधून घराघरात पोचवल्या आहेत. अशा काही अत्यंत लोकप्रिय रचना या लेखात दिल्या आहेत.

संतांच्या जीवनावरील चित्रपटांमध्ये त्यांच्या सोज्ज्वळ भूमिका साकारणा-या विष्णुपंत पागनीस या गायक नटाच्या आवाजातले हे गीत किती मनोरंजकसुध्दा आहे पहा. देवाबरोबर इतकी सलगी साधून बोलणारे एकनाथ लटक्या तक्रारीच्या सुरात सांगतात.
असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥
शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दही-दुधाचा रबडा ॥२॥
वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥

कवी जयदेव आणि सूरदास यांनी राधाकृष्णामधील मधुरा भक्तीवर केलेल्या अनेक गीतरचना लोकप्रिय आहेत. मराठी भाषेत याबद्दल काव्य करणारे संत एकनाथच लगेच डोळ्यासमोर येतात. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबध्द केलेली ही दोन गीते अजरामर झाली आहेत. पहिल्या गीतात ते राधेच्या भूमिकामधून अलगदपणे एकनाथांच्या भूमिकेत जातात.
कशि जांवू मी वृंदावना ।  मुरली वाजवी ग कान्हा ॥धॄ॥
पैलतिरीं हरि वाजवी मुरली । नदि भरलीं यमुना ॥१॥
कासे पीतांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करू बाई कोणाला सांगूं । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरिनें कौतुक केलें । जाणे अंतरिच्या खुणा ॥४॥
एका जनार्दनी मनी म्हणा । देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥

दुस-या गाण्यामध्ये राधा आणि कृष्ण या दोघांचेही देहभान हरपल्यामुळे ते कसे वेडेवाकडे चाळे करत आहेत असे सांगता सांगता एकनाथ महाराज स्वतःच देवाशी एकरूप होतात.
वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।
राधा पाहून भुलले हरी, बैल दुभवी नंदाघरी ।।
फणस जंबिर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा ।।
हरि पाहून भुलली चित्‍ता । राधा घुसळी डेरा रिता ।।
ऐसी आवडी मिनली दोघा । एकरूप झाले अंगा ।।
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ।।

आर. एन्‌. पराडकर या गायकाच्या प्रसिध्द भक्तीगीतांमधले संत एकनाथांचे हे गाणेसुध्दा राधाकृष्णाच्या प्रीतीबद्दलच आहे.
नको वाजवू श्रीहरी मुरली ।
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे ।।
खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ, जल स्थिरावली ।।
घागर घेऊन पाणियासी जाता, डोईवर घागर पाझरली ।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने, राधा गौळण घाबरली ।।

बाळकृष्णाने आपल्या बासरीमधल्या जादूने सर्व चराचराला कशी मोहिनी घातली होती याचे सुंदर वर्णन या गीतात आहे.
भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥
पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्र्चळ ॥२॥
तॄणचरे लुब्ध झाली । पुच्छ वाहुनिया ठेली ॥३॥
नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥

भारतरत्न स्व.पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या या अभंगाची संगीतरचना राम फाटक यांनी केली आहे.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेंचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥६॥

किशोरी आमोणकर या शास्त्रीय संगीतामधील श्रेष्ठ गायिकेने थोडी सुगम संगीतातली गीते दिली आहेत यातले एक प्रसिध्द गीत संत एकनाथांच्या रचनांमधून घेतले आहे. पं. रघुनंदन पणशीकर यांनी या गीतात किशोरीताईंना आवाजाची साथ दिली आहे.
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥
कानडा विठ्ठल नामें बरवा । कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥
कानडा विठ्ठल रूपे सावळां । कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥
कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥
कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥
वेधियेलें मन कानड्यानें माझें । एका जनार्दनीं दुजें नाठवेचि ॥६॥


या दोन श्रेष्ट गायकांच्या नंतर आलेल्या पिढीमधील संगीतकार श्रीधर फडके आणि स्वराची देणगी लाभलेले आजचे आघाडीचे गायक सुरेश वाडकर यांनी तयार केलेल्या आल्बममध्ये त्यांनी संत एकनाथांचे अभंग घेतले आहेत.
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥
देव तयाचा अंकिला । स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥
एका जनार्दनी गरुदेव । येथें नाही बा संशय ॥३॥

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥
गोविंद हा जनी-वनी ।
म्हणे एका जनार्दनी ॥४॥

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥
महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥
एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥

रुपे सुंदर सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिता ॥१॥
रुणझुण वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने चारी हती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।
अनाथाच्या नाथा, तुज नमो ।
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥
नमो मायबापा, गुरुकृपाघना ।
तोडी या बंधना मायामोहा ।
मोहोजाळ माझे कोण नीरशील ।
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ।
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्यापुढे उदास चंद्र-रवी ।
रवी, शशी, अग्‍नि, नेणति ज्या रूपा ।
स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥
एका जनार्दनी गुरू परब्रम्ह ।
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥
ॐकार स्वरूपा या गाण्याने तर एका काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. आजही हे गाणे निरनिराळ्या कार्यक्रमांमधून, अगदी नृत्यामधूनसुध्दा सादर केले जातांना दिसते.

.  . . . . . . . .  . . (उत्तरार्ध पुढील भागात)

No comments: