Sunday, September 27, 2015

"गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या


http://lalbaugkaraja.com/wp-content/uploads/2014/09/Lalbaugcha-Raja-Visarjan-20141.jpg
मी नोकरीसाठी मुंबईला आलो तेंव्हा मित्रांसोबत दादरला रहात होतो. आम्ही सर्वजणच त्या भागतल्या सर्व सार्वजनिक गणेत्सवांमध्ये रोजच अतीशय उत्साहाने प्रेक्षक म्हणून सहभागी होत होतो.  अनंत चतुर्दशीला तर तासन् तास रस्त्यांवरून भटकत राहून दिसतील तेवढ्या खाजगी आणि सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुका आणि मूर्ती, सजावट वगैरे पहात होतो. लग्न करून आधी चेंबूर आणि नंतर अणुशक्तीनगरला रहायला गेल्यावर कित्येक वर्षे या दिवशी बसने शहरात जाऊन शक्य तो दुमजली बसच्या वरच्या भागात बसून दिसतील तेवढ्या मिरवणुका आणि प्रतिमा पाहून त्यांना आपल्या डोळ्याात साठवून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. पुढे वयोमानानुसार तेअवघड होत गेले.  टीव्ही वरील अनेक वाहिन्यांमधून त्यांचे दिवसभर प्रक्षेपण होऊ लागल्यानंतर तेच पहायला लागलो.

मी संसार थाटल्यानंतर दरवर्षी आमच्या घरीच पाच दिवसाचा गणेशोत्सव साजरा करायला लागलो. एकदा नाइलाजाने तो तीन दिवसांचाच करावा लागला तेवढा अपवाद वगळला तर दर वर्षी अधिकाधिक उत्साहाने ते करत गेलो. माझ्या दोन्ही मुलांनीही वेगळ्या ठिकाणी संसार मांडल्यानंतर आपापल्या घरी हे उत्सव सुरू केले आणि ते इंग्लंड किंवा अमेरिकेत असतांनाही सुरू ठेवले. एकदा आम्हीही या वेळी पुण्याला गेलेलो असल्यामुळे तिथल्या घरातल्या उत्सवात तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सहभाग घेतला होता.

या वर्षी प्रकृतीअस्वास्थ्यामुळे आम्ही वाशीच्या घरी घरापुरता उत्सव साधेपणाने साजरा करायचे ठरवले होते. आयत्या वेळी आम्ही दोघेही आजारी पडलो आणि मुलाला पुण्याहून बोलावून घेतले. ते दोघे लगेच आलेच आणि एक दिवस पुण्याला जाऊन त्यांच्या मुलींनाही घेऊन आले. गणेशचतुर्थीच्या आधी माझी पत्नीही हॉस्पिटलमधून घरी आली आणि आम्ही उत्साहाने गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. पण दुस-याच दिवशी मलाच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले आणि मला कळायला लागल्यापासून या वर्षी प्रथमच मी या उत्सवापासून दूर राहिलो. घरातल्या गणेशाला निरोपसुद्धा देऊ शकलो नाही, याची मनाला चुटपुट लागून राहिली.

आज अनंतचतुर्दशीला मी कुठेच बाहेर जाऊ शकत नव्हतो. गावोगावी होत असलेल्या ठिकठिकाणच्या विसर्जनाच्या मिरवणुका आणि दृष्ये  घरी टीव्हीसमोर बसून पहात राहिलो. हे कार्यक्रम पहात असतांना अचानक आमच्या जिन्यामधूनच "गणपतीबाप्पा मोरया"चा जल्लोष ऐकू आला आणि दारात जाऊन पाहिले तोपर्यंत आमच्या बिल्डिंगमधल्याच एका भाडेकरूने बसवलेल्या गणेशाच्या मूर्तीला विसर्जमासाठी खाली  नेत असलेले पाहिले. मी लगेच खिडकीशी जाऊन उभा राहिलो. आमच्या खिडकीच्या खालीच एक व्हॅन उभी होती आणि तिच्या मागच्या भागात ही मूर्ती ठेवली जात होती. मला तिचे पूर्ण दर्शन घडले. मी तिला दोन्ही हात जोडून नमस्कार केला, प्रार्थना केली आणि "पुढच्या वर्षी लवकर या" असे म्हणत  या गणेशमूर्तीलाच मनोमन निरोप दिला. "गणपती बाप्पा, आता पुढच्या वर्षी पुन्हा मला पहिल्यासारखाच पूर्ण उत्सव साजरा करायची संधी द्या." अशी मनोमन प्रार्थना केली.No comments: