Friday, October 30, 2009

डॉ.होमी भाभा - भाग ३


डॉ.होमी भाभा यांनी केलेली कांही वक्तव्ये आणि दिलेले संदेश त्यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक आहेत. "No power is costlier than No power" हे त्यांनी दिलेले बोधवाक्य तर आमच्यासाठी केवळ ब्रम्हवाक्य होते. "कोणतीही शक्ती अशक्तपणापेक्षा जास्त महाग नसते" असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. शक्ती प्राप्त करण्यासाठी जेवढा खर्च येईल त्यापेक्षा अशक्तपणामुळे होणारे नुकसान जास्त असते, त्यामुळे शक्तीहीनता अखेर महागात पडते हे सत्य त्यात आहे. आरोग्य, राजकारण, व्यवसाय, संरक्षण वगैरे जीवनाच्या निरनिराळ्या पैलूंमध्ये त्याचे वेगळे अर्थ निघतील, पण आमच्या दृष्टीने त्या वेळी 'पॉवर' या शब्दाचा 'इलेक्ट्रिकल पॉवर' किंवा 'वीज' एवढाच अर्थ आम्हाला अभिप्रेत होता. अणुशक्तीपासून विद्युतनिर्मिती करण्याची संयंत्रे इतर प्रकारच्या केंद्रांच्या मानाने खूपच गुंतागुंतीची असल्यामुळे त्यासाठी अधिक खर्च येतो. त्यामुळे निदान सुरुवातीच्या काळात तरी ती वीज इतर स्रोतांच्या मानाने स्वस्तात उपलब्ध करून देणे शक्यच नव्हते. पण त्यामुळे नाउमेद न होता ती वीज निर्माण करत राहण्यासाठी सतत प्रयत्नशील रहाण्यात डॉ.भाभांच्या या वाक्याने दिलासा मिळत असे. इतर स्रोतांपासून मिळू शकत असेल तेवढी वीज तर निर्माण करून घ्यायची आहेच, इतर लोक त्या कामाला लागलेले आहेतच, पण ती घेतल्यानंतरसुध्दा आपल्या देशाला अधिक वीज लागणार आहे. त्यासाठी अणुशक्तीपासून तयार होणारी थोडी महाग वीज जरी तयार केली तरी त्यातून देशाचा फायदाच होणार आहे. कारण त्यामुळे अनेक घरांत प्रकाश पडेल, कारखान्यात तयार होणारा माल घरोघरी पोचेल, कामगारांना रोजगाराची संधी मिळेल, या सगळ्यांमुळे जास्त लोकांचे राहणीमान सुधारेल. अशा प्रकारे दर युनिटमागे कांही पैसे जास्त खर्च आला आणि त्यापासून कांही रुपयांएवढा लाभ मिळाला तर त्यातून देशातल्या समाजाचा फायदाच आहे. या भावनेने प्रेरित होऊन आम्ही ही वीज तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या प्रयत्नाला लागलो होतो. त्यात यश येऊन देशात अनेक जागी अणुविद्युत केंद्रे उभी राहिली आणि ती आता बाजारभावाने वीजनिर्मिती करू लागली आहेत.


ज्या काळात जगातल्या कोणत्याच देशात अणुशक्तीपासून व्यापारी तत्वावर विद्युतनिर्मिती सुरू झाली नव्हती त्या काळातच भविष्यात ती निश्चितपणे होणार असल्याचे डॉ.भाभांनी ओळखले होते आणि निदान या क्षेत्रात भारताने अगदी सुरुवातीपासून जगाच्या बरोबर रहावे, मागासलेले राहू नये यासाठी ते प्रयत्नशील होते आणि आपण प्रयत्न केले तर ते शक्यतेच्या कोटीत असल्याचा आत्मविश्वास त्यांना वाटत होता. ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या जमान्यात साधी टांचणीसुध्दा परदेशातून आयात करावी लागत असे. खादी ग्रामोद्योग सोडला तर तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारे कारखाने अत्यल्प होते. तेंव्हा भारतात निघालेले बहुतेक कारखाने परदेशी कंपन्यांबरोबर कोलॅबोरेशनमधून उभे राहिले होते आणि ते चालवण्यासाठी परदेशी तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागत असे. असे असतांना जे तंत्रज्ञान पुढारलेल्या देशातसुध्दा अजून विकसित व्हायचे होते ते आपण पहिल्यापासून आत्मसात करू असे म्हणायला अंगात जबरदस्त धमक लागते. ती डॉ.भाभांनी दाखवली. अणुशक्तीविभाग सुरू करण्याचा प्रस्ताव मांडतांना त्यांनी असे सांगितले, "When nuclear energy has been successfully applied for power production in say a couple of decades from now, India will not have to look abroad for its experts but will find them ready at hand." आजपासून वीस एक वर्षांनंतर जेंव्हा अणुशक्तीचा उपयोग विजेच्या निर्मितीसाठी यशस्वीरीत्या करण्यात येईल तेंव्हा या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी आपल्याला परदेशांकडे पहावे लागणार नाही, ते आपल्याकडेच तयार झालेले असतील. डॉ.भाभांनी काळजीपूर्वक नियोजन आणि अथक परिश्रम करून आपले भाकित खरे करून दाखवले. हे त्यांनी करून दाखवले हे तर महत्वाचे आहेच, पण आपण हे करू शकू हे त्यांना माहीत होते याचेसुध्दा आश्चर्य वाटते.



भारतीय कारखानदारीबद्दल बोलतांना डॉ.भाभांनी असे सांगितले होते, "If Indian industry is to take off and be capable of independant flight, it must be powered by science and technology based in the country." जर भारतीय उद्योगक्षेत्राला स्वतंत्रपणे उड्डाण करायचे असेल तर त्याने या देशात विकसित झालेले विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या बळावर ते करायला हवे. हा संदेश त्यांनी उद्योगपतींकडे तर पोचवलाच, पण त्यांच्या अखत्यारीखाली असलेल्या विभागात स्वदेशीकरण हा मूलमंत्र त्यांनी सर्वांना पढवला. अणुशक्तीसाठी लागणारी खास द्रव्ये, यंत्रे आणि उपकरणे सुरुवातीच्या काळात परदेशी बाजारात विकत मिळत होती आणि आपण ती आयात करतही होतो, पण अगदी जमीनीखाली दडलेल्या खनिजाचा शोध घेण्यापासून त्यांचे उत्खनन, शुध्दीकरण, उत्पादन वगैरे करून त्या सर्वांचा वीज निर्माण करण्यासाठी उपयोग करण्यापर्यंत आणि त्यानंतर अखेर त्याची सुरक्षितपणे विल्हेवाट कशी लावायची यासकट त्या बाबतीतले संपूर्ण तंत्रज्ञान आपल्या देशात विकसित करण्यावर त्यांनी भर दिला आणि त्यासाठी सविस्तर योजना आंखल्या. हीच गोष्ट अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही केली. पुढील काळात जेंव्हा सर्व पुढारलेल्या देशांनी भारताला आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वाळीत टाकले होते तेंव्हासुध्दा अणुशक्ती आणि अवकाश या दोन्ही क्षेत्रात आपली प्रगती होतच राहिली यामागे डॉ.भाभा यांची दूरदृष्टीच कारणीभूत होती यात शंका नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील.


अशा या द्रष्ट्या महामानवाला आज त्याच्या जन्मशताब्दीच्या दिवशी त्रिवार मुजरा आणि सतशः दंडवत.

1 comment:

नरेंद्र गोळे said...

समयोचित आणि भाभांची यथायोग्य ओळख करून देणारा लेख.