Friday, December 18, 2015

मित्र, यार, दोस्त आणि फ्रेन्ड्स (पूर्वार्ध)श्रीकृष्ण आणि सुदामा ही बालमित्रांची जोडी प्रसिद्ध आहे. जिवलग मित्रांच्या जोडगोळीना नेहमी त्यांची उपमा दिली जाते. सगळ्या पौराणिक चित्रांमध्ये अगदी छोट्या बाळकृष्णाला देखील छान इवलासा पितांबर नेसवला जात असला तरी सुदामा, पेंद्या आदि त्याच्या सवंगड्यांना बहुधा लंगोटीच नेसवलेली दिसते. कदाचित यावरूनच 'लंगोटीयार' हा शब्द प्रचारात आला असावा. पुढच्या पिढीतल्या मुलांना लंगोटी हे वस्त्र पहायलाही मिळणार नाही. तेंव्हा वयाने कदाचित याच्याही मागे जाऊन 'डायपर फ्रेंड्स' असा नवा शब्दप्रयोग रूढ होईल.

मी शाळेत शिकायला जाण्याच्या आधीपासूनचे माझेही काही लंगोटीयार होतेच. आम्ही साधारणपणे एकाच काळात अर्धी चड्डी घालायला लागलो होतो आणि शालेय शिक्षण संपेपर्यंत बहुधा हाफ पँटच घालतही होतो. पुढे मी कॉलेजशिक्षणासाठी आमचे गांव सोडून पुण्यामुंबईकडे गेलो तसे माझे बालमित्रही चहू दिशांना पांगले गेले.  मी आधी दोन वर्षे मुंबईला सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन इंटरमीडिएटची परीक्षा पास केल्यानंतर पुण्याला इंजिनियरिंगला गेलो. यामुळे दोन वर्षांमध्ये मुंबईला मिळालेले मित्रही नंतर पारखे झाले आणि पुण्याला गेल्यानंतर तिथे नवीन मित्र जोडले. त्यानंतर पुन्हा आमची फाटाफूट होऊन मी नोकरीसाठी  मुंबईला आलो. कॉलेजमधले इतर मित्र कुठे कुठे गेले ते ही लगेच समजले नाही. या सगळ्या घटना  १९६० च्या दशकात घडल्या.

त्या काळात सेलफोन, इंटरनेट, ई मेल, फेसबुक, ट्विटर, वॉट्सअॅप यातले काहीच नव्हते. ट्रिंग ट्रिंग करणारा साधा टेलीफोनसुद्धा माझ्या बापुड्याच्या आवाक्याबाहेर होता. पोस्टाने पत्र पाठवणे हा कोणाशीही संपर्क साधण्याचा एकमेव मार्ग असायचा आणि त्यासाठी आधी कोणाचाही नवा पत्ता तरी कळायला हवा. शिवाय मी नव्या जागी गेल्यावर तिथले वेगळे वातावरण समजून घेऊन त्यात कसेबसे रुळण्याकडेच माझे सगळे लक्ष वेधलेले असायचे आणि त्या कामात रोजच विविध प्रकारच्या अडचणीही येत असत. त्यांना सामोरे जाऊन सोडवण्यातच माझा बहुतेक सगळा वेळ आणि शक्ती खर्च होत असे. माझ्या इतर मित्रांचीही गत यापेक्षा वेगळी असायचे कारण नव्हते. या सगळ्या कारणांमुळे माझे बालमित्र तसेच कॉलेजमधलेही बहुतेक मित्र यांच्याशी नंतर फारसा संपर्क राहिला नाही आणि ते हळूहळू दुरावत विस्मरणात चालले गेले. नंतरच्या काळात कधीतरी अचानकपणे एकाद्या जुन्या काळातल्या मित्राची कुठे तरी गाठ पडली की जुन्या आठवणी ताज्या होत, एकमेकांचे पत्ते घेतले जात पण प्रत्यक्ष पत्र लिहायला बसण्यापूर्वी ते चिठोरे हरवून जात असे. अशा प्रकारे तो मैत्रीचा दुवा सांभाळून ठेवणे कठीणच होत असे.

मैत्रीचे बंध एकदा का जुळले की ते कायमसाठी अगदी मजबूत असतात असे सांगितले जाते. यावर सिनेमा नाटकांमध्ये अनेक संवाद आणि गाणी असतात आणि ती तुफान लोकप्रियही होतात. पण निदान मला तरी याबाबतीत जरा वेगळे अनुभव आले. "यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी।" असे म्हणत खरोखरच कुणावर जीव ओवाळून टाकणारा मित्र माझ्या नशीबात नव्हता किंवा माझ्या पाहण्यातही कधीच आला नाही आणि आपल्या मनात दुस-या कुणाबद्दल स्वतःपेक्षाही जास्त प्रेमभावना बाळगावी असे मलाही कधी वाटले नाही. जीवनातले कुठलेही नाते, विशेषतः मैत्रीचे नाते टिकवून ठेवण्यासाठी सतत संपर्कात राहणे आवश्यक असते असा माझा अनुभव आहे.

मी नोकरीला लागल्यानंतर मला मिळालेले मित्र मात्र अनेक वर्षे माझ्या संपर्कात राहिले. त्यातले काही जण माझे कार्यालयातले सहकारी होते, काही जणांशी कामानिमित्य भेटणे व बोलणे होत असे तर काही जण आमच्या इमारतीत किंवा आसपास रहात होते. त्यातल्या ज्या लोकांशी माझे पटत होते किंवा आमच्या वेव्हलेंग्थ्स साधारणपणे जुळायच्या त्यांची गणना मित्रांमध्ये होत गेली. त्या लोकांशी माझ्या कामाव्यतिरिक्त काही अवांतर गप्पा गोष्टी होऊ लागल्या. त्यातले ही काही जण बदली होऊन किंवा नोकरी सोडून परगावी गेले, त्यांच्या जागी काही नवीन लोक आले असे होत गेले तरी नोकरीत असेपर्यंत माझा एकंदर मित्र परिवार ब-यापैकी वाढला होता. "समानशीलव्यसनेषु सख्यम्" असे म्हणतात, त्यातले समानशील सखे मला भेटले, पण मला स्वतःलाच कोणतेही व्यसन न लागल्यामुळे मित्र मिळवण्याचा दुसरा मार्ग मात्र मला उपलब्ध नव्हता.

कालांतराने मीच सेवानिवृत्त होऊन नव्या जागी रहायला गेल्यानंतर मात्र माझा मित्रपरिवार झपाट्याने कमी होत गेला कारण आता पूर्वीच्या मित्रांच्या भेटीगाठी होणे दुर्मिळ झाले आणि टेलीफोनवरचे संभाषणही हळूहळू कमी कमीच होत गेले. एक वय उलटून गेल्यानंतर नवे मित्र जोडायची इच्छा व उमेद कमी होत गेल्याने नव्या मित्रांची संख्या वाढणेही कठीणच होते.

.  . . . . . . . . . . . . .   (क्रमशः)
   

No comments: