Saturday, October 17, 2009

दीपोत्सव


"असतोमासद्गमय। तमसोमाज्योतीर्गमय। मृत्योर्माअमृतंगमय।" असे आदर्श मानवी जीवनाचे त्रिसूत्र आपल्या प्राचीन वाङ्मयात दिलेले आहे. यातली पहिला म्हणजे सत्याची कास धरून नेहमी सदाचाराचे पालन करण्याचा सन्मार्ग आदर्श असला तरी कांही प्रसंगी व्यावहारिक दृष्ट्या तो बिकट वाटतो. मिथ्या किंवा फसव्या प्रलोभनांचा मोह आवरता येत नाही. सदाचरणाचे सुपरिणाम दूरगामी असतात, ते लगेच दिसत नाहीत. कीर्तीरूपे अजरामर होण्याचा तिसरा रस्ता तर अडचणींचे पहाड फोडून स्वतःच तयार करावा लागतो आणि ते सर्वांना शक्य नसते. शिवाय तेवढे कष्ट करणा-याला त्याचे फळ प्रत्यक्ष मिळत नाहीच. दुसरा मार्ग तुलनेत सोपा आहे. एक लहानशी ज्योतसुध्दा आसपासचा आसमंत उजळून टाकते आणि त्या उजेडात आपण न ठेचकाळता मार्गक्रमण करू शकतो. त्यामुळे जीवनाचा हा दुसरा मार्ग हा सर्वसाधारण माणसाला अवलंबता येतो आणि त्याची फळे लगेच दिसू लागतात. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार आणि इच्छा असेल तेवढी मजल त्या मार्गावर मारणे शक्य असते. या वचनात तमस याचा अर्थ फक्त रात्रीचा काळोख एवढ्यापुरता मर्यादित नसून सर्व प्रकारच्या अंधारांचा समावेश त्यात होतो. अज्ञान, भय, निराशा आदींमुळे मनात दाटलेला अंधःकार जास्तच भीषण असतो. ज्ञानाच्या प्रकाशात आपल्याला हित आणि अहित समजल्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊन त्यानुसार प्रगती करू शकतो. अज्ञात गोष्टींबद्दल वाटणारी भीती त्याची माहिती मिळाल्यावर कमी होते किंवा नाहीशी होते, निराशेने ग्रस्त झाले असतांना आशेचे किरण दिसल्यावर मनाला केवढी उभारी येते!
एका दिव्याचा उजेडसुध्दा काळ्याकुट्ट अंधारातून एक छान दृष्य अनुभव आपल्याला देतो, तर दिव्यांची रांगच लावली तर ती पाहून किती मजा येईल? आश्विन महिन्यातल्या कोजागरी पौर्णिमेला चंद्राच्या पिठुर चांदण्याचा अनुभव घेतल्यानंर येणा-या अमावास्येची काळोखी रात्र दिव्यांनी उजळून टाकण्याची कल्पना ज्या कोणाला सुचली असेल त्याचे कौतुक वाटते. आजकाल विजेच्या दिव्यांच्या कृत्रिम प्रकाशात आपण रोज रात्री पडणारा अंधार आपल्यापुरता तरी मिटवून टाकला आहे, पण शंभर वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आजही अनेक खेड्यापाड्यांपर्यंत वीज पोचलेली नाही किंवा भारनियमनामुळे ती असून नसल्यासारखी असते, पण उजेड पाडण्यासाठी तेथे रॉकेलचे कंदील तरी असतात. पूर्वीच्या काळात तेसुध्दा नव्हते. समई, निरांजन किंवा पणतीच्या मिणमिणत्या उजेडात जेवढे दिसेल तेवढ्यावरच समाधान मानून घ्यावे लागत असे. फारच महत्वाचे काम असले तर दिवटी किंवा मशाल पेटवीत असत. अशा काळातल्या गडद अंधारात पणत्यांची रांग करून केलेली आरास, उंच काठीवर बांधलेला आकाशदिवा वगैरे फारच मनोहर दिसत असणार.
काळानुसार प्रगत झालेल्या तंत्रज्ञानामुळे रात्रीच्या काळोखाचा गडदपणा कांहीसा कमी झाला आहे आणि जास्त लखलखीत उजेड पाडण्याची साधने उपलब्ध झाली आहेत. विजेने उजळणा-या दिव्यांच्या माळा अधिकाधिक प्रखर होत आहेत, त्यांची होत असलेली उघडझाप आणि बदलते रंग यांतून त्या अधिकाधिक आकर्षक होत आहेत. आतिशबाजीचे नवनवे प्रकार निघत आहेत. जमीनीवरून आभाळात उंचवर उडणारी प्रकाशाची झाडे अधिकाधिक रंगीबेरंगी होत आहेतच, पण आधी आकाशात उंच उडून तिथून खाली रंगीबेरंगी ठिणग्यांचा वर्षाव करणारे अग्निबाण खूपच नयनमनोहर दिसतात. तेजाची ही सगळीच रूपे अत्यंत विलोभनीय वाटतात.
माझ्या जन्माआधी आलेल्या शेजारी या चित्रपटातल्या या गाण्यात तेजाच्या या न्यारी दुनियेचे किती छान वर्णन केले आहे?
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती हा हा हा !
चला धरू रिंगण, गुढी उभी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
गातसे चंद्र तारे, वाजती पैंजण
छुनछुन झुमझुम हा, हा !
झोत रुपेरी, भूमीवरी गगनात
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत
कण कण उजळीत, हासत हसवीत
सरीतील गार हा हा हा !
आनंदुन रंगून, विसरून देहभान
मोहरली सारी काया, हरपली मोहमाया
कुडी कुडी पाजळून, प्राणज्योती मेळवून
एक होऊ या या या !

No comments: