Tuesday, September 18, 2012

गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला - भाग २ - गणेश आणि लेखनकला


आजच्या काळातली लेखनसामुग्री मुबलक प्रमाणात सर्वत्र उपलब्ध असते आणि ज्याला कोणाला काही लिहायची इच्छा असेल तो ते लिहू शकतो. जगातील प्रत्येक माणसाने साक्षर व्हावे या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत. माझ्या लहानपणी म्हणजे पन्नास वर्षांपूर्वीसुद्धा कागद आणि शाई सहज मिळत होती तरी ग्रामीण भागातली साक्षरता वीस टक्क्याहून कमी होती. ज्या काळात कागदच अस्तित्वात आला नव्हता तेंव्हा तर ती अगदीच नगण्य प्रमाणात असणार. काही महान सम्राट आणि बादशहासुध्दा निरक्षर होते असे म्हणतात. असे असले तरी अगदी प्राचीन काळापासून लेखन व वाचन चालत आले आहे. भाषांच्या विकासाबरोबरच किंवा पाठोपाठ त्या लिपीबध्द केल्या गेल्या. काही विद्वान मंडळी निरनिराळ्या भाषांमध्ये आणि निरनिराळ्या लिपींमध्ये लेखनाचे कार्य करीत असत. ऐतिहासिक शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्रे वगैरे साधनांवरून अशा लेखनांचे पुरावे मिळतात. अशा लेखनामधून प्राचीन काळातले काही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य आपल्यापर्यंत येऊन पोचले आहे.

आजच्या काळातले बहुतेच लोक व्यक्तीगत स्वरूपाचे लेखन स्वतःच करतात, पण पत्रव्यवहार, रिपोर्ट्स किंवा रेकॉर्ड्स यासारख्या व्यावसायिक लेखनासाठी अनेक ठिकाणी खास प्रशिक्षण घेतलेले लिपिक (स्टेनोटायपिस्ट) नेमलेले असतात. इतिहासकाळातसुध्दा मुनीम, चिटणिस वगैरेंकडून लेखनाचे काम करून घेतले जात असे. लिहिलेला मजकूर वाचणा-याला नीट समजावा या दृष्टीने तो सुवाच्य अक्षरात लिहिलेला असणे आणि व्याकरणदृष्ट्या निर्दोष असणे आवश्यक असते. तशा पध्दतीने तो लिहिण्यासाठी भाषेवर प्रभुत्व मिळवावे लागते तसेच सुलेखनकला अवगत असावी लागते. विद्या आणि कला या दोन्हीमध्ये प्राविण्य मिळवावे लागते.

बरेचसे वैदिक वाङ्मय अपौरुषेय आहे, ते कोणा माणसाने लिहिले नसून साक्षात ब्रह्मदेवापासून ते ज्ञान काही निवडक ऋषींना मिळाले आणि पुढे त्याचा प्रसार गुरूशिष्यपरंपरेनुसार मौखिक रीतीने होत गेला अशी काही लोकांची श्रध्दा असते. गुरूने सांगायचे आणि शिष्याने त्याचा वारंवार उच्चार करून ते तोंडपाठ करायचे अशी ज्ञानदानाची पध्दत प्राचीन काळात होती. अनेक सूक्ते, श्लोक, स्तोत्रे वगैरे अमक्या तमक्या ऋषीने विरचित केली असा उल्लेख त्यात केला जातो. सर्वाधिक प्रसिध्द आणि प्रचंड आकाराचे असे महाभारत हे महाकाव्य व्यासमहर्षींनी रचले आणि प्रत्यक्ष गणेशाने ते लिहिले असे समजले जाते. त्याचा विस्तार पाहता हे काव्य तोंडपाठ करणे जवळ जवळ अशक्यप्रायच वाटते. ते चिरकाळ टिकून रहावे यासाठी ग्रंथरूपाने लिहून ठेवणे आवश्यक होते. ते लिहून काढणे हे सुध्दा सोपे काम नव्हते. ते कोण करू शकेल याचा विचार करता केवळ श्रीगणेशच हे करू शकेल असे दिसले.

त्यासाठी व्यासमहर्षींनी गणेशाची आराधना केली. त्याने प्रसन्न होऊन वरदान मागितले तेंव्हा महाभारताचे लेखनकार्य त्याने करावे असा वर व्यासांनी मागितला. हे काम करण्यासाठी गणेशाने एक अट घातली. ती म्हणजे व्यासांच्या सांगण्यात खंड पडला तर लगेच हे काम तिथेच थांबवून गणेशजी अंतर्धान होतील आणि पुन्हा परत येणार नाहीत. व्यासांनी ती अट मान्य केली आणि एका बैठकीत हजारो श्लोक रचून सांगितले आणि गणेशाने ते तत्परतेने लिहून हा ग्रंथ पूर्ण केला. अशी कथा मी ऐकली होती. काल वाचनात आलेल्या एका लेखात असे लिहिले आहे की गणेशाने अशी अट घातली की व्यासांच्या लांगण्यात खंड पडला तर गणपती आपल्या मनाने काही तरी लिहीत जाईल. अशा प्रकारे त्याने लिहिलेला मजकूर इतका गूढ आहे की त्याचा अर्थ कोणालाच कधी नीटपणे समजला नाही.

सर्वात पहिला कुशल लेखनपटु गणेशच होता याबद्दल एकमत दिसते. कोणत्याही लेखनाच्या सुरुवातीला गणेशाला वंदन, त्याची स्तुती करून ग्रंथनिर्मितीचे कार्य निर्विघ्नपणे संपूर्ण होऊ द्यावे असा आशिर्वाद गणपतीकडे मागण्याचा प्रथा पडली आणि शतकानुशतके चालत राहिली. आधुनिक काळातील काही इतिहासकारांना असे वाटते की महाभारत हा ग्रंथ शतकानुशतके लिहिला जात होता. तसे असल्यास ते रचणारे विद्वान व्यास म्हणवले जात असतील आणि लिहिणारे विद्वान गणेशाचे अंश.
संस्कृत या देववाणीची देवनागरी ही लिपी गणेशानेच तयार केली असेही या लेखात लिहिले आहे. या लिपीची रचना करतांना त्यात अशी खुबी केली आहे की ग, ण आणि श ही तीन अक्षरे इतर व्यंजनाहून वेगळी आहेत. फक्त या तीन व्यंजनांनाच एक स्वतंत्र अशी उभी रेघ आहे. ही तीन अक्षरेसुध्दा गणेश या नावात ज्या क्रमाने येतात त्याच क्रमाने देवनागरी लिपीच्या मुळाक्षरांमध्ये येतात.





. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

-----------------------------------------------------------------------------------------------------------

No comments: