Sunday, May 10, 2015

वर्ल्डकपचे साइड इफेक्ट्स -२ - देशभक्त आणि द्वेषभक्त

वर्ल्डकपच्या सुमाराला मी जे पाहिले आणि वाचले त्यामधून मला जे जाणवले ते शब्दबद्ध करण्याचा एक प्रयत्न मी महिनाभरापूर्वी सुरू केला होता. आपण क्रिकेटचे सामने कसे जिंकले? याबद्दल मी पहिल्या भागात लिहिले होते. या बातम्यांकडे एका वेगळ्या अँगलने पाहतांना मला काय दिसले हे या लेखात लिहीले होते. मध्यंतरी मी एका अपघातात जबर जखमी झाल्यामुळे हा लेख प्रकाशित करू शकलो नव्हतो. मला ती संधी आज मिळत आहे.

वर्ल्डकपाचे सगळे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दक्षिण गोलार्धातल्या दोन देशांमध्ये खेळले गेले होते. तरीसुद्धा हजारो भारतीयांनी यातल्या प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांच्या कक्षांमध्ये गर्दी केली होती. भारतातले सर्वसामान्य नागरीक तर नाहीच, पण उच्च मध्यमवर्गीय लोकसुद्धा स्वतःच्या खर्चाने तिकडे जाऊन हे सामने पाहू शकतील एवढी सुबत्ता अजून आपल्याकडे आलेली नाही. बडे उद्योगपती, सिनेकलाकार किंवा राजकारणी अशा अतीश्रीमंत वर्गातले लोकच हे करू शकतात. अखेरीस ग्राहक, प्रेक्षक किंवा करदाता या नात्याने त्याचा बोजा आपल्यावरच पडत असला तरी तो लक्षावधी लोकांमध्ये विभागून जात असल्यामुळे आपल्याला वेगळा जाणवत नाही. अर्थातच हे सामने पहायला आलेले बहुतेक सर्व भारतीय वंशाचे प्रेक्षक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये वास्तव्य करणारेच असणार. त्यातले काहीजण अमेरिका, सिंगापूर, दुबई वगैरे देशांमधून तिकडे गेलेले असले तरी तेसुद्धा अनिवासी भारतीयच (नॉनरेसिडेंट इंडियन्स) असणार.

यातले काही लोक थोड्या काळासाठी तिकडे जाऊन परत येणार असले तरी बरेचसे लोक तिकडे स्थायिक झाले तरी आहेत किंवा तसा प्रयत्न करीत आहेत. तरीसुद्धा हे सगळे प्रेक्षक भारतीय खेळाडूंना अगदी मनापासून भरभरून दाद आणि खूप प्रोत्साहन देत होते. त्याते काही जण मोठमोठे तिरंगी झेंडे हातात धरून मोठ्या उत्साहाने जोरजोरात फिरवतांना दिसत होते, तर काही लोकांनी आपले चेहेरे तीन रंगांमध्ये रंगवून घेतले होते. हा म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे असा सूर काढणारे काही अतीशिष्ट लोक आपल्याकडे आहेत. पण त्यांच्या नकारात्मक दृष्टीकडे दुर्लक्ष केल्यास या सगळ्या लोकांना आपल्या भारत देशाबद्दल मनातून काही तरी आपुलकी वाटते हे जाणवेल. केवळ हौस किंवा गंमत म्हणून त्यांना एकादा झेंडा फिरवायचा असता किंवा आपले तोंड रंगवून घ्यायचे असते तर त्यांनी मलेशिया, ग्वाटेमाला, झुलूलँड असल्या कुठल्याही देशाचा छान दिसणारा झेंडा किंवा चित्रविचित्र रंगांमध्ये रंगवलेले कसलेही फडके आणले असते किंवा आपल्या चेहे-यावर कुठलेही चित्र रंगवून घेतले असते. पण या प्रसंगी त्यांनी यासाठी तिरंग्याचीच निवड का केली? त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी देशभक्तीची एक लहानशी ज्योत अजूनही तेवत आहे याचेच हे लक्षण होते. परदेशी गेलेल्या भारतीयांच्या मनात अशी थोडी देशभक्तीचा झलक दिसलीच, भारतातल्या लोकांचा उत्साह तर अमाप होता. आपल्या संघाच्या फलंदाजांनी मारलेल्या प्रत्येक चौकार किंवा षट्कारावर आणि मिळवलेल्या प्रत्येक विकेटवर सामना पाहणारे लोक जागच्याजागीच उड्या मारत होते, नाचत होते, प्रत्येक सामना जिंकल्यानंतर फटाक्यांचे आवाज कानावर पडत होते. यात एका प्रकारे त्यांची देशभक्ती दिसून येत होती.

पण स्वतःच्या अत्यंत जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा नगारा सदैव वाजवत असणा-या काही लोकांना क्रिकेट या शब्दाचेच वावडे आहे असेही दिसले. गो-या रंगाच्या आणि ख्रिश्चन धर्म पाळणा-या परकीय आक्रमक लोकांचा हा खेळ भारतीय लोकांनी खेळावा हाच मुळात त्यांना देशद्रोह वाटतो. इथल्या कोट्यावधी लोकांनी तो विदेशी खेळ पहाण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवावा म्हणजे तर त्यांच्या मते देशद्रोहाची परिसीमा झाली. यामुळे क्रोधाने लालपिवळे होऊन त्यांनी सगळ्या जनतेवरच सैरभैर आगपाखड सुरू केली. आजची परिस्थिती काय आहे? आजच्या काळातले इंग्रज हे आपले शत्रू आहेत का? एका काळात त्यांनी सुरू केलेला खेळ आता त्यांचा राहिला तरी आहे का? खेळ हा द्वेष करण्याचा विषय असू शकतो का? असा कसलाही विचार त्यांच्या मनाला शिवत नाही इतके ते द्वेषाने भरून गेलेले आहे. आजच्या काळातल्या भारतातल्या लोकांच्या मनाला त्यांच्या मते कवडीइतके महत्व देण्याचे कारण नाही. देशामधली माणसे वगळून कुठला देश शिल्लक राहतो? देश किंवा राष्ट्र या शब्दाची कसली संकल्पना या लोकांच्या डोक्यात भरलेली आहे हेच मला समजत नाही. 

हे लोक स्वतःला अत्यंत प्रखर राष्ट्रनिष्ठ असे मानतात आणि तसे सांगत असतात. अशा लोकांना देशभक्त म्हणावे की द्वेशभक्त असा प्रश्न पडतो.

No comments: