Friday, December 18, 2015

मित्र, यार, दोस्त आणि फ्रेन्ड्स

दोन भागात लिहिलेला लेख एकत्र केला दि. ०९-०४-२०२१
- - - - - - - - - -

श्रीकृष्ण आणि सुदामा ही बालमित्रांची जोडी प्रसिद्ध आहे. जिवलग मित्रांच्या जोडगोळीना नेहमी त्यांची उपमा दिली जाते. सगळ्या पौराणिक चित्रांमध्ये अगदी छोट्या बाळकृष्णाला देखील छान इवलासा पितांबर नेसवला जात असला तरी सुदामा, पेंद्या आदि त्याच्या सवंगड्यांना बहुधा लंगोटीच नेसवलेली दिसते. कदाचित यावरूनच 'लंगोटीयार' हा शब्द प्रचारात आला असावा. पुढच्या पिढीतल्या मुलांना लंगोटी हे वस्त्र पहायलाही मिळणार नाही. तेंव्हा वयाने कदाचित याच्याही मागे जाऊन 'डायपर फ्रेंड्स' असा नवा शब्दप्रयोग रूढ होईल.

मी शाळेत शिकायला जाण्याच्या आधीपासूनचे माझेही काही लंगोटीयार होतेच. आम्ही साधारणपणे एकाच काळात अर्धी चड्डी घालायला लागलो होतो आणि शालेय शिक्षण संपेपर्यंत बहुधा हाफ पँटच घालतही होतो. पुढे मी कॉलेजशिक्षणासाठी आमचे गांव सोडून पुण्यामुंबईकडे गेलो तसे माझे बालमित्रही चहू दिशांना पांगले गेले.  मी आधी दोन वर्षे मुंबईला सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन इंटरमीडिएटची परीक्षा पास केल्यानंतर पुण्याला इंजिनियरिंगला गेलो. यामुळे दोन वर्षांमध्ये मुंबईला मिळालेले मित्रही नंतर पारखे झाले आणि पुण्याला गेल्यानंतर तिथे नवीन मित्र जोडले. त्यानंतर पुन्हा आमची फाटाफूट होऊन मी नोकरीसाठी  मुंबईला आलो. कॉलेजमधले इतर मित्र कुठे कुठे गेले ते ही लगेच समजले नाही. या सगळ्या घटना  १९६० च्या दशकात घडल्या.

त्या काळात सेलफोन, इंटरनेट, ई मेल, फेसबुक, ट्विटर, वॉट्सअॅप यातले काहीच नव्हते. ट्रिंग ट्रिंग करणारा साधा टेलीफोनसुद्धा माझ्या बापुड्याच्या आवाक्याबाहेर होता. पोस्टाने पत्र पाठवणे हा कोणाशीही संपर्क साधण्याचा एकमेव मार्ग असायचा आणि त्यासाठी आधी कोणाचाही नवा पत्ता तरी कळायला हवा. शिवाय मी नव्या जागी गेल्यावर तिथले वेगळे वातावरण समजून घेऊन त्यात कसेबसे रुळण्याकडेच माझे सगळे लक्ष वेधलेले असायचे आणि त्या कामात रोजच विविध प्रकारच्या अडचणीही येत असत. त्यांना सामोरे जाऊन सोडवण्यातच माझा बहुतेक सगळा वेळ आणि शक्ती खर्च होत असे. माझ्या इतर मित्रांचीही गत यापेक्षा वेगळी असायचे कारण नव्हते. या सगळ्या कारणांमुळे माझे बालमित्र तसेच कॉलेजमधलेही बहुतेक मित्र यांच्याशी नंतर फारसा संपर्क राहिला नाही आणि ते हळूहळू दुरावत विस्मरणात चालले गेले. नंतरच्या काळात कधीतरी अचानकपणे एकाद्या जुन्या काळातल्या मित्राची कुठे तरी गाठ पडली की जुन्या आठवणी ताज्या होत, एकमेकांचे पत्ते घेतले जात पण प्रत्यक्ष पत्र लिहायला बसण्यापूर्वी ते चिठोरे हरवून जात असे. अशा प्रकारे तो मैत्रीचा दुवा सांभाळून ठेवणे कठीणच होत असे.

मैत्रीचे बंध एकदा का जुळले की ते कायमसाठी अगदी मजबूत असतात असे सांगितले जाते. यावर सिनेमा नाटकांमध्ये अनेक संवाद आणि गाणी असतात आणि ती तुफान लोकप्रियही होतात. पण निदान मला तरी याबाबतीत जरा वेगळे अनुभव आले. "यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी।" असे म्हणत खरोखरच कुणावर जीव ओवाळून टाकणारा मित्र माझ्या नशीबात नव्हता किंवा माझ्या पाहण्यातही कधीच आला नाही आणि आपल्या मनात दुस-या कुणाबद्दल स्वतःपेक्षाही जास्त प्रेमभावना बाळगावी असे मलाही कधी वाटले नाही. जीवनातले कुठलेही नाते, विशेषतः मैत्रीचे नाते टिकवून ठेवण्यासाठी सतत संपर्कात राहणे आवश्यक असते असा माझा अनुभव आहे.

मी नोकरीला लागल्यानंतर मला मिळालेले मित्र मात्र अनेक वर्षे माझ्या संपर्कात राहिले. त्यातले काही जण माझे कार्यालयातले सहकारी होते, काही जणांशी कामानिमित्य भेटणे व बोलणे होत असे तर काही जण आमच्या इमारतीत किंवा आसपास रहात होते. त्यातल्या ज्या लोकांशी माझे पटत होते किंवा आमच्या वेव्हलेंग्थ्स साधारणपणे जुळायच्या त्यांची गणना मित्रांमध्ये होत गेली. त्या लोकांशी माझ्या कामाव्यतिरिक्त काही अवांतर गप्पा गोष्टी होऊ लागल्या. त्यातले ही काही जण बदली होऊन किंवा नोकरी सोडून परगावी गेले, त्यांच्या जागी काही नवीन लोक आले असे होत गेले तरी नोकरीत असेपर्यंत माझा एकंदर मित्र परिवार ब-यापैकी वाढला होता. "समानशीलव्यसनेषु सख्यम्" असे म्हणतात, त्यातले समानशील सखे मला भेटले, पण मला स्वतःलाच कोणतेही व्यसन न लागल्यामुळे मित्र मिळवण्याचा दुसरा मार्ग मात्र मला उपलब्ध नव्हता.

कालांतराने मीच सेवानिवृत्त होऊन नव्या जागी रहायला गेल्यानंतर मात्र माझा मित्रपरिवार झपाट्याने कमी होत गेला कारण आता पूर्वीच्या मित्रांच्या भेटीगाठी होणे दुर्मिळ झाले आणि टेलीफोनवरचे संभाषणही हळूहळू कमी कमीच होत गेले. एक वय उलटून गेल्यानंतर नवे मित्र जोडायची इच्छा व उमेद कमी होत गेल्याने नव्या मित्रांची संख्या वाढणेही कठीणच होते.

.  . . . . . . . . . . . .

मित्र, यार, दोस्त आणि फ्रेन्ड्स (उत्तरार्ध)

पूर्वीच्या काळात  काही लोक पेन फ्रेन्ड्शिप किंवा पत्रमैत्री करायचे. ते लोक आपल्या मनातले विचार, सुखदुःखे, कल्पना, आपली तत्वे, आपले बरे वाईट अनुभव वगैरे नाजुक गोष्टी स्वतःच्या जवळच्या लोकांशी बोलून व्यक्त करण्याऐवजी किंवा त्याशिवाय सवडीने कागदावर लिहून काढत आणि दूर देशी असणाऱ्या मित्रांना किंवा मैत्रिणींना पत्राद्वारे पाठवून देत असत. तिकडूनसुद्धा त्या पत्राला असाच उत्साही प्रतिसाद मिळाला तर मग ती मैत्री दृढ होऊन वाढत जात असे. कधी कधी हे पत्रमित्र प्रत्यक्षात भेटलेलेही नसत किंबहुना ते त्यांना शक्यही होत नसावे, पण त्यांच्या संदेशांची देवाणघेवाण मात्र पत्रांद्वारे दीर्घकाळ चालत असे. अशा प्रकारच्या मैत्रीविषयी मी फक्त पुस्तकांमध्येच वाचलेले आहे, मला कधीच त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला नाही किंवा इतर कोणाचा पहायलादेखील मिळाला नाही.

माझे वडील रिटायर व्हायच्या पंधरा वीस वर्षांपूर्वी कधी तरी एका बदलीच्या गावी गेलेले असतांना त्या खेड्यात रहात असलेल्या एका गृहस्थांच्या संपर्कात आले होते असे मी ऐकले होते. माझ्या आठवणीत तरी त्या दोघांची कधीच गांठभेट झाली नव्हती, मी त्या गृहस्थांना कधीच पाहिलेले नाही किंवा ते खेडेही पाहिले नाही. पण माझे वडील रिटायर होऊन गेल्यानंतरसुद्धा काही वर्षे या जुन्या स्नेह्याची पत्रे नियमितपणे येत असत. त्यांचेकडून आलेली पत्रे माझ्या वडिलांना वाचून दाखवायचे काम मात्र माझ्याकडे यायचे. त्यांच्या पोस्टकार्डामध्ये फक्त तिकडची खुषाली कळवलेली असायची आणि इकडची चौकशी केलेली असायची. त्या पत्रलेखनाला फारसे वाङ्मयीन किंवा साहित्यिक मूल्य नसेलही, पण त्यामधून व्यक्त होत असलेली त्या दोघांमधली खूप जवळीक मात्र मलासुद्धा चांगली जाणवत असे. या मित्राबद्दलचे माझे कुतूहल वाढतच गेले आणि अखेरपर्यंत ते एक गूढ राहिले.

माझ्याकडे घरी असलेल्या पत्याच्या वहीतले बहुतेक सगळे पत्ते आमच्या नातेवाईकांचेच असायचे. टेलिफोन नसतांनाच्या काळात त्यांच्याशी पत्रव्यवहार होत असे. त्या वहीतली फारच कमी नांवे माझ्या मित्रांची असायची. तीसुद्धा जर मला कधी काळी त्यांच्या गावी किंवा घरी जायचे असले तर तेंव्हा उपयोगी पडावी म्हणून लिहून ठेवलेली होती. त्यातल्या कुणालाही मी पत्रे लिहून पोस्टाने पाठवली नाहीतच, त्यांच्याकडूनही कधी आली नाहीत. एकंदरीतच मी टपालखात्याला फारसे कष्ट दिले नाहीत.

अलीकडच्या काळात इंटरनेटचा प्रसार झाल्यानंतर मात्र हे चित्र पार पालटले. माझ्या ईमेल्सवरील काँटॅक्ट्सची संख्या वाढतच गेली आणि त्यात मात्र काही नातेवाईकही असले तरी त्यातली बहुतांश नावे मात्र माझ्या मित्रांचीच असायची. मी काही याहू किंवा गुगल ग्रुप जॉइन केल्यावर तर मला एकदम अनेक मित्र मिळाले. मनोगत, मिसळपाव, उपक्रम, ऐसी अक्षरे यासारख्या संकेतस्थळांवर माझे नाव नोंदवले होते. तिथे काही लिहिल्यास त्यावर लगेच अनेक शेरे किंवा प्रतिक्रिया येत, मी ब्लॉग लिहायला सुरू केल्यावर त्यावरही अनेक प्रतिसाद यायला लागले. या सर्वांमधून मला काही नवे मित्र मिळाले.  फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सअॅप ही तर खास सोशल नेटवर्कची साईट्स आहेत. माझे आधीपासून असलेले बरेचसे मित्र यात येत गेलेच, शिवाय कित्येक अनोळखी मित्रांची अनाहूत आमंत्रणे या नेटवर्क साईट्समधून येत असतात. मीच संपूर्ण खात्री पटल्याखेरीज कोणाला मित्र करून घेत नाही. तरी सुद्धा माझ्या या जालमित्रांची संख्या आता काही शेकड्यांमध्ये गेली आहे. तीन चार दशकांपूर्वी दूरावलेले, म्हणजे अक्षरशः हजारो किलोमीटर दूर अंतरावर गेलेले माझे काही जुने मित्र मला पुन्हा कधी भेटतील अशी मला आशाच वाटत नव्हती, पण या नव्या माध्यमांमधून मला ते पुन्हा एकदा सापडले आणि माझ्या संपर्कात आले, तेंव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.

मी प्रत्यक्षात कोणाच मित्राला हाताने पत्र लिहून पाठवले नसले तरी या आभासी जगातल्या मित्रांमध्ये मात्र रोजच भरपूर पत्रव्यवहार होत असतात. एकाच वेळी एका क्लिकमधून एकच संदेश अनेकांना पाठवता येतो, त्याला अवांतर मजकूर, चित्रे किंवा ध्वनि सहजपणे जोडता येतात आणि ते सगळे क्षणार्धात अनेक ठिकाणी जाऊन पोचतात, लगेच त्याची उत्तरे येऊ शकतात आणि आपण ते आणखी कोणाला पाठवू शकतो वगैरे त्याचे अचाट फायदे आहेत. आता तर हे सगळे हाताच्या मुठीत धरता येईल इतक्या लहानशा यंत्रामधून आणि आपण जिथे असू तिथूनच करता येणे शक्य झाले आहे. आपल्या आयुष्यात असे काही आपल्याला अनुभवायला मिळेल अशी मी कल्पनासुद्धा केली नव्हती. अर्थातच यामुळे मित्र या शब्दालाच नवा अर्थ, नवे परिमाण लाभले आहे.

या आभासी जगातल्या मित्रांमध्येसुद्धा विविध प्रकार असतात. त्यातले बरेचजण आधीपासूनच आपले खरे खुरे मित्र असतात पण दूर रहात असतात. त्यांच्याशी केंव्हाही लगेच संपर्क साधणे  आता नव्या माध्यमांमधून सहज शक्य झाले आहे. आपल्याला गरज पडली की ते लगेच धावून येऊ शकतात, तसेच आपणही वेळेवर त्यांच्या मदतीसाठी काही करू शकतो. याविरुद्ध काही जालमित्र  आपल्याला फक्त इंटरनेटवरच भेटतात. त्या वेळी ते लोक खूप जवळिकेने आपले मनोगत व्यक्त करतात, सल्ले देतात, विचार मांडतात, चर्चा करतात, वादही घालतात. दूर राहूनच त्यांच्याशी केलेल्या या संवादामधून आपल्या सामान्यज्ञानाच्या कक्षा विस्तारतात, आपल्याला उपयुक्त माहिती मिळतेच, वैचारिक समाधान मिळते, आपली बौद्धिक भूक प्रज्ज्वलित होते किंवा भागते, भावनात्मक आनंद मिळतो. विशेषतः निवृत्त आयुष्यात उपलब्ध झालेला माझा बराचसा रिकामा वेळ या मित्रांशी संवाद साधण्यात चांगला जातो किंवा सत्कारणी लागतो.

ब्लॉग्ज किंवा संकेतस्थळांवर भेटणारे काही मित्र तर या आभासी जगतात टोपणनावाने वावरत असतात. त्यांनी पांघरलेल्या बुरख्यामागील व्यक्ती पुरुष आहे की स्त्री, ती तरुण आहे की वृद्ध, ती कोणत्या सामाजिक किंवा शैक्षणिक स्तरातली आहे यातले काहीच आधी कळत नाही, पण तरीही त्यांच्या लेखनामधून ते मित्रत्वाने वागत असतात. अशा लोकांशी तात्विक चर्चा करणे किंवा वितंडवाद घालणे सोपे असते आणि त्यात मजाही येते, कारण तो अनामिक मित्र दुखावला जाण्याची काळजी करायची गरज नसते.  त्यांचा समावेश मित्रांमध्ये करता येईलच का नाही अशी शंका येते, पण या लोकांचीही संमेलने भरतात, त्याला हजेरी लावली की आपल्याला बुरख्यामागले चेहेरे पहायला मिळतात.  त्यातून काही लोकांशी खरी मैत्री जमते.

मैत्री, दोस्ती, यारी, फ्रेन्ड्शिप यांच्या असंख्य छटा असतात, त्यातल्या काही दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न या भागात केला आहे.  
   

Friday, October 09, 2015

शस्त्रक्रियेनंतर

या लेखाचे दोन भाग एकत्र केले दि. ०९-०४-२०२१
- - - - - - - - - - -

दि. ३ एप्रिलला गुड फ्रायडेच्या दिवशी झालेल्या एका अपघातात माझ्या दोन्ही हातांची हाडे मोडली होती. दि. ७ एप्रिल रोजी वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेच्या पूर्वतयारीचा सविस्तर वृत्तांत मी या ब्लॉगवर पूर्वीच दोन भागांमध्ये दिला होता. आता पुढील अनुभवांच्या आठवणी या भागात देत आहे.

मी ऑपरेशन थिएटरच्या शेजारच्या दालनात पोचलो असतांनाच मला एक इंजेक्शन दिले गेले आणि एकापासून आकडे मोजायला सांगितले. मला असे वाटते की दहाचा आकडा मोजायच्या आधीच मला गुंगी आली आणि माझी शुद्ध हरपली. पुढील काही तासपर्यंत मी बेशुद्धावस्थेतच होतो. या दरम्यान मला ऑपरेशन टेबलावर ठेवून माझ्या डाव्या हाताचे मनगट आणि उजव्या हाताचा खांदा यांचेवर वीत वीतभर लांब छेद करण्यात आले. आतल्या मोडलेल्या हाडांना एकेका पट्टीच्या आधारे सांधण्यात आले. या हाडांना ड्रिलने भोके पाडली आणि न गंजणा-या विशिष्ट मिश्रधातूच्या या पट्ट्यामधून तशाच धातूचे स्क्रू पिळून त्यांच्या सहाय्याने त्या पट्ट्यांना हाडांशी घट्ट जोडून ठेवले गेले. त्यानंतर कातडीला स्टेपल करून ती जखम बंद केली गेली आणि त्यावर बँडेजेस बांधली गेली. मी पूर्णपणे बेशुद्ध असल्याने मला यातले काहीच समजले नाही. त्यामुळे नंतर कधीही त्यातले काही आठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही माहिती मलाही नंतर समजत गेली.

मी शुद्धीवर येत असतांना माझ्या आजूबाजूला काही माणसे वावरत असल्याची हलकीशी चाहूल मला लागल्याने मी डोळे किलकिले करून पाहिले तर माझ्या डोळ्यांसमोर एक पांढरी शुभ्र भिंत आहे असे त्यावेळी मला वाटले. बहुधा आपल्याला एकाद्या कॉरीडॉरमध्ये आणून ठेवले असावे, पण असे भिंतीकडे तोंड करून का बसवले आहे असा प्रश्नही माझ्या मनाला पडला. त्याआधीच मला एक उलटी झाली होती आणि माझ्या पोटातला थोडा द्रव बाहेर पडून तो माझ्या कपड्यांवर सांडला होता. मी सकाळी प्यालेल्या फ्रूट ज्यूसचा वास त्यांना येत होता. हेही माझ्या लक्षात आले. मला मिळालेल्या चुकीच्या सल्ल्यानुसार मी केलेले फलरसप्राशन मला थोडेसे भोंवले होते.

काही वेळाने माझ्या अगदी जवळ पावलांचा आवाज आला तेंव्हा मी डोळे उघडून पाहिले तर माझे आप्त परितोष माझ्याजवळ आले होते. "काका, कसं वाटतंय् ?" त्यांनी विचारले.  खरे तर अॅनेस्थेशियाचा असर कमी होत असतांना माझ्या सर्वांगाला प्रचंड वेदना होत होत्या, माझे दोन्ही हात खूपच ठणकत होते आणि नॉश्यामुळे पोटातून नुसते ढवळून निघत होते, पण मी मानेनेच मला ठीक वाटत असल्याची खूण केली. "तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय् ना? तुम्हाला मी दिसतोय् ना?"  परितोषने विचारले. "हो, पण तुम्ही असे आडवे कां दिसत आहात?" मी क्षीण आवाजात विचारले. परितोषना काहीच बोध झाला नाही. ते मला टा टा करीत निघून गेले. दोन मिनिटांनी शिल्पा आली. मला तीसुद्धा आडवीच दिसत होती. मी तिलाही तोच प्रश्न विचारला. "काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल." असे आश्वासन देऊन तीही परत गेली. त्या वेळी माझ्या जवळच्या फक्त दोन माणसांना तिथे येऊन फक्त मला पाहून जाण्यापुरती परवानगी मिळाली होती. त्यामुळे इतर कोणीही माझ्या जवळ येऊ शकले नाही.

माझ्या जिवाला मात्र आता एक नवाच घोर लागला होता. माझ्या दोन्ही हातांचे ऑपरेशन झाले होते हे मला ठाऊक होते, पण माझ्या डोळ्यांना हे काय होऊन बसले आहे ते समजत नव्हते. जादूगर जसे त्यांच्या चेल्याला अलगदपणे हवेत उचलल्यासारखे दाखवतात त्याप्रमाणे मला परितोष आणि शिल्पा हे दोघेही अधांतरी आडवे तरंगत असल्याचा भास झाला होता. पण त्यांना तर तसे करणे शक्यच नव्हते एवढे त्या वेळीही माझ्या बुद्धीला कळायला लागले होते. त्यामुळे मला जे काही दिसले तो नक्कीच दृष्टीभ्रम असणार. यापुढे जर मला सगळे जग असे ९० अंशांनी फिरल्यासारखे दिसणार असेल तर त्यात माझे वावरणेच कठीण होणार होते. मला काही सुचेनासे झाले. मी डोळे मिटून मनातल्या मनात गणपतीअथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली.

त्या स्तोत्राची दोन तीन पारायणे झाल्यानंतर मी हलकेच डोळे उघडले. अजूनही मला माझी मान वळवता येत नव्हतीच. बुबुळांच्या हालचाली करून जरा इकडे तिकडे पाहिले. खालच्या बाजूला पहाताच मी झोपून राहिलो असल्याचा मला एक प्रकारचा साक्षात्कार झाला. मला भूल देण्यापूर्वी मी व्हीलचेअरवर बसलो होतो त्या वेळी पाहिलेली दृष्ये माझ्या मनःपटलावरली ताजी दृष्ये होती आणि आता पहात असलेल्या दृष्यांचा त्याच संदर्भात विचार करून माझी बुद्धी तसा अर्थ काढीत होती. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर असलेल्या आडव्या छताला मी उभी भिंत समजत होतो आणि उभी असलेली माणसे मला आडवी दिसत होती. याचा उलगडा झाल्यानंतर मी पुन्हा पुन्हा सर्व बाजूंनी जेवढे दिसत होते तेवढे पहायचा प्रयत्न करत राहिलो. अॅनेस्थेशियाचा अंमल उतरत असल्यामुळे आता माझे डोकेही जरा जास्त काम करायला लागले आणि माझी नजर आपोआप पूर्ववत झाली. मी समाधानाचा एक सुस्कारा टाकला.

...........................

शस्त्रक्रियेनंतर (उत्तरार्ध)

(या लेखाचा पूर्वार्ध लिहून झाल्यानंतर माझ्यापुढे अनेक वैयक्तिक आणि तांत्रिक अडचणी आल्यामुळे उत्तरार्ध लिहायला उसंतच मिळाली नाही. आता आज त्याला मुहूर्त मिळाला. मध्यंतरीच्या काळात बरेचसे विस्मरणही झाले आहे. यामुळे आता ज्या गोष्टी ठळकपणे आठवतात त्या लिहून काढणार आहे.)

त्या पांढ-या शुभ्र आढ्याकडे पहात मी सुन्नपणे पडून राहिलो होतो, त्यामुळे मला वेळेचे भानच राहिलेले नव्हते. अंगातला ठणका वाढत चालला होता. असा बराच वेळ गेल्यानंतर पुन्हा शिल्पा माझ्याजवळ आली. या वेळी तिच्यासोबत आलेली एक नर्स हातात चहाचा कप घेऊन उभी होती.
शिल्पा म्हणाली, "सकाळपासून तुमच्या पोटात काही नाही, कपभर चहा घ्या म्हणजे थोडी तरतरी वाटेल."
खरे तर मला काहीही खाण्यापिण्याची मुळीसुद्धा इच्छा नव्हती. पोटातले वादळ अजून धिंगाणा घालत होतेच. तरीही शिल्पाच्या आग्रहाखातर मी घोटभर चहाचे एक दोन घोट कसेबसे घशाखाली ढकलले. पण आता पोटातल्या वादळाचे रूपांतर सुनामीमध्ये होऊन माझ्या पोटात जे काही असेल नसेल ते सगळे नाकातोंडामधून वेगाने बाहेर फेकले गेले. माझ्या अंगावरचे कपडे आणि चादर वगैरे पुसून आणि झटकून त्या दोघी परत गेल्या.

मी पलंगावर मुकाटपणे पडून राहिलो होतो. माझे दोन्ही हात बँडेजमध्ये करकचून बांधलेले होते. डाव्या हाताच्या मनगटाच्या जवळच ऑपरेशन केलेले असल्यामुळे बोटांची फक्त टोके बाहेर दिसत होती. उजव्या हाताच्या दंडाजवळ हाडाचे ऑपरेशन केले होते आणि कोप-याला आधीच मोठी जखम झालेली होती, तिचे अनेक टाके घातलेले होते. त्या हाताचे मनगट मात्र मोकळे होते. डाव्या हाताला प्लॅस्टरसकट उभे धरून एका दोरीने स्टँडला बांधून ठेवले होते आणि उजवा हात कोप-यामधून मुडपून स्लीव्हमध्ये घालून गळ्यात अडकवून ठेवला होता. यामुळे दोन्ही हात तर जागच्या जागी खिळलेले होतेच, खांद्यापाशी एक लहानसे भोक पाडून तिथे एक मोठे बँडेज बांधल्यासारखे वाटत होते. माझ्या कॉटच्या बाजूला ठेवलेल्या स्टँडला तीन चार प्लॅस्टिकच्या बाटल्या उलट्या टांगल्या होत्या त्यांचेपासून निघालेल्या रबराच्या पारदर्शक नळ्या माझ्या खांद्याला बांधलेल्या बँडेजशी जोडलेल्या होत्या. मला देण्यात येणारी औषधे तसेच जीवनावश्यक द्रव्ये यांचा पुरवठा त्या नळ्यांमधून माझ्या शरीराला मिळत होता. कॅथेटर लावून आणि डायपर बांधून माझ्या उत्सर्जनाची व्यवस्था केलेली होती. माझ्या पायालासुद्धा अपघातात जखमा झालेल्या होत्याच, आता अंगात त्राणही नव्हते. यामुळे मी उठून बसूही शकत नव्हतोच, फक्त पायांचे तळवे आणि बोटे हलवू शकत होतो आणि हाताची बोटे वळवण्याचा प्रयत्न करून शकत होतो. मी एवढ्या हालचाली मात्र सारख्या करत रहाव्यात असे कोणीतरी मला सांगून गेले.

आणखी बराच वेळ गेला तोपर्यंत पोटातले ढवळणे कमी झाले होते. बहुधा त्या नळ्यांमधून माझ्या शरीरात गेलेल्या औषधांचा परिणाम झाला असावा, पण मला अजूनही काही खावे असे वाटतच नव्हते. आता माझ्यासाठी भोजन आणले गेले. ती एक खिरीसारखी सरभरीत अशी पण बेचव खिचडी होती. अन्न हे पूर्णब्रह्म असे म्हणत मी ते अतिसात्विक अन्न खाण्याचा बराच प्रयत्न केला, पण बाउलमधले अर्धेसुद्धा खाऊ शकलो नाही. माझ्यासाठी हे जेवण घेऊन आलेली शिकाऊ नर्स मात्र अन्नाच्या नासाडीवर माझी शाळा घेत होती. कोणतेही अन्नपदार्थ तयार करण्यासाठी शेतात राबणा-या शेतक-यांपासून ते भटारखान्यातल्या आचा-यांपर्यंत किती लोकांनी केवढे परिश्रम घेतलेले असतात, त्यात देशाची आणि विश्वाची किती संसाधने खर्च झालेली असतात, आपण हे सगळे वाया घालवणे योग्य आहे का ? वगैरे वगैरे वगैरे. हेच संवाद या पूर्वी मी कित्येक लोकांना ऐकवले असतील, आज ते ऐकण्याची पाळी माझ्यावर आली होती.

हे सगळे चालले असतांना मी फोर्टिस हॉस्पिटलच्या सर्जिकल आय सी यू मध्ये होतो. सगळ्या बाजूंनी बंदिस्त असलेल्या त्या जागेत दिवस किंवा रात्र हेसुद्धा समजत नव्हते. पण बहुधा दुसरा दिवस उजाडून वर आला असावा हे सकाळचा नाश्ता आल्यानंतर कळले. दुपारच्या सुमाराला आमचे सर्जनसाहेब आले. त्यांनी थोडी पाहणी आणि तपासणी केली आणि माझी प्रगति व्यवस्थितपणे चालली असल्याचा अभिप्राय देऊन मला आता वॉर्डमध्ये हलवायला हरकत नसल्याचा निर्णय दिला. त्यानंतर कोणत्या खोलीत एकादी जागा रिकामी आहे याची शोधाशोध केली गेली. ऑपरेशन व्हायच्या आधी मला ज्या कॉटवर अॅडमिट करून ठेवले होते, तिथे आता एक नवा रुग्ण आला होता. दुस-या एका कॉटवरच्या पेशंटला डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर तिथले बेडशीट्स वगैरे बदलून मला तिथे हलवण्यात आले. ऑपरेशनसाठी जातांना मी व्हीलचेअरवर बसून गेलो होतो, परत येतांना मात्र स्ट्रेचरवरून आणणे आवश्यक होते.

या वेळी मी पूर्णपणे परस्वाधीन झालो होतो. दिवसभर आणि रात्री माझी सर्व प्रकारची सेवा शुश्रुषा करण्यासाठी दोन अटेंडंट्स ठेवलेले होतेच, शिवाय माझी दोन्ही मुले सारखी ये जा करत होती. पण हॉस्पिटलच्या नियमांप्रमाणे पेशंटच्या सोबत एका वेळी फक्त एकाच अटेंडंटने राहण्याची मुभा होती. यासाठी त्यांनी पास देऊन ठेवले होते आणि कडक सिक्यूरिटी व्यवस्था असल्यामुळे पास असल्याशिवाय कोणाला लिफ्टमध्ये पण जाऊ देत नव्हते. पासधारकाने खाली येऊन लॉबीत आलेल्या व्यक्तीला पास दिला तरच तो वर माझ्या खोलीत येऊ शकत होता. यात दहा पंधरा मिनिटांचा तरी वेळ जात होता.  पण माझ्या दिमतीला चोवीस तास कोणी ना कोणी हजर राहणेही आवश्यक होते आणि वेळोवेळी डॉक्टरांना भेटणे किंवा गरजेचे सामान आणून देणे वगैरेसाठी आणखी एकाद्या माणसाला अधून मधून यावे लागत होते. यासाठी माझ्या मुलाने एक सविस्तर पत्र लिहून डॉक्टरांची तात्पुरती परवानगी घेतली. त्यामुळे बरीच सोय झाली. रात्रीच्या वेळी मला पूर्णपणे अनोळखी अटेंडंटवर सोपवणे माझ्या मुलाला फारसे पटत नव्हते. त्याने स्वतःच रात्रपाळीला माझ्यापाशी थांबायचे ठरवले.

माझ्यावर ऑपरेशन्स केलेल्या जागांमधून एक एक नळी बाहेर काढून लहानशा डब्यांना जोडून ठेवली होती. याला ड्रेन म्हणत. या ड्रेन्समधून किती गाळ बाहेर पडत आहे याची रोज पाहणी केली जात होती. एक दोन दिवसातच त्यातली गळती थांबल्यावर त्या डब्या काढून टाकल्या गेल्या. आणखी एक दोन दिवसांनी कॅथेटर काढून टाकण्यात आले आणि पॉटची व्यवस्था केली गेली.  मला नळ्यांमधून देण्यात येणारी औषधे कमी कमी होत गेली. खांद्यावर जोडलेली सेंटरलाईन काढून उजव्या हाताच्या मनगटापाशी आयव्ही लावले गेले. गरज पडेल तेंव्हापुरताच त्याचा उपयोग होऊ लागला. अशा प्रकारे मला कॉटशी बांधून ठेवलेलले बंध सुटत गेले. माझी अवस्था बुटक्या लोकांनी बांधून टेवलेल्या गलिव्हरसारखी झाली होती, त्यातून मोकळे झाल्यावर केवढा तरी आनंद झाला.

मला हातावर जोर देणे शक्यच नव्हते आणि त्याशिवाय उठून बसताही येत नव्हते. हॉस्पिटलमधल्या कॉटचा मागचा भाग शक्य तितका वर करून आणि माझ्या पाठीला आधार देऊन बसवणे सुरू झाले. त्यानंतर खांद्याच्या खाली धरून उभे करता येऊ लागले.  मुख्य म्हणजे मी आता अटेंडंटच्या आधारे टॉयलेटला जाऊ शकत होतो. रूममध्ये येऊन दोन तीन दिवस झाल्यानंतर रोज एक फिजिओथेरॅपिस्ट येऊन भेटून जायची. आधी तिने एक लहानसे खेळणे हातात दिले आणि त्यातले गोळे फुंकर मारून उडवायची प्रॅक्टिस करवून घेतली. माझा श्वास पुरेसा नीट चालत आहे याची खात्री झाल्यानंतर पुढचे व्यायाम करायचे होते. उभा राहिल्यानंतर हाताला धरून मला माझ्या खोलीच्या खिडकीपाशी नेऊन बाहेरचे जग दाखवले. त्यानंतर कॉरीडॉरमध्ये दोन मिनिटे, पाच मिनिटे, दहा मिनिटे असे चालवत धीम्या गतीने पंधरा मिनिटांपर्यंत मजल नेली. त्यानंतर तेवढ्याच वेळात पण गती वाढवत नेऊन जास्त अंतर चालवून आणले. अशा प्रकारे हळूहळू माझ्या अंगातले त्राण वाढत गेले तसा माझा आत्मविश्वास वाढत गेला.

आमचे सर्जन डॉ.यादव दररोज एक फेरी मारून त्रोटक विचारपूस करतच होते. त्यांचा सहाय्यक जरा अधिक तपासणी करून जात असे. हॉस्पिटलचा मेडिकल विभाग इतर अनेक प्रकारच्या तपासण्या करत होता. दररोज दिवसातून ती चार वेळा ब्लड प्रेशर मोजणे ही एक कसरत असायची. दोन्ही हात बँडेजमध्ये असल्याने आणि एका पायाला जखम झाली असल्यामुळे उरलेल्या जागेत कसेबसे ते उपकरण लावून त्यातला आकडा पाहणे सगळ्या नर्सेसना जमत नसे. त्या अंदाजाने काही तरी लिहून ठेवायच्या. मग डॉक्टरांना शंका आली की पुन्हा ते तपासले जायचे हे रोजचेच होते. माझ्या आठवणीप्रमाणे मला थरमॉमीटर लावण्याची वेळ आलीच नाही, पण तपमानाची नोंद मात्र होत असावी.

प्रत्येक आहारापूर्वी रक्तातल्या शर्करेची तपासणी होत असे, पण एवढ्या मोठ्या नामवंत हॉस्पिटलमधले आमच्या वॉर्डमधले त्याचे उपकरण मात्र कधी कधी बेभरवशाचे निघत असे. माझ्या बोटाला सुई टोचून रक्ताचा थेंब बाहेर निघाल्यानंतर ते उपकरण चालत नसल्याचे सिस्टरच्या लक्षात येत असे. मग दुस-या वॉर्डमधून वेगळे ग्लुकोमीटर आणून टेस्ट करून त्यानुसार इन्सुलिनचे प्रमाण ठरवले जात असे. हे सगळे होईपर्यंत आणलेले खाद्यपदार्थ थंडगार होत असत. याबद्दल एक दोनदा  तक्रार करून झाल्यानंतर मी  त्यांना न जुमानता खाणे सुरू केले.  

दररोज अगदी नियमितपणे एक डायटीशियन येऊन मला भेटून जात असे. पण माझ्या फाइलींमध्ये डॉक्टर लोकांनी काय काय लिहून ठेवले होते कोण जाणे. तिच्याकडे माझ्यासाठी फारच कमी पर्याय उपलब्ध असायचे. कसल्याशा प्रकारचा खिचडा हे माझे मुख्य अन्न असायचे. यापूर्वी मला फक्त तांदूळ व मुगाच्या डाळीची खिचडी आणि उपासाची साबूदाण्याची खिचडी एवढेच प्रकार ठाऊक होते. इथे रोज निरनिराळी तृणधान्ये आणि कडधान्ये यांच्या कण्यांच्या मिश्रणांना शिजवून बाउलमध्ये भरून आणले जात असे. आज त्यात ज्वारी आहे की ओट्स की नागली आणि मुगाची डाळ आहे की मसूरीची की उडिदाची याचा सस्पेन्स थोडा चेंज म्हणून बरा वाटायचा. मात्र जेवणाशिवाय इतर वेळी मिळत असलेले निरनिराळ्या फळांचे काप आणि सूप्स मनापासून आवडत. सकाळी नाश्त्यामध्ये आधी नुसतेच ओट्स असत, दोन तीन दिवसांनंतर कधी बिनतेलाचा उत्तप्पा किंवा घावन मिळायला लागला. ब्रेड बटर सँडविच असे काही मिळू शकेल का असे विचारल्यावर त्या विदुषीने सांगितले की व्हीट ब्रेड मिळेल पण त्याला बटर किंवा जॅम लावता येणार नाही आणि सँडविचमध्ये टोमॅटो घालता येणार नाही की बरोबर खायला ऑमलेटही मिळणार नाही. यामुळे मी माझ्या या सगळ्या इच्छा पुढे घरी गेल्यानंतर पूर्ण करण्यासाठी राखून ठेवल्या.  चार पाच दिवस दोन्ही वेळच्या भोजनामध्ये फक्त खिचडा खाऊन झाल्यानंतर माझ्या ताटात एक चपाती अवतरली, त्यानंतर दुसरी, तिसरी यायला लागली. उकडलेल्या भाजीपाल्यांमध्ये थोडे तिखटमीठ पडायला लागले. चांगले रुचकर असे जेवण मिळायला लागेपर्यंत माझी घरी परतण्याची वेळ झाली होती. हॉस्पिटलच्या किचनमधल्या आचा-यांच्या हातालासुद्धा चंव असू शकते एवढे मात्र त्यातून समजले.

माझी पुरेशी प्रगती झाल्यानंतर इंजेक्शन्सची गरज संपून औषधाच्या फक्त गोळ्या आणि सायरप घ्यायचे राहिले, वेळोवेळी बीपी, शुगर वगैरे पहायची आणि रोजच्या रोज डॉक्टरने तपासण्याची गरज राहिली नाही, तेंव्हा मला डिस्चार्ज देण्यात आला. आता मी माझ्या कुटुंबासमवेत राहणार होतो, माझ्यासाठी माझ्या कुटुंबियांना करावी लागणारी दगदग वाचणार होती आणि हॉस्पिटलची बिले भरावी लाणार नव्हती. अजूनही माझे दोन्ही हात बांधलेले असल्यामुळे घरी गेल्यानंतरसुद्धा दोन तीन आठवडे तरी मी पूर्णपणे परस्वाधीनच राहिलो होतो. यामुळे घरी गेल्यानंतरसुद्धा दिवसा व रात्रीसाठी सेवकांची सोय करावी लागलीच.  त्यानंतर हळूहळू सुधारणा होत मी हाताच्या हालचाली करायला लागलो, आधी घरातल्या घरात आणि नंतर बिल्डिंगच्या सभोवती फे-या मारायला लागलो. मला साधारणपणे हिंडण्याफिरण्यायोग्य व्हायला आणखी तीन महिने लागले. तरीही दोन्ही हात पूर्णपणे पूर्ववत झाले नाहीतच. होण्यासारखी सुधारणा आता झाली आहे, उरलेली कदाचित हळूहळू होईल असे डॉक्टरांनी सांगितले आणि हे काम पूर्ण झाले असल्याचे जाहीर केले.


Sunday, September 27, 2015

"गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या


http://lalbaugkaraja.com/wp-content/uploads/2014/09/Lalbaugcha-Raja-Visarjan-20141.jpg
मी नोकरीसाठी मुंबईला आलो तेंव्हा मित्रांसोबत दादरला रहात होतो. आम्ही सर्वजणच त्या भागतल्या सर्व सार्वजनिक गणेत्सवांमध्ये रोजच अतीशय उत्साहाने प्रेक्षक म्हणून सहभागी होत होतो.  अनंत चतुर्दशीला तर तासन् तास रस्त्यांवरून भटकत राहून दिसतील तेवढ्या खाजगी आणि सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुका आणि मूर्ती, सजावट वगैरे पहात होतो. लग्न करून आधी चेंबूर आणि नंतर अणुशक्तीनगरला रहायला गेल्यावर कित्येक वर्षे या दिवशी बसने शहरात जाऊन शक्य तो दुमजली बसच्या वरच्या भागात बसून दिसतील तेवढ्या मिरवणुका आणि प्रतिमा पाहून त्यांना आपल्या डोळ्याात साठवून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. पुढे वयोमानानुसार तेअवघड होत गेले.  टीव्ही वरील अनेक वाहिन्यांमधून त्यांचे दिवसभर प्रक्षेपण होऊ लागल्यानंतर तेच पहायला लागलो.

मी संसार थाटल्यानंतर दरवर्षी आमच्या घरीच पाच दिवसाचा गणेशोत्सव साजरा करायला लागलो. एकदा नाइलाजाने तो तीन दिवसांचाच करावा लागला तेवढा अपवाद वगळला तर दर वर्षी अधिकाधिक उत्साहाने ते करत गेलो. माझ्या दोन्ही मुलांनीही वेगळ्या ठिकाणी संसार मांडल्यानंतर आपापल्या घरी हे उत्सव सुरू केले आणि ते इंग्लंड किंवा अमेरिकेत असतांनाही सुरू ठेवले. एकदा आम्हीही या वेळी पुण्याला गेलेलो असल्यामुळे तिथल्या घरातल्या उत्सवात तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सहभाग घेतला होता.

या वर्षी प्रकृतीअस्वास्थ्यामुळे आम्ही वाशीच्या घरी घरापुरता उत्सव साधेपणाने साजरा करायचे ठरवले होते. आयत्या वेळी आम्ही दोघेही आजारी पडलो आणि मुलाला पुण्याहून बोलावून घेतले. ते दोघे लगेच आलेच आणि एक दिवस पुण्याला जाऊन त्यांच्या मुलींनाही घेऊन आले. गणेशचतुर्थीच्या आधी माझी पत्नीही हॉस्पिटलमधून घरी आली आणि आम्ही उत्साहाने गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. पण दुस-याच दिवशी मलाच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले आणि मला कळायला लागल्यापासून या वर्षी प्रथमच मी या उत्सवापासून दूर राहिलो. घरातल्या गणेशाला निरोपसुद्धा देऊ शकलो नाही, याची मनाला चुटपुट लागून राहिली.

आज अनंतचतुर्दशीला मी कुठेच बाहेर जाऊ शकत नव्हतो. गावोगावी होत असलेल्या ठिकठिकाणच्या विसर्जनाच्या मिरवणुका आणि दृष्ये  घरी टीव्हीसमोर बसून पहात राहिलो. हे कार्यक्रम पहात असतांना अचानक आमच्या जिन्यामधूनच "गणपतीबाप्पा मोरया"चा जल्लोष ऐकू आला आणि दारात जाऊन पाहिले तोपर्यंत आमच्या बिल्डिंगमधल्याच एका भाडेकरूने बसवलेल्या गणेशाच्या मूर्तीला विसर्जमासाठी खाली  नेत असलेले पाहिले. मी लगेच खिडकीशी जाऊन उभा राहिलो. आमच्या खिडकीच्या खालीच एक व्हॅन उभी होती आणि तिच्या मागच्या भागात ही मूर्ती ठेवली जात होती. मला तिचे पूर्ण दर्शन घडले. मी तिला दोन्ही हात जोडून नमस्कार केला, प्रार्थना केली आणि "पुढच्या वर्षी लवकर या" असे म्हणत  या गणेशमूर्तीलाच मनोमन निरोप दिला. "गणपती बाप्पा, आता पुढच्या वर्षी पुन्हा मला पहिल्यासारखाच पूर्ण उत्सव साजरा करायची संधी द्या." अशी मनोमन प्रार्थना केली.



Thursday, September 24, 2015

गणपतीबाप्पांची इच्छा




आपण सगळ्या चांगल्या कामांची सुरुवात गणपतीचे स्मरण करून करतो. श्रीगणेशा हा या ब्लॉगवरचा पहिला भाग होता. पुढे त्या वर्षी मी एका मोठ्या आजारामुळे अंथरुणाला खिळलो होतो आणि हा ब्लॉग कदाचित बंदच पडेल असे वाटत होते.  त्या वर्षीचा गणेशोत्सव आला. घरी बसल्या बसल्या आणि पडल्यापडल्या गणेशाची अनंत रूपे पाहून आपल्या परीने ती वाचकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचे असे मी ठरवले. गणपतीच्या कृपेनेच मी त्याच्या कोटी कोटी रूपांपैकी काही निवडक रूपे दाखवू शकलो.  'कोटी कोटी रूपे तुझी' ही मालिका मी ओळीने ११ दिवस ११ भागात लिहू शकलो. त्या संपूर्ण कालावधीत माझा संगणक व्यवस्थित चालला, आंतर्जालाशी माझा संपर्क खंड न पडता होत राहिला आणि माझी तब्येत सुधारत गेली, माझा उत्साह आणि आत्मविश्वास वाढत गेला. असे व्हावे ही गणेशाचीच इच्छा आणि लीला असणार.

त्यानंतरच्या काळातसुध्दा मी दरवर्षी माझ्या परीने या ब्लॉगवर गणेशोत्सव साजरा करत राहिलो. 'गणेशोत्सव आणि पर्यावरण' या विषयावर लेखमाला लिहून त्यात दोन्ही बाजूचे मुद्दे मांडले.त्या मालिकेत मी सर्व बाजूने विचार करणारे लेख दिले होते. लोकमान्य टिळकांच्या वेळच्या गणेशोत्सवाची आठवण करून देणारे त्यांचेच लेख दिले. आजच्या काळात होत असलेल्या उत्सवाबद्दल लिहितांना त्यातल्या काही सकारात्मक बाबींकडे लक्ष वेधण्याचा आणि नकारात्मक किंवा वादग्रस्त गोष्टींच्या मागची कारणपरंपरा शोधण्याचा अल्पसा प्रयत्नही केला. गणपतीची स्तोत्रे, कहाण्या, गाणी वगैरेंकडे लक्ष पुरवले, काही जुनी, काही नवी गीते, काही स्तोत्रे, काही स्तोत्रांचे अर्थ वगैरे देण्याचा प्रयत्न केला. गणपतीच्या अनेक नावांची यादी संकलित करून दिली. गणपती आणि चंद्रदेव, स्यमंतकमणी यांच्या कहाण्या सांगितल्या. एका वर्षीच्या  वर्तमानपत्रांमध्ये गणेशोत्सवावर छापून आलेल्या लेखांचा आढावा घेतला. अशा प्रकारे दर वर्षी मी या दिवसात श्रीगणेशासंबंधी काही ना काही लिहीत राहिलो.

या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या एका अपघातात आम्ही दोघेही जबर जखमी झालो होतो. देवाधिदेवाच्या म्हणजे गणपतीच्या कृपेनेच त्यातून बचावलो. त्या काळात मी सतत त्याचाच धावा करत होतो. माझ्या दोन्ही हातांचे ऑपरेशन करावे लागले होते. अलका त्या अपघातामधून सावरते ना सावरते तोपर्यंत तिची काही जुनी दुखणी पुन्हा उफाळून वर आली तर काही नव्या व्याधी उद्भवल्या. यामुळे आम्ही चिंताग्रस्तच होतो. गोकुळाष्टमीच्या सुमाराला आम्हा दोघांच्या प्रकृती जरा स्थिरावल्या. गणपतीबाप्पाचे स्मरण करून त्याचे आभार मानण्यासाठी या वर्षीचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने निदान घरच्या घरापुरता साजरा करायचा असे आम्ही ठरवले. दरवर्षी आम्ही दोघेही मिळून गणपतीची मूर्ती निवडण्यासाठी जात होतो. या बाबतीत अलका जरा चोखंदळ असल्यामुळे त्या ठिकाणी ठेवलेले सगळे गणपती तासभर निरखून पाहून झाल्यावर आम्ही त्यातून आपल्याला हवी त्या आकाराची, रंगाची आणि मुद्रेमधली मूर्ती निवडत होतो. या वर्षी ते शक्यच नव्हते. मी एकटाच लोटलीकरांच्या केंद्रात गेलो आणि पाच मिनिटात निर्णय घेऊन एका सुबक मूर्तीची ऑर्डर दिली. माझ्या हातांच्या नाजुक अवस्थेमुळे या वर्षी मला फारशी सजावट करता येणार नव्हतीच. टेबलावर एकादा पाट मांडून त्यावर आसन पसरायचे आणि त्यावर या मूर्तीची स्थापना करायची असे मनोमनी ठरवले.

पुढचे दोन तीनच दिवस ठीक गेले आणि अलकाला खोकल्याचा त्रास सुरू झाला. तो इतका वाढत गेला की ११ तारखेला तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले. त्या आधी झालेली जागरणे आणि पडलेला ताण या गोष्टी मलाही सोसल्या नाहीत आणि संसर्गही झाला असणार. मी घरी आल्या आल्या माझ्या अंगात भरपूर ताप भरला. लगेच मुलाला पुण्याहून बोलावून घेतले आणि ते दोघेही दुस-या दिवशी वाशीला येऊन हजर झाले. पहिल्या दिवशी तर उदय पूर्णवेळ माझ्यासोबत घरीच राहिला आणि शिल्पा एकटीच हॉस्पिटलमध्ये अलकाजवळ गेली. दोन दिवसांनी माझ्या अंगातला ताप उतरल्यानंतर मी त्यांच्यापुढे गणेशोत्सवाचा विषय काढला आणि यंदा तो साधेपणाने घरच्या घरापुरता साजरा करायचा असल्याचे सांगितले. तोपर्यंत गणेशचतुर्थी  जवळ आली होती.  ते दोघेच जाऊन मी ऑर्डर केलेली मूर्ती घेऊन आले. गुरुवारी गणेशचतुर्थी होती त्याच्या आधी मंगळवारी अलकालाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. आमच्या दोन्ही नाती पुण्याला आजोळी राहिल्या होत्या.  शिल्पा पुण्याला जाऊन त्यांना घेऊन आली. काही वर्षांनंतर पुन्हा आम्ही एकत्र येऊन हा उत्सव साजरा करायचा अशी गणपतीबाप्पाची इच्छा होती. सगळी मंडळी जमल्यावर सर्वांना उत्साह आला. उदयने डेकोरेशनचे थोडे सामान आणले आणि त्या चौघांनी मिळून ब-यापैकी सजावटही करून घेतली.

या वर्षीच्या गणेशचतुर्थीला बाहेरच्या कोणा आप्तेष्ट, शेजारी किंवा मित्रांना बोलावणे शक्यच झाले नव्हते. आम्हीच गणेशाच्या मूर्तीला जिन्यापर्यंत नेऊन वाजत गाजत घरात आणले, दारात येताच त्याचे निरांजने ओवाळून स्वागत केले आणि मखरामध्ये स्थापना केली. आम्ही दोघेही अजून धडधाकट झालेलो नव्हतोच. त्यामुळे आम्ही बसल्या बसल्या सगळा सोहळा पाहिला, पूजाविधीमध्ये किंचित मार्गदर्शन केले आणि आरत्या म्हंटल्या. नैवेद्यासाठी लागणारे तळलेले मोदक आणि पंचखाद्य वगैरे पदार्थ त्या गडबडीतही आदल्या दिवशीच करून ठेवले होते, खव्याचे आणि चॉकलेटचे मोदक दुकानामधून आणले. फळफळावळ आणली आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा गणपतीबाप्पाला व्यवस्थित नैवेद्य दाखवले.

गुरुवारी गणपतीचे आगमन झाल्यानंतर आणखी एक दिवस वाशीला राहून शनिवारी पुण्याला परत जायचा विचार असल्याचे उदयने सांगितले. तोपर्यंत त्यांचा इथला मुक्काम आठवडाभर होत होता.  ते दोघे अचानक इकडे निघून आल्याने त्यांची तिकडली काही कामे अर्धवट राहिली होती, त्याच्या मुलींनी पुण्यातल्या त्यांच्या कॉलनीमधल्या सार्वजनिक उत्सवात भाग घेण्यासाठी नाव नोंदवले होते, गाण्यांची कसून तयारी केली होती. त्यांचा कार्यक्रम शनिवारीच होणार होता आणि त्यांना तो चुकवायचा नव्हता वगैरे कारणे होती आणि आता आमची तबेत आम्ही सांभाळू शकू असे वाटायला लागले होते. त्यामुळे आम्ही त्यांना थांबायला सांगितले नाही.

माझ्या अंगातला ताप उतरला असला तरी अजूनही मला थोड्या हालचाली करताच दम लागत होता. त्यामुळे शुक्रवारी डॉक्टरकडे जाणे आवश्यक होतेच. तिथे ईसीजी काढल्यावर डॉक्टरांना काही शंका आल्या आणि घाबरण्याचे कारण नसले तरी एकदा हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना तो दाखवून येण्याचा सल्ला डिस्पेन्सरीमधल्या डॉक्टरीणबाईंनी दिला.  फक्त ईसीजी दाखवून परत येण्यासाठी आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये  गेलो, पण तिथे गेल्यावर तिथल्या डॉक्टरांनी मला अॅडमिटच करून घेतले. आता उदय, शिल्पा वगैरे सगळेजण पुण्याला परत जाऊ शकत नव्हते.  कोणीतरी इथे असणे आवश्यक झाले होते. त्यामुळे उदय इकडे थांबला आणि मुलींना घेऊन शिल्पा शनिवारी पुण्याला गेली. मुलींच्या शाळांना सुट्या असल्यामुळे रविवारी सकाळीच ते लोक वाशीला परत येणार होते आणि मग उदय पुण्याला जाणार होता. पण त्या दिवशी पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला. त्याचा जोर इतका वाढला की त्यांना तर पुण्याला थांबावे लागलेच पण आज आईला एकटीला घरी सोडून मला भेटायला तू हॉस्पिटलमध्येसुद्धा येऊ नकोस असे मी उदयला बजावले. पावसाचा जोर रात्रीपर्यंत  कमी झाल्यावर पुण्याला गेलेली मंडळी परत आली.

रविवारी सकाळीच ते लोक इकडे आले असते तर उदय लगेच पुण्याला जाऊन सोमवारी त्याच्या ऑफिसात हजर होणार होता, पण गणपतीबाप्पाला ते मंजूर नसावे. मीही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेलो असल्यामुळे गणपतीचे विसर्जन कोण करेल हा एक प्रश्न होताच. त्यामुळे उदयने त्याचा मुक्काम एका दिवसाने वाढवला. सोमवारी संध्याकाळपर्यंत मलाही डिस्चार्ज मिळणार असल्याचे त्याच दिवशी सकाळी ऐकल्यावर मी विसर्जनाच्या आधी घरी जाऊन पोचू शकेन अशी एक आशा निर्माण झाली होती. पण तिथून निघायच्या आधी मला एका हृदयरोगतज्ज्ञाला दाखवायचे होते. बाहेरून व्हिजिट करायला येणारा तो डॉक्टर केंव्हा भेटेल हे कोणी सांगू शकत नव्हता. गणपतीची उत्तरपूजा आणि विसर्जन करण्यापूर्वी मला घरी घेऊन यायचे म्हणून इतर लोक माझ्यासाठी थांबले असते तर कदाचित विसर्जनाला खूप उशीर झाला असता आणि त्या दिवशी गौरीगणपतींचे एकत्र विसर्जन असल्यामुळे रस्त्यात तसेच तळ्यावर प्रचंड गर्दी झाली असती. यावर बरेच वेळा फोनवर उलटसुलट चर्चा करून झाल्यावर मी उदयलाच विसर्जन करून घ्यायला सांगितले.

हॉस्पिटलमधल्या माझ्या तपासण्या आणि त्यावरील कागदी कारवाया उरकून मला प्रत्यक्ष डिस्चार्ज मिळायला रात्रीचे आठ वाजून गेले.  त्यामुळे आमचा निर्णय तसा बरोबर ठरला. पण मला मात्र चुटपुट लागून राहिली. त्या दिवशी मी गणपतीच्या विसर्जनासाठी तळ्यापर्यंत जाऊ शकलो नसतोच, पण निदान घरातली पूजा बघितली असती, आरती म्हंटली असती. घरात आरत्या चाललेल्या असतांना मी सेलफोनवरून त्या ऐकाव्यात आणि हॉस्पिटलमध्येच मनातल्या मनात म्हणाव्यात असा प्रयत्नही केला.  पण नेमक्या त्याच वेळी मला हॉस्पिटलमधल्या अशा विभागात नेले होते जिथे मोबाईलचा सिग्नलच येत नव्हता. या वर्षी गणपतीबाप्पाला माझ्याकडून एवढी सेवा करून घ्यायची नव्हती अशी त्याचीच इच्छा होती असे म्हणायचे. त्याआधी सकाळच्या वेळी बेडवरच बसून मी अथर्वशीर्षाची आवर्तने मात्र केली होती.

अशा प्रकारे या वर्षीच्या आमच्या घरातल्या गणेशोत्सवात अनपेक्षित घटना घटत गेल्या. त्यांचा क्रम आणि टाइमिंग यांचा विचार केल्यास मन थक्क होते. अखेर आपणा सर्वांचा कर्ता करविता तोच असल्याची खात्री पटावी असा हा अनुभव होता. त्वमेव केवलम् कर्ताSसि, त्वमेव केवलम् धर्ताSसि,  त्वमेव केवलम् हर्ताSसि असे जे म्हणत होतो त्याची प्रचीती येत होती.
   







Tuesday, September 08, 2015

मानवी संबंध (उत्तरार्ध) - प्रेमबंध

आधीचा भाग : मानवी संबंध (पूर्वार्ध) -जुळणे आणि तुटणे
http://anandghan.blogspot.com/2015/08/blog-post_29.html

आपण माणसामाणसांमधल्या संबंधांचा विचार करतो त्यावेळी बहुतेक वेळा तो विचार त्यांच्या आपसातल्या चांगल्या संबंधांबद्दल असतो. जवळच्या किंवा सर्वात आतल्या वर्तुळातल्या लोकांशी सर्वांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घनिष्ठ संबंध असतात, माणसांमाणसांमधले अंतर जसजसे वाढत जाते तसतशी त्या  संबंधांची वीण सैल होत जाते. थोड्या बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांशी सर्वांचे सलोख्याचे संबंध असतात आणि दूरच्या इतर लोकांशी कामापुरते वरवरचे संबंध असतात. ज्यांच्याबद्दल मनात वैरभाव किंवा द्वेष असतो त्यांच्याशी सहसा कोणी संबंध ठेवतच नाहीत आणि ठेवलेच तर ते औपचारिक तोंडदेखले खोटे खोटे असतात, म्हणजे खरे तर ते नसल्यातच जमा असतात.  काही वेळा मात्र एका माणसाला दुसरा माणूस जवळचा वाटत असतो पण तो मात्र पहिल्या माणसापासून दूर दूर रहात असतो असे अनुभवसुद्धा येतात. यामुळे त्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होतात.  दोन व्यक्तींमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होत असतांना त्यामधून आपुलकीची भावना निर्माण होते. आपुलकी आणि प्रेमाच्या धाग्याने ते लोक एकमेकांशी बांधले जातात, म्हणून त्यांना संबंध असे म्हणायचे. हे बंधन का आणि कसे होत असेल?

परमेश्वराने किंवा निसर्गाने जगातल्या सर्वच प्राणिमात्रांना स्वतःचा जीव वाचवण्याची एक जबरदस्त अंतःप्रेरणा (Instinct) दिलेली आहे. किडामुंगींपासून वाघ, सिंह. हत्ती वगैरेंपर्यंत प्रत्येक जीव स्वसंरक्षणासाठी सदोदित धडपडत असतो. आपल्या जिवाला धोका आहे असे वाटताच तो लपून बसतो, पळून जातो किंवा शत्रूवर प्रतिहल्ला चढवतो. प्रत्येक सजीव प्राण्याच्या शरीराला अन्नाची गरज असते म्हणूनमुळे ते शोधत तो फिरत असतो आणि त्याला विश्रांती व निद्रा यांची गरज असते म्हणून त्यासाठी तो निवारा पाहतो.  या दोन्हींचा समावेशसुद्धा त्या प्राण्याच्या जीव वाचवण्याच्या मूलभूत प्रेरणेबरोबरच करता येईल. या बाबतीत प्रत्येक प्राणी हा मुख्यत्वे स्वार्थीच असतो. सशक्त शाकाहारी प्राणी दुसऱ्या कमजोर प्राण्याच्या समोरचे अन्न बिनदिक्कतपणे खायचा प्रयत्न करतात तर मांसाहारी प्राणी दुसऱ्या प्राण्यांनाच खाऊन टाकतात. निवाऱ्याच्या बाबतीतसुद्धा निसर्गामध्ये बळकावणे चाललेले असते. सगळे नागोबा आयत्या बिळातच घुसून वास्तव्य करतात. तसे पाहता माणूससुद्धा त्याच्या मूळ स्वभावाने स्वार्थीच असतो, संस्काराने त्याच्यात बदल होतात. त्याशिवाय इतरही काही कारणे असतात.

समस्त प्राणीमात्र नेहमी स्वतःचा स्वार्थ पहात असले तरी त्यांना इतर प्राणीमात्रांच्या सोबतीनेही रहायचे असते. कदाचित त्यात त्यांना अधिक सुरक्षित वाटत असेल. म्हणजे हा सुद्धा आपला जीव वाचवण्याचाच एक भाग झाला. तशा प्रकारची दुसरी अंतःप्रेरणाही त्याला मिळत असते. यामुळेच जगातले बहुतेक प्राणी, कीटक, मासे, पक्षी वगैरे जीव कळप करून राहतात. तसे रहात असतांना त्यांना स्वतःच्या स्वार्थाला थोडी मुरड घालणे, थोड्या गोष्टी इतरांसाठी सोडणे, इतरांचा थोडा त्रास सोसणे वगैरे करणे भाग असते. एकाद्याने तसे नाही केले तर कळपातले इतर प्राणी त्याला हुसकावून लावतील अशी भीती असते. बहुतेक सगळी माणसेसुद्धा लहानमोठ्या समूहांमध्ये राहणेच पसंत करतात. आपले कुटुंब, वस्ती, गाव, प्रदेश, देश, जग  किंवा कुटुंब, पोटजात, जात, धर्म अशा चढत्या भाजणीने त्यांच्या समूहाच्या व्याख्या बदलत जातात एवढेच. त्याचे वागण्याचे नियम त्यानुसार ठरत जातात आणि ते पाळण्याची गरज त्यांना वाटते. ते करत असतांना स्वार्थाला बाजूला ठेवावे लागतेच.

पण या सगळ्यांच्या पलीकडे जाणारी आणखी एक दिव्य अशी अंतःप्रेरणा माणसाला तसेच इतर जीवांना मिळत असते.  प्रत्येक प्राणी किंवा पक्षी आपल्या पिलांवर माया करतात, त्यांचे जिवापाड संरक्षण करतात, त्यांच्यासाठी अन्नाची तरतूद करतात. यात त्यांचा कसलाही स्वार्थ नसतो किंवा हा परस्पर सहकाराचा भागही नसतो. यात शुद्ध आपुलकी आणि प्रेम असते. पक्षी जोडप्याने रहात असतात, त्यांनाही आपल्या जोडीदाराविषयीसुद्धा विशेष असे काही वाटत असणार. एका कळपातल्या प्राण्यांमध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण होत असते. पाळीव प्राणी नेहमीच त्यांना पाळणाऱ्यांशी मायेच्या नात्याने जोडले जातात.  हे मुके जीव त्यांच्या डोळ्यांमधून किंवा अंगलटीला येऊन प्रेम व्यक्त करतात. कुत्रा हा प्राणी तर अत्यंत इमानदार समजला जातो. त्यांचे हे वागणे हे नैसर्गिक स्वार्थभावनेच्या विरुद्ध असले तरी होत असते. ते कशामुळे होत असेल ?

सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा पगडा सर्व माणसांच्या आचार आणि विचारांवर असतो आणि त्यानुसार ती वागत असतात असे आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये लिहिले आहे सांगितले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत या तीन गुणांचे प्रमाण मात्र निरनिराळे असते. दुसऱ्याकडील वस्तू हिसकावून किंवा लुबाडून घेणे, तिचा विध्वंस करणे ही राक्षसी वृत्ती माणसातल्या तम या वाईट गुणाच्या प्रभावामुळे येते. आपल्याला हवे असेल ते आपल्या प्रयत्नाने आणि परिश्रमाने मिळवण्याची धडपड सर्वसाधारण माणसे करत असतात. ही मानवी वृत्तीची क्रिया त्यांच्यातल्या रज या गुणामुळे त्यांच्याकडून घडत असते. काही दुर्मिळ लोक स्वतः उपाशी राहून आपला घास भुकेल्यांना भरवतात, इतरांचा फायदा व्हावा यासाठी स्वतः तोशीस सोसतात. इतरांना सुखी करण्यात स्वतःचा आनंद शोधतात. अशा लोकांची गणना देवमाणूस म्हणून केले जाते. परोपकार, दया, माया, भक्ती, सचोटी, कृतज्ञता वगैरे दैवी गुण माणसातल्या सत्त्वगुणामधून येतात. प्रेमाची भावना हे सत्त्वगुणाचे सर्वात सुंदर असे रूप आहे.  प्रेमळ लोक सात्त्विक प्रवृत्तीचे असतात किंवा सात्त्विक लोक प्रेमळ असतात असे आपण पाहतोच. प्रत्येक माणसाच्या अंगात काही प्रमाणात सत्त्वगुण असतात आणि जे कोणी लोक त्याला आपलेसे वाटत असतात त्यांच्यासंबंधी त्यालासुद्धा प्रेम, माया, ममता वगैरे वाटत असते, तो त्यांची काळजी करतो आणि घेत असतो.

प्रेम ही भावना बांधून ठेवणारी असते. त्याने माणसे एकमेकांशी जोडली जातात आणि राहतात. माणसांना जन्मतःच आईचे प्रेम मिळते आणि ते मिळत राहते. वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, काका, काकू वगैरे घरातील इतर व्यक्तींचा लळा त्यांना सहवासातून लागत जातो. त्यात हळूहळू इतर नातेवाईक, शेजारी, शिक्षक वगैरेंची भर पडत जाते. पुढे त्यांचा स्वतःचा मित्रपरिवार निर्माण होतो आणि तो वाढत जातो. तरुण वयात ते आपल्या जोडीदाराची निवड करतात. नैसर्गिक आकर्षणामुळे त्यांच्या एकमेकांवर वसलेल्या प्रेमाचे धागे खूप घट्ट होतात. ते बंध त्यांना इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचे वाटायला लागतात. अगाध मित्रप्रेमाविषयी खूप लिहिले गेले आहे. देश, धर्म यांच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमासाठी कित्येक भक्तांनी बलिदान केलेले आहे. देवभक्तीमध्ये लीन झालेल्या व्यक्तीला इतर कशाचेच भान रहात नाही. इतकेच काय पण लेखक, कवी, गायक, नटनट्या यांच्यावरील एकतर्फी प्रेमापोटी माणसे वेडी होतात. आवडत्या नेत्याचे अनुयायी आपले तनमनधन त्याला अर्पण करतात.

या सगळ्याच्या मागे असलेले प्रेमबंध हे समान कारण असते.  ज्या व्यक्ती, संस्था किंवा समाज यांच्याविषयी आपल्याला आपुलकी वाटत असते, त्याच्या संबंधातले सगळे काही जाणून घ्यायला, ऐकायला, बोलायला आपल्याला आवडते, त्याला काही होणार तर नाही ना किंवा कसे होणार याची चिंता वाटते आणि काही बिनसले तर दुःख होते, त्याला यश मिळाले तर आनंद होतो. कारण आपण त्याच्याशी जोडले गेलेले असतो. ग्वाटेमालात एकादा अपघात झाला किंवा सोमालियात  दंगल झाली आणि त्यात जीवित वित्त यांची हानी झाली असे आपण बातम्यांमध्ये वाचले किंवा ऐकले तर क्षणभर हळहळ वाटेल, पण तसे काही पुण्यामुंबईला घडले तर आपण बेचैन होऊन जातो कारण ज्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटते अशा अनेक व्यक्ती तिथे रहात असतात किंवा काही कारणाने तिथे गेलेल्या असतात, आपल्याला त्यांची काळजी वाटते,  तिथल्या काही जागांना आपल्या भावविश्वात स्थान असते, त्या ठिकाणच्या नेमक्या परिस्थितीची माहिती मिळवण्यासाठी आपण धडपड करतो. या सर्वांशी आपण बांधले गेलेलो असल्यामुळे तिथे काय घडले याचा आपल्यावर परिणाम होतो.

या विषयावर असंख्य लोकांनी अगणित वेळा अमाप लिहिले असले तरी पुन्हा त्यालर लिहावे वाटते कारण या विषयाबद्दल आपल्याला आणि वाचकांना वाटणारा जिव्हाळा आणि प्रेमबंध.

Saturday, August 29, 2015

मानवी संबंध (पूर्वार्ध) -जुळणे आणि तुटणे

संबंध या शब्दाची व्याप्ती फार विस्तृत आहे. ते व्यक्तीव्यक्तींमधले असतात तसेच इतर सजीव प्राणी, निर्जीव वस्तू, घटना किंवा विचार, सिद्धांत वगैरे अॅब्स्ट्रॅक्ट गोष्टींशीसुद्धा असतात.  आपल्या परिचयातल्या काही व्यक्ती त्यांच्या घरात कुत्रा किंवा मांजर पाळतात, ग्रामीण भागात काही लोकांच्या गोठ्यात गायीम्हशी असतात. त्या मुक्या प्राण्यांशी या लोकांचे घट्ट संबंध जुळलेले असतात. आपण त्यांच्याकडे जात येत असलो तर ते प्राणी आपल्याला ओळखायला लागतात आणि आपल्यालाही त्यांच्याबद्दल काही वाटायला लागते. शिवाय ते लोक आपले आहेत असे जरी म्हंटले की त्यांच्याकडल्या प्राण्यांशीसुद्धा आपला अप्रत्यक्ष संबंध जुळतोच. आपले कपडे, पुस्तके, घर वगैरें निर्जीव पदार्थ आपल्याला जीव की प्राण वाटायला लागतात. आपल्या आयुष्यात घडलेल्या महत्वपूर्ण घटनांचा संबंध आपल्याशीच नव्हे तर आपल्या भूतकाल, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळाशीही असतो. आपले विचार, मते, इच्छा, आकांक्षा, आवडी निवडी वगैरेंचा आपल्याइतका इतर कोणाशीच निकटचा संबंध नसतो.

आपण आधी त्यातल्या मानवी संबंधांबद्दल विचार करू. बहुतेक वेळा हे संबंध आपोआप किंवा योगायोगाने जुळतात, काही लोक त्याला सुदैवाने किंवा दैवयोगाने असेही मानतात. मूल जन्माला येताच त्याचे आई वडील, भाऊबहिणी, आजोबा आजी, काका. मामा, मावशी, आत्या वगैरे सगळ्या नातेवाईकांशी नातेसंबंध ही जन्माला येतात. शाळाकॉलेजात जाताच शिक्षक, प्राध्यापक, सहविद्यार्थी वगैरेंशी संबंध निर्माण होतात, तसेच नोकरीला लागताच सहकाऱ्यांशी होतात. पति किंवा पत्नी यांच्याबरोबरचे लग्न ठरवून केले जात असले तरी त्या क्षणी सासुरवाडीकडच्या सगळ्या नातेवाईकांशीसुद्धा आपले संबंध आपोआप जुळतात. खरेदी विक्रीचा व्यवहार ठरवून केला गेला तरी त्यामधून ग्राहक आणि विक्रेता यांच्याकडल्या इतर लोकांशीही संबंध येत राहतो. अशा प्रकारे बहुतेक सगळे मानवी संबंध आपोआप जन्माला येतात, अगदी थोड्या लोकांच्या बाबतीत मात्र आपण मुद्दाम प्रयत्न करून तो जुळवून आणतो.

मानवी संबंध आपणहून जन्माला येत असले तरी ते संबंध टिकवून ठेवणे मात्र जवळजवळ पूर्णपणे संबंधित व्यक्तींच्या हातात असते. संबंध आलेल्या व्यक्तीशी आपण कसे वागतो, कसे बोलतो याचप्रमाणे तो कसा प्रतिसाद देतो यावर ते अवलंबून असते. यासाठी दोन व्यक्तींनी सतत एकमेकांच्या संपर्कात राहणे आवश्यक असते, निदान ते उपयुक्त तरी असतेच. संपर्क तुटला की संबंधांवर धूळ साचायला लागते आणि ते विस्मृतीत जायला लागतात. आपल्याला  रोजच्या जीवनात जी माणसे भेटतात त्यांच्याशी आपण कधी गरजेनुसार कामापुरते बोलतो किंवा कधी कधी अवांतर गप्पाही मारतो. बोलणे झाले नाही तरी एकादे स्मितहास्य करून किंवा हात हालवून जरी त्याचे अभिवादन केले तरी त्यामधून आपले संबंध टिकून रहायला मदत होते. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायामुळे अनेक लोकांना घर, गाव किंवा देशसुद्धा सोडून दूर जावे लागते. माझ्या लहानपणी पोस्टाने पत्र पाठवणे एवढाच संपर्कात रहाण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध होता. पत्र पोचून त्याचे उत्तर यायला कित्येक दिवस लागत असत. यामुळे अशा प्रकारचा संपर्क फक्त अगदी निकटच्या निवडक लोकांशी ठेवला जात असे. मी तिशीमध्ये आल्यानंतर माझ्याकडे टेलीफोन आला आणि मला निदान काही स्थानिक लोकांशी तरी केंव्हाही बोलणे शक्य झाले. क्रमाक्रमाने एसटीडी आणि आयएसडी यांची सोय झाली आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या आपल्या आप्तांशी बोलणे शक्य झाले. सुरुवातीला या सोयी महाग असल्यामुळे त्यांचा उपयोग जरा जपूनच केला जात असे. आता त्याही आपल्या आवाक्यात आल्या आहेत.

इंटरनेट सुरू झाल्यानंतर ई मेलद्वारे संदेश पाठवणे सुलभ आणि फुकट झाले. टेलीफोनच्या सोयी झाल्यानंतर व्यक्तीगत पत्रव्यवहार जवळजवळ संपुष्टात आला होता. ई मेलमधून त्याला एका वेगळ्या रूपामध्ये नवजीवन मिळाले. हाताने पत्रे लिहिण्याऐवजी लोक त्यांना संगणकावर टाइप करायला लागले. ऑर्कुट, फेसबुक, गूगलप्लस वगैरेंमुळे त्याला आणखी उधाण आले आणि आता ट्विटर आणि व्हॉट्सअपवर तर लहान लहान संदेशांचे महापूर यायला लागले आहेत. या सर्वांमध्ये एक अशी सोय आहे की आपण एकच संदेश एकाच वेळी कित्येक लोकांना पाठवू शकतो आणि त्यांचे प्रतिसादसुद्धा एकाच वेळी सर्वांना मिळतात. हे सगळे अगदी क्षणार्धात होते. यामुळे संपर्क साधून आपापसातले संबंध टिकवून ठेवणे आता खूप सुलभ झाले आहे. आंतर्जालावरली किंवा या मायानगरीतली ही माणसे प्रत्यक्ष आयुष्यात कामाला येतात का? असा प्रश्न विचारला अनेक वेळा जातो. त्याचे उत्तर असे आहे की ही सगळीच माणसे खरोखरच आपल्या उपयोगी पडू शकत नसली तरी एकाद दुसरा तरी मदतीसाठी पुढे येतोच. मुख्य म्हणजे आपली अडचण त्याला लगेच समजते.  एरवीच्या शांततेच्या काळात या मंडळींशी गप्पा मारून किंवा चर्चा करून आपल्याला एक प्रकारचा मानसिक किंवा बौद्धिक आनंद मिळत असतो.  आज माझे सुमारे तीनचारशे अशा प्रकारचे जालमित्र आहेत. त्यांच्याशी निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारता मारता किंवा फक्त त्यांनी टाकलेल्या पोस्ट वाचत व चित्रे पहात पहातसुद्धा सारा दिवस आरामात चालला जातो.

संबंध टिकवून ठेवणे आपल्या हातात असते आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते तोडून टाकणे किंवा वाढू न देणे सुद्धा आपल्याच हातात असते आणि त्यासाठी विशेष काही करावेही लागत नाही. शिवाय आपल्याला ज्यांच्याशी संबंध ठेवायचे असतात तोच जर त्यासाठी उत्सुक नसेल तर मात्र आपण काही करूही शकत नाही. संबंध ठेवले गेले नाहीत तर ते आपल्या आप क्षीण होत होत नाहीसे होतात. काही वेळा काही अप्रिय घटना घडतात त्यामुळे ते तुटले जातात किंवा मुद्दाम तोडले जातात.  दुधाने तोंड पोळलेला माणूस ताकसुद्धा फुंकून पितो याप्रमाणे  वाईट अनुभव आलेले काही लोक कोणत्याही अनोळखी किंवा अविश्वसनीय व्यक्तींपासून  थोडे अंतर राखूनच राहतात. काही वेळा एका काळी जवळची वाटत असलेली  माणसेसुद्धा कोणत्याही कारणाने एकमेकांपासून दूर गेल्यामुळेच संपर्कात रहात नाहीत आणि त्यामुळे ती माणसे हळू हळू मनानेही दूर जातात. आत्मकेंद्रित वृत्तीची (इन्ट्रोव्हर्ट) काही माणसे तुसडी किंवा माणूसघाणीच असतात. त्यांचे कुणावाचून काहीसुद्धा अडत नाही याचीच त्यांना घमेंड असली तर त्यांचे कुणाशीही चांगले संबंध जुळतच नाहीत.

संपर्क जोडणे आणि वाढवणे हे गुण लहान मुलांमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतात.  ती पटकन कोणालाही आपलेसे करतात. पण त्याचप्रमाणे हे सहजपणे जुळलेले संबंध ती लगेच विसरूनसुद्धा जातात. जसजसे वय वाढत जाते, जगाचे अनुभव येत जातात, टक्केटोणपे खाल्ले जातात त्यानुसार माणसे याबद्दल विचार करायला लागतात. कोणाशी किती प्रमाणात जवळचे संबंध ठेवावे हे ठरवायला लागतात. त्या संबंधामधून होत असलेल्या आणि होऊ शकणाऱ्या नफ्यातोट्याचा विचार करायला लागतात.  अशा प्रकारचे संबंध किती विशुद्ध आहेत आणि त्यात किती आपमतलबीपणा आहे हे चांचपून पहातात. लहानपणी जुळलेले संबंध सहसा पूर्णपणे तुटत नाहीत. ती व्यक्ती चारपाच दशकांनंतर जरी भेटली तरी पूर्वीच्या आठवणी उसळून वर येतात. हे काही प्रमाणात मोठेपणी भेटलेल्या व्यक्तींसंबंधातसुद्धा घडत असते. पूर्वीच्या काळी जवळ आलेली एकादी व्यक्ती कित्येक वर्षांनंतर नुसती भेटली तरी आपल्याला केवढा आनंद होतो! आपण तिच्याशी पहिल्याच जवळकीने छान बोलतो, त्यानंतर आपण पुन्हा एकमेकांना निवांतपणे भेटू असे नेहमी बोलले जाते. पण क्वचितच ते अंमलात आणता येते. ज्या कारणांमुळे आपले संबंध कमजोर झालेले असतात ती कारणे शिल्लक असली तर ते नव्याने जुळलेले पूर्वीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी मनापासून खूप प्रयत्न केले जात नाहीत. माझ्या नात्यातली किंवा मैत्रीतली अशी कित्येक माणसे आहेत जी मला अचानक एकाद्या समारंभात भेटतात, त्या वेळी ती अत्यंत आपुलकीने बोलतात, एकमेकांना पुन्हा सवडीने भेटत रहायच्या योजना आखतात आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या एकाद्या समारंभातच भेटतात आणि अशा प्रकारे पूर्वीच्या भेटींची पुनरावृत्ती होत रहाते.

या विषयावर लिहावे तितके थोडे आहे. जे दोन चार ठळक मुद्दे आठवले तसे लिहिले आहेत
. . . .  . . . . .  पुढील भाग : मानवी संबंध (उत्तरार्ध) - प्रेमबंध
http://anandghan.blogspot.com/2015/09/blog-post.html

Friday, August 07, 2015

शस्त्रक्रियेची पूर्वतयारी - भाग २

मी अँब्युलन्समध्ये जाऊन झोपलो त्या वेळी माझ्या डोक्याला झालेली जखम ठणकत असली तरी ते काम करत होते आणि अंगात अशक्तपणा आलेला असला तरी माझ्यात बोलायचे त्राण होते. मी उदयला विचारले, "सगळी कागदपत्रे घेतलीस ना रे?" हो म्हणत त्याने हातातला लिफ़ाफ़ा दाखवला. त्यात फक्त एक रेफ़रल लेटर होते, माझ्या दोन्ही हातांच्या अमक्या अमक्या हाडांचे ऑपरेशन आणि मॅनेजमेंट एवढेच त्यात लिहिलेले होते आणि इतर ठराविक छापील मजकूर होता, बीएआरसी हॉस्पिटलमध्ये याआधी केलेल्या तपासण्यांचे रिपोर्ट, तिथे दिलेली औषधे वगैरेंचे एकादे डोसियर मला अपेक्षित होते, ते नव्हते. एवढ्यात ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि आम्ही मार्गस्थ झालो. फोर्टिस हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी विचारले तर त्यांना काय सांगायचे हा माझ्या मनात उठलेला प्रश्न उदयला विचारायचे राहूनच गेले. त्यासाठी कदाचित उदयला आणखी एक फेरी मारावी लागली असती, पण त्याची गरज पडली नाही. माझ्या एक्सरे फिल्म आमच्याकडेच होत्या, तेवढ्यावरच काम भागले. जिथे आमचा अपघात झाला होता ती जागा वाशीकडे जात असतांना वाटेत आली . आता त्या भयानक घटनेचा मागमूसही तिथे राहिलेला नव्हता. त्यानंतर कित्येक हजार गाड्या त्या स्पॉटवरून गेल्या असतील. त्यातल्या लोकांना आमच्या वाट्याला आलेल्या भोगाची पुसटशी जाणीवही व्हायचे काही कारण नव्हते.

अँब्युलन्समधून उतरल्यावर मला फोर्टिस हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी विभागात दाखल करण्यात आले. त्यासाठी असलेला एक सविस्तर फॉर्म उदयने भरल्यानंतर मला त्यावर सही करायची होती, पण ते शक्यच नव्हते, डावा अंगठाही बँडेजमध्ये बंद होता, मंग उजव्या हाताच्या अंगठ्याला शाई लावून ठसा उमटवला गेला. तिथल्या नर्सने मात्र स्पिरिट लावून ती शाई लगेच पुसून टाकली, बीएआरसी हॉस्पिटलमध्ये डाव्या अंगठ्याला लावलेला रंग पुसट होत निघायला आणखी चार पाच दिवस लागले. अॅडमिशनच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी उदय फोर्टिस हॉस्पिटलच्या अकाउंट्स आणि अॅडमिन डिपार्टमेंट्सकडे ये जा करत होता आणि कॅज्युअल्टीत डोकावून माझ्यावरही लक्ष ठेवत होता. त्या दिवंशी बहुधा ते काम पूर्ण झालेच नाही, त्यातले उरलेले शेपूट त्याने दुस-या दिवशी सकाळी आल्यावर पूर्ण केले. इकडे कॅजियुअल्टीतले डॉक्टर आणि नर्सेस मात्र त्यांच्या कामाला लागले होते. त्यांनी पुन्हा माझ्या सर्व शरीराची संपूर्ण तपासणी केली, हातांवरची बँडेजेससुद्धा उलगडून आणि प्लॅस्टर कापून काढून आतल्या हातांना तपासले. नुकताच एकादा अपघात होऊन आलेला मी एक नवा रुग्ण असावा अशा प्रकारे त्यांचे काम चालले होते.

थोड्याच वेलात डॉ.सिद्धार्थ यादव यांचे आगमन झाले. त्यांचे उंचेपुरे आणि भारदस्त व्यक्तीमत्व याचीच कोणावरही अनुकूल छाप पडत असणार. हे सर्जन आपले ऑपरेशन करणार आहेत हे पाहून त्या अवस्थेतही मला बरे वाटले. डॉक्टरसाहेबांनी आल्या आल्या भराबर सारी कागदपत्रे वाचून त्यांच्या सहाय्यकांच्या नोंदी पाहिल्या. माझे एक्सरे फोटो लक्षपूर्वक पाहून सांगितले की दोन्ही हातांमध्ये प्लेट्स घालाव्या लागतीलच. "आपण उद्या दुपारी ऑपरेशन करून घेऊ" असे त्यांनी सांगितले तेंव्हा तर मला आश्चर्याचा एक लहानसा धक्काच बसला. त्यापूर्वी करायच्या तपासण्यांची एक मोठी यादी त्यांनी सहाय्यकांना पटापट सांगितली. डॉक्टर निघण्याच्या तयारीत असतांनाच डॉक्टर असलेला माझा भाचा श्री तिथे येऊन पोचला. त्याने वैद्यकीय भाषेत काही चर्चा केली त्यावरून मला एवढेच समजले की उजव्या हाताचे जे हाड मोडलेले आहे त्याला हे लोक ह्यूमरस असे म्हणतात. माझे हे हाड़ इतक्या जोराने ठणकत होते की यातल्या ह्यूमरसपणाला (विनोदाला) मी दाद देऊ शकत नव्हतो.

डॉक्टर यादव यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी लगेच सुरू झाली. माझ्या शरीरातल्या रक्तातल्या अनेक घटकांची पुन्हा एकदा नव्याने तपासणी आणि मोजणी करायची होती. त्यासाठी लागणारे रक्त कुठून आणि कसे काढायचे हा प्रश्न होताच. उजवा हात स्लिंगमधून बाहेर काढून त्याच्या मनगटाच्या शेजारी दोन तीन ठिकाणी सुया खुपसून पाहिल्यावर एका जागी त्यांना रक्ताचा झरा  (व्हेन) सापडला. दोन तीन टेस्ट ट़्यूबमध्ये त्यातल्या रक्ताचे नमूने काढून घेतले गेले. रक्तदाब कसा तपासा़यचा हा दुसरा प्रश्न होताच. उजव्या पायाच्या घोट्याच्या आसपास थोडीशी मोकळी जागा मिळाली तिथे बीपी मीटरचा पट्टा गुंडाळून त्याची झाली तशी नोंद केली. त्या वेळी मला मूत्रविसर्जनाचा काही त्रास होत नसला तरी ऑपरेशन करण्यासाठी त्य जागी एक कॅथेटर जोडून ठेवणे गरजेचे होते. ते लावून त्याला प्लॅस्टिकच्या नळीने एक पिशवी जोढून आणि बांधून ठेवली. शरीरामध्ये इंजेक्शने देण्यासाठी उजव्या हाताच्या पंजावर एक आय व्हीसाठी सुई खुपसून ठेवली. माझे शरीर आता पूर्णपणे कॅज्युअल्टीमधील डॉक्टर्स व नर्सेस यांच्या ताब्यात होते. त्यावर जे जे काही चाललेले होते ते स्वस्थपणे पाहणे आणि त्यातून ज्या वेदना होतील त्या सोसणे एवढेच मी करू शकत होतो.

त्यानंतर फोर्टिस हॉस्पिटलच्या निरनिराळ्या विभागांमधून  माझी ट्रॉलीवरली वरात हिंडायला निघाली. एकापाठोपाठ एक आणखी काही तपासण्या करून घ्यायच्या होत्याच. सर्वात आधी आम्ही स्कॅनिंग सेक्शनमध्ये गेलो. स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी उपयोगात येतात तशा बोगी हर्थ फर्नेसेस मी अनेक ठिकाणी पाहिल्या होत्या, एक दोन वेळा इलेक्ट्रिक क्रिमेटोरियमही पाहिले होते, तिथल्या यंत्रांची आठवण मला त्या स्कॅनरला पाहून  झाली. माझ्या ट्रॉलीची उंची तिथल्या बोगीएवढी वाढवून समान केली. मग चार जणांनी चार कोप-यात धरून माझ्या अंगाखालील बेडशीटसकट मला उचलले आणि त्या बोगीवर ठेवले. कारखान्यांमध्ये असते तशी क्रेन वापरली नाही नशीब. मग मला कुशीवर वळवून हळूच माझ्या अंगाखालची बेडशीट काढून घेतली. ऑपरेटरला सोडून बाकी सारे जण त्या खोलीबाहेर गेले. गळ्यात शील्डिंगचे जाड आवरण अडकवून ऑपरेटर माझ्या जवळ आला. मी केंव्हा श्वास घ्यायचा, धरून ठेवायचा, सोडायचा, किती निस्तब्ध रहायचे वगैरे सूचना पटापटा सांगून तो पॅनेलपाशी गेला. मी होकारारार्थी मानसुद्धा हलवली नाही.  

त्याने त्या यंत्राचे बटन दाबताच माझी बोगी हलायला लागली आणि आधी झरकन पुढे सरकली. माझे मस्तक त्या यंत्राच्या कमानीत शिरल्यानंतर तिचा वेग मंदावला आणि ती अत्यंत सूक्ष्म गतीने पुढे मागे सरकायला लागली.  त्या कमानीच्या आत एक प्रचंड आकाराची रिंग होती. एक क्ष किरणाचा झोत त्या रिंगमध्ये गोल गोल फिरत सर्व बाजूंनी माझ्या मस्तकामधून आरपार जात होता आणि पलीकडच्या बाजूला असलेल्या सेन्सर्समध्ये त्याचे रेकॉर्डिंग होत होते. मी भीतीने पटकन माझे डोळे मिटून घेतले, पण तरीही ते तीव्र किरण माझ्या पापण्यांच्या आत जाऊन डोळ्यांच्याही आरपार थेट मेंदूमध्ये जाणार होतेच. पण तेवढ्या एक्स्पोजरमुळे त्या अवयवांना इजा होण्याची शक्यता फार कमी होती. माझे डोके अत्यंत हळूहळू  त्या यंत्राच्या पूर्णपणे आत जाऊन पुन्हा बाहेर आल्यावर त्यााचे घरघरणे थांबले आणि अशा प्रकारे माझा सीटी स्कॅन पूर्ण झाला. त्यानंतर माझ्या खांद्याचा थ्री डी स्कॅन करायचा होता. त्यासाठी मला पुन्हा एकदा त्या यंत्रामधून आतबाहेर केले गेले.

मेंदू आणि खांद्याचे स्कॅनिंग संपल्यानंतर माझ्या हृदयाचा टू डी इकोकार्डिओग्रॅम काढायचा होता. त्यासाठी वेगळ्या खोलीत नेण्यात आले.  तिथल्या डॉक्टरने एक सेन्सर माझ्या छातीवरून फिरवत फिरवत आत काय चालले आहे याची स्क्रीनवर पाहून तपासणी केली. यावेळी आतल्या रक्ताभिसरणाचे खळखळाटासारखे आवाज मलाही मोठमोठ्याने ऐकू येत होते.  आपल्या हृदयामध्ये आपले रक्त अशा प्रकारे उसळ्या घेत असते हे मी प्रथमच अनुभवले आणि सळसळते रक्त असे का म्हंटले जाते हे समजले.

अखेर एकदाचे मला माझ्या खोलीत नेण्यात आले तोंपर्यंत जेवणाची वेळ टळून गेली होती, पण माझ्यासाठी जेवण आणून ठेवलेले होते ते चार घास पोटात ढकलणे आवश्यक होते. दुस-या दिवशी ऑपरेशन असल्यामुळे कडकडीत उपासच घडणार होता. रात्री एक ब्रदर (मेल नर्स) येऊन मला सांगून गेला की दुसरे दिवशी सकाळी सातच्या आत मी थोडा नाश्ता करू शकतो आणि त्यानंतर अकरा वाजेपर्यंत फक्त द्रवरूप पदार्थ सेवन करू शकतो. अकरा वाजल्यानंतर मात्र पाण्याचा थेंबसुद्धा प्यायचा नव्हता. त्यानुसार पहाटेच मला उठवून साडेसहालाच काही खायला दिले गेले आणि त्यासोबत माझी औषधे दिली गेली. त्यानंतर मलाही काही खाण्यापिण्याची इच्छा नव्हतीच. शिवाय एकापाठोपाठ एकेक कामे चालली होती.  एक न्हावी येऊन सर्वांगावरचे केस भादरून गेला. त्यानंतर आलेल्या सुपरवायजरला त्यात काही न्यून दिसले म्हणून त्याने हजामाला पुन्हा पाचारण करून जास्त तुळतुळीत हजामत करवून घेतली. मला आयव्हीमधून देण्यात येत असलेल्या औषधांच्या बाटल्या तर एका पाठोपाठ एक कोणी ना कोणी सारखे येऊन बदलून जात होते. मध्येच एकादी परिचारिका येऊन नाडीचे ठोके, रक्तदाब, रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण, तापमान वगैरे मोजून जात होती.  माझ्याकडे खूपच लक्ष दिले जात होते.

आदले दिवशी केलेल्या रक्ताच्य तपासण्या, सीटी स्कॅन, थ्रीडी स्कॅन, टूडी एको वगैरेंचे रिपोर्ट्स येऊन त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी पाहून झाल्यावरच ऑपरेशनला अनुमती मिळणार होती. आमच्या हॉस्पिटलमध्ये यात निदान दोन तीन दिवस जातात, पण इथे सगळे  समांतर चालले होते. या सगळ्या गोष्टी समाधानकारक असणारच असे गृहीत धरून एकेक कामे उरकवली जात होती. ऑपरेशन तर दुपारी होणार होते. तोपर्यंत अंगात थोडी शक्ती शिल्लक रहावी अशा सूज्ञ विचार करून पावणेअकराच्या सुमाराला मीच माझ्या मुलाला एकादा ज्यूस मागवायला सांगितले. रूम सर्व्हिसने तो येणार असल्याची चिन्हे न दिसल्याने तो स्वतः खाली गेला आणि मोठ्या मिनतवारीने फ्रूटीचे एक पॅकेट घेऊन अकरा वाजायच्या आत वर आला आणि मीही तहान भूक लागलेली नसतांनाच ते प्राशन केले.  

ठरल्या वेळी म्हणजे सुमारे दीड पावणेदोन वाजता मला ऑपरेशन थिएटरकडे नेण्यात आले. पहिल्या दरवाजामधून आत गेल्यावर तिथल्या वेगळ्या गणवेशातल्या स्टाफने माझा ताबा घेतला.  माझ्या व्हीलचेअरला ढकलत असतांना एकाने सहज म्हणून विचारले,  "सकाळपासून काही खाल्ला प्याला नाहीत ना?"
 "अजीबात काही खाल्ले नाही" मी उत्तर देत देत माहिती सांगितली, "फक्त थोडासा फळांचा रस घेतला."
"काय?" असे म्हणत तो जागच्या जागीच थबकला.
"अहो आम्हाला काल असेच सांगितले होते." मी गयावया करत म्हंटले.
"द्रवरूप पदार्थ म्हणजे फक्त पाणी प्यायला परवानगी असते" त्याने नवीनच व्याख्या सांगितली. आता एवढ्या कारणाने माझे ऑपरेशन रद्द होणार की काय? मला चिंता लागली. पण त्या गणवेशधारकांच्या म्होरक्याने पुढे जायचा निर्णय घेतला आणि मला पुढच्या दालनात नेता नेताच एक इंजेक्शन दिले गेले. त्यानंतर काही सेकंदांमध्येच माझी शुद्ध पूर्णपणे हरपली.

Wednesday, July 15, 2015

शस्त्रक्रियेची पूर्वतयारी - १

गुडफ्रायडेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मला अपघात झाला त्या दिवशी काढलेल्या एक्सरेवरूनच माझ्या दोन्ही हातांना झालेल्या दुखापतींची कल्पना डॉक्टरांना आली होती आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणारच आहे हेसुद्धा त्यांनी मलाही लगेच सांगितले होते. पण कुणालाच त्याची घाई दिसत नव्हती. हृदय, फुफ्फुस, जठर, यकृत यायारख्या अवयवांची आपल्या शरीराला सारखी नितान्त गरज असते, पण दोन्ही हातांची घड़ी घालून आपण हवा तितका वेळ बसून राहिलो तरी शरीराचे नेहमीचे सर्व व्यवहार व्यवस्थितपणे चालत राहतात. माझ्या बाबतीत नेमके तसेच झाले. वॉर्डमध्ये दाखल करण्याच्या आधीच माझ्या दोन्ही हातांना करकचून गुंडाळून उरापाशी नेऊन ठेवलेले होते, त्यांची कसलीही हालचाल करणे मला शक्यच नव्हते. चोवीस तास माझी सेवा करण्यासाठी दोन प्रायव्हेट अटेंडंट्स नेमले होते, ते मला उठवून बसवत आणि काम झाले की पुन्हा झोपवत असत, मला खाऊपिऊ घालत आणि नैसर्गिक विधींसाठी जे काही आवश्यक असायचे ते सारे ते करत होते. उदय आणि शिल्पा अधून मधून माझ्या आणि अलकाच्या वॉर्डमध्ये येऊन आमच्याशी बोलत बसायचे, वॉर्डमधल्या तसेच ऑफीसांमधल्या डॉक्टरांबरोबर चर्चा करायचे आणि एकमेकांची माहिती आम्हा दोघाना येऊन सांगायचे. अर्थातच त्यांची यात खूपच धावपळ होत होती. शिवाय आमच्या काही आवश्यक वस्तू किंवा कागदपत्रे वगैरे आणून देण्यासाठी त्यांना वाशीला घरीही जाऊन यावे लागत होते.

आम्हाला अपघात झाला असल्याची बातमी कानोकानी पसरत गेली आणि शनिवारी दुपारी अनेक लोक आम्हाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले . "ये क्या हुवा? कैसे हुवा? कब हुवा ? क्यूँ हुवा ?" वगैरे प्रश्न प्रत्येकाच्या मनात किंवा ओंठांवर असले तरी मी त्यांना उत्तर देण्याच्या स्थितीत नव्हतो. उदयकडे बोट दाखवून "हे त्याला विचारा" अशी विनंती करत राहिलो. "पण हे फार वाईट झालं, असं व्हा़यला नको होतं यावरून पुढे अमक्याचं असं झालं आणि तमक्याचं तसं झालं" अशी चर्चा होऊन वातावरण जास्तच दुःखीकष्टी व्हा़यला लागल्यावर मीच बोलायला सुरुवात केली, "हे पहा, मला तुम्ही दिसत आहात, तुमचं बोलणं ऐकू येत आहे, मीही थोडं बोलू शकत आहे, श्वास घेत आहे, माझी नाड़ी चालत आहे, मी खाल्लेलं अन्न पचत आहे, तेंव्हा देवाच्या दयेनं जेवढं काही आज माझ्याकडे आहे ते खूप महत्वाचं आहे, माझ्या या जखमा ठीक होणार आहेत आणि हातांचे ऑपरेशन झाल्यावर तेदेखील बरे होणार आहेत, म्हणजे मी या अपघातात जे गमावले आहे ते मला परत मिळणार आहे. त्याला अवधी लागेल, तोपर्यंत मला खूप वेदना सहन कराव्या लागतील, त्यासाठी मला या वेळी तुम्हां सर्वांकडून  धैर्य आणि मनोबल हवे आहे." त्यानंतर त्यांच्या बोलण्याला सकारात्मक दिशा आली.
मी त्यांना सांगितले, "माझी शारीरिक दशा तुम्ही पहातच आहात, पण मी एक (केविलवाणे का होईना) स्मित माझ्या (फाटलेल्या) ओठांवर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रत्येक माणसाला सहानुभूति हवी असते, पण अनुकंपा नको असते, मदत हवीशी वाटते पण कींव केलेली आवडत नाही असा मनुष्य स्वभाव आहे. पण या दोन्हींमधल्या सीमारेखा पुसट असतात, त्या केंव्हा ओलांडल्या जातात हे कधीकधी समजत नाही.

माझ्या रक्ताचे नमूने तपासण्यांसाठी पाठवलेले होतेच, क्ष किरणांचे फोटोही काढून झालेले होते, ईसीजी काढून पाहिला यात दोन दिवस गेले. सोमवारच्या दिवशी माझी सोनोग्राफी करायचे ठरले. मला बाटलीभर पाणी घेऊन त्या विभागात पाठवले. तिथे वीसपंचवीस पेशंट आधीपासून येऊन बसलेले होते, त्यात बहुसंख्येने गरोदर स्त्रिया होत्या. काही तांत्रिक कारण किंवा तज्ज्ञांची कमतरता या कारणाने तिथले काम सावकाशीने चालले होते. यामुळे आधीच तंग झालेल्या त्या विभागातल्या वातावरणात मी एका व्हीलचेअरवर सुन्नपणे बसून वाट पहात होतो. माझा नंबर त्या मानाने लवकरच लागला. पण डॉक्टरांनी तपासणी सुरुवात करता करताच विचारले, "इनको क्यों यहाँ लाया है? कौन कहता है कि इनको कोई प्रॉब्लेम है?" ते ऐकून मला थोडे बरेही वाटले , पण मीच त्यांना उत्तर दिले, "मेरा अभी ऑपरेशन होनेवाला है और शायद ब्लड टेस्ट देखकर मुझे यहाँ भेजना जरूरी लगा होगा।" "ओके ओके" करत त्यांनी मूत्रपिंडांची तपासणी करून रिपोर्ट दिला.
तिकडून वॉर्डमध्ये परत येतो तेवढ्यात मला पुन्हा व्हीलचेअरवर बसवून अॅनेस्थेशिया विभागात पाठवले गेले. तिथल्या तज्ज्ञाकडून एका प्रकारचे फ़िटनेस सर्टिफिकेट आणायचे होते. त्या डॉक्टरांनी माझी कसून चौकशी केली. यापूर्वी मला कोणकोणते आजार होऊन गेले? सध्या कोणत्या व्याधी आहेत? त्यासाठी कोणकोणती औषधे चालू आहेत वगैरे. मोतीबिंदू सोडल्यास माझे कोणतेही ऑपरेशन झालेले नव्हतेच, कोणत्याही सर्जनच्या हातातल्या शस्त्राचा माझ्या शरीराला स्पर्श झाला नव्हता आणि यापूर्वी मी फक्त लोकल अॅनेस्थेशिया घेतला होता वगैरे सांगितले. त्या डॉक्टरांना माझा रक्तदाब पहायचा होता, पण दोन्ही हातांना बँडेज बांधलेले असल्याने ते करता येत नव्हते. ते मला त्यांच्या लॅबमध्ये घेऊन गेले. तिथे एक पायाला बांधायचे यंत्र होते, पण त्या बद्दल काही शंकाही होत्या. त्यांनी कसाबसा माझा रक्तदाब मोजला, तो ज़रा जास्तच निघाला. कदाचित सकाळपासून चाललेल्या धामधुमीमुळे आणि मनस्तापामुळेही तो वाढला असेल. मला ऑपरेशन साठी परवानगी मिळाली किंवा नाही तेसुद्धा तेंव्हा समजले नाही.

मला गुडफ्रा़डेच्या रात्री हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यानंतर अनेक तपासण्या सुरू झाल्या होत्या. सोमवारी अल्ट्रासोनोग्राफी आणि अॅनेस्थेशिया विभागात मला व्हीलचेअरवर बसवून नेऊन आणले असले तरी तेवढ्या श्रमानेही थकवा आला होता. अजूनही काय काय बाकी आहे याचा विचार करत मी निपचित पडलो होतो. चोवीस तासाचे मूत्र जमवून त्याची तपासणी करण्यासाठी एक मोठा कॅन आणून कॉटच्या खाली ठेवलेला होता. रक्ततपासणीसाठी आणखी नमूने घेण्यासाठी एक डॉक्टर आला, पण काय करावे ते त्याला समजेना. माझे दोन्ही हात बँडेजमध्ये पाहून त्याने पायात चार पाच ठिकाणी सुया खुपसून पाहिल्या, त्यातल्या कुठूनही त्यालाही रक्त मिळाले नाहीच, माझे सर्वांग आधीच भयानक ठणकत होते त्यात आणखी थोड़ी भर पडली, पायाचा शिल्लक राहिलेला भागही आता दुखायला लागला. आलीया भोगासी मी सादर होत राहिलो.

सोमवारी ६ एप्रिलच्या दुपारी मी वॉर्डमध्ये तळमलत पडलो होतो तेंव्हा ऑॅर्थोपिडिक डेपार्टमेंटमध्ये माझ्या बाबतीत एक वेगळाच विचार चाललेला होता. अलकाचे काही रिपोर्ट आणण्यासााठी उदय वाशीला गेला होता आणि शिल्पा अलकाच्या सोबतीला बसली होती. तिला बोलवून असे सांगितले गेले की बीएआरसी हॉस्पिटलमधले ऑॅपरेशन थिएटर पुढील महिनाभरासाठी बुक्ड आहे, यामुले मला वाशी इथल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पाठवायचे ठरले आहे. या अचानक निर्णयाने गोंधळून जाऊन ती माझ्याकडे वॉर्डमध्ये आली. मी या हॉस्पिटलचा लौकिक ऐकला असल्याने मी तिकडे जाण्यासाठी तयार होतो, पण अणुशक्तीनगर आणि वाशी अशा दोन ठिकाणी आम्ही दोघे असलो तर दोन ठिकाणी लक्ष देण्यासाठी आमच्याकडचे मनुष्यबळ कमी पडत होते. मी स्वतःच अपंग झालेलो असल्यामुले काहीच करू शकत नव्हतो, मला तर हातात मोबाइल फोन धरणेसुद्धा अशक्य होते. त्यामुळे कुणाशी बोलणार आणि कुणाला बोलावणार? उदयशी चर्चा करून ठरवा़यला पाहिजे, यासाठी थोडा अवधी मागा़यला हवा वगैरे मी शिल्पाला सांगितले. थोड्या वेळाने उदय आला तो ऑॅर्थोपिडिक डॉक्टरला भेटूनच माझ्याकडे आला. मला आजच फोर्टिस हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचे ठरलेले आहे, तिथल्या सर्जनशी बोलणेही झालेले आहे वगैरे सांगून झाल्यावर आता आपण कसे तरी मॅनेज करू असे तो म्हणाला. बीएआरसी हॉस्पिटलमध्ये असलेले माझे सामान, मुख्यतः विशिष्ट औषधे खणातून काढून घेतली. मी कॅज्युअल्टीमध्ये येऊन दाखल झालो होतो तेंव्हा काढून ठेवलेले म्हणजे अपघात झाला तेंव्हा माझ्या अंगावर असलेले रक्ताने माखलेले कपडे नेमके या वेळी माझ्याकडे पाठवण्यात आले होते, त्यांना असह्य असा दुर्गंध येत होता. ते गाठोडे उलगडूनही न पाहता जसेच्या तसे डिस्पोज ऑफ करायला मी उदयला सांगितले, त्यानुसार तो ते गाठोडे कोणाच्या तरी स्वाधीन करून परत आला. अँब्युलन्स आल्याचे समजताच मी वॉर्डमधून निघालो, जाता जाता अलकाच्या वॉर्डमार्गे व्हीलचेअर वळवून मी तिला भेटलो. आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यापासून तीन दिवस एकमेकांना पाहिलेही नव्हते आणि आता किती दिवसाचा विरह होणार आहे याची कल्पना नव्हती. पण मी सेंटिमेंटल न होता उभ्या उभ्या म्हणजे व्हीलचेअरवर बसल्या बसल्या तिचा निरोप घेतला आणि अँब्युलन्समध्ये जाऊन झोपलो, अणुशक्तीनगरच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या दिमतीला असलेल्या अटेंडंट्सशी उदयने बोलून घेतले आणि त्यांनाही फोर्टिसमध्ये यायला सांगितले. त्यासाठी त्यांचा भत्ता वाढवून दिला. त्या वेळी माझ्यासोबत असलेला दिवसपाळीचा अटेंडंट आणि उदय यांच्या बरोबर मी वाशी इथल्या फोर्टिस हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी सेक्शनमध्ये येऊन दाखल झालो तोंपर्यंत सहा एप्रिलची रात्र झाली होती.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Tuesday, July 14, 2015

गुड फ्रायडे की very bad Friday?

ज्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या हातापा़यात खिळे ठोकून त्याला क्रूसावर चढवले गेले तो दिवस गुड म्हणजे चांगला कसा असेल? हे कोडे मला खूप दिवस पडत असे, पण त्या दिवशी सुटी असल्यामुळे मिळत असलेली तीन दिवस सलग सुटी मात्र चांगली वाटायला लागली. गेली काही वर्षे त्या तीन दिवसांना जोडून चेंबूरला अल्लादियाखाँ संगीत समारोह सुरू झाल़्यानंतर ती एक पर्वणीच वाटायला लागली होती.

या वर्षीसुद्धा आम्ही दोघे या कार्यक्रमासाठी चेंबूरला जायला टॅक्सीत बसून निघालो होतो. जेमतेम वाशीची खाडी पार केली आणि समोरून येत असलेल़्या मोटारीने धडक देऊन आनच्या गाडीचा चेंदानेंदा केला. क्षणार्धात आम्ही दोघेही जबर जखमी झालो. कसला गुड फ्रायडे? It was a very bad Friday,

या अपघातात माझ़्या दोन्ही हातांची हाडे मोडली होती आणि अलकाला ज़बरदस्त मुका मार लागून तिचे सर्वांग सुजले होते. त्या ठिकाणी जमा झालेल़्या लोकांनी आम्हाला गाडीबाहेर काढले आणि त्यांच्यातल्या एका देवमाणसानेच आम्हा दोघांना लगेच म्हणजे १५ २० मिनिटांमध्ये हॉस्पिटलमध़्ये पोचवले. या जगात अजूनही माणुसकी जीवंत आहे असे म्हणायचे की ही फक्त देवाची असीम कृपा होती!

मी हॉस्पिटलमध़्ये पोचलो तेंव्हा अर्धवट ग्लानीमध्ये होतो. डोक़्याला मोठी खोक पडली होती, एक दात पडून गेला होता, कोप-यावर दोन इंच लांब जखम झाली होती आणि सर्वांमधून रक्त वहात होते. डाक्टर आणि नर्सेस यांनी भराभरा माझे कपड़े टराटरा कापून काढले, माझ्या अंगावर आणखी कुठे कुठे जखमा झाल़्या आहेत का हे पाहून एकेक जखम टाके घालून शिवून वहात असलेले सगळे रक्तप्रवाह बंद केले. माझ्या हातांकडे पहायला मी त्यांना सारखे विनवत होतों कारण मला त्यांच्या वेदना सहन होत नव्हत्या, पण डॉक्टरांच्या प्रायारिटीजच बरोबर होत्या हे मला त्या अवस्थेत समजत नव्हते. जखमांना टाके घालून रक्तप्रवाह थांबवल्यानंतर अस्थितज्ज्ञ पुढे आले आणि त्यांनी दोन्ही हातांची हाडे अंदाजाने बसवून तीवर क्रेप बँडेज गच्च आवळून बांधले. त्यानंतर माझे मोजून सतरा एक्सरे फोटो काढले. ते पाहून झाल़्यावर डॉक्टरांनी असे निष्कर्ष काढले की माझ्या दोन्ही हातांवर शस्त्रक्रिया करावी लागेल, पण डोक्याची कवटी, छातीचा पिंजरा आणि त्यांच्या आतले महत्वाचे सारे अवयव शाबूत आहेत. याचा अर्थ असा होता ती या भयानक अपघातामंधून मी बचावलो होतो. मी परमेश्वराचे कोटी कोटी आभार मानलेच, इतरांनीही निश्वास टाकले.

आम्ही दोघे अपघात झालेल्या जागेपासून निघून हास्पिटलकडे चाललो आहोत एवढे मला उमजत होते पण खिशातला मोबाईल काढून तो वापरणे मला अशक़्य होते. अलकाने कसाबसा तिचा फोन काढून अणुशक्तीनगरमध्ये रहात असलेल्या रश्मीला लावला. सुटीच्या दिवसाची सांज असली तरी रश्मी आणि परितोष हे दोघेही घरीच होते. पहिल़्याच प्रयत्नात फोन लागला आणि रश्मीने तो उचललाही. "अगं, आम्हा दोघांना मोठा एक्सिडेंट झाला आहे आणि आम्ही आता आपल्या हॉस्पिटलमध़्ये येत आहोत ." एवढेच अलका तिला सांगू शकली . ते दोघेही लगेच निघाले आणि आमच्या मागोमाग कॅज्युअल्टी विभागात येऊन पोचले. आमच्या हातातले सामान, खिशातले पाकीट, किल्ल्या, सेलफोन्स, अलकाच्या हातातली आणि अंगावरची इतर आभूषणे, आमची मेडिकलची कार्डे वगैरे सगळ्या वस्तु त्यांनी ताब्यात घेऊन जपून ठेवल्या . डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आणि ते सांगतील ती कामे करीत किंवा आणून देत ते दोघे आमच्या बाजूला उभे राहिले. मधून मधून आमच्याशी बोलत आम्हाला धीर देण्याचे कामही करत राहिले . आमची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली होती, आमची सगळी काळजी ते दोघे घेत होते.

अलकाने रश्मीला फ़ोन केल्यानंतर लगेच उदयला पुण्याला फोन लावला. त्यावेळी तो ऑफिसात एका मीटिंगमध्ये होता . अशा वेळी तो सहसा कोणाचाही फोन घेत नाही, घेतलाच तरी बिझी असल्याचे सांगतो, पण अलकाचा कातर व रडवेला स्वर ऐकून तो दचकला आणि मीटिंग रूमच्या बाहेर जाऊन तिच्याशी बोलला. एक्सिडेंटचे वर्तमान ऐकून तो पुरता हादरला होता हे त्याच्या साहेबाच्या लगेच लक्षात आले, त्यांनी त्याला ताबडतोब मुम्बईला जाण्याची अनुज्ञा केली, कंपनीच्या ताफ्यातले एक वाहन दिले आणि धीर दिला. उदयने लगेच शिल्पाला फोन लावला आणि ही बातमी देऊन लगेच मुंबईला जायचे असल्याचे सांगितले. त्या वेळी त्यांच्या मुली  त्यांच्या आजोळी गेल्या होत्या. यामुळे त्यांची विशेष चिंता नव्हती. उदय आणि शिल्पा हे दोघेही नेसत्या कपड्यांनिशी आपापल़्या ऑफिसांमधून निघून दोन तासांत हॉस्पिटलातल्या कॅज्युअल्टी विभागात येऊन दाखल झाले. दुरून त्यांचे चेहेरे पाहून पहिल्यांदा तर मला भास व्हा़यला लागले आहेत की काय अशी शंका आली, पण ते दोघे जवळ येऊन माझ्याशी बोलले तेंव्हा खात्री पटली. लगेच रश्मी आणि परितोष यांच्याशी बोलून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुढील कारवाईचा ताबा घेऊन रश्मीला तिच्या मुलांकडे पहायला तिच्या घरी जायला सांगितले. रश्मी, परितोष, उदय आणि शिल्पा हे चौघेही नेहमी आपापल्या उद्योगांमध्ये इतके गुंतलेले असतात किंवा कुठे ना कुठे जात येत असतात की त्यांच्याशीलगेच  सम्पर्क होणे जरा कठीणच असते, पण त्या दिवशी मात्र पाच दहा मिनिटांमध्ये तो होऊ शकला आणि ते धावत येऊ शकले हीच केवढी महत्वाची गोष्ट घडली. पुन्हा एकदा देवाची कृपाच म्हणायची!

आमचा अपघात झाला तिथे समोरच एक ट्रॅफिक सिग्नल होता. त्या ठिकाणी नेहमीच काही पोलिस तैनात असतात. मला लोकांनी गाडीच्या बाहेर काढेपर्यंत एक वर्दीधारी तिथे आला होताच. तो आता पंचनाम्याचा घोळ घालेल आणि विलंब करेल अशी भीती मला वाटली, पण त्याने आम्हाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्याची परवानगी दिलेली होती. बहुधा याबाबतीतले नियम आता बदलले असावेत. कॅज्युअल्टी मध्ये आमच्यावर उपचार चालू होते तेंव्हा एक किंवा दोन पोलिस तिथे येऊन पोचले. आमचे डॉक्टर आणि नर्सेस माझ्याशी सतत बोलत राहून मला जागे ठेवत होते, त्यातच ते पोलिससुद्धा अधून मधून मला आता कसे वाटते याची विचारणा करत होते. मी त्यांना किती सुसंबद्ध की असंबद्ध उत्तरे देत होतो हे त्या अवस्थेमध्ये मलाच समजत नव्हते. सुमारे तासाभराने मी ज़रा सावरलो असेन. तेंव्हा त्यांनी माझी ज़बानी नोंदवून घेतली, म्हणजे त्यानेच कागदावर लिहिली आणि त्यावर माझी 'निशाणी डावा अंगठा' उमटवली. त्यातला एक मुद्दा माझी कोणाविरुद्ध काही तक्रार आहे का असा होता. मी तसे करायच्या मनस्थितीतच नव्हतो, शिवाय माझे वय आणि प्रकृती पाहता मला तपास, चौकशी, खटले वगैरेंमध्ये भाग घेणे शक्यच नव्हते. पोलिस कारवाई त्यानंतरही बराच काळ चालत राहिली होती. मला वार्डमध्ये दाखल करून झाल्यानंतर माझा मुलगा काही कागदपत्रे घेऊन पोलिसचौकीत जाऊनही आला. एकंदरीत पाहता मला तरी पोलिसांचे त्यावेळचे वर्तन सौजन्यपूर्ण वाटले.

एकाद्या माणसाच्या कपड्यावर पडलेल्या रक्ताच्या डागाची फोरँसिक सायंटिस्ट तपासणी करून हल्लेखोराला शोधून काढतात वगैरे आपण रहस्यकथांमध्ये वाचतो. पण ती तपासणी वेगळ्या प्रकारची असते, वैद्यकीय उपचारांसाठी मात्र शरीरात वाहणा-या रक्ताचीच तपासणी करावी लागते. मी इस्पितळात पोचलो त्या वेळी माझे सारे कपड़े रक्ताने माखलेले होतेच, दोन जखमा वहातही होत्या. पण तपासणीसाठी त्यांचा उपयोग नव्हता. त्या जखमा आधी बंद करण्यात आल्या आणि त्यानंतर तपासणी करण्यासाठी कुठून रक्त काढायचे यावर विचार सुरू झाला. माझ्या रक्तातल्या तांबड्या आणि पांढ-या पेशी, लोह, साखर, सोडियम, पोटॅशियम वगैरे घटकांचे प्रमाण जाणून घेणे पुढील उपचारांसाठी आवश्यक होते. नेहमी करतात तसे कोप-याच्या खोबणीतून सँपल काढणे माझ्या बाबतीत शक्यच नव्हते कारण दोन्ही हातांवर बँडेज बांधलेले होते. पायामधून रक्त घेण्यासाठी डॉक्टरांनी चार पाच जागी सुया घुसवून पाहिल्या, पण माझे रक्त त्यांमध्ये यायला तयारच नव्हते. अखेर उजव्या हाताच्या पंजामधली एक नस त्यांना सापडली आणि तिच्यातून नमूने काढून तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्या तपासणीचे निकाल हातात आल्यानंतर पुढील औषधे आणि त्यांची प्रमाणे ठरवण्यात आली.

माझ्या शरीराच्या पायापासून डोक्यापर्यंत नखशिखांत भागांचे निरनिराळ्या बाजूंनी (अँगल्समधून) एकंदरीत सतरा एक्सरे फोटो काढले गेले होते. त्यातल्या दोन्ही हातांच्या छायाचित्रांमध्ये तुटलेली हाडे दिसत होती. शरीराचे बाकीचे सर्व भाग ठीक होते. उजव्या हाताच्या खांद्यापासून निघणारे ह्यूमरस या विनोदी नावाचे दंडाचे हाड खांद्यापाशीच पिचकले होते आणि मनगटापासून कोपरापर्यंत जाणा-या दोन हाडांपैकी एकाचा पार चुरा झाला होता. या दोन्ही ठिकाणी धातूच्या पट्ट्या (प्लेट्स) बसवून त्यांना दुरुस्त करावे लागणार होते, म्हणजे त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. अशा प्रकारे माझ्यावर करण्याच्या उपायांची दिशा निश्चित झाली. मला ऑर्थोपीडिक डिपार्टमेंटच्या स्वाधीन करण्यात आले. तोपर्यंत माझा एक मित्र आणि शेजारी पंढरीनाथन तिथे येऊन पोचला होता. तो आणि उदय या दोघांनी हॉस्पिटलमधल्या माणसांच्या साथीने मला अस्थिरुग्णकक्षामध्ये नेऊन दाखल केले. माझ्यासोबत रात्रभर राहून माझी सेवा करण्यासाठी एका अटेंडंटची सोय करण्यात आली. उदयला त्याच्या जखमी आईचीही काळजी घेणे अत्यावश्यक होते . त्यासाठी तो कॅज़्युअल्टी विभागात परत गेला. माझी नीट व्यवस्था लागलेली पाहून पंढरीनाथन त्याच्या घरी परत गेला.

माझ्याप्रमाणेच अलकाच्याही सर्वांगाचे एक्सरे फ़ोटो काढले गेले. सुदैवाने त्यात कोणतेही व्यंग दिसले नाही, सर्व हाडे आणि अवयव शाबूत होते, पण तिला प्रचंड धक्का बसला होता, त्यामुळे ती हादरून गेली होती, अनेक जागी लागलेल्या मुक्या माराने तिचे सर्वांग सुजले होते, गालावर एवढी सूज आली होती की एक डोळा उघडत नव्हता. इतर उपचारांसाठी ती जी औषधे घेत होती त्यातल्या एका औषधाचा असा परिणाम झाला होता की तिच्या शरीरातले रक्त जागोजागी कातडीच्या खाली जमा होऊन ती काळीनिळी झालेली दिसत होती, सर्व अंगामधून होत असलेल्या तीव्र वेदना तिच्याच्याने सहन होत नव्हत्या, अंगात प्रचंड अशक्तपणा आला होता, एक पाऊल उचलावे एवढीसु्द्धा ताकत वाटत नव्हती.

तिला हाडाच्या किंवा कसल्याच शस्त्रक्रियेची गरज नसल्यामुळे सर्जिकल वार्डमध्ये ठेवता येत नव्हते, त्या वेळी तिला ताप, खोकला, रक्तदाब अशा प्रकारची विकोपाला गेलेली कोणतीही गंभीर व्याधी नसल्यामुले मेडिकल वार्डचे लोक तिला घेऊन जायला तयार होत नव्हते. मग तिला हॉस्पिटलमध्ये नेमके कुठे ठेवा़चे यावर कॅज्युअल्टीमध्ये चर्चा चालली होती. उदय आणि शिल्पा हे दोघे नेसत्या वस्त्रांनिशी पुण्याहून आलेले होते, त्या रात्री त्यांनी कुठे मुक्काम करायचा याचाही त्यांनी अजून विचार केला नव्हता. अलकाच्या अशा नाजुक अवस्थेत ते तिला कुठे आणि कसे घेऊन जाणार होते? उदय पोलिस स्टेशन वर जाऊन परत आला तोंवर मध्यरात्र व्हा़यला आली होती. अखेर अलकालाही एका वार्डमध्ये एडमिट केले गेले आणि तिच्या सोबतीला शिल्पा तिथेच राहिली. गुड किंवा bad Friday चा दिवस अशा प्रकारे संपला.

Sunday, May 10, 2015

वर्ल्डकपचे साइड इफेक्ट्स -२ - देशभक्त आणि द्वेषभक्त

वर्ल्डकपच्या सुमाराला मी जे पाहिले आणि वाचले त्यामधून मला जे जाणवले ते शब्दबद्ध करण्याचा एक प्रयत्न मी महिनाभरापूर्वी सुरू केला होता. आपण क्रिकेटचे सामने कसे जिंकले? याबद्दल मी पहिल्या भागात लिहिले होते. या बातम्यांकडे एका वेगळ्या अँगलने पाहतांना मला काय दिसले हे या लेखात लिहीले होते. मध्यंतरी मी एका अपघातात जबर जखमी झाल्यामुळे हा लेख प्रकाशित करू शकलो नव्हतो. मला ती संधी आज मिळत आहे.

वर्ल्डकपाचे सगळे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दक्षिण गोलार्धातल्या दोन देशांमध्ये खेळले गेले होते. तरीसुद्धा हजारो भारतीयांनी यातल्या प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांच्या कक्षांमध्ये गर्दी केली होती. भारतातले सर्वसामान्य नागरीक तर नाहीच, पण उच्च मध्यमवर्गीय लोकसुद्धा स्वतःच्या खर्चाने तिकडे जाऊन हे सामने पाहू शकतील एवढी सुबत्ता अजून आपल्याकडे आलेली नाही. बडे उद्योगपती, सिनेकलाकार किंवा राजकारणी अशा अतीश्रीमंत वर्गातले लोकच हे करू शकतात. अखेरीस ग्राहक, प्रेक्षक किंवा करदाता या नात्याने त्याचा बोजा आपल्यावरच पडत असला तरी तो लक्षावधी लोकांमध्ये विभागून जात असल्यामुळे आपल्याला वेगळा जाणवत नाही. अर्थातच हे सामने पहायला आलेले बहुतेक सर्व भारतीय वंशाचे प्रेक्षक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये वास्तव्य करणारेच असणार. त्यातले काहीजण अमेरिका, सिंगापूर, दुबई वगैरे देशांमधून तिकडे गेलेले असले तरी तेसुद्धा अनिवासी भारतीयच (नॉनरेसिडेंट इंडियन्स) असणार.

यातले काही लोक थोड्या काळासाठी तिकडे जाऊन परत येणार असले तरी बरेचसे लोक तिकडे स्थायिक झाले तरी आहेत किंवा तसा प्रयत्न करीत आहेत. तरीसुद्धा हे सगळे प्रेक्षक भारतीय खेळाडूंना अगदी मनापासून भरभरून दाद आणि खूप प्रोत्साहन देत होते. त्याते काही जण मोठमोठे तिरंगी झेंडे हातात धरून मोठ्या उत्साहाने जोरजोरात फिरवतांना दिसत होते, तर काही लोकांनी आपले चेहेरे तीन रंगांमध्ये रंगवून घेतले होते. हा म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे असा सूर काढणारे काही अतीशिष्ट लोक आपल्याकडे आहेत. पण त्यांच्या नकारात्मक दृष्टीकडे दुर्लक्ष केल्यास या सगळ्या लोकांना आपल्या भारत देशाबद्दल मनातून काही तरी आपुलकी वाटते हे जाणवेल. केवळ हौस किंवा गंमत म्हणून त्यांना एकादा झेंडा फिरवायचा असता किंवा आपले तोंड रंगवून घ्यायचे असते तर त्यांनी मलेशिया, ग्वाटेमाला, झुलूलँड असल्या कुठल्याही देशाचा छान दिसणारा झेंडा किंवा चित्रविचित्र रंगांमध्ये रंगवलेले कसलेही फडके आणले असते किंवा आपल्या चेहे-यावर कुठलेही चित्र रंगवून घेतले असते. पण या प्रसंगी त्यांनी यासाठी तिरंग्याचीच निवड का केली? त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी देशभक्तीची एक लहानशी ज्योत अजूनही तेवत आहे याचेच हे लक्षण होते. परदेशी गेलेल्या भारतीयांच्या मनात अशी थोडी देशभक्तीचा झलक दिसलीच, भारतातल्या लोकांचा उत्साह तर अमाप होता. आपल्या संघाच्या फलंदाजांनी मारलेल्या प्रत्येक चौकार किंवा षट्कारावर आणि मिळवलेल्या प्रत्येक विकेटवर सामना पाहणारे लोक जागच्याजागीच उड्या मारत होते, नाचत होते, प्रत्येक सामना जिंकल्यानंतर फटाक्यांचे आवाज कानावर पडत होते. यात एका प्रकारे त्यांची देशभक्ती दिसून येत होती.

पण स्वतःच्या अत्यंत जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा नगारा सदैव वाजवत असणा-या काही लोकांना क्रिकेट या शब्दाचेच वावडे आहे असेही दिसले. गो-या रंगाच्या आणि ख्रिश्चन धर्म पाळणा-या परकीय आक्रमक लोकांचा हा खेळ भारतीय लोकांनी खेळावा हाच मुळात त्यांना देशद्रोह वाटतो. इथल्या कोट्यावधी लोकांनी तो विदेशी खेळ पहाण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवावा म्हणजे तर त्यांच्या मते देशद्रोहाची परिसीमा झाली. यामुळे क्रोधाने लालपिवळे होऊन त्यांनी सगळ्या जनतेवरच सैरभैर आगपाखड सुरू केली. आजची परिस्थिती काय आहे? आजच्या काळातले इंग्रज हे आपले शत्रू आहेत का? एका काळात त्यांनी सुरू केलेला खेळ आता त्यांचा राहिला तरी आहे का? खेळ हा द्वेष करण्याचा विषय असू शकतो का? असा कसलाही विचार त्यांच्या मनाला शिवत नाही इतके ते द्वेषाने भरून गेलेले आहे. आजच्या काळातल्या भारतातल्या लोकांच्या मनाला त्यांच्या मते कवडीइतके महत्व देण्याचे कारण नाही. देशामधली माणसे वगळून कुठला देश शिल्लक राहतो? देश किंवा राष्ट्र या शब्दाची कसली संकल्पना या लोकांच्या डोक्यात भरलेली आहे हेच मला समजत नाही. 

हे लोक स्वतःला अत्यंत प्रखर राष्ट्रनिष्ठ असे मानतात आणि तसे सांगत असतात. अशा लोकांना देशभक्त म्हणावे की द्वेशभक्त असा प्रश्न पडतो.

Friday, May 08, 2015

देव तारी ....... मला

भाविक लोक मोठ्या श्रद्धेने देवाचे नामस्मरण करत असतात. नास्तिक वाटणारे लोकसुद्धा "अरे देवा (ओ माय गॉड)",  "देव जाणे (गॉड नोज)" असे उद्गार काढत असतात तेंव्हा देवाचे नावच घेत असतात. अचानक एकादे मोठे संकट कोसळते तेंव्हा तर बहुतेक सर्वांनाच 'देव आठवतो' असा वाक्प्रचार आहे. ज्या वेळी साक्षात काळ समोर उभा राहिलेला दिसतो आणि त्यामुळे बोबडी वळलेली असते अशा वेळी तर कोणीही दुसरे काही करूच शकत नाही. पण कदाचित अवेळी आलेला काळ कधी कधी मागच्या मागे अदृष्य होतो आणि तो माणूस भानावर येऊन सुखरूपपणे आपले पुढले आयुष्य घालवू लागतो. असे प्रसंग बहुतेक सर्वांच्या आयुष्यात येऊन जातात आणि केवळ देवाच्या कृपेने आपण त्यातून वाचलो असे तो सांगतो. त्याला तसे मनापासून वाटते सुद्धा. माझ्या आयुष्यात नुकताच असा एक प्रसंग येऊन गेला.

माझी आई सांगत असे की मी लहान म्हणजे दोन तीन वर्षांचा असतांना एकाएकी माझ्या हातापायांमधली शक्ती क्षीण होऊ लागली आणि चांगला दुडूदुडू पळणारा मी लुळ्यापांगळ्यासारखे निपचित पडून रहायला लागलो. त्या काळातले आमच्या लहान गावातले डॉक्टर आणि त्यांना उपलब्ध असलेली औषधे देऊन काही फरक पडत नव्हता. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात सगळ्याच कुटुंबांमध्ये आठ दहा मुले जन्माला येत असत, त्यातली दोन तीन किंवा काही घरांमध्ये तर चार पाच दगावत असे घरोघरी चालत असे. मीही त्याच मार्गाने जावे अशी ईश्वरेच्छाच असेल तर त्याला कोण काय करू शकणार होते?

पण माझ्या आईने मला उचलले आणि घरगुती औषधांमधल्या तज्ज्ञ माई फडके आजींच्या समोर नेऊन ठेवले. मला पाहून झाल्यावर त्यांनी त्यांच्या एका गड्याला हाक मारली. गावापासून तीन चार कोसावर असलेल्या त्यांच्या शेतावर तो रहात असे. माईंना काही वस्तू आणून देण्यासाठी किंवा त्यांच्याकडून घेऊन जाण्यासाठी नेमका त्या दिवशी तो त्यांच्या घरी आला होता. "शेतातल्या अमक्या झाडाखाली तमूक प्रकारचे किडे तू पाहिले आहेस का?" असे त्याला विचारताच त्याने होकारार्थी मान हलवली. त्या किड्याच्या अळ्या आणून द्यायला माईंनी त्याला सांगितले.

त्यानंतर दर चार पाच दिवसांनी तो माणूस थोड्या अळ्या आणून माझ्या आईला द्यायचा. संपूर्ण शाकाहारी आणि अहिंसक असलेली माझी आई किळस न करता त्या अळ्यांना चिरडून त्यात पिठी साखर मिसळून त्याच्या चपट्या गोळ्या करायची आणि बत्तासा म्हणून मला भरवायची. या उपायाने मात्र मी उठून बसायला, उभे रहायला, चालायला आणि पळायला लागलो. मी जगावे अशी देवाची इच्छा होती म्हणून आईला, माईंना आणि त्या गड्याला त्या वेळी ही बुद्धी सुचली असे म्हणून याचे सगळे श्रेय माझी आई मात्र देवालाच देत असे. माझी ही कहाणी माझ्यासमक्षच आईने कितीतरी लोकांना सांगितली असल्यामुळे आपल्याला आता कसली भीती नाही कारण प्रत्यक्ष देव आपला रक्षणकर्ता आहे ही भावना माझ्या मनात रुजली. माझ्या हातून काही पुण्यकर्म झाले की नाही कोण जाणे, पण माझ्या आईवडिलांची पुण्याई मला नेहमी तारत राहिली. लहानपणी माझी रोगप्रतिकारात्मक शक्ती थोडी कमीच असल्याने गावात आलेल्या बहुतेक साथींनी मला गाठले. त्यातल्या काही घातक होत्या, तरीही मी त्यामधून सुखरूपपणे बरा झालो. आईवडिलांच्या पुण्याईमुळे माझ्याभोवती देवाचे संरक्षणाचे कवच असण्यावरचा माझा विश्वास जास्तच वाढला.

कॉलेजशिक्षणासाठी घर सोडल्यानंतर सेवानिवृत्त होईपर्यंतच्या चार दशकांमध्ये मात्र मला कोणताही मोठा आजार झाला नाही. त्यानंतर एकदा मेंदूला होत असलेल्या रक्तपुरवठ्यात बाधा आल्यामुळे डोक्याच्या चिंधड्या उडतील असे वाटण्याइतक्या तीव्र वेदना होऊन मला ग्लानी आली होती तर एकदा गॅस्ट्रोएंटरटाईजच्या जबरदस्त दणक्याने क्षणार्धात डोळ्यापुढे निळासार प्रकाश दिसायला लागला होता आणि कानात पूर्णपणे शांतता पसरली होती. या दोन्ही वेळा आपला अवतार संपला असे आत कुठेतरी वाटले होते. पण त्याच्या आतून कोणीतरी उसळून वर आले आणि मी भानावर आलो. त्या वेळी आलेल्या दुखण्यांवर केलेल्या उपचारानंतर पूर्णपणे बरा होऊन मी कामालाही लागलो. देवाच्या कृपेने आपण त्यातून वाचलो असे मलाही मनापासून वाटले आणि मीही सांगायला लागलो.

माझ्या आयुष्यात बसने किंवा कारने रस्त्यावरून, रेल्वेगाडीत बसून आणि विमानांमधून मी एवढा प्रवास केला आहे की त्यांची अंतरे जोडल्यास या प्रत्येकातून निदान तीन चार तरी पृथ्वीप्रदक्षिणा झाल्या असत्या. अर्थातच यादरम्यान काही अपघातही झाले. पण ते फार गंभीर स्वरूपाचे नसावेत. थोडे खरचटणे, थोडा मुका मार यापलीकडे मला इजा झाली नाही. अनेक वेळा ड्रायव्हरच्या किंवा पायलटच्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि हुषारीमुळे तर काही वेळा निसर्गाने साथ दिल्यामुळे आमचे वाहन अपघात होता होता त्यातून थोडक्यात वाचले. "असे होण्याएवजी तसे झाले असते तर आमची खैर नव्हती, ईश्वरकृपेने आणि नशीबाची दोर बळकट असल्यामुळे आपण वाचलो." असे उद्गार काढले गेलेच. 

महिनाभरापूर्वी झालेल्या मोटार अपघातात आम्ही जिच्यात बसलो होतो त्या टॅक्सीची पार मोडतोड आली होती आणि मला आणि माझ्या पत्नीला जबर इजा झाली होती. रस्त्यावरून जात असलेल्या सात आठ मोटारगाड्या आम्हाला पाहून थांबल्या आणि त्यातून उतरलेली दहापंधरा माणसे गोळा झाली, जवळच उभे असलेले हवालदारही आले. ड्रायव्हरच्या बाजूची दोन्ही दारे मोडून जॅम झाली होती. डाव्या बाजूच्या दरवाजामधून लोकांनी ड्रायव्हरला बाहेर काढले. तो ठीक दिसत होता. माझ्या बाजूला बसलेली अलका असह्य वेदनांनी आकांत करत होती, पण शुद्धीवर होती. तिलाही बाहेर पडता आले. माझ्या डोक्याला खोक पडून त्यातून भळाभळा रक्त वहात होते आणि एक दात पडल्यामधून तोंडातूनही रक्त येत होते. दोन्ही हात पूर्णपणे कामातून गेले असल्यामुळे मला कणभरही हलवता येत नव्हते. डोळ्यावर आलेल्या रक्तामधून एक क्षण सगळे लालभडक दृष्य दिसले की दुस-या क्षणी सगळा काळोख आणि तिस-या क्षणी नुसती पांढरी शुभ्र भगभग अशा प्रकारचा विचित्र खेळ डोळ्यांसमोर चालला होता. मी ड्रायव्हरच्या सीटच्या मागच्या सीटवर अडकून पडलो होतो.

अँब्युलन्सला बोलावून तिथपर्यंत येण्यात अमूल्य वेळ गेला असता. तिथे जमलेल्यातला एक सज्जन गृहस्थ आम्हाला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तयार झाला. पोलिसाने कुठल्या तरी वेगळ्या हॉस्पिटलचे नाव काढताच अलकाने आम्हाला बीएआऱसीच्या हॉस्पिटलमध्येच जायचे आहे असे निक्षून सांगितले. पोलिस केस असल्यामुळे त्यात वेळ जाईल का अशी शंका तिला वाटत होती, पण तसे काही झाले नाही. आमचा टॅक्सीड्रायव्हर त्या सज्जनाला वाट दाखवण्यासाठी त्याच्या शेजारी गाडीत बसला. अलका त्याच्या मागच्या सीटवर बसली. .मी आमच्या टॅक्सीमधल्या माझ्या जागेवरच अडकून बसलेलो होतो. एका माणसाने त्या टॅक्सीत शिरून मला खेचत पलीकडच्या दारापाशी आणले आणि दोघातीघांनी धरून बाहेर काढून उभे केले, त्यांच्या आधाराने मी त्या दुस-या कारपर्यंत चालत आल्यावर त्यांनीच मला आत बसवले आणि अपघात झाल्यावर पाच मिनिटांच्या आत आम्ही तिथून निघालो.

एक दोन मिनिटांनी थोडा भानावर आल्यानंतर मी अलकाला सांगितले, "या क्षणी मी तर काहीही हालचाल करू शकत नाही, तुला शक्य असले तर कोणाला तरी फोन कर." तिने कसाबसा तिच्या पर्समधसा सेलफोन काढून आमच्या भाचीला लावला. आमच्या नशीबाने तो पहिल्या झटक्यात लागला आणि रश्मीने तो लगेच उचललाही. सुटीचा दिवस असला तरी त्या क्षणी ती आणि परितोष दोघेही बीएआरसी क़लनीमधल्या त्यांच्या घरीच होते. "अगं, आम्हा दोघांनाही मोठा अँक्सिडेंट झाला आहे, आम्ही आपल्या हॉस्पिस्टलमध्ये येत आहोत." एवढेच अलका बोलू शकली पण तिच्या आवाजाचा टोन ऐकूनच रश्मी हादरली आणि आमच्या पाठोपाठ ते दोघेही हॉस्पिटमधल्या कॅज्युअल्टीत येऊन पोचले आणि त्यांनी आमच्याक़डे लक्ष दिले. रश्मीशी बोलल्यानंतर अलकाने लगेच पुण्याला उदयला फोन लावून जेमतेम तेवढेच सांगितले. तोही लगेच हिंजेवाडीहून निघाला, त्याने शिल्पाला ताबडतोब वाकड जंक्शनवर यायला सांगितले त्याप्रमाणे तीही तिथे जाऊन पोचली. ती दोघेही अंगावरल्या कपड्यातच पुण्याहून निघून थेट हॉस्पिटमधल्या कॅज्युअल्टीत येऊन पोचले आणि त्यांनी पुढच्या सगळ्या कांमाचा भार उचलला. रश्मी आणि परितोष होतेच, आमचे एक शेजारीगी वाशीहून तिथे आले. त्या सर्वांनी मिळून माझी आणि अलकाची हॉस्पिटलमधली व्यवस्था पाहिली.
 
हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत मला अर्धवट शुद्ध हरपत असल्यासारखे वाटायला लागले होते. तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी सतत माझ्याशी बोलत राहून मला जागृतावस्थेत  ठेवले होते आणि सलाईनमधून पोषक द्रव्ये पुरवून अंगातली शक्ती थोडी वाढवली होती. सगळ्या तपासण्या होऊन त्यांचे रिझल्ट हातात येईपर्यंत शरीरात कुठे कुठे काय काय झाले असेल याची शाश्वती वाटत नव्हती. सगळ्या तपासण्या होऊन गेल्यानंतर असे निष्कर्ष काढण्यात आले की डोक्याला मोठी खोक पडली असली तरी आतला मेंदू शाबूत होता, छाती व पोट या भागात कोणतीही बाह्य किंवा अंतर्गत इजा शालेली नव्हती. पायाला झालेल्या जखमा आणि आलेली सूज फक्त वरवरची होती. उजव्या हाताचा खांदा आणि डाव्या हाताचे मनगट यांच्या जवळची हाडे मोडली असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक झाले होते. जखमांमधून खूप रक्तस्राव झालेला असला तरी रक्ततपासणीमध्ये सगळे घटक प्रमाणात आले होते. पत्नीला माझ्यापेक्षा जास्त ठिकाणी मुका मार लागून सगळ्या अंगाला सूज आली होती, त्यातली एक तर डोळ्याला लागून होती, पण डोळा बचावला होता. दोघांच्याही शरीरातले सर्व महत्वाचे अवयव व्यवस्थित कामे करीत होते. थोडक्यात म्हणजे दोघांच्याही जिवाला धोका नव्हता. ज्याची सर्वांना  धास्ती वाटत होती अशा मोठ्या संकटातून आम्ही देवाच्या कृपेने वाचलो होतो. यापुढे काही काळ आम्हा दोघांनाही असह्य अशा वेदना सहन करत राहणे मात्र भाग होते. तेवढा भोग भोगायचाच होता. पण पुन्हा एकदा देवाने मला तारले होते हे जास्त महत्वाचे होते.

Wednesday, April 01, 2015

आपण क्रिकेटचे सामने कसे जिंकले?


या वर्षीच्या वर्ल्डकपसाठी झालेले बहुतेक सगळे सामने टीव्हीवर पाहून मी स्टार स्पोर्ट चॅनेलसाठी भरलेले पैसे वसूल करून घेतले. भारताच्या संघाने पहिले सात सामने ओळीने जिंकले. ते कशामुळे जिंकले असतील? खरे तर कोणालाही असा प्रश्न पडायचे कारण नव्हते. आपला कप्तान महेंद्रसिंह धोनी ऊर्फ आपला लाडका माही याने या खेळाचा तसेच ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधली पिचेस, हवामान वगैरेचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून ठेवला होता.

प्रत्येक सामन्यातल्या प्रत्येक क्षणी तिथल्या पिचची अवस्था, त्या वेळचे हवामान, वाहत्या वा-याची गती आणि दिशा, खेळत असलेल्या विरुद्ध बाजूच्या फलंदाजाच्या संवयी आणि त्याचे वीक पॉइंट्स वगैरे पाहून कोणाला गोलंदाजी द्यायचे हे तो ठरवत होता. त्या बॉलरने कशा प्रकारचा चेंडू टाकावा, आखूड पल्ल्याचा (शॉर्टपिच्ड) की यॉर्कर, ऑफ ब्रेक की गुगली वगैरेंच्या सूचना माही त्या गोलंदाजांना देत होता आणि तंतोतंत तसेच बॉल ते गोलंदाज टाकू शकत होते. पिचवरल्या विशिष्ट पॉइंटवर ठरलेल्या वेगाने ते चेंडू पडत होते आणि अपेक्षेइतकेच वळत होते. यामुळे विरोधी फलंदाजांच्या फटकेबाजीवर नियंत्रण येत होते, तसेच ते पटापट बाद (आउट) होऊन जात होते. अशा प्रकारे आपण सातही सामन्यांमधल्या सात विरोधी संघांना सर्वबाद करून एक नवा विक्रम नोंदवला.

आपले फलंदाज मात्र फलंदाजी करतांना प्रत्येक चेंडूकडे निरखून पहात होते, त्यातल्या कुठल्या चेंडूला नुसतेच अडवावे, कुठल्या बॉलला जरासे ढकलून एकादी धांव काढावी, केंव्हा त्याला सीमारेषेच्या बाहेर टोलवून चार किंवा सहा रन्स मिळवाव्यात आणि कुठल्या चेंडूला शांतपणे जिकडे जायचे असेल तिकडे जाऊ द्यावे हे ओळखून त्यांनी तुफान फलंदाजी केली आणि प्रत्येक सामन्यात धावांचे पर्वत रचले. यामुळेच आपण हे सातही सामने जिंकू शकलो. असे कोणालाही वाटेल. मला त्यातले फारसे काही समजत नाही, पण या सामन्याचे धावते वर्णन (कॉमेंटरी) करत असलेल्या आणि तज्ज्ञ म्हणून त्या खुर्च्यांवर बसलेल्या आपल्या संघातल्या पूर्वीच्या दिग्गजांनीच हे सांगितल्यामुळे मलाही त्या वेळी ते पूर्णपणे पटले होते.    

पण उपांत्य सामन्यात काय झाले कोण जाणे? या वेळी आपल्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक अगदी सोपे सोपे बॉल्स टाकले आणि त्यांनी त्या चेंडूंना मनसोक्त फटकारून आपल्या संघासमोर धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर आपल्या मुख्य फलंदाजांनी नको त्या चेंडूंना नको त्या वेळी बॅटने निश्कारण स्पर्श करून आपल्या विकेट्स घालवल्या. अशा प्रकारे परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर खेळायला आलेला माहीसुद्धा आपल्या संघाची थोडीबहुत लाज राखण्यापलीकडे काही करू शकला नाही. यामुळे आपण पहिले सात सामने कशामुळे जिंकले असतील? हा प्रश्न पुन्हा मनात डोकावायला लागला. त्याचे उत्तर मला दुसरे दिवशी सकाळच्या टीव्हीवरील बातम्या पहात असतांना मिळाले.

त्या बातम्यांमधल्या हकीकतींबद्दल लिहितांना मी त्यातल्या पात्रांची नावे आणि गावे बदललेली आहेत. तरीही त्याच नावांच्या व्यक्ती त्या गावांमध्ये प्रत्यक्षात रहात असल्यास हा एक योगायोग समजावा आणि या लेखाशी त्यांचा काहीही संबंध असणे अभिप्रेत नाही हे ध्यानात घ्यावे. लखनऊच्या लखनसिंग यादव नावाच्या युवकाने आधी त्याच्या मिशा सफाचट केल्या होत्या. त्या मूछमुंड्याने महिनाभरापूर्वीपासून त्याच्या मिशा पुन्हा वाढवल्या आणि त्यांना पीळ भरू शकण्याइतपत त्या वाढल्या. वर्ल्डकपचा प्रत्येक सामना टीव्हीवर पहात असतांना लखन आपल्या मिशांना आलटून पालटून पीळ भरत असे. आपल्या टीमची बॅटिंग चाललेली असतांना इकडे त्याने मिशीला पीळ भरला की तिकडे फलंदाजाला चौका मिळत असे आणि जरा जोरात पीळ भरला की सरळ सिक्सर. विरुद्ध संघाची फलंदाजी चाललेली असतांना याने इकडे पीळ भरला की तिकडे विकेट पडायचीच म्हणे. वाराणशीच्या बनारसीदासने त्याच्या डोक्यावर चांगली जाड आणि लांबलचक शेंडी वाढवून ठेवली होती. तोसुद्धा आपल्या शेंडीला मागेपुढे किंवा डाव्याउजव्या बाजूला झटके देऊन तिकडे चौकार, षट्कार घडवून आणत होता किंवा विकेट्स घेत होता म्हणे. हे दोघे भय्ये इथे टीव्हीसमोर बसल्याबसल्या मिशी आणि शेंडीच्या रिमोट कंट्रोलने तिकडे दूर देशात चाललेले सामने खेळवत होते.

भारताच्या खेळाडूंच्या कपड्यांचा रंग निळा असल्यामुळे प्रेक्षकांमध्येसुद्धा बहुतेक लोक निळ्या रंगाचे टी शर्ट घालून मॅच पहायला येत होतेच, पण इकडे भारतात रहात असलेले बरेचसे प्रेक्षक नीलकमल, नीलकांत, निळूभाऊ किंवा निळे कोल्हे बनून टीव्हीसमोर बसून ते सामने पहात होते. यामुळे निळ्या रंगाच्या लहरी इकडून निघून त्या खेळाडूंपर्यंत पोचत असा त्यांचा दावा होता. पण पुण्यातले कॅप्टन कर्णिक मात्र 'अंग्रेजोंके जमानेके' कर्नल असल्यामुळे क्रिकेटसाठी 'प्रॉपर' असा पांढरा शुभ्र पोशाख घालूनच मॅच पहायला बसत. गांधीनगरचे डाह्याभाईसुद्धा त्या दिवशी सफेद खादीचा कुर्ता, धोती आणि टोपी परिधान करत असत. त्या दोघांच्या मते शुभ्र रंगामध्ये अचाट सामर्थ्य असते आणि त्याचा फायदा आपल्या संघाला होत असे. सुरतेचा छगनभाई ड्रेसवाला मात्र मुद्दाम विरोधी संघाच्या गणवेशाच्या रंगाचे कपडे घालून बसत. यामुळे ते कन्फ्यूज होऊन सामने हरत असत असे त्याचे म्हणणे पडले.

क्रिकेटच्या मैदानात स्लिप, गली, कव्हर, मिडऑन, मिडऑफ, लाँग लेग, शॉर्ट लेग वगैरे ठिकाणी क्षेत्ररक्षकांना उभे करून व्यूहरचना केली जाते. आपल्या हैद्राबादच्या तिम्मय्याने त्याच्या घरातल्या हॉलमध्येच टीव्हीच्या समोर अनेक खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या आणि सामने पहात असतांना तो घरातल्या मंडळींना या किंवा त्या खुर्चीवर बसायला सांगत असे. त्याने इकडे अशी व्यूहरचना केली की प्रत्यक्षातल्या मॅचमध्ये एकादा कॅच उडून बरोबर त्या ठिकाणच्या फील्डरकडे जात असे आणि तो पकडला जात असे असे त्याचे सांगणे होते. यातल्या एकाद्या ठिकाणच्या खुर्चीवरून तिथे बसलेली व्यक्ती उठली की नेमका तिकडे मॅचमध्ये एक कॅच ड्रॉप होत असे असाही त्याचा अनुभव होता.

याशिवाय कित्येक लोकांनी प्रत्येक मॅचच्या दिवशी कडकडीत उपास पाळले होते आणि मॅचमध्ये विजय मिळाल्यावर पोटभर गोडधोड खाऊन ते सोडले होते. कित्येक लोकांनी आपापल्या देवांना साकडे घातले होते तर कोणी विजयासाठी नवस बोलले होते. अशा प्रकारांचे असंख्य वैयक्तिक प्रयत्न तर होत होतेच, शिवाय गावोगावच्या लोकांच्या समुदायांनी एकत्र येऊन अनेक सांघिक उपाय योजले होते. काही ठिकाणी मंत्रोच्चारासह होमहवन, यज्ञयाग वगैरे चाललेले होते, काही ठिकाणी खूप लोक एकत्र येऊन एकाद्या मंत्राचा हजारो किंवा लाखो वेळा जप करत होते, काही लोक एकाद्या स्तोत्राचे शेकडो किंवा हजारो वेळा पठण करत होते. या सगळ्या लोकांच्या या प्रयत्नामुळेच आपला संघ वर्ल्ड कपमधल्या सामन्यांमध्ये विजयी होत होता अशी त्या सर्वांची श्रद्धा होती.

पण मग उपांत्य सामन्यात काय झाले? याचे समाधानकारक उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते.  बहुधा त्या वेळी या सगळ्याचा अतिरेक झाल्यामुळेच 'अती तेथे माती' असे झाले असेल असे माझे आपले साधे अनुमान आहे. 

Saturday, March 28, 2015

विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग १ ते ३)

२०१५ साली होऊन गेलेल्या या घटना अजून माझ्या लक्षात राहिल्या आहेत. मी आधी हा लेख तीन भागांमध्ये लिहिला होता. ते तीन्ही भाग एकत्र केले. दि.०४-०४-२०२२ 

विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग १)


सूर्य आणि विश्वातले सारे तारे नेहमी आपापल्या जागांवरच असतात. पण आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि आपण तिच्यासोबत फिरत असतो यामुळे आपल्याला ते सगळे पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतांना दिसतात. पृथ्वीबरोबर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतांना आपण त्याला निरनिराळ्या ठिकाणांहून जरा जवळून पहात असतो. यामुळे आपल्याला तो खूप खूप दूर असलेल्या इतर ताऱ्यांच्या तुलनेत हळू हळू सरकत बारा राशींमधून प्रवास करतांना दिसतो. मकर संक्रांतीच्या दिवशी तो धनूराशीमधला प्रवास आटोपून मकर राशीत प्रवेश करतो. पण त्या वेळी सूर्याच्या प्रकाशात आपल्याला आकाशातली धनू रासही दिसत नसते आणि मकर रासही. या दोन राशींमध्ये कसली सीमारेषा तर आखलेली नाहीच. त्यामुळे तो इकडून तिकडे गेल्याचे आपल्याला दिसणार तरी कसे? खरे तर त्या दिवशी आपल्याला आकाशात काहीच वेगळे घडतांना दिसत नाही आणि इतर दिवसांपेक्षा वेगळे असे काही त्या दिवशी प्रत्यक्षात घडतही नाही हे सगळे मला चांगले माहीत आहे. संक्रांत नावाची एक विध्वंसक देवी या दिवशी एका दिशेने येते आणि दुसऱ्या दिशेकडे पहात पहात तिसरीकडे चालली जाते असे सांगितले जाते. प्रत्यक्षात तिला कोणीच कधी पाहिलेले नाही कारण ती फक्त एक रंजक कल्पना आहे याबद्दल मला खात्री आहे. तरीही एकाद्यावर कोणते संकट आले किंवा एकाद्याचे नुकसान झाले तर त्याच्यावर 'संक्रांत आली' असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. त्या अर्थाने या वर्षीची संक्रांत आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आली होती.

या वर्षातली मकरसंक्रांत होऊन गेल्यावर सातआठ दिवसांनी एका पहाटे बाहेरून धडाड् धुम्, फाट् फुट् असे आवाज येऊ लागल्यामुळे मला जाग आली. त्या दिवशी नरकचतुर्दशी किंवा गुढीपाडव्यासारखा पहाटे उठून साजरा करण्याचा कोणताच सण नव्हता, ख्रिसमस, ईद वगैरे नव्हती आणि जैन, बौद्ध, शीख वगैरेंपैकी कोणाचाही सण नव्हता. कोणाची वरात किंवा बारात निघाली असेल म्हणावे तर रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते, भारतपाकिस्तान यांच्यातली क्रिकेट मॅचही कुठे चाललेली नव्हती. मग हे फटाके कोण उडवत असेल? कदाचित शेजारच्या बिल्डिंगमधल्या वात्रट मुलांचे हे काम असावे किंवा दूर कुठे तरी अतिरेक्यांनी केलेले बाँबस्फोट होत असावेत असे काही अंदाज मनात आले.

बाहेरून येत असलेल्या आवाजांपेक्षा घरातल्या पंख्यांमधून येत असलेले घुर्र घुर्ऱ असे आवाज जास्त चिंताजनक वाटल्याने त्यांच्याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे होते. आमच्या घरातली वीज गेली होती आणि इन्ह्रर्टरमधून पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्यामुळे पंखे कुरकुरत होते हे लक्षात येतांच आधी पंख्यांची बटने बंद केली. पहाटेच्या वेळी त्यांची फारशी गरजही वाटत नव्हतीच. समोरच्या आणि शेजारच्या बिल्डिंग्जमध्ये उजेड दिसत होता पण आमच्या बिल्डिंगमधल्या जिन्यातले व गेटवरचे दिवे बंद झाले होते. यावरून हा फक्त माझ्या घरातला प्रॉब्लेम नसून आमच्या बिल्डिंगचा आहे एवढे लक्षात आले. कदाचित मुख्य फ्यूज उडला असेल आणि सकाळी कोणीतरी तो लावून देईल असे वाटले.

बाहेर थोडा उजेड झाल्यावर मी नित्याचा मॉर्निंगवॉक घेऊन परत आलो. आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे आणि टाटापॉवर कंपनीत काम करणारे सद्गृहस्थ खाली भेटले. "वीज आली का?" असे त्यांना विचारताच "बहुतही व्होल्टेज फ्लक्च्युएशन हो रहा है।" असे पुटपुटत ते त्यांच्या गाडीत बसून चालले गेले. मला काहीच समजले नाही. मी आमच्या सोसायटीच्या सेक्रेटरीला फोन लावला. तोही म्हणाला, "अरे साब, ४०० व्होल्ट्सतक व्होल्टेज जा रहा है। आप अपने कॉस्टली इक्विपमेंट्सको बचाइये। कोई केबल फॉल्ट लगता है।" माझ्याघरात तर अजीबातच वीज नव्हती, पण या केबलफॉल्टचे काही सांगता येत नाही. मागे एकदा एका केबलफॉल्टमुळे चक्क न्यूट्रल वायरमधून फेजमधला करंट येत होता आणि त्या गोंधळात आमच्या वॉशिंगमशीनचे कंट्रोल सर्किट जळून गेले होते, त्याचा मला चांगला फटका बसला होता. ते आठवल्याने मी सावध झालो, फ्रिज, टीव्ही, वॉशिंगमशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरेंची सगळी स्विचे तर फटाफटा ऑफ केलीच, त्यांचे प्लग्जही सॉकेट्समधून काढून ठेवले.  

आमच्या भागातल्या सबस्टेशनमधून आमच्या बिल्डिंगमध्ये येणारा विजेचा प्रवाह वाहून नेणारी भूमीगत (अंडरग्राउंड) केबल होती. जमीनीखाली ती नेमकी कुठून नेलेली होती, त्यात कोणत्या जागी हा फॉल्ट आला असेल, म्हणजे ती केबल तुटली बिटली असेल ते कसे शोधून काढतात आणि त्याची दुरुस्ती कशी केली जाणार होती याची कणभरही कल्पना आम्हा कोणाला नव्हती. त्या कामाला अनिश्चित काळ लागणार होता एवढे मात्र निश्चितपणे वाटत होते. यामुळे माझ्यासमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला.

त्या वेळी अलकाला आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेले होते आणि त्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण घरी आल्यानंतर तिला प्राणवायूच्या कृत्रिम पुरवठ्याची गरज पडणार होती. त्यासाठी आणलेले यंत्र चालवण्यासाठी विजेची आवश्यकता होती आणि वीज नसेल तर आमची पंचाईत होणार होती. शिवाय वीज नाही म्हणजे पाण्याचे पंप चालणार नाहीत, ओव्हरहेड टँकमध्ये पाणी भरता येणार नाही, त्यात शिल्लक असलेले पाणी संपले की घरात पाण्याचा ठणठणाट होणार, विजेशिवाय अॅक्वागार्ड चालणार नाही, म्हणजे टँकच्या तळातले गाळाने गढूळ झालेले पाणी मिळणार ते आजारी व्यक्तीला कसे द्यायचे आणि मी तरी ते कसे प्यायचे? स्वयंपाक तरी कुठल्या पाण्याने करायचा? अशा वेळी हॉटेलातले जेवण मागवून खाणेही योग्य नव्हते. असा सगळाच घोळ झाला होता. यामुळे त्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळाला तर कोणा नातेवाइकाच्या किंवा मित्राच्या घरी नेऊन ठेवावे का? तसेच ही गोष्ट तिला कशी सांगावी व पटवून द्यावी? याच विचारात मी धडपडत होतो.

पण या वेळी काही तातडीची कामे करणेही आवश्यक होते. आधी स्वयंपाकघरात आणि बाथरूम्समध्ये शक्य तेवढे नळाचे पाणी भरून ठेवले. त्यानंतर इन्व्हर्टरकडे मोर्चा वळवला. महाराष्ट्रात जेंव्हा बारनियमन आणि भारनियमन जोरात चालले होते तेंव्हा घरातली वीज रोजच जायची. यामुळे घरात इन्हर्टर बसवून घेतला होता आणि त्याचा चांगला उपयोग होत होता. पुढे विजेच्या पुरवठ्य़ात सुधारणा होत गेली. तरीही वाशीला अधूनमधून वीज जातच असल्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट अगदीच वाया गेली नाही असे वाटण्याइतपत त्याचा उपयोग होत राहिला. एकदा त्याची बॅटरी आणि एकदा इन्हर्टरही बदलून झाले होते. मात्र गेल्या तीन चार महिन्यात वीजेचा पुरवठा खंडित न झाल्यामुळे कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या त्या यंत्राकडे आमचे दुर्लक्षच झाले होते. पण या अचानक आलेल्या आपत्तीमुळे मात्र आता त्या यंत्राला महत्वाची भूमिका बजावायची होती आणि त्यासाठी त्याच्याकडे लक्ष देणे आवश्यक होते.

मी आधी पेट्रोल पंपावर जाऊन डिस्टिल्ड वॉटरचा कॅन आणला, इन्हर्टरच्या वजनदार बॅटरीला कसेबेसे ओढत कोपऱ्यातून बाहेर काढले आणि ते उकळून शुद्ध केलेले पाणी त्यातल्या तहानलेल्या सेल्सना पाजले. त्यांनीही ते गटागटा पीत जवळजवळ अख्खा कॅन संपवून टाकला. आणखी काही काळ लोटला असता तर कदाचित त्यांचे डिहायड्रेशन होऊन त्यांनी मानच टाकली असती. आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आलेल्या संक्रांतीमुळे त्या बॅटऱ्यांना मात्र नवजीवन मिळाले होते.

घरकाम आणि स्वयंपाक करणाऱ्या बायांना मी वीज आणि पाणी जपूनच वापरण्याच्या सूचना दिल्या, पण त्यांनी अनवधानाने काही दिवे आणि पंखे लावले आणि थोडे पाणी वाहून जाऊ दिलेच. त्यामुळे बॅटरीतली थोडी वीज खर्च झाली आणि पाण्याचा साठाही कमी झाला. तोंपर्यंत घरातले सगळे नळ तर कोरडे झालेले होतेच.  माझ्यासमोर असलेला प्रश्न जास्त गंभीर झाला. हा प्रॉब्लेम अलकाला लगेच फोनवर सांगावा की बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला प्रत्यक्ष भेटून सांगावा याचा विचार मी करत असतांना तिचाच फोन आला. मी काही बोलण्याच्या आधीच तिचा हिरमुसलेला स्वर कानावर पडला. हॉस्पिटलमधले डॉक्टर्स त्यांच्या वॉर्डमधल्या रोजच्या राउंडवर येऊन गेले होते, पण तिची केस ज्या मोठ्या डॉक्टरीणबाई पहात होत्या त्या काही कारणाने आल्या नव्हत्या आणि तिला डिस्चार्ज देण्याचा निर्णय त्यांच्या संमतीशिवाय घेतला जाणार नव्हता. यामुळे तिचा तिथला मुक्काम एका दिवसाने वाढला होता.

खरे तर हे ऐकून मला जरा हायसे वाटले होते, पण माझ्या आवाजातूनसुद्धा तिला तसे कळू न देता मी तिची समजूत काढली. "आणखी एक दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याने तुझी तब्येत आणखी सुधारेल, आज ज्युनियर डॉक्टर्सच्या मनात कदाचित काही शंका असल्या तरी उद्या मोठ्या डॉक्टरांनीच तुला तपासून खात्री करून घेतली तर मग घरी आल्यावर काही प्रॉब्लेम येणार नाही. एका दृष्टीने ते ही ठीकच आहे. मला आणखी एक दिवस तुझ्यापासून दूर रहावे लागेल, पण त्याला काही इलाज नाही. मी दुपारी तुला भेटायला येईनच, तेंव्हा काय काय आणायचे आहे?" विषय बदलून झाल्यावर कोणाकोणाचे फोन येऊन गेले? ती मंडळी कशी आहेत? काय म्हणताहेत? वगैरेंवर चर्चा करून संभाषण संपवले.

काही वेळाने बाहेरून कोणी तरी मोठ्याने बोलत असल्याचा आवाज ऐकू आला. बाल्कनीत जाऊन पाहिले तर एक माणूस आमच्या बिल्डिंगच्या काम्पाउंडजवळ असलेल्या एका झाडावर चढला होता तर त्याचा साथी फूटपाथवर असलेल्या दिव्याच्या खांबापाशी उभा होता. त्याने दिव्याच्या वायरला जोडलेली एक लहान जाडीची केबल झाडावरल्या माणसाकडे फेकली, त्या माणसाने ती ओढून घेतली आणि तिची गुंडाळी करून आमच्या अंगणात फेकली. त्यानंतर त्या दोघांनी आत येऊन ती केबल आमच्या बिल्डिंगच्या मुख्य कनेक्शनला जोडून दिली आणि विजेचा तात्पुरता पुरवठा सुरू करून दिला.

वीज कंपनीच्या लोकांनी केलेल्या या जुगाडू प्रकारच्या उपाययोजनेचे मला कौतुकही वाटले आणि त्यातला धोकाही जाणवला. पण त्या क्षणी तरी आमचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. आम्ही लगेच पाण्याचे पंपिंग सुरू करून दिले. ओव्हरहेड टँकमधून नळाला पाणी येऊ लागताच आंघोळ केली, कपडे धुवून टाकले, इन्हर्टरची बॅटरीही चार्ज करून घेतली. केबल फॉल्टची पक्क्या स्वरूपाची दुरुस्ती होईपर्यंत थोडा मोकळा श्वास घ्यायची सोय झाली होती.

.  . . . . . . . . . . . . .  . . . . . . (क्रमशः) 

विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग २)


मकरसंक्रांत होऊन गेल्यावर सातआठ दिवसांनी केबल फॉल्टच्या रूपाने या वर्षीची संक्रांत आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आली होती. आणि त्यामुळे आमच्या घरातली वीज अचानक गेली होती. त्या वेळी अलकाला आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेले असल्यामुळे माझी चांगलीच तारांबळ उडाली होती वगैरे हकीकत या लेखाच्या पहिल्या भागात दिली आहेच. त्या दिवशी मी हॉस्पिटलला जायला निघालो तेंव्हा आमच्या घराच्या पलीकडच्या इमारतीसमोरच्या फुटपाथवर तीन चार माणसे हातात कुदळ, फावडे, पहार वगैरे घेऊन कुणाची तरी वाट पहात बसली होती. त्या अर्थी आमच्या भूमीगत केबलच्या दुरुस्तीसाठी चक्रे फिरायला सुरुवात झाली होती आणि काही तासांमध्ये ते काम पूर्ण होईल अशी आशा होती. मी जरा खुशीत येऊन पुढे गेलो.

कुठल्याही पतीला पत्नीशी बोलत असतांना हं, हां याच्या पलीकडे जास्त काही उच्चारायची जास्त गरज सहसा पडत नाही किंवा त्याला तशी जास्त संधीही मिळत नाही हे एक वैष्विक सत्य आहे. त्या दिवसभरात हॉस्पिटलमध्ये आलेले अनुभव, घरात करायची साचलेली कामे, बाजारातून आणायचे असलेले सामान यासारख्या अनेक विषयांवर अलका बोलत राहिली आणि मी ते ऐकत राहिलो. घरातल्या वीजपुरवठ्यावर आलेल्या संक्रांतीचा उल्लेख मी मुद्दामच टाळला. मी हॉस्पिटलमधून घरी परत येत असतांना आमच्या घराजवळच्या रस्त्याच्या कडेला एक खड्डा खणलेला मी चालत्या रिक्शेमधूनच पाहिला. त्या खड्ड्यातून बाहेर काढलेल्या विजेच्या केबलवर जो़डणीसाठी शस्त्रक्रिया सुरू होती. ते लोक नेमके काय करत होते ते पाहण्याची मला उत्सुकता असली तरी सकाळपासून झालेल्या धावपळीनंतर तिथे जाऊन उभे राहण्यासाठी माझ्या अंगात त्राण उरले नव्हते आणि पोटात सडकून भूकही लागली होती. त्यामुळे मी रिक्शा सरळ आमच्या घरापर्यंत नेली, चार घास जेवण पोटात ढकलले आणि बिछान्यावर आडवा झालो. तोपर्यंत वीजही आली. पहाटे तिच्य़ावर आलेली संक्रांत बहुधा रात्री तिच्या निजधामाला परत गेली असे वाटले.

दुसरे दिवशी अलकाला हॉस्पिटलमधून घरी आणले. अजूनही तिला संपूर्ण विश्रांतीची गरज होती. तिच्याकडे लक्ष देऊन मी जमतील तेवढी कामे उरकून घेत होतो. असाच आणखी एक दिवस सुरळितपणे पार पडला. त्या दिवशीच्या रात्री साडेतीनच्या सुमाराला पुन्हा पंख्याचे जोरात घुरघुरणे सुरू झाल्याने मला जाग आली. पंखा बंद करून खिडक्या उघडल्यावर थंड आणि ताजी हवा आत आली. अलकाचे ऑक्सीजनचे मशीन बंद करावे लागले, पण ती गाढ झोपेत होती. दचकून किंवा खडबडून जागी झाली नाही. मीही थोडा वेळ आडवा झालो आणि तिच्याकडे लक्ष ठेवत राहिलो. आजूबाजूच्या इमारतींमध्ये लखलखाट होता पण आमचीच बिल्डिंग अंधारात होती. याचा अर्थ आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आलेली संक्रांत अजून इथेच मुक्कामाला राहिली होती. दोन दिवसांपूर्वी केलेली केबलदुरुस्ती बहुधा कुचकामी ठरली असावी. सकाळ होईपर्यंत मला त्यावर काहीही करणे शक्य नव्हते. पहाटेची वाट पहात राहिलो.

बिल्डिंगमधले इतर लोक उठण्याच्या आधीच मी भल्या पहाटे उठून एक मोठे पातेलेभर पाणी स्वयंपाकघरातल्या नळावर भरून ठेवले आणि त्या दिवशीच्या स्वयंपाकाची सोय केली. कोपऱ्यात रिकामा पडलेला प्लॅस्टिकचा ड्रम बाथरूममध्ये नेऊन भरून ठेवला. पूर्वी कधीकाळी विजेचे भारनियमन चाललेले असतांना घेऊन ठेवलेल्या या वस्तूंचा पुन्हा एकदा उपयोग करण्याची वेळ आता आली होती. पिण्यासाठी गाळलेले भरपूर पाणी चार पाच बाटल्यांमध्ये आदल्या रात्रीच भरून ठेवलेले होते. नळाला पाणी येत होते तोपर्यंत सकाळची सगळी कामे आणि आंघोळ वगैरे आटोपून घेतली. आता केंव्हाही ते गेले तरी काही वांधा नव्हता.

अलकाचे ऑक्सीजनचे मशीन बंद झाले होते हे सकाळी उठल्यानंतर तिच्या लक्षात आले. पण सुदैवाने त्या वेळी तिला काही त्रास होत नव्हता. ऑक्सीमीटर लावून तिच्या रक्तातले प्राणवायूचे प्रमाण तपासून पाहिले, ते थोडे कमी झाले असले तरी मर्यादेतच होते. ही जमेच्या बाजूची गोष्ट होती. ते आणखी कमी झाल्यानंतर तिला जाणवले असते आणि त्याहून कमी झाल्यावर त्याचा त्रास झाला असता. याचा अर्थ आमच्याकडे बरेच मार्जिन होते. आता मला विजेचे नियोजन करणे शक्य होते आणि बराच वेळ वीज आली नाही तरी तिचा फार मोठा प्रोब्लेम होणार नव्हता. बॅटरीवर चालणारे दुसरे ऑक्सीजनचे मशीन थोडा वेळ चालवून रक्तातले प्राणवायूचे प्रमाण वाढवायचे आणि काही वेळ मशीन बंद करून ठेवायचे असे करून ते जास्त वेळ चालवणे शक्य होते. इन्हर्टरच्या विजेवर मशीनची बॅटरी चार्ज करून घेऊन तिचे आयुष्य वाढवता येत होते.

त्या दिवशी इन्व्हर्टरचा उपयोग फक्त या एकाच कामासाठी करायचा असे मात्र आम्ही ठरवले. आमच्या घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये थोडा फार सूर्यप्रकाश येत असल्यामुळे दिवसा उजेडी विजेचे दिवे लावायची चैन एक दिवस करायची नाही, जानेवारीचा महिना असल्यामुळे एकादा दिवस पंख्याशिवाय राहणे अशक्य नव्हते. टीव्हीचे जास्त अॅडिक्शन बरे नाही असे म्हणताच माझ्या कॉम्प्यूटरच्या व्यसनावर गाडी घसरली. तो दिवस 'नो टीव्ही आणि नो कॉम्प्यूटर डे' असा साजरा करायची घोषणा केली. त्यामुळे मला बराचसा मोकळा वेळही मिळाला.

कपाटांमधले सामान काढून ते आवरायला घेतले. त्यात काही जुने फोटो, पत्रे वगैरे मिळाली. त्यांनी मला भूतकाळाची सफर घडवून आणली. नजरेआड गेलेल्या काही उपयोगाच्या किंवा शोभेच्या वस्तू गवसल्या. त्या नव्याने मिळाल्याचा आनंद झाला. शीतकपाटाचे मुख्य यंत्र (रेफ्रिजरेटरचा कॉम्प्रेसर) थंड पडल्यामुळे त्यातले तपमान वाढायला लागले. त्यातले उरलेसुरले आइसक्रीम वाया जाऊ नये म्हणून खाऊन फस्त केले आणि फळांचे रस (फ्रूट ज्यूस) पिऊन टाकले. ज्यांच्या टिकण्याबद्दल शंका होती अशी काही फळे, भाज्या आणि इतर खाद्यपदार्थ बाहेर काढले. "आम्ही सारे खवय्ये" आणि "खाना खजाना" या कार्यक्रमांच्या गेल्या दोन तीन आठवड्यातल्या भागात पाहिलेल्या काही रेसिपीजचे प्रयोग त्यांच्यावर करून पाहिले. कुठलाही तिखटमिठाचा पदार्थ चांगला खरपूस भाजला किंवा तळला तर मस्तच लागणार आणि कुठल्याही गोड पदार्थात मुबलक बदाम, काजू, बेदाणे वगैरे घातले तर तो कशाला वाईट लागणार आहे? "शाहंशाही ताश्कंदी टिक्का", आणि "मॅजेस्टिक बव्हेरियन फज्" असली फॅन्सी नावे देऊन त्या पदार्थांचा आस्वाद घेतला. थोडक्यात म्हणजे वीजपुरवठ्यावर आलेल्या संक्रांतीच्या या वेळच्या फेरीमुळे आपण गांगरून न जाता तिला धीराने तोंड देऊन जमेल तेवढी  मजा करायची असे मी या वेळी ठरवले होते. 

  .  . . . . . . . . . . . . .  . . . . . . . . . . . . . . . . .. (क्रमशः) 

विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग ३)

मकरसंक्रांत होऊन गेल्यावर सातआठ दिवसांनी केबल फॉल्टच्या रूपाने या वर्षीची संक्रांत आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आली होती. केबलची दुरुस्ती झाल्यानंतर ती संक्रांत बहुधा तिच्या निजधामाला परत गेली असे मला वाटले होते. पण ती इथेच मुक्कामाला राहिली होती. दोन दिवसांनी तिने पुन्हा दुसरा फटका दिला, पण संक्रांतीच्या या वेळच्या फेरीमुळे आपण गांगरून न जाता तिला धीराने तोंड द्यायचे असे मी या वेळी ठरवले होते आणि मी त्यासाठी तयार राहिलो होतो. या वेळी मी दिवसभर घरीच होतो आणि तो दिवस 'नो टीव्ही आणि नो कॉम्प्यूटर डे' असा साजरा करायचा असल्यामुळे मला बराचसा मोकळा वेळ मिळाला होता. मी दर तासा दोन तासांनी खाली उतरून रस्त्यावर जात होतो आणि आमच्या बिल्डिंगच्या वीजपुरवठ्याला पूर्ववत करण्यासाठी नेमके कोणते उपाय योजले जात होते याचा मागोवा घेत होतो.

वीज कंपनीच्या कामगारांनी येऊन सगळी पाहणी केली आणि पुन्हा एकदा केबलफॉल्टच आला आहे असा निष्कर्ष काढून ते लोक परत गेले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी खणलेला खड्डा अजून भरलेलाही नव्हता. त्यानंतर आलेल्या कामगारांनी त्या खड्ड्यातली माती उकरून आधी मारलेला केबलचा जॉइंट पाहिला. तो ठीकठाकच दिसत होता. त्या लोकांनी तिथून खणायला सुरुवात करून तो खड्डा रस्त्याच्या कडेने वाढवत नेला. दीड दोन मीटर्स लांब खड्डा खणून झाल्यानंतर त्यांना केबलमधला नवा दोष (फॉल्ट) सापडला. या दोन ठिकाणांमधली खराब झालेली केबल बदलायचे ठरवून ते लोक केबलचा एक नवा तुकडा घेऊन आले. त्यांनी हा तुकडा जुन्या केबलच्या जागेवर ठेऊन त्याला दोन्ही बाजूंच्या बाकीच्या केबलशी दोन ठिकाणी नवे जॉइंट्स मारून जोडले.

आमच्या इमारतीला विजेचा पुरवठा करणारी ही केबल चौपदरी होती. मनगटाएवढ्या जाड मुख्य केबलचे जाड आणि कठीण कवच काढल्यावर आत लाल, पिवळ्या, निळ्या आणि काळ्या रंगाच्या अंगठ्याएवढ्या जाड चार केबल्स होत्या. आर, वाय आणि ब्ल्यू या तीन फेजमधल्या विजेचा पुरवठा तीन रंगांच्या केबल्समधून होत होता आणि काळ्या कॉमन न्यूट्रल केबलमधून ती वीज ग्रिडकडे परत जात होती. या प्रत्येक लहान केबलमध्येसुद्धा दीडदोन मिलिमीटर जाडीच्या पंधरावीस अॅल्युमिनियमच्या तारा दाटीवाटीने बसवलेल्या होत्या. यामुळे यातली एक एक केबल एकेका सळीसारखी दिसत होती. हे लोक त्यांना एकमेकांसोबत कसे जोडणार होते ते मला माहीत नसल्यामुळे ते पाहण्याची मला उत्सुकता होती.

त्या लोकांनी अॅल्युमिनियमच्या जाडसर नळीचे बोटबोटभर लांब असे अनेक तुकडे आणले आणि दोन बाजूच्या तारा एकेका तुकड्यात दोन बाजूंनी घुसवून त्या पोकळ तुकड्याला आतल्या तारांवर हातोडीने मारून चांगले चेचून काढले. अशा त-हेने त्या दोन तारा त्या नळीच्या तुकड्यांमधून एकमेकींशी जोडल्या गेल्या. लाल, पिवळ्या, निळ्या आणि काळ्या रंगाच्या तारांसाठी दोन ठिकाणी अशा प्रकारचे प्रत्येकी चार जॉइंट्स करून त्यांनी हे जोडणीचे काम केले. त्यावर इन्सुलेशन टेपचे अनेक थर गुंडाळून झाल्यावर त्यामधून विजेचा पुरवठा सुरू केला गेला. विजेवरल्या संक्रांतीचा हा अध्याय एकदाचा मिटला असे मला एकीकडे वाटत होते, पण या जुन्या केबलमध्ये आणखी कुठे कुठे नवे फॉल्ट्स निर्माण होणार आहेत ही शंकासुद्धा मनात येत होतीच.

या घटनेला दोन तीन दिवसही झाले नसतील तेवढ्यात या वर्षीच्या संक्रांतीने पुन्हा आपला तडाखा आम्हाला दिला. मात्र या वेळी तिने फक्त आमच्या फ्लॅटमधल्या विजेवरच हल्ला चढवला. एका संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला आमच्या घरातले सगळे दिवे अचानक प्रखर आणि मंद व्हायला लागले, टेलिव्हिजनवरील चित्रे थयथयाट करायला लागली, एरवी सुप्तावस्थेत पडून असलेले इन्व्हर्टरवरचे तीन लाल दिवे आलटून पालटून डोळे मिचकावायला लागले. इन्व्हर्टरमधून खस्स्स खस्स्स असे लहानसे स्पार्क पडल्याचे आवाज ऐकायला येऊ लागले. आम्ही लगेच टीव्ही बंद केला. आमच्या इन्व्हर्टरमध्येच काही लोचा झाला असावा असे गृहीत धरून त्याच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला असलेली सगळी बटने दाबून पाहिली, स्विचे वर खाली करून पाहिली, पण अपेक्षेप्रमाणे काहीच घडत नव्हते. एक तर घरात संपूर्ण अंधार व्हायचा, नाही तर सगळे दिवे प्रखर आणि मंद होण्याची भुताटकी व्हायची. बहुधा या वेळी संक्रांतीने तिच्या एकाद्या गणाला सोबत आणले असावे. आम्हाला क्षणभर काहीच समजेनासे झाले, तेंव्हा आमच्या नेहमीच्या इलेक्ट्रिशियनला म्हणजे पठारांना फोन लावला. त्यातल्या त्यात सुदैवाची एक गोष्ट घडली. "इस लाइनकी सभी लाइने व्यस्त है।", "आप जिस फोनसे संपर्क करना चाहते हैं वह इस समय संपर्कक्षेत्रके बाहर है।", "डायल किया हुवा नंबर मौजूद नही है।" अशा प्रकारचा कोणताही संदेश आला नाही. चक्क पठारांनीच फोन उचलून हॅलो म्हंटले. मी लगेच त्यांना विचारले, "पठार, तुम्ही आत्ता कुठे आहेत?"
"सेक्टर १७ मध्ये" त्यांनी सांगितले.
"अहो तुम्हाला काय सांगू? आमच्या घरातले दिवे सारखे सेकंदासेकंदाला जाताय्त आणि येताय्त, इन्व्हर्टरमधून कसले कसले आवाज येताय्त. तुम्ही लगेच येऊन पाहू शकाल का? नाही तर रात्रभर आम्हाला वीजही नाही आणि इन्व्हर्टरही नाही असे झाले तर मोठे प्रॉव्लेम येतील हो."
माझ्या आवाजातली काकुळती पाहून त्यांनी लगेच यायचे कबूल केले. मी एक मेणबत्ती पेटवली आणि विजेचे मेनस्विच आणि इन्व्हर्टर या दोघांनाही बंद ठेऊन अंधारात बसून राहिलो. सांगितल्याप्रमाणे पठार आले. त्यांनी इन्व्हर्टर सुरू केला तर या वेळी तो सुतासारखा सरळ झाला होता. त्यातून येणारे चित्रविचित्र आवाज येणेही बंद झाले होते. मेन स्विच ऑन करून मात्र काही उपयोग झाला नाही. आमच्या घरातला वीजपुरवठा बंद झालेला होताच. शेजारी आणि जिन्यातले दिवे मात्र लागलेले होते.
"अहो, तुम्ही नक्की विजेचं बिल भरलं होतं ना?" या वेळी एक अविश्वासदर्शक विचारणा व्हायला हवीच होती.
"आता या अंधारात तुला रिसीट शोधून काढून आणून दाखवू का?" हर सवाल का सवाल ही जवाब हो या जुन्या गाण्याची मला आठवण झाली.
पठारांनी आमच्या घरातला कंट्रोल बोर्ड उघडून दोन तीन जागी टेस्टर टोचला आणि तिथपर्यंत सप्लाय येत नसल्याची खात्री करून घेतली. मग आम्ही दोघेही खाली उतरलो. बिल्डिंगच्या स्विचबोर्डाच्या जाळीदार कॅबिनेटचे कुलूप उघडले. तिथल्या भिंतीवरल्या बोर्डावर चौदा मीटर्स दाटीवाटीने लावलेली होती आणि त्यांचे चौदा फ्यूज खालच्या जागेत दाटीवाटीनेच बसवले होते. त्यातले आमचे मीटर आणि फ्यूज शोधून काढले. खरे तर त्यासाठी प्रयत्न करण्याची गरजच नव्हती. त्यातली फ्यूजवायर नाहीशी झालेली होतीच, तिला जोडलेल्या तारेवरचे इन्सुलेशनही जळून काळे ठिक्कर पडले होते, शिवाय ते अजून धुमसत असल्याने जळक्या रबराचा वास दरवळत होता. त्या वायरला टेस्टरने जरासे हलवताच तिच्यातून भल्या मोठ्या ठिणग्या पडत होत्या. झोपडपट्ट्यांपासून गगनचुंबी इमारतींच्या वरच्या मजल्यांपर्यत अनेक ठिकाणी लागलेल्या आगी इलेक्टिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्या असल्याची शंका घेतल्याच्या अनेक बातम्या मी वाचल्या होत्या, पण आतापर्यंत माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. या वेळी आमच्या घराकडे येणा-या मुख्य वायरमधून येणा-या मोठ्या ठिणग्या पाहिल्या आणि त्या बातम्या मला ख-या वाटायला लागल्या. जर एकादा ज्वालाग्राही पदार्थ जवळपास असता तर त्याने पेट घेणे या ठिणग्या पाहून शक्य वाटत होते. आमचे नशीब म्हणा किंवा आमचा शहाणपणा म्हणा, अशा कुठल्याही वस्तू त्या जागेच्या आसपास ठेवलेल्या नव्हत्या.

फ्यूजला जोडलेली वायर का जळली असेल? हा प्रश्न मला पडल्याने मी पठारांना विचारला. "वायरिंग जुनं झालंय्." असे एक मोघम उत्तर मिळाले. खरे तर फ्यूजने सर्वात आधी वितळून वीजपुरवठाच बंद करावा आणि इतर उपकरणांना वाचवावे असे अपेक्षित असते, मग या वेळी तसे का झाले नाही? या जागची फ्यूज कधी आणि कुणी लावली होती हेसुद्धा मला माहीत नव्हते किंवा आठवत नव्हते. त्या वेळेलाच त्यात काही तरी घोटाळा झाला असला तर आम्ही किती वर्षे असुरक्षितपणे रहात होतो याचा विचार मनात आला. पठारांनी मात्र शांतपणे जळलेला वायरचा तुकडा काढून त्या जागेवर नवा तुकडा बसवला आणि फ्यूजच्या जागी एमसीबी बसवून वीजप्रवाह सुरू करून दिला.

या घटनेला आठवडाही झाला नसेल तेवढ्यात पुन्हा एका भल्या पहाटे बाहेरून धडाड् धुडुम्, फाट् फुट् असे आवाज येऊ लागल्यामुळे मला जाग आली. त्याच वेळी आमच्याकडली वीज गेली असल्याचेही लक्षात आले. दोन तीन आठवड्यांपूर्वी पहिल्या वेळी जेंव्हा असले आवाज यायला लागले होते तेंव्हा ते फटाक्यांचे आवाज असावेत असे मला वाटले होते आणि त्याच वेळी गेलेल्या विजेकडे सगळे लक्ष द्यावे लागल्यामुळे मी त्या आवाजांकडे दुर्लक्ष केले होते. या वेळी मात्र विजेच्या वारंवार जाण्याची संवय झालेली असल्यामुळे मी त्या विचित्र आवाजांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. हे आवाज जमीनीखालील केबलमध्ये होत असलेल्या भयानक स्पार्किंगमुळे निघत असल्याचे कळल्यामुळे अचानकपणे असे आवाज येणे आणि त्याच वेळी वीज जाणे यात जवळचा संबंध आहे हे पहिल्यांदाच माझ्या लक्षात आले. हे सगळे जसे मला समजले तसेच ते इतरांच्याही लक्षात आले असणार. आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी माझ्या घराच्या वरच्या मजल्यावरच राहतात. पहाटेच्या शांत वातावरणात त्यांचे टेलिफोनवरून चालत असलेले संभाषण मला ऐकू येत होते. आमच्या घराजवळ जमीनीखाली मोठमोठे स्फोट होत असल्याचे कुणाला तरी ओरडून सांगून त्यावर ताबडतोब उपाययोजना करायला ते जोराजोरात सांगत होते. पाच मिनिटातच मोटारसायकलवर बसून एक जोडगोळी आली, त्यांनीही ते स्फोटाचे आवाज ऐकले, कदाचित ते त्यांच्या ओळखीचे असतील. त्यांनी लगेच सबस्टेशनमध्ये जाऊन आमच्या सोसायटीचा वीजपुरवठा खंडित केला. 

सकाळी मी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडलो तेंव्हा घटनास्थळावर जाऊन पाहिले. आठवडाभरापूर्वी केलेल्या दुरुस्तीनंतर त्या केबल्सना जमीनीखाली गाडून त्यावर माती पसरलेली होती, पण वर काँक्रीटचे कवच केलेले नव्हते. खड्ड्यातली ती माती भिजून ओली किच्च झालेली दिसत होती. त्याच जागी एक टोयोटा गाडी उभी होती आणि तीदेखील भिजलेली दिसत होती. बहुधा रात्री कोणीतरी ती गाडी तिथे उभी केली होती आणि पाण्याने धुतली होती. जमीनीतले पाणी केबलच्या इन्सुलेशनच्या आतपर्यंत झिरपत जाऊन शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामधून ठिणगी पडताच त्या पाण्याची वाफ होऊन तिचा स्फोट झाला असावा. त्या स्फोटाने केबल तुटल्यामुळे आमच्याकडची वीज गेली असली तरी सबस्टेशनपासून त्या जागेपर्यंतचे सर्किट शाबूत होते. त्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा थोडे पाणी झिरपून इन्सुलेशनच्या आत शिरले की दुसरा स्फोट होत असेल अशा प्रकारे तो प्रकार दहा पंधरा मिनिटे चालला होता. वीजपुरवठाच बंद केल्यानंतर ते थांबले. त्यानंतर वीजकंपनीच्या लोकांनी यथावकाश येऊन पुन्हा एकदा ती केबल जोडून दिली. यावेळी मुद्दाम तिकडे जाऊन त्यांचे काम पहावेसेही मला वाटले नाही.

एकाच ठिकाणी पंधरावीस दिवसांमध्ये तीन वेळा केबव फॉल्ट आल्यामुळे वीजमंडळाच्या उच्चपदस्थांनाही त्यात लक्ष घालावेसे वाटले आणि त्यांनी ती जुनी केबलच बदलण्याचा निर्णय घेतला. पण त्यात एक अडचण होती. आमची बिल्डिंग आणि जवळचे सबस्टेशन यांच्या मधून एक रस्ता जातो. त्या रस्त्याखालून जात असलेली केबल बदलायची असल्यास त्या रस्त्यावरील रहदारी बंद ठेऊन त्या रस्त्याच्या आरपार जाणारा खड्डा खणून काढावा लागणार. यासाठी महानगरपालिकेची परवानगी हवी. ती मिळायला खूप वेळ लागणार. यावर त्यांनी एक उपाय काढला. हे काम एका वेळी न करता ते दोन टप्प्यात करायचे असे ठरवले. त्या रस्त्याच्या आमच्या बाजूच्या कडेला एक लाल रंगाचे मोठे कपाट आणून उभे केले. त्यांच्या भाषेत त्याला केबल पिलर असे म्हणतात. या पिलरमध्ये तीन फेजेस आणि न्यूट्रल केबल्सना जोडणारे पॉइंट्स आणि फ्यूज वगैरे असतात. या पिलरपासून ते आमच्या घऱापर्यंत एक नवी केबल टाकली. पण रस्त्याच्या पलीकडल्या बाजुने आलेली केबल पिलरपर्यंत पोचू शकली नाही. यामुळे त्यादरम्यान पुन्हा एक जोड आलाच.

केबलमधला हा जोड टिकाऊ आहे असे त्यावेळी सांगण्यात आले होते, पण तो जेमतेम महिनाभर टिकला. त्यानंतर म्हणजे मागल्या आठवड्यात पुन्हा एकदा रस्त्याखालून स्फोटाचे आवाज येऊ लागले, धूर यायला लागला. वीजकंपनीच्या लोकांनी येऊन रिपेअरीचे काम केले, पण तेही फुसकेच ठरले, तीन चार तासदेखील टिकले नाही. त्यानंतर अधिक खोलवर आणि दूरवर खणून त्यांनी त्याच ठिकाणी दुसरा जोड (जॉइंट) मारला आणि जमीनीतल्या पाण्याने तो भिजू नये म्हणून तो खड्डा न बुजवता अजून तसाच ठेवला आहे. केबलसाठी हे ठीक असले तरी माणसांसाठी ते असुरक्षित आहेच. शिवाय कावळे, चिमण्या, उंदीर, घुशी, कुत्री, मांजरे वगैरे प्राणी केंव्हा त्यात जाऊन कडमडतील आणि कसले घोटाळे करून ठेवतील ते सांगता येत नाही. रस्त्याखालून आरपार जाणारी केबल बदलून हा जोड जेंव्हा नाहीसा होईल तोपर्यंत या धोक्याची टांगती तलवार शिल्लक राहणार आहे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास या वर्षी आमच्या घराच्या वीजपुरवठ्यावर आलेली संक्रांत अजून परत गेलेली नव्हतीच.
आमच्या बिल्डिंगच्या समोरचा रस्ता खणणेही शक्य होत नव्हतेच.  त्यानंतर वीजबोर्डाच्या लोकांनी आणखी एक वेगळी युक्ती योजिली. आमच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला दुसऱ्या एका मोठ्या कॉलनीतल्या बिल्डिंग्ज होत्या. त्यांच्यासाठी वेगळे सबस्टेशन होते. तिथून एक लांबच लांब केबल जमीनीवरूनच आणून ती कुंपणावरून आमच्या बिल्डिंगमध्ये टाकली आणि तिच्यातून वीजपुरवठा करून दिला.     
 

 . . . . . . . . . .  . . . . . . . . (समाप्त)