आनंदघन या ब्लॉगचा श्रीगणेशा २००६ सालाच्या सुरुवातीला केला. त्याचे नांव 'श्रीगणेशा' असे दिले असले तरी त्यात गणेश या देवाचा उल्लेखही केला नव्हता. तेंव्हाच्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये असतांना आलेल्या एका वेगळ्या अनुभवाची हकीकत त्यात दिली होती. पुढे त्या वर्षी मी एका मोठ्या आजारामुळे अंथरुणाला खिळलो होतो आणि इतर कामे तर करू शकत नव्हतोच, हा ब्लॉगही कदाचित बंदच पडेल असे वाटत होते. त्या निराशाग्रस्त मनस्थितीत असतांना त्या वर्षीचा गणेशोत्सव आला. घराबाहेर पडणे कठीण होत असले तरी बसल्या बसल्या आणि पडल्यापडल्या गणेशाची अनंत रूपे पाहणे आणि आपल्या परीने ती वाचकांना दाखवण्याचा प्रयत्न करणे शक्य होते आणि तेच करायचे ठरवले. गणपतीच्या कृपेनेच मी त्याच्या कोटी कोटी रूपांपैकी काही निवडक रूपे दाखवू शकलो. घरबसल्या आठवणीतून आणि टेलीव्हिजन, इंटरनेट वगैरे दृष्य माध्यमामधून मला गणपतीची जी निरनिराळी रूपे दिसत गेली त्यावर थोडेसे भाष्य करून ती सचित्र लेखांमध्ये मी देत राहिलो. अशा प्रकारे 'कोटी कोटी रूपे तुझी' ही मालिका मी ओळीने ११ दिवस ११ भागात लिहू शकलो. त्या काळात माझा संगणक व्यवस्थित चालला, आंतर्जालाशी माझा संपर्क खंड न पडता होत राहिला आणि माझी तब्येत सुधारत गेली, माझा उत्साह आणि आत्मविश्वास वाढत गेला. या ब्लॉगवरील लेखनात इतके सातत्य त्यापूर्वी कधी आले नव्हते आणि नंतरही ते क्वचितच घडले असेल.
त्यानंतरच्या काळातसुध्दा या ब्लॉगवर मी गणेशोत्सव साजरा करत राहिलो. 'गणेशोत्सव आणि पर्यावरण' या विषयावर लेखमाला लिहून त्यात दोन्ही बाजूचे मुद्दे मांडले. गणेशोत्सवात होणारी सजावट आणि गणेशमूर्तींचे विसर्जन यांचा पर्यावरणावर किती परिणाम होतो, तो कसा आणि किती कमी करता येईल याबरोबरच यात किती सत्य आणि तथ्य आहे, किती विपर्यास किंवा अतीशयोक्ती आहे, हे परिणाम टाळण्यासाठी जे पर्यायी मार्ग सुचवले जातात त्यांचे कोणते चांगले किंवा वाईट परिणाम होऊ शकतात, ज्या वस्तूंच्या गणेशोत्सवामध्ये होत असलेल्या वापरावर आक्षेप घेतले जातात त्याच वस्तूंचा इतर कोणत्या प्रकारे किती प्रमाणात वापर होत असतो, मुळात समाजाला उत्सवांचीच किती गरज असते किंवा उपयोग होतो वगैरे सर्व बाजूने विचार करणारे लेख या मालिकेत दिले होते.
गणेशोत्सवाचे ऐतिहासिक महत्व सांगून झाल्यावर त्याच्याशी तुलना करून आज त्याला आलेले रूप हा एक टीका करणा-यांचा आवडता विषय आहे. लोकमान्य टिळकांच्या वेळच्या गणेशोत्सवाची आठवणही या वेळी केली जाते. मलाही याबद्दल लिहिण्याचा मोह झाला. इतका जुना भूतकाळ मी काही प्रत्यक्ष पाहिलेला नाही. त्याबद्दल फक्त वाचले आहे. गेल्या दोन तीन दशकात म्हणजे तुलनेने आजच्या काळात होत असलेल्या उत्सवाबद्दल लिहितांना त्यातल्या काही सकारात्मक बाबींकडे लक्ष वेधण्याचा आणि नकारात्मक किंवा वादग्रस्त गोष्टींच्या मागची कारणपरंपरा शोधण्याचा अल्पसा प्रयत्नही केला. गणेशोत्सवातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या, कोणत्या खटकल्या आणि कोणत्या गोष्टींची उणीव भासली याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मागच्या वर्षी मी गणपतीची स्तोत्रे, कहाण्या, गाणी वगैरेंकडे लक्ष पुरवले होते. या निमित्याने काही जुनी, काही नवी गीते, काही स्तोत्रे, काही स्तोत्रांचे अर्थ वगैरे देण्याचा प्रयत्न केला होता. गणपती आणि चंद्रदेव, स्यमंतकमणी यांच्या कहाण्या सांगितल्या होत्या. या वर्षीचा गणेशोत्सव लवकरच सुरू होतो आहे. यावेळी कोणते सूत्र घ्यावे हे अजून ठरवले नसले तरी येत्या १० -१२ दिवसात गणपती आणि गणेशोत्सव यावरच भर देणार आहे हे नक्की. यापूर्वी जे लिहिले होते त्यापेक्षा वेगळे काय आता माझ्या दृष्टीपथात येणार आहे किंवा मला सुचणार आहे हे आता बाप्पाच ठरवेल!
No comments:
Post a Comment