Monday, September 03, 2012

वाचावे नेटके

'वाचावे नेटके' या मथळ्याखाली दर सोमवारच्या लोकसत्तेमध्ये मराठी ब्लॉग्सची ओळख करून दिली जाते. आजच्या अंकात माझ्या या ब्लॉगबद्दल छापून आले आहे. अशा प्रकारे एका आघाडीच्या वृत्तपत्रात या स्थळाबद्दल लिहून आलेले वाचून अंगावर मूठभर मांस चढले हे सांगायला संकोच कशाला? या लेखाचे लेखक अभिनवगुप्त यांचा मी अत्यंत आभारी आहे. या लेखाचा दुवा असा आहे.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=247889:2012-09-02-17-56-59&catid=404:2012-01-20-09-49-09&Itemid=408

कदाचित हे पान उघडण्यात तांत्रिक अडचण येऊ शकेल म्हणून किंवा ते काम वाचवण्याच्या दृष्टीने प्रिय वाचकांच्या सोयीसाठी हा लेखच मी खाली उद्धृत केला आहे.

----------------------------------------

सोमवार, ३ सप्टेंबर २०१२


वाचावे नेट-के : अनाग्रही, सभ्य भूमिका



‘मला विचारांचा त्रास वगैरे होत नाही. एखाद्या अनपेक्षित अनुभवाचे नवल वाटणे, त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया समजून घेणे, त्यावर स्वत: विचार करणे, अखेरीस पटेल तेवढे ठेवून घेणे आणि बाकीचे सोडून देणे हा सारा शिकण्याचा भाग आहे..’

वरवर पाहता साधे वाटणारे हे वाक्य, आनंद घारे यांनी ‘उपक्रम’ या चर्चास्थळावर २०११च्या नोव्हेंबरात लिहिले होते. ‘आनंदघन’ या ब्लॉगवर घारे यांचे भरपूर लिखाण चालू असते. मात्र अशी काही वाक्ये, घारे यांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण लिखाणामागचे हेतू स्पष्ट होण्यास उपयोगी ठरतील.

वर दिलेले विधान उपयोगी कसे, ते पुढे पाहू. आधी आपल्या वाचनीयतेच्या शोधाबद्दल या ब्लॉगसंदर्भात काही स्पष्टीकरणे गरजेची आहेत.

घारे यांच्या ब्लॉगवरील ‘वैज्ञानिक माहिती देणाऱ्या लेखमालिका’ हा सर्वाधिक वाचनीय भाग. मात्र, अन्य प्रकारच्या नोंदी ‘सामान्य’ ठरवून पुढे जाता येणार नाही, इतपत वेगळेपण या ब्लॉगमध्ये आहे.

आत्मचरित्र उलगडेल, अशा प्रकारे लिहिलेल्या जवळपास ४० टक्के नोंदी घारे यांच्या ब्लॉगवर आहेत. जमखंडी येथे जन्म व शिक्षण, कॉलेज शिक्षणासाठी गाव सोडणे, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अणुऊर्जा क्षेत्रात नोकरी, त्यादरम्यान ‘कॉलनी’त वास्तव्य आणि उच्चशिक्षित आणि स्थिरस्थावर मुले, प्रवासाची आवड भरपूर प्रमाणात भागवता येईल इतका सुखवस्तू निवृत्तिकाळ अशा अगदी व्यक्तिगत गोष्टी वाचकाला कळतात, पण त्या एकरेषीय पद्धतीने नव्हे. स्वत:च्या काकांबद्दल लिहिताना उच्चशिक्षणाचा उल्लेख घारे करतात, तर होळीबद्दल लिहिताना कॉलनीचा. तारापूरच्या अणुऊर्जा केंद्रात महत्त्वाची जबाबदारी घारे पार पाडत होते, हे वाचकाला कळते ते ‘अणुऊर्जा’ या विषयावर त्यांनी जी माहितीपर मालिका लिहिली आहे, त्यातून! असा- म्हणजे आत्मचरित्राच्या उपबोधाचा- परिणाम साधणारे लिखाण कित्येक मराठी ब्लॉगलेखकांनी आजवर केले आहे.

याखेरीज ‘स्व-समाजवर्णन’ हा शक्यतो खुसखुशीत शैलीत लिहिण्याचा प्रकारही घारे यांनी हाताळला आहे. या दोन्ही प्रकारच्या लिखाणांतून माणूस स्पष्ट होत जातो- म्हणजे अमुक एका समाजातली त्याने स्वत:कडे घेतलेली भूमिका काय आहे आणि ती कितपत खरी आहे, हे कळते. अशा लिखाणाला ब्लॉगवर स्थान देणारे ब्लॉगलेखक वा लेखिका जेव्हा काही मतप्रदर्शन करतात, तेव्हा त्यांनी (त्याआधी/ वारंवार) ब्लॉगवरच रेखलेले आत्मचित्र वाचकासमोर असतेच. हे अनेकदा लेखकांनाही माहीत असते आणि ‘आपण बुवा असे’ असे गृहीतक त्यांच्या लिखाणामागे असल्याचे वाचकही समजून घेतात. यातून पुढे ‘नायकत्वा’ची प्रवृत्ती वाढीस लागू शकते. ‘होय, मी तेव्हाही म्हटले होते आणि आजही म्हणणारच’ आदी सूर अशा नायकत्ववादी ब्लॉगलेखकांच्या लिखाणातून उघड होऊ लागतात. हे असे सूर अंतिमत: कर्कशच ठरणार, याचे भान पाळले गेले नाही, तर ब्लॉगच्या वाचनीयतेवर परिणाम होतो. हे झाले इतरांबद्दल. हा धोका घारे यांच्या लिखाणाला नाही, याचे कारण त्यांचे लिखाण मूलत: अनाग्रही आहे.

अनाग्रहीपणा म्हणजे गुळमुळीतपणा, असा अर्थाचा गोंधळ घारे यांच्या ब्लॉगबाबत होऊ नये. आग्रह हे पसंती आणि नापसंती यांच्याशी संबंधित असतात. गुळमुळीतपणामध्ये पसंती कशाला आणि नापसंती कशाबद्दल हे अस्पष्टच ठेवण्याची सोय असते. पसंती-नापसंतीची स्पष्टता असली की त्यापुढे जाऊन नापसंतीला झोडपणे वा पसंतीला सर्वोच्च मानणे ही ‘आग्रहा’ची पुढली पायरी सहज गाठता येते.. ती पायरी टाळणारे, ते अनाग्रही. घारे अनाग्रही कसे, याचे एक उदाहरण त्यांनी ‘उपक्रम’वरील चर्चेला उत्तर देताना आपसूकच समोर ठेवले आहे.

‘पटेल तेवढे ठेवून घेणे आणि बाकीचे सोडून देणे’ हा घारे यांच्या ‘शिकण्याचा भाग’ असतो, असे ते म्हणतात. ‘पटेल’ आणि ‘बाकीचे’, यात पसंती-नापसंती आलीच, पण हा पसंती-निर्णय अंतिम नाही, तो ‘शिकण्याचा भाग’ आहे.

ब्लॉगलिखाणाची घारे यांची प्रक्रिया २००६ पासून बदलत गेलेली दिसेल. गेल्या तीन-चार वर्षांत, हा ‘शिकण्याचा भाग’ त्यांच्या लेखनप्रक्रियेतही आलेला आहे. घारे लिहितात तो मजकूर एखाद्या चर्चास्थळावरही चर्चेला खुला ठेवतात. चर्चेची सभ्यता पाळतात आणि क्वचित, ‘पटेल तेवढे घ्यावे’ या शिरस्त्याने ब्लॉगवरच्या लिखाणात बदलही करतात. एखाद्या लेखाच्या शीर्षकातच ‘सुधारित’ असा उल्लेख या ब्लॉगवर दिसतो, तोही याचमुळे. बँकेच्या एटीएम मशीनने कार्ड ‘खाऊन टाकल्या’वरचा अनुभव, यावरची घारे यांची नोंद केवळ आत्मरत न होता माहितीपर झाली आहे, तीही चर्चास्थळावर घडलेल्या संवादामुळे.

घारे यांनी कायकाय लिहिले, हे त्यांच्या ब्लॉगवर जाऊन पाहाता येते. (‘वाचावे नेट-के’चा परीघ ‘ब्लॉगचा परिचय आणि प्रसिद्धी’ एवढाच नसल्याने-) इथे वैपुल्य आणि सातत्य याबद्दलच्या एका मुद्दय़ाची चर्चा प्रस्तुत ठरावी. ‘मी लिहिलेली इतकी पुस्तके छापली गेलीत’ अशी संख्या सांगणाऱ्यांकडे जरा संशयाने पाहण्याचा जो दृष्टिकोन मराठी वाचकांपैकी सुजाण समाजाने काळानुरूप विकसित केला आहे, तो ब्लॉगलिखाणाची चर्चा करताना जरा बाजूला ठेवण्यास हरकत नाही, अशी एक विधायक शक्यता घारे यांचा ब्लॉग दाखवतो. घारे यांचे ब्लॉगलिखाण अभ्यासूपणे पाहणे त्यामुळे महत्त्वाचे ठरते.

उत्कृष्ट वैज्ञानिकाचा पुरस्कार स्वत:ला मिळाल्याचे घारे यांनी ब्लॉगच्या परिचय-समासातच, कुठल्याही पानावर दिसेल अशा ठिकाणी नमूद केले आहे. अशा व्यक्तीने ‘ईश्वरी कृपा, पूर्वपुण्याई, सुदैव..’ आदी संकल्पनांबद्दल सकारात्मक सूर लावावा, हे अनेकांना पटणे-पचणे अशक्य होते. तसेच एका चर्चेत झाले. परगावी गेले असता रेल्वे स्थानकात शुद्ध हरपण्याइतका उलटय़ा-जुलाबांचा त्रास होणे आणि त्यापुढे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जावे लागून खडखडीत बरे होणे, अशा अनुभवानंतर हा सकारात्मक सूर घारे यांनी लावला. त्या सुराची होणारी चर्चा मान्य केली, पण ‘सोडून देणे’ हा पर्याय इथे बलवत्तर ठरला. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलची तात्त्विक किंवा आधुनिक तत्त्वज्ञानाधारित चर्चा घारे यांनी इथे केलेली नाही. त्यांना ती करायची आहेच, असेही नव्हे.


माणसाला हा अनुभव या विचारांकडे नेऊ शकतो, एवढेच त्यांना म्हणायचे आहे. इथे पुन्हा, त्यांच्या अनाग्रही भूमिकेचा पैलू दिसतो. अनुभव आणि त्यांचे परिणाम, अशा अनुभवसिद्ध जगण्यात पुन्हा नव्याने येणारे अनुभव आणि त्या नव्या अनुभवांचे परिणाम कोणते होऊ शकतात, याचा वेध घेण्यासाठी इतरांनाही आवाहन, हे घारे यांच्या एकंदर ब्लॉगलिखाणातील महत्त्वाचे संवादसूत्र आहे. त्यांचा ब्लॉग वैज्ञानिक माहिती देणाऱ्या लेख-मालिकांसाठी शिफारसपात्र ठरतोच ठरतो, परंतु ब्लॉगलेखक म्हणून जो सभ्यपणा घारे पाळतात आणि वादांच्या प्रसंगांमध्येही टिकवून ठेवतात, तो त्यांचा विशेष अन्य ब्लॉगलेखकांना अनुकरणीय वाटावा, असा आहे.

तात्पर्य हे की, ब्लॉगलिखाणात अनुस्यूतच- अपेक्षितच- असलेले सातत्य विचारात घेता आपण कोणत्या विषयांवर लिहितो आणि किती शैलीदार लिहितो याखेरीज आपण कोणत्या भूमिकेतून लिहितो याचाही विचार सर्वच ब्लॉगलेखकांनी केल्यास मराठी ब्लॉगांची वाचनीयता वाढेल.

अभिनवगुप्त

उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता:

http://anandghan.blogspot.in

तुम्हाला वाचनीय वाटणाऱ्या ब्लॉगची सकारण शिफारस किंवा प्रतिक्रिया, सूचना पाठवण्यासाठी :

wachawe.netake@expressindia.com

लोकसत्ता वृत्तपत्राच्या सौजन्याने





No comments: