या वर्षीच्या वर्ल्डकपसाठी झालेले बहुतेक सगळे सामने टीव्हीवर पाहून मी स्टार स्पोर्ट चॅनेलसाठी भरलेले पैसे वसूल करून घेतले. भारताच्या संघाने पहिले सात सामने ओळीने जिंकले. ते कशामुळे जिंकले असतील? खरे तर कोणालाही असा प्रश्न पडायचे कारण नव्हते. आपला कप्तान महेंद्रसिंह धोनी ऊर्फ आपला लाडका माही याने या खेळाचा तसेच ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधली पिचेस, हवामान वगैरेचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून ठेवला होता.
प्रत्येक सामन्यातल्या प्रत्येक क्षणी तिथल्या पिचची अवस्था, त्या वेळचे हवामान, वाहत्या वा-याची गती आणि दिशा, खेळत असलेल्या विरुद्ध बाजूच्या फलंदाजाच्या संवयी आणि त्याचे वीक पॉइंट्स वगैरे पाहून कोणाला गोलंदाजी द्यायचे हे तो ठरवत होता. त्या बॉलरने कशा प्रकारचा चेंडू टाकावा, आखूड पल्ल्याचा (शॉर्टपिच्ड) की यॉर्कर, ऑफ ब्रेक की गुगली वगैरेंच्या सूचना माही त्या गोलंदाजांना देत होता आणि तंतोतंत तसेच बॉल ते गोलंदाज टाकू शकत होते. पिचवरल्या विशिष्ट पॉइंटवर ठरलेल्या वेगाने ते चेंडू पडत होते आणि अपेक्षेइतकेच वळत होते. यामुळे विरोधी फलंदाजांच्या फटकेबाजीवर नियंत्रण येत होते, तसेच ते पटापट बाद (आउट) होऊन जात होते. अशा प्रकारे आपण सातही सामन्यांमधल्या सात विरोधी संघांना सर्वबाद करून एक नवा विक्रम नोंदवला.
आपले फलंदाज मात्र फलंदाजी करतांना प्रत्येक चेंडूकडे निरखून पहात होते, त्यातल्या कुठल्या चेंडूला नुसतेच अडवावे, कुठल्या बॉलला जरासे ढकलून एकादी धांव काढावी, केंव्हा त्याला सीमारेषेच्या बाहेर टोलवून चार किंवा सहा रन्स मिळवाव्यात आणि कुठल्या चेंडूला शांतपणे जिकडे जायचे असेल तिकडे जाऊ द्यावे हे ओळखून त्यांनी तुफान फलंदाजी केली आणि प्रत्येक सामन्यात धावांचे पर्वत रचले. यामुळेच आपण हे सातही सामने जिंकू शकलो. असे कोणालाही वाटेल. मला त्यातले फारसे काही समजत नाही, पण या सामन्याचे धावते वर्णन (कॉमेंटरी) करत असलेल्या आणि तज्ज्ञ म्हणून त्या खुर्च्यांवर बसलेल्या आपल्या संघातल्या पूर्वीच्या दिग्गजांनीच हे सांगितल्यामुळे मलाही त्या वेळी ते पूर्णपणे पटले होते.
पण उपांत्य सामन्यात काय झाले कोण जाणे? या वेळी आपल्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक अगदी सोपे सोपे बॉल्स टाकले आणि त्यांनी त्या चेंडूंना मनसोक्त फटकारून आपल्या संघासमोर धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर आपल्या मुख्य फलंदाजांनी नको त्या चेंडूंना नको त्या वेळी बॅटने निश्कारण स्पर्श करून आपल्या विकेट्स घालवल्या. अशा प्रकारे परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर खेळायला आलेला माहीसुद्धा आपल्या संघाची थोडीबहुत लाज राखण्यापलीकडे काही करू शकला नाही. यामुळे आपण पहिले सात सामने कशामुळे जिंकले असतील? हा प्रश्न पुन्हा मनात डोकावायला लागला. त्याचे उत्तर मला दुसरे दिवशी सकाळच्या टीव्हीवरील बातम्या पहात असतांना मिळाले.
त्या बातम्यांमधल्या हकीकतींबद्दल लिहितांना मी त्यातल्या पात्रांची नावे आणि गावे बदललेली आहेत. तरीही त्याच नावांच्या व्यक्ती त्या गावांमध्ये प्रत्यक्षात रहात असल्यास हा एक योगायोग समजावा आणि या लेखाशी त्यांचा काहीही संबंध असणे अभिप्रेत नाही हे ध्यानात घ्यावे. लखनऊच्या लखनसिंग यादव नावाच्या युवकाने आधी त्याच्या मिशा सफाचट केल्या होत्या. त्या मूछमुंड्याने महिनाभरापूर्वीपासून त्याच्या मिशा पुन्हा वाढवल्या आणि त्यांना पीळ भरू शकण्याइतपत त्या वाढल्या. वर्ल्डकपचा प्रत्येक सामना टीव्हीवर पहात असतांना लखन आपल्या मिशांना आलटून पालटून पीळ भरत असे. आपल्या टीमची बॅटिंग चाललेली असतांना इकडे त्याने मिशीला पीळ भरला की तिकडे फलंदाजाला चौका मिळत असे आणि जरा जोरात पीळ भरला की सरळ सिक्सर. विरुद्ध संघाची फलंदाजी चाललेली असतांना याने इकडे पीळ भरला की तिकडे विकेट पडायचीच म्हणे. वाराणशीच्या बनारसीदासने त्याच्या डोक्यावर चांगली जाड आणि लांबलचक शेंडी वाढवून ठेवली होती. तोसुद्धा आपल्या शेंडीला मागेपुढे किंवा डाव्याउजव्या बाजूला झटके देऊन तिकडे चौकार, षट्कार घडवून आणत होता किंवा विकेट्स घेत होता म्हणे. हे दोघे भय्ये इथे टीव्हीसमोर बसल्याबसल्या मिशी आणि शेंडीच्या रिमोट कंट्रोलने तिकडे दूर देशात चाललेले सामने खेळवत होते.
भारताच्या खेळाडूंच्या कपड्यांचा रंग निळा असल्यामुळे प्रेक्षकांमध्येसुद्धा बहुतेक लोक निळ्या रंगाचे टी शर्ट घालून मॅच पहायला येत होतेच, पण इकडे भारतात रहात असलेले बरेचसे प्रेक्षक नीलकमल, नीलकांत, निळूभाऊ किंवा निळे कोल्हे बनून टीव्हीसमोर बसून ते सामने पहात होते. यामुळे निळ्या रंगाच्या लहरी इकडून निघून त्या खेळाडूंपर्यंत पोचत असा त्यांचा दावा होता. पण पुण्यातले कॅप्टन कर्णिक मात्र 'अंग्रेजोंके जमानेके' कर्नल असल्यामुळे क्रिकेटसाठी 'प्रॉपर' असा पांढरा शुभ्र पोशाख घालूनच मॅच पहायला बसत. गांधीनगरचे डाह्याभाईसुद्धा त्या दिवशी सफेद खादीचा कुर्ता, धोती आणि टोपी परिधान करत असत. त्या दोघांच्या मते शुभ्र रंगामध्ये अचाट सामर्थ्य असते आणि त्याचा फायदा आपल्या संघाला होत असे. सुरतेचा छगनभाई ड्रेसवाला मात्र मुद्दाम विरोधी संघाच्या गणवेशाच्या रंगाचे कपडे घालून बसत. यामुळे ते कन्फ्यूज होऊन सामने हरत असत असे त्याचे म्हणणे पडले.
क्रिकेटच्या मैदानात स्लिप, गली, कव्हर, मिडऑन, मिडऑफ, लाँग लेग, शॉर्ट लेग वगैरे ठिकाणी क्षेत्ररक्षकांना उभे करून व्यूहरचना केली जाते. आपल्या हैद्राबादच्या तिम्मय्याने त्याच्या घरातल्या हॉलमध्येच टीव्हीच्या समोर अनेक खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या आणि सामने पहात असतांना तो घरातल्या मंडळींना या किंवा त्या खुर्चीवर बसायला सांगत असे. त्याने इकडे अशी व्यूहरचना केली की प्रत्यक्षातल्या मॅचमध्ये एकादा कॅच उडून बरोबर त्या ठिकाणच्या फील्डरकडे जात असे आणि तो पकडला जात असे असे त्याचे सांगणे होते. यातल्या एकाद्या ठिकाणच्या खुर्चीवरून तिथे बसलेली व्यक्ती उठली की नेमका तिकडे मॅचमध्ये एक कॅच ड्रॉप होत असे असाही त्याचा अनुभव होता.
याशिवाय कित्येक लोकांनी प्रत्येक मॅचच्या दिवशी कडकडीत उपास पाळले होते आणि मॅचमध्ये विजय मिळाल्यावर पोटभर गोडधोड खाऊन ते सोडले होते. कित्येक लोकांनी आपापल्या देवांना साकडे घातले होते तर कोणी विजयासाठी नवस बोलले होते. अशा प्रकारांचे असंख्य वैयक्तिक प्रयत्न तर होत होतेच, शिवाय गावोगावच्या लोकांच्या समुदायांनी एकत्र येऊन अनेक सांघिक उपाय योजले होते. काही ठिकाणी मंत्रोच्चारासह होमहवन, यज्ञयाग वगैरे चाललेले होते, काही ठिकाणी खूप लोक एकत्र येऊन एकाद्या मंत्राचा हजारो किंवा लाखो वेळा जप करत होते, काही लोक एकाद्या स्तोत्राचे शेकडो किंवा हजारो वेळा पठण करत होते. या सगळ्या लोकांच्या या प्रयत्नामुळेच आपला संघ वर्ल्ड कपमधल्या सामन्यांमध्ये विजयी होत होता अशी त्या सर्वांची श्रद्धा होती.
पण मग उपांत्य सामन्यात काय झाले? याचे समाधानकारक उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते. बहुधा त्या वेळी या सगळ्याचा अतिरेक झाल्यामुळेच 'अती तेथे माती' असे झाले असेल असे माझे आपले साधे अनुमान आहे.
No comments:
Post a Comment