Wednesday, October 28, 2009

डॉ. होमी भाभा - भाग १

"जगातले सर्वांत उंच शिखर कोणते?", "भारतातले सर्वात मोठे शहर कोणते?", "सर्वात प्रसिध्द नाटककार कोण?" अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे जमवून ती लक्षात ठेवायची हौस लहान मुलांना असते. मी त्या वयात असतांनाच्या काळात "भारतातला सध्याचा सर्वात मोठा शास्त्रज्ञ कोण?" या प्रश्नाचे उत्तर 'होमी भाभा' असे कानावर पडले होते किंवा वाचनात आले होते. हे दोन्ही शब्द मी त्यापूर्वी कधी ऐकलेच नव्हते. 'होमी' हे नांव एका पुरुषाचे असेल असे त्या वेळी वाटले नाही आणि 'भाभा' हे आडनांवसुध्दा चमत्कारिक वाटले. पण त्यामुळे नवलापोटी हे नांव मात्र लक्षात राहिले. 'शास्त्रज्ञ' म्हंटला की त्याने कसला तरी 'शोध' लावला असणारच. या भाभा महाशयांनी काय शोधून काढले होते ते कांही त्या वेळी समजले नाही. पावसात बाहेर पडण्यापूर्वी घरात कुठे तरी पडलेली छत्री शोधण्यापेक्षा वैज्ञानिक लावत असलेले शोध खूप वेगळ्या प्रकारचे असतात हे वय वाढल्यानंतर समजायला लागले. त्यासाठी आधी अंगात असामान्य बुध्दीमत्ता असावी लागते, एकाद्या विषयाचा कसून सखोल अभ्यास करून प्रचंड ज्ञानसंपत्ती मिळवून ठेवावी लागते आणि त्यानंतर कसला तरी ध्यास घेऊन अष्टौप्रहर कष्ट केल्यानंतर लागलाच तर एकादा शोध लागतो हे कळल्यानंतर मला सर्वच शास्त्रज्ञांबद्दल नितांत आदर वाटू लागला आणि अजून वाटतो. त्यात होमी भाभा 'सर्वात मोठे शास्त्रज्ञ' म्हंटल्यावर त्यांची गणना मनातल्या परमपूज्य व्यक्तींमध्ये होत राहिली. कॉलेजमध्ये गेल्यावर मेसमध्ये खाण्यापिण्याबरोबरच वृत्तपत्रांचे माफक वाचन होत असे. त्यात अधून मधून भाभांचे नांव येत असे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतांना अचानक त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी आली आणि मन सुन्न होऊन गेले.


त्याच सुमारास कै.लालबहादुर शास्त्री यांचेही भारताबाहेर अचानक देहावसान झाले होते आणि या दोन्ही दुर्दैवी घटनांमध्ये कोणा दुष्ट शक्तीचा हात तर नसेल अशी चर्चा होत असल्यामुळे त्यांच्या संबंधी येणारा मजकूर आवर्जून वाचला जात असे. त्यामुळे स्व. होमी भाभा यांच्या कार्याबद्दल जी माहिती मिळत गेली त्यामुळे त्यांच्याबध्दल मनात असलेला अमूर्त प्रकारचा आदर अर्थपूर्ण होत गेला तसेच तो कांही पटीने वाटला. इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या माझ्या आधीच्या बॅचमधली दोन तीन मुले अणुशक्तीखात्यात प्रशिक्षण घेत होती. पुण्याला आली तर ती हॉस्टेलमध्ये येऊन आम्हाला भेटत असत. त्यांच्या बोलण्यातून त्या खात्याची एक उज्ज्वल प्रतिमा मनात झाली. त्यामुळे आमच्या कंपूमधल्या बहुतेक मुलांनी त्या प्रशिक्षणात प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केला. त्यात मला यश येऊन माझी निवड झाली. शिवाय त्या दोन तीन महिन्याच्या कालावधीत मला दुस-या कोणा मोठ्या कंपनीकडून बोलावणेही आले नाही, त्यामुळे मी अणुशक्तीखात्याच्या प्रशिक्षण प्रशालेत (ट्रेनिंग स्कूलमध्ये) दाखल होऊन रुजू झालो.


आमच्या प्रशिक्षणालयाच्या कार्यालयात प्रवेश करताच समोर होमी भाभांचे भव्य छायाचित्र दिसायचे तसेच वसतीगृहाच्या मुख्य दालनातही ते लावलेले असल्यामुळे त्याचे दर्शन रोज घडत असे. अणुशक्ती खात्याच्या विविध प्रयोगशाळा, संयंत्रे, कारखाने, कार्यालये वगैरेंमध्ये काम करणारे अनुभवी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ आम्हाला शिकवायला येत असत. ही सारीच मंडळी होमी भाभांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वामुळे प्रभावित झालेली आणि विचारांनी भारावलेली दिसत असत. "भाभांनी असे ठरवले, हे सांगितले, ते अशा प्रकाराने केले" वगैरेंचे उल्लेख त्यांच्या भाषणांमध्ये येत असतच, कधी कधी त्यांच्या हृद्य आठवणी सांगतांना त्यांना भरून येत असे. योग्य अशा वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांच्या निवडीपासून त्यांना घडवण्याच्या प्रक्रियेतल्या प्रत्येक महत्वाच्या बाबीवर स्व.भाभांचे पूर्ण लक्ष असे. जर त्यांच्या विमानाला अपघात झाला नसता तर निश्चितच आपल्याला त्यांना प्रत्यक्ष पाहता आले असते आणि कदाचित त्यांची ओळखही झाली असती असे वाटत राही. तसे झाले असते तर 'तेथे कर माझे जुळती' या माझ्या ब्लॉगवरील मालिकेतले पहिले पुष्प कदाचित मी त्यांनाच समर्पण केले असते. आता त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्य हा लेख मी त्यांना सादर अर्पण करीत आहे.


मी अणुशक्तीखात्यात रुजू झालो त्या काळात आमच्या मुख्य संशोधनकेंद्राचे नांव अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्राँबे (एईईटी) असे होते. आमचे प्रशिक्षण चालले असतांनाच आलेल्या भाभांच्या प्रथम स्मृतीदिनी त्या केंद्राचे नांव बदलून भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर असे नामकरण तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या केंद्राच्या उभारणीच्या कामात स्व. होमी भाभांचा केवढा मोठा वाटा होता ते त्या प्रसंगी झालेल्या प्रत्येक भाषणांतून व्यक्त होत होते. तेथे उभारलेल्या प्रत्येक प्रयोगशाळेची इमारत, तिचे बाह्य स्वरूप, अंतर्गत रचना, त्या ठिकाणी उभी करण्यात येणारी साधनसामुग्री, तिथे काम करणा-यांसाठी सुखसोयी अशा असंख्य बाबीकडे त्यांनी अत्यंत बारकाईने लक्ष पुरवलेले ठळकपणे दिसून येत होते. आपली संस्था जागतिक पातळीवर नांवाजली गेली पाहिजे इतकी ती सर्वच दृष्टीने चांगली असायला पाहिजे आणि तशी दिसायलासुध्दा पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्याचा ठसा जागोजागी प्रतीत होत होता आणि चार दशकांच्या दीर्घ कालावधीनंतरसुध्दा तो जाणवल्याशिवाय रहात नाही.


(क्रमशः)
पुढील भागासाठी पहा Newer Post
https://anandghan.blogspot.com/2009/10/blog-post_29.html

1 comment:

Anonymous said...

डॉ. होमी भाभा यानी कॉस्मिक किरणांच्या उत्पत्तीसंबंधी कास्केड थिअरी हा अंदाज मांडला.