Tuesday, June 30, 2009

सांचीचे स्तूप - भाग ४


सांची येथील स्तूपांची प्रवेशद्वारे किंवा तोरणे हा सांचीदर्शनाचा सर्वात जास्त आकर्षक, सुंदर आणि महत्वपूर्ण भाग आहे. कल्पकता, कलादृष्टी, हस्तकौशल्य आणि चिकाटी या सर्व गुणांचा परमोच्च असा संगम या शिल्पकृतींमध्ये झालेला दिसतो. सांची येथील मुख्या स्तूपाच्या चार दिशांना चार भव्य अशी तोरणे आहेत, तर इतर स्तूपांसमोर एक किंवा दोन आहेत. मूळ स्तूपांचे बांधकाम होऊन गेल्यानंतर शेदोनशे वर्षांनंतर ही तोरणे बांधली गेली असे पुरातत्ववेत्ते सांगतात. तशी ती मुख्य स्तूपांपासून वेगळीच आहेत.

प्रत्येक तोरणासाठी जमीनीवर दोन उंच असे स्तंभ उभे केले आहेत. प्रामुख्याने हे चौकोनी आकाराचे आहेत, पण कांही ठिकाणी त्याच्या कडा घासून तिथे नक्षीकाम केले आहे तर कांही जागी त्यात सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. चार हत्ती, चार सिंह किंवा चार बटू वगैरे आकृती अशा खुबीने कोरल्या आहेत की वरील तोरणाचा भार ते उचलून धरत आहेत असेच वाटते. या दोन खांबाच्या माथ्यावर विशिष्ट अशा वक्र आकाराच्या तीन आडव्या शिळा ठेवल्या आहेत. त्यातील दर दोन शिळांमध्ये एक पोकळी ठेऊन त्या पोकळ्यांमध्ये तसेच सर्वात वरील शिळेच्या माथ्यावर सुंदर मूर्ती ठेवल्या आहेत. हे सारे शिल्प एकाच अखंड प्रस्तरातून कोरले आहे असे वाटत नाही, पण त्यामधले सांधे बेमालूम पध्दतीने जोडले आहेत, त्यामुळे ते सहजपणे दिसून येत नाहीत.

या कमानींचे उभे खांब व आडव्या पट्ट्या यांवर अगणित सुरेख शिल्पे कोरलेली आहेत. ती सारी पॅनेल्सच्या स्वरूपात आहेत. द्विमिती चित्रांनाच थोडा उठाव देऊन त्यातून त्रिमितीचा भास निर्माण केला आहे. अनेक प्रकारच्या आकृती या चित्रांमध्ये एकमेकीमध्ये गुंतवल्या असल्यामुळे सत्य आणि कल्पित यांचे अगम्य असे मिश्रण या कलाकृतींमध्ये दिसते. यातील चित्रांचे मुख्य विषय आहेत :

१. जातक कथांमधील दृष्ये
२. गौतम बुध्दाच्या आयुष्यातील प्रसंग
३. बौध्द धर्माशी निगडित बुध्दानंतरच्या काळातील प्रसंग
४. मानुषी बुध्दांशी निगडित दृष्ये
५. विविध प्राणिमात्र व वनराई वगैरेंची चित्रे आणि कलाकुसर

जातक कथांमध्ये गौतमबुध्दाच्या पूर्वायुष्याच्या गोष्टी आहेत. ती बौध्दधर्मीयांची पुराणे आहेत असे म्हणता येईल. या पूर्वजन्मांमध्ये गौतमाने मनुष्य रूपात तसेच विविध प्राणी व पक्षी यांच्या रूपात जन्म घेतले होते. त्यात छद्दंत नांवाचा सहा दांत असलेला गजराज, महाकपी नांवाचा वानर, एक शिंग असलेले हरिण वगैरेंच्या उद्बोधक कथा आहेत. समा नांवाच्या मातृपितृभक्त मुलाची गोष्ट श्रावणबाळाच्या गोष्टी सारखी आहे. या कथांमधील प्रसंग चित्रमय पध्दतीने दाखवले आहेत. प्रत्येक चित्रामधील अनेक पात्रांच्या मुद्रा व त्यांचे हांवभाव पाहण्यासारखे आहेत.

गौतमबुध्दाच्या जीवनातले प्रसंग त्याच्या जन्माच्या आधीपासून सुरू होतात. त्याची आई मायादेवी हिला एक दृष्टांत होऊन एक महात्मा तिच्या उदरी जन्माला येणार असल्याचे समजते. सिध्दार्थाच्या जन्मामुळे राजधानीत सर्वांना आनंदीआनंद होतो, त्यानंतर कुमार सिध्दार्थाचे बालपण, यशोधरेबरोबर विवाह, त्याने रथात बसून राज्याचे निरीक्षण करायला बाहेर पडणे, घरदार सोडून रानात जाणे, बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती होणे वगैरे सारा कथाभाग कांही प्रत्यक्ष रूपाने तर कांही अप्रत्यक्ष रूपाने दाखवला आहे.

एक सजवलेला घोडा त्यावर आरूढ झालेल्या राजकुमाराला घेऊन रानाच्या दिशेने जातो आणि उलट दिशेने एक रिकामा घोडा खाली मान घालून परत येतांना दिसतो एवढ्या दोन चित्रांतून गौतमाचे तपश्चर्या करण्यासाठी रानात जाणे सूचित केले आहे. त्याचप्रमाणे बोधीवृक्षाखाली गौतमाची आकृती न दाखवताच त्याचे तिथे असणे सूचित केले आहे.

बौध्द धर्माच्या प्रसारार्थ गौतमबुध्दाने तसेच त्याच्या प्रमुख अनुयायांनी मोठमोठे दौरे काढून जागोजागी प्रवचने दिली, संघ स्थापन केले, त्यांना अनेकविध माणसे भेटली. त्यात कांही राजे होते तर कांही दीनवाणे पीडित लोक होते, कांही पंडित होते तशाच गणिकासुध्दा होत्या. या सर्वांचा कसा उध्दार झाला हे वेगवेगळ्या कथांमध्ये सांगितले आहे. महावीर हा अखेरचा तीर्थंकर होता तसेच गौतम हा शेवटचा बुध्द होता, त्याच्या आधीसुध्दा कांही बुध्द होऊन गेले अशी बौध्दधर्मीयांची मान्यता आहे. त्या सर्वांच्या जीवनाशी निगडित कथा आहेत. या सर्वच गोष्टी चमत्कारांनी भरल्या आहेत. त्यातल्या त्यात ज्या शक्यतेच्या कोटीतल्या वाटतात त्यांचा समावेश इतिहासात केला गेला असावा. सांची येथील तोरणांवरील चित्रांत शक्य व अशक्य या दोन्ही प्रकारच्या गोष्टी दाखवल्या असल्यामुळे त्या एकमेकीत मिसळून गेल्या आहेत. लक्षपूर्वक पाहून त्या चित्रांचा अर्थ लावावा लागतो.

याशिवाय अनेक प्रकारचे जलचर व थलचर पशु, पक्षी तसेच झाडे, पाने, फुले वगैरेंनी ही चित्रे सुशोभित केलेली आहेत. त्यातले अनेक पाकळ्यांचे कमळ, धम्मचक्र, स्तूपाचा बाह्य आकार, बोधीवृक्ष, त्याखाली जिच्यावर बसून गौतमबुध्दाने तप केले ती शिला, सम्राट अशोकाचे चार सिंह वगैरे कांही प्रतीके अनेक जागी कोरलेली दिसतात. हे चार सिंह आणि चक्र यांना भारताच्या नाण्यांवर व नोटांवर स्थान मिळाले आहे.

तोरणाचे स्तंभ आणि आडव्या शिला यांच्या माथ्यावरील मोकळ्या जागांवर पूर्णपणे त्रिमित अशा आकृती आहेत. यांत घोड्यावर किंवा हत्तींवर बसलेले स्वार, नृत्य करणा-या नर्तकी वगैरे आहेत. कांही मनुष्याकृतींना तर आतल्या बाजूला पहाणारे एक आणि बाहेरच्या बाजूने पहाणारे दुसरे अशी दोन दोन तोंडे आहेत. माणसाने बाह्य सृष्टीकडे लक्ष द्यावे तसेच अंतर्मुखसुध्दा व्हावे असे यातून सुचवले आहे.

अशा प्रकारच्या खूप मजा इथे आहेत. ही चित्रे पाहण्यासारखी आहेतच, पण त्याबरोबर विचार करायला लावणारी आहेत. मात्र त्यासाठी बौध्द धर्म, त्याचे तत्वज्ञान, त्यांच्या समजुती वगैरेंची माहिती असायला हवी.
. . . . . . . . . . (समाप्त)

Monday, June 29, 2009

सांचीचे स्तूप - भाग ३

अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी भारतात चांगलेच हातपाय पसरवले होते. मोगलाई आणि मराठेशाही लयाला चालली होती. त्यांच्या प्रमुख सरदारांना राजेपद आणि नबाबी देऊन इंग्रजांनी आपले मांडलिक बनवले होते. त्या राजांना संरक्षण, मदत, सल्ला वगैरे देण्याचे निमित्य करून जागोजागी इंग्रज अंमलदार पेरून ठेवले होते आणि त्यांच्या दिमतीला कवायती फौजा दिल्या होत्या. जे याला तयार झाले नाहीत त्यांची राज्ये खालसा करून इंग्रजांच्या अधिपत्याखाली आणण्याचा सपाटा चालवला होता. सन १८१८ मध्ये त्यांनी पुण्यातली पेशवाई कायमची बुडवली त्याच वर्षी भोपाळच्या नवाबाच्या पदरी असलेल्या जनरल टेलरला सांचीचा स्तूप अचानक सापडला. टेहेळणी करण्याकरता तो तिथल्या टेकडीवर चढून गेला असतांना झाडाझुडुपांच्या आत लपलेल्या स्तूपाचा भाग त्याला दिसला. झाडेझुडुपे तोडून आणि दगडमातीचा ढिगारा बाजूला केल्यावर त्याला स्तूपाचा आकार दिसला आणि त्याने त्या गोष्टीची नोंद केली.

त्या पुरातन वास्तूच्या आत एकादा खजिना गाडून ठेवला असल्याची भूमका उठली आणि त्याच्याबरोबरच त्या द्रव्याचे रक्षण करणारी एकादी दैवी किंवा पैशाचिक शक्ती त्या जागी वास करत असल्याच्या वावड्याही उठल्या. त्यांना न जुमानता कांही धीट भामट्यांनी स्तूपाच्या आतमध्ये आणि आजूबाजूला बरेच खोदून पाहिले आणि खजिन्यांऐवजी अस्थी किंवा राखेने भरलेले कलश मिळाल्यावर कपाळाला हात लावला आणि हाताला लागेल ते उचलून नेले. या सगळ्या गोंधळात येथील प्राचीन ठेव्याचा बराच विध्वंस झाला. अशोकाने स्तूप बांधतांना त्याच्या समोर दगडाचा एक सुरेख स्तंभ उभा केला होता. त्याचे तुकडे नंतर शेजारच्या गावातल्या जमीनदाराकडे मिळाले. तेलबियांमधून तेल गाळण्यासाठी किंवा उसाचा रस काढण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात होता म्हणे.

इंग्रजी राज्य स्थिरस्थावर झाल्यानंतर ब्रिटीशांच्या केंद्रीय सरकारमध्ये पुरातत्वशाखेची स्थापना करण्यात आली आणि त्या खात्यातर्फे या जागी योजनाबध्द रीतीने उत्खनन आणि साफसफाई करून जमीनीखाली दडलेली देवळे, स्तूप, कमानी, निवासस्थाने वगैरे काळजीपूर्वक रीतीने शोधून काढण्यात आली. पडझड जालेल्या सर्व स्तूपांची डागडुजी आणि आवश्यक तेवढी पुनर्बांधणी करून त्यांना पूर्वीची रूपे देण्यात आले. या कामाचे सर्वाधिक श्रेय सर जॉन मार्शल यांनी सन १९१२ ते १९१९ या काळात केलेल्या अभूतपूर्व अशा कामगिरीला जाते. त्यांनी पाया घालून दिल्यानंतर पुढे आलेल्या संशोधकांनी हे काम चालू ठेवलेच आणि आजही ते चाललेले आहे. जागतिक कीर्तीच्या पुराणकालीन अवशेषांमध्ये म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सांचीचा समावेश होतो आमि जगभरातले अभ्यासू या जागंला भेट देण्यासाठी इथे येतात.

इतस्ततः सापडलेले कमानींचे तुकडे गोळा करून आणि जोडून त्या उभ्या करण्यात आल्या. अशोकस्तंभ मात्र पुन्हा एकसंध करता येण्यासारखा नसल्यामुळे खंडितच राहिला. त्याचा जमीनीलगतचा खालचा भाग स्तूपाच्या जवळच जमीनीत गाडलेल्या स्थितीत आहे. मधला मोठा तुकडा आडवा करून एका शेडमध्ये ठेवला आहे आणि चार दिशांना चार सिंहाची तोंडे असलेला शीर्षभाग म्यूजियममध्ये ठेवला आहे. आतून भरीव असलेले स्तूपसुध्दा कालौघात अभंग राहिलेले नव्हते त्या ठिकाणी बांधकाम करून उभारलेली देवळे टिकणे शक्यच नव्हते. त्यामुळे ती सगळी भग्नावस्थेत सापडली आणि त्याच अवस्थेत राखून ठेवली आहेत. उभे असलेले सुंदर खांब, कांही तुळया, चौकटी, कोनाडे, शिखरांचे भाग वगैरेवरून तत्कालिन वास्तुशिल्पकलेचा पुरेसा अंदाज येतो. त्यातली कोणतीच वास्तु आकाराने भव्य नाही, पण ज्या आकाराच्या दगडांचा वापर त्यात केलेला दिसतो ते पाहता कोणत्याही यांत्रिक सहाय्याशिवाय या शिला खडकातून खोदून कशा काढल्या असतील, कशा तिथवर आणल्या असतील आणि कशा रीतीने खांबांवर चढवल्या असतील याचे कौतुक वाटते. एका जागी रांगेत ओळीने उभ्या असलेल्या सात आठ उंच खांबांवर सरळ रेषेत मोठमोठ्या फरशांच्या तुळया मांडून ठेवल्या आहेत. त्यांना पाहून अशा प्रकारच्या ग्रीक व रोमन अवशेषांची आठवण येते.

पूर्वीच्या काळातल्या मठांच्या अस्तित्वाच्या खुणा अनेक ठिकाणी दिसतात. त्यातील एका मुख्य जागी एक संपूर्ण मठच उत्खननातून बाहेर निघाला आहे. या आयताकृती जागेत सरळ रेषेत अत्यंत प्रमाणबध्द अशा अनेक लहान लहान चौकोनी खोल्या दगडांच्या भिंतीतून बांधल्या होत्या. देशविदेशातून आलेले बौध्द धर्माचे विद्वान, प्रसारक आणि विद्यार्थी तिथे राहून अध्ययन, अध्यापन, ध्यानधारणा वगैरे गोष्टी करत असतील. मठाच्या या इमारतींना लागूनच एक अवाढव्य आकाराचा दगडी कटोरा ठेवला आहे. सर्व भिख्खूंना मिळालेले अन्न त्यांनी त्यात टाकायचे आणि सर्वांनी मिळून ते भक्षण करायचे असा रिवाज त्या काळी असावा.

या जागी केलेल्या उत्खननात अगणित नाणी, मातीच्या भांड्यांचे तुकडे वगैरे मिळाले आहेत. अनेक लहान मोठ्या आकाराच्या दगडी प्रतिमा आहेत. त्यातील कांही बहुतांश शाबूत आहेत, कांहींचे थोडे तुकडे निघाले आहेत, तर कांही छिन्नविछ्छिन्न अवस्थेत आहेत. अनेक शिलालेख आहेतच, शिवाय खांब, तोरण वगैरेंवर लिहिलेला बराच मजकूर स्पष्टपणे दिसतो. पण तो बहुधा ब्राम्ही लिपीत असल्यामुळे आपल्याला वाचता येत नाही आणि पाली भाषेत असल्यामुळे कळणारही नाही. पुरातत्व खात्याच्या दृष्टीने सांची हे फार महत्वाचे ठिकाण आहे. त्यांचे तज्ज्ञ या सगळ्यांचा सुसंगत अर्थ लावून त्यातून निष्कर्ष काढत असतात.

.... . . . . . . (क्रमशः)

सांचीचे स्तूप - भाग २


बौध्द धर्माच्या पुरातनकालीन परंपरेत स्तूप म्हणजे एक समाधी किंवा स्मारक असते. महात्मा गौतम बुध्दाचे महानिर्वाण ख्रिस्तजन्माच्या पाचशे वर्षे आधी होऊन गेले. तत्कालिन भारतीय परंपरेनुसार त्यांचेवर दाहसंस्कार करून त्यावर एक समाधी बांधली गेली. ती कदाचित स्तूपाच्या आकाराची असावी. त्यानंतर सुमारे तीन शतकांनी सम्राट अशोक याने बौध्द धर्माचा स्वीकार केला आणि त्याच्या प्रसाराचे काम हिरीरीने पुढे नेले. त्याने त्यापूर्वी केलेल्या निरनिराळ्या लढायांत प्रचंड मानवसंहार झाला होता. त्या पापातून मुक्त होऊन चौर्‍याऐंशीच्या फेर्‍यांतून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने बोधिसत्वाचे चौर्‍याऐंशी हजार स्तूप बांधले होते अशी आख्यायिका आमच्या मार्गदर्शकाने सांगितली. एकाच पुण्यात्म्याच्या अनेक जागी समाध्या असणे मी तर कधी ऐकले नाही. त्यात तीनशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या मानवाच्या पार्थिवाचे चौर्‍याऐंशी हजार भागात विभाजन करणे शक्यतेच्या कोटीतले वाटत नाही. त्यामुळे यात अतीशयोक्ती वाटली. चक्रवर्ती सम्राट अशोकाकडे सत्ता आणि समृध्दी या दोन्ही गोष्टी मुबलक असल्यामुळे त्याने गांवोगांवी भिक्खूंसाठी मठ बांधून दिले असतील आणि ते दुरूनही चटकन ओळखू यावेत यासाठी टेकड्या टेकड्यांवर स्मारकाच्या रूपात स्तूप उभे केले असण्याचीही शक्यता आहे. त्या कालातले सारेच बांधकाम दगड, माती, विटा वगैरेंपासून केलेले असल्यामुळे ते दोन हजार वर्षांच्या दीर्घ कालौघात वाहून गेले असणार. त्यातल्या त्यात सांची येथील काम आज जास्तीत जास्त सुस्थितीत दिसते, पण त्यामागे वेगळीच कारणे आहेत.

महात्मा गौतम बुध्दाचा जन्म आजच्या नेपाळमधील लुंबिनी या जागी झाला. राजकुमार सिध्दार्थ या नांवाने तो कपिलवस्तू या नगरात वाढला. राजवाड्यातील सुखी जीवनाचा त्याग करून सत्याचा शोध घेण्यासाठी तो अरण्यात गेला आणि बिहारमधल्या गया शहराजवळ बोधीवृक्षाखाली तपश्चर्या करतांना त्याला ज्ञानप्राप्ती झाली. आपल्या मतांचा प्रसार करण्यासाठी तो आजचा उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळ या भागात पुढे आयुष्यभर भ्रमण करत राहिला. आजच्या मध्यप्रदेशातील सांची या गांवाला गौतमबुध्दाने कधीच भेट दिली नव्हती. मग त्याची समाधी किंवा एवढे मोठे स्मारक इथे कां बांधले गेले? या प्रश्नाचे एक कारण असे दिले जाते की सम्राट अशोकाच्या एका राणीचे माहेर नजीकच असलेल्या विदिशानगरीत होते. त्यामुळे त्याचा थोडा ओढा या बाजूला होता. हा भाग आर्थिक दृष्टीने समृध्द होता आणि विदिशा हे एक महत्वाचे शहर होते. मोठ्या शहराच्या जवळ पण उंच टेकडीवर असल्यामुळे त्यापासून थोडे अलिप्त अशी ही निसर्गरम्य जागा भिख्खूंना राहण्यासाठी आकर्षक होती. असा सर्व बाजूंनी विचार दूरदृष्टीने करून सम्राट अशोकांने या जागी फक्त एक स्तूपच बांधला नाही, तर बौध्द धर्माच्या अभ्यासाचे आणि प्रसाराचे एक प्रमुख केंद्र या जागी उभे केले.

देशभरातील शिकाऊ तसेच अनुभवी भिख्खू इथे येऊन रहात असत आणि प्रशिक्षण घेऊन तयारीनिशी धम्मप्रसारासाठी बाहेर पडत असत. यात हे केंद्र चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आणि पुढील तेरा शतके त्याचा विकास अधून मधून होत राहिला. वेगवेगळ्या काळातल्या तत्कालिन राजांनी त्याच्या सौंदर्यात आणि समृध्दीत वेळोवेळी भर घातली. सम्राट अशोकाने बांधलेला मुख्य स्तूप फक्त विटांनी बांधलेला होता. कांही काळाने तो मोडकळीला आला. तेंव्हा त्याची डागडुजी करून त्याच्या सर्व बाजूंनी दगडी बांधकाम केले गेले. नंतर कोणी त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी पुरुषभर उंच असा चौथरा सर्व बाजूंनी बांधून त्यावर चढण्याउतरण्यासाठी दगडी पायर्‍या बांधल्या. भारताचे सुवर्णयुग मानले जाणार्‍या गुप्तवंशाच्या राजवटीत अनेक सुंदर मूर्ती या परिसरात बसवल्या गेल्या. बौध्द धर्म परमेश्वराची मूर्तीपूजा मानत नाही. त्यांच्या मताप्रमाणे तो निर्गुण निराकार आहे. त्यामुळे परमेश्वराची कोणत्याही सगुण रूपातली प्रतिमा इथे दिसत नाही किंवा तिची पूजाअर्चा होत नाही, पण बुध्दाच्या मात्र अगणित रूपामधील प्रतिमा पहायला मिळतात. मुख्य स्तूप बांधून कांही शतके लोटल्यानंतर इतर स्तूप त्या जागी बांधले गेले, तसेच त्यांना आकर्षक अशी प्रवेशद्वारे बांधली गेली. सांचीच्या स्तूपामधील सर्वात सुंदर, अगदी अप्रतिम म्हणता येईल असा भाग म्हणजे स्तूपांच्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना उभ्या केलेल्या कमानी किंवा तोरणे आहेत. इतके सुंदर प्रवेशद्वार आणि आत गेल्यावर पाहण्यासारखे विशेष असे कांहीच नाही असा अनुभव आपल्याला फार क्वचित येतो. या कमानींबद्दल सांगण्यासारखे खूप असल्यामुळे ते पुढील भागात देईन.

सम्राट अशोकाचे एकछत्र साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा भाग कधी एकाद्या चक्रवर्ती सम्राटाच्या अधिपत्याखाली यायचा तर कधी स्थानिक राजेरजवाडे शिरजोर होत असत. त्यांच्या मर्जीनुसार कधी बौध्द धर्माला महत्व प्राप्त होत असे, तर कधी त्याचा राजाश्रय काढून घेतला जात असे. हा उतार चढाव तेरा शतके इतका प्रदीर्घ काळ चालल्यानंतर बहुधा बौध्द धर्मीयांनी या जागेला कायमचा रामराम ठोकला असावा. कारण अकराव्या शतकानंतरच्या काळातला एकही बौध्द धर्माशी संबंधित अवशेष येथील उत्खननात सापडला नाही. त्यानंतर इतर कोणीही या जागेचा सदुपयोग न केल्यामुळे ती पुढील सातआठ शतके पडून राहिली होती. मोठ्या स्तूपांची पडझड झाली होती, लहान लहान स्तूप दगडामातीच्या ढिगा-यांखाली गाडले गेले होते आणि सगळीकडे दाट झाडाझुडुपांची गर्दी झाली होती. भारतातील इतर कांही सौंदर्यस्थळांप्रमाणेच सांचीच्या प्राचीन स्तूपांचा नव्याने शोध एका इंग्रज अधिका-याने लावला.
..... . . . . . . (क्रमशः)

Sunday, June 28, 2009

सांचीचे स्तूप - भाग १


शाळेत शिकतांना इतिहास आणि भूगोल या दोन्ही विषयात सांचीबद्दल थोडेफार वाचनात आले होते, त्या भागातून रेल्वेने जातांना मुद्दाम लक्ष ठेऊन सांची स्टेशनजवळच असलेल्या टेकडीवरील त्या वास्तूच्या घुमटांचे दर्शन घेतले होते, पण मुद्दाम मुंबईहून इतक्या दूर खास तेवढ्यासाठी जाण्याएवढी तीव्र इच्छा मात्र कधी झाली नव्हती. विदिशाला जाण्याचा योग आला तेंव्हा मात्र सांची पाहूनच परत यायचे ठरवले.
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन वर येण्याच्या आधीच आम्ही घरातून निघालो आणि पंधरा वीस मिनिटात सांचीला पोचलो तोंवर ते अजून कोवळेच होते. विदिशाहून भोपाळकडे जाणार्‍या महामार्गावरून जातांना सांचीच्या स्तूपाकडे जाण्यासाठी एक फाटा फुटतो. त्या फाट्यावर वळताच लगेच पुरातत्वखात्याची चौकी लागली. तिथली तिकीटाची खिडकी उघडलेली होती. भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, बांगलादेश वगैरे भरतखंडातल्या पर्यटकांसाठी माणशी दहा रुपये तिकीट आहे तर इतर देशातील नागरिकांसाठी त्याचा दर थेट अडीचशे रुपये इतका आहे असे तिथल्या फलकावर लिहिलेले होते. अमेरिकेत जन्मलेल्या आपल्या लहानग्या नातवाला सोबत आणले तर इतके पैसे द्यावे लागतील असा शेरा कोणी मारला, पण जगातल्या सगळ्याच लहान मुलांना इथे विनामूल्य प्रवेश असल्यामुळे सध्या तरी तशी वेळ आलेली नाही अशी दुरुस्ती केली गेली. दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी वेगवेगळे दर दाखवणारा तक्ता दिला होता, पण त्याची वसूली करणारा नगरपालिकेच्या कंत्राटदाराचा कर्मचारी अजून आला नसावा. तो वाहनतळावर बसला असेल असे समजून आम्ही आपली गाडी पुढे दामटली.
स्तूप ज्या टेकडीवर आहेत तिथपर्यंत वर चढण्यासाठी चांगला रस्ता आहे. वर गेल्यावर एक लहानसा पार्किंग लॉट होता. वीस पंचवीस गाड्या तिथे उभ्या राहू शकल्या असत्या. तिथे जागा नसली तर तिथे पोचण्याच्या रस्त्याच्या कडेने आणखी चाळीस पन्नास गाड्या उभ्या करता येतील. एकाच वेळी याहून जास्त संख्येने तिथे येणार्‍या वाहनांची संख्या कधी होत नसणार. रमत गमत वेळ घालवण्यासारखे हे ठिकाण नसल्यामुळे कोणीही तिथे तासभरसुध्दा रहात नसेल.
त्या दिवशीच्या पर्यटनाची बोणगी आम्हीच केली होती. त्यामुळे रस्त्यावरही कोणी भेटले नाही आणि पार्किंग लॉटही अगदी रिकामा होता. वाहनतळाच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या सावलीला कार उभी करून आम्ही गेटपाशी गेलो. तिथली झाडलोट, राखणदारी वगैरे करणारे दोन तीन कर्मचारी गप्पा मारत बसले होते. आम्ही प्रवेश केल्यावर त्यातलाच एकजण माहिती द्यायला तयार झाला. त्याच्या बरोबर आम्ही समोरच असलेल्या मुख्य स्तूपाकडे वळलो.
यापूर्वी सारनाथला एकच भव्य आकाराचा स्तूप पाहिल्यासारखे मला आठवत होते आणि शाळेत असतांना पाहिलेल्या सांचीच्या चित्रांत एकच स्तूप असायचा. रेल्वेतून जातांनासुध्दा टेकडीच्या माथ्यावर असलेला एकच स्तूप पाहिला होता. प्रत्यक्षात ती टेकडी चढून वर गेल्यावर तिच्या शिखरस्तानी एक मोठा स्तूप आणि त्याच्या जवळच उतारावर दोन मध्यम आकाराचे स्तूप दिसले. लहान सहान अगणित स्तूपांचा तर सडा पडला होता. असे दृष्य पाहणे मला अगदी अनपेक्षित होते. एकमेकांच्या अगदी जवळ जवळ असलेल्या इतक्या स्तूपांचे कांही प्रयोजन वरवर तरी दिसत नव्हते.
लहानपणी स्तूपाचे चित्र पाहून ती एक वर्तुळाकृती इमारत असावी आणि तिच्या माथ्यावर अर्धगोलाच्या आकाराचा घुमट बांधलेला असावा असाच माझा समज झाला होता. अशा प्रकारचे घुमट अडीच हजार वर्षांपूर्वी कोणत्या तंत्राने बांधले गेले असतील आणि त्यांचा भार कशाच्या आधारावर तोलला जात असेल असे तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न इंजिनियरिंग शिकल्यानंतर पडू लागले. शिवाय असे घुमट बांधण्याचे कौशल्य जर ख्रिस्तपूर्व युगात भारतीयांकडे होते तर ते मध्येच लुप्त होऊन पुन्हा इस्लामी राजवटीत कां प्रगट झाले असाही प्रश्न सतावू लागला. त्यांचे उत्तर सारनाथला मला मिळाले. तेथील स्तूपाला प्रदक्षिणा घालून पाहिली, पण कोठेच आत जाण्याचा दरवाजा दिसला नाही. आजूबाजूला कोणता भुयारी मार्गही सापडला नाही. अखेर चौकशी करता स्तूप ही इमारत नसून तो एक प्रकारचा बुरुज आहे असे समजले. आंतमध्ये दगडमातीचा ढिगारा रचून त्याला विवक्षित आकार देण्यासाटी बाहेरून भिंत बांधली होती. त्याला पोकळी नव्हतीच, त्यामुळे त्याच्या आंत प्रवेश करण्याचा प्रश्नच नव्हता. ही माहिती मला मिळालेली असल्यामुळे सांचीच्या स्तूपाकडे पाहतांनातिच्याकडे एक इमारत या नजरेने मी पाहिलेच नाही.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

Thursday, June 25, 2009

तेथे कर माझे जुळती - ४ - प्रकाश झेंडे - भाग १,२,३

या लेखात मी आणखी एका परिचिताचे व्यक्तीचित्र काढणार आहे, त्यामुळे अर्थातच व्यक्तीगत बाबींचे उल्लेख शक्यतो टाळणार आहे.

मी नोकरीला लागून दोन अडीच वर्षे झाली असतील. कसल्याशा किचकट तांत्रिक समस्येमध्ये गुंतलेला असल्यामुळे त्या विषयाचा एकाग्रचित्ताने अभ्यास करत असतांना माझ्या पार्टीशनवर कोणी तरी टकटक केली. मी थोड्या अनिच्छेनेच मान वळवून पाहिलं. एक निरागस, उमदा आणि हंसतमुख युवक उभा होता. माझ्याशी नजरानजर होताच म्हणाला, "माझं नांव प्रकाश झेंडे. मला तुमची थोडी मदत हवी आहे."
मी यांत्रिकपणाने म्हंटलं, "बोला."
खिशातून एक कागद काढून त्यानं सांगितलं, "मला हा सर्किट डायग्रॅम देता कां?"
"सर्किट डायग्रॅम आणि माझ्याकडे ..." पुढे मी न उच्चारलेले "कसा असेल?" हे शब्द त्याने आधीच ओळखले आणि एकदम "याचा अर्थ तुमच्याकडे तो नाही, धन्यवाद." एवढे म्हणून दाहिनेमुड् करून तो तरातरा चालला गेला. मी अवाक् होऊन त्याची पाठमोरी आकृती पहात माझ्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आलो तेंव्हा कांहीतरी चुकल्याची जाणीव मला झाली. पण तोवर तो अदृष्य झाला होता. मी पुन्हा वळून माझ्या कामाला लागलो.

"दुपारच्या भोजनासाठी मी कँटीनमध्ये गेलो तेंव्हा प्रकाश तिथे बसून आपल्या दोनतीन मित्रांबरोबर हंसतखिदळत जेवण करत होता. ते सुध्दा नव्यानेच नोकरीवर रुजू झालेले त्याचे बॅचमेट होते. आपली थाळी घेऊन मी त्यांच्या टेबलावर जाऊन बसलो, माझे नांव आणि बॅच क्रमांक सांगून आपली ओळख करून दिली, त्यांची नांवे विचारून घेतली. नवे ऑफीस त्यांना कसे वाटते याबद्दल विचारले. त्यांच्या मनात त्याबद्दल असंख्य प्रश्न असणे साहजीक होते, ते हळूहळू बाहेर येऊ लागले. संभाषणाला सुरुवात झाली.
जेवण संपल्यावर प्रकाशला आपल्याबरोबर घेऊन आमच्या ऑफीसच्या लायब्ररीत गेलो, सकाळी त्याला जे काय हवे होते ते मिळाले कां हे विचारलं. त्याने पुन्हा खिशातला कागद बाहेर काढून दाखवला. मी त्याला विचारलं, "हा सर्किट डायग्रॅम माझ्याकडे मिळेल असं तुला कुणी सांगितलं?"
"माझ्या बॉसनं, म्हणजे मिस्टर गुलाटी यांनी."
काय झाले असेल ते आता माझ्या थोडे लक्षात आले. हे मिस्टर गुलाटी वयाने माझ्याहून निदान पंधरा वीस वर्षांनी मोठे होते, चांगले उंचेपुरे गृहस्थ, उग्र चेहेरा, तारवटलेले असावेत असे वाटणारे मोठे मोठे डोळे, भरघोस मिशा वगैरेंनी युक्त असे त्यांचे भारदस्त व्यक्तीमत्व होते. त्यांना पाहून अमरीश पुरीने साकार केलेल्या एकादा मग्रूर जमीनदाराची आठवण यावी. योगायोगाने पूर्वी कधीतरी त्यांना हवी असलेली कसलीशी माहिती मी शोधून काढून पुरवली असल्याने त्यांचा माझ्याबद्दल बरा ग्रह झाला असावा. तो टिकवून धरणे शहाणपणाचे होते. प्रकाशच्या हातातला कागद घेऊन पहात त्याला सांगितलं, "मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यामुळे माझा कुठल्याही सर्किट डायग्रॅमशी कधी प्रत्यक्ष संबंध आला नाही, पण आपण दोघे मिळून हा शोधून काढू."
मग मी एक भला थोरला सविस्तर प्रॉजेक्ट रिपोर्ट कपाटातून काढला, तो चाळून ते सर्किट कशासंबंधी असेल याचा अंदाजाने शोध घेतला, कांही विशिष्ट यंत्रसामुग्रीची मॅन्यू्अल्स उघडून त्यांतले कांही संदर्भ काढले आणि ते घेऊन ड्रॉइंग रेकॉर्ड्सच्या विभागात गेलो. संदर्भातल्या ड्रॉइंग लिस्टांमध्ये पाहून तो सर्किट डायग्रॅम शोधून काढून उलगडला. इतका गुंतागुंतीचा असला डायग्रॅम मी माझ्या आयुष्यात प्रथमच पहात होतो. तो कसा वाचायचा हे प्रकाशला ठाऊक असले तरी त्या यांत्रिक प्रणालीबद्दल तो अनभिज्ञ होता. त्यामुळे त्याच्याही डोक्यात फारसा प्रकाश पडला नसणार. तरीही मी त्याला विचारले, "हाच डायग्रॅम तुला हवा होता ना?"
"कांही कल्पना नाही. मिस्टर गुलाटींना विचारीन." त्याने थंडपणे उत्तर दिले.
"आपण जे कांही शोधतो ते कशासाठी शोधत आहोत हे माहीत असले तर ती गोष्ट मिळाल्यानंतर होणारा आनंद अनेकपटीने जास्त असतो." मी आपल्या सीनिअरपणाचा फायदा घेऊन त्याला उपदेशामृताचा डोस पाजला. पण बॉसने सांगितले एवढे कारण खरे तर या शोधासाठी पुरेसे होते.
"तुला आणखीन कांही गरज पडली तर मला सांग बरं." मी कांहीशा मानभावीपणाने त्याला सांगितले, पण ती गरज पडणार नाही हे मला समजायला हवे होते. आम्ही दोघे लायब्ररीत शिरल्यापासून बघितलेल्या प्रत्येक बाबीचे टिपण त्याने आपल्या कागदावर लिहून ठेवले होते, त्यामुळे ऑफीसमधली कोणती तांत्रिक स्वरूपाची माहिती कुठे मिळेल याचा बराचसा अंदाज त्याला आला होता. तसेच निदान या मेकॅनिकल इंजिनिअरला इलेक्ट्रॉनिक्सबद्दल विचारणे म्हणजे किराणा मालाच्या दुकानात जाऊन पंख्याचा रेग्युलेटर मागण्यासारखे आहे याची जाणीव त्याला झाली होती.

ऑफिसातल्या आमच्या बसण्याच्या जागा वेगवेगळ्या मजल्यांवर होत्या आणि कामाच्या संदर्भातही आमचा एकमेकांशी संपर्क येत नव्हता. कधी कॉरिडॉरमध्ये तर कधी कँटिनमध्ये गांठभेट झाली तर नमस्कार, कसंकाय , हॅलोहाय् होत असे, पण त्या कालखंडात पुन्हा कधी एकत्र बसून बोलण्याची वेळ आली नाही. पुढे आमची ऑफीसेच मुंबईतल्या दूर दूरच्या वेगवेगळ्या भागात गेल्यामुळे तेही थांबले. इतर सहका-यांच्या बोलण्यातून एकमेकांची जी थोडी खुशाली समजत असे तेवढीच राहिली होती.
ज्येष्ठताक्रमानुसार मला आधी ऑफीसच्या कॉलनीत घर मिळून मी तिकडे रहायला गेलो. त्यानंतर कांही वर्षांनी प्रकाशलाही कॉलनीच्या वेगळ्या भागातल्या एका इमारतीत जागा मिळाली. आमच्या रोजच्या जाण्यायेण्याच्या वाटा वेगळ्या असल्या तरी पोस्ट ऑफीस, बँक, दवाखाना, शाळा, बाजार वगैरे समाईक सार्वजनिक जागांवर अधून मधून भेट घडू लागली आणि उभ्या उभ्या दोन चार वाक्यांची देवाणघेवाण होऊ लागली. प्रकाशचा स्वभाव मनमिळाऊ आणि बोलका होता. थोडी थट्टामस्करी करायची आवड त्याला होती. त्याला अनेक विषयांत रस होता तसेच गती होती. त्याचे वाचन दांडगे होतेच, पण वाचनात आलेले शब्दप्रयोग व वाक्ये त्याच्या स्मरणात रहात आणि बोलण्यातून ते डोकावत असत. त्यामुळे त्याचे बोलणे रंगतदार होत असे. क्वचित कधी त्यात टोमणे किंवा उपहास यांचा आभास व्हायचा, कदाचित मुळामुठेच्या पाण्यातूनच त्याचे बाळकडू मिळत असावे, पण एकंदरीत त्याच्याशी वार्तालाप करतांना मजा येत असे.
. . . . . . . . (क्रमशः)

तेथे कर माझे जुळती - ४ प्रकाश झेंडे  - भाग २

प्रकाश झेंडेच्या बरोबर नव्याने जुळलेले नाते अरेतुरेचे राहिले नव्हते. आम्ही दोघेही तोपर्यंत चांगले गृहस्थ झालो होतो. त्यांना संगीत, नाट्य वगैरे कलांची आवड होती, तसेच जाण होती. आमच्या वसाहतीच्या आसमंतात होणा-या शास्त्रीय संगीताच्या मैफलींपासून लहान मुलांच्या नाचगाण्यांच्या कार्यक्रमापर्यंत सर्व जागी ते आवर्जून उपस्थित होत असत. फावल्या वेळात ते सतारवादन शिकत. त्यामुळे सूर, ताल आणि लय यांच्यावर आधारलेले शास्त्रीय संगीताचे व्याकरण त्यांना अवगत होते. सूर, ताल आणि लय साधारणपणे सांभाळले तर गाणे चालीवर येते, पण तो त्याचा नुसता सांगाडा असतो. त्याला सौष्ठव आणि सौंदर्य मिळवून देण्यासाठी त्यात अनेक गोष्टींची भर घालावी लागते, कलाकार मंडळी त्याला आपल्या कौशल्याने अलंकृत करून अधिकाधिक सजवतात वगैरे बरेचसे बारकावे त्यांना ठाऊक होते. झी टीव्हीच्या सारेगमप कार्यक्रमात अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत जसे कॉमेंट्स करतात तशा प्रकारची टीकाटिप्पणी ते वीस पंचवीस वर्षांपूर्वी करत असत.

प्रकाश झेंडे सर्वसामान्य लोकांपेक्षा निश्चितच वेगळे होते. साधारणपणे घरचे खाऊन लष्कराच्या भाक-या भाजायला सहसा कोणी तयार होत नाही. पण झेंड्यांना सार्वजनिक कामात भाग घेण्याची विलक्षण आवड होती. निव्वळ प्रकाशाच्या झोतात येण्यासाठी पुढेपुढे करणा-यातले ते नव्हते, पण त्यापासून दूर राहून मुद्दाम तो टाळण्याचा प्रयत्नही ते करत नसत. त्यांनी केलेले काम लोकांना समजावे इतपत ते सर्वांच्या नजरेसमोर येत असत. वसाहतीत चालत असलेल्या बहुतेक स्वयंसेवी संस्थाच्या कारभारात ते उत्साहाने सहभागी होत.

त्यातच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेली स्वरमंडल नांवाची एक संस्था होती. मी त्याचा एक संस्थापक सदस्य आणि आजीव सभासद होतो. संस्थेच्या कार्यक्रमाचे वेळी तबले, पेट्या वगैरेंची हलवाहलवी करणे, जाजमे आणि सतरंज्या पसरणे व घड्या करून किंवा गुंडाळून ठेवणे अशा नैमित्यिक कामात माझा खारीचा वाटाही असे. नित्याच्या व्यवस्थापनात मात्र मी कधीच रस दाखवला नव्हता. मला त्याची हौसही नव्हती आणि त्यासाठी माझ्याकडे वेळही नसायचा. प्रकाश झेंडे कॉलनीत रहायला आल्यानंतर लवकरच त्या संस्थेचे सभासद झाले आणि थोड्या कालावधीतच व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बनले. ही संस्था ज्यांनी उभी केली होती तेच तिचा सर्व कारभार चालवत असत. आपण त्यांना नानासाहेब म्हणू. दर तीन वर्षांनी सभासदांची सर्वसाधारण सभा होत असे. त्याला उपस्थित असलेल्या मोजक्या लोकांतल्या चार जणांना व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बनण्याची गळ घातली जाई आणि अर्थातच ते बिनविरोध निवडून येत. हिमालयाची सांवली या नाटकातल्या एका वाक्याप्रमाणे हे सदस्य म्हणजे निव्वळ नानासाहेबांनीच शेंदूर फासून कोनाड्यात बसवलेले धोंडे असायचे. पण झेंड्यांना असे नुसते मिरवायचे नव्हते, त्यांना मन लावून काम करायची इच्छा होती. वर्षभरातच हे दिसून आले.

एका संध्याकाळी मला त्यांचा फोन आला आणि मी घरात आहे याची खात्री करून घेतल्यावर पाठोपाठ ते ही आले. आल्या आल्या त्यांनी सरळ मुद्द्याला हात घातला.
"स्वरमंडळाचं कसं काय चाललं आहे असं तुम्हाला वाटतं ?" त्यांनी मला विचारले. हे असे कां विचारत आहेत याचे मला थोडे आश्चर्य वाटले.
मी अंदाजाने सांगितलं, " आजकाल थोडी मुलं आणि खूप मुली गायन शिकायला येतात, परीक्षांना बसतात आणि चांगल्या मार्कांनी पास होतात असं मी ऐकत आहे त्या अर्थी सगळं कांही ठीकच दिसतंय्."
"ते उत्तमच आहे, पण आर्थिक बाजू कशी आहे असं तुम्हाला वाटतं ?" आता हे व्यवस्थापकीय सदस्य आपल्याला देणगी बिणगी मागणार आहेत की काय अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. त्यामुळे सावध होऊन मी म्हंटले, "अहो, पूर्वीच्या काळच्या मानाने आता कितीतरी पटीने विद्यार्थी येत आहेत. त्यांच्या फीमधून सगळा खर्च सहज निघत असेल."
"गेल्या दहा वर्षात तुम्ही कधी स्वरमंडळाचा जमाखर्च किंवा ताळेबंद पाहिला आहे ?"
"नाही बुवा. मी कुठे पाहणार ?"
"बरं, संस्थेचे अधिनियम तरी वाचले असतील."
'सार्वजनिक संस्थांचे अधिनियम' इतके रटाळ आणि अवाचनीय पुस्तक कोण वाचतो ? संस्था स्थापन झाली होती तेंव्हा त्या पुस्तिकेच्या शेवटच्या पानावर इतर अनेक सदस्यांच्या सह्यांच्या खाली माझी स्वाक्षरी ठोकून दिली असणार, हे उघड होते.
"अहो हे सगळं आत्ता या वेळी मला कां विचारत आहात? तुम्ही मॅनेजिंग कमिटीचे मेंबर आहात, तुम्हाला हे सगळे माहीत असण्याची जास्त शक्यता आहे." मी वैतागून म्हंटले.
"हो ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. मागलं आर्थिक वर्ष संपून चार महिने व्हायला झाले. खरं तर वर्ष संपताच त्या वर्षाचा जमाखर्च आणि ताळेबंद तयार करून त्यांचं ऑडिट करून घ्यायचं असतं, ऑडिटरच्या रिपोर्टसह ते सभासदांच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडायचे असतात, त्याची मंजूरी घेऊन एक प्रत चॅरिटी कमिशनरकडे पाठवायची असते अशी कितीतरी कामे असतात. पण अजूनपर्यंत मला कांही हांलचालच दिसत नाही. दर वर्षी असंच असतं का?"
"मला कांही कल्पना नाही. तुम्ही नानासाहेबांना विचारलंत कां?"
"अनेक वेळा विचारून झालं, पण त्यांना कधी वेळच नसतो आणि याची कांही फिकीरही दिसत नाही. असं कसं चालेल?"
मी म्हंटले, "खरंच त्यांना सवड होत नसेल. घरची आणि ऑफिसची सगळी कामं सांभाळून पुन्हा संस्थेचा रोजचा कारभार बघण्यात त्यांचा सगळा वेळ संपून जात असेल. आणि स्वरमंडळाचं एकंदर उत्पन्न तरी असून असून असं कितीसं असणार आहे ? तुमच्या माझ्या पगाराइतकं सुध्दा नसेल."
"मुळात माझ्या मनात तो प्रश्न नाहीच आहे. आज संस्थेची आर्थिक घडी व्यवस्थित आहे. पण उद्या काय होणार आहे ? आज आपले नानासाहेब सर्व पैसे गोळा करतात, त्यातले खर्चही तेच करतात आणि बँकेचा व्यवहारही तेच पाहतात. पण त्याचा रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर उद्या वेळ आली तर इतरांना ते कसे कळणार ? या वर्षी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर ते कॉलनीत राहू शकणार नाहीत, बाहेर कुठे राहणार आहेत की मुंबई सोडून जाणार आहेत हे कुणाला ठाऊक नाही. त्यानंतर ते उपलब्ध नसतील तर त्यांना कुठे शोधणार आणि रोजच्या कारभाराचे काय होईल हा प्रश्न मला सतावतो आहे. चांगल्या अवस्थेतली संस्था एका माणसाच्या अभावी बंद पडायची वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे."
"पण यात आम्ही काय करू शकतो?"
"आपण सर्व सभासदांची विशेष बैठक बोलावून त्यांना विचारू शकतो. त्यांना उत्तरे द्यावीच लागतील. नाही तर त्यांच्या विरुध्द कारवाई करण्याची वेळ येईल. पण आता स्वस्थ बसून राहण्यात काय अर्थ आहे ?"
"समजा, ते बधले नाहीत, तर आपण कोणती पर्यायी व्यवस्था करू शकणार आहोत ?"
"मी इतर सभासदांशी यावर बोललो आहे. ते कांही कामे वाटून घ्यायला तयार आहेत. आणखी कांही सदस्यांना नॉमिनेट करून संस्था चालवणे अशक्य नाही. पण ती वेळ नाहीच आली तर ते जास्त चांगले. नाही कां?"
झेंडे संपूर्ण तयारीनिशी आले होते. मी त्या विशेष सभेला यायला कबूल झालो, तसेच इतर दोन चार मित्रांना तयार केले. नानासाहेबांनी खरोखरच वेळेअभावी कधी हिशोब ठेवलाच नव्हता की त्यांना तो दाखवायचा नव्हता कुणास ठाऊक. पण ते कांही त्या सभेला आले नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण यापुढे या संस्थेच्या कामाचा भार पेलू शकणार नाही. तेंव्हा ताज्या दमाच्या तरुण मंडळींनी ही धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सांभाळावी अशी विनंती करणारे पत्र त्यांनी पाठवले होते. ते वाचून दाखवण्यात आले. सुरुवातीपासून नानासाहेबांनी या संस्थेसाठी केवढी जिवापाड धडपड, पायपीट आणि धांवपळ केली याची आठवण करून त्यांना पुढील आयुष्यातही आयुरारोग्य लाभो अशी आशा व्यक्त करण्यात आली, पर्यायी व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली आणि कसल्याही प्रकारचा कडवटपणा न आणता ती संस्मरणीय बैठक संपली. प्रकाश झेंडे यांचे यातले कौशल्य पाहून मी थक्क झालो.

प्रकाश झेंडे  - भाग ३
ऑफीसातल्या कामाच्या वाटणीची सोयीनुसार नेहमीच पुनर्रचना होत असते. अशा एका पुनर्रचनेत प्रकाश झेंडे त्यांच्या विभागासह माझ्या हाताखाली आले. तोपर्यंत मला सर्किट डायग्रॅम वाचता यायला लागले असले तरी मध्यंतरीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातल्या प्रगतीची प्रचंड घोडदौड चालली होती. संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता. यातल्या प्रमुख नवनव्या गोष्टींची ओळख करून घेण्यात मला झेंड्यांची खूप मदत झाली. सर्वात जास्त महत्वाच्या बाबी थोडक्यात पण नीट समजतील अशा पध्दतीने समजावून सांगण्यात त्यांची विलक्षण हातोटी होती. एका बाजूने पाहता त्यांचा कान माझ्या हातात होता, त्यामुळे त्यांच्याकडून घेतलेल्या माहितीवरून मी त्यांच्याच चुका काढणे शक्य होते हे त्यांना माहीत होते. तर दुस-या बाजूला त्यांच्या हाताखाली काम करणारी तरुण मुले जास्त आधुनिक शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन आलेली असल्यामुळे त्यांचेकडे अद्ययावत प्रणालींचे अधिक चांगले ज्ञान होते आणि मी त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कातसुध्दा होतो याची जाणीव त्यांना होती. तरीही कांहीही हातचे न राखता त्यांनी मला सगळे बारकावे व्यवस्थित दाखवले. एकादा पुरेसा सक्षम संगणक काय काय चमत्कार करू शकतो आणि इतर बाबतीत तो तितकाच मठ्ठ असल्यामुळे त्याचा उपयोग करण्यासाठी त्याला किती पढवावे लागते आणि तरीसुध्दा तो कसले गोंधळ घालू शकतो वगैरे गोष्टी त्यांनी मला छान समजावून सांगितल्या. पण हा सहवास जास्त दिवस टिकला नाही. आम्हा दोघांनाही वेगवेगळ्या विभागातल्या वरच्या जागांवर वेगवेगळ्या कामगिरींसाठी पाठवण्यात आले. त्यामुळे ऑफीसमधल्या गाठीभेटी बंद झाल्या. मात्र बाहेर आम्ही भेटत राहिलो.

एकदा कसल्याशा गाण्याच्या कार्यक्रमाच्या मध्यंतरात झेंडे आणि त्यांचे दोन तीन मित्र यांच्याबरोबर मी बोलत उभा होतो. म्हणजे ते लोक आपसात बोलत होते आणि मी आपला अधून मधून 'खरंच', 'व्वा', 'हो का' वगैरे उद्गार काढत नुसताच उभा होतो. अखेर स्थानापन्न होण्यासाठी सभागृहात परत येतायेता त्यातल्या एकाने " आता पुन्हा आपली भेट हितगुजमध्ये होणार आहेच." असे म्हंटले, त्याचा अर्थ कांही मला समजला नाही. त्या भागातल्या बहुतेक सर्व खाद्यगृहांना आणि सभागृहांना मी भेटी दिलेल्या असल्यामुळे हितगुज या नांवाचे चांगले हॉटेल किंवा हॉल तिथे नाही याची मला खात्री होती. "असेल कांहीतरी" म्हणून मी तो विषय त्या वेळी सोडून दिला, पण पुन्हा जेंव्हा झेंडे भेटले तेंव्हा मनातल्या कुतुहलाच्या किड्याने पुन्हा उचल खाल्ली आणि मी त्यांना त्यासंबंधी विचारून टाकले.
"तुम्हाला माहीत नाही कां? आम्ही मराठी मंडळी दर महिन्यातल्या पहिल्या रविवारी एकत्र बसून साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक समस्यांवर तासभर चर्चा करतो." त्यांनी सांगितले. यातल्या कुठल्याच 'सा' शी माझा कधी फारसा संबंध आला नव्हता आणि त्याविना माझे जीवन ठीकच चालले होते."हो कां? माझ्या कानांवर अजून हे आलेच नव्हते. कदाचित मला यात रस नसेल असे सगळ्यांना वाटले असेल." असे म्हणून मला तो विषय संपवायचा होता, पण झेंड्यांनी सांगितले," पुढच्या बैठकीला तुम्ही येऊन एकदा प्रत्यक्ष बघाच. तुम्हाला आवडेल."
मी नुसते तोंडदेखले 'हो' म्हंटले असले तरी त्यांनी पुढच्या बैठकीची सविस्तर माहिती दिली. अमक्या बिल्डिंगमधल्या तमक्यांच्या घरी ती मीटिंग असल्याचे सांगितले आणि पुढच्या महिन्यातल्या पहिल्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता नक्की तिथे यायचा आग्रह धरला.
"अहो, पण मी त्यांना ओळखतसुध्दा नाही. त्यांच्या घरी अगांतुक पाहुणा म्हणून कसा येऊ?" मी शंका काढली. त्यावर त्यांनी लगेच उत्तर दिले,
"तिकडे मी असेनच ना? तुमची ओळख करून देईन. तसे बहुतेक लोक आपल्या परिचयातलेच आहेत. परवाच तर आपण पाटील, कुलकर्णी आणि देशपांड्यांशी बोलत होतो. ते सगळे नेहमी येतात. हितगुजमध्ये आम्ही खाणं पिणं ठेवलेलंच नाही, त्यामुळे तुम्हाला कसलाही संकोच वाटायचं कारण नाही."
आता माझ्यापाशी न जाण्याचे कारण उरले नव्हते. शिवाय माझे कुतूहल वाढले होते. त्यामुळे मी जायचे ठरवले. मीटिंगला आठवडाभर उरला असतांना झेंड्यांनी मला पुन्हा आठवण करून दिली आणि त्या दिवशी इतर कोणता प्रोग्रॅम ठरवायचा नाही अशी जवळजवळ आज्ञा केली. मीही कॅलेंडरवर त्या तारखेवर खूण करून ठेवली. पण मध्यंतरी कॅलेंडर बघण्यासाठी कांही काम पडले नाही तर त्या खुणा महिना संपल्यावर मागील महिन्याचे पान फाडतांनाच दिसतात असा अनुभव बरेच वेळा येतो. कदाचित या बाबतीतसुध्दा तसेच झालेही असते. पण झेंड्यांनी त्या दिवशी सकाळी पुन्हा आठवण करून दिल्यामुळे मी त्या बैठकीला गेलो. तिथले एकंदर वातावरण मला रुचले आणि शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनी मी पुन्हा एकदा मराठी वाचनलेखनाकडे वळत गेलो आणि त्याची गोडी वाढत गेली. त्यानंतर दर महिन्याला नेमाने आमच्या भेटी होत राहिल्या. चर्चा हाच या बैठकींचा उद्देश असल्यामुळे मनमुराद चर्चा झाल्या. त्यातून झेंड्यांचे वाचन, त्यांच्या जीवनातले अनुभव, त्यावर त्यांनी केलेला विचार, यातून विकसित गेलेले त्यांचे बहुरंगी व्यक्तीमत्व या सगळ्यांची ओळख होत गेली.

सुमारे पांच सहा वर्षापूर्वी त्यांच्याच घरी झालेली हितगुजची बैठक अविस्मरणीय ठरली. त्यांचे वडील कृषीविज्ञानातले मोठे तज्ज्ञ होते. सेवानिवृत्तीनंतरसुध्दा ते अनेक कृषीविद्यापीठांना संशोधनकार्यात मार्गदर्शन करायचे. पंतनगरच्या भारतातल्या सर्वाधिक महत्वाच्या विश्वविद्यालयाने त्यांचा जीवनगौरव करून त्यांना मानपत्र आणि मानचिन्ह प्रदान केले होते. याची माहिती देऊन प्रकाश यांनी अत्यंत अभिमानाने त्या गोष्टी सर्वांना दाखवल्या. त्यानंतर एका खास आणि दुर्मिळ अशा ध्वनिफीतीचे सार्वजनिक श्रवण झाले. सात आठ वर्षांपूर्वी पोखरण येथे ज्या चांचण्या घेतल्या गेल्या होत्या त्यात सहभागी झालेल्या एका सैनिकी अधिका-याचा त्याच्या गांवी जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्याला उत्तर देतांना त्याने जे विस्तृत भाषण केले होते त्याची ध्वनिमुद्रित प्रत कोठून तरी झेंड्यांनी प्राप्त केली होती. अशा विषयात अत्यंत गुप्तता बाळगली जात असल्यामुळे त्यात कसल्याही प्रकारची तांत्रिक माहिती असणे शक्यच नव्हते, पण राजस्थानातल्या मरुभूमीवर भर उन्हाळ्यात रहायचा त्यांचा अनुभव चित्तथरारक होता. त्या काळात त्यांना आलेल्या इतर मजेदार अनुभवांच्या सुश्राव्य अशा कथनामुळे ते भाषण अत्यंत श्रवणीय होते.
या चांचणी प्रयोगाशी ज्यांचा प्रत्यक्ष किंवा अपरोक्षरीत्या संबंध आला होता अशा कांही व्यक्तींना या कार्यक्रमासाठी मुद्दाम पाचारण केले होते. बरेच वेळ आपण त्या गांवचेच नाही अशा मुद्रेने बसलेल्या लोकांना हळूहळू बोलते केल्यानंतर त्यांनीसुध्दा कांही हृदयस्पर्शी व्यक्तीगत अनुभव सांगितले. ही संस्मरणीय बैठक चांगली दोन अडीच तास रंगली होती. अखेर घरच्या लोकांचे चौकशी करणारे फोन येऊ लागल्यानंतर ती आटोपती घ्यावी लागली.

त्या बैठकीची आठवण ताजी होती. त्या निमित्याने झालेल्या चर्चेत झेंड्यांच्या व्यक्तित्वाचे अवगत नसलेले कांही पैलू समजले होते. याच्या आधी सुध्दा वेगवेगळ्या संदर्भात त्यांनी अनेक अजीबोगरीब अनुभव सांगितले होते. त्यांच्या समृध्द जीवनातल्या खूप कांही गोष्टी त्यांच्याकडून मला ऐकायच्या होत्या. त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप कांही होते आणि मुख्य म्हणजे ते सांगायची त्यांची तयारी असे आणि त्याचे मनोरंजक पध्दतीने कथन करणे त्यांना अवगत होते. त्यांच्यासह मोजक्या मंडळींना बरोबर घेऊन एकादी गिरिविहाराची सहल काढावी आणि त्यात मनसोक्त गप्पा मारून घ्याव्यात अशी माझी खूप इच्छा होती. पण देवाच्या मनात कांही वेगळेच होते. एका काळरात्री मला घाईघाईने एका आप्ताच्या अंत्ययात्रेला जावे लागले होते. ते काम आटोपेपर्यंत मध्यरात्र होऊन गेल्यामुळे तिथेच मुक्काम करून झुंजूमुंजू होताच मी घती परतलो. घरी येऊन पोचतो न पोचतो तोपर्यंत त्यांच्या एका जवळच्या मित्राचा फोन आला आणि त्याने धक्कादायक वर्तमान सांगितले, "प्रकाश आता आपल्यात राहिला नाही."
--------------------------------------------------------------------------------

Wednesday, June 24, 2009

बर्फाचे घरटे - भाग १,२,३

Tuesday, June 23, 2009

बर्फाचे घरटे - भाग १


या लेखाचे मूळ शब्दांकन आणि छायाचित्रण माझे आप्त श्री.अमोल दांडेकर यांनी केले आहे. मी फक्त थोडेसे संपादनकार्य केले आहे. हा लेख त्यांनी ऐन थंडीच्या दिवसात लिहिला होता. मला तो मिळून त्यावर प्रक्रिया करेपर्यंत तिकडचे ऋतुमानही आता बदलले आहे.

मी निसर्गवेडा आहे. जितके सुख आणि आनंद मला निसर्गातून मिळतो तितका आनंद मला दुस-या कशातूनही मिळत नाही. 'फॉल' हा काय प्रकार असतो हे मी अमेरिकेत येऊनच पाहिले आणि मला ते कळले. नाहीतर साडीला फॉल लावून मिळतो यापलीकडे आपल्याला फॉल माहीत नाही.

आता 'बर्फाचे घरटे' म्हणजे काय ? मी सध्या अमेरिकेच्या पूर्व किना-यालगत उत्तरेत राहतो. या भागात नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये भरपूर थंडी पडते. सध्या (म्हणजे थंडीच्या दिवसात) तपमान -४ अंश ते -१८ अंशपर्यंत कुठेही असते. आठवड्याला एक याप्रमाणे इथे बर्फवृष्टी होते आहे. दोन आठवड्यांपूर्वी इतकी बर्फवृष्टी झाली की विचारता सोय नाही. कार साफ करता करता पुरेवाट लागली. रात्री बारापासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत बर्फ पडत होता. हा बर्फ इतका पडला की निष्पर्ण झालेल्या झाडांच्या फांद्यांवर बर्फाने आपले बस्तान बसवले.

देवदार जातीतल्या बारा महिने हिरवे गार राहणा-या सूचिपर्ण वृक्षांच्या (ख्रिसमस ट्रीज) पानांवर बर्फ साचला. सध्या वातावरण असे आहे की बर्फवृष्टी होते तेंव्हाच फक्त आभाळात ढग असतात, नाही तर छान सूर्यप्रकाश पडतो. मग वातावरण तापते, पारा शून्याच्या वर ४ ते ८ अंशांपर्यंत चढतो आणि बर्फ वितळायला लागतो. छपरांवरून आणि पानांवरून थेंब थेंब पाणी गळते. चार वाजेपर्यंत सूर्यप्रकाश क्षीण होत जातो आणि पांच वाजेपर्यंत बाप्पा मावळतात. मग बर्फाचे साम्राज्य पुन्हा पसरते. पांढरा रंग सा-या सृष्टीला पुन्हा आपल्या ताब्यात घेतो. सपाटून थंडी पडते. गारवा इतक्या लवकर पसरतो की छपरावरून ओघळणारे पाणी असते त्याच जागी गोठते. म्हणजे एकादा थेंब ओघळता ओघळता गोठतो आणि त्यातून तयार होते बर्फाची सुई, तर कुठे अक्षरशः भाल्याचे पाते. छातीत घुसले तर मृत्यूच!

पार्किंग लॉटच्या छपरावरील बर्फाचे वितळणे तर मोठे विलक्षण आणि मजेदार ! वितळणारा बर्फ छपराचाच आकार घेतो आणि घसरत घसरत 'C' आकाराचा होतो. मग त्याला वितळलेल्या व पुन्हा गोठलेल्या बर्फाचे काटे आणि सुया येतात.

(क्रमशः)

-----------------------------------------------
Tuesday, June 23, 2009

बर्फाचे घरटे - भाग २



छपरावरून पडणारे थेंब बर्फ साचलेल्या खालच्या झाडावर पडले तर सोनाराचे काम करतात आणि सुंदर नक्षी तयार होते. सोनाराच्या दुकानात गेल्यावर जशा लखलखत्या वस्तू बघायला मिळतात, लखलखणारे हिरे, मोती आणि मौल्यवान जडजवाहीर जसे चकाकतात, तसेच या गळलेल्या पाण्याच्या थेंबांमुळे बर्फाचे मौल्यवान खडे, स्फटिक आणि रत्ने बनतात. एकाद्या निष्णात रत्नपारख्याला यांचे रत्नजडित अलंकार घडवावे असे वाटले तर नवल नाही. हा झाला एक प्रकार. झाडावरून गळणाते पाणी छत्रीसारखा किंवा मशरूमसारखा आकारही घेते. मग ते एक घरटे आहे की काय असे वाटते, म्हणून 'बर्फाचे घरटे !'

बर्फ आणखीन किती तरी रूपे दाखवतो. म्ङणजे जमीनीवर पाहिले की पाणी वाहते आहे असे वाटते, पण त्यावर पाय ठेवला की लक्षात येते ही तर पाण्याची कांच तयार झाली आहे. पाण्याचा वरचा २-३ मिलीमीटरचा थर गोठलेला असतो आणि त्याच्या खालून पाणी वहात असते. बर्फाचा हा प्रकार अत्यंक घातक असतो. त्यावरून पाय घसरला की कपाळमोक्ष होऊ शकतो, हात-पाय, दांत काहीही तुटू शकते. याहूनही वेगळ्या आणखी कांही रूपात बर्फ पहायला मिळतो, पण त्यांचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य आहे. तो अनुभवायचा आणि कॅमे-यात बंद करून टाकायचा, म्हणजे वितळत नाही.

(क्रमशः)

------------------------------
Wednesday, June 24, 2009

बर्फाचे घरटे - भाग ३


या लेखाचे मूळ शब्दांकन आणि छायाचित्रण माझे आप्त श्री.अमोल दांडेकर यांनी केले आहे. मी फक्त थोडेसे संपादनकार्य केले आहे. हा लेख त्यांनी ऐन थंडीच्या दिवसात लिहिला होता. मला तो मिळून त्यावर प्रक्रिया करेपर्यंत तिकडचे ऋतुमानही आता बदलले आहे.

आकाशातून पाणी पडण्याचे ढोबळमानाने तीन प्रकार आपल्याला (भारतात) माहीत आहेत. १) साधा नेहमीचा पाऊस, २) गारा, ३) बर्फवृष्टी (हिमवर्षाव). पण इथे येऊन मी दोन नवीन प्रकार पाहिले. १) विंटरी मिक्स : हा बर्फवृष्टी आणि पाऊस यांच्यामधला प्रकार आहे. यात थंडगार बर्फच आभाळातून खाली पडतो, पण त्या गारा नसतात. खाली पडल्यावर त्याचे पाणी होते आणि खूप थंडी असल्यामुळे त्याचे पुन्हा बर्फात रूपांतर होते. त्यातूनच तयार होते ती काच.२) या बर्फव़ष्टीमध्ये कापसाचे छोटे छोटे पुंजके पडल्यासारखे वाटते, पण ह्या पुंजक्यांची घनता कमी झाली की ते एकदम विरळ होतात आणि जमीनीवर पडताच त्याचे पाणी होते, पण त्याची काच तयार होत नाही. तो खूप संथ गतीने पडतो. हे असे निसर्गाचे कांही नवे अनुभव मी इथे घेतले, ते सांगितले आहेत.
माझे इथले मित्र मला सतत त्यांच्या घरी डीव्हीडीवर सिनेमे पहायला बोलावत असतात. मी आपला येन केन प्रकारेण त्यांच्या तावडीतून सुटण्याचे आणि ते गचाळ चित्रपट टाळण्याचे प्रचंड प्रयत्न करत असतो. आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर असतांना आपला वेळ असा दवडणे माझ्या खूप जिवावर येते. मी जर सिनेमे पहात घरी बसलो, तर हे अनुपम निसर्गसौंदर्य कधी पाहणार ?
खरे तर मला आता माझ्या एका मित्राची खूप आठवण येते. त्याच्यासारखा एकादा उत्साही आणि आंबटशौकीन दोस्त इथे भेटला नाही. नाहीतर आम्ही दोघांनी मिळून अख्खा पूर्व किनारा पालथा घातला असता, अमेरिकेच्या अटकेपार झेंडे रोवले असते आणि "मराठी पाउल पडते पुढे" असली गाणी गात छायाचित्रे घेण्याचा सपाटा लावला असता. मित्राहो, तुमाले लै मिस करतो हाय म्या !
(समाप्त)

Saturday, June 20, 2009

गांधर्व महाविद्यालयाचा वर्षदिन


गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीसुध्दा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला हजर रहायची संधी मला मिलाली. इतके मोठे नांव तसेच नांवलौकिक असलेल्या या संस्थेचा कार्यक्रम म्हणजे तो दणकेबाज असणार असे वाटेल. पण त्या मानाने तो फारच किरकोळ वाटला. संस्थेच्या वाशी येथील इमारतीच्या प्रांगणात उघड्यावरच शंभर दीडशे खुर्च्या मांडल्या होत्या. सुरुवात झाली तेंव्हा त्यातल्या अर्ध्या सुध्दा भरल्या नव्हत्या. या संस्थेतर्फे घेण्यात येणा-या परीक्षांना हजारोंच्या संख्येने परीक्षार्थी दर वर्षी बसत असतात. त्या सर्व केंद्रसंचालकांनी जरी आपापले फक्त पांच दहा प्रतिनिधी पाठवले असते तरी उपस्थिती निदान दहापट झाली असती. पण तशा प्रकारचे आवाहन केले जात नसावे. त्यामुळे बहुतेक स्थानिक मंडळीच आलेली दिसली. कार्यक्रम मात्र उच्च दर्जाचा होता यात शंका नाही.

संस्थेच्या पदाधिकारी श्रीमती सुधाताईंनी स्व.पं.विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या महान कार्याची थोडक्यात पण हृद्य अशी माहिती सांगितली. त्यांच्या कांही आठवणी सांगितल्या. विष्णु दिगंबरांचे बालपण मिरजेत गेले. त्या वेळच्या मिरजेच्या संस्थानिकांचे चिरंजीव त्यांचे बालमित्र होते. एकदा पंडितजी त्यांच्या गुरूजींसोबत मिरजेतल्या रस्त्यावरून पायी चालत जात असतांना महाराजांची बग्गी आली असा कोलाहल झाला आणि रस्त्यावरून चालणारे सारे लोक लगबगीने सरकून एका बाजूला झाले. ती बग्गी बालक विष्णूच्या जवळ येऊन थांबली, आंत बसलेल्या राजकुमाराने त्यांना बग्गीत घेतले आणि ते पुढे चालले गेले. त्यांचे गुरूजी पायीच चालत त्यांच्या मागे मागे गेले. त्या काळात ते महान संगीतज्ञ पंडित वगैरे असले तरी राजकुमाराच्या नजरेतून ते राजाचे सेवकच होते, त्यामुले त्याच्या बरोबरीने ते बग्गीत कसे बसू शकतील ?

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुःसाक्षात् परब्रह्मो तस्मैश्रीगुरुवेनमः।। अशी भावना मनात बाळगणा-या विष्णु दिगंबरांना ही गोष्ट खटकली आणि संगीत व संगीतज्ञ यांना मान सन्मान, प्रतिष्ठा मिळवून देणे हेच त्यांनी आपले जीवनकार्य ठरवले. पण त्या काळात कसल्याच आधाराशिवाय ते काय करू शकत होते? असा विचार करून ते खचले नाहीत. दुर्दैवाने त्यांचे डोळे अधू झाल्यामुळे त्यांना शालेय शिक्षणसुध्दा अर्धवट सोडावे लागले. त्यांनी घर सोडले, वेगवेगळ्या गुरूंच्या पदरी राहून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले, त्यानंतर गुरूंचा आशीर्वाद आणि निरोप घेऊन भारतभर भ्रमण केले. अखेर लाहोरला गेले असतांना तिथे कांही काळ राहून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची स्थापना सन १९०१ मध्ये केली. भारतभरातून आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातून त्यांनी अत्यंत गुणी शिष्य निवडून त्यांना शास्त्रीय संगीताचे आणि त्याबरोबरच संस्था संचालनाचे शिक्षण दिले. त्या काळात पंडितजी आपल्या संगीताचे कार्यक्रम करून जे कांही उत्पन्न मिळवीत असत त्यातले स्वतःसाठी कांहीही न ठेवता ते सारेच्या सारे आपल्या विद्यार्थ्यांसाठी खर्च करत. त्यातून त्यांच्यासारखेच ध्येयासक्त विद्यार्थी तयार झाले, त्यांनी भारतभरात चहू दिशांना जाऊन जागोजागी संस्था स्थापन केल्या आणि आपला शिष्यवर्ग निर्माण करून ही ज्योत पुढे नेली. आज शंभर वर्षानंतरसुध्दा ती तेवत राहिली आहे.

औपचारिक भाषणांचा कार्यक्रम थोडक्यात आंवरून मुख्य कार्यक्रम सुरू झाला. ज्येष्ठ गायिका आणि संगीतज्ञ डॉ.अलका देव मारुलकर यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम या निमित्याने ठेवला होता. त्यांनी आपल्या नेहमीच्या सफाईने आणि गायनकौशल्याने पूर्वी राग सादर केला. पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी दयाघना, कां तुटले चिमणे घरटे हे अजरामर गाणे याच रागातील एका बंदिशेवर बांधले आहे. त्यानंतर थोडी तिलककामोद रागाची झलक त्यांनी एका सुरेख तराण्यातून दाखवली. लोकसंगीतातल्या प्राविण्याबद्दल अलकाताई प्रसिध्द आहेत. त्याला साजेशा अंदाजात त्यांनी कलिंगडा रागावर आधारित एक चैती सादर केली. पण ती रंगात आलेली असतांनाच समोरच्या रस्त्यावर एक लग्नाची वरात बेंडबाजा वाजवत आल्याने रंगाचा बेरंग झाला. त्यातच भरीला भर म्हणून फटाके वाजू लागले. हा गोंगाट सहन करण्याच्या पलीकडे असल्यामुळे नाइलाजाने अलकाताईंना त्यांचे गाणे थांबवावेच लागले. पण त्यांनी आणि श्रोत्यांनी पराकोटीचा संयम बाळगून पंधरा मिनिटे शांतपणे बसून त्या वरातीला पुढे जाऊ दिले. त्यानंतर जणु कांही झालेच नव्हते अशा थाटात अलकाताईंनी भैरवी सुरू केली. स्व.बेगम अख्तर यांनी अजरामर करून ठेवलेली हमरी अटरियापे आजा सांवरिया, देखादेखी बलम हुई जाये ही ठुमरी त्यांनी तितक्याच ताकतीने सादर करून श्रोत्यांचे कान तृप्त केले.

न्यू जर्सी

 न्यू जर्सी (पूर्वार्ध)

Friday, June 19, 2009 

जर्सी' नांवाच्या जातीच्या गायी भारतात आल्यानंतर इथे श्वेतक्रांती झाली, दुधाचा महापूर वगैरे आला आणि मुख्य म्हणजे भल्या पहाटे उठून दुधाच्या बाटल्या हातात धरून दूधकेंद्रापुढे रांगेत उभे राहण्याच्या कामातून माझी मुक्तता झाली. त्यामुळे 'जर्सी' या नांवाबद्दल माझ्या मनात प्रेमभाव उत्पन्न झाला. पुढे भडक रंगाचे, दाट वीण असलेले कॉलरवाले बनियान 'जर्सी' या नांवाने बाजारात आले. हे असले कपडे कोण घालेल असे म्हणत पाहता पाहता सगळ्यांनी ते विकत घेतले आणि त्याची फॅशन झाली. पुढे स्पोर्टशर्ट, टीशर्ट वगैरे नांवाने ते ओळखले जाऊ लागले. एकादी गोष्ट नाहीशी झाली आणि तिचे नांव तेवढे सिल्लक राहिले तर आपण ती 'नामशेष' झाली असे म्हणतो. या बाबतीत 'जर्सी' हे नांव 'वस्तूशेष' झाले असे म्हणता येईल. कोणाकोणाचा मुलगा किंवा मुलगी, नाहीतर मित्र, शेजारी, नातेवाईक असे कोणीतरी हल्ली अमेरिकेतल्या न्यू जर्सी इथे असतात असे वरचेवर ऐकायला येऊ लागले. त्याबरोबर हे न्यू जर्सी न्यूयॉर्कला अगदी खेटून आहे अशी माहितीही मिळाली. कांही लोक तर न्यूजर्सीमध्ये राहतात आणि न्यूयॉर्कला कामाला जातात असेसुध्दा ऐकले. त्यामुळे मुंबईला लागून ठाणे व नवी मुंबई ही शहरे आहेत तसेच न्यूयॉर्कला लागून न्यूजर्सी हे दुसरे मोठे शहर असावे आणि न्यूयॉर्क या महानगराच्या वाढीचा भार ते उचलत असावे अशी माझी धारणा झाली. दोन वर्षांपूर्वी माझी भाची लग्न होऊन पतीगृही न्यूजर्सीला गेली तेंव्हा ती विमानाने इथून न्यूयॉर्कला गेली असे ऐकल्यामुले ही भावना अधिकच दृढ झाली.

अॅटलांटाला जाण्यासाठी आमचे तिकीट नेवार्कमार्गे निघाले तेंव्हा हा शब्द पहिल्यांदा माझ्या समोर आला. एकाद्या शब्दाचे पहिले, शेवटचे आणि मधली कांही अक्षरे बरोबर असली तर आपला मेंदू त्यातील स्पेलिंगच्या चुका माफ करून ओळखीचा शब्द बरोबर वाचतो असे प्रयोगातून सिध्द झाले आहे असे म्हणतात. त्यानुसारच पहिल्या वेळी मी 'NEWARK' हा शब्द बहुधा 'NEWYORK' असाच वाचला असावा. लक्षपूर्वक वाचनानंतर हा फरक जाणवला तेंव्हाही ती स्पेलिंगमधली चूक वाटली. ती दुरुस्त करण्यासाठी जास्त माहिती गोळा केली तेंव्हा नेवार्क हे न्यूजर्सीमधले विमानतळ आहे असे समजले. त्याबरोबरच न्यूयॉर्कच्या विमानतळाला जेएफके (केनेडी यांचे संक्षिप्त नांव) एअरपोर्ट म्हणतात असेही कळले. त्यामुळे अशाच प्रकारे न्यूजर्सीतल्या विमानतळाला कुटल्याशा मिस्टर नेवार्कचे नांव दिले असेल असे वाटले. माझी भाचीसुध्दा बहुधा नेवार्कलाच गेली असेल, पण तिलाही नेवार्क आणि न्यूयॉर्क यांमधला फरक कदाचित नीटसा माहीत नसल्यामुळे त्यावरील चर्चा टाळण्यासाठी तिने आपण न्यूयॉर्कला जात आहोत असेच बहुधा सर्वांना सांगितले असावे. आम्हाला या विमानतळावर फक्त एका विमानातून उतरून दुस-या विमानात बसायचे होते. त्यामुळे ती जागा अॅटलांटाच्या वाटेवर अमेरिकेत कुठेतरी आहे एवढी माहिती आम्हाला पुरेशी होती.

विमानतळावर पोचल्यावर तिथल्या बोर्डावर आमच्या फ्लाईटच्यापुढे नेवार्क असेच लिहिले होते आणि विमान सुटतांना झालेल्या घोषणेत तेच नांव होते. मुंबईहून उड्डाण केल्यानंतर माझ्या अपेक्षेनुसार पश्चिमेकडे अरबी समुद्रावरून जाण्याऐवजी ते उत्तरेला जमीनीवरून उडू लागले तेंव्हा मी थोडा गोंधळात पडलो होतो, पण ते उत्तर ध्रुवावरून जाणार असल्याचे लक्षात आले आणि उत्कंठेत भर पडली. उत्तर ध्रुवाजवळ गेल्यानंतर त्याने अॅटलांटिक महासागराला पूर्णपणे टाळून पूर्व गोलार्धातून पश्चिम गोलार्धात प्रवेश केला आणि कॅनडामार्गे ते यूएसएमध्ये नेवार्कला जाऊन उतरले. अमेरिकेच्या (यूएसएच्या) भूमीवर माझे पहिले पाऊल नेवार्क इथे पडले असे लाक्षणिक अर्थाने म्हणता येईल, पण प्रत्यक्षात आम्ही हवाई पुलावरून थेट विमानतळाच्या इमारतीत गेलो आणि तिथल्या वरखाली करणा-या सरकत्या जिन्यांवरून आणि सरकणा-या पट्ट्यांवरून पुढे पुढे जात अखेर दुस-या हवाईपुलावरून दुस-या विमानात प्रवेश केला. नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर आपले ऐतिहासिक पहिले पाऊल टाकले तेंव्हा त्याच्या बुटाचा ठसा चंद्रावरल्या जमीनीवर उमटला होता. त्या ठशाच्या छायाचित्राला अमाप प्रसिध्दी मिळाली होती. मात्र नेवार्कच्या भूमीचा आमच्या बूटांनासुध्दा स्पर्श झाला नाही. पुढे अॅटलांटाला गेल्यानंतरच अमेरिकेच्या भूमातेचा स्पर्श माझ्या पायांना झाला.

आम्ही अमेरिकेला जायला निघालो तेंव्हा तिकडे थंडी पडायला सुरुवात झाली होती म्हणून आम्ही भरपूर गरम कपडे सोबत घेतले होते, पण मुंबईत ऑक्टोबर हीटने जीव हैराण होत असल्यामुळे ते अंगावर चढवणे शक्यच नव्हते. गळ्याभोवती आणि कंबरेभोवती गुंडाळून ते कसेबसे विमानात नेले आणि विमानाने पूर्ण उंची गाठल्यानंतर आंतला गारवा वाढायला लागला तेंव्हा ते अंगावर चढवले. नेवार्कला पहाटेच्या वेळेला विमान पोचले तेंव्हा तिथले तापमान शून्य अंशाच्या आसपास होते. त्यामुळे गरम कपडे घालूनसुध्दा थोडी थंडी वाजत होती. निदान दहा तरी 'कटिंग' मावतील एवढ्या जंबो ग्लासात चहा घेऊन तो घोटघोटभर घशाखाली उतरवला तेंव्हा अंगात जराशी ऊब आली. अॅटलांटाला पोचलो तेंव्हा तिथले हवामान मात्र सुखद होते, पण न्यूयॉर्क आणि त्याहून उत्तरेच्या भागातली थंडी वाढतच जाणार असल्यामे तो भाग लगेच पाहून घ्यायचे ठरले होते. त्यामुले दोन दिवस अॅटलांटाला राहून जेटलॅग थोडा घालवला आणि आम्ही पुन्हा नेवार्क गांठले.

अॅटलांटा ते नेवार्क हा प्रवास जवळजवळ मुंबई ते कोलकाता एवढा असेल. त्यामुळे आम्ही एवीतेवी नेवार्कला उतरलेलो असतांना दोन दिवसांसाठी अॅटलांटाला जाून परत यायची काय गरज होती असे कोणालाही वाटेल. त्यापेक्षा न्यूजर्सीमध्येच राहून आधी तिकडला भाग पाहून अॅटलांटाला गेलो असतो तर वेळ, कष्ट आणि पैसे या सर्वांची बचत झाली असती असे पोक्त विचार मीसुध्दा पूर्वी केला असता. पण आता काळाबरोबरच काळ, काम, वेगाची गणिते सुध्दा बदलली आहेत. नेवार्कहून अॅटलांटाला जाण्यात आणि परत येण्यात दोन दिवस गेले होते खरे, पण आता माझ्याकडे भरपूर रिकामा वेळ असल्यामुळे तो वेळ वाया गेला असे न वाटता तो मजेत गेला असे वाटले. विमानाचा प्रवास आरामदायी झाला असल्यामुळे इतक्या वेळात घरी कांही काम करण्यात किंवा हिंडण्याफिरण्यात जेवढे शारीरिक कष्ट पडले असते तेवढेसुध्दा त्या प्रवासात पडले नाहीत. अमेरिकेतल्या मुक्कामासाठी भारतातून भरून आणलेल्या सर्व बॅगा बरोबर घेऊन हिंडण्यात मात्र नक्कीच जास्त मेहनत करावी लागली असती. राहता राहिला खर्चाचा मुद्दा. आजकाल विमानाच्या तिकीटांचे भाव शेअरबाजाराप्रमाणे वरखाली होत असतात. खूप आधीपासून तिकीटे काढून ठेवली असतील तर ते त्यातल्या त्यात स्वस्तात पडते. त्यानुसार आम्ही चारपांच महिन्यापूर्वी बुक केलेले मुंबई ते अॅटलांटापर्यंतचे तिकीट आणि महिनाभरापूर्वी काढलेले अॅटलांटा ते नेवार्क आणि वापसीचे तिकीट यांची एकंदर किंमत त्या वेळी मुंबई पासून फक्त नेवार्कपर्यंतच जितके भाडे पडले असते त्यापेक्षा कमी पडले होते. या व्यवहारात एकंदरीत फायदा झाला म्हणून आपली पाठ थोपटून देखील घेतली. त्याशिवाय अॅटलांटानिवासी कुटुंबियांना भेटण्याची आस लागलेली होती, इकडून नेलेले त्यांच्या खास आवडीचे खाद्यपदार्थ शिळे होण्याच्या आत त्यांना खाऊ घालायचे होते, अशी इतर अनेक कारणे थेट त्यांच्याकडे जाण्यामागे होतीच.

चार दिवस फिरतांना लागतील एवढे जरूरीपुरते कपडे लहानशा बॅगेत घेऊन आम्ही भ्रमंतीला निघालो. अमेरिकेतल्या विमानतळावर कोणालाही प्रवेश करायला मुभा असते आणि सिक्यूरिटी चेकपॉइंटपर्यंत बेलाशक जाता येते. त्यासाठी तिकीट वगैरे काढावे लागत नाही. सुरक्षा तपासणी मात्र जरा कडकच असते. त्यासाठी खिशातल्या एकूण एक वस्तू तर बाहेर काढाव्या लागतातच, शिवाय डोक्यावरची कॅप, अंगातले जॅकेट, कंबरेचा पट्टा, पायातले बूट, मंगळसूत्रासकट अंगावर असतील नसतील ते सर्व दागीने वगैरेसुध्दा काढून ते एका ट्रेमध्ये ठेवावे लागतात. अमेरिकेतल्या नियमांनुसार हँडबॅगेजमध्ये काय काय न्यायची परवानगी आहे आणि कुठल्या वस्तू नेण्याला मनाई आहे हे नीट माहीत नसल्यामुळे आम्ही आपल्या हातातल्या बॅगा सरळ चेकइन करून टाकल्या आणि हात हलवत विमानात जाऊन बसणार होतो. विमानात बसण्याच्या दहा मिनिटे आधीच विमानात कांही खायला प्यायला मिळणार नाही अशी घोषणा झाल्यामुळे प्रवासात सोबत अन्न असावे ही जुन्या काळातली शिकवण आठवली आणि समोरच्या स्टॉलवरून बरेच खाद्यपदार्थ पॅक करून आणले. ही घोषणा कदाचित त्या दुकानदारांनी प्रायोजित केलेली असावी. कारण विमानप्रवास अगदीच निर्जळी उपासाचा नव्हता. निरनिराळी ऊष्ण आणि शीत पेये घेऊन एक ट्रॉली फिरवली गेली आणि ज्याला जे पेय हवे असेल ते दिले गेले. त्याबरोबर तोंड चाळवण्यासाठी इवल्याशा पाकिटात कांही तरी देत होते. त्यांची अमेरिकन अॅक्सेंटमध्ये उच्चारलेली इंग्रजी नांवे कांही मला समजली नाहीत. त्यामुळे त्यातले काय पाहिजे हे सांगायला माझी पंचाईत झाली. कशाचेच नांव न घेता "त्या दोन्ही मिळतील कां ?" असे विचारताच त्या दोन्ही पुरचुंड्या मिळाल्या. त्यातल्या एकीत रुपयाच्या नाण्याएवढ्या आकाराची दोन क्रॅकर बिस्किटे होती आणि दुसरीत मोजून दहा बारा भाजलेले शेंगदाणे होते. आम्ही घरातून निघतांना पोटभर नाश्ता हाणून घेतला असल्यामुळे भूक लागली नाहीच. विमानात दिलेल्या खाद्यपेयांच्या सोबतीला विकत घेतलेले थोडे वेफर्स आणि कुरकुरे खाऊन टाइम पास केला. बाकीचे पदार्थ घरीच न्यावे लागले.

अमेरिकेतल्या विमानतळांच्या प्रवेशद्वारातून जसे कोणालाही आंत जाता येते तसेच प्रवाशांनी बाहेर पडण्याच्या मार्गानेसुध्दा बाहेरून आंत जाता येते. आम्ही नेवार्कला उतरून बॅगेज कलेक्शनच्या बेल्टपाशी आलो तो आम्हाला घेण्यासाठी आलेला सौरभ तिथे येऊन उभा होता. त्याच्या गाडीत बसून घरी जायला निघालो. त्या दिवशी त्याचे जीपीएसचे यंत्र कांचेच्या आंतल्या बाजूला चिकटून बसायलाच तयार नव्हते, ते सारखे खाली घसरत होते, त्यामुळे मी ते हातात धरून बसलो. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर निरनिराळ्या दिशांना जाणा-या वाटा फुटल्या. जाणारे व येणारे रस्ते एकमेकांना न भेटताच उड्डाणपुलावरून किंवा लहानशा बोगद्यातून एकमेकांना पार करत होते. अजस्त्र अशा रस्त्यांचे एवढे मोठे जाळे बांधणा-यांचे जास्त कौतुक करावे की त्या जंजाळातून नेमकी आपली वाट शोधून देणा-या त्या इवल्याशा मार्गदर्शकाचे (जीपीएसचे) करावे याचा संभ्रम मला पडत होता. विमानतळाहून निघाल्या नंतर वाटेत कोठल्याही नाक्यावर क्षणभरही न थांबता सलगपणे वीस पंचवीस मिनिटे गाडी चालवून आम्ही घरी पोचलो.

विमानतळावर बसल्या बसल्या क्षितिजापर्यंत जितके दृष्य समोर दिसत होते त्यात गगनचुंबी इमारतींचे जंगलही नव्हते किंवा हिरवी गार नैसर्गिक वृक्षराई किंवा विस्तीर्ण पसरलेली सपाट शेतजमीनही नव्हती. न्यूजर्सीच्या पहिल्या दर्शनात त्याचे स्वरूप कांही समजले नाही. घरी पोचेपर्यंत वाटेत बहुतेक रस्त्यांच्या दुतर्फा रांगेत लावलेल्या उंच झाडांची मानवनिर्मित वनराई होती. अधून मधून कांही इमारती, चर्चेस, दुकाने, हॉटेले, मैदाने वगैरे दिसली, पण आपण एका महानगरातून जात आहोत असे मुळीच वाटले नाही. घरी गेल्यावर मी सौरभला विचारले, "न्यूजर्सी विमानतळाच्या पलीकडल्या बाजूला आहे कां?" त्यावर तो म्हणाला, "कां? आपण आतासुध्दा न्यूजर्सीमध्येच आहोत."
"पण मला तर मोठ्या शहरात आपण आल्यासारखे कुठे वाटलेच नाही." मी म्हणालो.
"न्यूजर्सी हे इकडल्या स्टेटचे नांव आहे." सौरभ.=
न्यूजर्सीला प्रत्यक्ष जाऊन पोचल्यानंतर माझ्या डोक्यात पहिल्यांदा प्रकाश पडत होता.

न्यू जर्सी (उत्तरार्ध)

June 19, 2009


मी म्हंटले, "ओके, न्यूजर्सी हे एक शहर आहे आणि नेवार्क हे इथल्या एअरपोर्टचं नांव आहे अशी माझी समजूत होती. पण न्यूजर्सी हे स्टेटचे नांव आहे तर नेवार्क काय आहे?"
"ओह, नेवार्क हे एक शहर आहे आणि लिबर्टी इंटरनॅशनल हे तिथल्या एअरपोर्टचे नांव आहे, पण ते जेएफकेएवढे विशेष प्रचलित नाही." सौरभने माहिती दिली.
"तुमचं हे पारसिपानी म्हणजे न्यूजर्सी शहराचे उपनगर असेल असेही मला वाटले होते." माझी आणखी एक शंका मी व्यक्त केली.
"पारसिपानी हे एक स्वतंत्र शहर आहे आणि ते न्यूजर्सीमध्येच येते, पण नेवार्कशी त्याचा कांही संबंध नाही."
माझ्या अज्ञानाचे पापुद्रे निघत गेले. बरेच वेळा ऐकीव माहितीचे असेच होते याचा मला अनुभव आहे. कांही लोक मात्र कुठेतरी कांहीतरी अर्धवट ऐकलेल्याच्या आधारावर ठामठोक विधाने करत असतात आणि ती बरोबरच आहेत म्हणून वाद घालतात तेंव्हा ऐकतांना मजा येते.
"तुमच्या पारसिपानीत मुसोलिनी, मार्कोनी यासारख्या इटालियन लोकांची वस्ती आहे कां?" मी गंमतीने विचारले.
त्याच अंदाजात त्याने उत्तर दिले, "इटालियन आहेत की नाहीत ते माहीत नाही, पण लाखानी, अंबानी यासारखे गुजुभाई मात्र भरपूर आहेत, थोडे अडवानी गिडवानीसुध्दा आहेत."त्यांच्या भागात अनिवासी भारतीयांचे (एनआरआयचे) वास्तव्य मोठ्या संख्येने आहे. कांही मराठी लोकसुध्दा आहेत, पण सर्वाधिक संख्या तेलुगूभाषिकांची आहे. शहरातून फिरतांनादेखील शहा, पटेल, भाटिया वगैरे नांवांच्या पाट्या बंगल्यांवर आणि दुकानांवर दिसत होत्या. ही मंडळी पूर्वीच येऊन इथे स्थायिक झाली होती आणि त्यांनी तिथे मालमत्ता संपादन केली होती. पूर्वीच्या पिढीत आलेले जास्त करून गुजराथी आणि नव्या पिढीतले अधिकांश आंध्रवासी असेच प्रमाण मी अल्फारेटालासुध्दा पाहिले.

दुपारचा चहा घेऊन शहरात भटकायला बाहेर पडलो तेंव्हा हवेत गारवा असला तरी वातावरण प्रसन्न होते. पण हे हवामान आता थोडेच दिवस असे राहणार होते. थंडी वाढून हिमवर्षाव सुरू झाला आणि दिवस लवकर मावळून अंधार पडायला लागला की संध्याकाळी असे मजेत फिरायला मिळणार नव्हते. म्हणूनच मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडलेले दिसले. त्यात पुन्हा भारतीय वंशाचेच खूप दिसले. अमेरिकन लोकांना पायी चालावे असे कधी वाटले तर ते आता बहुधा मोटारीत बसून जिममध्ये जातात आणि ट्रेडमिलवर वर्कआउट करतात, किंवा त्यासाठी घरातल्या एकाद्या खोलीत त्यांनी सगळ्या प्रकारची यंत्रे आणून ठेवली असतील. महानगरांमध्ये आपली गाडी पार्किंग लॉटमध्ये ठेवून कामाच्या जागेकडे तरातरा चालत जाणारे लोक दिसतात, पण मनात कसलाही उद्देश नसतांना रस्त्यातून केवळ रमतगमत फिरण्यातला आनंद बहुतेक भारतीयांनाच अनुभवता येत असावा. त्यात कांही मराठी माणसेसुध्दा दिसली, पण आता त्याचे एवढे अप्रूप वाटत नाही. त्यातून आम्ही त्या जागी चार दिवस राहणार असतो तर ती वेगळी गोष्ट होती, पण आम्हाला दुसरे दिवशीच निघायचे होते. पुन्हा कधी आम्ही अमेरिकेत आलो, त्यावेळी पारसीपानीला जवळचे कोणी रहात असले आणि त्यांना भेटायचे ठरले तर पुन्हा त्या गांवी येण्याची संभावना होती, ती अर्थातच कमीच होती. कदाचित आम्हाला दिसलेली मराठी मंडळीसुध्दा अशीच एकदोन दिवसांसाठी तिथे आलेली असतील आणि त्यांनी असाच विचार केला असेल, त्यामुळे त्यातल्या कोणांबरोबर संवाद साधला गेला नाही.

पारसीपानी हे एक टुमदार म्हणावे असे शहर आहे. एवढ्या आकाराची जवळ जवळ शंभर शहरे फक्त न्यू जर्सीतच आहेत आणि न्यू जर्सी तर यूएसएच्या नकाशात नीट दिसतसुध्दा नाही, इतके लहान राज्य आहे. यावरून कल्पना येईल, असे असले तरी सर्व प्रकारच्या सुखसोयी तिथे उपलब्ध आहेत. मोठ्या शहरांमध्ये जास्तीत जास्त एफएसआय मिळवण्यासाठी आजकाल कदाचित सरळसोट चौकोनी इमारती उभ्या केल्या जात असाव्यात. लहान लहान गांवात मात्र आता फार सुरेख बंगले पहायला मिळतात. भारतात मैसूरला मला असाच अनुभव आला होता. पारसीपानीलासुध्दा कांही बंगल्याच्या वास्तू अत्यंत प्रेक्षणीय वाटल्या. गांवात अमेरिकन पध्दतीची अनेक दुकाने होती, त-हेत-हेची हॉटेले होती, त्यात चिनी तर होतीच, एक भारतीयसुध्दा होते. अनेक घरांच्या माथ्यावर किंवा समोर अमेरिकेचे राष्ट्रध्वज लावलेले होते. कांही ठिकाणी न्यू जर्सी संस्थानाचा वेगळा ध्वजसुध्दा लावलेला दिसला. ही सारी खाजगी मालमत्ता होती, सरकारी कार्यालये नव्हती. त्यामुळे त्याचे नवल वाटले. अमेरिकेत झेंडा लावण्याचे वेगळेच प्रस्थ आहे. अमेरिकेच्या झेंड्यातले स्टार अँड स्ट्राइप्स रंगवलेल्या असंख्य प्रकारच्या वस्तू आणि कपडे बाजारात मिळतात, लोक ते विकत घेता त आणि हवे तसे वापरतात. त्यामुळे त्या ध्वजाचा अवमान होत नाही किंवा कोणाच्या नाजुक भावना त्यात दुखावल्या जात नाहीत.

पारसीपानीला एक विस्तीर्ण तलाव आहे. तलावाच्या काठाकाठाने फिरण्यासाठी छानसा रस्ता बांधला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत त्यात नौकाविहार करता येतो, मासे पकडायची व्यवस्था सुध्दा आहे. हिंवाळा सुरू झाल्यामुळे माणसांसाठी त्या बंद झाल्या होत्या, पण करकोच्यासारखा एक उंच मानेचा पक्षी ध्यान धरून उभा होता. आमच्यासमोर त्याला मत्स्यप्राप्ती झालेली दिसली नाही. आमची चाहूल लागताच तो भुर्रकन दूर उडून गेला. त्या भागात इतर जलाशयसुध्दा आहेत. पारसीपानी शहराच्या जवळच पाण्याची एक प्रचंड टाकी बांधलेली आहे. त्यातून बहुधा आजूबाजूच्या गांवांनासुध्दा पाणीपुरवठा होत असेल. तो टँक अमक्या नांवाच्या मेयरने बांधला असे त्या टाकीच्या भिंतीवर चांगल्या हातभर उंच अशा मोठमोठ्या ठळक आणि बटबटीत अक्षरात लिहिलेले वाचून मजा वाटली. बाजूच्या रस्त्यावरून सुसाट वेगाने धांवणा-या गाडीतील लोकांनासुध्दा वाचता यावे यासाठी ही योजना असावी. प्रसिध्दी मिळवण्याचा केवढा सोस ?

न्यू जर्सीहून परत आल्यानंतर त्या भागासंबंधी थोडीशी माहिती गुगलवरून काढली. न्यूयॉर्क हे महानगर त्याच नांवाच्या राज्याच्या आग्नेयेकडील अगदी टोकावर आहे. त्याला अगदी खेटून न्यू जर्सी हे एक वेगळे चिमुकले संस्थान आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्याचा पार सत्तेचाळीसाव्वा क्रमांक लागतो. अमेरिकेच्या नकाशात ते शोधून काढावे लागते. लोकसंख्येच्या बाबतीत मात्र त्याचा सातवा क्रमांक लागतो. अर्थातच हा तुलनेने दाट वस्तीचा प्रदेश आहे. नेवार्कपासून पारसीपानीपर्यंत आणि पारसीपानीपासून न्यूयॉर्कपर्यंत जेवढ्या भागात आम्ही फिरलो त्यात कोठेच अवाढव्य शेते किंवा घनदाट वृक्षराईने नटलेली जंगले दिसली नाहीत. कुठे दाट तर कुठे विरळ अशी मनुष्यवस्तीच जवळजवळ सलगपणे सगळीकडे दिसत होती. अधून मधून अमक्या शहराची हद्द इथे संपते आणि तमक्या शहराची हद्द सुरू होते अशा पाट्या वाचून आपण एका गांवातून दुस-या गांवात प्रवेश केला असे समजायचे. आपल्याकडील जिल्ह्याहून लहान आणि साधारणपणे तालुक्याएवढ्या आकाराच्या भूभागाला तिकडे काउंटी म्हणतात. न्यूयॉर्कच्या पश्चिमेकडे ईसेक्स कौंटीमध्ये नेवार्क शहर आहे. त्याच्या पलीकडे मॉरिस नांवाच्या काउंटीमध्ये असलेल्या पारसीपानीला आम्ही गेलो होतो. नेवार्क हे न्यूजर्सीमधले सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असले तरी या संस्थानाची राजधानी पार पश्चिमेकडल्या मर्सर कौंटीमध्ये असलेल्या ट्रेंटन या लहान शहरी आहे. हडसन कौंटीमधले जर्सी सिटी हे मोठे शहर तर न्यूयॉर्कचाच भाग वाटावा इतके त्याला जोडून आहे. सुप्रसिध्द स्वातंत्र्यदेवीचा पुतळा न्यूयॉर्कला आहे असले म्हंटले जात असले तरी तो ज्या द्वीपावर आहे ते लहानसे बेट न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या दोन्ही राज्यांच्या किना-यांपासून अगदी जवळ आहे. त्या बेटावरून पाहिल्यास न्यूयॉर्कचा मॅनहॅटन भाग आणि जर्सी सिटी बाजूबाजूला दिसतात, त्यामुळे दोन्ही ठिकाणच्य़ा लोकांना त्या पुतळ्याबद्दल आत्मीयता आहे. नकाशात पाहिले तर न्यूयॉर्क शहराचा कांही भाग न्यूजर्सी स्टेटने वेढलेला दिसतो, तर जर्सी सिटी न्यूयॉर्क स्टेटचा भाग वाटते. या भागाच्या राज्यपुनर्रचनेचा विचार कोणी केला नसावा.


Friday, June 19, 2009

पाऊले चालती पंढरीची वाट



या वर्षीच्या आषाढीच्या वारीची सुरुवात करण्यासाठी भक्तगण देहू व आळंदीला जमा झाले असल्याची बातमी आली आहे. आता त्यांच्या दिंड्यांच्या मार्गक्रमणाचा वृत्तांत 'आँखो देखा हाल'च्या थाटात पुढील पंधरवडाभर सर्व प्रसिध्दीमाध्यमांत येत राहील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर शेजारच्या कर्नाटकांतूनसुध्दा लक्षावधी भाविक पायी चालत पंढरपूरपर्यंत जातील. त्यातल्या अनेकांची ही पदयात्रा सुरू झालेलीही असेल. कांही लोक आपापल्या कुवतीनुसार त्यात थोडा काळ सहभाग घेऊन मिळेल तेवढा आनंदानुभव घेतील व पुण्य गांठीला बांधतील. हे सगळे संपूर्णपणे स्वेच्छापूर्वक चालत आले आहे. या साऱ्यांमागे प्रेरणेचा कुठला श्रोत असतो?

पंढरीच्या विठ्ठलाचे गुणगान आणि स्तुती करणारे शेकडो अभंग संतश्रेष्ठांनी लिहिले आहेत आणि भजनाच्या परंपरेतून ते आजही वारकऱ्यांच्या ओठावर आहेत. त्यामधील कांही अभंगांना आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांनी चाली लावल्या आणि लोकप्रिय गायक गायिकांनी आपल्या गोड गळ्यातून गाऊन ते आपल्या घराघरापर्यंत पोचवले. सार्वजनिक भजनाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये एक भक्त अभंग 'सांगतो', म्हणजे त्यातील एक एक ओळ टाळ व मृदुंगाच्या भजनी ठेक्यावर गातो आणि बाकीचे सर्व टाळकरी ती ओळ तशाच चालीने समूहाने गातात. यामुळे भजनामधील सर्व अभंग त्यांच्या मुखातून वदले जातात. अशा प्रकारे वारंवार ऐकण्या व गाण्यामुळे हळूहळू त्यांना ते अभंग पाठ होतात. त्याचप्रमाणे त्यातील भावसुद्धा त्यांच्या मनाला जाऊन भिडणारच. संत ज्ञानेश्वरांच्या एका अभंगामध्ये त्यांनी आपल्या मनामधील उत्कट इच्छा व्यक्त केली आहे. खाली दिलेल्या अशा अभंगांतून पांडुरंगाच्या मूर्तीच्या प्रत्यक्ष दर्शनाची आस लागल्यामुळेच हे सारे वारकरी आपली घरदारे सोडून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीत सामील होत असतील कां?

माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी ।।
पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधले ।।
जागृत स्वप्न सुषुप्त नाठवे। पाहता रूप आनंद साठवे ।।
बाप रखुमादेवीवरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खूण ।।

होकार आणि नकार अशी दोन्ही उत्तरे या प्रश्नाला देता येतील. हो, आस तर लागलेली असतेच, पण सर्वच  वारकऱ्यांच्या मनातली  इच्छा पूर्ण होतेच का? याचे उत्तर  नाही असे द्यावे लागेल. आषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाप्रचंड रांगा लागतात. त्यात दहा बारा तास उपाशी तापाशी उभे राहून वाट पाहण्याची तपश्चर्या केल्यानंतर विठोबाच्या पायावर क्षणभर डोके टेकवण्याची संधी मिळते. त्या दिवशी पंढरपूरला गेलेल्या लक्षावधी भाविकांच्या मनात ही इच्छा असणार यात शंका नाही. पण त्यांमधील किती वारकरी हे दर्शन घेऊ शकतील हे थोडेसे गणित केले तर लक्षात येईल. अगदी दर सेकंदाला एक एवढ्या भरभर हे वारकरी पुढे सरकत राहिले असे धरले तरी तासाभरामध्ये ३६०० जणांचा नंबर लागेल. पहाटेच्या काकड आरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंतच्या कालात मधील पूजाअर्चांना लागणारा वेळ सोडून उरलेल्या वेळेत फार फार तर चाळीस ते पन्नास हजार भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाचे सुख प्राप्त होऊ शकेल. म्हणजे राहिलेले ऐंशी नव्वद टक्के भक्त ते घेऊ शकत नाहीत. हे त्यांना आधीपासून ठाऊक असते. त्यांच्यामधील बहुतेकजण विठोबाच्या देवालयाच्या शिखराचे किंवा पायरीचे दर्शन घेऊनच माघारी जातात. कांही थोडे लोक पुढे चार पांच दिवस तिथला मुक्काम वाढवून गर्दी कमी झाल्यानंतर देवदर्शन करून घेतात. मात्र प्रत्येक वारकऱ्याने आपल्यासोबत विठ्ठलाची प्रतिमा आणलेली असते. दिवसातून वेळोवेळी तिचे दर्शन घेऊन ते प्रार्थना करत असतात.

असे जर असेल तर त्या भाविकांना ते घरी बसूनसुद्धा करता आले असते. त्यासाठी एवढे कष्ट घेऊन उन्हातान्हातून आणि भर पावसातून पंढरपूरपर्यंत पायी चालत जाण्याची काय गरज आहे असे कोणाला वाटेल. त्यामागे अर्थातच इतर कांही सबळ कारणे असली पाहिजेत. एक तर परंपरेनुसार दरवर्षी वारी करायची हे ठरून गेलेले असते. एकदा गळ्यात तुळशीची माळ घातली की हे कमिटमेंट पाळावे लागते. दुसरे कारण म्हणजे आपण देवासाठी कांही करतो आहोत या भावनेमध्ये एक प्रकारचे समाधान मिळते. महात्माजींनी सांगितल्याप्रमाणे त्यागाविना भक्तीला अर्थ नसतो. आपण देवासाठी कष्ट घेतले तर देव आपली पूर्ण काळजी घेईल अशी श्रद्धा भक्तांच्या मनात असते. मनापासून केलेल्या शारीरिक श्रमाचे त्यांना कांही वाटत नाही. पर्वतांवर ट्रेकवर जाणारे लोक असेच कष्ट करतात ते कशासाठी? त्यातून त्यांना समाधान मिळते म्हणूनच ना? तिसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भाविकांच्या दृष्टीने तो एक अविस्मरणीय असा सुखद अनुभव असतो. आजकालच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे आपण सतत जगाच्या संपर्कात राहतो. पण पूर्वीच्या काळात एकदा दिंडीबरोबर घर सोडले की परत येईपर्यंत रोजच्या सगळ्या विवंचनापासून मुक्त होऊन दिवसरात्र परमेश्वराचे नामस्मरण आणि संतांचा सहवास यात एका वेगळ्या सात्विक वातावरणात राहण्याचा एक आगळा अनुभव त्यांना मिळत असे. त्यामुळे दत्ता पाटील यांनी लिहिलेल्या आणि प्रल्हाद शिंदे यांनी गायिलेल्या खालील गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे आषाढी कार्तिकीच्या वारीचे दिवस आले की वारकऱ्यांची पावले आपोआप पंढरीच्या दिशेने पडू लागतात.

पाऊले चालती पंढरीची वाट । सुखी संसाराची सोडूनीया गाठ।।
गांजूनी भारी दु:ख दारिद्र्याने । करी ताणताण भाकरीचे ताट ।।
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा । अशा दारिद्र्याचा होई नायनाट ।।
मनशांत होता पुन्हा लागे ओढ । दत्ता मांडी गोड अंतराचा थाट ।।
पाऊले चालती पंढरीची वाट ।।

Friday, June 12, 2009

अडला हरी

'अडला नारायण' किंवा 'अडला हरी गाढवाचे पाय धरी' ही म्हण मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. अत्यंत बिकट अवस्था आली तर मानापमान किंवा सदसद्विचार थोडा बाजूला ठेऊन कोणाचेही पाय धरायची वेळ येते असा या म्हणीचा अर्थ आहे असे मी आतापर्यंत समजत आलो आहे. या म्हणीचा एक वेगळाच अर्थ लावून त्यावरून एक अजब तर्कट काढल्याचे एका लेखात वाचले, त्यामुळे या म्हणीची थोडी चिरफाड या लेखात करावी असे वाटले.

हरी आणि गाढव या दोन व्यक्ती आणि अडणे व पाय धरणे या क्रिया धरल्या तर त्यापासून अनेक शक्यता संभवतात.
१. हा हरी नेहमीच अडलेला असतो आणि गाढवाचे पाय धरून बसलेला असतो.
२. जेंव्हा जेंव्हा हरी अडतो तेंव्हा थेट गाढवाकडे जाऊन त्याचे पाय धरतो.
३. ज्या कोणाचे पाय हरी धरेल तो गाढवच असतो.
४. अडल्यानंतर हरी कोणाचेही पाय धरतो, कधी कधी ते पाय गाढवाचे असतात.
५. तातडीच्या मदतीची गरज असते आणि त्या वेळी इतर कोणाचीही मदत मिळत नाही, तेंव्हाच हरी ख-या अर्थाने 'अडतो' आणि निरुपाय झाल्यामुळे गाढवाचे पाय धरायला तयार होतो किंवा ते धरतो.
अशा प्रकारच्या अधिक शक्यता सांगता येतील. पण माझ्या मते यातली फक्त ५ क्रमांकाची शक्यता या म्हणीशी सुसंगत आहे. इतर सर्व शक्यतांचा या म्हणीच्या संबंधात विचार करण्याचे कारण नाही.

प्रामुख्याने माणसांच्या जगात हरीच्या सोबतीला नारायणही असेल तसेच अनेक गाढवेही असतील हे लक्षात घेतले तर इतर असंख्य शक्यता निर्माण होतात. उदाहरणार्थ:
१. हरी नारायणाचे पाय धरेल.
२. एक गाढव दुस-या गाढवाचे किंवा माणसाचे किंवा हरीचे पाय धरेल.
३. भाविक माणूस अडलेला नसतांनासुध्दा नेहमीच हरी- नारायण यांचे पाय धरेल आणि "सुखमे सुमिरन ज्यों करे तो दुख काहे होय?" या कबीराच्या वाणीनुसार दुःखमुक्त होईल.
४. "मी एक वेळ गाढवाचे पाय धरेन, पण नारायणाचे नांवसुध्दा घेणार नाही." असे पक्का नास्तिक म्हणेल.
५. कोणीच कोणाचेच पाय धरणार नाही.
अशा प्रकारच्या शक्यता अपरंपार आहेत, पण त्यासुध्दा या म्हणीच्या कक्षेच्या बाहेर आहेत. कुंपणावर बसलेली माणसे अडचणीचा काळ आल्यावर देवाचे स्मरण करून त्याचा धांवा करतात, पण त्यांना देवावर भरोसा नसतो. त्यामुळे ते एकादा तांत्रिक, मांत्रिक, ज्योतिशी, बुवा, बाबा, फकीर, हस्तसामुद्रिक, न्यूमरॉलॉजिस्ट, टॅरॉटरीडर, क्रिस्टलगेझर, नाडीवाला, पोपटवाला अशा 'सिध्दीप्राप्त' किंवा 'चमत्कारी' माणसाकडे धांव घेतात. त्यांच्या बाबतीत "अडला माणूस लबाड कोल्ह्याचे पाय धरी" अशी नवी म्हण काढायला हरकत नाही!
"अडला हरी गाढवाचे पाय धरी... पण याचा अर्थ असा नाही ही, शंभर टक्के प्रसंगांत अडलेला, अडचणीतला माणूस फक्त मुर्ख व्यक्तीचेच पाय फक्त धरेल? खरोखर चांगला माणुससुद्धा त्याला मदत करू शकतोच की!" असे एक अफलातून विधान या लेखात केले आहे. कठीण प्रसंगी सज्जन माणसे नेहमीच मदतीला येतात, हा त्यांचा धर्मच आहे, त्यासाठी त्यांचे पाय धरावे लागत नाहीत. ऐनवेळी एकादा माणूस न बोलावतासुध्दा देवासारखा धांवत येऊन मदत करतो असे दिसते. हे चांगले लोक वरील म्हणीला अपवाद आहेत असे म्हणता येणार नाही. 'अडला हरी गाढवाचे पाय धरी' याचा अर्थ तो नेहमी गाढवाचे आणि फक्त गाढवाचेच पाय धरतो असा मुळीच होत नाही. गाढवाचे पाय धरल्यामुळे त्याच्या मार्गातला अडसर दूर होतो असे आश्वासनसुध्दा या म्हणीत नाही. उलट गाढवाकडून लत्ताप्रहार होण्याची शक्यताच दांडगी असते. त्यामुळे गाढवाचे पाय धरणे ही नित्याच्या जीवनातली बाब नाही.
एकाद्या बिकट प्रसंगी इतर सर्व उपाय संपलेले असतात, दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो, अशा वेळी अपाय होण्याचा धोका पत्करूनसुध्दा मदतीची किंचित आशा बाळगून एकादा माणूस अपात्र माणसाला शरण जातो अशा अपवादास्पद प्रसंगाचे उदाहरण या म्हणीद्वारे दिले आहे. हरी किंवा नारायण हे देव आहेत, त्यामुळे ते माणसापेक्षा श्रेष्ठ समजले जातात, तर गाढव हे एक निर्बुध्द, निष्क्रिय आणि निकृष्ट जनावर गणले जाते. त्यामुळे सर्वात उच्च पातळीवरील हरी सर्वात खालच्या पातळीवरील गाढवाच्या पायाशी लोळण घेतो ही त्याच्या अगतिकतेची परमावधी असते. अशा प्रकारच्या टोकाच्या अगतिकतेचे उदाहरण या म्हणीद्वारे दिलेले आहे. त्याचा उपयोग बारीक सारीक अडचणींसाठी सर्रास केला जात असल्यामुळे त्याची तीव्रता आता कमी झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रहसनांमध्ये ज्याला गाढव म्हणायचे असेल त्याचे पाय धरले जातात. या म्हणीच्या अशा वापरामुळे ती थोडी गुळगुळीत झाली आहे एवढेच.
भगवान हरीने अडल्याप्रसंगी कोणा गाढवाचे पाय धरल्याचे सुरस आख्यान एकाद्या गर्दभपुराणात किंवा खरोपनिषदात कदाचित असलेच तरी ते कधी माझ्या ऐकण्यात आलेले नाही. त्यामुळे या म्हणीचा उद्भव कसा झाला हे मला माहीत नाही. आपल्या भाषातज्ज्ञ मित्रांनी यावर प्रकाश पाडावा अशी त्यांना विनंती आहे.

Thursday, June 11, 2009

परतलो मातृभूमीला

मला पहिल्यापासूनच प्रवासाची आवड आहे. प्रवास करण्यात मला कसलाही त्रास वाटत नाही किंवा कधी कंटाळा येत नाही अशा नकारार्थी कारणांमुळे नव्हे तर त्यात पहायला मिळणारी अनुपम दृष्ये, कानावर पडणारे मंजुळ ध्वनी, चाखायला मिळणारे चविष्ट खाद्यपदार्थ, भेटणारी वेगवेगळी माणसे आणि निरनिराळ्या वातावरणात रहाण्याचा मिळणारा अनुभव या सर्वांमधून जी एक सर्वांगीण अनुभूती होते ती मला सुखावते. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या निमित्याने मी प्रत्येकी कांहीशेहे वेळा परगांवी जाऊन आलो आहे. असे असले तरी नोकरीत असेपर्यंत कधीही सलग दोन तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ बाहेरगांवी जाऊन तिथे राहिलेलो मात्र नव्हतो. मला तशी संधीच मिळाली नसेल असे कोणी म्हणेल, किंवा नाइलाजाने कुठेतरी जाऊन राहण्याची आवश्यकता पडली नसेल असेही कोणी म्हणेल. दोन्हीही कारणे खरीच असतील, तसे घडले नाही एवढे मात्र खरे.

सेवेतून निवृत्त झाल्यानंतर घरी परतण्याची एवढी घाई नसायची आणि त्यासाठी सबळ अशी कारणे देता येत नव्हती त्यामुळे हा कालावधी चार पाच आठवड्यांपर्यंत लांबत गेला. मागच्या वर्षी मुलाला भेटून येण्यासाठी अमेरिकेला जायचे ठरले तेंव्हा त्यासाठी सहा आठवडे एवढा कालावधी माझ्या मनात आला होता. त्यासंबंधी सखोल अभ्यास, विश्लेषण वगैरे करून त्यावर मी कांही फार मोठा विचार केला होता अशातला भाग नव्हता, पण सहा आठवड्याहून जास्त काळ आपण परदेशात राहू शकू की नाही याची मला खात्री वाटत नव्हती. उन्हाळ्यात अमेरिकेतले हवामान अनुकूल असते, त्यामुळे बहुतेक लोक तिकडे जायचे झाल्यास उन्हाळ्यात जाऊन येतात, पण आम्हाला गेल्या वर्षी ते कांही जमले नाही. उद्योग व्यवसायात आलेली जागतिक मंदी आणि अमेरिकेची होत चाललेली पीछेहाट पाहता पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत वाट न पाहता त्याआधीच जाऊन यायचे ठरले. शिवाय उद्या कुणी पाहिला आहे हा एक प्रश्न होताच. घरातला गणेशोत्यव झाल्यानंतर इकडून निघायचे आणि दिवाळी साजरी करून कडाक्याची थंडी सुरू होण्याच्या आधी परतायचे असा माझा बेत होता.

आमच्या चिरंजीवांच्या डोक्यात वेगळे विचारचक्र फिरत होते. आमचे अमेरिकेला जायचे नक्की झाल्यापासून सर्व संबंधित दस्तावेज गोळा करून त्यासाठी लागणारी सरकारी अनुमती मिळवणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रवासाला निघण्यासाठी बांधाबांध करणे यात कित्येक महिन्यांचा काळ लोटला होता. एवढ्या सायासाने अमेरिकेला जाऊन पोचल्यानंतर तिथे सहा महिने राहण्याची परवानगी मिळाली होती तिचा पुरेपूर फायदा आम्ही घेतला पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. तर्कदृष्ट्या ते अगदी बरोबर होतेच आणि तशी त्याची मनापासून इच्छा होती. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे 'पोटापुरता पसा' तो 'देणा-याच्या हांता'ने अगदी घरबसल्या मिळत होता आणि 'पोळी पिकण्या'साठी मी भारतातसुध्दा कसलीच हालचाल करत नव्हतो. अमेरिकेत तर मला कुठलाही कामधंदा करून अर्थार्जन करायला तिकडच्या कायद्याने बंदी होती. तसे झाल्याचे आढळल्यास तडकाफडकी माझी उचलबांगडी करण्यात येईल असा दम मला प्रवेश करण्याची परवानगी देतांनाच भरला गेला होता. माझा तसा इरादाही नव्हता. मी स्वतःला इथल्या कुठल्या समाजकार्यात गुंतवून घेतलेले नव्हते. इथे भारतात राहतांना मी लश्करच्या भाक-या कधी भाजल्या नाहीत तेंव्हा परदेशात जाऊन कुणा परक्यासाठी कांही करायला मी कांही अमेरिकन नव्हतो. त्यामुळे इथे असतांनाही माझा सगळा वेळ स्वतःच्या सुखासाठी आणि आपल्या माणसांसाठी यातच खर्च होत असे आणि ते करणे मला अमेरिकेतसुध्दा शक्य होते. मग भारतात परत जायची घाई कशाला करायची? या युक्तीवादाचा माझ्यापाशी तोड नव्हती.

अमेरिकेतील आमचे वास्तव्य अत्यंत सुखासीन रहावे यासाठी मुलाने चंगच बांधला होता असे दिसत होते. भारतात आमच्या घरात असलेल्या एकूण एक सुखसोयी तिथे उपलब्ध होत्याच, त्या चांगल्या दर्जाच्या असल्यामुळे सहसा त्यात बिघाड उत्पन्न होत नसे. पाणी टंचाई, विजेचे भारनियमन यासारख्या कारणांमुळे त्या कधी बंद ठेवाव्या लागत नसत. यात घरकाम आणि आराम करण्याची साधने आली तसेच करमणुकीचीसुध्दा आली. तिकडच्या टेलीव्हिजनवर शेकडो वाहिन्यांवर चाललेले कार्यक्रम लागायचे, शिवाय दीडशेच्या वर चित्रपट 'ऑन डिमांड' म्हणजे आपल्याला हवे तेंव्हा पाहण्याची सोय होती. भारतात जर आपल्याला पहायचा असलेला चित्रपट टीव्हीवर लागणार असेल तर आधीपासून ठरवून त्या वेळी करायची इतर कामे बाजूला सारून टीव्हीच्या समोर फतकल मारून बसावे लागते आणि दर दहा मिनिटांनी येणा-या जाहिराती पहाव्या लागतात तसे तिथे नव्हते. आपल्या सोयीनुसार आपल्याला हवा तेंव्हा तो पाहता येत असेच, शिवाय वाटल्यास आपणच पॉज बटन दाबून त्यात लंचब्रेक घेऊ शकत होतो. ब्लॉकबस्टर नांवाच्या कंपनीकडून दोन नवीन सिनेमांच्या डीव्हीडी घरपोच येत, त्या पाहून झाल्यानंतर दुकानात देऊन आणखी दोन डीव्हीडी निवडून घ्यायच्या आणि त्या परत केल्या की लगेच आणखी दोन नव्या डीव्हीडी घरी यायच्या अशी व्यवस्था होती. त्यातून नवनव्या तसेच गाजलेल्या जुन्या चित्रपटांचा एक प्रवाहच वहात होता असे म्हणता येईल.

असे असले तरी इतके इंग्रजी पिक्चर्स पाहण्यात आम्हाला रुची नसेल म्हणून हवे तेवढे हिंदी चित्रपट पहायची वेगळी व्यवस्था होती. मुलाने भारतातून जातांनाच अनेक सीडी आणि डीव्हीडी नेल्या होत्या, इतर जाणा-या येणा-यांकडून मागवल्या होत्या, तसेच आमच्याकडील हिंदी आणि मराठी डिस्क आम्ही नेल्या होत्या. अशा प्रकारे घरात जमवून ठेवलेला ब-यापैकी मोठा स्टॉक होताच, त्याशिवाय आता अमेरिकेतसुध्दा हिंदी चित्रपटांच्या डीव्हीडीज विकत किंवा भाड्याने मिळू लागल्या आहेत. मुलाच्या मित्रांच्याकडून कांही मिळाल्या आणि किती तरी सिनेमे चक्क इंटरनेटवर सापडले. यापूर्वी आयुष्यातल्या कुठल्याही तीन महिन्यात, अगदी कॉलेजात असतांनासुध्दा पाहिले नसतील इतके हिंदी, मराठी आणि इंग्रजी सिनेमे मी या वेळी अमेरिकेत पाहून घेतले.

सिनेमा पाहणे हा मनोरंजनाचा एक थोडा जुना झालेला भाग झाला. आज टेलिव्हिजन पाहणे हा एक मनोरंजनाचा भाग न राहता जीवनाचा भाग बनून गेला आहे. आपली आवडती मालिका पाहिल्याखेरीज चैन पडेनासे झाले आहे. पण कांही हरकत नाही. भारतात जे कार्यक्रम पाहण्याची संवय जडली आहे तेसुध्दा वॉच इंडिया नांवाच्या वेबसाइटवर जगभर दाखवले जातात. त्याचेही सभासदत्व घेऊन ठेवले होते. भारतात रात्री प्रक्षेपित होत असलेले कार्यक्रमच आम्ही मुख्यतः पहात असू, पण त्यावेळी अमेरिकेत सकाळ असे एवढा फरक होता. त्यामुळे आपली रोज सकाळी करायची कामे विशिष्ट कार्यक्रमांच्या वेळा पाहून त्यानुसार करीत होतो.

निवृत्तीनंतर रिकामेपणाचा उद्योग म्हणून आणि कांही तरी करीत असल्याचा एक प्रकारचा आनंद प्राप्त करण्यासाठी मी ब्लॉगगिरी सुरू केली आहे. त्यात खंड पडू नये याची संपूर्ण व्यवस्था करून ठेवली होती. अमेरिकेत दुर्लभ असलेली मराठी (देवनागरी) लिपी घरातल्या संगणकावर स्थापित झाली होती. अत्यंत वेगवान असे इंटरनेट कनेक्शन तर चोवीस तास उपलब्ध होतेच. एकाच कॉम्प्यूटरवर टेलिव्हिजन पाहणे आणि लेखन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येणार नाहीत म्हणून चक्क एक वेगळा संगणक घरी आणला.

बहुतेक दर शनिवार रविवार आसपास असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यात जात असे. आता भारतातसुध्दा मॉल संस्कृती आली आहे, तिकडे ती पूर्णपणे विकसित झालेली आहे. त्यामुळे एक एक मोठा मॉल किंवा स्टोअर म्हणजे एक भव्य असे प्रदर्शनच असते. सगळीकडे दिव्यांचा झगमगाट, अत्यंत कलात्मक रीतीने सजवून आणि व्यवस्थित रीतीने मांडून ठेवलेल्या वस्तू पहातांना मजा येते. त्यातले शोभेच्या वस्तू असलेले दालन म्हणजे तर एकादे म्यूजियमच वाटावे इतक्या सुंदर कलाकुसर केलेल्या वस्तू तिथे पहायला मिळतात. त्या दुकानांत कोणीही वाटेल तितका वेळ हिंडावे, कांही तरी विकत घ्यायलाच पाहिजे असा आग्रह नाही. इतक्या छान छान गोष्टी पाहून आपल्यालाच मोह होतो यातच त्यांचे यश असते. दिवसभर भटकंती केल्यानंतर बाहेरची खाद्यंतीही ओघानेच आली. त्यासाठी मेक्सिकन, इटॅलियन ते चिनी आणि थाय प्रकारची भोजनगृहे आहेतच, पण उत्कृष्ट भारतीय भोजन देणारी निदान चार पांच हॉटेले मिळाली.

अशा प्रकारे आमची मजाच मजा चालली असली तरी घरी परतायची एक ओढ लागतेच. शिवाय घरात करता येण्याजोग्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करता आली तरी घराबाहेरचे वातावरण कांही आपल्याला बदलता येत नाही. कडाक्याच्या थंडीशी जमवून घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती आपला हात दाखवते आणि शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्यानंतर तो त्रास सहन करणे सुखावह वाटत नाही. अशा कारणांमुळे मी योजलेले सहा आठवडे आणि मुलाने ठरवलेले सहा महिने म्हणजे सव्वीस आठवडे यातला सोळा हा सुवर्णमध्य अखेर साधला गेला आणि अमेरिकेत गेल्यापासून सोळा आठवड्यांनी आम्ही अमेरिकेचा निरोप घेऊन जानेवारीच्या अखेरीस आम्ही मातृभूमीकडे परत आलो. यादरम्यान तिकडे पाहिलेल्या कांही जागांची वर्णने मी या ब्लॉगवर केलेली आहेत. उरलेले अनुभव हळू हळू सांगत राहणार आहे.

Wednesday, June 10, 2009

तेथे कर माझे जुळती - भाग ३



आयुष्यात आपल्याला अनेक माणसे भेटतात. त्यातली कांही प्रसिध्दीच्या शिखरावर जाऊन पोचतात, कांही आपापल्या क्षेत्रात चांगले नांव कमावतात तर कांही फक्त त्यांच्या परिचयातल्या लोकांनाच माहीत असतात. पण अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचा आपल्यावर कळत नकळत प्रभाव पडत असतो. अशाच कांही व्यक्तींबद्दल मी 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेत लिहायला सुरुवात केली आहे. परमपूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले आणि स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या दोन उत्तुंग व्यक्तींविषयी मी पहिल्या दोन भागात लिहिले होते. त्यांच्या जीवनकार्याबद्दल आजवर अमाप लिहिले गेले आहे, त्यात आणखी भर घालण्याएवढी माझी पात्रता नाही. त्यामुळे त्यांच्या मोठेपणाबद्दल फारसे कांही न लिहिता माझ्या व्यक्तीगत जीवनाच्या वाटेवरील कुठल्या वळणावर योगायोगाने मला त्यांच्याबरोबर कांही क्षण घालवण्याची संधी मिळाली आणि त्याचा माझ्यावर काय परिणाम झाला या मी मनाशी जपून ठेवलेल्या आठवणींबद्दलच लिहिले होते. आज या लेखात मी माझ्या परिचयाच्या एका जवळच्या व्यक्तीबद्दल लिहितांना याच्या नेमके उलट करणार आहे. ते मला कधी, कुठे, किती वेळा आणि किती वेळ भेटले वगैरे व्यक्तीगत स्वरूपाचा मजकूर शक्य तो टाळून त्यांचे जे वेगळेपण मला त्यातून जाणवले तेवढेच या ठिकाणी सांगणार आहे.

योगायोगाने तेसुध्दा पुण्याचे जोशीच आहेत. श्री.प्र.ह.जोशी या नांवाने ते साहित्य, संगीत, नाट्य वगैरे क्षेत्रात सुपरिचित आहेत, आमचे प्रभाकरराव आणि बच्चेकंपनीचे आवडते जोशीकाका. त्यांचे बालपण मुधोळ, बागलकोट वगैरे लहान लहान गांवात गेले. त्या काळी तो भाग त्रिभाषिक मुंबई प्रांताच्या कानडी विभागात होता, राज्यपुनर्रचनेनंतर तो म्हैसूर राज्याला जोडला गेला आणि कालांतराने त्या राज्याचेच नांव बदलून 'कर्नाटक' असे ठेवले गेले. पण तोंपर्यंत प्रभाकरराव उच्च शिक्षण आणि अर्थार्जनासाठी महाराष्ट्रातील कोल्हापुराला आले होते. अधिक चांगली संधी मिळताच ते पुण्याला आले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे पुणे हीच त्यांची मुख्य कर्मभूमी आहे असे म्हणता येईल. त्यांच्याबरोबर माझी ओळख पुण्यातच झाली. त्यांच्या बोलण्याची ढब, शब्दोच्चार आणि बोलण्यात येणारे उल्लेख यावरून मी बरेच दिवस त्यांना कोल्हापूरचे समजत होतो. माझ्याप्रमाणेच ते सुध्दा कानडी मुलुखातून आले आहेत हे मला कालांतराने कळले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात झपाट्याने बदलत गेलेले तिकडचे समाजजीवन आम्ही दोघांनी जवळून आणि डोळसपणे पाहिले होते, त्याशिवाय त्या भागातले रीतीरिवाज, समजुती, वाक्प्रचार, खास खाद्यपदार्थ वगैरे अनेक समान धागे मिळाल्यामुळे आम्हाला संवाद साधायला मदत झाली.

पहिल्या भेटीत एकमेकांची ओळख करून घेतांना शिरस्त्याप्रमाणे आम्ही दोघांनी आपण कुठे काम करतो ते सांगितले. प्रभाकररावांनी सांगितलेल्या संस्थेची आद्याक्षरे ऐकून माझ्या डोक्यात कांहीच प्रकाश पडला नाही. हे पाहून त्यांनी त्यांच्या संस्थेचे पू्र्ण नांव सांगितले. कदाचित मी पुणेकर नसल्यामुळे तरीही मला त्यातून फारसा बोध झाला नाही. ती संस्था संरक्षण खात्याशी संबंधित आहे एवढे समजल्यानंतर मी जास्त चौकशी केली नाही. त्यांनीही मी काय काम करतो ते कधी विचारले नाही. बोलण्यासारखे इतर असंख्य विषय असल्यामुळे एकमेकांच्या ऑफीसमधल्या कामाबद्दल बोलण्याची आम्हाला कधीच गरज पडली नाही. प्रभाकररावांच्या व्यक्तीमत्वाच्या तानपु-यात अगणित तारा आहेत. त्यातली एकादी तार माझ्यातल्या एकाद्या तारेबरोबर जुळायची आणि तिच्या झंकारातून एक प्रकारचा सुसंवाद साधायची असेच नेहमी होत गेले.

संरक्षणखात्यातल्या संस्था नेहमीच मुख्य शहरापासून दूर, सहसा कोणाच्या नजरेला पडू नयेत अशा जागी असतात. प्रभाकररावांचे कार्यस्थळही असेच त्या काळच्या पुण्याच्या विस्तारापासून दूर आडवाटेला होते आणि पेशवाईपासून चालत आलेल्या पुण्यपत्तनाच्या पुरातन भागात ते रहात होते. त्यामुळे ते सकाळी लवकर घरातून निघत आणि परत येईपर्यंत त्यांना बराच उशीर होत असे. या जाण्यायेण्याच्या दगदगीमुळेच सर्वसामान्य माणूस थकून जाईल आणि निवांत फावला वेळ कशाला म्हणतात असा प्रश्न तो विचारेल. प्रभाकररावांच्याकडे मात्र चैतन्याचा एक अखंड वाहणारा श्रोत असावा. नोकरी आणि त्यासाठी जाण्यायेण्याला लागणारा आणि इतर जीवनावश्यक कामांना देण्यात येणारा वेळ आणि श्रम खर्च करून उरलेल्या वेळातला थोडा वेळ ते स्वतःसाठी बाजूला काढून तो साहित्य, संगीत, कला वगैरेंच्या आविष्कारात घालवत. कथा, कविता, विनोद, लेख, संवाद वगैरे विविध प्रकारचे लेखन ते करायचे. त्यांचे हस्ताक्षर मोत्यांसारखे सुरेख आहे. आपल्या लेखनाच्या सुवाच्य आणि सुडौल प्रती काढून ते पुण्यातल्या नियतकालिकांकडे पोंचवत आणि छापून येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करीत. मला हे सगळे अद्भुत वाटत असे. त्यांचे पाहून मलाही चार ओळी लिहायची हुक्की अधून मधून यायची, पण त्या कागदावर उतरेपर्यंत त्यात काना, मात्रा, वेलांट्यांच्या चुका होत असत, अक्षरे किंवा शब्द गाळले जात, किंवा ते बदलावेत असे वाटे आणि त्या खाडाखोडीनंतर तो कागद कोणाला दाखवायला सुध्दा संकोच वाटत असे. असले लिखाण घेऊन एकाद्या अनोळखी माणसाकडे जाण्याचा विचार माझ्या कल्पनेच्या पलीकडचा होता. त्यातूनही एकदा महत्प्रयासाने मी दोन तीन विडंबनात्मक चारोळ्या लिहून पोस्टाने एका जागी पाठवल्या. वर्षदीड वर्षानंतर अचानक त्या कांही मुद्रणदोषांना सोबत घेऊन छापून आल्या, पण त्याच्या खाली माझे आडनांव घाटे असे छापले होते. माझ्या परीने मी लिहिलेली अक्षरे ती वाचणा-याला वेगळी दिसली असतील तर त्यांचा तरी काय दोष म्हणा. पण त्याचे पारिश्रमिकसुध्दा कोणा घाट्यानेच बहुधा परस्पर लाटले असावे. प्रभाकररावांचे साहित्य मात्र कसल्याही ओळखी पाळखीच्या आधाराशिवाय नियमितपणे प्रकाशित होत होते, याचे मला प्रचंड कौतुक वाटत असे.

माझ्या शाळेतल्या ज्या मुलांचे हस्ताक्षर चांगले होते ती मुले पुस्तकांतली चित्रे पाहून ती हुबेहूब तशीच्या तशी त्यांच्या वहीत काढायची. या दोन्ही कामांसाठी हांताच्या बोटांच्या हालचालींवर एकाच प्रकारचे नियंत्रण मिळवावे लागत असणार. पण स्वतंत्र चित्रे काढण्यासाठी ते पुरेसे नाही. त्यासाठी प्रतिभेचे लेणे लागते. व्यंगचित्र काढायचे असेल तर विलक्षण निरीक्षण, मार्मिकता, विनोदबुध्दी वगैरे इतर अनेक गुण त्यासोबत लागतात. प्रभाकररावांकडे या सगळ्यांचा संगम असल्यामुळे ते आकर्षक व्यंगचित्रे किंवा हास्यचित्रे काढीत असत आणि ती सुध्दा छापून येत. या निमित्याने संपादन, प्रकाशन वगैरे बाबीसुध्दा त्यांनी पाहून घेतल्या. इतर साहित्यिकांकडून साहित्य मिळवून आणि त्यात स्वतःची भर घालून त्यांनी एक स्वतंत्र दिवाळी अंक काढला. कालांतराने तो बंदही केला. मला ज्या अशक्यप्राय वाटत अशा कित्येक गोष्टी ते अगदी सहज हातात घेत, त्या यशस्वीपणे पूर्ण करेपर्यंत त्यासाठी कठोर मेहनत घेत आणि त्यानंतर तितक्याच सहजपणे त्या सोडून देत हा अनुभव त्यांच्या बाबतीत मला येतच राहिला.

साहित्याच्या क्षेत्रातला एक अभूतपूर्व असा नवा प्रयोग त्यांनी यशस्वीपणे करून दाखवला. अनेक नव्या कवींच्या अप्रकाशित रचना गोळा करून त्यांनी त्या आपल्या सुरेख हस्ताक्षरात मोठ्या अक्षरात वेगवेगळ्या ड्रॉइंग पेपरवर लिहून काढल्या, त्यावर समर्पक अशी रेखाचित्रे रेखाटली आणि त्या सर्व कविता मोठमोठ्या आकाराच्या बोर्डांवर लावून पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचे चक्क प्रदर्शन भरवले. त्याच्या उद्घाटनासाठी मान्यवरांनी हजेरी लावली, स्थानिक वर्तमानपत्रांत त्याचे वृत्तांत छापून आले आणि रसिक पुणेकरांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली. त्यात प्रदर्शित केलेल्या काव्यांची एक पुस्तिकासुध्दा ते दरवर्षी काढत. 'काव्यगंध' या नावाचा हा उपक्रम त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे चालवला. अशा प्रकारची प्रदर्शने नाशिक, नागपूर आदी अन्य शहरात भरवण्याबद्दल विचारणा झाली. परदेशात गेलेल्या मराठी बांधवांनी त्यासंबंधी उत्सुकता दाखवली. विविध प्रकारच्या कवितांचे पोस्टर्स घेऊन आमचे प्रभाकरराव लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिसच्या दौ-यावर गेले आहेत असे एक रम्य चित्र मला दिसायला लागले होते. अखेर हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन 'काव्यतरंग' या नांवाने भारतातच झाले. त्यासाठी परदेशस्थ कवींनी आपल्या रचना ईमेलद्वारे इकडे पाठवणे अधिक सोयिस्कर झाले असावे.

जितक्या सहजपणे प्रभाकररावांची बोटे कागदावर चालून सुरेख अक्षरे किंवा चित्रे काढतात तितक्याच कौशल्याने ती हार्मोनियमच्या पट्ट्यांवरून फिरून त्यातून सुमधुर अशी नादनिर्मिती करतात. एकाद्या उस्ताद, खाँसाहेब किंवा बुवांचे गंडाबंधन करून संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्याइतका वेळ त्यांना कधीच मिळाला नसणार, पण एकलव्याप्रमाणे एकाग्रचित्ताने साधना करून त्यांनी आपले वादनकौशल्य कमावले आहे. गोड गळ्याची देण असलेली कोणतीही व्यक्ती एकादी गाण्याची ओळ ऐकून ती तशीच्या तशी गुणगुणू शकते तितक्याच सहजपणे ते कुठलीही लकेर ऐकल्यावर पहिल्याच प्रयत्नात तशीच्या तशी पेटीतून काढतात. त्यामुळे ओळखीचे चार संगीतप्रेमी भेटले आणि त्यांची मैफल जमली की प्रभाकरराव पेटीवर बसणार हे गृहीतच धरले जाते. तेसुध्दा कसलेही आढेवेढे न घेता तयार होतात, गाणारा कुठल्या पट्टीत गाणार आहे वगैरे चौकशी न करता त्याची पट्टी अचूक पकडतात आणि कोमल ऋषभ किंवा शुध्द निषाद (हे कशा प्रकारचे प्राणी असावेत?) असली चर्चा न करता त्याच्या गाण्यात आपले रंग भरतात. एकाद्या दर्दी गायकाने काळी चार किंवा पांढरी पांच अशा विशिष्ट पट्टीतले सूर मागितलेच तर त्यातील षड्ज आणि पंचम दाखवून ते त्याचे गाणे सुरू करून देतात आणि त्याला उत्तम साथ करतात. त्यांचे घरच संगीतमय आहे. त्यांच्याकडे अनेक निवडक सुरेल ध्वनिमुद्रिका, टेप्स आणि आता सीडीज यांचा मोठा संग्रह आहे आणि त्यातल्या छान छान चिजा ते उत्साहाने ऐकवतात. अर्थातच स्वतः ते भरपूर ऐकत असणारच. आपली पत्नी आणि मुलगा यांच्याबरोबर त्यांनी घरचाच एक मिनिऑर्केस्ट्रा तयार केला आहे. या त्रिकूटाने निवडक गाण्यांचे कांही सार्वजनिक कार्यक्रम करून रसिकांचे मनोरंजन केले आहे.

कांही वर्षांपूर्वी एकदा ते हिमालयातल्या एका दुर्गम अशा जागी गेले असल्याचे अचानक कोणाकडून तरी ऐकले. मला त्याचा कांही संदर्भच लागेना. त्यांच्या बोलण्यात कधी गिर्यारोहणाचा उल्लेख आला नव्हता. त्यातून ते ऑफीसतर्फे तिकडे गेले असल्याचे समजल्यावर मी अधिकच गोंधळात पडलो. हिमालयातल्या समुद्रसपाटीपासून खूप उंचावर असलेल्या जागी जे अतीशीत आणि विरळ वातावरण असते त्याचा सैनिकांच्या सामुग्रीवर काय परिणाम होतो अशा प्रकारच्या कसल्याशा अभ्यासासाठी गेलेल्या तज्ज्ञांच्या समीतीमध्ये त्यांचा समावेश होता असे नंतर समजले. कदाचित ते अशा प्रकारच्या मोहिमांमध्ये त्यापूर्वीसुध्दा इतरत्र गेलेही असतील, पण त्याची वार्ता माझ्या कानावर आली नव्हती. साहित्य, संगीत, कला वगैरेमध्ये रमणारे हे गृहस्थ उच्च दर्जाचे शास्त्रीय संशोधनाचे कार्य करत होते हे मला माहीतच नव्हते. त्यांच्याकडे कांही प्रशासनिक कार्य असेल किंवा हिशोब ठेवणे वा तो तपासणे अशा स्वरूपाचे काम असेल असे मला उगाचच वाटत असे. मी सुध्दा आपल्या कामाबद्दल कोणापुढे कधी चकार शब्द काढत नसल्याने माझ्या कामाच्या स्वरूपाबद्दल लोकांच्या मनात काय काय कल्पना असतील कोण जाणे.

प्रभाकरराव सेवानिवृत्त होणार असल्याचे समजल्यावर ते पूर्णवेळ साहित्य आणि संगीताला वाहून घेऊ शकतील आणि त्या क्षेत्रात कांही भरीव स्वरूपाचे प्रकल्प हातात घेतील असे मला वाटले होते. कदाचित ते एकादा मोठा ग्रंथ लिहून त्याचे प्रकाशन करतील, एकादे संगीत नाटक रंगमंचावर आणतील, कविता, चुटकुले आणि चित्रे यांची प्रदर्शने वेगवेगळ्या शहरात भरवतील, विविधगुणदर्शनाचे कांही अफलातून कार्यक्रम सादर करतील, होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकादी कार्यशाळा सुरू करतील अशा त्यांच्या संभाव्य कामाबद्दल अनेक प्रकारच्या कल्पना माझ्या मनात आल्या. त्यांना पाककलेतही चांगली गती असल्यामुळे त्यांनी खास कोल्हापुरी रस्सा किंवा कर्नाटकातले चित्रान्ना, बिशीब्याळीअन्ना यासारखे भाताचे खास प्रकार पुरवणारे उच्च श्रेणीचे खाद्यगृह उघडले असते तरी मला त्याचे फार मोठे आश्चर्य वाटले नसते. पण त्यांनी जे कांही मनात ठरवले होते ते माझ्या कल्पनेच्या अत्यंत स्वैर भरारीच्या (वाइल्डेस्ट इमॅजिनेशनच्या) पार पलीकडले होते. त्यांनी पुण्याहून चाळीस पन्नास किलोमीटर दूर एका खेड्यात एक जमीनीचा पट्टा घेऊन या वयात त्यात स्वतः काबाडकष्ट करून मातीतून मोती पिकवायचे ठरवले. आपले इतर व्याप सांभाळण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना पुण्यात राहणे आवश्यक होते. इतक्या दूर रोज ये जा करण्यासारखी सोयिस्कर बससेवा उपलब्ध नव्हती आणि रोज आपल्या मोटारीने जाणे येणे परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे ते सलगपणे बरेच दिवस एकट्यानेच त्या शेतावर एका कामचलाऊ छप्पराखाली रहात असत आणि अधून मधून गरजेपुरते पुण्याला येऊन परत जात असत. जमीनीची नांगरणी करण्यापासून ते आलेल्या पिकांची कापणी व मळणी आणि झाडांची लागवड करण्यापासून फळांची व भाज्यांची वेचणी इथपर्यंत सारी कामे त्यांनी स्वतःच्या हाताने केली, वेगवेगळ्या प्रकारची बीबियाणे, खते, कीटकनाशके वगैरेंचा उपयोग करून पाहिला आणि या सर्वातून एक वेगळ्याच प्रकारच्या निर्मितीचा आनंद लुटला. त्यांचा हा यशस्वी प्रयोग प्रत्यक्ष पाहण्याची अनिवार इच्छा मला अनेक वेळा झाली, पण ते जमण्यापूर्वीच त्यांनी या प्रकल्पाचा गाशा गुंडाळला. त्याबद्दल अत्यंत शांतपणे त्यांनी सांगितले की शेती करावी किंवा न करावी या दोन्ही बाजूंना पहिल्यापासून परस्परविरोधी अनेक कारणे होतीच. आधी पहिली बाजू जड होती म्हणून मी तसा निर्णय घेतला होता, त्यानंतर तिकडची कारणे हलकी होत गेली आणि इकडची वजनदार होऊन पारडे उलट बाजूने झुकल्यावर तो बदलला.

त्यांनी शेती करणे सोडून दिले असले तरी त्यानिमित्याने त्यांचे वनस्पतीविश्वाशी जडलेले नाते तुटले नाही. आता त्यांनी आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवरच छोटीशी किचन गार्डन तयार केली आहे. त्यामुळे गच्चीवर प्रत्यक्ष परिणाम होऊ नये किंवा कोणाला तसे बोलायला जागा मिळू नये म्हणून लाकडाच्या चौकटी ठेऊन त्यावर दुधाच्या प्लॅस्टिकच्या लहान लहान पिशव्यांमध्ये ही रोपवाटिका तयार केली आहे. त्यात लावलेल्या रोपांसाठी सेंद्रिय खत निर्माण करण्याविषयी त्यांचे आगळ्या प्रकारचे संशोधन चालले आहे. पारंपरिक पध्दतीत सर्व पालापाचोळा एका खड्ड्यात पुरून ठेवतात आणि कांही महिन्यानंतर त्याचे नैसर्गिक रीतीने खतात रूपांतर होते. यात वेळ लागतो आणि यासाठी लागणारी मोकळी जागा शहरात कुठून मिळणार? प्रभाकररावांनी एक नवा प्रयोग सुरू केला. मिळेल तो पाला गोळा करून ते आपल्या गच्चीवर बसवलेल्या सोलर कुकरमध्ये चांगला शिजवून घेतात आणि त्याचा लगदा थोड्या मातीत मिसळून झाडांच्या मुळापाशी घालतात आणि त्यावर मातीचा थर पसरवतात. यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होते असे त्यांचे निरीक्षण आहे. आता किती मातीमागे किती दिवसांनी किती लगदा घालायचा याचे ते ऑप्टिमायझेशन करताहेत.

त्यांच्याबरोबर गप्पा मारत असतांनाच आम्ही टेलिव्हिजनवरील बातम्या पहात होतो. बातम्यांच्या खाली शेअर्सचे भाव स्क्रोल होत होते इकडे माझे लक्षसुध्दा नव्हते. मध्येच "मी एका मिनिटात येतो" असे सांगून प्रभाकरराव उठून आत गेले आणि बाहेर आल्याआल्या त्यांनी सांगितले, "अमक्या अमक्या कंपनीचा भाव साडेअठरा झालेला पाहिला म्हणून तिचे शंभर शेअर विकून आलो." शेअरबाजारात खरेदीविक्री करणे ही आता कोट्याधीशांची मक्तेदारी राहिलेली नाही हे मला ऐकून ठाऊक झाले असले तरी प्रत्यक्षात ते करणारे मी अजून पाहिले नव्हते. मी अचंभ्याने आणि भाबडेपणाने त्यांना विचारले, " अहो इथे तर हजारो कंपन्यांचे भाव स्क्रोल होतांना दिसत आहेत, त्यातली नेमकी हीच कंपनी तुम्ही कशी निवडली?"त्यांनी त्यावर सांगितले, "मी याचा सखोल अभ्यास सुरू केला आहे." एक वही दाखवून त्यांनी पुढे सांगितले, "या इतक्या निवडक कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात रोज होणारा चढउतार मी तारखेनुसार इथे लिहून ठेवला आहे. रोजच्या रोज बदलणारे त्याचे आंकडे पाहून तो कमी होत असला किंवा वाढत असला तरी त्याचा एक अंदाज बांधता येतो. आणि एकादा अंदाज जरी चुकला तरी बाकीचे अनेक अंदाज बरोबर येतात. त्यामुळे एकंदरीत आपला फायदाच होतो. आता याच कंपनीचे पहा, महिन्याभरापूर्वी अमक्या किंमतीला बरा वाटत होता म्हणून मी तिचे दोनशे शेअर्स विकत घेतले होते, पण तो भाव कमी व्हायला लागला तेंव्हा त्यातले शंभर विकून टाकले, तो आणखी कमी झाल्यावर आता याहून कमी होणे शक्यच नाही असे वाटल्यावर तेवढ्याच किंमतीत दीडशे शेअर्स विकत घेतले, म्हणजे माझ्याकडे अडीचशे शेअर्स झाले. आज शंभर विकून त्यात माझे जवळ जवळ अर्धे पैसे वसूल झाले. दोन चार दिवसात याची किंमत अजून वाढली की आणखी शंभर विकेन, म्हणजे माझे सारे पैसे परत मिळून वर माझ्याकडे पन्नास शेअर्स राहतील. त्याचा भाव उतरला तर मी वाट पाहीन किंवा विकलेले शेअर्स कमी किंमतीत पुन्हा विकत घेईन. वगैरे वगैरे .... " त्यांचे बरेचसे सांगणे माझ्या डोक्यावरून चालले होते. कोणाच्या तरी सांगण्यावरून मीही पूर्वी कधी तरी थोडेसे शेअर्स विकत घेऊन ठेवले होते आणि आपल्या मुलांबाळांप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करत आलो होतो. त्यांचा भाव वर चढला की मला आनंदाचे भरते येते आणि कोसळला की मलाही रडू कोसळते. एकदाच लॉटरीची तिकीटे विकत घेऊन आयुष्यभर वाटेल तेंव्हा त्याचा रिझल्ट पहाण्याची ती एक प्रकारची सोय झाली होती. अगदी गरज पडल्याखेरीज ते विकून टाकायचा विचारही कधी माझ्या मनात येत नाही. आता मात्र मलाही त्यांच्याकडे अलिप्त भावनेने पहायला शिकले पाहिजे असे वाटायला लागले.

अशा खूप छोट्या छोट्या गंमती माझ्या आठवणीत आहेत. त्या प्रत्येकात आश्चर्यचकित होण्याची पाळी नेहमी माझ्यावरच आली होती. नव्या भेटीत प्रभाकररावांचे कोणते नवे रूप समोर येईल याचा विचारच मी आता करत नाही. त्यामुळे आता आश्चर्य वाटणे जरा कमी झाले आहे. मात्र त्यांची आठवण निघाली की दर वेळी बोरकरांची एक ओळ मला आठवते, "दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती."