Friday, September 21, 2012

गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला - भाग ४ - सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार

माणसांच्या मनात विचार येतात, त्यांना कल्पना सुचतात, अनुभव आणि ज्ञान यांच्या कसोट्यांवर त्यांची पारख होते, विवेक व संयम यांच्या गाळणीतून गाळून घेतल्यानंतर त्यातले इतरांना सांगण्याजोगे असे विचार व्यक्त केले जातात, त्या कल्पना मांडल्या जातात. मनातले हे व्यवहार आपल्या नकळत चालले असतात. भाषेवर चांगले प्रभुत्व, आपले विचार सुसंगतपणे मांडण्याचे कौशल्य, छाप पाडणारे व्यक्तिमत्व आणि वाक्चातुर्य हे गुण अंगी असले तर मनातल्या कल्पना शब्दातून स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी त्या गुणांचा चांगला उपयोग होतो, मनात आलेले नवे विचार, नव्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या जाऊ शकतात. समाजामधील रूढ समजुतींना त्यातून धक्का बसण्याची शक्यता असली तर ते वेगळे विचार व्यक्त करण्याचे धैर्य लागते. लोकमान्य टिळकांसारख्या अलौकिक व्यक्तींमध्ये हे सगळे गुण एकवटले होते, तसेच त्यांच्यासमोर असलेले उद्दिष्ट स्पष्ट होते आणि ते गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची त्यांची तयारी होती, टीका किंवा विरोधाने विचलित न होता आपल्या भूमिकेवर ठामपणे उभे राहण्यासाठी लागणारे मनोधैर्य ही त्यांच्या अंगी होते. यामुळे ते असे नवे विचार समाजापुढे मांडून सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकले.

कोणत्याही नव्या कल्पनेवर ऐकणा-या लोकांच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. पहिली म्हणजे खूप लोकांकडून तिचे उत्साहाने स्वागत होते. त्यांच्यातल्या ज्यांना ती कल्पना पटलेली आणि आवडलेली असते, ते लोक तिचा पुढे पाठपुरावा करतात, तिला वास्तवात आणण्याच्या कामात सहभागी होतात, त्यात जमेल तेवढी आपली भर टाकतात. अशा लोकांचा नव्या कार्यात हातभार लागतो. पण त्यातल्या इतर अनेक जणांना नव्याची नवलाईच तेवढी प्रिय असते. ती संपली किंवा आणखी एकादी वेगळी कल्पना पुढे आली की त्यांचा उत्साह ओसरतो, ते लोक दुस-या नव्या कल्पनेच्या मागे धावतात. अशा लोकांचा पाठिंबा फसवा आणि तात्पुरता असतो. त्यामुळे अवसानघात होतो. त्यांच्यावर विसंबून राहिल्यास ते काम बिघडते किंवा खोळंबून राहते.

काही लोकांना टिंगल, टवाळी, चेष्टा, मस्करी यात खूप गोडी असते. प्रस्थापित गोष्टींच्या तुलनेने नव्या विचारांची टर उडवणे सोपे आणि सुरक्षित असते. असे लोक त्यातील कमकुवत दुवे, त्याबद्दलचे गैरसमज वगैरेंना यथेच्छ झोडून घेतात. त्यात त्यांना गंमत वाटतेच, इतरांनाही ते ऐकतांना मजा वाटते. त्यामुळे कार्यकर्ता नाउमेद झाला तर तो आपले काम सोडून देतो आणि त्याला प्रत्युत्तर देत बसला तर त्यातच त्याचा वेळ आणि श्रम खर्च होतात. त्यामुळेही कार्यातली प्रगती मंद होते.


काही लोकांना विरोध करण्याचीच आवड असते. विशेषतः रूढी प्रिय असणा-या लोकांना कोणताही बदल नको असतो. त्यांना बदलामधील अनिश्चिततेचे भय वाटते. ज्या लोकांचे हितसंबंध आधीच्या व्यवस्थेत गुंतलेले असतात त्यांचे त्यातील बदलामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. असे लोक सरळ सरळ विरोधात उभे राहतात किंवा प्रच्छन्नपणे अडथळे आणतात. ते बलिष्ठ असल्यास नव्या विचारानुसार काम होऊ देत नाहीत किंवा चालू झालेले काम बंद पाडू शकतात. अशा वेळी शक्ती किंवा युक्तीचा वापर करून त्यांच्यावर मात करावी लागते.

अशा प्रकारे बहुतेक सगळ्या नव्या कल्पनांना उत्साह, उपहास, विरोध आणि त्यानंतर स्वीकृती या अवस्थांमधून जावे लागते. त्यात काही दिवस, महिने किंवा कदाचित काही वर्षे जातात. पण ती कल्पना मुळात चांगली आणि उपयुक्त असेल तर ती पहिल्या तीन अवस्थांमध्ये तग धरून राहते आणि अखेर स्वीकारली जाते. त्यानंतर ती खूप फैलावते आणि दीर्घ काळ टिकून राहते. नवी वैद्यकीय उपचारपध्दती, शिक्षणाची नवी पध्दत, विज्ञानातले नवे सिध्दांत किंवा नवे तंत्रज्ञान अशा निरनिराळ्या प्रयोगांमध्ये असेच अनुभव येतात, पंधरा वीस वर्षांपूर्वी संगणकाचे आगमन झाले तेंव्हाचा इतिहास आपण पाहिला आहेच. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातसुध्दा असे अनुभव येतात. एवढेच काय, घरात आणलेल्या एकाद्या नव्या वस्तूचेसुध्दा कोणाकडून उत्साहाने स्वागत होते, तर कोणी त्याला नावे ठेवतात, कोणी त्यातल्या उणीवा शोधतात, तर कोणाला त्यात धोके दिसतात. पण ते उपकरण खरोखर चांगले असले तर अखेर सगळे त्याचा उपयोग करू लागतात आणि तसे नसले तर ते अडगळीच्या खोलीत जाऊन धूळ खात पडते.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो उपक्रम लोकमान्य टिळकांनी १८९३ साली सुरू केला त्याच्या संदर्भातसुध्दा आपल्याला या चार प्रतिक्रिया दिसतात. त्या वेळी बाळ गंगाधर टिळक अजून 'लोकमान्य' झाले नव्हते. झुंजार वृत्तपत्रकार अशी त्यांची ख्याती झालेली होती आणि पुण्यामधील शिक्षणसंस्था, सभा, संमेलने वगैरेंशी त्यांचा निकटचा संबंध असल्यामुळे त्यांची खास प्रतिमा तयार झाली होती. त्यांचा चाहता वर्ग तयार झाला होता. त्या लोकांनी गणेशोत्सवाचा उत्साहाने पुरस्कार केला. पण अनेकांनी त्याचा उपहास आणि विरोधही केला. कर्मठ धर्मनिष्ठांनी त्याला 'धर्मबुडवा' म्हंटले तर कुचाळकी करणा-यांनी त्याला जातीयतेचा रंग दिला, कोणी त्याला परधर्मीयांचे अनुकरण ठरवले तर कोणी परकीयांचे. मेळ्यामधील कार्यक्रमात कोणाला काही आक्षेपार्ह वाटले तर कोणाला सजावट आणि आणखी कोणाला विसर्जनाची मिरवणूक पसंत पडली नाही. या निंदेमुळे टिळक विचलित झाले नाहीत की त्यांनी निंदकांना अवास्तव महत्व दिले नाही. आपल्या ध्येयाच्या दिशेने ते शांतपणे आणि खंबीरपणे मार्गक्रमण करत राहिले आणि गणेशोत्सवामुळे समाजाला होणारे फायदे दाखवत राहिले. टिळकांच्या आवाजाचा एक नमूना शतकानंतर अलीकडे आपल्याला ऐकायला मिळाला. त्यावरून असे दिसते की गणेशोत्सवात आलेल्या श्रोत्यांना शास्त्रीय संगीत ऐकायची संधी मिळावी अशी योजना टिळकांनी केली तसेच हे दिव्य संगीत त्यांनी गोंधळ गडबड न करता शांतपणे ऐकून घ्यावे अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.


टिळकांचे सांगणे लोकांनाही पटत गेले आणि अल्पावधीतच गणेशोत्सवाची लोकप्रियता वाढत गेली. टिळकांनी दाखवलेल्या उदाहरणाचे असंख्य लोकांनी अनपकरण केले. वर्षभरानंतर पुण्यातच शेकडो ठिकाणी हा उत्सव साजरा केला गेला आणि त्याच्या पुठल्या वर्षी तो गावोगावी साजरा होऊ लागला. पंढरपूरसारखी यात्रा आणि सार्वजनिक गणेशोत्सव यातला हाच मोठा फरक होता आणि टिळकांनी तो नेमका हेरला होता असे त्यांच्या लिखाणावरून दिसते. देवस्थानामध्ये जमणारी यात्रा ही फक्त त्या एकाच ठिकाणी भरते पण टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव गावोगावीच नव्हे तर प्रांताप्रांतांमध्ये पसरवायला कसलीच मर्यादा नव्हती. त्या निमित्याने ठिकठिकाणी अनेक लोक एकत्र येतील आणि त्यांना देशाभिमान व देशप्रेमाची प्रेरणा मिळू शकेल अशी दूरदर्शी व्यवस्था त्यात होती. टिळकांचा हा होरा अचूक ठरला आणि पाहता पाहता गणेशोत्सवाचा प्रकार सर्व दिशांना झाला. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा फक्त एकच विशाल वृक्ष झाला नाही, त्यातून असंख्य वृक्ष निर्माण झाले.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments: