Monday, October 19, 2009

लक्ष्मीपूजन


आमच्या घरी वडिलोपार्जित गडगंज मालमत्ता नव्हती, पण आमची गणना खाऊन पिऊन सुखी लोकात होत असे. मौसमानुसार जी कांही धान्ये, भाजीपाले आणि फळफळावळ वगैरे त्या भागात मुबलक आणि स्वस्तात किंवा फुकट उपलब्ध होत असत ती घरी यायची, पाककौशल्याने त्यांतून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार होऊन पानात पडायचे आणि अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणत सर्वजण ते चवीने पोटभर खात असत. रोज लहान मुलांना दूध मिळायचे, जेवणात ताक असायचे, आल्या गेल्यांसाठी चहा कॉफी व्हायची आणि मोसमानुसार आंब्याचे पन्हे किंवा लिंबाचे सरबत बनायचे. आमची पेयसंस्कृती एवढ्यापुरतीच मर्यादित होती. त्यामुळे खाऊनपिऊनचा अर्थ सुध्दा एवढाच होता. आमचा उद्योग व्यवसाय वगैरे नसल्यामुळे माझ्या वडिलांना दर महिन्याला जेवढा पगार मिळत असे आणि वर्षाला स्केलप्रमाणे इन्क्रिमेंट मिळत असे त्यापेक्षा जास्त धनप्राप्ती होण्याचा मार्गच नव्हता. त्यामुळे लक्ष्मीमाता आमच्यावर प्रसन्न झाली असती तरी तिने कशा रूपाने आम्हाला घबाड दिले असते ते समजत नाही. अर्थातच त्या काळात असा विचारही कोणी करत नसे.
त्या मानाने सरस्वतीची आमच्या घरावर जास्त कृपा असावी. सगळ्याच मुलांची आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे आणि त्यांना अभ्यासाची आवड असल्यामुळे ती शाळेत हुषार समजली जायची. त्यांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हायचे आहे असे सतत त्यांच्या मनावर बिंबवले जात असे आणि एकदा ते मोठे झाले की लक्ष्मीची कृपाही त्यांच्यावर होईलच अशी आशा वाटत असे. त्यामुळे आम्ही सगळी मुले मनोमनी सरस्वतीची उपासक होतो. पण देवी शारदेची पूजा मात्र फक्त शाळेतच केली जात असे. घरात सरस्वतीची प्रतिमा नव्हतीच. तिच्या चित्राला कधी हार घातल्याचे मला आठवत नाही. दर वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजन मात्र अत्यंत उत्साहाने केले जात असे.
पूजेच्या देव्हा-यात अंबाबाईची मूर्ती असली तरी दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनासाठी वेगळा चांदीचा शिक्का होता. तो कोठीतून बाहेर काढून चिंच आणि रांगोळीने घासून लखलखीत केला जायचा. ताट, वाट्या, पेले, तबक, निरांजने, कुंकवाच्यी कोयरी, पळी पंचपात्र वगैरे सर्व चांदीची भांडी काढून तीही स्वच्छ केली जात. संध्याकाळ झाली की एका चौरंगावर देवीची आरास करायची. चांदीच्या नाण्याच्या शेजारी एक दोन सोन्याचे अलंकार ठेवायचे. त्या सर्वांची साग्रसंगीत शोडशोपचार पूजा केली जायची. त्या वेळी घरातली सर्व मंडळी नवे कपडे आणि ठेवणीतले दागदागिने अंगावर चढवून त्या काळात जितके शक्य असेल तितके नटून थटून त्या जागी उपस्थित होत असत. दरवर्षी दिवाळीला घरी कोणी ना कोणी पाहुणे असतच. तेसुध्दा सालंकृत होऊन पूजेला येऊन बसत. डाळिंबे, सीताफळे यासारखी एरवी आमच्या भागात न दिसणारी फळे लक्ष्मीपूजनासाठी मुद्दाम शहरातून मागवली जात. केळी, चिकू, संत्री, मोसंबी वगैरे असतच. एका ताटात विविध प्रकारची फळे मांडून ठेवली जात तर दुस-या ताटात काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे वगैरे सुका मेवा नैवेद्यासाठी मांडून ठेवलेला असे. पेढे बर्फी वगैरे मिठाई असेच. साळीच्या लाह्या आणि बत्तासे असणे अत्यावश्यक असे. असा इतका आकर्षक प्रसाद समोर दिसत असला तरी आमचे लक्ष तिकडे नसायचे. ही पूजा संपली रे संपली की आम्ही अंगणात धूम ठोकून फटाके उडवायला सुरुवात करत असू.
मागल्या वर्षी आम्ही दिवाळीला अमेरिकेत होतो. पण तिथेसुध्दा लक्ष्मीपूजन केलेच. त्यासाठी काय काय लागते याची यादी करून आणि ते कुठे मिळते याची चौकशी करून त्यातल्या बहुतेक गोष्टी पैदा करून ठेवल्या. फटाकेसुध्दा आणले होते, पण अमेरिकेतल्या प्रदूषणाच्या नियमात ते उडवणे बसेल की नाही याची भीती असल्यामुळे ते उडवायचा धीर झाला नाही. पूर्वीपासून अमेरिकेत राहणारे दुसरे कोणी आधी सुरुवात करेल याची वाट आम्ही पहात होतो, पण ती झालीच नाही.

No comments: