Thursday, September 24, 2015

गणपतीबाप्पांची इच्छा




आपण सगळ्या चांगल्या कामांची सुरुवात गणपतीचे स्मरण करून करतो. श्रीगणेशा हा या ब्लॉगवरचा पहिला भाग होता. पुढे त्या वर्षी मी एका मोठ्या आजारामुळे अंथरुणाला खिळलो होतो आणि हा ब्लॉग कदाचित बंदच पडेल असे वाटत होते.  त्या वर्षीचा गणेशोत्सव आला. घरी बसल्या बसल्या आणि पडल्यापडल्या गणेशाची अनंत रूपे पाहून आपल्या परीने ती वाचकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचे असे मी ठरवले. गणपतीच्या कृपेनेच मी त्याच्या कोटी कोटी रूपांपैकी काही निवडक रूपे दाखवू शकलो.  'कोटी कोटी रूपे तुझी' ही मालिका मी ओळीने ११ दिवस ११ भागात लिहू शकलो. त्या संपूर्ण कालावधीत माझा संगणक व्यवस्थित चालला, आंतर्जालाशी माझा संपर्क खंड न पडता होत राहिला आणि माझी तब्येत सुधारत गेली, माझा उत्साह आणि आत्मविश्वास वाढत गेला. असे व्हावे ही गणेशाचीच इच्छा आणि लीला असणार.

त्यानंतरच्या काळातसुध्दा मी दरवर्षी माझ्या परीने या ब्लॉगवर गणेशोत्सव साजरा करत राहिलो. 'गणेशोत्सव आणि पर्यावरण' या विषयावर लेखमाला लिहून त्यात दोन्ही बाजूचे मुद्दे मांडले.त्या मालिकेत मी सर्व बाजूने विचार करणारे लेख दिले होते. लोकमान्य टिळकांच्या वेळच्या गणेशोत्सवाची आठवण करून देणारे त्यांचेच लेख दिले. आजच्या काळात होत असलेल्या उत्सवाबद्दल लिहितांना त्यातल्या काही सकारात्मक बाबींकडे लक्ष वेधण्याचा आणि नकारात्मक किंवा वादग्रस्त गोष्टींच्या मागची कारणपरंपरा शोधण्याचा अल्पसा प्रयत्नही केला. गणपतीची स्तोत्रे, कहाण्या, गाणी वगैरेंकडे लक्ष पुरवले, काही जुनी, काही नवी गीते, काही स्तोत्रे, काही स्तोत्रांचे अर्थ वगैरे देण्याचा प्रयत्न केला. गणपतीच्या अनेक नावांची यादी संकलित करून दिली. गणपती आणि चंद्रदेव, स्यमंतकमणी यांच्या कहाण्या सांगितल्या. एका वर्षीच्या  वर्तमानपत्रांमध्ये गणेशोत्सवावर छापून आलेल्या लेखांचा आढावा घेतला. अशा प्रकारे दर वर्षी मी या दिवसात श्रीगणेशासंबंधी काही ना काही लिहीत राहिलो.

या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या एका अपघातात आम्ही दोघेही जबर जखमी झालो होतो. देवाधिदेवाच्या म्हणजे गणपतीच्या कृपेनेच त्यातून बचावलो. त्या काळात मी सतत त्याचाच धावा करत होतो. माझ्या दोन्ही हातांचे ऑपरेशन करावे लागले होते. अलका त्या अपघातामधून सावरते ना सावरते तोपर्यंत तिची काही जुनी दुखणी पुन्हा उफाळून वर आली तर काही नव्या व्याधी उद्भवल्या. यामुळे आम्ही चिंताग्रस्तच होतो. गोकुळाष्टमीच्या सुमाराला आम्हा दोघांच्या प्रकृती जरा स्थिरावल्या. गणपतीबाप्पाचे स्मरण करून त्याचे आभार मानण्यासाठी या वर्षीचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने निदान घरच्या घरापुरता साजरा करायचा असे आम्ही ठरवले. दरवर्षी आम्ही दोघेही मिळून गणपतीची मूर्ती निवडण्यासाठी जात होतो. या बाबतीत अलका जरा चोखंदळ असल्यामुळे त्या ठिकाणी ठेवलेले सगळे गणपती तासभर निरखून पाहून झाल्यावर आम्ही त्यातून आपल्याला हवी त्या आकाराची, रंगाची आणि मुद्रेमधली मूर्ती निवडत होतो. या वर्षी ते शक्यच नव्हते. मी एकटाच लोटलीकरांच्या केंद्रात गेलो आणि पाच मिनिटात निर्णय घेऊन एका सुबक मूर्तीची ऑर्डर दिली. माझ्या हातांच्या नाजुक अवस्थेमुळे या वर्षी मला फारशी सजावट करता येणार नव्हतीच. टेबलावर एकादा पाट मांडून त्यावर आसन पसरायचे आणि त्यावर या मूर्तीची स्थापना करायची असे मनोमनी ठरवले.

पुढचे दोन तीनच दिवस ठीक गेले आणि अलकाला खोकल्याचा त्रास सुरू झाला. तो इतका वाढत गेला की ११ तारखेला तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले. त्या आधी झालेली जागरणे आणि पडलेला ताण या गोष्टी मलाही सोसल्या नाहीत आणि संसर्गही झाला असणार. मी घरी आल्या आल्या माझ्या अंगात भरपूर ताप भरला. लगेच मुलाला पुण्याहून बोलावून घेतले आणि ते दोघेही दुस-या दिवशी वाशीला येऊन हजर झाले. पहिल्या दिवशी तर उदय पूर्णवेळ माझ्यासोबत घरीच राहिला आणि शिल्पा एकटीच हॉस्पिटलमध्ये अलकाजवळ गेली. दोन दिवसांनी माझ्या अंगातला ताप उतरल्यानंतर मी त्यांच्यापुढे गणेशोत्सवाचा विषय काढला आणि यंदा तो साधेपणाने घरच्या घरापुरता साजरा करायचा असल्याचे सांगितले. तोपर्यंत गणेशचतुर्थी  जवळ आली होती.  ते दोघेच जाऊन मी ऑर्डर केलेली मूर्ती घेऊन आले. गुरुवारी गणेशचतुर्थी होती त्याच्या आधी मंगळवारी अलकालाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. आमच्या दोन्ही नाती पुण्याला आजोळी राहिल्या होत्या.  शिल्पा पुण्याला जाऊन त्यांना घेऊन आली. काही वर्षांनंतर पुन्हा आम्ही एकत्र येऊन हा उत्सव साजरा करायचा अशी गणपतीबाप्पाची इच्छा होती. सगळी मंडळी जमल्यावर सर्वांना उत्साह आला. उदयने डेकोरेशनचे थोडे सामान आणले आणि त्या चौघांनी मिळून ब-यापैकी सजावटही करून घेतली.

या वर्षीच्या गणेशचतुर्थीला बाहेरच्या कोणा आप्तेष्ट, शेजारी किंवा मित्रांना बोलावणे शक्यच झाले नव्हते. आम्हीच गणेशाच्या मूर्तीला जिन्यापर्यंत नेऊन वाजत गाजत घरात आणले, दारात येताच त्याचे निरांजने ओवाळून स्वागत केले आणि मखरामध्ये स्थापना केली. आम्ही दोघेही अजून धडधाकट झालेलो नव्हतोच. त्यामुळे आम्ही बसल्या बसल्या सगळा सोहळा पाहिला, पूजाविधीमध्ये किंचित मार्गदर्शन केले आणि आरत्या म्हंटल्या. नैवेद्यासाठी लागणारे तळलेले मोदक आणि पंचखाद्य वगैरे पदार्थ त्या गडबडीतही आदल्या दिवशीच करून ठेवले होते, खव्याचे आणि चॉकलेटचे मोदक दुकानामधून आणले. फळफळावळ आणली आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा गणपतीबाप्पाला व्यवस्थित नैवेद्य दाखवले.

गुरुवारी गणपतीचे आगमन झाल्यानंतर आणखी एक दिवस वाशीला राहून शनिवारी पुण्याला परत जायचा विचार असल्याचे उदयने सांगितले. तोपर्यंत त्यांचा इथला मुक्काम आठवडाभर होत होता.  ते दोघे अचानक इकडे निघून आल्याने त्यांची तिकडली काही कामे अर्धवट राहिली होती, त्याच्या मुलींनी पुण्यातल्या त्यांच्या कॉलनीमधल्या सार्वजनिक उत्सवात भाग घेण्यासाठी नाव नोंदवले होते, गाण्यांची कसून तयारी केली होती. त्यांचा कार्यक्रम शनिवारीच होणार होता आणि त्यांना तो चुकवायचा नव्हता वगैरे कारणे होती आणि आता आमची तबेत आम्ही सांभाळू शकू असे वाटायला लागले होते. त्यामुळे आम्ही त्यांना थांबायला सांगितले नाही.

माझ्या अंगातला ताप उतरला असला तरी अजूनही मला थोड्या हालचाली करताच दम लागत होता. त्यामुळे शुक्रवारी डॉक्टरकडे जाणे आवश्यक होतेच. तिथे ईसीजी काढल्यावर डॉक्टरांना काही शंका आल्या आणि घाबरण्याचे कारण नसले तरी एकदा हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना तो दाखवून येण्याचा सल्ला डिस्पेन्सरीमधल्या डॉक्टरीणबाईंनी दिला.  फक्त ईसीजी दाखवून परत येण्यासाठी आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये  गेलो, पण तिथे गेल्यावर तिथल्या डॉक्टरांनी मला अॅडमिटच करून घेतले. आता उदय, शिल्पा वगैरे सगळेजण पुण्याला परत जाऊ शकत नव्हते.  कोणीतरी इथे असणे आवश्यक झाले होते. त्यामुळे उदय इकडे थांबला आणि मुलींना घेऊन शिल्पा शनिवारी पुण्याला गेली. मुलींच्या शाळांना सुट्या असल्यामुळे रविवारी सकाळीच ते लोक वाशीला परत येणार होते आणि मग उदय पुण्याला जाणार होता. पण त्या दिवशी पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला. त्याचा जोर इतका वाढला की त्यांना तर पुण्याला थांबावे लागलेच पण आज आईला एकटीला घरी सोडून मला भेटायला तू हॉस्पिटलमध्येसुद्धा येऊ नकोस असे मी उदयला बजावले. पावसाचा जोर रात्रीपर्यंत  कमी झाल्यावर पुण्याला गेलेली मंडळी परत आली.

रविवारी सकाळीच ते लोक इकडे आले असते तर उदय लगेच पुण्याला जाऊन सोमवारी त्याच्या ऑफिसात हजर होणार होता, पण गणपतीबाप्पाला ते मंजूर नसावे. मीही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेलो असल्यामुळे गणपतीचे विसर्जन कोण करेल हा एक प्रश्न होताच. त्यामुळे उदयने त्याचा मुक्काम एका दिवसाने वाढवला. सोमवारी संध्याकाळपर्यंत मलाही डिस्चार्ज मिळणार असल्याचे त्याच दिवशी सकाळी ऐकल्यावर मी विसर्जनाच्या आधी घरी जाऊन पोचू शकेन अशी एक आशा निर्माण झाली होती. पण तिथून निघायच्या आधी मला एका हृदयरोगतज्ज्ञाला दाखवायचे होते. बाहेरून व्हिजिट करायला येणारा तो डॉक्टर केंव्हा भेटेल हे कोणी सांगू शकत नव्हता. गणपतीची उत्तरपूजा आणि विसर्जन करण्यापूर्वी मला घरी घेऊन यायचे म्हणून इतर लोक माझ्यासाठी थांबले असते तर कदाचित विसर्जनाला खूप उशीर झाला असता आणि त्या दिवशी गौरीगणपतींचे एकत्र विसर्जन असल्यामुळे रस्त्यात तसेच तळ्यावर प्रचंड गर्दी झाली असती. यावर बरेच वेळा फोनवर उलटसुलट चर्चा करून झाल्यावर मी उदयलाच विसर्जन करून घ्यायला सांगितले.

हॉस्पिटलमधल्या माझ्या तपासण्या आणि त्यावरील कागदी कारवाया उरकून मला प्रत्यक्ष डिस्चार्ज मिळायला रात्रीचे आठ वाजून गेले.  त्यामुळे आमचा निर्णय तसा बरोबर ठरला. पण मला मात्र चुटपुट लागून राहिली. त्या दिवशी मी गणपतीच्या विसर्जनासाठी तळ्यापर्यंत जाऊ शकलो नसतोच, पण निदान घरातली पूजा बघितली असती, आरती म्हंटली असती. घरात आरत्या चाललेल्या असतांना मी सेलफोनवरून त्या ऐकाव्यात आणि हॉस्पिटलमध्येच मनातल्या मनात म्हणाव्यात असा प्रयत्नही केला.  पण नेमक्या त्याच वेळी मला हॉस्पिटलमधल्या अशा विभागात नेले होते जिथे मोबाईलचा सिग्नलच येत नव्हता. या वर्षी गणपतीबाप्पाला माझ्याकडून एवढी सेवा करून घ्यायची नव्हती अशी त्याचीच इच्छा होती असे म्हणायचे. त्याआधी सकाळच्या वेळी बेडवरच बसून मी अथर्वशीर्षाची आवर्तने मात्र केली होती.

अशा प्रकारे या वर्षीच्या आमच्या घरातल्या गणेशोत्सवात अनपेक्षित घटना घटत गेल्या. त्यांचा क्रम आणि टाइमिंग यांचा विचार केल्यास मन थक्क होते. अखेर आपणा सर्वांचा कर्ता करविता तोच असल्याची खात्री पटावी असा हा अनुभव होता. त्वमेव केवलम् कर्ताSसि, त्वमेव केवलम् धर्ताSसि,  त्वमेव केवलम् हर्ताSसि असे जे म्हणत होतो त्याची प्रचीती येत होती.
   







No comments: